रविवार, २४ एप्रिल, २०११

कडी जोडणारा संपादक



कडी जोडणारा संपादक

वर्तमानपत्रे आपला चेहरा गमावून बसली आहेत, अशी ओरड आता अभिजनांमध्ये सारखी होताना दिसते. संपादकांचा चेहरा वर्तमानपत्रात दिसत नाही अशा आशयाच्या चर्चाही घडत आहे. वाचकांची रुची आणि वर्तमानपत्रांना आलेले भांडवली स्वरुप या कारणांनी अभिजनांच्या या चर्चामध्ये तथ्य नाहीच असे नाही, पण तरीही काही संपादक आपला चेहरा अंकातून दाखवत आले आहेत. पण केवळ संपादकांचा चेहरा वर्तमापत्रात दिसून चालत नाही तर संपादकांमध्ये समाजाला एकवटण्याची आणि त्या समाजाला एका दिशेने घेऊन जाण्याची ताकद असली पाहिजे. स्वातंत्र्यपुर्व काळात अनेक संपादकांनी समाज एकवटण्याचे काम केले, स्वातंत्र्यानंतरही अनेक प्रश्‍नांच्याबाबतीत संपादकांनी समाजाजागृती करुन त्याला दिशा देण्याचे काम केले नाहीच असे नाही, पण तरीही गेल्या काही वर्षांचा ताजा इतिहास बघता संपादक मंडळींना हे काम जमल्याचे दिसत नाही. पण कोल्हापूरच्या 24 एप्रिलच्या पंचगंगा वाचवुया मोहिमेला मिळालेला प्रतिसाद बघता ही तुटलेली साखळी जोडण्याचे काम "सकाळ'चे कार्यकारी संपादक श्रीराम पवार करत आहेत हे दिसते. संपादकाला लागणारी वैचारीक बैठक त्यांची घट्‌ट तर आहेच पण त्याशिवाय समाजाला एकवटण्याची आणि त्याला दिशा देण्याची विलक्षण ताकद त्यांच्यात आहे.
कोल्हापुरातील "झाडे लावा' ही मोहिम असो वा पंचगंगा स्वच्छता मोहिम या दोन्ही मोहिमांचे रुपांतर लोकचळवळीत करण्याची हातोटी आणि त्यापाठिमागचे तात्वीक अधिष्ठान पवारसर यांच्याकडे आहे. एकीकडे वर्तमानपत्रे रोजच्या घडामोडी देत असताना त्याच घडामोडींवर लिहिणारे अनेक संपादक आहेत ( ते चूकही नाही), तर दुसरीकडे आपल्याच विचारांना कवटाळून समाजातील सगळे प्रश्‍न त्याच चष्म्यातून बघत लिहिणारे संपादक आहेत. वेगळे विषय मांडणे आणि ते लावून धरणे हेही समजण्यासारखे आहे पण त्या पलिकडे जाऊन काहीतरी करता येईल का हे बघणे आणि त्यासाठी पुढाकार घेणे ही गोष्ट आव्हानात्मकच नव्हे तर अवघडही आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न काय हे हेरुण तो प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनाच पुढे आणण्याची ताकद तुमच्या लेखणीत पाहिजे. पवारसर यांच्याकडे ही लेखणीची ताकद तर आहेच पण तो प्रश्‍न काय हे हेरण्याची दृष्टी आहे. त्यामुळेच "सकाळ'च्या या दोन्ही मोहिमा लोकचळवळ बनल्या.

बुधवार, १३ एप्रिल, २०११

अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...

आंदोलनाचा विषय कोणी चांगला घेतला म्हणून तो माणूस महानायक ठरतो का? एखादा विषय मार्गी लावल्यानंतर त्या माणसाला सगळ्याच विषयांतील सगळेच कळते, असे मानायचे का? त्याच्या प्रत्येक कृतीमागे कोणताही छुपा उद्देश नाहीच, हे का मानून चालायचे? समाजहित बघताना त्या महानायकाने केलेल्या चुका आणि त्याच्याकडून होत असलेल्या चुका यांना क्षमा करतच राहायचे का? एखाद्या विचाराने प्रभावित होणे वेगळे आणि तो विचार अंगीकारताना त्यामागची विचारांची बैठक मजबूत असणे वेगळे. याबाबत त्या महानायकाचे विचार ठिसूळ असतील तर तो त्या विचारांचा कसा मानायचा?..... असे अनेक प्रश्‍न आहेत... त्याची उत्तरे सापडत नाहीत. केवळ भोळेपणाने आणि समाजातील मोठा घटक अण्णा हजारे यांच्या मागे जातो म्हणून अण्णांना महानायक म्हणायला मन धजत नाही. अण्णांच्या प्रामाणिकपणावर आक्षेप घ्यायचे कारण नाही. त्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबाच द्यायला हवा, तरीही आंदोलनकर्त्या माणसाला महानायक मानण्याची गरज आहे का? अण्णा खरेच महानायक आहेत का? प्रश्‍नांची माळ तुटता तुटत नाही. या प्रश्‍नांची ठोस उत्तरे अण्णांना पाठिंबा देणाऱ्यांकडेही नाहीत.
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेला कोणीतरी ठोसा लावला पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. रोजच्या "संसारिक' जबाबदाऱ्या पेलताना भ्रष्टाचाराचा राक्षस त्यांना दिसत होता; पण त्यावर उपाय मिळत नव्हता. ए. राजा, सुरेश कलमाडी यांच्या प्रकरणानंतर तर लोकांचा राजकारण्यांवरील विश्‍वासच उडू लागला होता. त्यातच अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयकाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू केले आणि लोकांचा अण्णांना पाठिंबा मिळायला लागला. इथपर्यंत सगळं ठीक चालले होते; पण इथून पुढे मात्र अनेक घटकांनी हे आंदोलन प्रभावित होत गेले. त्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरली. अण्णांच्या आंदोलनाला इंग्रजी माध्यमांनी वारेमाप प्रसिद्धी दिली. यामागे केवळ या देशातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाले पाहिजे, हा हेतू नक्‍कीच नव्हता. गेल्या सहा महिन्यांतील काही वृत्तवाहिन्यांच्या चर्चा बघितल्या तर हे लक्षात येईल, की यांना हे सरकार पाडण्याची घाई झाली आहे. ए. राजा प्रकरण असेल, सुरेश कलमाडी प्रकरण असेल किंवा विकिलिक्‍स प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांतून सरकारला अडचणीतच आणायचे होते, हे सहज लक्षात येते. (केंद्रातील युपीए सरकारही काही फार दिवे लावत नसल्याने या माध्यमांची भूमिका अयोग्य म्हणता येणार नाही; पण त्या पाठीमागे केवळ लोकहित हाच उद्देश नाही हे त्यांच्या आक्रस्तळेपणावरून लक्षात येते.) इथे मात्र एक मूलभूत फरक आहे. कलमाडी, राजा किंवा विकिलिक्‍स प्रकरणी विरोधी पक्षाने मोठा गदारोळ केला; पण लोकांचा पाठिंबा मात्र त्यांना मिळाला नाही. आता विरोधी पक्षांनी उठविलेल्या प्रश्‍नांना लोकांतून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने या माध्यमांचीही गोची होत होती. सरकारची विश्‍वासार्हता कमी झालीच आहे; पण विरोधकांकडेही ती नाही, असाच संदेश जणू जनता देत होती. या दोन्हीपेक्षा तिसऱ्याच कोणीतरी हा प
्रश्‍न हाताळावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत होती आणि अण्णांच्या रूपाने ती पूर्ण झाली. आता या प्रश्‍नाचे भांडवल करून सरकारला नमवावे, यासाठी ही माध्यमे पुढे झाली. त्यांनी अण्णांना हिरो करायचे ठरविले. चोवीस तास अण्णांच्या बातम्या दाखवून लोकांमधील असंतोष जागृत केला. लोकांना तिसरी व्यक्‍ती मिळाली आणि माध्यमांना नवा मुद्दा. विकिलिक्‍स आणि ए. राजा प्रकरणात सरकार कोसळले तर नाही; पण तरीही काही चिरा पडल्या होत्या. आता अण्णांना हिरो करून ती तोफ डागायची, याच उद्देशाने माध्यमे कामाला लागली. अण्णांच्या अनिश्‍चित (बेमुदत नव्हे) उपोषणाचे दिवस जसे पुढे पुढे जाऊ लागले तस तसे माध्यमांची धार तीव्र होत गेली. लोकांचा पाठिंबा वाढत गेला आणि एका वळणावर अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या. आता खरा प्रश्‍न परत निर्माण झाला आहे. आता अण्णा महानायक झाले. ते गांधीवादी विचारांचे आहेत, ते अंगावरच्या कपड्यांनीशी लढताहेत वगैरे वगैरे चर्चा झडू लागल्या. प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आणि तो प्रश्‍न सोडविणाऱ्यांना प्रतीक करून त्यांचा यथोचीत मान राखणे, हेही महत्त्वाचे असतेच. अण्णांच्या आंदोलनाबद्दल कोणाच्या मनात शंका येण्याचे कारण नाही; पण याचा अर्थ अण्णांना महानायकपदावर बसविणे हे अण्णांसाठी आणि समाजासाठीही घातक ठरेल.
विचारांची पताका हातात घेणे आणि ती घेऊन पुढे जाणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. महात्मा गांधीजींना हे दोन्ही जमले. स्वातंत्र्यानंतर जयप्रकाश नारायण यांनाही ते काही प्रमाणात जमले (जयप्रकाश नारायण यांना गुरू मानणारे किमान डझनभर नेते दिल्लीत सरकारला हलविताना दिसतील); पण हे अण्णांना जमेल का? हा प्रश्‍न आहे. अण्णांकडे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारी शक्‍ती नाही, हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या विचारांचा गोंधळच प्रचंड आहेत. बौद्धीक क्षमतेविषयी कोणी जर आक्षेप घेत असेल, तर त्यामागील असूया आणि निगरगट्टपणा सोडून त्यावर चर्चा व्हायला हरकत नाही. हा प्रश्‍न उपस्थित करण्याचे कारण, अशा माणसांना देव्हाऱ्यात ठेवून आपला कार्यभार करणारे निर्माण होतात (इथे तर ते झाले आहेतच) आणि आंदोलनाची दिशा दाखविणे, बघून घेणे, अडचणीतच आणणे या पातळीवर येते. त्याचबरोबर देव्हाऱ्यातील या महानायकालाही आपण खूप मोठे आहोत असा भास होतो आणि तो वेगवेगळ्या मागण्या करू लागतो. या मागण्या बहुंताशवेळा व्यवहारवादाच्या पलीकडच्या असतात आणि मग समाजासाठी रणांगणात उतरलेला महानायक समाजाचेच नुकसान करायला लागतो. त्यांचे शिष्य त्यांच्या विचारांना विरोध म्हणजेच समाजावादाला, पुरोगामित्वाला विरोध, देशाला विरोध अशा आवया उठवायला लागतात. त्यामुळेच अण्णांना महानायक करणे समाजाने पायावर धोंडा मारून घेण्यासारखेच आहे.
अण्णांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात कुठे गांधीवाद दिसत नाही. गांधीजी ज्या प्रकारे आंदोलन करायचे त्यालाच गांधीवाद समजायचा का? गांधीवाद हा विचारांचा आणि आचारांचा एक मार्ग आहे. एका बाजूला अण्णा फाशी द्या, गोळ्या घाला अशा पद्धतीचे आवाहन करताहेत, तर दुसऱ्या बाजूला गांधीवादी म्हणवून घेताहेत. अरे गांधींना तलवारच मान्य नव्हती आणि हे तर तलवारीच्या म्यानेत गांधीवाद कोंबताहेत. प्रश्‍न केवळ तलवार किंवा फाशीची गोष्ट करण्याबाबत नाही, तर प्रश्‍न आहे त्या विचारांची अधिष्ठान असण्याचे. एक क्षणभर आपण मानू की काय फरक पडतो, की ते गांधीवादी आहेत की नाही याचा. भ्रष्टाचारविरोधी ते आग्रही आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपला प्राणही पणाला लावला होताच की. त्यांच्या प्राण पणाला लावण्याबद्दल आक्षेप नाही किंवा त्यांच्या समाजसेवेच्या निष्ठेबद्दलही आक्षेप नाही. आक्षेप आहे तो त्यांच्याभोवती जमत असलेल्या जळमटांबद्दल. ही जळमटे वाढली, की त्यात समाजाचाच श्‍वास कोंडला जाण्याची शक्‍यता आहे. नेत्याकडे अशी जळमटे बनू न देण्याची ताकद असायला हवी. दुर्दैवाने ती अण्णांकडे नाही. त्यामुळे ते दीर्घकालीन मोठे आंदोलन उभे करू शकत नाहीत. अण्णांच्या उपोषणाला सलाम; पण...

रविवार, ३ एप्रिल, २०११

सोळा सहस्रातील स्त्री

डोक्‍यावरचा मोरपिसांचा मुकुट त्याने काढून ठेवला आणि तो बाथरूमध्ये शिरला. चेहऱ्यावरचा रंग धूत असतानाच कोणी तरी कडी वाजविली. त्याने चेहरा धुतला आणि तो पुसतच तो बाहेर आला. अजुनी अंगावरची नाटकातील कृष्णाची वस्त्रे तशीच होती. गळ्यातील माळ आणि पितांबर तसेच होते. खरे तर त्याला आज खूप कंटाळा आला होता, कोणी भेटायला सही मागायला येऊ नये असेच वाटत होते; पण समोरच्या त्या बाईंना त्याला थांबवावे नाही वाटले. ती बाई आत आली.
तुमचं कृष्णाचं काम खूप सुंदर झालं. मला तुमचा अभिनय खूप आवडतो.
त्यानं उगाच हसण्याचा प्रयत्न केला. आभारी आहे, अशा अर्थाने त्याने मान हलविली.
ती बाई तिथेच उभी राहिली... त्याला तिचे तसे उभे राहणे अस्वस्थ वाटू लागले.
तुम्ही बसा ना?
तिही थोडी संकोचली होती; पण बसली. ती बसल्यावर त्याला आपण उगाचच तिला बसायला सांगितल्याचे वाटून गेले.
तुमच्याकडे बघितल्यावर कृष्ण तुमच्यासारखाच दिसत असेल असे वाटते हो?
""नाही हो हे तुमचे प्रेम आहे. रंगांची पुटं चेहऱ्यावर चढवून कृष्ण रंगवणारे आम्ही बहुरुपी. त्या योगेश्‍वराचे रुप कुठे यायचे आम्हला.''
त्याचे ते थोडे लांबलेले वाक्‍य ऐकून ती थोडी सैल झाली. तिथेच व्यवस्थित बसत तिने त्याच्याकडे बघितले. तो थकला होता; पण तरीही त्या बाईचे तिथे बसणे त्याला खुपत नव्हते. ती काही फार सुंदर म्हणावी अशी नव्हतीच. खरे तर थोडी सावळी होती. चाळीशी पार केली असेल; पण निटनेटक्‍या कपड्यांमुळे ती थोडी आकर्षक वाटत होती.
""पण तुमच्यातील राधाकृष्णच योगेश्‍वर कृष्णापेक्षा जास्त भावतो. त्या शेवटच्या प्रसंगातील यादवीने असह्य झालेल्या कृष्ण नाही बघवत.''
""पण खरे तर तोच कृष्ण खरा की... असह्य, दुर्बल तो कुठे योगेश्‍वर आहे. महाभारताच्या युद्धा वेळी अर्जुनाला उपदेश सांगणारा, पांडवांसाठी शिष्टाई करणारा आणि जरासंधाचा वध करण्यासाठी भीमाला प्रोत्साहित करणारा कृष्णच तो राधाकृष्ण.'' तो खाली बसला. त्या बाईंकडे त्याने आणखी एकदा निटस्‌ बघितलं, कुठे ओळख लागते का बघण्यासाठी मेंदूच्या शेवटच्या पेशीपर्यंत ताण दिला; पण कुठेच संदर्भ लागला नाही.
""तुम्ही अनेक भूमिका केल्या; पण तरीही वीस वर्षांपूर्वीचे हे नाटक तुम्हाला अजून का करावे वाटते.''
तसा तो अबोल, खूप कमी बोलायचा. कोणी पत्रकाराने वैगेरे काही प्रश्‍न विचारले तरी तो जास्त काही नाही बोलायचा. त्याच्या मुलाखतीही खूप जणांनी घेतल्या; पण त्या शाळा-कॉलेजांत अर्ज भरून द्यावा तश्‍याच स्वरूपाच्या. अलीकडे तर तो काही बोलायचाच नाही. त्याच्या जुन्या मुलाखतींनाच नव्या स्वरूपात पत्रकार सादर करायचे. कधी काळी काही मते त्याने मांडलेली असायची; पण ती आज पुरती बदललेली असायची तरीही ती मते त्याच्या नावावर वर्तमानपत्रे खपवायची. त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. आता त्या मतांनाही किंमत फक्‍त काही मिनिटांच्या मनोरंजनाची आहे हे त्याला कळले होते. पण आज या बाईंशी बोलावं असं त्याला वाटू लागलं. कुठे तरी समानधागा असेल याची त्याला खात्री वाटू लागली.
तुम्हाला माझा प्रश्‍न आवडला नाही का?
त्या बाईंच्या अर्जवी आवाजाने तो भानावर आला.
""तसं काही नाही. या नाटकातील कृष्ण मला फार आवडतो. तो माझा वाटतो. नटाच्या आयुष्याची शोकांतिका हीच असते तो अनेक भूमिका करतो. अनेकांची चरित्र पडद्यावर किंवा रंगमंचावर मांडतो; पण स्वतः मात्र कोरडाच राहतो. या कृष्णाच्या भूमिकेत मला माझं पण दिसतं. खरे तर मला या भूमिकेच्या तालमीच जास्त करायला आवडतात. त्या आपल्यासाठी असतात ना? त्या भूमिकेतून बाहेर यावं असं वाटतचं नाही; पण तालमी केल्यानंतर नाटक रंगमंचावर यायलाच पाहिजे नाही तर इतरांची पोटे कशी भरणार म्हणून हे नाटक रंगमंचवर येते एवढेच.''
म्हणजे मला नाही समजलं. त्या योगेश्‍वर कृष्णात आणि तुमच्यात साम्य आहे असं वाटतं की काय?
नाही ओ. त्या योगेश्‍वर कृष्णात आणि माझ्यात काही साम्य शोधायचे म्हणजे असंख्य सूर्याने व्यापलेल्या आकाशात आणि आपल्यात एखाद्या काजव्याने साम्य शोधावे तसेच आहे. ''
मग तरीही तुम्हाला कृष्णात साम्य वाटतेच की.
हो पण त्या योगेश्‍वर कृष्णात नाही. तुम्हाला त्या नाटकातील एक प्रसंग आठवतो. नरकासूर वधानंतर कृष्ण त्या सोळा सहस्त्र स्त्रियांना आपलेसे करतो. त्या रात्री कृष्णाला झोप लागत नाही. आपल्या महालात येरझाऱ्या घालणाऱ्या त्या कृष्णाकडे त्या सोळा सहस्र स्त्रियांतील एक धीट स्त्री येते.
हो... आठवते. तोच एक तर प्रसंग मनाच्या कुपीत कायम ठेवलाय... त्या एका प्रसंगासाठीच तर मी हे नाटक अनेक वेळा बघितले. बघते आहे... त्यातील शब्द अन्‌ शब्द तोंड पाठ आहे... ती म्हणते...
कृष्णा तुझी बेचैनी कळते रे...सहस्त्र स्त्रिया मिळूनही तू तसा कोरडाच की. खरे तर तू त्या राधेच्या प्रेमपाशातून मुक्‍त झालाच नाही, होणारही नाहीस.. तू गोकुळ आणि मथुरा सोडून इथे आलास त्यामागे राधेला विसरणे हेही होतेच की. पण ते तुला काही जमले नाही. राधेला विसरणे म्हणजे स्वतःला विसरणे. तुझ्या पराक्रमात, तुझ्या शिष्टाईत, तुझ्या साऱ्या गुणांतून राधाच तर दिसते. राधेला तुझ्यातून वेगळे केले की तू तुझा उरतोस कुठे. त्यामुळे आज तुला झोप लागणार नाही, तशी झोप मलाही लागणार नाही.
माणुसकीच्या नात्याने तू आम्हाला जवळ केलंस. तुझ्या राज्यात आम्ही तुझ्या बायका म्हणूनही फिरू. नकासुराच्या राज्यात ज्या बंदीवासात आम्ही होतो त्यापेक्षा निश्‍चितच तुझ्या राज्यात आम्हाला मोकळीक मिळेल. तुझ्या नावाच्या कुंकवामुळे समाजात मानही मिळेल; पण तरीही आम्ही तुझ्या नाही होऊ शकणार. खरे सांगू कृष्णा त्या बंदीवासापेक्षा ही मोकळी हवा फार लागते रे. नरकासुराच्या बंदीशाळेपेक्षा तुझा महाल मोठी बंदीशाळा वाटते. नरकासुराने केलेल्या यातनांचे काही वाटायचे नाही.. तुझी मूर्ती डोळ्यासमोर आली की सगळ्या वेदना सुसह्य व्हायच्या. तू येशील ही आशा होती आणि या सगळ्यातून तू आम्हाला बाहेर काढशील, या आशेवरच तर जगत होतो आम्ही; पण तू आलास आणि ती आशाही आमच्याकडून तू हिरावून घेतलीस. आता आम्ही तुझ्या आहोत आणि तू मात्र आमचा नाहीस. ... आता जगायचं कसं. तुझंही असंच होईल. राधेच्या विचाराशिवाय तुला जगायला येणारच नाही.''
तो त्या बाईंकडे बघत राहिला. त्याला एकट्यालाच वाटायचं हे नाटक माझ्यासाठीच लिहिलं आहे. प्रत्येक पात्र माझ्याच भावना बोलत आहे; पण त्या बाईंकडे बघितल्यावर त्याला वाटले हे नाटक माझे एकट्याचे कुठे आहे. त्या बाईतील आणि कृष्णाने मुक्‍त केलेल्या त्या सहस्र स्त्रियांतील अंतर पार मिटून गेल्याचे त्याला वाटले.

शुक्रवार, १ एप्रिल, २०११

एक भूत हवे आहे..... चमत्कारासाठी






संघाला चार धावांची गरज. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. अस्वस्थ हीरो खेळपट्‌टीवरून क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत असतो... प्रेक्षकांत शांतता... हिरॉईन हात जोडून देवाचा धावा करत असते. व्हिलन जो गोलंदाजी करत असतो तो शोएब अख्तरच्या स्पीडने धावत येतो.. (बऱ्याच वेळा एवढा वेळ हा का धावतोय असा प्रश्‍न पडावा
इतका वेळ तो एक चेंडू टाकायला घेतो)... तो चेंडू टाकतो... हीरो बॅट घुमवतो. चेंडू उंच आकशात जातो... क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी चेंडूखाली येतो आणि तो झेल पकडतोही; पण त्याचा एक पाय सीमारेषेबाहेर... अंपायर षटकार असल्याची खूण करतो आणि एकच जल्लोष... हिंदी चित्रपटात असेच थोडेफार बदल केलेले प्रसंग अनेक वेळा चितारलेले आहेत. प्रेक्षकांना खात्री असते की काहीही झाले तरी (म्हणजे तेथे आपल्या हीरोची फलंदाजी व्यंकटेश प्रसादसारखी असो आणि व्हिलनची गोलंदाजी मॅकग्रासारखी असली तरीही) शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून हीरो तो सामना जिंकून देणारच. प्रेक्षकही हा खरोखरचा सामना असल्यासारखे शिट्या वाजवून आपल्या हीरोने कशी जिरवली, म्हणत सिनेमागृहातून बाहेर पडतात.
भारतीय सिनेमा आणि क्रिकेट विश्‍व या दोन्ही गोलांच्या अनेक कड्या एकमेकांत मिसळल्या आहेत. क्रिकेटपटूंची आणि बॉलिवूड तारकांची अफेअर ही यातील एक कडी; पण ही कडी वगळूनही अनेक कड्या या दोन गोलांना एकत्र करतात. मग क्रिकेपटूंचे सिनेमात काम करणे असो वा नट-नट्यांनी क्रिकेट मॅच खेळणे असो; पण भारतीय सिनेमांत क्रिकेटचे प्रतिबिंब ठळकपणे पडले आहे.
भारतीय सिनेमा हा बॉक्‍स ऑफिसवर चालणाऱ्या गणितांवर जास्त निर्माण केला जातो. त्यामुळे बाजारात जे चालते ते ते सगळे सिनेमात आणण्यासाठी काही निर्माते-दिग्दर्शक जिवाचा आटापिटा करतात. त्यामुळे ज्या देशाचा धर्मच क्रिकेट बनलेला आहे त्यामुळ क्रिकेटला 70 एमएमवर न आला असता तरच नवल. भारतीय सिनेमातही क्रिकेट अनेक अंगाने येत गेले. कधी ते कथानकाचा मुख्य भाग म्हणून तर कधी उपभाग म्हणून. अगदी काही वेळा त्याचा ओझरता उल्लेख; पण क्रिकेट भारतीय सिनेमात योग्य अंतरांनी येतच राहिले आहे. "इक्‍बाल', "ऑलराऊंडर', "लगान', "पटियाला हाऊस', "चेन कुली की मेन कुली', "दिल बोले हडीप्पा' यांसारख्या चित्रपटांचा मुख्य कथाभाग हा चित्रपटाभोवतीच गुंफला होता, तर "मासूम', "हम आपके है कोन', "मुझसे शादी करोगी', "चक दे इंडिया' यांसारख्या चित्रपटांत काही सेकंदांपुरते का होईना; पण क्रिकेट येऊन गेलेच.
ऑल राऊंडर ः भारताने 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकला आणि संपूर्ण भारतात दिवाळी साजरी झाली. क्रिकेटचा फिव्हर एवढा होता की तो कॅश करण्यासाठी ऑल राऊंडर हा चित्रपट काढला. ज्याला अभिनयाचा एक पैलूही माहिती नव्हता अशा कुमार गौरवला अष्टपैलूची भूमिका मिळाली. लव्हस्टोरीच्या यशातून अजून कुमार गौरव बाहेर पडला नव्हता; पण लोकांनी या ऑल राऊंडरला नाकारले.
मालामाल ः हा खरे तर संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित चित्रपट नव्हता. या चित्रपटात नसिरुद्दीन शाहने क्रिकेटपटूची भूमिका केली होती. यामध्ये आता ज्याप्रमाणे पाकिस्तानी क्रिकेट संघ स्पॉट फिक्‍सिंगमध्ये अडकलेला आहे त्याप्रमाणेच नासिरुद्दीन शहांना हा सामना गमवायचा होता. खरे तर या चित्रपटाची खरी प्रसिद्धी झाली ती भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांच्यामुळे. नसिरुद्दीन शहा यांच्या सोबतीने तेही या सामन्यात दिसले होते.
अव्वल नंबर ः 1990 मध्ये आलेला हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळलेच नाही. मिस्टर परफेक्‍टनिस्ट म्हणून ज्या अमीर खानला संबोधले जाते तो या चित्रपटाचा हीरो. चित्रपट देव आनंदचा. त्यामुळे देव आनंद यांच्या चित्रपटात जे जे असते ते ते सगळे या चित्रपटात बघायला मिळते. विशेष म्हणजे त्यानंतर काही काळ आमीरवर तो देव आनंदसारखा अभिनय करतो अशी टीकाही झाली होती. आदित्य पांचोलीही या चित्रपटात होता; पण चित्रपटच लोकांच्या लक्षात नाही तिथे आदित्य पांचोली कोठून राहणार.
चमत्कार ः 1992 मध्ये आलेला हा चित्रपट आजही टीव्हीवर लागला तरी लोक काही वेळ का होईना; पण रिमोट बाजूला ठेवतात. या चित्रपटाचे रसायनच काही भन्नाट बनले आहे, की आजही हा चित्रपट बघायला आवडतो. शाहरूख या चित्रपटात जेवढा इनोसंट वाटला तेवढा पुन्हा कधीच वाटला नाही. नसिरुद्दीन शहा यांचे भूत आणि या चित्रपटातील क्रिकेट मॅच हे दोन्हीची खिचडी मस्त जमली आहे. आजही जेव्हा कधी भारतीय संघ संकटात सापडतो त्या वेळी सिनेमाप्रेमी लोक देवाचा धावा करण्याऐवजी नसिरुद्दीन शहाचाच धावा करतात. नसिरुद्दीनचे भूत हीरोच्या संघाला अशा काही विचित्र स्थितीतून बाहेर काढते ते खरे तर पडद्यावरच बघायला पाहिजे. बाकी या चित्रपटात शाहरूख खानने प्रशिक्षकाची भूमिका केली आहे; पण हा चित्रपट संपूर्णपणे क्रिकेटवर आधारित नाही.
लगान ः 2001 मध्ये आलेला लगान चित्रपटाची कथा कोणा एका क्रिकेटपटूवर आधारित नव्हती, तर चित्रपटाचा आत्मा क्रिकेटच होता. अव्वल नंबरमध्ये मिळालेले अपयश आमीरने या चित्रपटात धुऊन काढले. आतापर्यंत एवढे यश कोणत्याही क्रिकेटपटाला मिळाले नव्हते, एवढे यश लगानने मिळविले. ब्रिटिश इंडियातील एका न झालेल्या सामन्यावर या चित्रपटाची कथा बेतली होती. तीन तासांहून अधिक काळ लांबी असूनही "लगान'ने तुफान यश मिळविले.
स्टंप्ड ः 2003 च्या विश्‍वचषक स्पर्धेचा फिव्हर कॅश करण्यासाठी निर्माण केलेल्या या चित्रपटाच्या दांड्या बॉक्‍स ऑफिसवर अशा काही उडाल्या, की निर्माता नंतरचे काही दिवस रात्री क्रिकेट क्रिकेट... म्हणत जाबडत उठला असेल. चित्रपटात दम नव्हताच. केवळ धंदेवाईक दृष्टीने निर्माण केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी ग्राहक या दृष्टीने बघत नाकारले. सलमान खानने या चित्रपटात रविना टंडनच्या इच्छेखातर एक आयटम सॉंग केले होते, एवढीच या चित्रपटाची जमेची बाजू.
इक्‍बाल ः एका मूक-बधिर आणि तरीही क्रिकेटचे प्रचंड वेड असलेल्या मुलाची ही कथा. चित्रपटातील मुख्य कथानक आणि उपकथानकेही क्रिकेटभोवतीच फिरतात. श्रेयस तळपदेने या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीचे दार ठोठावले. नसिरुद्दीन शहा आणि क्रिकेट यांचे काय नाते आहे माहिती नाही; पण याही चित्रपटात नसिरुद्दीन प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला. चित्रपटाच्या पहिल्या दृश्‍यापासून ते शेवटच्या दृश्‍यापर्यंत क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच बघायला मिळते. या चित्रपटाला समीक्षकांनी प्रचंड उचलून धरले.




चेन कुली की मेन कुली ः या चित्रपटात एका मुलाला एक बॅट मिळते. त्याच्यातील गुणांपेक्षा तो त्या बॅटवरच जास्त विसंबून राहतो. त्याला वाटत असते, की त्या बॅटमध्ये काही तरी जादू आहे. सचिन तेंडुलकरचा या चित्रपटात उल्लेख नाही; पण झईन खानला निवडताना तो थोडासा सचिनसारखा दिसतो म्हणूनच निवडले आहे हे जाणवते. सचिनही अवघ्या सोळाव्या वर्षी संघात आला तोच संदर्भ घेऊन हा चित्रपट केला आहे.
से सलाम इंडिया ः 2007 मध्ये भारतीय संघाचे वर्ल्डकपमध्ये जे झाले तेच या चित्रपटाचे झाले. भारतीय संघ वेस्ट इंडीजला गेला कधी आणि आला कधी हे जसे लोकांना कळले नाही; तसेच से सलाम इंडिया हा चित्रपट कधी लागला आणि कधी गेला कळले नाही. चित्रपटात संजय सुरीने काम केले होते. चित्रपट बरा होता; पण त्याची प्रदर्शनाची वेळ चुकली.
दिल बोले हडिप्पा ः राणी मुखर्जीने या चित्रपटात फलंदाजाचे काम केले आहे. एक मुलगी मुलगा बनून भारतीय संघात खेळते या आशयावर चित्रपट होता. चित्रपटात काहीच नव्हते. राणीला बघायला जावे तर दाढी आणि मिशीतील राणीही बघवत नव्हती.



पटियाला हाऊस ः ज्या ज्या वेळी वर्ल्ड कपचा फिव्हर कॅश करण्यासाठी क्रिकेट चित्रपटात आले त्या त्या वेळी लोकांनी ते नाकारले. खरे क्रिकेट बघायला मिळत असताना कोणी हे फालतू क्रिकेट का बघावे; पण नाही तरीही निर्मात्यांना याच वेळी चित्रपट काढण्याची भारी हौस. पटियाला हाऊस कधी आला आणि कधी गेला ते अक्षयकुमारलाही कळले नाही.
ही काही प्रतिनिधीक उदाहरणे याबराबरच अनेक चित्रपटांतून क्रिकेट आले. कधी क्रिकटपटूंवर, तर कधी पैजेतून तर कधी मॅच फिक्‍सिंगसारख्या विषयातून भारतीय सिनेमात क्रिकेट येत राहिले आणि यापुढेही ते येतच राहील.