सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

हिरवा


""तुला माहीत होतं मी या कार्यक्रमाला येणार होतो ते'', त्यानं विचारलं.
हो !
ती नेहमी तुटक बोलायची... त्याला त्याची सवय झाली होती. आजही ती खूप बडबडेल मनातलं सगळं सांगले, याची अपेक्षा नव्हतीच पण तरीही ती थांबली याचेच त्याला खूप होते.
किती वर्षे झाली असतील नाही,
तो काही तरी बोलायचे म्हणून बोलला...
अठरा...
पुन्हा तिचे तुटक उत्तर.... हो अठरा वर्षे झाली... काळ गेल्यानंतर तो कसा गेला वाटतो पण खरेच ही आठरा वर्षे कशी काढलीत ती मलाच माहित.ती काही बोलली नाही.... आपलं बोलणं तिला आवडलं नाही काय असं वाटून तो मध्येच थांबला.... काही क्षण तसेच निःशब्दात गेले त्या कार्यक्रमातील इतकी धावपळ आणि गोंधळातही दोघांना त्यांच्यातील शांतता असह्य झाली
"बोला की'...
ती पुटपुटली.
""गेल्या आठरा वर्षांत आज तू भेटशील, उद्या तू भेटशील असे वाटत राहायचं.. खरे तर अनेकदा तुला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडायचो पण पाय साथ द्यायचे नाहीत. कितीतरी वेळा परतलोय तुला भेटण्यासाठी निघून....''
ती त्याच्याकडे एकटक बघत होती, जणू तो बोलत असलेला प्रत्येक शब्द अन्‌ शब्द ती मनात कोरुन घेत होती.
"" तुला कधी वाटलं का मी तुला भेटायला येईन असं...''
त्याला हा प्रश्‍न आपण विचारायला नको होता, असं वाटून गेलं पण तरीही तिच्या उत्तराच्या अपेक्षेने तो थांबला....
"" नाही !'' ती बोलली... यावेळी त्यानं तिच्या डोळ्यात खोल बघितलं त्यातून त्याला काही दिसतं का.... तिच्या नाही म्हणण्यात ठामपणापेक्षा नाराजी जास्त दिसली.
का? असा प्रश्‍न विचारावा वाटला पण त्यानं घाई केली नाही....काही तरी बोलायचं म्हणून त्यान विचारलं.
""आज थंडी खूप आहे नाही. तू स्वेटर नाही घातलास...
अरे स्वेटरवरुन आठवलं तुला हिरवा स्वेटर हवा होता आणि मला तो आवडला नव्हता कितीवेळ तू माझ्याशी बोलली नव्हतीस तुला प्रत्येक गोष्टीचा रंग हिरवा का नाही असाच प्रश्‍न पडायचा? घराची अक्षरशः बाग केली होतीस...
त्यावेळी मी तुझ्यावर रागवायाचो, आदळाआपट करायचो... पण तू गेल्यानंतर मात्र घरातील प्रत्येक कुंडी मी आजही जपली आहे आजही ती बाग तशीच आहे हिरवीगार.... घराचे पडदे अनेकवेळा बदलले पण त्यांचा हिरवा रंग आजही तसाच आहे...... तुझे सगळे कपडे हिरव्या रंगाचे असायचे नाही, अगदी रुमालापर्यंत. त्याच्या ओठातून हे वाक्‍य निघाले आणि त्याचे लक्ष तिच्या साडीकडे गेले. तिने अमंगळ साडीचा पदर चाचपला. आत्तापर्यंत त्याच्यावर खिळलेली तिची नजर खाली झुकली. तिच्या साडीचा रंग वेगळा बघून त्यालाही काही सुचले नाही..... पुन्हा दोघांत निःशब्दता आली.. काही रिकामे क्षण तसेच निघून गेले....खरे तर ते क्षण रिकामे नव्हतेच उलट आतापर्यंत जगलेल्या आयुष्यातली पोकळी भरुन काढून ओसंडून वाहू देणारे इतके भरलेले.... तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरची एक एक रेघ निरखीत होता.
""आता हिरवाई उरली नाही....ती बोलली. तुझ्यापासून वेगळं झाल्यावर वाटलं होतं आता आयुष्य आपल्या मर्जीनुसार घालवायचं..... मला कोणाचीच बंधने नको होती. काही काळ गेलाही तसाच... पण नंतर ते जगणं बेचव वाटू लागलं. तुझ्याकडे परतायचे सगळे दरवाजे मीच बंद करुन घेतले होते. त्यामुळे तो रस्ता बंदच होता. पर्याय काहीच नव्हता. त्यानंतर "तो' माझ्या आयुष्यात आला. आमच्याच ऑफीसमध्ये काम करायचा. लग्न केलं दहा वर्षे संसारही केला. अगदी निमूटपणे केला. पण आमचे सूर काही जुळले नाहीत. तुझ्याबरोबर घालवलेल्या दिड वर्षांतील मोजके क्षणही त्याच्याबरोबरच्या दहा वर्षात मिळाले नाहीत. तो माझ्यावर प्रेम करायचा का? मी त्याच्यावर प्रेम केलं का? खरेच तो माझ्या आयुष्यातून गेल्यावर जी पोकळी जाणवायला हवी होती ती जाणवते का? या प्रश्‍नांची उत्तरे मला आजही सापडलेली नाहीत. ती भरभरुन बोलत होती. इतकी ती कधी बोललीच नव्हती. ..... तो गेला आणि माझं हिरवाईशी नातं तुटलं... तू मघाशी विचारलंस ना की तू येशील का? असे कधी वाटले होते का? खरे तर त्या प्रश्‍नाचं उत्तर होतं, तू येऊ नये असंच वाटायचं. अगदी दिवस सुरु झाला की एक भीती वाटायची की तू कुठेतरी भेटलास तर आपल्याला तुला सामोरे जाता येईल का?तुला आठवतं मी एक पोपट आणला होता.. त्या पोपटावरुन तुझ्यात आणि माझ्यात किती भांडणे झाली होती.
"" किती मुर्ख होतो मी. मला खरेच कळलं नाही तुझ्यापेक्षा पोपट जास्त महत्त्वाचे वाटत होते.''
"" तू नाही रे मीच मुर्खपणा केला. सौंदर्य स्वातंत्र्यात असते याची जाणिवच नव्हती. ऐक तो पोपट नंतर आमच्या घरात होतां बराच काळ. पण एक दिवस काय झालं काय ठाऊक, पिंजऱ्याचे तोंड उघडे राहिले. पण तो काही हलला नाही.. त्या दरवाजातून बाहेर पडायचेच त्याला कळले नाही. माझ्या हिरवाईचेही तसेच झाले. पहिल्यांदा मला हिरवा रंग आवडतो म्हणून आख्खं घर मी हिरवं केलं आणि नंतर तो हिरवा मीच माझ्यावर लादत गेले.
तो गेल्यावर मात्र हिरव्याचे दार मी उघडले. आणि पुन्हा त्यात प्रवेश नाही केला.
""चल जाऊ या! '' त्यानं विचारलं. तुला सोडू घरी... त्यानं विचारलं... तिनं नकार दिला नाही.
तिच्या घरचा रस्ता याच्या घरावरुन होता. यानं तिला घर दाखवायला आत नेले. ती जसे घर सोडून गेली होती अगदी तसंच घर होतं. अठरा वर्षांपुर्वीचे घर आणि आताचे घर यात काहीच फरक नव्हता. कुड्यांही तशाच आणि त्यातील झाडेही तशीच.... तुझी इतकी सवय झाली होती की काहीच बदलू दिले नाही... त्याच्या या वाक्‍याने ती भानावर आली. तिने त्याच्याकडे बघितले.... त्याचे डोळे भरुन आले होते...तिच्याही कडा ओल्या झाल्या होत्या....तिने जिथे पिंजरा ठेवला होता. त्याच ठिकाणी त्यानं पिंजरा आणून ठेवला होता... त्यातील पोपटाकडे तिने बफघितले....तिने हलकेच त्याच्या दरवाजाची कडी काढली. कडी काढताच पोपट उडाला आणि त्या अंधारात दिसेनासा झाला....
चलायचं....ती पायऱ्या उतरता उतरता म्हणाली...तोही लगबगीने तिच्या मागून चालू लागला. ती थांबली... त्याचा हात हातात घेतला आणि पायऱ्या उतरु लागली.... तिच्या डोळ्यातून उडालेले पोपट त्याच्या डोळ्यात दिसत होते..........