रविवार, २५ सप्टेंबर, २०११

महाराजांचं उपरणं....

अमुक तमुक महाराज की जय... महाराज की जय... एक पट्टेवाला जोरात ओरडला. त्याच्या पाठीमागून मग दुसरा आणि मग तिसराही ओरडला. "महाराज की जय...' जयजयकार गगनात दुमदुमला.
महाराजांनी हात वर केला. दरबार शांत झाला..
मग एक एक दरबारी बोलू लागला.
महाराजांचा विजय असो.... महाराजांच्या राज्यात गुरं-ढोरं सुखी आहेत. महाराजांची कृपा आहे.... एका दरबाऱ्याने सूर आळवला.
महाराजांचा विजय असो... महाराजांच्या राज्यात स्त्रिया सुखी आहेत... दुसऱ्या दरबाऱ्याने री ओढली.
महाराजांचा विजय असो... विजय असो... महाराजांच्या राज्यात पोरं-सोरं सगळी प्रजा सुखी आहे... महाराजांचा विजय असो... आता अश्‍वमेध केलाच पाहिजे...
दरबाऱ्याने अश्‍वमेधाचं नाव काढताच महाराजांच्या अंगावर मास चढलं.
उद्याच्या चक्रवर्ती सम्राटाचा विजय असो... पट्टेवाला जोरात ओरडला... त्याच्या पाठीमागून दरबारानेही जयजयकार केला.
"उद्याच्या चक्रवर्ती सम्राटांचा विजय असो... पण...' एका दरबाऱ्याने मुजरा करता करता "पण...' थोडा लांबवला...

पण काय? महाराजांना काही कळेना...
गुरं-ढोरं... पोरं-सोरं... सगळी सुखी; तरी पण काय? महाराजांनी सवाल केला...
दरबार शांत. पट्टेवाल्याने जोरदार "अमुक तमुक महाराजांचा विजय असो...' "उद्याच्या सम्राटाचा विजय असो' अशी जोरात घोषणा केली... "महाराजांचा विजय असो... महाराजांचा विजय असो...' दरबारी एकसुरात ओरडले.
थांबा... दरबाऱ्याच्या पण या... प्रश्‍नाला उत्तर नाही मिळालं... पण काय?
सरदार बोला... पण काय?... सुभेदार बोला. पण काय?... मंत्री बोला... कोणी तरी बोला हा "पण' कशासाठी?
कोणी बोलेना... महाराज संतापले... काय आहे ही भानगड... आम्ही एवढं चांगलं राज्य करतोय; पण तरीही "पण' आहेच...
एका दरबाऱ्याने अभय मागितले... महाराजांनी हात वर केला...
होय महाराज... पोरं-सोरं... गुरं-ढोरं... सगळी सुखी आहेत... पण महाराजांच्या उपरण्यावरचा डाग लोकांच्या डोळ्यात खुपतोच आहे...
लोकं म्हणताहेत... सगळी प्रजा सुखी; पण तरीही उपरण्यावरचा डाग काही जात नाही...
महाराजांनी एकदा उपरण्याकडे बघितले आणि दुसऱ्यांदा दरबारात... सगळे दरबारी माना खाली घालून बसलेले...
यावर उपाय आहे की नाही... सरदार, चोपदार, मंत्री सगळे चूप...
प्रधानजी, तुम्ही सांगा आहे का उपाय?... प्रधानजी काही बोलले नाहीत...
आहे. महाराज उपाय आहे... जालीम उपाय आहे... मघाचाच दरबारी बोलला.
काय आहे उपाय तातडीने सांगा... उपरण्यावरचा डाग घालवायचा कसा...?
महाराज... आता तुमच्या वाढदिवसाला राज्यातल्या सगळ्या धोब्यांना बोलवा.... तीन दिवस धोबी उपरणे धुतील. डाग धुऊन जाईल... उपरणे लख्ख होईल. मग अश्‍वमेधाची तयारी जोरात करता येईल...
महाराजांना दरबाऱ्याचा हा सल्ला आवडला... चला. शाही थाटात धोब्यांची फौज तयार करा... राज्यातले सगळे धोबी बोलावून घ्या...
खलिते सुटले... घोडेस्वार चारी दिशांना रवाना झाले... राज्यातील धोबी राजधानीत येऊ लागले... महाराजांनी त्यांची बडदास्त ठेवली... धोब्यांची फौज बघून महाराज मनातच खूश झाले... आता डाग धुतला जाणारच... एवढ्या लोकांनी उपरणे धुतल्यावर कशाला डाग राहतोय.... महाराजांचा आनंद गगनात मावेना...
महाराजांनी सगळ्या धोब्यांना साबण दिले... उपरण्याचा डाग धुण्यासाठी एक एक धोबी पुढे येऊ लागला.
महाराजांना उपरणे उंचावून दाखवू लागला... महाराज मनोमनी खूश होत होते... महाराजांचे उपरणे किती देखणे, किती रेशमी... महाराजही किती देखणे, किती चांगले याचे कौतुक होत होते...
एक दिवस झाला... महाराजांनी उपरण्याकडे बघितले... डाग अजून शिल्लक होताच... दुसऱ्या दिवशी दुसरे धोबी आले... उपरणे धुऊन निघून गेले... महाराजांनी पुन्हा उपरणे बघितले... उपरण्यावर डाग तसाच होता... महाराजांनी तिसऱ्या दिवशी नेटाने उपरणे धुण्यास सांगितले... धोब्यांनी केलेल्या साबणाचा फेस दुसऱ्या राज्याच्या राजांच्या तोंडाला यायला लागला...
राजांनी उपरणे पुन्हा बघितले... आता मात्र महाराजांना कळलं... उपरणं पुरतं फाटलं होतं... पण डाग काही गेला नव्हता... अश्‍वमेधाची तयारी थांबवावी लागणार होती...


http://72.78.249.107/Sakal/25Sep2011/Normal/Kolhapur/KolhapurToday/page4.htm
("सकाळ' च्या 25 सप्टेंबरच्या टुडेमध्ये छापलेला माझा लेख.... (सुषमेय) प्रवीण कुलकर्णी )