बुधवार, ३० जून, २०१०

पाण्याचा थेंब

सकाळपासून पावसाची रिपरिप थांबली नव्हती. तिच्या अंगावरची खोळ केव्हाच भिजून ती आता गळू लागली होती. डोक्‍यापासून ती चिंब भिजली होती... तशातच तिनं घराला जवळ केलं. अंगावरची ओली साडी तशीच ठेवून ती गोठ्यात शिरली आणि धारा काढायला सुरवात केली. आज डेअरीला दूध घातले नाही तर उद्याची मीठभाकर मिळणार नाही याची तिला जाणीव होती. तिने पटापट धारा आटोपल्या. डेअरीला दूध घातलं आणि तशीच ती घरी परतली. अंगावरची साडी आता सुकायला लागली होती. चुलीच्या धगीत ती आणखी सुकेल म्हणून तिनं निखाऱ्यावर फुंकर मारली आणि शेणी आत सारली. आगीने पेट घेतल्यावर तिनं साडीचा पदर जरा त्यावर सुकवायचा प्रयत्न केला आणि मिश्रीचं बोट तोंडात कोंबलं. तिचं दहा वर्षांचं पोर शाळेतनं पळत घरात आलं. चिखलाने माखलेल्या कपड्यांसहच ते तिला जाऊन बिलगलं. तिनं त्याला तसंच बाजूला सारलं. ते थोडं हिरमुसलं; पण लगेच बाहेर खेळायला पळालं. तिनं चुलीवर चहाचं आदण ठेवलं आणि परत त्याला तिनं हाक मारली. ते मघाच्याच वेगानं परत आत आलं, कपातला चहा त्यानं बशीत घालून भुरकायला सुरवात केली. चहा भुरकून झाल्यावर त्याला काही तरी आठवलं, मग म्हणालं, ""आये, यंदा चंद्री याली तरी च्या काळाच की.'' ती काही बोलली नाही. तसलाच काळा चहा तीही प्यायली आणि मालकिणीच्या घरी भांड्याला गेली. भांडी घासता घासता मालकीण मोठ्यानं ओरडताना तिनं ऐकलं. काय झालं म्हणून ती आत आली तर तिच्या पोराएवढंच मालकिणीचं पोरगं व्हॉं करून रडत होतं आणि त्याची आई त्याला जबरदस्तीनं दूध पाजत होती. निम्मे दूध खाली सांडत होतं. ते नको नको म्हणत होतं, पाय आपटत होतं. ती तशीच घरी आली. दारात तिचं पोर खेळत होतं. तिला त्याला जाऊन मिठी मारावी वाटली; पण धीर झाला नाही. तिच्या डोळ्यातून एकच थेंब आला; पण त्याचा प्रवाह दिवसभर पाऊस पडून भरलेल्या नाल्यापेक्षा जास्त होता.