शनिवार, २४ डिसेंबर, २०११

आणखी एक दिवस बुडाला....

तो
आणखी एक दिवस बुडाला. हा सूर्य पश्‍चिमेला गेल्यावर एक अनामिक ओढ निर्माण होत आहे. सूर्याचा हा प्रवास थोडा वेगात करता आला तर... आयुष्य जर-तर वर चालत नाही. व्यवहाराच्या पक्‍क्‍या भिंतींनी आयुष्य कोंडलेलं असतं. कितीही म्हटलं तरी या भिंती मोडकळीला येत नाहीत. त्याची रंगरंगोटी होते एवढंच. आज ती कुठे असेल.. अशीच माझ्यासारखी कातरवेळी मनात हुरहूर घेऊन एकांतात बसली असेल, की कामाच्या ओझ्याखाली स्वतःला दाबून टाकून स्वतःलाच हरवून बसली असेल.. की, प्रश्‍नांच्या जंजाळात तिने स्वतःला अडकवून घेतले असेल. अनेक प्रश्‍न तिच्या मनात उमटत असतील.. मी का थांबलो नाही...? का, पुन्हा एकदा तिचा हात जोरात पकडून तिला सांगितले नाही की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही... ? अर्ध्या वाटेत का सोडलं..? .जर सोडायचेच होते तर कशाला आशेचे मोरपंख लावायचे.. कितीतरी प्रश्‍न.. प्रश्‍नांचा कोळी तिच्याभोवती आपली जाळी विणत असेल आणि ती त्यातून स्वतःला सोडवत असेल....माहित नाही. कदाचित विसरूनही गेली असेल. नव्या वाटेवर नव्या सवंगड्याबरोबर खूष असेल. काहीच माहित नाही.... जगणं इतकं अवघड या पुर्वी कधीच नव्हतं. व्यवहाराच्या भिंती इतक्‍या उंच व इतक्‍या काळ्या कधीच भासत नव्हत्या, ज्यात साध्या मैत्रीच्या नात्यासाठीही झरोका नसावा. कालप्रवाहाचा हा वेग वाढावा, त्या प्रवाहाच्या आवेगात या भिंती कोसळाव्यात आणि जगण्याला एक निमित्त मिळावं. खरे, तर हीच भावना एक निमित्त आहे जगण्यासाठी!. कधीतरी या भिंती कोसळतील हीच एक आशा आहे. कालप्रवाहाचा वेग वाढवावा आणि त्याच्या खुणा अंगावर दिसाव्यात. जख्खड म्हातारपण यावं, जिथे समाजाच्या बंधनांचा पिळ सुटलेला असेल, खुपऱ्या झालेल्या डोळ्यातूनही जाणिवा प्रकट होतील, अगदी तिथपर्यंत पोचायचे आहे. हा आजचा एक दिवस बुडाला, असे अनेक दिवस बुडावेत आणि मग तो एकच दिवस उगवावा. जो एकच दिवस जगलो तरी आयुष्य तृप्त व्हावे.... आजचा आणखी एक दिवस बुडाला...

ती
आणखी एक दिवस बुडाला.....मावळतीचे रंग खूप फिके वाटताहेत आज. आजच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसांत हा केशरी रंग केशरी वाटतच नाही. जणू आयुष्याचेच रंग फिके पडलेत की काय? असे वाटते. तो सोडून गेला याचे दुःख आहे, की त्याला जाऊ दिले हेच कळत नाही. हात सोडवून घेताना त्याचीही नक्‍कीच घालमेल झाली असेल, किंबहूना आपल्यापेक्षा जास्त त्याचीच घालमेल झाली असणार, हे निश्‍चित! वेड्यासारखं मरायचा. बोलायचा कमी, पण ऐकायचा खूप.. प्रेम करायचा... आणि ते जाणवूही द्यायचा. त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला धीरच झाला नाही. ज्यावेळी द्यावा वाटला त्यावेळी त्याने हात सोडवून घेतला होता. मोरपंखी काही दिवस त्याच्या सहवासात गेले खरे पण त्याच्या आठवणींवर कसे जगायचे. व्यवहाराच्या भिंतीपलीकडील त्याची कुजबूज ऐकावी म्हटलं तरी ते शक्‍य नाही. रितेपणा जावणतो आहे सगळा... त्याच्या नसण्याचा... तो नव्हताच कधी; पण तो येण्याची एक आस होती. तीही मावळली.. या मावळतीच्या सूर्याप्रमाणे आता अंधार आणि मग त्यातून डोकावणारा चंद्र.. चांदण्या.. याच तर सोबतीला... प्रत्येक रात्र हवीहवीशी वाटावी... चांदण्याच्या जागा बदलताना, चंद्राच्या कला न्याहाळताना रात्र सरावी... डोळ्यात झोप असतानाही अशा कितीतरी रात्री जागून काढल्यात, रात्रीसारखी सखी नाही, तिच्या खांद्यावर डोके ठेवून कितीहीवेळ रडा, ती खुलासे मागत नाही. थोपटत राहाते. आजचा दिवस संपला... असे अनेक दिवस संपतील.. कधीतरी एक दिवस नक्‍की येईल, जो रात्रसखीप्रमाणे खुलासे मागणार नाही... व्यवहाराच्या भिंती इतक्‍या जोरात कोसळतील की पलीकडची कुजबूजच नाही तर त्याची हाकही ऐकू येईल...त्या एका दिवसासाठी असे अनेक दिवस जायला हवेत.... आजचा आणखी एक दिवस बुडाला.....

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

चर्चा में युवराज

युवराजांनी टीव्ही बंद केला, रिमोट फेकून दिला आणि जोरात हाक मारली. चापलुसी करणाऱ्यांपैकी एक दोन जण धावत युवराजांच्या शयनकक्षात आले. युवराज अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होते. हातोपे मागे सारत होते, पुढे घेत होते. त्यांच्या गालावरची खळी आणखी खोल झाल्यासारखी दिसत होती. चापलुसी करणाऱ्यांना समजेना युवराज एवढे अस्वस्थ का आहेत? एकाने धीर केला आणि विचारलेच, साहेब काय झालं आहे? एवढी चिंता कशाची...? युवराजांनी एकदा चापलुसी करणाऱ्याकडे बघितलं.
अरे ! हे राज ठाकरे कोण? केवढा आहे त्यांचा पक्ष? किती राज्यात सत्ता आहे, किती आमदार, खासदार आहेत... बोला लवकर बोला...
साहेब फारसे काही नाही... महाराष्ट्र प्रदेशी 13 आमदार असलेला छोटा पक्ष आहे. आपल्या तुलनेत तर काहीच नाही. कुठे आपला पक्ष आणि कुठे राज ठाकरे यांचा पक्ष... चापलुसी करणारे जशी-जशी माहिती सांगत होते तसे युवराज संतापत होते...
अरे! एवढासा पक्ष आणि त्यांच्या नेत्याच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि आमची केंद्रात सत्ता, 9-10 राज्यांत सत्ता, तरी कोणी आमचे लाईव्ह भाषण दाखवत नाही, म्हणजे काय? आमच्या भाषणाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आतल्या पानात कुठेतरी आणि राज ठाकरे काहीही बोलायला लागले की लाईव्ह. हे काही बरोबर नाही. आपलंही भाषण लाईव्ह झालं पाहिजे शोधा काय जादू असते त्यांच्या भाषणात, ज्यामुळे राज ठाकरेंचे भाषण लाईव्ह दाखविले जाते... शोधा...
चापलुसी करणाऱ्यापैकी दुसरा एक जण पुढे झाला, साहेब राज ठाकरेंसारखे आपले भाषण लाईव्ह व्हायचे असेल तर भाषण चर्चेत यायला हवे... काही तरी असं बोललं पाहिजे, की सगळ्या वर्तमानपत्रात त्याची मेन बातमी झाली पाहिजे... पुढचे चार-पाच दिवस सगळ्या वाहिन्यांवर त्याचीच चर्चा झाली पाहिजे... विरोधी पक्षाने हिरीरीने पुढे येत त्यावर बोलले पाहिजे.
युवराजांना स्वप्ने पडू लागली... सगळ्या चॅनेलवर आपलीच चर्चा... सगळे आपल्याविषयीच बोलताहेत... युवराजांनी सचिवाला भाषण लिहायला सांगितले, ""यावेळी असे भाषण लिहा, की साऱ्या वर्तमानपत्रांची मुख्य बातमी झाली पाहिजे, चार दिवस आपलीच चर्चा झाली पाहिजे.'' सचिवांनी भाषण लिहिले... खूप मोठे भाषण लिहिले... युवराजांनी एकदा वाचले आणि फाडून टाकले... यापेक्षा जोरकस लिहा... चर्चा लक्षात ठेवा... चर्चा झाली पाहिजे... सचिवाने पुन्हा भाषण लिहिले. युवराजांनी पुन्हा भाषण फाडून टाकले... सचिवाने तिसऱ्यांदा भाषण लिहिले. युवराजांना यावेळी भाषण आवडले नाही त्यांनी स्वतः पेन हातात घेतलं आणि एका टाकात भाषण लिहून टाकलं... आता हे भाषण केलं, की आपलीच चर्चा... केवळ उत्तर प्रदेशी नाही तर महाराष्ट्रदेशीही आपलीच चर्चा... युवराज आपल्याच स्वप्नात रंगून गेले.
भाषणाचा दिवस उजाडला... युवराज स्टेजवर माईकपुढे उभे राहिले, चापलुसी करणाऱ्या काहींनी घोषणा द्यायला सुरवात केली, युवराजांनी हातोपे वर केले आणि भाषण द्यायला सुरवात केली लोक बावरून बसले... युवराज बोलत सुटले... जोरकसपणे हातवारे करीत राहिले... भाषण संपवून युवराज खुर्चीवर येऊन बसले, कसं झालं भाषण... जोरकस झालं ना...? स्वतःवर खुश होत युवराजांनी विचारलं... चापलुसी करणाऱ्याने मान डोलावली युवराजांना घाई झाली हे टीव्हीवाले काय चर्चा करताहेत... त्यावर आपले लोक काय प्रतिक्रिया देत आहेत... युवराज घाई-घाईने घरी आले टीव्ही लावला... सटासट चॅनेल सर्फ केलं सगळीकडे युवराजच दिसत होते... युवराजांनी एका चॅनेलवर रिमोट स्थिर ठेवला... चर्चा में युवराज .. लोकांच्या भावनेला ठेच... लोकांची युवराजांनी माफी मागावी... युवराजांना कळेना आपलं काय चुकलं... त्यांच्या जोरकस भाषणाची चिरफाड सुरू होती आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून त्याबाबत खुलासा मागितला जात होता... पक्षाच्या नेत्यांना उत्तर देताना कठीण जात होतं... युवराजांच्या भाषणाने पक्षाला फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्‍यता जास्त होती... युवराज बावरले... त्यांनी सचिवाला विचारलं, ठाकरे भाषण करतात त्यावेळी त्यांच्यावर स्तुतिसुमने आणि आपण बोललो की जाब, असं का? सचिव हळूच कानात बोलला... साहेब विरोधक खरं बोलण्यासाठी भाषण करतात आणि सत्ताधाऱ्यांना खरं लपवावं लागतं...

****"सकाळ'मध्ये 20 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****




रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

डबल बेल...

बाईंनी पुन्हा घड्याळात बघितलं. आपल्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवला, पण केस काही बसले नाहीत... साडी जरा सारकी-वारकी करायचा प्रयत्न केला, आणि बाई बसमध्ये चढल्या. कंडक्‍टरने डबल बेल मारली आणि जोरात घोषणा केली, "इथून पुढच्या प्रवासाला आता आणखी दोन रुपये तिकीटवाढ करण्यात आली आहे.' तिकीट दरवाढ ऐकल्यावर बसमध्ये कुजबूज सुरू झाली... हा अन्याय आहे? मागच्याच थांब्यावर तिकीट दरवाढ करण्यात आली होती. आता परत दरवाढ... अशक्‍य आहे... आम्ही तिकीट दरवाढ खपवून घेणार नाही, कपाळाला भगव्या पट्ट्या बांधलेल्या काही प्रवाशांनी जोरात घोषणा केली. या प्रवाशांबाबत लांब फटकून राहणाऱ्या काही हिरव्या पट्ट्या बांधलेल्या लोकांनीही अशीच घोषणा केली... बाई सगळं बघत होत्या... समजून घेत होत्या... तिकीट दरवाढीला विरोध करणाऱ्यांबाबत त्यांना आता "ममत्व' वाटू लागले तर... आता या सगळ्याच्या आंदोलनात बाईही पडल्या तर... अवघड होईल म्हणून कंडक्‍टर भांबावला होता... त्यानं आशेनं चालक सरदारजींवर नजर खिळविली... पण त्यांनी हूं की चूं केलं नाही... गाडीतील गोंधळ वाढतोय तसा त्यांनी आपली तुरबान आणखी खाली खेचत आवाज कानापर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्यायला सुरवात केली. बाईंच्या हे ध्यानी आलं. त्यांनी आता या कालव्यात आपलाही आवाज मिसळायला सुरवात केली. तुरबानीतून आवाज पोहोचेपर्यंत आवाजाचा पिच मोठा करत त्यांनी घोषणा दिली... अन्यायी तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... तिकीट वाढ मागे घेतलीच पाहिजे... बसमधल्या साऱ्यांचेच लक्ष आता बाईंवर खिळून राहिले. बाईंनी दिलेल्या स्टेपनीवरच तर गाडी चालू आहे. त्यामुळे बाई म्हणताहेत त्या प्रमाणे तिकीट दरवाढ मागे घेतली जाईल... अशी सगळ्यांना अशा लागली... कपाळावर भगव्या पट्ट्या बांधलेल्या प्रवाशांना घाई झाली... बाईंनी आता स्टेपनी काढून घ्यावी... म्हणजे ही गाडी इथेच थांबेल... सरदारज
ी जातील आणि शेठजी गाडी चालवतील... त्यांनी मनाचे मांडे खायला सुरवात केली... बाईंच्या घोषणेने कंडक्‍टर गोंधळला. आता या वळणावर जर बाईंनी स्टेपनी काढून घ्यायचा निर्णय घेतला तर पुढचा प्रवास करायचा कसा... आणखी कोणाकडे स्टेपनी उपलब्ध होऊ शकते का? झाली तर ती किती काळ टिकेल... कंडक्‍टरच्या डोक्‍याचा भुगा झाला... तो सरळ सरदारजींच्या पाशी गेला... बाई नाराज आहेत... स्टेपनी मागितली तर... काही तरी उपाय केला पाहिजे... बाईंना समजावलं पाहिजे... सरदारजींनी आरशातून बघितलं... बसमध्ये गोंधळ सुरू होता... भगवे, निळे, हिरवे सगळे पट्टे बांधलेले तिकीट दरवाढीचा विरोध करत होते... त्यातून त्यांना बाई दिसल्या... बाई आपल्या कपाळावर आलेले केस मागे घेत जोरात घोषणा देत होत्या.... तिकीट दरवाढ मागे घेतलीच पाहिजे... घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. त्यांचे काही सहकारी त्यांच्या घोषणेला साथ देत होते... आता हे सगळे जर ओरडत राहिले तर गोंधळ वाढणार हे बघून सरदारजींनी गाडी धाब्यावर थांबविली... बाईंसाठी लस्सी मागवली... लोकांना वाटू लागलं. बाई चर्चा करताहेत... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार... काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या... भगवे पट्टेवाले चर्चा फिसकटण्याची वाट बघू लागले... आता चर्चा फिसकटेल... बाई स्टेपनी काढून घेतील... त्यांचे मनाचे मांडे सुरू झाले... धाब्यावरून गाडी सुटायला लागली... सरदारजींनी स्टार्टर मारला... बाई बसमध्ये चढल्या... आता साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली... तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार का? स्टेपनी काढली जाणार का? काही वेळ बाई बोलल्याच नाहीत... कंडक्‍टरने डबल बेल मारली... लोक कुजबुजायला लागले... बाईंनी घोषणा केली... पुढच्या थांब्यावर आणखी दोन रुपयांनी तिकीट दरवाढ होणार होती, माझ्यामुळे ती थांबली... भगवे पट्टेवाले, हिरवे पट्टेवाले, निळे पट्टेवाले मघाच्या घोषणा देऊन दमून गेले होते... कंडक्‍टरने पुन्हा डबल बेल
मारली... या वेळी सरदारजींनी बसमधले दिवे बंद केले... कोणी काही बोलत नव्हते, घोषणा नव्हत्या... कुजबुज नव्हती... होती ती केवळ झोप...!!

****"सकाळ'मध्ये 13 नोव्हेंबरला छापून आलेला माझाच लेख****

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

खाली डोकं वर पाय...

बाबांनी आपल्या काळ्या लांब वाढलेल्या दाढीवरून पुन्हा हात फिरविला आणि आपला डावा डोळा आणखी लहान करत मानेनं आणखी एक मुरका मारला... प्रेक्षकांतल्या काही बायका लाजल्या... "तो अब मै आप को शीर्षासन कर के दिखाता हुँ!' असं म्हणत बाबांनी आपलं खाली डोकं वर पाय केले... लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या... बाबांना नेमके काही कळेना... अरे मी इथे योग शिकवतोय आणि लोक त्याला सर्कस समजून टाळ्या काय वाजवताहेत... बाबा गरजले... "टाळ्या वाजवू नका, तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा...' काही पोरा-सोरांनी प्रयत्न केला; पण तो पार फसला... बाबा पुन्हा पुन्हा स्टेजवर उड्या मारत होते... पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... काही जण बाबांप्रमाणे करायचा प्रयत्न करत होते; तर बरेच जण बाबांचा स्टेज परफॉर्मन्स बघून हसत होते, टाळ्या वाजवत होते... बाबांनी मोठ्याने स्टेजवर उडी मारली आणि एका झटक्‍यात खाली डोके वर पाय केले आणि तशाच अवस्थेत घोषणा केली... या सरकारला असंच खाली डोकं वर पाय करायला लावीन... प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजविल्या आणि बाबांना प्रोत्साहन दिलं...

बाबा मनोमनी खूश झाले... आपल्या वर्गाला येणाऱ्या प्रेक्षकांनी साथ दिली की मग झालं... बाबा गावोगाव सांगत सुटले... लोक त्यांचं ऐकायचे... त्यांच्या शीर्षासनाला टाळ्या ठोकायचे आणि घरी परतायचे... बाबांना वाटायचं, लोक आपल्या मागे आहेत, त्यांच्या जीवावर आपण सरकारला खाली डोकं वर पाय करायला लावू...
मग बाबा जोरात उड्या मारायचे... हातवारे करत सुटायचे... तिरकी मान करत डावा डोळा आणखी बारीक करत राहायचे.... शीर्षासन कसं आरोग्याला चांगलं आहे सांगायचे... देशासाठी, लोकांसाठी शीर्षासन सरकारला करावंच लागणार हे ते पुन्हा पुन्हा सांगत होते... लोक माना डोलवत होते... बाबा खूश होत होते... दिवस ठरला... स्टेज ठरलं... सरकारला धडा शिकवायला बाबांनी मुहूर्त बघितला... बाबांचा आवेग बघितल्यावर सगळ्यांनाच वाटायला लागलं, आता सरकारचे खाली डोके वर पाय होणार... सरकार घाबरणार... बाबा मनोमनी खूश होते... बाबा स्टेजवरून सांगत होते... आदेश देत होते... लोक पोट आत घेत होते, बाहेर काढत होते... बाबांना आता विश्‍वास आला, आता आपण सरकारला शीर्षासन करायला लावू... बाबा दाढीवरून हात फिरवत होते, डोळा बारीक करून प्रेक्षकांकडे बघत होते... आता सरकारचे शीर्षासन नक्‍की... रात्र चढत चालली तशी बाबांच्या स्टेजवरच्या उड्या वाढल्या... लोक पेंगाळून झोपले... पण बाबा मात्र कधी पोट आत घेत, कधी बाहेर सोडत... असंच बाबांनी पोट आत घेतलं आणि ते बाहेर काढणार इतक्‍यात सरकारच्या सैनिकांनी त्यांनाच स्टेजवरून बाहेर काढलं... बाबा तोंड लपवत-छपवत बाहेर आले... लोक चिडले... सरकारने बाबांचा घात केला... सैनिकांची कारवाई रात्री झाली... सरकारला काही सुचेना... बाबांचा महिमा कसा कमी करायचा... सरकारचा एक मानकरी पुढे झाला... बाबांच्या दाढीला हात घालायची त्यानं घोषणा केली... लोक बोलू लागले, आता बाबा आणि यांच्यात चकमक उडणार... बाबा सांगत राहिले, नखावर नख घासत राहा... केस काळे ठेवत राहा... मानकऱ्याच्या लक्षात आलं... लोकांना नखावर नख घासायला सांगणाऱ्या बाबांच्या दाढीचे दोन केस पांढरे आहेत... मानकऱ्याने लगेच ढोल वाजवायला सुरवात केली... बाबांच्या दाढीत पांढरे केस... बाबांचं हे काम एकट्याचे नसून "सांघी'क आहे... लोकांनाही बाबांच्या दाढीतले हे पांढरे केस दिसू लागले... लोक कु
जबुजू लागले... मानकऱ्याचे काम झाले... सरकारला संधी मिळाली... सरकारचं खाली डोकं वर पाय करण्याच्या गप्पा मारणाऱ्या बाबांचंच सरकारने खाली डोकं वर पाय केलं होतं... आणि त्यांच्या संघातलेच इतर जण "सर्कस' कशी झाली म्हणून टाळ्या वाजवत राहिले...!!

6 नोव्हेंबरच्या सकाळ मधील माझा लेख

रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

पोपटपंची

सारथ्याने लगाम हातात घेतले आणि चाबूक मारला. घोडे उधळले... रथाने वेग घेतला. हवेत एक धुळीचा लोट उठला... कोणी म्हणाले, आता रथ हाकून काय उपयोग, फार वेळ झाला... कोणी म्हणाले, आता रथ हाकला तरी रथपत्यालाच त्याचा फायदा होईल असे म्हणता येणार नाही... काहींनी मात्र रथपती अजून कसे पट्टीचे रथपती आहेत आणि तेच कसे उद्या सिंहासनावर बसतील, हे ठासून सांगायला सुरवात केली... रथपती मात्र हवालदिल झाले होते... रथातून उठणाऱ्या धुळीपेक्षा या अशाच धुळीची वावटळं त्यांच्याभोवती फिरत होती... यातून मार्ग कसा काढायचा हेच त्यांना कळत नव्हतं... एवढ्यात...
नमस्ते, नमस्ते, नमस्ते....रथपतींकडे बघून पोपट जोरात किंचाळला.. त्या पोपटाकडे बघून रथपत्याने रथ थांबण्यिाचा आदेश दिला. हा पोपट खूप महान दिसतो. नाही तरी आपल्या मनात असलेला "नमस्ते' त्याला कसं कळलं. रथपती खाली उतरले. समोर पोपटवाला आपल्या पोपटाला डाळ खाऊ घालत होता.
महाराज... महाराज... रथपतींनी धोशा लावला... पोपटवाला खूश झाला. एवढा मोठा रथपती, पण आपल्यासमोर येऊन थांबल्याचे त्याला आश्‍चर्य वाटले. पण जमेल तितके आश्‍चर्य त्याने लपवले.
रथपतीने पुन्हा धोशा लावला...
महाराज... महाराज... नमस्ते सदा वत्सले केलं, यात्रा काढल्या, लोहपुरुषाची बिरुदावली मिरवून घेतली, अनेक जिने चढलो तरी माशी कुठं तरी शिंकते आहे. पंतप्रधानपदाची रेष काही हातावर उमटत नाही... काही तरी उपाय सांगा महाराज... उपाय सांगा? त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने पोपटवाल्यासमोर "नोट' ठेवली. पोपटवाल्याने एकदा नोटेकडे आणि दुसऱ्यांदा रथपतींच्या चेहऱ्याकडे बघितले.
"लाल'बुंद चेहऱ्यावरची चिंतेची "कृष्ण' रेघ पोपटवाल्याला उठून दिसली.
पोपटवाल्याने नोट दाखवताच पोपटाने एक कार्ड चोचीत पकडले आणि पोपटवाल्याच्या हाती दिले.
""तुम्ही म्हणता तेवढं पक्षानं तुम्हाला दिलं नाही, लोकांना तुम्ही पुढं आणता, पण लोक मात्र तुमचं नाव घेत नाहीत. तुम्ही धाडसाचे, पण आता वय साथ देत नाही... "रामा'चं नाव सोडल्यापासून त्रास फार होतो आहे. ''
पोपटवाल्याने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. रथपतींची अस्वस्थता वाढू लागली. हा पोपट भलताच हुशार निघाला.
""महाराज भूतकाळ चांगला सांगितलात; पण भविष्याचं काय? पंतप्रधान होईन का नाही...?''
पोपटवाल्याने मघाशी ठेवलेल्या नोटेकडे पुन्हा बघितलं. रथपतींच्या रथाच्या मानाने "नोट अगदीच तोकडी होती. त्या नोटेकडे बघून काय भविष्य सांगायचं हेच त्याला कळेना.
""तुमची इच्छा फार, पण दैव साथ देत नाही. तुमच्या मार्गात चार चार ग्रह वक्री आहेत. त्यांची शांती केली पाहिजे. ''
""त्यासाठी उपाय काही महाराज... ''रथपत्याने आग्रह सोडला नाही.
""उपाय भारी आहे... पण झेपला पाहिजे. नागासाठी दुधाचा पूर आणला पाहिजे. मेद आणि मोद दोन्ही वाढले, की पदापर्यंत पोचण्याचा मार्ग आणखी कठीण... त्यामुळे तब्येत चांगली ठेवण्यासाठी "गड' सर केले पाहिजेत. ''
""महाराज मग तरी मार्ग सुकर होईल ना?''
""एवढं करूनही खरे तर सांगता येत नाही.''
""का का महाराज? आता आणखी काही अडचणी..?''
""अडचणी खूप आहेत.'' पोपटवाल्याने "नोटे'कडे पुन्हा लक्ष देत सांगायला सुरवात केली. ""अहो राहू आणि केतूचा अनिष्ट काळ चालू आहे. हे दोन्ही जोपर्यंत तुमच्या कुंडलीत आहेत तोपर्यंत या पदापर्यंत पोचणे अवघडच.''
""मग यावर काही उपाय...?''
""उपाय आहे, पण तो जालीम आहे. "भागवत' धर्माचा आधार घ्यायला पाहिजे... त्या मोहनासमोर नतमस्तक झालं की सगळं ठीक होतं. ''
पोपटवाल्याचा हा उपाय ऐकून रथपती उठले. त्यांनी पोपटवाल्याला नमस्कार केला आणि ते निघू लागले.
एवढ्यात पोपटवाला मोठ्याने बोलला,
""आणखी एक करायचे... लोकसभेत सरकार पाडण्यासाठी "नोट' कामाला आली नसली तरी चांगलं भविष्य ऐकण्यासाठी "चांगली नोट नकामी येते.''

***30 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'मध्ये छापून आलेला माझा लेख***

उंटाचं पोर...

नदीच्या त्या पुलावरून जाताना त्याला नेहमी तिथं थांबावं वाटायचं. नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या त्या हिरवळीवर मस्त पडून राहावं, त्या हिरवळीवरून प्रतिबिंबित झालेली उन्हं अंगावर झेलावीत. रात्री तिथून चांदण्यांचा प्रकाश अंगावर ल्यावा, असं काहीबाही त्याला वाटत राहायचं. नदीवरील पुलावरून जाताना त्याची जी स्वप्नं सुरू व्हायची ती ऑफिस येईपर्यंत. स्वप्न बघणं हा त्याचा जणू नित्यक्रमच बनला होता. नदीपेक्षा तिचा किनारा त्याला फार आपला वाटायचा. त्या किनाऱ्यावर बसून दिवस अन्‌ दिवस घालवावा, असं त्याला वाटत राहायचं. पण ही स्वप्नांची माळ ऑफिसच्या दारात येताच विरून जायची. कामाच्या ओझ्याखाली माळेचे मणी पिचून जायचे. पण दुसऱ्या दिवशी परत ते मणी चमकत त्याच्या डोळ्यासमोर यायचे आणि त्यातील धाग्याप्रमाणे तो त्यात गुंगून जायचा. आजही त्यानं पुलावरून जाताना सहज त्या नदीकिनाऱ्याकडं बघितलं आणि त्याला आश्‍चर्य वाटलं. एक उमदा उंट... छे उंटीण असावी ती... तिच्यासोबत एक पिल्लूही होतं. अगदी तिच्यासारखंच... त्या किनाऱ्यावर होती... ती उंटीण कुणाचीही पर्वा न करता त्या कुरणात हिंडत होती. तिचं ते पिल्लू तिच्या मागे मागे करत होतं. त्यांच्या मागे दोन-तीन गाढवं आणि एखाद-दुसरी मेंढी. त्या हिरव्यागार हिरवळीवर मनसोक्‍तपणे चरणारी ती उंटीण, त्या गाढव आणि मेंढ्यांचे जणू नेतृत्वच करीत होती. कळपाच्या प्रमुखाप्रमाणे ती डौलदारपणे, आपल्याच मस्तीत चरत होती. त्यानं गाडी थांबविली आणि त्या उंटीणीला न्याहाळायला सुरवात केली... तपकिरी रंगाचे ते उमदे जनावर एखाद्या राजाच्या सांडणीस्वारांच्या
तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सैनिकाने प्रेमाने वाढवावे त्याप्रमाणे असावे असे वाटले. तिचे ते भुरभुरीत केस नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांना कुठलीच दाद देत नव्हते. कशाचीच तमा न बाळगता आपल्या ऐटीत ती उंटीण चरत होती आणि तिच्या मागून ते पिल्लू... ती गाढवं... आणि मेंढ्या...
ती उंटीण चरत होती त्याच्या पलीकडेच थोड्या अंतरावर काही माणसांची लगबग चालू होती. गेल्या पावसाळ्यात पुराने खचलेली जमीन भराव टाकून ते ती सपाट करत होते.
मग रोज तो त्या पुलावर थांबून त्या उंटीणीला आणि तिच्या पिलाला निरखायचा. ती उंटीण आणि तिचं ते विजातीय कुटुंब आपल्या मस्तीत त्या कुरणावर ताव मारायचं. ती उंटीण मध्येच आपल्या पिलाला चाटायची... त्याची माया करत राहायची..
आता त्या पलीकडचा भराव टाकून तिथं पालं उभी राहिली होती. कधी कधी तो आता त्या उंटीणीबरोबर त्या पालांकडेही नजर टाकायचा. त्या पालांतून खेळणारी मुलं आणि तेथील माणसांना निरखायचा. खरे तर त्यांच्या त्या मुक्‍त जगण्याचा त्याला हेवा वाटायचा. खास करून त्या पालातील "त्या' माणसाचा. तो त्या उंटीणीप्रमाणेच त्या पालांचा प्रमुख असावा. काळाकुट्ट, पिळदार शरीराचा, त्याच्या दंडावरचा तो काळा दोरा आणि उंटीणीच्या गळ्यातील काळी दोरी यामध्ये त्याला बरेच साम्य दिसायचे. तो पुलावर थांबून त्याला निरखायचा. शहरात फिरतानाही तो कुठे कुठे दिसायचा, कधी गटार खणताना, कधी कुठल्या इमारतीच्या बांधकामावर काम करताना, तर कधी त्या उंटीणीवर पोरांना बसवून फेरफटका मारताना... अलीकडे तो त्याच्याकडे बघतो हे त्यालाही कळले होते. त्यामुळे तोही याच्याकडे बघून ओळखीचा हसायचा, पण दोघांत बोलणं व्हायचं नाही. कधी कधी रात्री ऑफिसमधून परतताना त्याच्या पालाशेजारी लावलेली शेकोटी त्याला दिसायची. त्या शेकोटीभोवती तो आणि त्याची बायको आणि त्याची ती दोन चिल्लीपिल्ली दिसायची. त्या कडाक्‍याच्या थंडीत ती तिथंच झोपलेली असायची. कधी अंगावर पांघरुण असायचे तर कधी तेही नसायचे. तो मात्र रात्रीच्या जागत्यासारखा त्या सगळ्यांसाठी जागा असायचा. ती उंटीण आणि तिचं पिल्लूही तिथेच असायचे... थंडी संपली तसे ते नदीभोवतीचं ते गवतही आता खुरटलं होतं. उन्हाच्या सरळ किरणांना ती उंटीण जुमानायची नाही. खरे तर ती सरळ किरणांना आपल्या तिरप्या मानेवर झेलत जणू आव्हान द्यायची... भर उन्हात काम करताना तिचा मालकही उन्हाला आव्हान द्यायचा. त्याच्या त्या रापलेल्या काळ्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकायचे... आता अलीकडे तो त्याच्याकडे बघायचा. हसायचा. "क्‍या साब' असं बोलायचाही. त्यालाही बरं वाटायचं.
पावसाळा सुरू झाला तसं नदीचं पाणी वाढू लागलं. नदीने आपला विस्तार करायला सुरवात केली. तिथली बरीच पालं उठली होती... फक्‍त त्याचे पाल तिथे तसेच होते... पावसाच्या धारांत पालांचे कापड टिकाव धरत नव्हतं. त्यावरचा प्लास्टिकचा कागद वाऱ्यावर उडून जायचा. तो मालक त्या पालाला ठीक करायचा प्रयत्न करायचा... पण तो कुठे टिकाव धरणार होता... तो आता त्याच्याकडे बघायचा; पण हसायचा नाही. ती उंटीण आणि तिचं ते पिल्लू आता नदीपासून दूर रस्त्याकडेला झाडाचा आडोसा घेत उभे राहिलेले असायचे... तिचे ते विजातीय कुटुंब एक एक करत गायब झालं होतं. बहुतेक मालकाने ते विकले असावे. आता पावसामुळे त्या उंटीणीचे तपकिरी केस काळे पडले होते. त्या उमद्या जनावराला काय करावे तेच कळत नव्हते. पाऊस त्याच्या अंगावर पेलवत नव्हता. जणू पावसाने त्याचे अंग कुजवायला सुरवात केली होती. अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्याकडे बघवत नव्हते. तिच्या जखमी कासेमुळे पिलाचीही उपासमार होत असावी. पावसाने ते फार बिथरलं होतं. त्या एवढ्याशा जीवाला तो पाऊस सहन होत नव्हता... येणारे-जाणारे रस्त्यात थांबून त्या उंटीणीकडे बघायचे, पिलाबाबत हळहळायचे आणि मालकाला शिव्या घालायचे... पाऊस जोराचा सुरू होता... नदीचे पाणी वाढत होते... एके दिवशी त्या पालाशेजारी कसलीशी गर्दी झाली म्हणून तो पाहायला थांबला... काही प्राणीप्रेमी त्याची ती उंटीण घेऊन चालले होते... तो दयावया करत होता. पाया पडत होता... जगण्याचे तेच एक साधन राहिल्याचे वारंवार सांगत होता. पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते... प्राणीप्रेमींपैकी एकाने त्या उंटीणीचे पिल्लू ओढत आणले. त्याने त्याच्यासमोर उभे केले आणि त्याला दोन शिव्या घातल्या.
बघ. या छोट्या जीवाचे हाल काय झाले आहेत... तुम्हाला जनावरं सांभाळता येत नाही तर पाळता कशाला... त्यातील एकाने आणखी शिवी हासडली. तो रडत होता. गयावया करत होता. आता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी एक मोठा ट्रक आणला.. त्यात त्या उंटीणीला आणि त्या पिलाला घातले. ट्रक गेला, तशी गर्दी ओसरली. पावसाची रिमझीम सुरूच होती. परवाच्या जोराच्या वादळी पावसानं त्याचे ते पाल पार विस्कटून गेलं होतं. तो, त्याची बायको आणि त्याचं ते चार-पाच वर्षांचं पोर त्या गेलेल्या ट्रककडे शून्य नजरेने बघत होते. पुढे जावं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर द्यावा म्हणून तो पुढे गेला. तो पुढे झाला तशी त्याची बायको पालात शिरली...
त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. एवढ्यात त्याच्या डोळ्यातील पाण्याचा लोट बेभानपणे सुटला.
"साब..' एवढाच शब्द त्याला ऐकू आला अणि मग पालाच्या आत गेलेल्या त्याच्या बायकोचा जोराचा हुंदका....
साब ए लोक पुछते है, उस बछडे को देखा क्‍यों नही... परसो रात आयी बाढ में मेरा बच्चा बह गया... पुलीसने कहा यहॉं गैरकानुनी रहते हो! ...किसी से कुछ नही कहना... नही तो जेल में सड जाओगे...
त्याला काही सुचेनासं झालं... इथं उंटाच्या पोरापेक्षा माणसाचं पोर फार स्वस्त झालं होतं...!!

*** आकांक्षा दिवाळी अंकात छापून आलेली लघुकथा***

दोन पत्रं


आता वाहनांची वर्दळ बरीच कमी झाली होती. रात्रीचे 12 वाजून गेले असतील, मघापासून पुलाभोवती फिरणारा तो पुलाखाली आला. पुलाच्या एका खांबाशेजारी एक दगड होता, त्यावर तो रेलून बसला. दिवसभर वणवण करत भटकलेले शरीर थकून गेलं होतं. पण पोटातील भूक डोळ्यातील झोपेला अडवून धरत होती. त्यानं खूप प्रयत्न केला; पण झोप येत नव्हती. डोळ्यासमोरून बायको आणि पोराचा चेहरा जात नव्हता; काय करत असतील... हाच विचार त्याच्या मनात येत होता... कदाचित बायको रडून रडून थकून गेली असेल... बिचारीच्या डोळ्यातील पाणी आटलं असेल पण हुंदका अजून तसाच असेल.... खूप प्रेम करायची...तिच्यामुळेच पूर्णत्व आलं आहे.... पण.... पोराला अजून काही कळत नाही. पण आपला बाबा चार दिवसांपासून घरी का परतला नाही, हा प्रश्‍न त्यालाही पडला असेलच. हा प्रश्‍न विचारून विचारून त्यानं आईला भंडावून सोडलं असेल. त्याला दोघांची काळजी वाटली... त्यांच्या आठवाने त्याचे डोळे भरुन आले...त्याने हलकेच गालावर आलेले थेंब पुसले...

चार दिवसापूर्वी ऑफीसला जातो सांगून तो बाहेर पडला होता. तो अद्याप घरी पतला नव्हता. चार महिन्यापूर्वीच कंपनीने त्याला मंदिच्या कारणावरून काढलं होतं. बायकोला हा धक्‍का सहन होणार नाही... बिचारी फार सोसते आणि आता विचारांनीही खंगायची... लग्नापासून तिच्या अंगाला तसं काही लागलंच नाही...कदाचित मला सोडून जाईल...छे ती सोडून जाण्याचा विचार येताच त्याला कसंतरी झालं... तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. ती आहे म्हणून मी आहे....वीज चमकावी तसा तो विचार त्याच्या मेंदूतून सरसरला.... त्यामुळे त्यानं ही गोष्ट बायकोला सांगायचं टाळलं.मग तो रोज ऑफीससाठी म्हणून बाहेर पडायचा आणि नोकरी शोधत कंपन्यांची दारं झिजवत राहायचा. दिवस जात होते आणि जमा पुंजी संपत होती. दोन महिने खुळ्या आशेतच गेले. आता त्याला निराशा येऊ लागली होती, पण काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत म्हणून तो रोज घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. पण काही उपयोग व्हायचा नाही.... घरात बायको-पोरापुढे हसताना... त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना त्याची नजर चोर बनायची... त्याची बायकोही त्याच्या नजरेत नजर मिसळायला टाळायचीच.... चार दिवसांपूर्वी तो असाच घराबाहेर पडत होता एवढ्यात बायकोचे ते शब्द त्याच्या कानावर पडले.... पोरगं कसला तरी हट्ट करत होतं, त्याची आई त्याला समजावत होती.
आज बाबांचा पगार होणार आहे, ते नक्की आणतील हं !
तिचा तो "नक्‍की' शब्द त्याला दिवसभर टोचत राहीला. संध्याकाळ झाली... मंदिराच्या पायऱ्यांवरुन तो खाली उतरला.... आता घराकडे जायचं तर पोरगं हट्‌ट करणार... त्याला आणि बायकोला समजाविताही येणार नाही....कदाचित आपल्याला नोकरी नाही म्हणून ती सोडूनही जाईल... छे तिने सोडून जाण्याची कल्पनाही त्याला सहन झाली नाही.... त्याला काहीच सुचेना...
तो मटकन खाली बसला... थोडावेळ तिथेच बसून राहिला.... आज घराकडेच जायचं नाही हे त्यानं मनाशी पक्‍क ठरवून टाकलं...मग शहरात फिरत राहिला रात्री एका बसमध्ये चढला कंडक्‍टरने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं.... बस कुठे निघाली हेही त्याला माहित नव्हतं.. एका स्टॉपवर बस थांबली.. सगळे उतरले हाही उतरला... रात्र बरीच झाली होती....मग तो रस्त्यावरुन फिरु लागला.... दिवसभराच्या कंटाळ्याने पाय पुरते थकले होते...त्याची नजर कुठे निवारा मिळतो का याचा शोध घेऊ लागली.... तिथल्याच रस्त्याच्या एका पुलाखाली त्यानं आपलं ठाण मांडलं. आणि तिथे तो झोपून गेला.....
आता गाड्यांचा आवाज पूर्ण मंदावत होता. गेली चार दिवस तो या पुलाच्या आधाराने जगत होता. कपडे आता मळके म्हणण्यापलिकडे गेले होते. दाढी वाढली होती. आणि चपलाचा तुटका बंद त्याच्या भिकारीपणांच्या लक्षणांना आणखी अधोरेखीत करत होता. दोन दिवसापूर्वी सकाळी फिरायला येणाऱ्यापैकी कोणीतरी त्याच्यासमोर शिळी चपाती ठेवली; त्यावेळी तो मनाशीच हसला. दुपारपर्यंत त्यानं त्या चपातीला हात लावला नाही. नंतर मात्र पोटाने मनावर विजय मिळविला.चपातीचा प्रत्येक घास खाताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या... नंतर तिसऱ्या दिवशी आणि आजही कोणीतरी चपात्या आणून त्याच्यापुढे टाकल्या..... त्याला पहिल्यांदा त्या खाव्यात असं वाटलं पण नंतर त्यानं धीर केला त्यानं हात लावला नाही... दुपारी कधीतरी कुत्री त्याभोवती जमा झालेली त्यानं बघितलं आणि मग तो वेड्यासारखा हसत राहिला....
आता त्याला काही सुचत नव्हतं... कुत्र्याचं जगणं त्याला नकोच होतं....त्यानं खिसा चाचपला.... पेन अजून खिशात होते. त्यानं समोरच्या कचरा कुंडांतील एक कागद उचलला आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालायला लागला.
दुसऱ्या दिवशी पहाटे रेल्वे पोलिसांना रुळावर एक बॉडी मिळाली आणि खिशात एक पत्र
प्रिय,
रिमा.
आपल्या लग्नाला 3 वर्षे झाली. या तीन वर्षात जेवढं सुख देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीची सगळी वचनं मी पाळण्याचा प्रयत्न केला; पण आता ते शक्‍य नाही. तू सोडून जाण्यापेक्षा तू सोडून जाण्याची भीतीच मोठी आहे...ही व्दिधा सहन होत नाही... जगायचं तुझ्याशिवाय ही कल्पनाही सहन होत नाही..... म्हणून मी जगाचा निरोप घेतोय; जमलं तर माफ कर.
तुझाच रघू

पोलिसांनी पत्र वाचलं आणि त्या पत्रावरील पत्ता. त्या पत्त्यावर ते पोचले तर घराला मोठं कूलूप होतं. पोलिसांनी शेजारी चौकशी केली. त्यांना एक पाकिट मिळाल आणि त्यात रघुच्या नावाने एक पत्र


रघु.
आपल्या लग्नाला तीन वर्षे झाली. पण या तीन वर्षात मी तुमची कधीच होऊ शकले नाही... सप्तपदीची वचंन मी पाळू शकले नाही. खरे तर मी हे आधीच सांगायला हवं होतं... मनाविरुद्ध लग्न झालं होतं माझं... मला तुम्हाल धोका द्यायचा नव्हता....त्यामुळे नेटाने तीनवर्षे संसार केला पण आता हि व्दिधा सहन होत नाही... त्यामुळे मी आता सोडून जात आहे कायमचीच.... सोबत पिंटूंला घेऊन जात आहे... जमलं तर माला माफ करा.



*** 27 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'च्या स्मार्ट सोबतीमध्ये छापून आलेली माझी लघुकथा ***

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

पौर्णिमा...

तो
गॅलरीत उभं राहून तासन्‌ तास चंद्र न्याहाळण्यात काय मजा असते कोणास ठाऊक. पण ती न्याहाळत बसायची... रात्री तीन तीन वाजता उठून गॅलरीतून चंद्र बघायची... हा चंद्र किती वेगळा भासतो नाही? तिचा नेहमीचा प्रश्‍न.. या प्रश्‍नाचे तिला उत्तर हवे असायचेच असे नाही... पण ती रोज हा प्रश्‍न विचारायची... अशा वेळी कधी चहा किंवा कॉफीचा मग तिच्या हाती दिला की नुसती हसायची... गालातल्या गालात... तिच्या त्या गोबऱ्या सावळ्या गालांवर एक चमक दिसायची.... चंद्राचा प्रकाश तिच्या गालावरून ओघळत राहायचा... ती चंद्राला न्याहाळात राहायची आणि मी तिला... चंद्राची कितीतरी रूपं तिनं कॅमेराबद्ध केली होती... प्रत्येकवेळा तिच्या नजरेतून दिसणारा चंद्र वेगळा भासायचा... तो तिचा चंद्र होता... जणू तिच्यासाठीच रोज उगवायचा... तिच्या भावनांच्या वेग आवेगाप्रमाणे आपली रूपं बदलायचा... कधी झावळ्यांच्या आडोशातून तिला बघायचा तर कधी ढगांशी लपाछपी खेळायचा... तिच्या विस्कटलेल्या केसांत जणू रातराणीचा गंध भरत राहायचा... ती होतीच तशी... जगण्याची मजा लुटणारी... ही अमावस्या नसतीच तर?... कधी कधी ती प्रश्‍न विचारायची.
""अगं अमावस्या आहे, म्हणूनच तर चंद्राच्या या कला दिसतात ना!''
माझं हे उत्तर तिला कळायचं, पण पटायचं नाही... पण मग ती जास्त बोलायची नाही, गप्प राहायची. तिनं बहुतेक अमावस्या स्वीकारली होती... अशा कितीतरी अमावस्या तिनं स्वीकारल्या होत्याच, कदाचित त्या सगळ्या अमावस्या विसरण्यासाठीच ती चंद्राला जवळ करत होती... त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठीच... पण कधी कधी या आठवांचे ढग एवढे गडद व्हायचे की त्यातून चंद्र दिसायचाच नाही... मग एक हुंदका गॅलरीतून यायचा... अशा वेळी तिच्यासोबत असावं... हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवावा, असं वाटायचं. पण काही ढग गळलेलेच बरे म्हणून मग मीही लांब राहायचो. तिच्या मोकळ्या होणाऱ्या आकाशासाठी... मग त्यानंतर तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसायचा पूर्ण... अपूर्णतेची त्यात छटाही असायची नाही.

--------------------------

ती

त्याला चंद्र आवडतो का माहीत नाही... नसेल. कदाचित असेलही; पण... आपल्यासाठी तासन्‌ तास गॅलरीत बसून चंद्र बघायचा... आपण काहीबाही बडबडत राहायचो. पण तो नुसता गप्प बसायचा ...कधी कधी वाटायचं, हा चंद्राकडे बघतो की आपल्याकडे?... एकदा त्याला विचारलंही, ""अरे चंद्र बघ किती मस्त दिसतोय, पौर्णिमा हा पूर्णत्वाचा उत्सव असतो बघ.. अपूर्णतेचा लवलेशही नसतो...'' त्यावेळी एकदाच म्हणाला होता,
""पूर्णत्वात मजा नाही... पूर्णत्व आलं की लय सुरू होते... त्यामुळे मजा आहे ती अपूर्णतेत... त्याला अपूर्ण राहायला आवडायचे... तो पाण्याचा ग्लासही पूर्णपणे प्यायचा नाही... थोडं पाणी शिल्लक ठेवायचा... त्यामुळे तो बहुतेक वेळा चंद्राकडे न बघता आपल्याकडेच बघत असल्याचा भास व्हायचा... रात्री तीन-तीन वाजता आपल्यासाठी कॉफी देताना त्याचा चेहरा असाच द्वितीयेच्या चंद्रासारखा दिसायचा.... पूर्णत्वाची आस असलेला... पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला तो वेगळाच आहे.... त्याचा चेहराच अनेकवेळा अमावस्येत साथ देतो... तो नसलेल्यापणाची, अर्धवटपणाची जाणीव पिऊन टाकतो. तेच त्याचे वैशिष्ट्य आहे... त्याच्या चेहऱ्यावर एक अजिब लकीर आहे... चंद्रावरच्या खळग्यासारखी ही लकेर नेहमी आधाराचा हात द्यायला तयार असते, पण कधी कधी आधारालाही आधार लागतोच ना... पण त्याची नजर कधी आधार मागत नाही. अपूर्णतेत मजा जशी तो मानतो तशीच सोसण्यात... अशा वेळी त्याला एकटं सोडणं हेच चांगलं... अशावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे ढग आपण हलकेच दूर करावेत. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याला विश्‍वास द्यावा, असं वाटून जायचं. पण आपल्याला ते जमलं नाही... मग तो नजर चुकवत राहायचा. आपल्या वेदना सहन करत राहायचा... त्याचे ढग कधीच फुटले नाहीत... ढग फुटायला, त्यातून पाणी बरसायला गारव्याच्या बिजांचा शिरकाव व्हायला लागतोच की... अनेकदा आपण त्याच्या दारापर्यंत पोचून त्याला रितं करण्याचा विचार केला खरा; पण दारावर थाप मारून आपण अनेकदा मागे फिरलो आहे... आताही त्याच्या ढगांना गारव्याच्या स्पर्शाची आस लागून असेल... कदाचित मग त्यानंतर दिसणारा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण दिसून जाईल. त्यात अपूर्णतेची कोणतीच भावना असणार नाही.

https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl 

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

अश्रू

तो
ती काय करत असेल आता.... कदाचित रडून-रडून डोळे सुजले असतील.... जगजीत सिंह गेल्याचा धक्‍का तीनं कसा सहन केला असणार... वेड्यासारखी प्रेम करायची त्याच्यावर. त्याच्या गजलांवर मरायचीच म्हणा ना....वो कागज कि कश्‍ती हे तिचं आवडतं गाणं... हात छुटे भी तो रिश्‍ते नही छोडा करते.... या गझलेप्रमाणे तिने अनेकवेळा जगण्याचा प्रयत्नही केला पण जमला नाही.... जगणं गाण्याचे शब्द बनतात... पण गाण्याच्या शब्दांवरच्या मार्गावरुन चालणं सोप्प नसतं, हे तिला जाणवून गेलं त्यामुळेच तिनं हात सोडवून घेतला... ती गाण्यात रमायची... .. पण गजलांवर तिचं खास प्रेम....प्रत्येकवेळी ती नवनव्या गजलांवर बोलायची... तिच्या जगण्याच्या अनेक आधारांपैकी एक आधार गझल आहे हे नक्‍की.. त्यामुळे या आधाराला बसलेला धक्‍का तीनं कसा सहन केला असेल देव जाणे... कदाचित दारं खिडक्‍या बंद करुन जगजितचीच एखादी कॅसेट प्ले केली असेल... किंवा त्या अंधारात उशी ओली होईपर्यंत रडत बसली असेल...गुलजार आणि जगजीत सिंह या दोघांच्या शब्द -सुरावर तिचे अनेक इमले उभे आहेत, अशा इमल्यांना असे धक्‍के थोडे जडच जातात.....

ती
जगजीत सिंह गेले...त्याला बातमी समजल्यावर तो कसा रिऍक्‍ट झाला असेल.... त्याला धक्‍का बसला असेल... छे धक्‍का बसणाऱ्यांमध्ये तो कधीच नव्हता.... ब्रेन हॅमरेज झालेलं होतं... डॉक्‍टरांनी प्रयत्न केले पण ते अपुरे पडले एवढंच म्हणेल आणि मान एका दिशेला फिरवून गप्प बसेल.... माहित नाही नक्‍की तो कसा रिऍक्‍ट झाला असेल... संवेदना तशा त्याच्या बोथटच झाल्यात जणू.... सुख -दुःख मानायला वेळ कोणाकडे आहे, हे त्याचं तत्वज्ञान....त्यात माणसं मरायचीच कधी ना कधी हे नेहमीचंच वाक्‍य त्यानं नक्‍की कोणाच्या तरी तोंडावर फेकलं असणार... पण जगजीत वेगळाच माणुस... या माणसाकडे काय शक्‍ती आहे नाही, जखमांना तोच उघडं करतो आणि त्यावर हळुवार फुंकरही घालतो.... जखमा ओल्या ठेवताना त्यातील वेदना हलकेच सुखावह करण्याचे जे कसब त्याच्यात आहे ते मुळी कुणाच्यात नाहीच...शब्दांच्या अर्थांना सुरातून त्यानंच प्रवाहीत करावं... त्याचं गाणं रेडीओवर लागावं आणि ऐन दुपारी कातरवेळीची हुुरहूर जाणवावी... त्याच्यासारखा सूरकर्मी सापडणं मुश्‍किल... बंधमुक्‍त गाताना, ऐकणाऱ्याला बंधिस्त करण्याची त्याची हातोटी जगावेगळी... ही सारी वाक्‍ये तर त्याचीच की... त्यामुळं जगजीत गेल्याचं त्याला नक्‍कीच दुःख झालं असणार... रात्री घरी आल्यावर त्यानं जगजीतच्या गझला लावल्याच असतील... आणि त्या ऐकताना नाकावर अश्रुचा थेंब आला असणारच....

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

महाराजांचं उपरणं....

अमुक तमुक महाराज की जय... महाराज की जय... एक पट्टेवाला जोरात ओरडला. त्याच्या पाठीमागून मग दुसरा आणि मग तिसराही ओरडला. "महाराज की जय...' जयजयकार गगनात दुमदुमला.
महाराजांनी हात वर केला. दरबार शांत झाला..
मग एक एक दरबारी बोलू लागला.
महाराजांचा विजय असो.... महाराजांच्या राज्यात गुरं-ढोरं सुखी आहेत. महाराजांची कृपा आहे.... एका दरबाऱ्याने सूर आळवला.
महाराजांचा विजय असो... महाराजांच्या राज्यात स्त्रिया सुखी आहेत... दुसऱ्या दरबाऱ्याने री ओढली.
महाराजांचा विजय असो... विजय असो... महाराजांच्या राज्यात पोरं-सोरं सगळी प्रजा सुखी आहे... महाराजांचा विजय असो... आता अश्‍वमेध केलाच पाहिजे...
दरबाऱ्याने अश्‍वमेधाचं नाव काढताच महाराजांच्या अंगावर मास चढलं.
उद्याच्या चक्रवर्ती सम्राटाचा विजय असो... पट्टेवाला जोरात ओरडला... त्याच्या पाठीमागून दरबारानेही जयजयकार केला.
"उद्याच्या चक्रवर्ती सम्राटांचा विजय असो... पण...' एका दरबाऱ्याने मुजरा करता करता "पण...' थोडा लांबवला...

पण काय? महाराजांना काही कळेना...
गुरं-ढोरं... पोरं-सोरं... सगळी सुखी; तरी पण काय? महाराजांनी सवाल केला...
दरबार शांत. पट्टेवाल्याने जोरदार "अमुक तमुक महाराजांचा विजय असो...' "उद्याच्या सम्राटाचा विजय असो' अशी जोरात घोषणा केली... "महाराजांचा विजय असो... महाराजांचा विजय असो...' दरबारी एकसुरात ओरडले.
थांबा... दरबाऱ्याच्या पण या... प्रश्‍नाला उत्तर नाही मिळालं... पण काय?
सरदार बोला... पण काय?... सुभेदार बोला. पण काय?... मंत्री बोला... कोणी तरी बोला हा "पण' कशासाठी?
कोणी बोलेना... महाराज संतापले... काय आहे ही भानगड... आम्ही एवढं चांगलं राज्य करतोय; पण तरीही "पण' आहेच...
एका दरबाऱ्याने अभय मागितले... महाराजांनी हात वर केला...
होय महाराज... पोरं-सोरं... गुरं-ढोरं... सगळी सुखी आहेत... पण महाराजांच्या उपरण्यावरचा डाग लोकांच्या डोळ्यात खुपतोच आहे...
लोकं म्हणताहेत... सगळी प्रजा सुखी; पण तरीही उपरण्यावरचा डाग काही जात नाही...
महाराजांनी एकदा उपरण्याकडे बघितले आणि दुसऱ्यांदा दरबारात... सगळे दरबारी माना खाली घालून बसलेले...
यावर उपाय आहे की नाही... सरदार, चोपदार, मंत्री सगळे चूप...
प्रधानजी, तुम्ही सांगा आहे का उपाय?... प्रधानजी काही बोलले नाहीत...
आहे. महाराज उपाय आहे... जालीम उपाय आहे... मघाचाच दरबारी बोलला.
काय आहे उपाय तातडीने सांगा... उपरण्यावरचा डाग घालवायचा कसा...?
महाराज... आता तुमच्या वाढदिवसाला राज्यातल्या सगळ्या धोब्यांना बोलवा.... तीन दिवस धोबी उपरणे धुतील. डाग धुऊन जाईल... उपरणे लख्ख होईल. मग अश्‍वमेधाची तयारी जोरात करता येईल...
महाराजांना दरबाऱ्याचा हा सल्ला आवडला... चला. शाही थाटात धोब्यांची फौज तयार करा... राज्यातले सगळे धोबी बोलावून घ्या...
खलिते सुटले... घोडेस्वार चारी दिशांना रवाना झाले... राज्यातील धोबी राजधानीत येऊ लागले... महाराजांनी त्यांची बडदास्त ठेवली... धोब्यांची फौज बघून महाराज मनातच खूश झाले... आता डाग धुतला जाणारच... एवढ्या लोकांनी उपरणे धुतल्यावर कशाला डाग राहतोय.... महाराजांचा आनंद गगनात मावेना...
महाराजांनी सगळ्या धोब्यांना साबण दिले... उपरण्याचा डाग धुण्यासाठी एक एक धोबी पुढे येऊ लागला.
महाराजांना उपरणे उंचावून दाखवू लागला... महाराज मनोमनी खूश होत होते... महाराजांचे उपरणे किती देखणे, किती रेशमी... महाराजही किती देखणे, किती चांगले याचे कौतुक होत होते...
एक दिवस झाला... महाराजांनी उपरण्याकडे बघितले... डाग अजून शिल्लक होताच... दुसऱ्या दिवशी दुसरे धोबी आले... उपरणे धुऊन निघून गेले... महाराजांनी पुन्हा उपरणे बघितले... उपरण्यावर डाग तसाच होता... महाराजांनी तिसऱ्या दिवशी नेटाने उपरणे धुण्यास सांगितले... धोब्यांनी केलेल्या साबणाचा फेस दुसऱ्या राज्याच्या राजांच्या तोंडाला यायला लागला...
राजांनी उपरणे पुन्हा बघितले... आता मात्र महाराजांना कळलं... उपरणं पुरतं फाटलं होतं... पण डाग काही गेला नव्हता... अश्‍वमेधाची तयारी थांबवावी लागणार होती...


http://72.78.249.107/Sakal/25Sep2011/Normal/Kolhapur/KolhapurToday/page4.htm
("सकाळ' च्या 25 सप्टेंबरच्या टुडेमध्ये छापलेला माझा लेख.... (सुषमेय) प्रवीण कुलकर्णी )


बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

स्टेथ्‌स्कोप

पोरीचा फोन होता. तिला तीन हजार रुपये पाहिजे आहेत. ते डॉक्‍टरांच्या गळ्यात नसतं का? तसलं काही तरी घ्यायचं आहे. त्यानं एकदा तिच्याकडे बघितलं आणि तो तिथेच सैंपाकघरात केलेल्या मोरीत पाय धुवायला गेला.
रात्रभर झोप लागली नव्हतीच. वॉचमन म्हणून काम करत असला, तरी रात्री उशिरा एखादी झोप मिळायची. तेवढंच बरं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून ही झोप पण पार उडाली होती. त्या प्रसंगानंतर तर ती मिळणे शक्‍यच नव्हती. आता शाळेत दिवसभर काम करायला लागणार. मुख्याध्यापक आज नसले तर बरं होईल, थोडं डोकं तरी टेकता येईल, असा विचार त्याच्या डोक्‍यात येत होता. त्याचे डोळे तारवटले होते. त्यातच बायकोची बडबड.
गेल्याच महिन्यात सहा हजार दिले होते ना?
ते होस्टेलचं बिल भागवलं. आता हे पैसे त्या स्टेथ्‌स्कोप का काय म्हणतात, त्यासाठी आहे. मी काय म्हणतेय, उद्या पैसे पाठवायलाच हवेत.'' पोरीचे मास्तरांनी वर्गात यायचं नाही, म्हणून सांगितलं आहे. तीनं चार दिवसांपूर्वीच सांगितले होते; पण मी मुद्दामच सांगितले नव्हतं.
आता यावर त्याला बायकोचा रागच आला. आधीच सांगितलं असतं तर काय तरी तजवीज करता आली नसती का? आता उद्या लगेच पैसे कोठून आणायचे.
पण तो काही बोलला नाही. आतापर्यंत किती पैसे दिले. शाळेतल्या शिपायाला पगार तो केवढासा; पण पोरीला डॉक्‍टर करण्यासाठी त्यानं कितीही कष्ट उपसायचे ठरवले होते. प्रॉव्हिडंड फंड तर तिच्या बारावीच्या आणि प्रवेश परीक्षेच्या क्‍लासलाच संपला होता. बाकी कर्जाची मर्यादा केव्हाच उलटली होती. लोकांसमोर किती हात पसरायचा, म्हणून त्यानं रात्री वॉचमन म्हणून काम करायला सुरवात केली. मोठ्या बिल्डींगची वॉचमनगिरी असल्याने त्याची सुरूवातील काही महिने झोपही व्हायची. पोरीचा दर महिन्याचा खर्च भागायचा. दुसऱ्या पोराचा शिक्षणाचा खर्च भागायाचा. त्याचं ठीक चाललं होतं. पण आता पोरीचा खर्च दिवसेंनदिवस वाढत चालला होता. त्यातच बिल्डींगमध्ये झोपताही येत नव्हतं. रात्र-रात्र जागून त्याची तब्येत पुरती ढासळली होती. शाळेत काही काम सांगितलं की तिथेही चुका व्हायच्या, मुख्याध्यापक ताडताड बोलायचे; पण पोरीला डॉक्‍टर करायचंच हा त्याचा हट्‌ट मात्र कायम होता.
त्यानं बायकोकडे बघितलं. तिच्या बापाने दिलेली चार टिकल्यांची माळ त्यानं केव्हाच विकली होती. गळ्यातील खोट्या मंगळसुत्राला बाजारात चार आणेसुद्धा कोणी देणार नव्हतं; पण पोरीला पैसे तर पाठवायला हवेच. बिल्डींगच्या सोसायटीकडून गेल्याच महिन्यात दोन महिन्याचा ऍडव्हान्स घेतला होता. त्यामुळे तिथेही कोणी पैसे देणार नव्हते. शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाचे देणे होते, सगळे दरवाजे बंद होते. आता काय करायचे त्याला प्रश्‍न पडला. त्यातच रात्रीचा तो प्रसंग त्याला आणखी बेचैन करत होता. काय करायचे त्याला कळत नव्हते. डोकं फार बधीर झालं होतं.
तो तसाच शाळेत गेला. रात्रीच्या त्या प्रसंगानंतर तर त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली. काय करावे काहीच कळत नव्हतं. दिवसभर तो तीन हजारांचा आकडा त्याच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. पैसे कसे उभे करायचे. कोणाकडे मागायचे. आणखी काही काम करता येईल का? त्यानं मेंदूची पेशी आणि पेशी झिजवली. पण हातात काहीच लागलं नाही.
शाळा सुटल्याची घंटा त्यानंच वाजवली. घंटेवर दिलेल्या प्रत्येक ठोक्‍यासरशी त्याच्या डोक्‍यात विचारचक्र सुरू झालं. त्यानं निश्‍चय केला. पोरीला डॉक्‍टर करायचंच. काही झालं तरी डॉक्‍टर करायचं. कितीही पैसे लागोत.. कितीही... यातना सहन कराव्या लागोत.
तो घरात आला.
जरा पडून घेता का? रात्री पण झोप नाही मिळत. बायको म्हणाली.
तो गप्प गप्प होता. त्यानं दाढी केली. रात्रीची वाट बघत शांत बसला....जेवला.. जेवण कसलं ते काहीतरी खायचं म्हणून खाल्लं. डोक्‍याची टोपी, काठीबरोबर आज त्यानं बायकोची साडीही पिशवीत टाकली.
गेल्या कित्येक दिवसांपासून त्या बिल्डींगमधला एक मोठा साहेब त्याला सांगत होता. जवळ आलास तर तीन हजार देईन फक्‍त साडी नेसायची.

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

काळा

माझ्यातील लेखकावर प्रेम करणाऱ्या एका चाहत्याने काळा या रंगावर गोष्ट लिही असं सांगितलं होतं, ही गोष्ट म्हणून खास आहे.
ं.....
काळा
.........
तिनं डबीतून काजळ काढलं आणि हलकेच बाळाच्या डोळ्यांत घातलं. त्या बाळाच्या गालाचा हळूच पापा घेतला आणि त्याला पाळण्यात झोपवलं. त्यानं मिटलेली मूठ, त्याचं ते इवलंसं नाक, फुगरे गाल, कुरळे केस ती तासन्‌ तास बघत राहायची. त्याच्या इवल्याशा डोक्‍यावरून मायेचा हात फिरवत राहायची. त्या झोपलेल्या सानुल्याला अलगद उचलायची आणि छातीशी धरायची. त्याला कुठे ठेवू, कुठे नको असंच तिला व्हायचं.... लग्नानंतर दहा वर्षांनंतर तर ते जन्माला आलं होतं. या दहा वर्षांत तिनं किती सोसलं होतं. बायकांच्या नजरा टोचायच्या तिला. त्यांचं ते कुजबुजणं असह्य व्हायचं. पहिल्यांदा ती त्याकडे दुर्लक्ष करायची, पण अलीकडे तिला ती असह्य झाली होती. लग्नापूर्वीही तिला अशाच कुजबुजी ऐकायला मिळायच्या.
""तिशी गाठली की, अजून किती दिवस हुंदडायचं. घर बसवायचं नाही का? की पोरं फिरवत बसणार आहे नुसती....
एवढा सुंदरतेचा मिजास कशाला.... बाहेर कमी का बायका सुंदर असतात?
थोडी करायची ऍडजेस्टमेंट... नवऱ्याचा नसला पगार जास्त ;पण हिचा आहेच ना? मग त्यात भागवायचं... लग्नच करायचं नाही, असं सरळ सांगून टाकायचं. कारणं कशाला द्यायची..... अशा कुजबुजी ती ऐकायची. अनेकवेळा तिला ऐकू येईल अशीच कुजबूज व्हायची... तिची आत्या, मावशी, सगळेच यांत सामील असायचे; पण ती
ऐकून न ऐकल्यासारखी करायची. गप्प बसायची. ती खरंच देखणी होती. अगदी गोरीपान, नाक सरळ, केस लांब... पण तिला त्याचं फार कौतुक नव्हतं. लग्न करायचं तर किमान बरोबरीचा तरी हवा.. तिची आई तिच्यासोबत असायची... तिला म्हणायची, तू नको काळजी करू... तिच्या आईनं तिच्यासाठी पारड्यात जोखूनच मुलगा आणला.... लग्न झालं... पहिली दोन-तीन वर्षे खूप चांगली गेली... पण नंतर सुरू झालं मूल पाहिजे... ती गप्प बसायची.. तिच्याबाबतीत काहीबाही बोलणं सुरु असायचं...
काही नाही... पदर उडवत फिरायची सवय लागली आहे... त्यामुळे मूल कशाला?
फिगरची काळजी, बाकी काय कारण असतंय.... बॉसशी लफडं आहे म्हणे, त्यामुळेच तर प्रमोशन मिळालं ना?... ती वैतागायची, नवऱ्याशी भांडायची.. पण तो शांत बसायचा.... कशाला पाहिजे मूल, तुझ्या करिअरला ब्रेक लागेल... तिला नवऱ्याचं म्हणणं पटायचं. ती गप्प बसायची... अलीकडे मात्र ती मुलाबाबत हळवी झाली होती... तिने नवऱ्याच्या मागे धोशा लावला, "मला मूल हवंच.... तिने दोन वर्षे वाट बघितली; पण यश आले नाही; मग तपासण्या झाल्या. सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या नवऱ्याला तिनं कारण सांगितलं... त्यालाही ते पटलं... मूल हवंच आहे...डॉक्‍टरांनी उपाय सांगितला... नवरा समजूतदार होता... त्यानं पटकन सही केली...
तिच्या सासूला किती मोठा आनंद झाला होता. तिला कुठे, ठेवू कुठे नको असंच केलं. हे नऊ महिन्यांत नवऱ्यानेही किती काळजी घेतली. तिच्या पोटात दुखायला लागलं, नवऱ्याचा जीव कासावीस व्हायला लागला... तिची ती तळमळ त्याला बघवत नव्हती. सासूने देवापुढे दिवा लावला... तिथला अंगारा तिच्या कपाळाला लावला... डॉक्‍टरांनी तिला आत घेईपर्यंत तिचा नवरा तळमळत होता... त्या खोलीच्या बाहेरही तो येरझाऱ्या घालत होता... सकाळी दहापासून येणारा तिचा आतला ओरडण्याचा आवाज दुपारी तीनच्या दरम्यान थांबला....
नर्स धावत बाहेर आली... मुलगा झाला...बाळ फारच पोसवलंय त्यामुळे त्रास झाला बाईंना.... दोघेही आता उत्तम आहेत...
नर्सचे शेवटचे वाक्‍य ऐकल्यावर त्याच्या जिवात जीव आला... तो धावत आत गेला.... थकव्याने तिची शुद्ध नव्हती...त्याने तिला बघितले... डोळ्यांच्या कडा पुसल्या... नर्सने त्याच्या हातात ते कपड्यात गुंडाळलेलं बाळ दिलं... त्यानं एकदा बाळाकडं बघितलं आणि एकदा तिच्याकडं.... त्याने नर्सला जोरात हाक मारली... नर्स आज आणखी कोणाला बाळ झालं आहे का?... चुकून बाळ बदललंय का?...
नर्सने नकारार्थी मान डोलवली... आता त्या खोलीत तो.. ती... आणि ते तासभर वयाचं पोर एवढेच काय ते होती.... त्याला ते पोर हातात धरवेना... तो काळामिट्ट कुरळ्या केसांचा मांसाचा दोन-अडीच किलोचा गोळा त्याला शंभर किलोचा वाटायला लागला.... त्याला ते बाळ धरवेना... त्याची आई सोबतच होती... तिनं बाळाकडे बघितलं न बघितल्यासारखं केलं.. तिच्या आईकडे बाळ देऊन दोघे खोलीच्या बाहेर आले... त्याच्या डोळ्यासमोरून तो काळा गोळा सरकत नव्हताच. काहीही सांगितले तरी कळणार होतेच....तो अस्वस्थ झाला... त्याने घर गाठले... त्याची आईही होती समोर....
दुसऱ्या दिवशी तो आला.... त्यानं तिला बघून हसायचा प्रयत्न केला... तिनं बाळाला छातीला लावलं होतं... तो गप्प बसला; मग हळूच बोलला... तुला काय वाटतं....
ती म्हणाली, कशाबद्दल...
बाळाला घरला घेऊन जाण्याबद्दल.... लोकांना सगळं कळेल...
ती गप्प बसली... तो तिला समजावत राहिला... ती काहीच बोलली नाही.... तो जायला निघाला, त्यावेळी ती इतकंच बोलली...
ते बाळ तुमचं नाही म्हणून तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही... पण ते माझं आहे... मी त्याला सांभाळेन... तुमची साथ असली तर तुमच्यासोबत नाही तर एकटी.... त्या काळ्या कुरळ्या केसांतून फुन्हा हात फिरवताना तिला उगाच त्या बाळाचा अभिमान वाटला....

मंगळवार, २६ जुलै, २०११

पैंजण

तिनं कपाटातून जुनं पैंजण काढलं आणि तिच्यासमोर ठेवलं.
हं! घाल हे..
तिची सोळा - सतरा वर्षांची पोरगी पसरली होती.
तिच्या पसरलेल्या पायावर तिनं जोरात चापट मारली...
""हे असं फतकाल मांडून बसायचं न्हाई, असं कितीयेळा सांगिटलंय. कवा अक्‍कल येणार हाय देवास ठावूक. बारकी ऱ्हायली न्हाईस आता. '' तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा चालू झाला.
तिनं पाय मागं घेतले, पण तिचं आईकडं लक्षच नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ती सारखी चिडचिड करत होती. रोज रोज सूचनांचे डोस पाजायची. त्यामुळं तिला त्यात नवीन काहीच वाटलं नाही. आईकडं दुर्लक्ष करत ती टी.व्ही.चे चॅनेल बदलू लागली.
तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा सुरूच होता. तिचं सगळं लक्ष टीव्हीकडेच होतं.
मी काय म्हणते आहे...
आपल्या बोलण्याकडं पोरीचं लक्षच नाही कळल्यावर तिची चिडचिड आणखी वाढली. तिनं सरळ टीव्ही बंद केला आणि तिच्यासमोर टाकलेलं पैंजण तिच्या हातात दिलं.
"घाल हे....'
"अगं हे ल्हान व्हईल. सातवीत असताना घेतलं होतंस.'
"काय होत न्हाई एका दिसानं.. माघारी आल्यावर काढून टाक..
पण आपण जातोय कुठं....
तुला दाखवाय न्यायची हाय!
गेल्या चार-पाच दिवसांपासून आईची धावपळ अशाच काही कामासाठी चाललीय हे तिला कळत होतं. पण तिने स्पष्ट काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे विचारायचा प्रश्‍न नव्हता. आता मात्र आईनं सरळ दाखवायचीच भाषा केल्याने ती जाम पिसाळलीच. मला काही लगीनबिगीन नाही करायचं, आताशी कुठं कॉलेजात जायाला लागलीय. धाव्हीला चांगलं मार्क मिळाल्यावर तूच म्हणाली व्हतीस की, तू शिक, तू मोठी झाल्याबिगर तुझं लगीन करणार न्हाई म्हणून..
म्हणले व्हते... पण आताचं आयकायचं... निमूटपणे ते पैंजण घाल पायात... बोडक्‍या पायांनी जायाचं न्हाई.
तिला माहीत होतं, आईला आता विरोध केला तर ती मारायला कमी करणार नाही. आज तिचा चुलताही घरात नव्हता. ज्याच्याजवळ तिला तक्रार करता आली असती. आज जाऊन येऊ या. एवढं काय तातडीनं लगीन लावीत न्हाई, असा विचार करून ती उठली. तिनं ते पैंजण घेतलं आणि पायात घालू लागली.
आये, येत न्हाई गं...
अगं फासकी मोठी कर म्हंजे ईल.... तिच्या आईनं पर्याय सुचविला.
तिनं फासकी मोठी केली आणि ते पैंजण ओढून पायात घातलं....तरी काही ते येईना..
तिची आई बघत होती.. तिनं चटकन पुढे होऊन ती फासकी मोठी केली आणि जोरात दाबली. ते पैंजण ओढून ताणून तिच्या पायात बसले, पण त्याचे ते टोक तिच्या पायात रुतलं. ती जोरात ओरडली, पण त्याचा तिच्या आईवर परिणाम झाला नाही. तिनं तशीच कपाटातील तिची नवी कोरी साडी काढली आणि तिच्यासमोर टाकली.
नेस ही.... चल... पावणे धा ची गाडी हाय.... मामा बी तिथंच येणार हाय.
तिच्या पायातल्या पैंजणाची फासकी रुतत होती, पण तिला माहीत होतं, आई माया करायला लागली, की गाय होते, नाही तर कडकलक्ष्मीचा अवतार. झिंज्या पकडून बुकलून काढील. त्यामुळं तिनं साडी उचलली. पायात पैंजण फारच रुतत होतं.
"यंदा अकरावीला हाय', मुलगी काय करते, या मुलाच्या बापाने विचारलेल्या प्रश्‍नावर मामानेच उत्तर दिले.
मग शिकवा की तिला.. लवकर का लगीन करतायसा? मुलाच्या बापाने तिच्याकडे एकदा बघितलं आणि मामाला प्रश्‍न केला.
मामा काही बोलला नाही.
मुलगा तरतरीत होता. तो काही बोलला नाही. पण त्याला ही मुलगी पसंत पडलेली त्याच्या नजरेत दिसत होते.
आमचा मुलगा दहावी नापास हाय, काय? घरची पाच एकर शेती हाय, ती त्योच कसतोय. खायाला ल्यायला कमी न्हाई, पर थेरं इथं चालणार न्हायती. राबायला पाहिजे तवा खायला मिळंल.
तिची आई मुलाच्या बापाच्या प्रत्येक वाक्‍यावर डोके हलवत होती.
मग हातावर पाणी टाकू आजच....
व्हंय पर पोरीला आठरावं बी लागल्यालं न्हाई ! कायद्याचं काय? पोराकडच्या एकाने शंका विचारली.
तेची काळजी तुमी करू नका. शाळेचा मास्तर हाय माझ्या वळखीचा... वरीस दीड वरीस वाढवून दिल.
मग घालायचं का आज हातावर पाणी.. मुलाच्या बापानं आग्रह सोडला नाही.
तिची आई गडबडली.... तिनं मामाला खुणावलं... कोपऱ्यात नेलं....
ही माणसं जरा जास्तच घाई करत्यात .... मामानं तोंडावर बोट ठेवलं...
अगं पोराची आई जाऊन वरीस झाले... हाताची गाठ तोंडाशी पडत न्हाई....पोरीचं कल्याण व्हील...
पर समदं जमायचं कसं.. माझ्या अंगावरच्या ह्या चार टिकल्याशिवाय काई न्हाई....
तू नग काळजी करू, मी हाय.... पण पोरीला इचारायला पाहिजे....
तिनं हाक मारली... ती आली.... काय गं... पोरगा कसा हाय!
आये, शिकलेला न्हाई...
मग काय धोंडा न्हाई, पाच एकर शेती हाय....एकर इकला तरी लाखाची मालकीण व्हशील.
ती काही बोलली न्हाई.... पोरगं दिसायला चांगलंच होतं.. घरदारपण बरं दिसत होतं.. नकार द्यायला तिच्याजवळ दुसरं कारण नव्हतं..
चला तर मग हातावर पाणी टाकू.... मामानं सांगितलं.....
लग्नन झालं... लग्नाच्या फेऱ्यात पोरीच्या पायातील पैंजण लोकांच्या नजरेत आलं.. रुतलेल्या फासकीतून रक्‍त येत होतं.... पण कोणी बोललं नाही..
पोरीचं लग्न करून ती परतली.... पोरीचा चुलता भलताच बिघडला होता...पण बोलला नाही...
तिच्या शेजारीनं विषय काढलाच... का गं एवढी घाई केलीस... शिकली असती पोरगी....तिच्या शेजारच्या चार-पाच बायांनी तोच प्रश्‍न विचारला...
तिला काही सुचेना.... सकाळपासनं तिनं धरलेला बांध सुटला....
मला नगो व्हती व्हंय माजी पोर.... अजून न्हाणपण पण सरलं न्हाई तिचं.... पर काय करणार.... पाच दिस झालं तेला, ह्यो रेडा मला म्हणतोय कसा... पोरगी तुजी ताजीतवानी दिसतीया.... तवापसनं डोळ्याला डोळा लागला न्हाई माजा...
तिच्या आईचा हुंदका सुटला.... पोरीच्या चुलत्याची वाईट नजर व्हती....राक्षसानं मला खाल्ली आता हिला खायचा....
पोरीच्या पायात रुतलेल्या पैंजणापेक्षा तिच्या आईची कळ जरा जास्त मोठी होती.....

शुक्रवार, १५ जुलै, २०११

पाऊस

तो....
काळ्या ढगांचा हिला एवढा नाद का? नादच, नाही तर काय!
ढग जमू लागले की ही तिची उरत नाही. सगळी हातातील कामे बाजूला टाकून ती अंगणात येते, ढगांच्या काळ्या पंखाखाली स्वतःला हरवून बसते. कानठळ्या बसविणारा तो ढगांचा गडगडाट ऐकण्यासाठी जन्माची आतूर झाल्यासारखी वाटते. निसर्गातील प्रत्येक श्‍वासाला घाबरवून सोडणाऱ्या त्या आवाजाने हिला कोणती मोहिनी घातली आहे कोणास ठावूक. पण तिला तो आवाज आवडतो. त्या लखलखणाऱ्या विजांचा तिच्या नितळणाऱ्या सावळ्या चेहऱ्यावरून परावर्तीत होणारा तो प्रकाश जेव्हा माझ्या खिडकीत येतो त्यावेळी तो गोळा करून साठवून ठेवावा वाटतो. किती पावसाळे लोटले पण, पहिल्यांदा तिला पावसात भिजताना बघितले तेव्हाची "ती' आणि आजची "ती' तशीच आहे उत्कट. उत्कटता हाच तर तिच्यातील आणि पावसातील समानतेचा धागा. कधी कधी प्रश्‍न पडतो की, तिचा हा सावळा रंग तिने ढगांकडून घेतला की ढगांनी तिच्याकडून. दोघांकडेही स्वतः रिते होऊन दुसऱ्याला सर्वस्व देण्याचा गुण. पाऊस जणू तिच्यात पुरता भिनला आहे. कधी ती गडगडाटासह येणाऱ्या वादळी पावसासारखी वाटते तर कधी आषाढातल्या मुक्त होऊन कोसळणाऱ्या सरीसारखी, तर कधी श्रावणसरींसारखी हलकेच बरसत राहते. ती अशी बरसत राहते म्हणूनच तर आपल्या रखरखीत आयुष्यात हिरवाई आहे....

ती
"तो' असा का आहे हा प्रश्‍नच आहे. वळवाच्या ढगांसारखा अगदी अनाकलनीय. कधी कोसळेल? कधी नाही काहीच पत्ता लागू देत नाही. पावसाचं याला वावडं म्हणावं तर तासन्‌तास खिडकीत बसून "तो' पाऊस न्याहाळत असतो; पण त्याने कधी ओंजळ गजाबाहेर काढून हात ओले केल्याचं स्मरत नाही. पावसात चालायची वेळच जर आली, तर इतका अंग चोरुन चालतो की रेनकोटवरचा पाऊसही जणू त्याच्या अंगाला छेडतो की काय असे वाटते. भर पावसात हा इतका कोरडा कसा राहू शकतो? कधी कधी ढगांनाच जणू तो जमत असेल तर मला भिजवून दाखवा, असे आव्हान करतो आणि त्यावर हे आव्हान न पेलवल्याने ढग थयथयाट करतात की काय असे वाटून जाते. पण तो आहे तसाच आहे म्हणून तर मी आहे. तो त्या खिडकीत उभा असतो त्यामुळेच तर त्या ढगांच्या आवाजाची भीती नाही वाटत. एकटीला भयग्रस्त करणारे ते ढग, तो सोबतीला असला की
अगदी सुतासारखे सरळ वागायला लागतात. मग त्यांच्या त्या गर्जनेत ढोलांचा नाद ऐकायला मिळतो, विजांचा लखलखाट अंगभर घ्यावा वाटतो, पण त्यासाठी तो खिडकीत उभा असायला हवा. तो समोर असतो त्यामुळेच तर हे ढग आणि वीज आपल्या मर्यादा नाही सोडत...

शनिवार, ९ जुलै, २०११

कपाटातील समृध्द अडगळ

जगातील कोणत्याही ललित साहित्याचा मूळ गाभा वाचकांचे रंजन करणे हाच असतो, किंबहुना तोच असायला हवा. समाजप्रबोधन, नीतीमत्तांची शिकवणी साहित्यांनी घ्यायला हरकत नाही; पण त्यापूर्वी त्यांचा मूळ गाभा रसरशीत असायला हवा. जर एखादी कथा, कविता, नाटक, कादंबरी या गाभ्यापासून दूर गेली तर ती कलाकृती कागदांचे भेंडोळे किंवा चांगल्या वेष्टणातील रद्दी एवढ्यापुरतीच मर्यादित राहते. अशा कलाकृतीकडून वाचकही काही अपेक्षा करत नाहीत आणि प्रकाशक आणि लेखक दोघांनाही त्यातून काही मिळत नाही. बऱ्याचदा जाहिरातबाजी आणि लेखकाचे नाव वापरून प्रकाशक दुय्यम, तिय्यम दर्जाचे पुस्तक वाचकांच्या माथ्यावर मारण्यात यशस्वी होतात. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ याबाबतीत प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक श्रीयुत भालचंद्र नेमाडे यांची हिंदू जगण्याची समृद्घ अडगळ कादंबरी प्रसिद्ध करून आणि प्रसिद्धीला आणून रामदास भटकळ यांनी मराठीजनांवर जो काही उपकार केला आहे त्याला तोड नाही. अत्रेंच्या भाषेत सांगायचे झाल्यास गेल्या दहा हजार वर्षांत असे पुस्तक छे.., कादंबरी छे.., प्रबंध छे.., झोपेची गोळी जे काही त्यांनी प्रसिद्ध केले आहे तसे प्रसिद्धीस आणण्याची कुणाच्या बापाच्यात धमक नाही.
अनेक साहित्यिकांची उतरत्या वयात प्रतिभा संपुष्टास गेलेली असते. प्रतिभेचे तळे आटले, की हे जुन्या काळात रमू लागतात; मग प्रतिभेच्या अत्युच्च स्थानी असताना यांच्या हातातून निसटलेली काही पाने त्यावेळी त्यांना दुय्यम दर्जाची वाटलेली, पण आता हातातून काहीच निसटत नसल्याने आधार वाटू लागतात. मग हे साहित्यिक असे कागदाचे कपटे गोळा करून एका पोत्यात बांधतात आणि त्याला काही तरी नाव देतात. अनेकवेळा हा प्रयोग यशस्वीही होतो. त्या कागदांच्या बोळ्यातून काहीतरी हाताला लागते. उरलेला कचरा जरी सोडला तरी काही तरी हाताला लागले म्हणून वाचकही खूश असतो. रा. रा. नेमाडेंनीही असाच सगळा कचरा एका पोत्यात भरला. त्याला गोंडस असे नावही दिले "हिंदू'. हे िंहंदू नाव का, तर त्या पोत्याबाबतीत काही तरी वाद निर्माण होईल आणि पोती हातोहात खपली जातील. "होराभूषण' नेमाडेंचा हा होरा पक्‍का खरा ठरला. पोती भराभर खपली खरे; पण लोकांनी त्याचे तोंड उघडले आणि हातात फक्‍त संदर्भहीन कागदांचे कपटे मिळायला लागले. त्यामुळे लोकांनी एकदा ते तोंड झाकले ते पुन्हा काही उघडले नाही. त्यामुळे 650 रुपयांची ही कादंबरी कपाटातील समृद्ध अडगळ ठरते.
साहित्यिकाची प्रत्येक कलाकृती एकटी असते. लेखकाने यापूर्वी काय लिहिले आणि ते कसे होते यावर त्याने नंतर लिहिलेल्या पुस्तकांना प्राथमिक ग्राहक मिळण्यासाठी फायदा होतो खरा; परंतु त्या प्रत्येक पुस्तकाची स्वतःची ओळख निर्माण झाली तरच साहित्यिक यशस्वी ठरतो, नाही तर लेखक अमुक"कार' तमुक"कार' बनतो. एखाद्या लेखकाच्या दृष्टीने असे "कार' बनणेही खूप मोठे भाग्याचे असल्याने तो त्यावर समाधानी असतो. पण जातिवंत लेखकाला त्याची स्वतःची ओळख एखाद्या पुस्तकावरून व्हावी, असे वाटत नसते. त्यामुळे तो प्रत्येकवेळी प्रतिभेची नवनवी शिखरे चढत राहतो. त्यामुळे त्याची मागची पुस्तके कितीही गाजली असली तरी तो नूतन नवा भेटतो. नेमाडेंच्या बाबतीत अगदी तसेच म्हणायला गेल्यास ते "कोसला'पुरतेच मर्यादित राहतात आणि उद्या त्यांची ओळख सांगायची झाल्यास "कोसला'कार म्हणूनच सांगावी लागेल. प्राध्यापकी पिंड असलेल्या नेमाडेंना हिंदू धर्माबद्दल लिहायचे होते, त्यांना जातीपातीबद्दल लिहायचे होते, त्यांना ब्राह्मणी संस्कृतीबद्दल लिहायचे होते, रुढी-परंपरा यावर लिहायचे होते, त्यांना प्रत्येक गोष्टीवर लिहायचे होते, पण त्यासाठीचा आराखडा सापडत नव्हता. मग ते पस्तीस वर्षे लिहित राहिले, जमेल तसे आणि जमेल तेवढे.. घरात कागदांची नुसती अडगळ निर्माण झाली. आता ही अडगळ कमी करण्यासाठी त्यांनी पोती शोधायला सुरवात केली. या कागदाच्या कपटांना एका धाग्यात गुंतविणे आवश्‍यक होते. सध्या प्रबंध आणि शोधनिबंधांना कोणी कुत्रं खात नाही. विचारवंतांची पुस्तके ग्रंथालयांच्या कपाटात धूळ खात पडली आहेत. अशात या कपटांना विकून चांगला पैसा मिळविण्याच्या दृष्टीने कादंबरीसारखा मार्ग हा सोयीस्कर होता. त्यामुळे त्यांनी कादंबरीचं पोतं निवडलं. ज्या पोत्यात ही सगळी कागदे घातल्यानंतर ते विकलंही गेलं पाहिजे. मग त्या पोत
्याच्या नावावरून वाद निर्माण झाला पाहिजे. मग काय करायचे तर पोत्याला "वादळी' नाव द्यायचे. समाजातील भावनांचे ध्रुवीकरण झाल्याच्या काळात त्यांना "हिंदू' नावाचं पोतं सापडलं. त्यात त्यांनी हा सगळा पसारा कोंबला आणि तो खंडेराव नावाच्या एका काल्पनिक पात्राला पकडून त्याच्यावर वाचकांच्या दारात नेऊन टाकण्याची जबाबदारी सोपविली.
मुळात नेमाडेंना काय म्हणायचे आहे, कशासाठी म्हणायचे आहे आणि का म्हणायचे आहे हे काहीच या कादंबरीतून स्पष्ट होत नाही. त्यांना हिंदू धर्मातील रुढी-परंपरांवर टीकाही करायची आहे आणि त्याबद्दल भूमिकाही घ्यायची नाही. ब्राह्मणांना दुखवायचेही नाही आणि सोडायचेही नाही. केवळ मत्सर आणि आपल्याला खूप काही कळतं एवढं सांगण्यासाठी त्यांनी 603 पाने खर्ची घालण्याचे कारण नव्हते. त्यांनी मोठ्याने ओरडून सांगितलं असतं, की मला खूप काही कळतं आणि मी यांचा यांचा मत्सर करतोय, तर नेमाडेंचे साहित्यिक पुण्य एवढेही लयाला गेलेले नाही. त्यामुळे मराठी माणसांनी मान डोलविली असती. पण महाकाव्य लिहिण्याच्या अट्टहासापोटी त्यांनी केलेला हा कारभार आहे. पुस्तकातील त्रुटींबद्दल लिहायचे तर प्रत्येक पानावर त्रुटीच आहे. "नेमाडपंथी' भाषा म्हणून लोकांच्या डोक्‍यावर काहीही थापायचे हे योग्य नाही. रंजकता तर नाहीच, पण निवेदनाच्या पातळीवरही सगळा सावळा गोंधळ आहे. शेजारी झेंडू बामची डबी ठेवून वाचायला बसले तरी वाचता येत नाही. कादंबरी कुठल्याच पातळीवर चांगली नाही. ज्यांच्या सहनशक्‍तीची परीक्षा घ्यायची आहे अशा लोकांसाठी ही कादंबरी खूप चांगली आहे. त्यांनी ती वाचावी आणि सहनशक्‍ती दाखवावी हे माझे आव्हान आहे.

सोमवार, ६ जून, २०११

मोगऱ्याची वेणी

केवढयाला रे, हे केवड्याचे पान.. सोळा, सतरा वर्षांच्या त्या मुलीने त्याच्याकडे बघत, थोडं मुरकंतच विचारलं.
बारा रुपये! त्याने थंडपणे उत्तर दिलं. त्याला माहित होतं की बारा रुपये म्हणून सांगितलं की पुढची बाई दहा रुपयाला मागते. थोडा मोलभाव केला की दहा रुपयाला ते पान विकलं जायचं. पण तीनं ना पर्समध्ये हात घातला, ना मोलभाव केला, जशी आली तशी ती निघून मंदिरात शिरली.
त्याला क्षणभर वाटलं पुढे जावं... दहा रुपयाला देईन असं सांगाव पण त्याचा धीर झाला नाही. कदाचीत ती जर त्याच्या वयाचीच नसती तर तो पुढे नक्‍की गेला असता. पण ती त्याच्याच वयाची असल्याने तो संकोचला. जाऊ देत, म्हणून तो मागे सरला...
काय रे! काल तू केवड्याची पाने विकत होतास ना? मग आज तू या मोगऱ्याच्या वेण्या का आणल्या आहेस... कालची तीच ती होती. काल घातलेल्या निळ्या ड्रेसपेक्षा आज हिने घातलेला लाल रंगाचा ड्रेस खूप छान शोभतो. त्याच्या मनात एक विचार येऊन गेला..
केवड्याची पाने मिळाली नाहीत. विकायला काहीतरी पाहिजे ना? म्हणून मग मोगऱ्याच्या वेण्या आणल्या आहेत. घ्या ना वेण्या! दहा रुपयाला दोन दिल्या... त्यानं विनंती केली.
तिनं वेण्या उचलल्या... त्या मोगऱ्याचा गंध श्‍वास भरुन घेतला. केवड्याचा सुगंध, मोगऱ्याला नाही रे! मला केवडा हवा होता. ती एवढीच बोलली आणि निघून गेली.
तिसऱ्या दिवशी तो माळ्याशी भांडला, पण केवडा मिळाला नाही. आज कधी नव्हे तो त्याला केवडा हवा होता. नाही तर वेण्या संपल्या की याला केवडा मिळायचा...
आज ती परत आली आणि परत तिने केवडाच मागितला तर.. आज तिनं येऊच नये... उद्या तिच्यासाठी केवडा आणीन अगदी कुठूनही आणीन, पण आज तिनं येऊ नये...असं त्याला वाटत होतं... पण कालच्यावेळीच ती आली.
ती सरळ त्याच्यासमोरच आली... तीनं पुन्हा त्याच्याकडे बघितल... त्याच्या परडीतील मोगऱ्याच्या वेण्या इकडे तिकडे केल्या.
""केवडा नाही ना आणलास तू''
नाही... नाराजीनंच त्याने मान हलविली.
हातातील वेण्या तिथेच ठेवून ती निघायला लागली, तसा तो पुढे झाला.
"" या वेण्या घ्या... बघा किती ताजा मोगरा आहे...पैसे नका देऊ....''
त्याने हातात एक वेणी उचलली. त्या पांढऱ्या शुभ्र कळ्यांच्या पार्श्‍वभूमिवरचा तिचा सावळा चेहरा आणखी तजेलदार दिसत होता. क्षणभर तीही भांबावली, पण लगेच सावरली...
""नको! मला केवडाच हवा.''
तिच्या उत्तराने तो हिरमुसा झाला. मागे सरला.... पुढच्या दोन दिवसांत त्याला केवडा मिळाला नाही, मिळालेले गजरेही त्याने घेतले नाहीत... तो रस्त्यावर आलाच नाही.... नंतर तो कितीतरी दिवस त्याच रस्त्यावर यायचा. केवडा घेऊन .. पण ती यायची नाही... तो गजरे विकायचा... पण त्याच्या परडीत एक केवड्याचे पान मात्र तसेच सूकुन जायचे... कोणी त्याला विचारलेच तर केवडा विकायला नाही एवढेच म्हणायचा... कधीतरी ती येईल म्हणून तो परडीत नेहमी केवड्याचे एक पान ठेवायचा.... पण ती आली नाही. त्याची नजर तिच्या रस्त्याकडे असायची....दिवसा मागून दिवस सरले....त्याचं कॉलेज संपलं.... तसं त्याचा गजरे विकण्याचा पार्ट टाईम जॉबही सुटला......हातात गाडी आली... कधी तो त्या रस्त्यावर थांबायचा... गाडीच्या काचा खाली करुन तेथील गजरे विकणाऱ्या पोरांकडे बघायचा.... तेथील पोऱ्याकडून केवडा घ्यायचा... त्या केवड्याचा वास त्याच्या केबीनमध्ये दरवळत राहायचा....
आजही तो असाच आपल्या नादात चालला होता... त्याची गाडी मंदिरासमोर थांबली.... एक पोरगं परडी सांभाळत त्याच्यासमोर आलं...
"" केवडा आहे का रे!''
""नाय साहेब! '' त्यानं उत्तर दिलं.... आज माळ्याने केवडा दिला नाही...
तो हसला... पोराला नाराज करायला नको म्हणून त्याने एक छानशी मोगऱ्याची वेणी घेतली आणि तो मंदिराच्या पायऱ्या चढला.... त्यानं देवीला नमस्कार केला आणि तो परतला... चप्पल घालायला तो सहज वाकला, तर एक केवड्याचे पान त्याच्या चपलासमोर पडलं होतं. त्यानं ते उचललं... समोर ती तीच होती... काळ लोटला असला तरी त्यानं तिला कधीच ओळखले होते... बहुतेक तिनेही ते ओळखले असावं... ती हलकेच पुढे आली... तिने त्याच्या हातातील ते केवड्याचे पान हलकेच घेतले... त्याच्यासमोरच ते केसांत माळले.... त्याने मघाशी घेतलेली वेणी तिच्या समोर केली.... आज तिने ती वेणीही घेतली....

सोमवार, २३ मे, २०११

आई भूक

"अण्णा, आपण आता कुटं! मामाच्या गावाला! बापाच्या खांद्यावर बसलेल्या त्या साडेचार, पाच वर्षांच्या पोरानं बापाचा मुंडासा घट्‌ट पकडत प्रश्‍न विचारला. झपाझप पावलं टाकत चाललेल्या त्या बापानं पोराच्या त्या प्रश्‍नाकडे लक्षच दिले नाही. सोबतिला त्याची बायको दिड पावनेदोन वर्षांच्या पोरीला कडेवर घेऊन त्याच्या चालण्याच्या गतीत गती मिळवत होती. तिन्हीसांजेची वेळ जवळ येत होती. शेतात राबणारी माणसं घराला जवळ करीत होती.
"अण्णा, या पावटी मला जत्रेतनं, ट्यॅक्‍टर घेणार न्हवं! रंग्याला तेच्या मामानं लय चांगला ट्यॅक्‍टर घेतलाया, ही चाबी दिली की धुssम! ते पोरगं अखंड बडबडत होतं. त्याचा बाप मात्र त्याच्या कुठल्याच प्रश्‍नाचं उत्तर देत नव्हता. चालण्याची गती तेवढी वाढत होती. बापाच्या खांद्यावर बसून ते पोर टकामका नजरेनं सगळा परिसर डोळ्यात साठवून घेत होतं. लांबच लांब जाणाऱ्या पायवाटा, अंब्यांनी लगडलेली झाडे, घरट्याकडे परतणारे पक्षी.. त्याची नजर स्थीर राहात नव्हती. या रानात तो कितीतरी वेळा आला होता, अनेकवेळा घराकडे परीतीच्या वाटेवर त्याला हेच चित्र दिसायचं. पण आज काही तरी वेगळं होतं. आज त्यानं आईचं बोट धरलं नव्हतं, तर बापाच्या खांद्यावर तो बसला होता, त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट नविन वाटत होती. सहज त्याची नजर बगळ्यांच्या थव्याकडे गेली... नकळत त्याची मूठ झाकली गेली. मूठ झाकली की आकाशातून जाणारे बगळे आपल्या नखांवर येऊन बसतात, असं कोणतरी त्याला सांगितलं होतं. त्यानं मूठ वळली आणि ती बगळ्यांच्या दिशेने केली. बगळ्यांचा थवा आला आणि एका झाडावर जाऊन विसावला. त्यानं मूठ सोडली, मिटलेले डोळे उघडले. त्याच्या दोन्ही हातांच्या दहाही बोटांवरच्या नखांवर बगळ्यांनी दाटीवाटीने ठाण मांडले होते. त्याला प्रचंड आनंद झाला."अण्णा! समदं बगळं हातावर आल्याती! त्याचा बाप काही बोलला नाही. झपाझप पावलं टाकत तो पुढेच चालला होता. रानातील वर्दळ बरीच कमी झाली होती. अंधार पसरायला लागला होता. खरेतर त्याला अंधाराची खूप भीती वाटायची, पण आज बापाच्या खांद्यावर बसून जाताना ती भीती पार दूर लोटली होती. बाप जवळ असला की खरेच त्याला कशाचीच भीती वाटायची नाही. आईही बापासमोर त्याला काही बोलायची नाही. अंधार गडद होत गेला, तशी त्याची आईही दिसायची बंद झाली.
त्यानं मोठ्यानं हाक मारली. आई... . आईनं नुसतं हूूं केलं. छोटी घरातून निघातानच झोपली होती.मघाशी घरातून बाहेर पडताना दुधासाठी ती रडत होती. पण दूध घरात कुठे होतं, रडली रडली आणि झोपून गेली. अण्णा घरात आल्यावर आई खूप रडली. बराचवेळ त्याला काही कळेना. मग आई आणि अण्णा दोघे रडायला लागले, आणि आईनं छोटीला काखेत घेतलं. आणि अण्णांनी त्याला बखोटीला धरुनच खांद्यावर घेतलं.
अण्णा कुटं ! त्यानं विचारलं. गावाला त्याच्या बापानं त्याचं कुतूहल शमविण्याचा प्रयत्न केला. पण गावाला जाताना आई नेहमी तोंड धुते... त्याला त्याचा नवीन ड्रेस घालू देते पण आज यातील काहीच झाले नाही याचे त्याला आश्‍चर्य वाटले, पण तरीही गावाला जायचे या कल्पनेने तो आनंदून गेला.
अण्णा कवा यायचं गाव... त्यानं काकुळतीला येऊन प्रश्‍न केला. खरे तर त्याला भूक लागली होती, पण आईकडं काही मागायचं तर आई दिसत नव्हती. त्याचा बाप नेहमीसारखा शांत राहिला. आता अंधार मिट्‌ट झाला होता. मिणमिणत्या चांदण्यात काहीच दिसत नव्हतं. रातकिड्यांचा आवाज गहिरा झाला होता. एवढ्यात त्याला काही तरी विहिरीत पडल्याचा आवाज आला.... जोरात.... त्याला काही कळलं नाही. त्याची भूक त्याला जास्त जाणवायला लागली. त्यानं मोठ्याने आईला हाक मारली... आई भूक.... ते शब्द त्या विहिरीत घुमू लागले. त्याच्या अण्णांनी त्याच्यासकट विहिरीत उडी टाकली होती. "आई भूक' एवढेच शब्द जीवंत होते... बाकी चारही जणांचे श्‍वास शांबले होते.

रविवार, २४ एप्रिल, २०११

कडी जोडणारा संपादक



कडी जोडणारा संपादक

वर्तमानपत्रे आपला चेहरा गमावून बसली आहेत, अशी ओरड आता अभिजनांमध्ये सारखी होताना दिसते. संपादकांचा चेहरा वर्तमानपत्रात दिसत नाही अशा आशयाच्या चर्चाही घडत आहे. वाचकांची रुची आणि वर्तमानपत्रांना आलेले भांडवली स्वरुप या कारणांनी अभिजनांच्या या चर्चामध्ये तथ्य नाहीच असे नाही, पण तरीही काही संपादक आपला चेहरा अंकातून दाखवत आले आहेत. पण केवळ संपादकांचा चेहरा वर्तमापत्रात दिसून चालत नाही तर संपादकांमध्ये समाजाला एकवटण्याची आणि त्या समाजाला एका दिशेने घेऊन जाण्याची ताकद असली पाहिजे. स्वातंत्र्यपुर्व काळात अनेक संपादकांनी समाज एकवटण्याचे काम केले, स्वातंत्र्यानंतरही अनेक प्रश्‍नांच्याबाबतीत संपादकांनी समाजाजागृती करुन त्याला दिशा देण्याचे काम केले नाहीच असे नाही, पण तरीही गेल्या काही वर्षांचा ताजा इतिहास बघता संपादक मंडळींना हे काम जमल्याचे दिसत नाही. पण कोल्हापूरच्या 24 एप्रिलच्या पंचगंगा वाचवुया मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघता ही तुटलेली साखळी जोडण्याचे काम "सकाळ'चे कार्यकारी संपादक श्रीराम पवार करत आहेत हे दिसते. संपादकाला लागणारी वैचारीक बैठक त्यांची घट्‌ट तर आहेच पण त्याशिवाय समाजाला एकवटण्याची आणि त्याला दिशा देण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात आहे.
कोल्हापुरातील "झाडे लावा' ही मोहिम असो वा पंचगंगा स्वच्छता मोहिम या दोन्ही मोहिमांचे रुपांतर लोकचळवळीत करण्याची हातोटी आणि त्यापाठिमागचे तात्वीक अधिष्ठान पवारसर यांच्याकडे आहे. एकीकडे वर्तमानपत्रे रोजच्या घडामोडी देत असताना त्याच घडामोडींवर लिहिणारे अनेक संपादक आहेत ( ते चूकही नाही), तर दुसरीकडे आपल्याच विचारांना कवटाळून समाजातील सगळे प्रश्‍न त्याच चष्म्यातून बघत लिहिणारे संपादक आहेत. वेगळे विषय मांडणे आणि ते लावून धरणे हेही समजण्यासारखे आहे पण त्या पलिकडे जाऊन काहीतरी करता येईल का हे बघणे आणि त्यासाठी पुढाकार घेणे ही गोष्ट आव्हानात्मकच नव्हे तर अवघडही आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न काय हे हेरुण तो प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनाच पुढे आणण्याची ताकद तुमच्या लेखणीत पाहिजे. पवारसर यांच्याकडे ही लेखणीची ताकद तर आहेच पण तो प्रश्‍न काय हे हेरण्याची दृष्टी आहे. त्यामुळेच "सकाळ'च्या या दोन्ही मोहिमा लोकचळवळ बनल्या.

बुधवार, १३ एप्रिल, २०११

अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...

आंदोलनाचा विषय कोणी चांगला घेतला म्हणून तो माणूस महानायक ठरतो का? एखादा विषय मार्गी लावल्यानंतर त्या माणसाला सगळ्याच विषयांतील सगळेच कळते, असे मानायचे का? त्याच्या प्रत्येक कृतीमागे कोणताही छुपा उद्देश नाहीच, हे का मानून चालायचे? समाजहित बघताना त्या महानायकाने केलेल्या चुका आणि त्याच्याकडून होत असलेल्या चुका यांना क्षमा करतच राहायचे का? एखाद्या विचाराने प्रभावित होणे वेगळे आणि तो विचार अंगीकारताना त्यामागची विचारांची बैठक मजबूत असणे वेगळे. याबाबत त्या महानायकाचे विचार ठिसूळ असतील तर तो त्या विचारांचा कसा मानायचा?..... असे अनेक प्रश्‍न आहेत... त्याची उत्तरे सापडत नाहीत. केवळ भोळेपणाने आणि समाजातील मोठा घटक अण्णा हजारे यांच्या मागे जातो म्हणून अण्णांना महानायक म्हणायला मन धजत नाही. अण्णांच्या प्रामाणिकपणावर आक्षेप घ्यायचे कारण नाही. त्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबाच द्यायला हवा, तरीही आंदोलनकर्त्या माणसाला महानायक मानण्याची गरज आहे का? अण्णा खरेच महानायक आहेत का? प्रश्‍नांची माळ तुटता तुटत नाही. या प्रश्‍नांची ठोस उत्तरे अण्णांना पाठिंबा देणाऱ्यांकडेही नाहीत.
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेला कोणीतरी ठोसा लावला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. रोजच्या "संसारिक' जबाबदाऱ्या पेलताना भ्रष्टाचाराचा राक्षस त्यांना दिसत होता; पण त्यावर उपाय मिळत नव्हता. ए. राजा, सुरेश कलमाडी यांच्या प्रकरणानंतर तर लोकांचा राजकारण्यांवरील विश्‍वासच उडू लागला होता. त्यातच अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयकाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू केले आणि लोकांचा अण्णांना पाठिंबा मिळायला लागला. इथपर्यंत सगळं ठीक चालले होते; पण इथून पुढे मात्र अनेक घटकांनी हे आंदोलन प्रभावित होत गेले. त्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरली. अण्णांच्या आंदोलनाला इंग्रजी माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. यामागे केवळ या देशातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाले पाहिजे, हा हेतू नक्‍कीच नव्हता. गेल्या सहा महिन्यांतील काही वृत्तवाहिन्यांच्या चर्चा बघितल्या तर हे लक्षात येईल, की यांना हे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. ए. राजा प्रकरण असेल, सुरेश कलमाडी प्रकरण असेल किंवा विकिलिक्‍स प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांतून सरकारला अडचणीतच आणायचे होते, हे सहज लक्षात येते. (केंद्रातील युपीए सरकारही काही फार दिवे लावत नसल्याने या माध्यमांची भूमिका अयोग्य म्हणता येणार नाही; पण त्या पाठीमागे केवळ लोकहित हाच उद्देश नाही हे त्यांच्या आक्रस्तळेपणावरून लक्षात येते.) इथे मात्र एक मूलभूत फरक आहे. कलमाडी, राजा किंवा विकिलिक्‍स प्रकरणी विरोधी पक्षाने मोठा गदारोळ केला; पण लोकांचा पाठिंबा मात्र त्यांना मिळाला नाही. आता विरोधी पक्षांनी उठविलेल्या प्रश्‍नांना लोकांतून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या माध्यमांचीही गोची होत होती. सरकारची विश्‍वासार्हता कमी झालीच आहे; पण विरोधकांकडेही ती नाही, असाच संदेश जणू जनता देत होती. या दोन्हीपेक्षा तिसऱ्याच कोणीतरी हा प
्रश्‍न हाताळावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत होती आणि अण्णांच्या रूपाने ती पूर्ण झाली. आता या प्रश्‍नाचे भांडवल करून सरकारला नमवावे, यासाठी ही माध्यमे पुढे झाली. त्यांनी अण्णांना हिरो करायचे ठरविले. चोवीस तास अण्णांच्या बातम्या दाखवून लोकांमधील असंतोष जागृत केला. लोकांना तिसरी व्यक्‍ती मिळाली आणि माध्यमांना नवा मुद्दा. विकिलिक्‍स आणि ए. राजा प्रकरणात सरकार कोसळले तर नाही; पण तरीही काही चिरा पडल्या होत्या. आता अण्णांना हिरो करून ती तोफ डागायची, याच उद्देशाने माध्यमे कामाला लागली. अण्णांच्या अनिश्‍चित (बेमुदत नव्हे) उपोषणाचे दिवस जसे पुढे पुढे जाऊ लागले तस तसे माध्यमांची धार तीव्र होत गेली. लोकांचा पाठिंबा वाढत गेला आणि एका वळणावर अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या. आता खरा प्रश्‍न परत निर्माण झाला आहे. आता अण्णा महानायक झाले. ते गांधीवादी विचारांचे आहेत, ते अंगावरच्या कपड्यांनीशी लढताहेत वगैरे वगैरे चर्चा झडू लागल्या. प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आणि तो प्रश्‍न सोडविणाऱ्यांना प्रतीक करून त्यांचा यथोचीत मान राखणे, हेही महत्त्वाचे असतेच. अण्णांच्या आंदोलनाबद्दल कोणाच्या मनात शंका येण्याचे कारण नाही; पण याचा अर्थ अण्णांना महानायकपदावर बसविणे हे अण्णांसाठी आणि समाजासाठीही घातक ठरेल.
विचारांची पताका हातात घेणे आणि ती घेऊन पुढे जाणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. महात्मा गांधीजींना हे दोन्ही जमले. स्वातंत्र्यानंतर जयप्रकाश नारायण यांनाही ते काही प्रमाणात जमले (जयप्रकाश नारायण यांना गुरू मानणारे किमान डझनभर नेते दिल्लीत सरकारला हलविताना दिसतील); पण हे अण्णांना जमेल का? हा प्रश्‍न आहे. अण्णांकडे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारी शक्‍ती नाही, हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या विचारांचा गोंधळच प्रचंड आहेत. बौद्धीक क्षमतेविषयी कोणी जर आक्षेप घेत असेल, तर त्यामागील असूया आणि निगरगट्टपणा सोडून त्यावर चर्चा व्हायला हरकत नाही. हा प्रश्‍न उपस्थित करण्याचे कारण, अशा माणसांना देव्हाऱ्यात ठेवून आपला कार्यभार करणारे निर्माण होतात (इथे तर ते झाले आहेतच) आणि आंदोलनाची दिशा दाखविणे, बघून घेणे, अडचणीतच आणणे या पातळीवर येते. त्याचबरोबर देव्हाऱ्यातील या महानायकालाही आपण खूप मोठे आहोत असा भास होतो आणि तो वेगवेगळ्या मागण्या करू लागतो. या मागण्या बहुंताशवेळा व्यवहारवादाच्या पलीकडच्या असतात आणि मग समाजासाठी रणांगणात उतरलेला महानायक समाजाचेच नुकसान करायला लागतो. त्यांचे शिष्य त्यांच्या विचारांना विरोध म्हणजेच समाजावादाला, पुरोगामित्वाला विरोध, देशाला विरोध अशा आवया उठवायला लागतात. त्यामुळेच अण्णांना महानायक करणे समाजाने पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे.
अण्णांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात कुठे गांधीवाद दिसत नाही. गांधीजी ज्या प्रकारे आंदोलन करायचे त्यालाच गांधीवाद समजायचा का? गांधीवाद हा विचारांचा आणि आचारांचा एक मार्ग आहे. एका बाजूला अण्णा फाशी द्या, गोळ्या घाला अशा पद्धतीचे आवाहन करताहेत, तर दुसऱ्या बाजूला गांधीवादी म्हणवून घेताहेत. अरे गांधींना तलवारच मान्य नव्हती आणि हे तर तलवारीच्या म्यानेत गांधीवाद कोंबताहेत. प्रश्‍न केवळ तलवार किंवा फाशीची गोष्ट करण्याबाबत नाही, तर प्रश्‍न आहे त्या विचारांची अधिष्ठान असण्याचे. एक क्षणभर आपण मानू की काय फरक पडतो, की ते गांधीवादी आहेत की नाही याचा. भ्रष्टाचारविरोधी ते आग्रही आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपला प्राणही पणाला लावला होताच की. त्यांच्या प्राण पणाला लावण्याबद्दल आक्षेप नाही किंवा त्यांच्या समाजसेवेच्या निष्ठेबद्दलही आक्षेप नाही. आक्षेप आहे तो त्यांच्याभोवती जमत असलेल्या जळमटांबद्दल. ही जळमटे वाढली, की त्यात समाजाचाच श्‍वास कोंडला जाण्याची शक्‍यता आहे. नेत्याकडे अशी जळमटे बनू न देण्याची ताकद असायला हवी. दुर्दैवाने ती अण्णांकडे नाही. त्यामुळे ते दीर्घकालीन मोठे आंदोलन उभे करू शकत नाहीत. अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...

रविवार, ३ एप्रिल, २०११

सोळा सहस्रातील स्त्री

डोक्‍यावरचा मोरपिसांचा मुकुट त्याने काढून ठेवला आणि तो बाथरूमध्ये शिरला. चेहऱ्यावरचा रंग धूत असतानाच कोणी तरी कडी वाजविली. त्याने चेहरा धुतला आणि तो पुसतच तो बाहेर आला. अजुनी अंगावरची नाटकातील कृष्णाची वस्त्रे तशीच होती. गळ्यातील माळ आणि पितांबर तसेच होते. खरे तर त्याला आज खूप कंटाळा आला होता, कोणी भेटायला सही मागायला येऊ नये असेच वाटत होते; पण समोरच्या त्या बाईंना त्याला थांबवावे नाही वाटले. ती बाई आत आली.
तुमचं कृष्णाचं काम खूप सुंदर झालं. मला तुमचा अभिनय खूप आवडतो.
त्यानं उगाच हसण्याचा प्रयत्न केला. आभारी आहे, अशा अर्थाने त्याने मान हलविली.
ती बाई तिथेच उभी राहिली... त्याला तिचे तसे उभे राहणे अस्वस्थ वाटू लागले.
तुम्ही बसा ना?
तिही थोडी संकोचली होती; पण बसली. ती बसल्यावर त्याला आपण उगाचच तिला बसायला सांगितल्याचे वाटून गेले.
तुमच्याकडे बघितल्यावर कृष्ण तुमच्यासारखाच दिसत असेल असे वाटते हो?
""नाही हो हे तुमचे प्रेम आहे. रंगांची पुटं चेहऱ्यावर चढवून कृष्ण रंगवणारे आम्ही बहुरुपी. त्या योगेश्‍वराचे रुप कुठे यायचे आम्हला.''
त्याचे ते थोडे लांबलेले वाक्‍य ऐकून ती थोडी सैल झाली. तिथेच व्यवस्थित बसत तिने त्याच्याकडे बघितले. तो थकला होता; पण तरीही त्या बाईचे तिथे बसणे त्याला खुपत नव्हते. ती काही फार सुंदर म्हणावी अशी नव्हतीच. खरे तर थोडी सावळी होती. चाळीशी पार केली असेल; पण निटनेटक्‍या कपड्यांमुळे ती थोडी आकर्षक वाटत होती.
""पण तुमच्यातील राधाकृष्णच योगेश्‍वर कृष्णापेक्षा जास्त भावतो. त्या शेवटच्या प्रसंगातील यादवीने असह्य झालेल्या कृष्ण नाही बघवत.''
""पण खरे तर तोच कृष्ण खरा की... असह्य, दुर्बल तो कुठे योगेश्‍वर आहे. महाभारताच्या युद्धा वेळी अर्जुनाला उपदेश सांगणारा, पांडवांसाठी शिष्टाई करणारा आणि जरासंधाचा वध करण्यासाठी भीमाला प्रोत्साहित करणारा कृष्णच तो राधाकृष्ण.'' तो खाली बसला. त्या बाईंकडे त्याने आणखी एकदा निटस्‌ बघितलं, कुठे ओळख लागते का बघण्यासाठी मेंदूच्या शेवटच्या पेशीपर्यंत ताण दिला; पण कुठेच संदर्भ लागला नाही.
""तुम्ही अनेक भूमिका केल्या; पण तरीही वीस वर्षांपूर्वीचे हे नाटक तुम्हाला अजून का करावे वाटते.''
तसा तो अबोल, खूप कमी बोलायचा. कोणी पत्रकाराने वैगेरे काही प्रश्‍न विचारले तरी तो जास्त काही नाही बोलायचा. त्याच्या मुलाखतीही खूप जणांनी घेतल्या; पण त्या शाळा-कॉलेजांत अर्ज भरून द्यावा तश्‍याच स्वरूपाच्या. अलीकडे तर तो काही बोलायचाच नाही. त्याच्या जुन्या मुलाखतींनाच नव्या स्वरूपात पत्रकार सादर करायचे. कधी काळी काही मते त्याने मांडलेली असायची; पण ती आज पुरती बदललेली असायची तरीही ती मते त्याच्या नावावर वर्तमानपत्रे खपवायची. त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. आता त्या मतांनाही किंमत फक्‍त काही मिनिटांच्या मनोरंजनाची आहे हे त्याला कळले होते. पण आज या बाईंशी बोलावं असं त्याला वाटू लागलं. कुठे तरी समानधागा असेल याची त्याला खात्री वाटू लागली.
तुम्हाला माझा प्रश्‍न आवडला नाही का?
त्या बाईंच्या अर्जवी आवाजाने तो भानावर आला.
""तसं काही नाही. या नाटकातील कृष्ण मला फार आवडतो. तो माझा वाटतो. नटाच्या आयुष्याची शोकांतिका हीच असते तो अनेक भूमिका करतो. अनेकांची चरित्र पडद्यावर किंवा रंगमंचावर मांडतो; पण स्वतः मात्र कोरडाच राहतो. या कृष्णाच्या भूमिकेत मला माझं पण दिसतं. खरे तर मला या भूमिकेच्या तालमीच जास्त करायला आवडतात. त्या आपल्यासाठी असतात ना? त्या भूमिकेतून बाहेर यावं असं वाटतचं नाही; पण तालमी केल्यानंतर नाटक रंगमंचावर यायलाच पाहिजे नाही तर इतरांची पोटे कशी भरणार म्हणून हे नाटक रंगमंचवर येते एवढेच.''
म्हणजे मला नाही समजलं. त्या योगेश्‍वर कृष्णात आणि तुमच्यात साम्य आहे असं वाटतं की काय?
नाही ओ. त्या योगेश्‍वर कृष्णात आणि माझ्यात काही साम्य शोधायचे म्हणजे असंख्य सूर्याने व्यापलेल्या आकाशात आणि आपल्यात एखाद्या काजव्याने साम्य शोधावे तसेच आहे. ''
मग तरीही तुम्हाला कृष्णात साम्य वाटतेच की.
हो पण त्या योगेश्‍वर कृष्णात नाही. तुम्हाला त्या नाटकातील एक प्रसंग आठवतो. नरकासूर वधानंतर कृष्ण त्या सोळा सहस्त्र स्त्रियांना आपलेसे करतो. त्या रात्री कृष्णाला झोप लागत नाही. आपल्या महालात येरझाऱ्या घालणाऱ्या त्या कृष्णाकडे त्या सोळा सहस्र स्त्रियांतील एक धीट स्त्री येते.
हो... आठवते. तोच एक तर प्रसंग मनाच्या कुपीत कायम ठेवलाय... त्या एका प्रसंगासाठीच तर मी हे नाटक अनेक वेळा बघितले. बघते आहे... त्यातील शब्द अन्‌ शब्द तोंड पाठ आहे... ती म्हणते...
कृष्णा तुझी बेचैनी कळते रे...सहस्त्र स्त्रिया मिळूनही तू तसा कोरडाच की. खरे तर तू त्या राधेच्या प्रेमपाशातून मुक्‍त झालाच नाही, होणारही नाहीस.. तू गोकुळ आणि मथुरा सोडून इथे आलास त्यामागे राधेला विसरणे हेही होतेच की. पण ते तुला काही जमले नाही. राधेला विसरणे म्हणजे स्वतःला विसरणे. तुझ्या पराक्रमात, तुझ्या शिष्टाईत, तुझ्या साऱ्या गुणांतून राधाच तर दिसते. राधेला तुझ्यातून वेगळे केले की तू तुझा उरतोस कुठे. त्यामुळे आज तुला झोप लागणार नाही, तशी झोप मलाही लागणार नाही.
माणुसकीच्या नात्याने तू आम्हाला जवळ केलंस. तुझ्या राज्यात आम्ही तुझ्या बायका म्हणूनही फिरू. नकासुराच्या राज्यात ज्या बंदीवासात आम्ही होतो त्यापेक्षा निश्‍चितच तुझ्या राज्यात आम्हाला मोकळीक मिळेल. तुझ्या नावाच्या कुंकवामुळे समाजात मानही मिळेल; पण तरीही आम्ही तुझ्या नाही होऊ शकणार. खरे सांगू कृष्णा त्या बंदीवासापेक्षा ही मोकळी हवा फार लागते रे. नरकासुराच्या बंदीशाळेपेक्षा तुझा महाल मोठी बंदीशाळा वाटते. नरकासुराने केलेल्या यातनांचे काही वाटायचे नाही.. तुझी मूर्ती डोळ्यासमोर आली की सगळ्या वेदना सुसह्य व्हायच्या. तू येशील ही आशा होती आणि या सगळ्यातून तू आम्हाला बाहेर काढशील, या आशेवरच तर जगत होतो आम्ही; पण तू आलास आणि ती आशाही आमच्याकडून तू हिरावून घेतलीस. आता आम्ही तुझ्या आहोत आणि तू मात्र आमचा नाहीस. ... आता जगायचं कसं. तुझंही असंच होईल. राधेच्या विचाराशिवाय तुला जगायला येणारच नाही.''
तो त्या बाईंकडे बघत राहिला. त्याला एकट्यालाच वाटायचं हे नाटक माझ्यासाठीच लिहिलं आहे. प्रत्येक पात्र माझ्याच भावना बोलत आहे; पण त्या बाईंकडे बघितल्यावर त्याला वाटले हे नाटक माझे एकट्याचे कुठे आहे. त्या बाईतील आणि कृष्णाने मुक्‍त केलेल्या त्या सहस्र स्त्रियांतील अंतर पार मिटून गेल्याचे त्याला वाटले.

शुक्रवार, १ एप्रिल, २०११

एक भूत हवे आहे..... चमत्कारासाठी






संघाला चार धावांची गरज. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. अस्वस्थ हीरो खेळपट्‌टीवरून क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत असतो... प्रेक्षकांत शांतता... हिरॉईन हात जोडून देवाचा धावा करत असते. व्हिलन जो गोलंदाजी करत असतो तो शोएब अख्तरच्या स्पीडने धावत येतो.. (बऱ्याच वेळा एवढा वेळ हा का धावतोय असा प्रश्‍न पडावा
इतका वेळ तो एक चेंडू टाकायला घेतो)... तो चेंडू टाकतो... हीरो बॅट घुमवतो. चेंडू उंच आकशात जातो... क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी चेंडूखाली येतो आणि तो झेल पकडतोही; पण त्याचा एक पाय सीमारेषेबाहेर... अंपायर षटकार असल्याची खूण करतो आणि एकच जल्लोष... हिंदी चित्रपटात असेच थोडेफार बदल केलेले प्रसंग अनेक वेळा चितारलेले आहेत. प्रेक्षकांना खात्री असते की काहीही झाले तरी (म्हणजे तेथे आपल्या हीरोची फलंदाजी व्यंकटेश प्रसादसारखी असो आणि व्हिलनची गोलंदाजी मॅकग्रासारखी असली तरीही) शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून हीरो तो सामना जिंकून देणारच. प्रेक्षकही हा खरोखरचा सामना असल्यासारखे शिट्या वाजवून आपल्या हीरोने कशी जिरवली, म्हणत सिनेमागृहातून बाहेर पडतात.
भारतीय सिनेमा आणि क्रिकेट विश्‍व या दोन्ही गोलांच्या अनेक कड्या एकमेकांत मिसळल्या आहेत. क्रिकेटपटूंची आणि बॉलिवूड तारकांची अफेअर ही यातील एक कडी; पण ही कडी वगळूनही अनेक कड्या या दोन गोलांना एकत्र करतात. मग क्रिकेपटूंचे सिनेमात काम करणे असो वा नट-नट्यांनी क्रिकेट मॅच खेळणे असो; पण भारतीय सिनेमांत क्रिकेटचे प्रतिबिंब ठळकपणे पडले आहे.
भारतीय सिनेमा हा बॉक्‍स ऑफिसवर चालणाऱ्या गणितांवर जास्त निर्माण केला जातो. त्यामुळे बाजारात जे चालते ते ते सगळे सिनेमात आणण्यासाठी काही निर्माते-दिग्दर्शक जिवाचा आटापिटा करतात. त्यामुळे ज्या देशाचा धर्मच क्रिकेट बनलेला आहे त्यामुळ क्रिकेटला 70 एमएमवर न आला असता तरच नवल. भारतीय सिनेमातही क्रिकेट अनेक अंगाने येत गेले. कधी ते कथानकाचा मुख्य भाग म्हणून तर कधी उपभाग म्हणून. अगदी काही वेळा त्याचा ओझरता उल्लेख; पण क्रिकेट भारतीय सिनेमात योग्य अंतरांनी येतच राहिले आहे. "इक्‍बाल', "ऑलराऊंडर', "लगान', "पटियाला हाऊस', "चेन कुली की मेन कुली', "दिल बोले हडीप्पा' यांसारख्या चित्रपटांचा मुख्य कथाभाग हा चित्रपटाभोवतीच गुंफला होता, तर "मासूम', "हम आपके है कोन', "मुझसे शादी करोगी', "चक दे इंडिया' यांसारख्या चित्रपटांत काही सेकंदांपुरते का होईना; पण क्रिकेट येऊन गेलेच.
ऑल राऊंडर ः भारताने 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण भारतात दिवाळी साजरी झाली. क्रिकेटचा फिव्हर एवढा होता की तो कॅश करण्यासाठी ऑल राऊंडर हा चित्रपट काढला. ज्याला अभिनयाचा एक पैलूही माहिती नव्हता अशा कुमार गौरवला अष्टपैलूची भूमिका मिळाली. लव्हस्टोरीच्या यशातून अजून कुमार गौरव बाहेर पडला नव्हता; पण लोकांनी या ऑल राऊंडरला नाकारले.
मालामाल ः हा खरे तर संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित चित्रपट नव्हता. या चित्रपटात नसिरुद्दीन शाहने क्रिकेटपटूची भूमिका केली होती. यामध्ये आता ज्याप्रमाणे पाकिस्तानी क्रिकेट संघ स्पॉट फिक्‍सिंगमध्ये अडकलेला आहे त्याप्रमाणेच नासिरुद्दीन शहांना हा सामना गमवायचा होता. खरे तर या चित्रपटाची खरी प्रसिद्धी झाली ती भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांच्यामुळे. नसिरुद्दीन शहा यांच्या सोबतीने तेही या सामन्यात दिसले होते.
अव्वल नंबर ः 1990 मध्ये आलेला हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळलेच नाही. मिस्टर परफेक्‍टनिस्ट म्हणून ज्या अमीर खानला संबोधले जाते तो या चित्रपटाचा हीरो. चित्रपट देव आनंदचा. त्यामुळे देव आनंद यांच्या चित्रपटात जे जे असते ते ते सगळे या चित्रपटात बघायला मिळते. विशेष म्हणजे त्यानंतर काही काळ आमीरवर तो देव आनंदसारखा अभिनय करतो अशी टीकाही झाली होती. आदित्य पांचोलीही या चित्रपटात होता; पण चित्रपटच लोकांच्या लक्षात नाही तिथे आदित्य पांचोली कोठून राहणार.
चमत्कार ः 1992 मध्ये आलेला हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला तरी लोक काही वेळ का होईना; पण रिमोट बाजूला ठेवतात. या चित्रपटाचे रसायनच काही भन्नाट बनले आहे, की आजही हा चित्रपट बघायला आवडतो. शाहरूख या चित्रपटात जेवढा इनोसंट वाटला तेवढा पुन्हा कधीच वाटला नाही. नसिरुद्दीन शहा यांचे भूत आणि या चित्रपटातील क्रिकेट मॅच हे दोन्हीची खिचडी मस्त जमली आहे. आजही जेव्हा कधी भारतीय संघ संकटात सापडतो त्या वेळी सिनेमाप्रेमी लोक देवाचा धावा करण्याऐवजी नसिरुद्दीन शहाचाच धावा करतात. नसिरुद्दीनचे भूत हीरोच्या संघाला अशा काही विचित्र स्थितीतून बाहेर काढते ते खरे तर पडद्यावरच बघायला पाहिजे. बाकी या चित्रपटात शाहरूख खानने प्रशिक्षकाची भूमिका केली आहे; पण हा चित्रपट संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित नाही.
लगान ः 2001 मध्ये आलेला लगान चित्रपटाची कथा कोणा एका क्रिकेटपटूवर आधारित नव्हती, तर चित्रपटाचा आत्मा क्रिकेटच होता. अव्वल नंबरमध्ये मिळालेले अपयश आमीरने या चित्रपटात धुऊन काढले. आतापर्यंत एवढे यश कोणत्याही क्रिकेटपटाला मिळाले नव्हते, एवढे यश लगानने मिळविले. ब्रिटिश इंडियातील एका न झालेल्या सामन्यावर या चित्रपटाची कथा बेतली होती. तीन तासांहून अधिक काळ लांबी असूनही "लगान'ने तुफान यश मिळविले.
स्टंप्ड ः 2003 च्या विश्‍वचषक स्पर्धेचा फिव्हर कॅश करण्यासाठी निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या दांड्या बॉक्‍स ऑफिसवर अशा काही उडाल्या, की निर्माता नंतरचे काही दिवस रात्री क्रिकेट क्रिकेट... म्हणत जाबडत उठला असेल. चित्रपटात दम नव्हताच. केवळ धंदेवाईक दृष्टीने निर्माण केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी ग्राहक या दृष्टीने बघत नाकारले. सलमान खानने या चित्रपटात रविना टंडनच्या इच्छेखातर एक आयटम सॉंग केले होते, एवढीच या चित्रपटाची जमेची बाजू.
इक्‍बाल ः एका मूक-बधिर आणि तरीही क्रिकेटचे प्रचंड वेड असलेल्या मुलाची ही कथा. चित्रपटातील मुख्य कथानक आणि उपकथानकेही क्रिकेटभोवतीच फिरतात. श्रेयस तळपदेने या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीचे दार ठोठावले. नसिरुद्दीन शहा आणि क्रिकेट यांचे काय नाते आहे माहिती नाही; पण याही चित्रपटात नसिरुद्दीन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला. चित्रपटाच्या पहिल्या दृश्‍यापासून ते शेवटच्या दृश्‍यापर्यंत क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच बघायला मिळते. या चित्रपटाला समीक्षकांनी प्रचंड उचलून धरले.




चेन कुली की मेन कुली ः या चित्रपटात एका मुलाला एक बॅट मिळते. त्याच्यातील गुणांपेक्षा तो त्या बॅटवरच जास्त विसंबून राहतो. त्याला वाटत असते, की त्या बॅटमध्ये काही तरी जादू आहे. सचिन तेंडुलकरचा या चित्रपटात उल्लेख नाही; पण झईन खानला निवडताना तो थोडासा सचिनसारखा दिसतो म्हणूनच निवडले आहे हे जाणवते. सचिनही अवघ्या सोळाव्या वर्षी संघात आला तोच संदर्भ घेऊन हा चित्रपट केला आहे.
से सलाम इंडिया ः 2007 मध्ये भारतीय संघाचे वर्ल्डकपमध्ये जे झाले तेच या चित्रपटाचे झाले. भारतीय संघ वेस्ट इंडीजला गेला कधी आणि आला कधी हे जसे लोकांना कळले नाही; तसेच से सलाम इंडिया हा चित्रपट कधी लागला आणि कधी गेला कळले नाही. चित्रपटात संजय सुरीने काम केले होते. चित्रपट बरा होता; पण त्याची प्रदर्शनाची वेळ चुकली.
दिल बोले हडिप्पा ः राणी मुखर्जीने या चित्रपटात फलंदाजाचे काम केले आहे. एक मुलगी मुलगा बनून भारतीय संघात खेळते या आशयावर चित्रपट होता. चित्रपटात काहीच नव्हते. राणीला बघायला जावे तर दाढी आणि मिशीतील राणीही बघवत नव्हती.



पटियाला हाऊस ः ज्या ज्या वेळी वर्ल्ड कपचा फिव्हर कॅश करण्यासाठी क्रिकेट चित्रपटात आले त्या त्या वेळी लोकांनी ते नाकारले. खरे क्रिकेट बघायला मिळत असताना कोणी हे फालतू क्रिकेट का बघावे; पण नाही तरीही निर्मात्यांना याच वेळी चित्रपट काढण्याची भारी हौस. पटियाला हाऊस कधी आला आणि कधी गेला ते अक्षयकुमारलाही कळले नाही.
ही काही प्रतिनिधीक उदाहरणे याबराबरच अनेक चित्रपटांतून क्रिकेट आले. कधी क्रिकटपटूंवर, तर कधी पैजेतून तर कधी मॅच फिक्‍सिंगसारख्या विषयातून भारतीय सिनेमात क्रिकेट येत राहिले आणि यापुढेही ते येतच राहील.

सोमवार, १४ मार्च, २०११

ठिपका.....


त्याने थरथरत्या हाताने कपाटातील कागद काढले. ते पिवळसर कागद त्याने एकदा नाकापाशी नेले आणि जोरात श्‍वास घेतला. त्याची ही जुनी सवय, केव्हा लागली कोणास ठावूक. आता त्याची पहिली कादंबरी येऊनही 50 वर्षे उलटली असतील, मग दुसरी, मग तिसरी.. किती कादंबऱ्या, नाटके, लघुकथासंग्रह येत राहिले, त्याचे आकडे त्याचे चाहते मोजत राहिले, हा मात्र लिहित राहिला. अनुभवांना आणि कल्पनांना अगदी चंदनाचे लेप लावत लिहीत राहिला. पण काहीही लिहायला बसले की पहिल्यांदा कोऱ्या कागदांचा गंध श्‍वासात भरुन घ्यायची त्याची सवय सुटली नाही. नंतर नंतरच्या काळात तर त्याला अनेकांनी सल्ले दिले, की असे कागदावर लिहित राहू नका. संगणकाचा वापर कर, पण त्याने ते फारसे मनावर घेतले नाही. शाई पेनातील पहिला शब्द जेव्हा कागदारवर उमटतो, त्यावेळेचा आनंद कळपटावरच्या कळा दाबून येणार नाही, असे त्याचे म्हणणे असायचे. दोन वर्षांपुर्वी झालेल्या अपघातानंतर मात्र त्याचा आणि पेन-कागदांचा संबंध तुटलाच होता. हॉस्पीटलमधुन घरी आल्यावर तो अनेक दिवस बेडवर पडूनच होता. डोक्‍यात कल्पनांचे डोंगर तयार होत नव्हते असे नाही, पण थकलेल्या गात्रांना ते डोंगर उचलायचे सामर्थ्यच राहिले नव्हते. कित्येकदा त्याचा त्याला त्रास व्हायचा. कल्पनांचे डोंगर आपल्या अंगावर कोसळून त्यात गुदमरुन जातोय की काय, असे त्याला वाटत राहायचे. मग तो बडबडायचा, हातवारे करायचा.. मोठ्याने ओरडायचाही. त्याच्या आजुबाजुचे लोक मग चिडायचे. कोणी म्हणायचे त्याला वेड लागलंय, तर कोणी म्हणायचे तो बोलतो त्यात दैवी काही तरी आहे, त्याला समजायचे ते, पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याला ना वेडा म्हणवून घ्यायचं होतं, ना कोणी अवतारी पुरुष. तो बडबडायचा. झाडांशी, ढगांशी, पक्ष्यांशी कोणाशीही बोलत राहायचा, कल्पनांचे डोंगर विरघळेपर्यंत तो बोलायचा. ते डोंगर विरघळले की मग तो हलका व्हायचा आणि शांत झोपी जायचा. बेडवरुन तो खाली आला तरी त्याने लिहणं सुरु केलं नव्हतं. आता लेखक म्हणून संन्यास घ्यावा असा विचार डोक्‍यात यायचा पण मन त्याला विरोध करत राहायचे.लिहिण्यासाठीचा मनाएवढा उत्साह गात्रांत राहिला नव्हता. तरीही मन त्याची पाठ सोडत नव्हते.
आज मात्र त्याला राहावलं नाही. या कल्पनांच्या डोंगरांना असेच विरघळून द्यायचे नाही, हे त्याने मनाशी पक्‍के केले. काहीही झाले, तरी आज पेनातील शाई प्रवाहीत करायचीच. त्याने कागद टेबलवर ठेवले आणि पेनाचे टोपण काढले. पेनाचे टोपण काढताना बारीकसा किंचीत किनरा येणारा आवाज त्याने ऐकण्याचा प्रयत्न केला, पण तो आवाज काही त्याच्या मेंदूपर्यंत पोचला नाही. पेनाची ती सोनेरी पिवळी निप त्याने डोळ्यात साठवून घेतली. समोरच्या कागदांकडे त्याने एकवार बघितले आणि पेनाची निप त्या कागदावर रोवली. पेन उचलण्यातील तेजी बोटे कधीच विसरुन गेली होती. काही सेंकद तसेच गेले. एक मोठा ठिपका कागदावर उमटला. त्यानंतर पुढचा, आणि परत पुढचा शब्द ठिपका बनूनच कागदावर राहिला. त्याचे ते थरथरणारे हात थांबले. आयुष्यभर ज्या कागदाने आणि पेनाने प्रामाणिकपणे सेवा केली त्यांनी त्याची साथ सोडून दिली होती. तो तसाच त्या टेबलवर डोके टेकून बसला. काही वेळाने कोणीतरी दार वाजवले...दार उघडले नाही. कागदावरचा ठिपका त्याच्या श्‍वासांवर जाऊन बसला होता.
..................................
भेटवस्तू हा असा प्रकार आहे की, जो आपण पुढच्या माणसाला सांगतो की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस. त्यात त्याची किंमत देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर असते. आपल्याकडची सर्वात लाडकी गोष्ट त्याच व्यक्‍तीला दिली जाते जो आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असते, मग पैशाच्या बाजारात तिची किंमत काहीही होवो. अगदी असेच. स्वप्नांना सत्यात उतरायला निघालेल्या माझ्या मित्राला माझी ही नवी कोरी कथा भेट. happy journy...

रविवार, २० फेब्रुवारी, २०११

युतीचा नवा खेळ


भारतीय जनता पक्ष असो वा शिवसेना या दोन्ही पक्षांना आता युती स्वबळावर सत्तेत येईल याबाबत आत्मविश्‍वास उरलेला नाही. जोपर्यंत दलित समाज युतीबरोबर येत नाही, तोपर्यंत युतीला बहुमत मिळणार नाही, हे त्यांना पक्‍के ठाऊक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पायघड्या घातल्या नसत्या तरच नवल. शिवसेनेला आगामी मुंबई महापालिकेसाठी रामदास आठवले पाहिजे आहेत, तर भाजप लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अपेक्षित धरून चालला आहे. त्यामुळे भाजपला आता कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून स्वतःचे आणि मित्रपक्षांचे खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठीच मुंडेंची बांधणी सुरू आहे.



लो कसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवधी आहे. गेल्या निवडणुकांत काय चुका झाल्या, याचे आत्मपरीक्षण सर्वच पक्षांनी केले आहे. तरीही आता पुन्हा निवडणुका जवळ आल्यासारखी विधाने विरोधी पक्षांच्या नेत्याकंडून होत आहेत. यात विरोधी पक्षाची ताकद वाढविण्याचा जसा प्रयत्न आहे, तसाच सत्ताधाऱ्यांच्या मनातही चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत मनसेशी युती करणे कसे गरजेचे आहे, हे आकडेवारीनिशी सांगितले. त्याचदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या गणिताबाबत चर्चा रंगू लागली आहे. खरे तर भीमशक्ती- शिवशक्ती एकत्र येण्याची गोष्ट काही नवी नाही. यापूर्वीही अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आहेत आणि त्या वेळीही केवळ चर्चाच रंगली होती. त्यानंतरही रामदास आठवले ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत होते, त्यांच्यासोबतच राहिले आणि शिवशक्ती आणि भीमशक्‍ती एकत्र येण्याची चर्चा हे केवळ एरंडाचे गुऱ्हाळ ठरले. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण होणारच नाही असे नाही; पण मागच्या वेळीपेक्षा या वेळी ही युती होण्याच्या दिशेने रंकाळ्याचा नंदी एक तांदूळ पुढे सरकला आहे, हे निश्‍चित.
शिवसेनेला आता गरज आहे मुंबई महापालिका जिंकण्याची. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला विरोधात मनसे असल्याने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी विरोधातील ताकद जेवढी कमी करता येईल तेवढी करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. मुंबई ही शिवसेनेची पेढी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई जिंकायची आहे.
मुंबईतील दलित मते मिळविण्यासाठी रामदास आठवलेंची शिवसेनेला गरज आहे. (त्यासाठी ते काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याच्या तयारीतही आहेत.) रामदास आठवले जर शिवसेनेला मिळाले तर निवडणुकीची ही प्रश्‍नपत्रिका सोपी जाणार नसली तरी त्यातील दोन-तीन प्रश्‍नांची उत्तरे अगोदरच माहीत असल्याने प्रश्‍नपत्रिकेला सामोरे जातानाचा आत्मविश्‍वास वाढेल, यात शंका नाही. त्यामुळे शिवसेनेला आठवलेंची गरजच आहे. याच वेळी रामदास आठवलेंनाही लोकसभेचा पराभव जिव्हारी लागला आहे. आघाडीशी युती करूनही आपल्याला काहीच मिळाले नसल्याची भावना त्यांची तीव्र झाली आहे. हीच भावना कमी-जास्त प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांतही आहे. ग्रामीण पातळीवर काम करत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी-कॉंग्रेसने गृहीतच धरले आहे. त्यामुळे त्यांनाही आघाडीशी संबंध नकोसे झाले आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा मेळ रिपब्लिकन विचारांशी बसत नसला तरी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांत हा मेळ बसू लागला आहे. त्यामुळे समान कार्यक्रम ठरवून एकत्र यायला हरकत नाही, अशीच भावना दलित कार्यकर्त्यांची आहे. आगामी विधानसभा निवडणुका व्हायच्या तेव्हा होवोत; पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुंकाअगोदर ही युती झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांत युतीच्या बळावर आपली ताकद वाढेल, असा विश्‍वास या कार्यकर्त्यांना वाटत आहे. तरीही रामदास आठवलेंना आपल्यासोबत घेण्यासाठी युतीच्या नेत्यांना दोन पावले मागे यावे लागेल, हे निश्‍चित!
मनसेबाबत गोपीनाथ मुंडेंनी युतीचे केलेले वक्तव्य आणि राज ठाकरे यांनी त्याबाबत केलेला इन्कार दोघांच्याही राजकारणाचा भाग आहे. मुंडे आता दिल्लीत असल्याने दिल्लीतल्या वाऱ्याप्रमाणे ते बोलतात आणि राज ठाकरेंना दिल्लीतल्या वाऱ्यापेक्षा मुंबईचे खारे वारे जास्त प्रिय आहे. केंद्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात सापडल्याने हे सरकार कधी कोसळते, अशी वाट भाजप बघत आहे. त्यामुळेच कोहाळा पडला तर काय काय करायचे, याची रणनीती ते आतापासून बनवायला लागले आहेत. आज मनसे युतीसोबत नसली तरी उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने युतीत सहभागी व्हावे, यासाठीच हा प्रयत्न आहे. (त्यामुळेच रविशंकर यांनी मनसेबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील न म्हणता एनडीए घेईल, असंच म्हटलं आहे.) पण यात एक फरक आहे. शिवशक्‍ती-भीमशक्‍ती एकत्र यावी, ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जशी इच्छा आहे, तशीच ती त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. त्या प्रमाणात भाजप-मनसे एकत्र येण्यास मनसेचे ना नेते इच्छुक आहेत ना कार्यकर्ते.