सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

पुन्हा पुन्हा पुन्हा

रस्त्याच्या कडेच्या कचरा कोंडाळ्यात तीनं आपला थरथरता हात घातला. कचऱ्याच्या पिशव्या तपासता तपासता तिच्या हाताला काहीतरी लागलं. त्यातलीच एक प्लॅस्टीकची पिशवी तीनं रिकामी केली आणि त्यात तो "ऐवज' कोंबला. पुन्हा तिचं चाचपणं सुरु होतं.आणखी थोड्या वेळानं तिला त्यात काहीतरी सापडलं. तिनं तेही त्या पिशवीत कोंबलं. कोंडाळ्याच्या कडेला पडलेली वाकडीतिकडी काठी तिनं डाव्या हातात घेतली आणि शरिराची लक्‍तरं त्याच्या साहाय्याने उचलण्याचा प्रयत्न केला. एक एक अवयवय उचलत ती अर्धवाकलेल्या अवस्थेत उभी राहिली. कळकट मळकट साडीला तिनं हात पुसला आणि मघाचा "ऐवज' उजव्या हातात घेवून तिने रस्त्याच्या कडेला नाला वाहावा तसं स्वतःला वाहतं केलं. भंगारवाल्याच्या दुकानासमोर उभी राहात तिनं तो ऐवज त्याच्यासमोर ठेवला. त्यानं निरुत्साहानंच त्याकडं बघीतलं आणि दोन रुपयांची दोन नाणी तिच्याकडे भिरकावली. समोर पडलेली ती नाणी उचलण्यासाठी ती खाली वाकली आणि तिच्या वाकड्या काठीचा धक्‍का त्या पिशवीला बसला. सकाळपासून गावातले निम्मे कचाराकोंडाळे शोधून आणलेल्या त्या पिशवीतल्या बाटल्या खाली पडल्या आणि खळकण असा आवाज आला. मागे वाकलेला दुकानदाराने चटकन पाठ फिरवली आणि बघितलं. बाटल्यांच्या काचांकडे बघत तिच्या हातातील त्या दोन नाण्याकडे त्याचे लक्ष गेले. त्याकडे लक्ष जातातच त्याने तिच्या हातावर झडप घातली आणि ती नाणी हिसकावून घेतली. ती काही बोलली नाही. फुटलेल्या काचा तिनंच गोळा केल्या. त्या मघाच्या पिशवीत कोंबल्या. त्या कोंबता कोंबता त्यातील एक काच तिच्या हातात घुसली तिनं ती जोरात ओढली. पण बराचवेळ रक्‍ताचा थेंबही बाहेर आला नाही.... रक्‍त यायला पोटात काहीतरी असाव लागतं...