मंगळवार, २६ जुलै, २०११

पैंजण

तिनं कपाटातून जुनं पैंजण काढलं आणि तिच्यासमोर ठेवलं.
हं! घाल हे..
तिची सोळा - सतरा वर्षांची पोरगी पसरली होती.
तिच्या पसरलेल्या पायावर तिनं जोरात चापट मारली...
""हे असं फतकाल मांडून बसायचं न्हाई, असं कितीयेळा सांगिटलंय. कवा अक्‍कल येणार हाय देवास ठावूक. बारकी ऱ्हायली न्हाईस आता. '' तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा चालू झाला.
तिनं पाय मागं घेतले, पण तिचं आईकडं लक्षच नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून ती सारखी चिडचिड करत होती. रोज रोज सूचनांचे डोस पाजायची. त्यामुळं तिला त्यात नवीन काहीच वाटलं नाही. आईकडं दुर्लक्ष करत ती टी.व्ही.चे चॅनेल बदलू लागली.
तिच्या आईचा तोंडाचा पट्‌टा सुरूच होता. तिचं सगळं लक्ष टीव्हीकडेच होतं.
मी काय म्हणते आहे...
आपल्या बोलण्याकडं पोरीचं लक्षच नाही कळल्यावर तिची चिडचिड आणखी वाढली. तिनं सरळ टीव्ही बंद केला आणि तिच्यासमोर टाकलेलं पैंजण तिच्या हातात दिलं.
"घाल हे....'
"अगं हे ल्हान व्हईल. सातवीत असताना घेतलं होतंस.'
"काय होत न्हाई एका दिसानं.. माघारी आल्यावर काढून टाक..
पण आपण जातोय कुठं....
तुला दाखवाय न्यायची हाय!
गेल्या चार-पाच दिवसांपासून आईची धावपळ अशाच काही कामासाठी चाललीय हे तिला कळत होतं. पण तिने स्पष्ट काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे विचारायचा प्रश्‍न नव्हता. आता मात्र आईनं सरळ दाखवायचीच भाषा केल्याने ती जाम पिसाळलीच. मला काही लगीनबिगीन नाही करायचं, आताशी कुठं कॉलेजात जायाला लागलीय. धाव्हीला चांगलं मार्क मिळाल्यावर तूच म्हणाली व्हतीस की, तू शिक, तू मोठी झाल्याबिगर तुझं लगीन करणार न्हाई म्हणून..
म्हणले व्हते... पण आताचं आयकायचं... निमूटपणे ते पैंजण घाल पायात... बोडक्‍या पायांनी जायाचं न्हाई.
तिला माहीत होतं, आईला आता विरोध केला तर ती मारायला कमी करणार नाही. आज तिचा चुलताही घरात नव्हता. ज्याच्याजवळ तिला तक्रार करता आली असती. आज जाऊन येऊ या. एवढं काय तातडीनं लगीन लावीत न्हाई, असा विचार करून ती उठली. तिनं ते पैंजण घेतलं आणि पायात घालू लागली.
आये, येत न्हाई गं...
अगं फासकी मोठी कर म्हंजे ईल.... तिच्या आईनं पर्याय सुचविला.
तिनं फासकी मोठी केली आणि ते पैंजण ओढून पायात घातलं....तरी काही ते येईना..
तिची आई बघत होती.. तिनं चटकन पुढे होऊन ती फासकी मोठी केली आणि जोरात दाबली. ते पैंजण ओढून ताणून तिच्या पायात बसले, पण त्याचे ते टोक तिच्या पायात रुतलं. ती जोरात ओरडली, पण त्याचा तिच्या आईवर परिणाम झाला नाही. तिनं तशीच कपाटातील तिची नवी कोरी साडी काढली आणि तिच्यासमोर टाकली.
नेस ही.... चल... पावणे धा ची गाडी हाय.... मामा बी तिथंच येणार हाय.
तिच्या पायातल्या पैंजणाची फासकी रुतत होती, पण तिला माहीत होतं, आई माया करायला लागली, की गाय होते, नाही तर कडकलक्ष्मीचा अवतार. झिंज्या पकडून बुकलून काढील. त्यामुळं तिनं साडी उचलली. पायात पैंजण फारच रुतत होतं.
"यंदा अकरावीला हाय', मुलगी काय करते, या मुलाच्या बापाने विचारलेल्या प्रश्‍नावर मामानेच उत्तर दिले.
मग शिकवा की तिला.. लवकर का लगीन करतायसा? मुलाच्या बापाने तिच्याकडे एकदा बघितलं आणि मामाला प्रश्‍न केला.
मामा काही बोलला नाही.
मुलगा तरतरीत होता. तो काही बोलला नाही. पण त्याला ही मुलगी पसंत पडलेली त्याच्या नजरेत दिसत होते.
आमचा मुलगा दहावी नापास हाय, काय? घरची पाच एकर शेती हाय, ती त्योच कसतोय. खायाला ल्यायला कमी न्हाई, पर थेरं इथं चालणार न्हायती. राबायला पाहिजे तवा खायला मिळंल.
तिची आई मुलाच्या बापाच्या प्रत्येक वाक्‍यावर डोके हलवत होती.
मग हातावर पाणी टाकू आजच....
व्हंय पर पोरीला आठरावं बी लागल्यालं न्हाई ! कायद्याचं काय? पोराकडच्या एकाने शंका विचारली.
तेची काळजी तुमी करू नका. शाळेचा मास्तर हाय माझ्या वळखीचा... वरीस दीड वरीस वाढवून दिल.
मग घालायचं का आज हातावर पाणी.. मुलाच्या बापानं आग्रह सोडला नाही.
तिची आई गडबडली.... तिनं मामाला खुणावलं... कोपऱ्यात नेलं....
ही माणसं जरा जास्तच घाई करत्यात .... मामानं तोंडावर बोट ठेवलं...
अगं पोराची आई जाऊन वरीस झाले... हाताची गाठ तोंडाशी पडत न्हाई....पोरीचं कल्याण व्हील...
पर समदं जमायचं कसं.. माझ्या अंगावरच्या ह्या चार टिकल्याशिवाय काई न्हाई....
तू नग काळजी करू, मी हाय.... पण पोरीला इचारायला पाहिजे....
तिनं हाक मारली... ती आली.... काय गं... पोरगा कसा हाय!
आये, शिकलेला न्हाई...
मग काय धोंडा न्हाई, पाच एकर शेती हाय....एकर इकला तरी लाखाची मालकीण व्हशील.
ती काही बोलली न्हाई.... पोरगं दिसायला चांगलंच होतं.. घरदारपण बरं दिसत होतं.. नकार द्यायला तिच्याजवळ दुसरं कारण नव्हतं..
चला तर मग हातावर पाणी टाकू.... मामानं सांगितलं.....
लग्नन झालं... लग्नाच्या फेऱ्यात पोरीच्या पायातील पैंजण लोकांच्या नजरेत आलं.. रुतलेल्या फासकीतून रक्‍त येत होतं.... पण कोणी बोललं नाही..
पोरीचं लग्न करून ती परतली.... पोरीचा चुलता भलताच बिघडला होता...पण बोलला नाही...
तिच्या शेजारीनं विषय काढलाच... का गं एवढी घाई केलीस... शिकली असती पोरगी....तिच्या शेजारच्या चार-पाच बायांनी तोच प्रश्‍न विचारला...
तिला काही सुचेना.... सकाळपासनं तिनं धरलेला बांध सुटला....
मला नगो व्हती व्हंय माजी पोर.... अजून न्हाणपण पण सरलं न्हाई तिचं.... पर काय करणार.... पाच दिस झालं तेला, ह्यो रेडा मला म्हणतोय कसा... पोरगी तुजी ताजीतवानी दिसतीया.... तवापसनं डोळ्याला डोळा लागला न्हाई माजा...
तिच्या आईचा हुंदका सुटला.... पोरीच्या चुलत्याची वाईट नजर व्हती....राक्षसानं मला खाल्ली आता हिला खायचा....
पोरीच्या पायात रुतलेल्या पैंजणापेक्षा तिच्या आईची कळ जरा जास्त मोठी होती.....