सोमवार, २६ ऑक्टोबर, २००९

खिडकी

ऑफीसला जाताना तो नेहमी त्या घरासमोर थांबायचा. त्या घराच्या दरवाजाचे ते मोठे कुलूप त्याला जितके अस्वस्थ करायचे, त्यापेक्षाही अधिक त्याला त्या दरवाजाशेजारील खिडकी अस्वस्थ करायची. बंद दरवाजाआडच्या खिडकीतील तिचा चेहरा बघितला की त्याला सुचायचं नाही.... चालताना त्याचा वेग तिथे मंद व्हायचा.. वळून वळून तो त्या खिडकीत बघत राहायचा आणि मग स्वतःला समजावत पुढे जायचा.... तो रोज त्या खिडकीकडे बघयाचा... ती नेहमी तिथेच असायची कधी शुन्यात नजर लावून बसलेली.... तर कधी तिच्या खिडकीत चढलेला मोगऱ्याच्या वेलाला कुरवाळत... त्याशिवाय ती वेगळं काही करताना दिसायची नाही...... कधी कधी तिच्या डोक्‍यावर पट्‌टी बांधलेली असायची....तर कधी चेहऱ्यावर ओरखडे असायचे....डोळे खोल गेलेल्या तिच्याकडे बघितलं की त्याला चिड यायची... अलिकडे तर तो त्या खिडकीत बघायचंही टाळायचा, पण त्याला ते जमायचं नाही... तिचा तो केविलवाणा चेहरा काही तरी मदत मागतोय, असं नेहमी त्याला वाटायचं... सरळ जावून ते कुलूप तोडावं, असं त्याला वाटायचं, पण त्याला धीर झाला नाही.... एकदा रविवारी तो असाच त्या रस्त्यावरुन चालला होता... तो दरवाजा उघडा होता आणि तीही खिडकीतही नव्हती.... तो खूप वेळ तिथं रेंगाळला पण त्या खिडकीत ना ती आली ना कोणतीही हालचाल दिसली, मग कंटाळून तो निघून गेला.... त्या रात्री त्याला झोप लागली नाही.... घरी काहीच करायला नव्हतं म्हणून ऑफीसला जायला तो लवकरच घराबाहेर पडला.... त्या घरापाशी आल्यावर एक चाळीशीचा माणूस त्या दरवाजाला कुलूप लावताना त्याला दिसला....त्याला वाटलं तो तिचा नवरा असावा.... तो थोडे मागेच थांबला मग त्याच्यामागून तो चालू लागला... बस स्टॉपवर आल्यावर त्याच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून त्याने अमुक तमुक गाडी गेली का? विचारलं.... त्यानं शांतपणे नाही म्हटलं.... मग तो रोज त्याच वेळेत त्या बस स्टॉपवर यायचा ... त्याच्याशी बोलायचा
प्रयत्न करायचा पण तो बोलायचा नाही..... आता त्याला त्याचा राग यायला लागला.... त्याला खडसावून विचारायचं म्हणून त्यानं मनाशी पक्‍क केलं पण त्याचा भिडस्त स्वभाव त्याला साथ देत नव्हता.... तरीही एके दिवशी त्यानं त्याला बस स्टॉपवर गाठलंच .... त्यानं तिचा विषय काढताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....त्याने सरळ त्याला जाबच विचारला का? तुम्ही तिला कैद केलंय.... काय गुन्हा आहे तिचा.... त्याच्या चेहऱ्यावरचे रागाचे भाव मावळले....
तुम्हाला वेळ असेल तर चला माझ्याबरोबर , त्यानं विचारलं....
मग तो त्याच्यामागून परत त्याच्या घरी आला... त्यानं कुलूप काढलं, सोफ्यावर टाकलं.... ती खिडकीत तशीच होती...
त्यानं हाक मारली
"" मनू '' तीनं हू केलं नाही कि चू..... मग तो तिच्याजवळ गेला....मग त्याच्याजवळ
आला... जरा बाहेर थांबता तिनं कपडे ओले केले आहेत, तेवढे बदलतो.... त्याला त्याच्या नजरेला नजर देता आली नाही...तो बाहेर आला....परत मागे फिरुन त्याच्याशी बोलण्याचा त्याला धीर झाला नाही....