सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,

प्रिय,
रात्रीचे तीन वाजलेत. अंगभर कंटाळा आणि झोप दाटून आली आहे. पापण्यांना चहाचा टेकू आता देणे गरजेचे आहे. हा टेकूही फारकाळ टिकणार नाही, हे माहीत आहे; पण तरी तो द्यायला पाहिजे. आता जर असेच थांबलो, तर कोणत्याही क्षणी पापण्या खाली कोसळतील आणि त्या कोसळलेल्या पापण्यांचा आधार घेत मग एक-एक गात्र आपली हत्यारे टाकून देतील. जागे राहण्याची लढाई संपून जाईल आणि निद्रेची शांतता पसरेल. त्यामुळे चहाची आता आवश्‍यकता आहेच. प्रिंटिंग मशिनचा आवाज आता कानापर्यंत येऊ लागला आहे. धडधड करत एक एक पेपर बाहेर पडत असणार... वातावरणात माणसाच्या आवाजाचा लवलेशही नाही. मशिनची घरघर-घरघर आणि घरघरच ऐकू येत आहे. आणखी काही वेळ तरी जागे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅन्टीनचा दरवाजा खटखटवणे भाग आहे.

कॅन्टीनचा दरवाजा खटखटला तसा चहावाला पोऱ्या डोळे चोळत बाहेर आला. त्याने एकवार माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितले आणि पुन्हा डोळे चोळले. मी काही म्हणण्याआगोदरच तो आत गेला. स्टोव्ह त्याने पेटवला. त्या स्टोव्हचा आवाज आता त्या मशिनच्या आवाजात मिसळला आहे. जणू त्या दोघांची जुगलबंदी चालली होती. पण ही जुगलबंदी फारकाळ टिकणारी नाही. चहाला उकळी फुटेल आणि स्टोव्ह गप्प होऊन जाईल... अगदी तसेच झाले... पोऱ्याने चहा आणून दिला आणि बाहेरची लाईट बंद करून निघून गेला. अस्ताव्यस्त मांडलेल्या खुर्च्यांमध्ये मी, माझा चहा आणि सोबतीला होते काळेभोर आकाश, त्यात टिमटिमणारे तारे, हलक्‍या पावलांनी प्रवास करणारा वारा आणि झाडांच्या मुळाशी रात्रीचे काही किडे.. बस बाकी काहीच नव्हतं. मी सरळ वर आकाशात बघितले, टिमटिमणारे तारे जणू माझ्याकडेच बघत असल्याचा भास झाला. प्रत्येक तारा वेगळा. त्याची तऱ्हा वेगळी. कोणी लांबवरचे तर कोणी जवळचे. कोणी फटकून राहणारे तर कोणी उगाच सलगी दाखविणारे... तोंड लपविणारेही काही तारे, तर काही तारे उगाचच आपला तोरा मिरविणारे... सगळेच तारे वेगळे... निराळे... आठवणींसारखे... प्रत्येक आठवणींची खासियत वेगळी... काही आठवणी जुन्याच होऊ नये वाटतात, तर काही आठवणींपासून आपण दूर होऊ पाहतो... तरीही त्या टिमटिमत राहतात... आपल्या असण्याची जाणीव सतत करून देत राहतात..आणखी तास दोन तासांनी सूर्याची काही किरणे आवेगात सगळ्या आकाशभर पसरतील आणि हे टिमटिमणारे तारे हळुहळु लुप्त होतील. तरी काही चावट तारका त्यातूनही आपले अस्तित्व दाखवत राहतील. आठवणींसारखेच..... मग सरळ सूर्यबिंब वर येईल आणि त्यापुढे त्या तारकेची धीटाई अपुरी पडेल. त्याच्या त्या प्रखरतेपुढे मान तुकवत तिलाही विरळ व्हावेच लागेल.... मग प्रतीक्षा अंधाराची... सूर्य मावळण्याची... .. आयुष्याचेही असेच असते ना? प्रत्येक प्रहर वेगळा त्याच्या गरजा वेगळ्या आणि त्याने मागितलेल्या आहुत्या वेगळ्या... प्रत्येक आहुतीनंतरच कळते की ती किती मोठी होती.. ... आता हे विचारांचे रंग कागदावर तसेच उमटतील का? हा प्रश्‍नच आहे. पण तसेच उतरावेत यासाठी प्रयत्न करतोय.... बघू जमेल कदाचित.... आज एक काळी रात्र आठवणींची रुपेरी किनार लेवून गेली हे मात्र निश्‍चित!

तुझाच....