शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २००९

प्रचार

आमक्‍या, तमक्‍याला मत द्या, तेच तुमचा विकास करु शकतात, उठा प्रगतीचा मार्ग धरा.... अशा घोषणा देत एक गाडी येत होती.... घोषणांचा आवाज जसा टिपेला पोहचला तसे त्याने तोंडावरील टॉवेल बाजुला सारला. डोळे उघडले आणि समोरच्या रस्त्याकडे बघितले...... गाडी आली घोषणा देत निघून गेली.... आवाज क्षीण झाला तसे त्याने बाजुला केलेला टॉवेल पुन्हा तोंडावर घेतला आपला डावा हात मानेखाली घालत तो कुशीवर वळला... डोळे मिटले आणि पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करु लागला....पण त्याला त्यात यश आले नाही.... त्याने मघाशी आलेल्या गाडीला आणि ज्या नेत्याचा प्रचार ती गाडी करत होती त्या नेत्यालाही जोराची शिवी हासडली......दोन्ही हात वर करुन त्याने जोरात आळस झटकला आणि त्याच वडाच्या झाडाला टेकून बसला.... कडेला पडलेली एक काठी त्याने हातात घेतली.... ती मोडली... त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि फेकून दिले.... समोर पडलेला दगड उचलून थोडी माती खरवटायचा प्रयत्न केला पण त्यातही त्याला मजा आली नाही.... मग तो उठला आणि रस्त्याच्या कडेला जावून बसला.... डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजुला लांब लांबवर कोणी नव्हतं. मग त्याने स्वतःलाच एक जोरात शिवी हासडली आणि तिथल्या दगडावर तो बसला. मळलेला शर्ट आणि पॅंट बघून त्याने किमान पंधरा दिवसांत कपडे बदललेले नाहीत हे सांगायला कोणा जोतिष्याची गरज नव्हती. विस्कटलेल्या केसांना माती लागून लागून तांबडा रंग आलेला....अशा अवस्थेत तो तिथेच बसून राहिला. इतक्‍यात पुन्हा एक गाडी आली याही गाडीवर मघासारखाच एक स्पिकर होता... पण त्यातून घोषणा येत नव्हत्या... ती गाडी अगदी त्याच्या जवळ आली आणि थांबली....चालकाने कुठल्यातरी गावाचा पत्ता विचारला... त्यानेही तो सांगितला... चालकाने गाडी सुरु केली आणि तो थोडा पुढे गेला...आणि थांबला.... त्याने गाडी मागे घेतली आणि पुन्हा त्याच्याजवळ लावली... त्याला काही कळेना...
तुला वाचायला येतं...चालकाने विचारलं...
येतं की.....त्याने सरळ साधं उत्तर दिलं...
मग हे वाचून दाखव.... चालकाने एक चिटोरी त्याच्यापुढे ठेवली....
मघाशी जी गाडी घोषणा देत गेली होती त्याच या घोषणा होत्या.... त्याने जोरात त्या घोषणा वाचल्या....
चालकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले....
एकवेळचं जेवण आणि शंभर रुपये देईन, घोषणा द्यायला येतोस का? त्याने विचारलं....
याच्याकडे नकार द्यायला कारण नव्हतं, तो गाडीत बसला..... माईक हातात घेत त्याने उच्चरवात घोषणा द्यायला सुरवात केली...
एक एक गाव करत ते त्या नेत्याची सभा होती तिथे आले.... सभा अजून सुरु व्हायची होती... इतक्‍यात त्याच्या हातात आणखी एक कागद आला... त्याने तो सफाईदारपणे वाचला.....नेत्याने भाषण केले... पण लोकांच्या टाळ्या काही पडल्या नाहीत.
सभा झाली... आलेले लोक परतले.
नेत्याच्या गाड्यामागे मघाच्या चालकाने आपली गाडी लावली... थोडे अंतर गेल्यावर नेत्याने आपली गाडी थांबवली... तो उतरला मागे थांबलेल्या यांच्या गाडीकडे आला.... त्याने जोरात विचारले मघाशी गाडीतून भाषण कोण करत होता... चालकाने त्याच्याकडे बोट दाखविले.... नेत्याने त्याच्याकडे बघितलं आणि नाकं मुरडलं.... कुठल्या गावचा... त्यानं गावचं नाव सांगितलं.... नाव.... त्यानं नाव सांगितलं....नेत्याचा चेहरा उजळला....त्याने आपल्या सहकाऱ्याला हाक मारली.... त्याच्याकडून काही पैसे घेतले... चालकाकडे देत काही पांढरे कपडे खरेदी करा आणि उद्या प्रचाराला या. असं सांगून तो नेता आपल्या गाडीत बसून निघून गेला.
चालकाने सांगितल्याप्रमाणे त्याला कपडे घेवून दिले...त्याला घरात सोडले... आणि निघून गेला.
दुसऱ्या दिवशी गाडी त्याला न्यायला आली.... तोही पांढरे कपडे घालून तयार होता.... त्याला एका सभेच्या ठिकाणी नेलं गेलं. नेत्याच्या सहकाऱ्याने त्याच्यासमोर एक कागद पुढे केला.... त्याने तो बघितला. त्यात नेत्याने केलेल्या विकासकामे होती... तो व्यासपीठावर चढला.... माईक त्याने हातात घेतला.... नेत्याच्या विकासकामांचा पाढा वाचता वाचता तो थांबला.... त्यात लिहले होते दहा हजार युवकांना नोकरी दिली.... त्याने व्यासपीठाकडे बघितले नेता खूष होऊन आपल्या केसांवर हात फिरवत होता... मग त्याने समोर बसलेल्या श्रोत्यांवर एक नजर फिरवली आणि खड्या आवाजात त्याने सांगितले याच नेत्यामुळे आज दहा हजार एक लोकांना रोजगार मिळाला... त्यातील एकावर त्याने उगाचच भर दिला.....