बुधवार, २८ जुलै, २०१०

पत्र

नाव काय रे तुझं? जेवलास की नाही? आई कुठाय तुझी? काही खाणार का? तिनं प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. त्यानं हूं की चू केलं नाही. बहुतेक खूप रडल्याने त्याचा चेहरा सुजला होता... पण कुठेही मारल्याचे घाव नव्हते... नाकातून बाहेर आलेला शेंबूड त्यानं आत ओढला आणि पुन्हा तो त्या टेलिफोन खांबाला धरून राहिला... त्याची ती शांतता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी दहा वाजता ते आठ वर्षांचं पोर त्या खांबाशेजारी बसलेलं होतं. गोबऱ्या गालांचं. गोरंपान आणि अंगात चांगले कपडे असलेलं पोरगं मोठ्या खात्या-पित्या घरातलं वाटत होतं. पहिल्यांदा कोणीतरी असेल म्हणून तिनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं... दुपार झाली... ते तिथंच बसून होतं... त्याच्याकडे बघायचं नाही, असं अनेकदा ठरवूनही तिची नजर त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जात होती... आता त्याच्याकडे बघायचं नाही असं ठरवून ती नजर वळवायची... संध्याकाळ झाली तशी ती अस्वस्थ झाली... त्या पोराची तिला आता दया येऊ लागली, ते चुकलंय की कोणी त्याला इथे आणून सोडलंय, याची विचारपूस करावी म्हणून ती त्याच्याजवळ गेली... तिनं त्याला नाव-गाव विचारलं; पण ते काही बोललं नाही... तिनं त्याला हरतऱ्हेची आमिषे दाखवून बघितली; पण ते बधलं नाही... खांबाचा हात काही त्यानं सोडला नाही... तिला काही सुचेना... त्याला त्याच्या स्थितीवर सोडूनही जाता येईना आणि थांबताही येईना... काही क्षण तिला पोलिसांना फोन करावा वाटला; पण तिला धाडस झालं नाही... पोलिस येणार, त्याला घेवून जाणार... पुन्हा हे तिथंही नाही बोललं तर त्याला बालसुधारगृहात ठेवणार... ती अनेक वर्षे तिथं नोकरीला होती... पोलिसांना फोन म्हणजे त्याच्यासाठी नरकाचा दरवाजा आपल्या हाताने उघडण्यासारखंच... ती आता अस्वस्थ झाली... तिला काहीच सुचेना... त्याला त्याच्या अवस्थेवर सोडून द्यायचं तिनं मनाशी पक्‍कं केलं आणि ती घरात गेली... देवापाशी दिवा लावला... थो
डं कुंकू कपाळाला लावलं... सकाळचं बरंच जेवण शिल्लक होतं... तिनं टीव्हीचा रिमोट हातात घेतला... एक एक चॅनेलवरून ती सरकू लागली... पण मन रमेना... त्या पोराचा विचार मनातून जाता जात नव्हता... खिडकीतून बघावं काय, तो कुठे गेला असा विचार करून ती दोनदा खिडकीपाशी गेलीही. पण तिनं खिडकी उघडली नाही... पण ते जर तिथं असेल तर त्याला अंधाराची भीती नको म्हणून तिनं बाहेरचा दिवा लावला... रात्री बऱ्याच उशिराने तिला झोप आली... पहाटे जाग आल्यावर तिनं पहिल्यांदा खिडकी उघडली आणि त्या खांबाकडे तिनं बघितलं. ते पोरगं तिथं नव्हतं... रात्रीच्या थंडीत ते कुठेतरी गेलं असेल... कुठे गेलं असेल ते... घरी सुखरूप पोचलं असेल का? कोण असतील त्याचे आई-वडील... असे अनेक प्रश्‍नांचे तरंग तिच्या मनात उमटत राहिले. पण तिनं त्याला बगल दिली....ते सुखरुप असेल असा मनाशी समज करून तिनं चहाचं आधण ठेवलं आणि पेपर आला का बघण्यासाठी तिनं दार उघडलं... दारातच ते पोरगं पाय मुडपून झोपलं होतं... अगदी निरागस.. त्याच्या मुठी वळल्या होत्या... त्या वळलेल्या एका मुठीत एक चिठ्ठी होती... तिनं अलगद ती चिठ्ठी सोडवून घेतली...
त्यावर लिहिलं होतं...
प्रिय, संगीता,
याची आई चार वर्षांपूर्वी गेली... कॅन्सरने माझं आयुष्य अवघ्या चार महिन्यांवर आलं आहे... यापुढे याला पाळणारे हजारो मिळतील... पण सांभाळणारं कोणीच नाही... याचा सांभाळ कर...
ज्याच्यासाठी ती आयुष्यभर अविवाहित राहिली होती त्या दिलीपचं ते पत्र होतं...