शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०

लाल

प्रार्थना संपली आणि सगळी मुले खाली बसली....वर्गशिक्षक एक एक विद्यार्थ्याचे नाव घेऊन हजेरीपट मांडत होते.....
तिचं नाव घेतल्यावर दारातूनच उत्तर आलं
""हजर''
शिक्षकांनी नाकावर आलेल्या चष्म्यावरुन तिच्याकडे बघितलं आणि डोळ्यांनीच तिथंच थांब म्हणून दटावलं.
सगळ्या विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन झाल्यावर शिक्षकांनी तिला बोलावलं...
हं या आत. कुठे मैदान मारुन आलात?.....अर्थात या शब्दांचा तिच्यावर काही परिणाम होणार नसल्याचे त्यांना माहित होतं.
ती काही बोलली नाही, गप्प उभी राहिली... खूप रडली असावी असे तिचे डोळे लाल असायचे....त्यांनी तिला एकदा विचारलेही होते; पण तिने काही सांगितले नाही.....तशी ती कधीच काही बोलायची नाही... ताठ मानेने डोळ्यात डोळे घालून उभी राहायची... तिचे ते लालभडक डोळे बघुन त्यांना त्यांची भीती वाटायची... त्या डोळ्यांत त्यांना कधी पाणी दिसलेच नाही...
ती शाळेला रोजच उशिरा यायची... रोज ते शिक्षक तिला त्याचे कारण विचारायचे पण ती बोलायची नाही.... तिच्या उशिरा येण्यापेक्षा ती न बोलता गप्प बसायची याचाच त्यांना राग यायचा....
आज जर कारण सांगितले नाहीस तर वर्गात बसू देणार नाही... तुझ्या आई-बाबाला घेऊन ये..... शिक्षकांनी फर्मावलं.
तरीही ती गप्प उभी राहिली... तिचा तो गप्पपणा शिक्षकांना बोचू लागला.... शिक्षा करावी तर दहावीच्या वर्गातील मुलीला शिक्षा तरी काय करणार.... त्यांना काही सुचेना... पण आज सोक्षमोक्ष लावायचाच याचा निर्धार त्यांनी केला.
"चल ! मुख्याध्यापकांनी जर तुला बसू दिलं तर बस वर्गात...' शिक्षक मुख्याध्यापकांच्या केबीनच्या दिशेने चालू लागले... ती त्यांच्या मागे....
मुख्याध्यापकांची केबीन ...छे! मारुतीच्या मंदिरात एका बाजुने दानात मिळालेली तिजोरी आणि दुसऱ्या बाजुला असलेल्या कट्ट्याचा आधार घेऊन केलेली छोटी जागा म्हणजे केबीन.... शाळाच चार घरांत भरायची तर केबीन कुठली असणार....
त्या दहा बारा गावांत एकच शाळा... वाड्या-पाड्यातील पोरं यायची... कधीही यायची... कधीही जायची.... शिक्षकांना त्याची सवयच झाली होती.... पण इथे फरक होता... पोरांना उशीर का म्हणून विचारलं की काही-बाही उत्तर सांगायची.... म्हस चारायला गेलतो, आई गावाला गिलीया, बाबा आजारी हाय... काहीही उत्तरं यायची पण उत्तरं यायची पण ही मुलगी काहीच उत्तर द्यायची नाही....
तसे ते शिक्षक नवीनच, इथल्या पोरांची त्यांना भाषाच कळायची नाही.. कधी कधी ते चिडायचे...पण पोरंच त्यांच्या भाषेला हसत राहायची... ते तिला घेऊन मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले...
मुख्याध्यापक.... ते कधी असत कधी नसत. असले तरी त्यांचे शाळेकडे लक्ष कमीच... कुठल्या तरी चळवळीत ते काम करायचे... त्याच्या मासिकाचे संपादनाचेच काम मोठे...ते काही तरी पांढऱ्यावर काळे करत बसले होते....
सर, ही मुलगी रोज शाळेला उशिरा येते आणि कारण विचारले तरी बोलतही नाही....
मुख्याध्यापकांनी एकदा तिच्याकडे बघितलं.. ती खाली मान घालून गप्प उभी होती....
अभ्यास कसा करुन राहिला, सर? मुख्याध्यापकांनी मान वर न काढताच शिक्षकांना प्रश्‍न केला.
चांगला आहे... म्हणजे दहावीला जर मंडळाने नंबर काढला तर हीचाच नंबर येईल... शिक्षकांनी सांगितलं...
मग येऊ द्या की.... , मुख्याध्यापकांनी तिला काहीच न विचारता सुनावलेला हा निर्णय ऐकून शिक्षकांना काय बोलावे सुचेना....
ते वर्गात आले... आज त्यांना शिकविण्याचा मूडच राहिला नाही... सरांनी असा का निर्णय दिला असेल... तिला बोलतं करण्याचा प्रश्‍नच नव्हता....
तिच्या उशिरा येण्याचा प्रश्‍न नव्हताच, पण ती उशिरा का येते याचे कारण कधीच सांगत नव्हती हाच प्रश्‍न होता...ते वर्गावर आले पण त्यांचे शिकविण्याकडे लक्ष लागले नाही....
पुढच्या जवळपास प्रत्येक दिवशी ती उशिराच यायची.... एकदा त्यांनी तिला सरळ सांगून टाकलं तू मला विचारत जाऊ नकोस आलीस की सरळ वर्गात येऊन बस.... पण तरीही ती उशिरा आली की पहिली एक दोन मिनीटे त्यांना त्रास व्हायचाच....
दहावीची परीक्षा झाली...... निकाल लागला....अपेक्षेप्रमाणे ती शाळेत पहिली आली होतीच.... कदाचीत ती मंडळातही पहिलीच असावी... सगळ्या शिक्षकांनी तिचे तोंडभरुन कौतुक केलं... पण ती बोलली नाही...
त्या शिक्षकांनीही ती शाळा सोडली... पुन्हा धकाधकीच्या प्रवाहात स्वतःला वाहतं केलं... इथं चकचकीत बुट आणि टाय घातलेली पोरं बघितली की त्यांचा त्यांना हेवा वाटायचा... एखादा विद्यार्थी उशिरा आला की मग त्यांना ती आठवायची...त्याचबरोबर तिचे ते लाल डोळे आठवायचे. ती मुलगी त्यांच्या डोक्‍यातून काही गेली नाही....एकदा असेच नवीन कुठले मासीक आले म्हणून ते बघत होते.... मासीक चाळता चाळता त्यांची नजर त्या फोटोवर गेली... तीच ती...त्यांची उत्सुकता ताणली... त्यावेळी ते ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा तो लेख होता.....
"" वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच तिने या लढाईत भाग घेतला. शालेय शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं पण व्यवस्थेला संपवायचा विडाच तिने उचलला. खरे तर तिने पेनाने लढाई लढावी, असेच मला वाटायचे पण तिने तो मार्ग नाकारला आणि पेनाऐवजी तिने हातात बंदूक घेतली...या दिशेने पाऊल टाकल्यानंतर येणारा शेवट निश्‍चित होता... पण, ती शेवटपर्यंत डळमळली नाही...'' लेख खूपच मोठा होता... पण त्यांना पुढे वाचता आले नाही.... त्या लालभडक डोळ्यांना आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले.....

जांभळा

ट्रंकेतील तो जांभळा ड्रेस हलकेच काढतानाही त्याचा कडेचा पत्रा लागलाच... जीर्ण झालेल्या त्या कपड्याला तो पत्र्याचा स्पर्श पेलवला नाही, भाजी चिरताना नकळत विळीची धार बोटांना लागावी, अशी ती कळकळली.... किती वर्षे झाली ... बारा तरी होऊन गेली असावीत.... अकरावी परीक्षा पास झाल्यावर हट्‌टाने बाबांकडून तो ड्रेस मागून घेतला होता.... दुकानाच्या काचेतून दिसणारा तो मोरपंखी जांभळा ड्रेस कितीतरी दिवस तिच्या डोळ्यात घर करुन राहिला होता...तोच ड्रेस घ्यायचा म्हणून ती हट्‌टून बसली होती....घागरा चोली घालून काय तमाशा करायचा आहे काय? असं बाबा म्हणाले खरे पण त्यांचा हा राग लटका होता..
""एकच तर मुलगी आहे तिचा हट्‌ट नाही, पुरवायचा तर मग कोणाचा हट्‌ट पुरवायचा.''
आईच्या या वाक्‍यापुढे बाबांचं काहीच चालायचं नाही. त्या तलम मोरपंखी जांभळ्या कपड्याचा पहिला स्पर्श झाल्यावर असंख्य मोर मनात नाच करत होते....
त्यावर्षी दांडिया खेळताना उगाचच आपण कोणीतरी वेगळे आहोत असे वाटून गेलं. कितीजणींनी त्या ड्रेसबद्दल विचारलं होतं....
""असे गडद रंग तुला फार शोभून दिसतात.''
शेजारच्या काकूंनी केलेली ती स्तुती आठवली तरी आजही अंगावर मुठभर मांस चढते....
तिला त्या ड्रेसविषयीच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या.... कितीकाळ ती त्या ड्रेसला कुरवाळत बसली...
""उठा ! पब्लीकला जमा करायचंय. आजच्या खेळाला चार पैसं मिळालं न्हायी तर जेवायला घावणार न्हायी.... ''
तिचा नवरा तिच्यावर डाफरत होता.... तो सायकल सर्कस करायचा... पण त्याच्या खेळाला माणसं कुठं जमायची म्हणून तिला आधी नाचवायचा....
त्याच्यासोबत पळून आली त्यावेळी ती अवघी आठरा वर्षांची होती. घरात बाबांना विचारायची हिम्मतच झाली नाही.... त्याच्याही घरात विरोधच....
""कुठेही राहू, मीठ भाकर खाऊ'', तो सांगायचा... तिलाही ते पटायचं....दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला... पळण्याचा आधी निर्णय घेतला आणि नंतर तो नशीबाचाच भाग बनला... पळणं मागेच लागलं....लग्न होऊन सहा महिने झाले नसतील... तोच एका रात्री तिचा नवरा भीत भीत घरात शिरला....गेल्या चार-पाच महिन्यात तो कमालीचा दारु प्यायला लागला होता... दुकानदाराशी उदारीवरुन भांडण झालं, हातातील फुटलेली बाटली तशीच त्याच्या पोटात खुपसली....तिला समजायचं ते समजलं... हातात जे लागेल ते घेतलं आणि पळायला सुरवात केली... एक गाव झालं की दुसरं... दुसरं झालं की तिसरं....प्रत्येक गावात जाऊन रोजगार कुठे मागायचा, म्हणून मग सायकल सर्कस सुरु केली.... तो सायकलीवर कसरती करायचा.... पण पब्लीक जमा व्हायचं नाही....म्हणून मग तिच्या नवऱ्याने तिला नाचायला लावलं....घरातनं बाहेर पडताना घेतलेला तो ड्रेस तेवढीच तिची संपत्ती.... तो ड्रेस घालून ती रस्त्यावर उतरली की भल्या भल्यांच्या नजरा तिच्यावर खिळायच्या... त्या लोकांची लोचट नजर बघून तिला असह्य व्हायचं पण इलाज चालायचा नाही....चार पैसे हाताशी लागायचे पोटाची खळगी भरायची आणि पुढच्या गावचा रस्ता धरायचा....ज्याचा हात धरुन ती पळून आली होती त्याच्यासाठी पळणं एवढंच तिच्या नशीबी उरलं होतं...
पाठित एक जोराचा मुक्‍का मारुन त्यानं तिला जोरात शिवी हासडली, तशी ती भानावर आली.
"चल बाहेर''
तो म्हणाला आणि तसाच मागे वळला..
तिने हातातल्या त्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसकडे बघितलं...त्याचा रंग आता पार फिका पडला होता....
तिनं घागरा, चोली घातली आणि रस्त्यावर येण्यासाठी दारात उभी राहिली.... तिचा नवरा मोठ-मोठ्याने ओरडत होता... तमाशा देखो- तमाशा देखो....
नवऱ्याचे ते शब्द ऐकून बांबाचे शब्द तिला आठवले....घागरा चोली घालून काय तमाशा करायचाय....ती अस्वस्थ झाली...
मघाशी ट्रंकेतून बाहेर काढताना तो ड्रेस दंडावरच फाटला होता.... लोक त्या फाटलेल्या भागाकडेच बघत राहाणार...तिला स्वतःचीच किळस आली...आता नाचलं की पैसे मिळणार आणि त्याच पैशानं हा दारु पिणार आणि रात्री पुन्हा मारणार.... ती स्वतःशीच पुटपुटली.... त्या जांभळ्या ड्रेसचा रंग जसा फिका पडला होता....तसंच तिच्या नवऱ्याविषयी वाटणाऱ्या भावनांच्या आता चिंध्या झाल्या होत्या... त्याचा रंग तर केव्हाच उडून गेला होता...तीची ही जाणीव आणखी तीव्र झाली... तिने अंगावरचा तो ड्रेस काढला, त्या ड्रेसकडे पुन्हा एकदा तिने पाहिले... त्या विटलेल्या जांभळ्या ड्रेसमधुन असंख्य मोर तिला खुणावत होते.... तो ड्रेस तिने ट्रंकेत ठेवला.....तिचा नवरा बाहेर ओरडत होता..... तीने ट्रंक उचललली आणि ती पळू लागली... यावेळी तिच्या नशिबापासून नाही तर नशीबाच्या शोधात डोळयात नाचणारे जांभळे मोर घेऊन.....

निळा.....

या समुद्रात आणि मनात तसे बरेच साम्य.... समुद्र अथांग आणि मनाचाही कोठे थांग लागतो......दोघांनाही भरती-ओहटी येते... समुद्रालाही मर्यादा पाळायला लागतात आणि मनालाही.... दोघांनीही मर्यादा सोडली की अनर्थच.... मग मागे उरतो केवळ कचारा, गाळ, असह्य करुन सोडणारा कुजलेला कुबट वास ... एक लाट चटकन आली तिने मघाशी ओढलेल्या रेघोट्या घेऊन निघून गेली.... मनावरचे आठवणींचे ओरखडे असे मिटले असते तर.... पुन्हा डोक्‍यात विचारांनी गलका सुरु केला.... एका विचारातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा.... पण ही साखळी कुठे आहे... एका कडीतून दुसऱ्या कडीत घेवून जाणारा विचार हवा... पण तसे होत नाही.... सगळेच आपली मतं मांडतात आणि मग गलका होतो.... डोकं भणभणतं....पण या विचारातून बाहेर कसं पडायचं.... एक विचार मारायला दुसरा विचार डोक्‍यात आणायचा.... पण पहिल्याने ती जागा सोडायला तर हवी. ती जागा सोडली तर पुढे जाता येतं पण पहिल्या विचाराने जागाच सोडली नाही तर... तर मग साचलेपण येतं..... विचारांच्या गलक्‍याचा आवाज जसा टीपेला पोहचला तसं तिचं डोकं भणभणायला लागलं.... तिची चलबिचल वाढली. ती थरथरली.... सुरकुतलेली तिची गोरी कातडी आणखी पांढरी पडू लागली....
चला आत, वारा सुटायला लागलाय....तिच्यासोबत आलेल्या त्या मुलीने तिच्या आंगावरची शाल सरळ केली. आणि तिला उठण्यासाठी हात दिला... तिने तो हात नाकारला... स्वतःच उठण्याचा प्रयत्न केला... पण अशक्‍तपणाने तो फसला.... ती मुलगी सरळ पुढे झाली तिने दोन्ही हातांनी तिच्या हातांना धरलं आणि तिला उठण्यास मदत केली. यावेळी मात्र तिने कोणताच प्रतिकार केला नाही.... तिच्या खांद्याच्या आधाराने ती चालू लागली... समुद्रावरची तिची दृष्टी तशी खिळून होती....
ती राहात होती त्या खोलीतूनही समुद्र दिसायचा....समुद्र पाहायचा तिला नादच लागला होता.....ती इथे आल्यापासून ती समुद्राला डोळ्यात साठवत होती...ती खिडकीत बसुन राहिली.... काळोखाचा पडदा गडद झाला, तशी ती उठली... जेवणावरची वासनाच उठली होती... तरी तिने दोन घास पाण्याबरोबर घशात कोंबले...जेवणापेक्षा तिला दिल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्याच जास्त होत्या.... रोज गोळ्या घेताना तिला वाटायचं अजून कशी जगण्याची वासना टिकून आहे....कधी कधी गोळ्या घ्यायची इच्छा नसली की तिचा नवरा तिला समजावयाचा... गेलेल्या माणसांचा विचार करु नको....आपल्याला जगलं पाहिजे, माझ्यासाठी तरी तू जग.... मग तासन्‌ तास ती लेकरांच्या फोटाखाली आसवं ढाळीत बसायची.... नवराच मग घास भरवायचा, गोळ्या द्यायचा..... पण ते गेल्यापासून तिला काहीच सुचेना....काही काळ तिने गोळ्या नाकारुन बघितल्याही ....मग पाय बांधून, हात बांधून गोळ्या चारणं सुरु झालं....मग तिनं गोळ्या नाकारणं बंद केलं..
दुसऱ्या दिवशीही ती किनाऱ्यावर बसून राहिली.... समुद्राची निळाई तिच्या निळ्या डोळ्यात साठत राहिली... या समुद्राचा रंगही निळा आणि आकाशाचाही रंग निळाच.... किती दिवसांनी ती आकाशाकडे बघत होती... दिवस छे किती वर्ष झाली आकाशाकडे बघून... रोज दिसाणारी ही निळाई डोळ्यात का साठत नव्हती....तिचा नवरा तिला म्हणायचा... तुझ्या डोळ्यात मला काहीच दिसत नाही.... या निळ्या रंगाचा अर्थ काय?, ती काही बोलायची नाही.... समोरचा सागरही तसाच निळा तिच्या डोळ्यांसारखा. या आकाशाची निळाईच या सागरात प्रतिबिंबित होते.... तो निर्वाताचा, पोकळीचा रंगच खरा..... मग तिला जाणवलं आपले डोळेही असेच निळे.... पोकळीचा रंग ल्यायलेले... आता पोकळीच तर उरली बाकी काहीच नाही... आठवणीच्या पापुद्य्रात केवळ पोकळी.... अंनतांचा ध्यास घेणारी.... ती उठली.... अडखळत ती घरात शिरली.... होत्या नव्हत्या त्या गोळ्या तिने घेतल्या..... सकाळी कोणीतरी दार उघडलं.... आजाराला कंटाळून आत्महत्या असा पोलिस रिपोर्ट आला....एक पोकळी दुसऱ्या पोकळीत विलीन झाली होती...

पिवळा......

कितीवेळ गेला ठाऊक नाही. पण या काळात ढगांनी किती आकार बदलले, जशी सुर्याची किरणे तिरपी होत गेली तसा रंगही बदलत गेला. कापसासारखा मऊ मुलायम रंग... एखाद्या विरक्‍त माणसासारखा... सगळ्या इच्छा अर्पून रिता झाल्यासारखा... नाही तरी तो रिता झालेलाच असतो की... ओंजळ लहान आहे की मोठी, काही बघत नाही... देत राहतो, बरसत राहतो. जेवढं आहे ते सगळं देतो म्हणूनच त्याचा तो पांढरा रंग... मग येणारी पिवळसर छटा... विरक्‍तीतून जाणिवांच्या दिशेने नेणारी... या रंगाचा अर्थ लावायचा तरी कसा?... कारण अगोदर असणारा पांढरा हा विरक्‍तीचाच आणि नंतरचा भगवा हाही विरक्‍तीचा! अर्थात भगवा पुढे मोक्षाच्या दिशेने जाणारा... पहिल्या पांढऱ्या रंगात मोक्षाचीही अभिलाषा नाही. तिथे फक्‍त देणे आहे. दिल्यानंतरचे समाधान त्यात ओतप्रोत आहे. त्यामुळे तिथे कुठलेच इच्छेचे रंग दिसत नाहीत. दिसतो तो फक्‍त पांढरा शुभ्र रंग... इच्छा आकांक्षांना मागे ठेवलेला पांढरा रंग.... नंतरच्या केशरी किंवा भगव्या रंगाचा अर्थही विरक्‍तीच्या दिशेने जाणाराच पण इथे त्याला मोक्षाची इच्छा आहे... म्हणूनच मघाशी कापसाच्या पुंजक्‍यासारखा पांढरा शुभ्र दिसणारा ढग आता भगवा रंग घेतल्यानंतर विरळ होतो आहे... त्याला मोक्षाची, विरुन जाण्याची फार घाई झाल्याचे जाणवते... पण या मधला जो पिवळा रंग आहे त्याचा अर्थ काय लावायचा?... समाधानाच्या समाधीतून जागे होऊन मोक्षाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेचा हा रंग... विचारांची तंद्री सुटली तसे सगळ्या परिसराचा ताबा आंधाराने घेतल्याचे त्याला जाणवले... तो उठला... त्याने देवासमोर दिवा लावला... ती पिवळी ज्योत फडफडली आणि पुन्हा त्याच्या मनाने त्या पिवळ्या रंगाचा शोध सुरु केला... काय असेल याचा अर्थ... ही ज्योतही मोक्षाच्या दिशेनेच चाललेली... कापसाचा पांढरा रंग हरवून ती ही याच वाटेने चाललेली... मोक्षाच्या इच्छेचाच रंग पिवळा... तो अस्वस्
थ झाला... अंगाला त्याच्या घाम सुटला... आयुष्यभर ज्याच्यामागे धावलो तो साक्षात्कार वयाच्या उत्तरार्धात असाही मिळू शकतो का? त्यालाच प्रश्‍न पडला! सगळ्या इच्छा, आकांक्षा मागे ठेवून एकाकीपणाचे जीवन आपण पसंत केले... अगोदर पसंत केले मग ते समाजाने लादले... कपड्याचे रंग बदलले... पांढऱ्याशुभ्र धोतराचे रुपांतर मग भगव्या वस्त्रात केव्हा झाले ते त्यालाही कळले नाही... मग तो रंग चिकटला तो चिकटलाच... पण या भगव्यापेक्षाही त्याला आता पिवळा रंग फार जवळचा वाटू लागला... तो पिवळा रंग त्याच्या डोळ्यात साकाळत राहिला... सकाळी कोणीतरी कडी वाजवली..... दार उघडले नाही... प्रतिसाद आला नाही... महाराजऽऽऽऽऽऽऽ... शिष्याने टाहो फोडला... त्यांचा पिवळा पडलेला देह बघून कोणीतरी म्हणाले, महाराजांना काविळीने गिळले... त्यांना काय माहित, महाराज मोक्षाच्या वाटेवर निघून गेले होते...