रविवार, २६ ऑगस्ट, २०१२

"पॉलीश'

"पॉलीश'
एवढाच शब्द त्याने उच्चारला आणि त्याच्यापुढे पाय पुढे केला.
झाडाखाली बसलेल्या त्या सत्तरीतल्या चांभाराने एकदा त्याच्याकडं बघितलं आणि आपल्याकडचा चपलांचा एक जोडा त्याच्यापुढं ढकलला.
त्याने त्या जोड्यात पाय घुसविले आणि तसाच उभा राहिला.
लय दिस झालं, पन बुटाचं हे मॉडेल नायी बघिटलं. मागं लय फॅशन व्हती याची, पर आता कोन न्हाय वापरत.
चांभाराच्या त्या वाक्‍याने त्याला उगाचच अंगावर मास चढल्यासारखं वाटलं. आपल्या पांढऱ्या शुभ्र मिश्‍यांवर ताव मारत त्यानं नुसतं स्मित केलं. उगाचच आपल्या दाढी केलेल्या तुळतुळीत गालावरून हात फिरवला. कोटाची बटने काढली आणि पुन्हा घातली.
साधं करू की पेशल?
हं. स्पेशल. त्यानं आवाजात जितका जरब आणता येईल तितका आणला.
सायब कसं हाय! तुमच्यासारख्या लोकांस्नी असा चकचकीतच बूट लागतो. चालायचं कुठं असतंया. गाडीत बसला की धूम निघाला.....
हं.. चांभाराच्या त्या जवळीकतेनं तो थोडा अस्वस्थ झाला. बोलून चालून चांभार, दिडदमड्या मिळविणार आणि किती आगाऊपणे बोलतो, असाच भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
किती वेळ? त्यानं पुन्हा आवाजात जरब आणण्याचा प्रयत्न केला, पण ती तितकीशी जमली नाही.
लय नायी, पर चकाकी तर आली पाईजे..
हं. तो गप्प बसला.
बराचवेळ शांतता तशीच राहिली. कोणीच काही बोललं नाही. त्या चांभाराचे हात वेगानं बुटावर फिरत होते. मघापासून हातापेक्षा वेगाने चालणारी त्याची जीभ थंड पडली होती. एक बूट झाल्यावर त्यानं दुसरा हातात घेतला. त्याच्यावर तो ब्रश फिरवू लागला.
आपण उगाचच त्याला थांबवलं, असं वाटून त्यानं काही तरी प्रश्‍न करायचा म्हणून केला.
हं. किती वर्षे झाली. इथे बसतोस?
हं...
आता त्या चांभारानं त्याचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यानं गप्पपणे आपलं काम सुरूच ठेवले. सायबाने समोर बघितलं. उन तसं बऱ्यापैकी होतं. अंगातून आता घाम येऊ लागला होता. तो ज्या गाडीतून आला होता, ती नवीकोरी गाडी समोरच उभी होती. गाडीच्या थंडाव्यात जा,वं असं त्याला वाटून गेलं. पण त्यानं तो विचार टाळला. त्या चांभाराशेजारी असलेल्या एका मोडक्‍या खुर्चीवर त्यानं रुमाल टाकला आणि तिथंच बसून राहिला. काही क्षण तसेच गेले. ती शांतता त्याला आणखी डसू लागली.
त्यानं पुन्हा विचारलं.
किती वर्षे झाली. इथे बसतोस?
वरीस, दोन वरीस झालं असल की, इथं बसतो. तेच्याआगुदर.. तो बघा बंगला तिथं बसायचो. म्हणजे तिथं बंगला नव्हता. व्हतं एक घर. त्याच्या पुढ्यात एक झाड व्हुतं. तिथं बसायचो, न्हान व्हतो, तवापसनं.
त्यानं त्या बंगल्याकडे बघितलं. खूपच दिमाखात तो बंगला उभा होता.
मागल्या साली घर पाडलं. अन्‌ आता तिथं बंगला झाला. म्या ज्या झाडाखाली बसत हुतो ते झाड बी तोडलं गेलं. मंग काय. काही दिस बंगल्याच्या भित्तीला टेकून टाका घालायचो. पन एकदा वाचमन चिडला, म्हणाला सायबांकडं लय पावणं येणार हायती, उठ इथंनं. मग दोन चार दिसाला कोण कोण येत राहिलं आणि मग म्या सरळ इथ मुक्‍काम ठोकला.' तो बोलत होता.
""मोठ्या बंगल्यांस्नी न्हान माणसं पेलवत न्हायीत सायेब. तेंच्या शिरमंतीपुढं आपल्यावानी गबाळ्याचा कशापायी संसार थाटायचा. ह्या बुटांचं भारी असतंया बघा, गरीब दिसू लागली की हात फिरवायचा. थोडं पॉलीश केलं की झ्याक नव्यावानी दिसतंया. माणसांचं तसं नसतंया. माणसांना का कोणी पॉलीश करणार. म्हणलं त्यांचं नशीब त्यांच्याकडं आपलं आपल्याकडं. आपण जनमलोच तुटक्‍या चपलेवानी, दोन-चार टाकं काय घातलं तेवढंच आपलं. आता ते बी काय उपेगाचं न्हायी. शिवायला आता तळ बी राहिला न्हायी.''
हं.. सायबानं आता नुसता हुंकार भरला.
तू बघितलं आहेस त्या बंगल्यातील सायबांना? पुन्हा काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं प्रश्‍न केला.
नाय बा, काळ्या काचंच्या गाड्यातली माणसं कुठं दिसत्यात गरीबाला. पर गाड्या बघितल्यात. लय झ्याक हायती. तुमची ही गाडी बी तशीच, पर त्या बंगल्यातील गाड्या लय निराळ्या. रोज येगळी गाडी.
तो गप्प बसून राहिला. त्यानं त्या बंगल्याकडं एक नजर टाकली आणि पुन्हा त्या चांभाराकडं. त्याने आता दोन्ही बूट चकचकीत करुन ठेवले होते.
चांभाराने त्याच्याकडे बघितले.
त्याने पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला. पण तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर पुढे आला, ड्रायव्हरने पन्नासाची एक नोट त्याच्यापुढे ठेवली. साहेब गाडीत बसून निघून गेला. चांभाराने त्याच्या गाडीकडे बघितले. गाडी त्या बंगल्याच शिरली.
चांभार स्वतःशीच हसला. त्या बंगल्याच्या सायबालाच आपण सांगत व्हुतो की. त्याने मान हलवली आणि सायबानं टाकलेल्या पन्नाशीच्या नोटेकडं बघत चांभार पुटपुटला, आजचा दिस गेला आता, उद्याचं उद्या बघू.
त्यानं तिथं ठेवलेलं आपलं सामान आवरायला सुरवात केली. सायब बसलेल्या खुर्चीवर सायबाचा रुमाल तसाच होता. एवढा मोठ्‌ठा साहेब आणि त्याचा रुमाल बघून चांभाराला कसंतरीच वाटलं. रुमालाला पडलेल्या भोकांवरुन त्याला समजलं, त्या बंगल्यात जाण्यापूर्वी सायबालाही पॉलीश केलं होतं. माणसांना पॉलीश केलेलं त्यानं पहिल्यांदाच बघितलं होतं. 

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

प्रिय



खूप दिवसांनी पत्र लिहितोय. त्याबद्दल माफ कर. तुझ्याकडे माफी मागायची हाही एक बहाणा असतो, तुझ्याजवळ जाण्याचा, हे बहुतेक तुलाही माहीत आहे. काही नात्यांचं असंच असतं. जे दिसतं तसं असत नाही. महाभारत हा जसा तुझ्या आवडीचा विषय तसा माझ्याही. महाभारताचे वैशिष्ट्यच हे की ते प्रत्येकाला आपपल्या नजरेतून वेगळे भासते. कृष्ण-राधा ही जोडी महाभारतात नाही, ती नंतरच्या काळात कीर्तनकारांनी टाकली, दुर्गा भागवतांनी याबाबत खूप संशोधन केले आहे. खरे तर राधा आणि द्रौपदी ही पात्रे कीर्तनकारांनी वेगळी केली. राधाही विवाहित आणि द्रौपदीही विवाहित. पण दोघींचे कृष्णावर प्रेम. राधा-कृष्ण मांडताना कीर्तनकारांनी त्या प्रेमाला भक्‍तीचे रुप दिले आणि द्रौपदी-कृष्ण प्रेमाला बहीण-भावाचा मुलामा; पण मला नेहमी वाटते, राधा ही काही गोकुळातली गवळण नव्हती. शिवाजी सावंतांनी युगंधर लिहिताना राधेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला; पण त्यांनाही तो लागला नाही. मग त्यांनी शब्दांचा किस काढत राधा म्हणजे मोक्ष वगैरे असा काहीसा अर्थ लावला. पण राधेला महाभारतात शोधण्याचा त्यांनी आणखी थोडा प्रयत्न केला असता तर राधा महाभारतात क्षणा-क्षणाला भेटली असती. राधा आणि द्रौपदी या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. द्रौपदीत राधेला बघायचे थोडेसे धाडस केले तर तिच्यात राधा दिसतेच. अगदी स्वच्छ निर्मळपणे ती दिसते. विशेष म्हणजे प्रियतमेसाठी सर्वस्व देणारा कृष्ण द्रौपदीसाठीच भारतीय युद्ध घडवून आणतो हेही आरशासारखे स्पष्ट आहे. पाच पती असूनही द्रौपदीला कृष्ण का आवडावा? हा प्रश्‍न उपस्थित होईलही, पण नवऱ्यांची संख्या किती यावर का प्रेम असते. पाचही पतींमध्ये पराक्रम आणि शौर्य होते, पण प्रेम केवळ शौर्य आणि पराक्रमावर केले जात नाही, ती अंतरिक गोष्ट आहे. दुर्गाबाई याबाबत खूप सविस्तर सांगायच्या, पण त्यांनीही राधेला आणि द्रौपदीला एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मांडलेले नाही. कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील नाते हे भावा-बहिणीचे रंगविले ते खरे कीर्तनकारांनी आणि त्यानंतर भावगीत रचणाऱ्या कवींनी. द्रौपदी खरे तर कृष्णाची सखी. गंमत बघ हं, कृष्णाच्या रुक्‍मिणी-सत्यभामेसह सोळा सहस्र स्त्रिया असल्या तरी त्याला त्याची सखी भेटली ती द्रौपदीत आणि पाच नवरे असूनही कृष्णेला अर्थात द्रौपदीला कृष्णातच सखा दिसला. खरे तर हा प्रेमाचा रंग नाटककारांनी आणि कवींनी फुलवायला हवा होता. अगदी प्लेटो सांगतो तसे हे प्रेम अशारीरिक आणि उच्च पातळीवर होते. द्रौपदीच्या लज्जा रक्षणापासून ते तिच्यातील सूडाला मूर्त रूप देण्यापर्यंतच्या प्रवासात पांडवांहून जास्त पुढाकार कृष्णाने घेतला आहे. त्यासाठी त्याने वाट्‌टेल ते केले आहे. यांत तिच्यासाठी सर्वस्व द्यायचा हेतू होता. कृष्णाला भारतीय युद्ध थांबवायचे असते तर ते केव्हाच थांबले असते. पण ते त्याला थांबवायचे नव्हते. द्रौपदीचा झालेला अपमान जितका पांडवांना जिव्हारी लागला होता, त्यापेक्षा जास्त कृष्णाला लागला होता. म्हणूनच तर त्याने अर्जुनाला "युगंधर' तत्त्वज्ञान सांगून लढायला भाग पाडले. एखाद्या शूर सेनानीने युद्ध लढण्यापूर्वी आपल्या शस्त्रांना धार द्यावी, दारूगोळ्यांचा साठा करावा, व्यूहरचना करावी, अगदी त्याचप्रमाने द्यूत सभेनंतर कृष्णाने केले. पांडवांपेक्षा कृष्णालाच हे युद्ध हवे होते हे उघड आहे. हे युद्ध जिंकल्यानंतर कृष्ण काही चक्रवर्ती सम्राट वगैरे होणार नव्हता, किंवा तोही चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिरच्या साम्राज्यातील एक मांडलिक राजा होणार होता. तरीही त्याने पांडवांना मदत केली. याचे कारण धर्माची पुनर्स्थापना हे नव्हतेच. कारण कौरवांचा पक्ष अधर्माचा आणि पांडवांचा पक्ष धर्माचा हे कशावरून ठरणार? युद्धभूमीवरचा धर्म काय हे कृष्णाने सांगितले, याचा अर्थ असा नव्हे, की कौरवांचे राज्यच मूळी अधर्माचे होते. त्याचे संदर्भ वेगळे वेगळे करायला हवेत. सांगायचा मुद्दा हाच, की कृष्णाने केवळ आणि केवळ द्रौपदीसाठी हा महाभयंकर संग्राम घडवून आणला. पण हे अमूर्त आणि संयमी प्रेम उघड झाले नाही हे खरेच. आपल्याकडे सामाजिकदृष्टया स्त्री-पुरुषांना कुठल्यातरी नात्यात अडकविणे भाग पडते. तसे न झाल्यास अनैतिकतेच्या गाळात त्यांना अडकावे लागते. द्रौपदी विवाहित आणि कृष्णही विवाहित त्यात कृष्णाला दैवपद बहाल केलेले. त्यामुळे द्रौपदी आणि कृष्ण यांच्यात प्रेम होते आणि राधा दुसरी तिसरी कोणी नसून ती द्रौपदीच होती, असे जर कोणी सांगितले तर त्याला एक तर मुर्खात काढण्याचा संभव होता किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा. त्यामुळे राधेला कृष्णेतून वेगळे करण्यात आले आणि द्रौपदीला बहीण करण्यात आले. पण द्रौपदी आणि कृष्णाचे खरे प्रेम होते. अपुरेपण दोघांतही होते, माणसांच्या गर्दीत आपण एकटे असतो ना तसेच त्या दोघांचे होते.
पण त्यातही गंमत आहे. या दोघांचे प्रेम उच्च असले तरी खरे उच्चतम प्रेम महाभारतात सापडते ते भीमाचे. युधिष्ठिर एकपत्नीव्रत राहिला पण त्यात त्याच्या प्रेमापेक्षा तत्त्वाचा भाग जास्त होता, भीमाचे हिडिंबाशी लग्न झाले होते, ते खरे द्रौपदी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी. हे खरे तर एकतर्फी प्रेम होते. द्रौपदी मनाने कृष्णाची होती. खरे तर ती राधेसारखी कृष्णाबरोबर होती आणि भीम राधेप्रमाणे द्रौपदीवर प्रेम करायचा. द्यूत सभेत कृष्णेची विटंबना होताना तिला आठवला तो कृष्ण, पण पांडवात ज्याची सर्वात जास्त तडफड झाली तो भीम.
तुझाच..

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

फेडरर तू हरायला नको होतस....

मला टेनिसमधला "टे' कळत नाही,
रॅकेट कशाची असते काही माहीत नाही,
बॅक हॅण्ड, फोर हॅण्ड मला समजत नाहीत
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....

सर्व्हीस म्हणजे काय याचा मला पत्ता नाही
गुणांचा तक्‍ता कसा केला जातो, कळत नाही
ब्रेक पॉंईट म्हणजे कशाला ब्रेक ते समजत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....

स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह
टेनीसमध्येही असतं का माहीत नाही..
चेंडू प्रेक्षकांत भिरकावल्यावर टाळ्या
मिळतात का हेही माहीत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतंस...


टेनिसमधला तू बादशाह वैगेरे असशील
अनेक लढाया तू जिंकल्या असशीलही
पण तरीही तू उपयोगाचा नाहीस.....
तू खरंच हरायला नको होतंस...

मला गोल्डन चेरी माहीत नाही..
पण मला माहीत आहे डोळ्यांतील अश्रुंची किंमत
लाखो डोळ्यांतून तुझ्यासाठी गालावर आलेल्या
आणि त्यापेक्षा जास्त "त्या' दोन डोळ्यांतील अश्रू,
तुझ्या हरण्यामुळे तसेच डोळ्यात थबकून राहिलेले
त्या दोन डोळ्यांसाठी किमान तू हरायला नको होतसं...

फेडरर खरेच तू जिंकायला हवं होतंस, त्या दोन डोळ्यांसाठी तरी.......

(लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने रॉजर फेडररला हरवून गोल्ड जिंकल्यानंतर)