बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

पौर्णिमा...

तो
गॅलरीत उभं राहून तासन्‌ तास चंद्र न्याहाळण्यात काय मजा असते कोणास ठाऊक. पण ती न्याहाळत बसायची... रात्री तीन तीन वाजता उठून गॅलरीतून चंद्र बघायची... हा चंद्र किती वेगळा भासतो नाही? तिचा नेहमीचा प्रश्‍न.. या प्रश्‍नाचे तिला उत्तर हवे असायचेच असे नाही... पण ती रोज हा प्रश्‍न विचारायची... अशा वेळी कधी चहा किंवा कॉफीचा मग तिच्या हाती दिला की नुसती हसायची... गालातल्या गालात... तिच्या त्या गोबऱ्या सावळ्या गालांवर एक चमक दिसायची.... चंद्राचा प्रकाश तिच्या गालावरून ओघळत राहायचा... ती चंद्राला न्याहाळात राहायची आणि मी तिला... चंद्राची कितीतरी रूपं तिनं कॅमेराबद्ध केली होती... प्रत्येकवेळा तिच्या नजरेतून दिसणारा चंद्र वेगळा भासायचा... तो तिचा चंद्र होता... जणू तिच्यासाठीच रोज उगवायचा... तिच्या भावनांच्या वेग आवेगाप्रमाणे आपली रूपं बदलायचा... कधी झावळ्यांच्या आडोशातून तिला बघायचा तर कधी ढगांशी लपाछपी खेळायचा... तिच्या विस्कटलेल्या केसांत जणू रातराणीचा गंध भरत राहायचा... ती होतीच तशी... जगण्याची मजा लुटणारी... ही अमावस्या नसतीच तर?... कधी कधी ती प्रश्‍न विचारायची.
""अगं अमावस्या आहे, म्हणूनच तर चंद्राच्या या कला दिसतात ना!''
माझं हे उत्तर तिला कळायचं, पण पटायचं नाही... पण मग ती जास्त बोलायची नाही, गप्प राहायची. तिनं बहुतेक अमावस्या स्वीकारली होती... अशा कितीतरी अमावस्या तिनं स्वीकारल्या होत्याच, कदाचित त्या सगळ्या अमावस्या विसरण्यासाठीच ती चंद्राला जवळ करत होती... त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठीच... पण कधी कधी या आठवांचे ढग एवढे गडद व्हायचे की त्यातून चंद्र दिसायचाच नाही... मग एक हुंदका गॅलरीतून यायचा... अशा वेळी तिच्यासोबत असावं... हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवावा, असं वाटायचं. पण काही ढग गळलेलेच बरे म्हणून मग मीही लांब राहायचो. तिच्या मोकळ्या होणाऱ्या आकाशासाठी... मग त्यानंतर तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा दिसायचा पूर्ण... अपूर्णतेची त्यात छटाही असायची नाही.

--------------------------

ती

त्याला चंद्र आवडतो का माहीत नाही... नसेल. कदाचित असेलही; पण... आपल्यासाठी तासन्‌ तास गॅलरीत बसून चंद्र बघायचा... आपण काहीबाही बडबडत राहायचो. पण तो नुसता गप्प बसायचा ...कधी कधी वाटायचं, हा चंद्राकडे बघतो की आपल्याकडे?... एकदा त्याला विचारलंही, ""अरे चंद्र बघ किती मस्त दिसतोय, पौर्णिमा हा पूर्णत्वाचा उत्सव असतो बघ.. अपूर्णतेचा लवलेशही नसतो...'' त्यावेळी एकदाच म्हणाला होता,
""पूर्णत्वात मजा नाही... पूर्णत्व आलं की लय सुरू होते... त्यामुळे मजा आहे ती अपूर्णतेत... त्याला अपूर्ण राहायला आवडायचे... तो पाण्याचा ग्लासही पूर्णपणे प्यायचा नाही... थोडं पाणी शिल्लक ठेवायचा... त्यामुळे तो बहुतेक वेळा चंद्राकडे न बघता आपल्याकडेच बघत असल्याचा भास व्हायचा... रात्री तीन-तीन वाजता आपल्यासाठी कॉफी देताना त्याचा चेहरा असाच द्वितीयेच्या चंद्रासारखा दिसायचा.... पूर्णत्वाची आस असलेला... पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला तो वेगळाच आहे.... त्याचा चेहराच अनेकवेळा अमावस्येत साथ देतो... तो नसलेल्यापणाची, अर्धवटपणाची जाणीव पिऊन टाकतो. तेच त्याचे वैशिष्ट्य आहे... त्याच्या चेहऱ्यावर एक अजिब लकीर आहे... चंद्रावरच्या खळग्यासारखी ही लकेर नेहमी आधाराचा हात द्यायला तयार असते, पण कधी कधी आधारालाही आधार लागतोच ना... पण त्याची नजर कधी आधार मागत नाही. अपूर्णतेत मजा जशी तो मानतो तशीच सोसण्यात... अशा वेळी त्याला एकटं सोडणं हेच चांगलं... अशावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे ढग आपण हलकेच दूर करावेत. त्याचा चेहरा हातात घेऊन त्याला विश्‍वास द्यावा, असं वाटून जायचं. पण आपल्याला ते जमलं नाही... मग तो नजर चुकवत राहायचा. आपल्या वेदना सहन करत राहायचा... त्याचे ढग कधीच फुटले नाहीत... ढग फुटायला, त्यातून पाणी बरसायला गारव्याच्या बिजांचा शिरकाव व्हायला लागतोच की... अनेकदा आपण त्याच्या दारापर्यंत पोचून त्याला रितं करण्याचा विचार केला खरा; पण दारावर थाप मारून आपण अनेकदा मागे फिरलो आहे... आताही त्याच्या ढगांना गारव्याच्या स्पर्शाची आस लागून असेल... कदाचित मग त्यानंतर दिसणारा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण दिसून जाईल. त्यात अपूर्णतेची कोणतीच भावना असणार नाही.

https://docs.google.com/open?id=0B6FpjbggjhRAMDdmMzFmMDUtOTA2Mi00YjlhLWJlNjEtMWY2MjllMzk2NTJl