शनिवार, २८ एप्रिल, २०१२

सुटी

किक्रेट खेळणाऱ्या त्या मुलांकडे तो एकटक बघत होता. कोणी चेंडू टाकत होता, कोणी बॅटने तो फटकावत होता. ती दहा बारा पोरं आपल्या खेळात रंगून गेली होती. ते. हातातील बोचकं सावरत ते सात-आठ वर्षांचं पोरगं त्या खेळणाऱ्या पोरांकडे बघत होतं. त्यांच्यात दंगा चालू होता. भांडणं होत होती.. जिंकणं-हरणं चालू होत. एकमेकांच्या उरावर बसणं चालू होतं. ते पोरगं आपल्या बोचक्‍याला सावरत शेजारच्याच गडग्यावर बसलं. हलकेच त्याने बोचकं बाजुला ठेवलं. ते ठेवताना त्यातली एक फाटकी-तुटकी बाहुली खाली पडली. मघाशी कचराकुंडी चाचपताना सापडलेली ती कापडी बाहुली त्याने हलकेच त्या बोचक्‍यात कोंबली होती.
गोट्या...
आईच्या चौथ्या हाकेनंतर त्या क्रिकेट खेळणाऱ्यापैकी बॅट घेतलेला मुलगा थोडा चलबिचल झाला. त्याने तरीही डाव तसाच चालू ठेवला. बोचकं सांभळणाऱ्या त्या पोरानं हाकेच्या दिशेकडे बघितलं. मग त्या पोरांकडे बघत राहिलं. त्या पोराची आई त्याला पुन्हा-पुन्हा हाक मारत होती. आणि ते मात्र आपल्या खेळांत गुंगून गेलं होतं. पोरांचा गोंधळ उडाला होता. चिडा-चिडी दंगामस्ती सुरु होती. कोणी त्यांना हाक मारते आहे याकडे त्यांचं लक्षच नव्हते. एवढ्यात त्या बॅट धरलेल्या पोरानं चेंडू टोलावला तो त्या बोचकं घेतलेल्या पोराच्या पायाशी आला. त्याला तो चेंडू आवडला. तो चेंडू उचलण्यासाठी ते खाली वाकलं पण इतक्‍यात दुसरं एक पोरगं तिथं आलं त्याने तो चेंडू उचलला आणि जोरात फेकला.
त्या पोरांत जावं, तो चेंडू हातात घ्यावा, बॅट घुमवावी.. असं त्या बोचकं घेतलेल्या पोराला वाटलं पण त्याने तो विचार सोडून दिला. त्या पोरांइतके चांगले कपडे त्याच्याकडं नव्हते, दिवसभर उन्हात काम केल्यानं अंग सगळं घामेजून गेलं होतं. त्यातच कचऱ्यात शोधा-शोध करुन त्याची सगळी घाण अंगाला लागली होती. अंग मळलं होतं, कपडे मळके होते. त्या पोरांच्या तुलनेत तो खूपच घाणेरडा दिसत होता. त्यालाच त्याची लाज वाटत होती. त्या टकटकीत मुलांत कसं जायचं? म्हणून मग ते गप्पच बसलं.
पुन्हा त्या मुलाच्या आईची हाक ऐकू आली.. तरी ते पोर खेळत राहिलं.. आईची हाक जवळ-जवळ येऊ लागली.. ती जशी जवळ येऊ लागली तशी पोरांची चलबिचल वाढली..
काकू आली रे, स्टंप, बॅट घेऊन पळा... एकाने जोरात आरोळी ठोकली, तशी सगळी पोरं पटपट गोळा झाली.. सगळ्या वस्तू पोरांनी गोळा केल्या आणि त्यांनी धुम ठोकली. बॅट घेतलेलं पोर मात्र शूर शिपायासारखं तिथेच टिकून राहिलं. त्या बोचकेवाल्या पोराला त्याचं आश्‍चर्य वाटलं..
आता त्याची आई त्याच्याजवळ आली होती. तिने त्याला हलकेच टपली मारली.
किती हाका मारायच्या रे, सुटी लागली म्हणून किती वेळ खेळायचे... त्याची आई त्याला दटावत होती.. ती माय-लेक बोलत बोलत त्याच्यासमोरुन गेली. समोरुन जाताना त्या पोराच्या आईने त्याच्याकडे बघितलं, मग त्याच्या बोचक्‍याकडे आणि म्हणाली, बघ तुझ्यापेक्षा किती लहान आहे, पण तरीही सुटीत बघ कसा आईला मदत करतो ते. आता तुही सुटीत काम कर. ती माय-लेक अंधारात निघून गेली.
त्या पोराने बोचकं उचललं. घर जवळ करायला हवं होतं. घर कसलं, कालच तर त्या माळावर त्याच्या आई-बाबांनी पालं टाकलं होतं. हे गाव अजून नवं होतं. कळायला लागल्यापासून किती गावं बदलली हेही आता आठवेनासं झालं आहे. अंधारातच तो आपल्या पालांकडं वळला. पोटात भूक होतीच पण त्यापेक्षा मनात खूप विचार होते. त्या पोरांनी टोलवलेले चेंडू त्याच्या डोक्‍यात टप्पे खात होते. ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्या पोराची आई आणि ते पोरंग यांचं बोलणं त्याच्या मनात कोरुन गेलं होतं. पालांत शिरल्या शिरल्या त्यानं बोचक्‍यातील बाहुली काढली आणि आपल्या लहान बहिणीच्या हातात दिली. आई चुलीला लाकूड लावत होती. त्यानं ते बोचकं बाहेर ठेवलं आणि ते आईकडे गेलं.. आईकडे सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे असतात याची त्याला खात्री होती. त्यानं हलकेच आईच्या गळ्यात हात घातला, गालाला गाल लावला आणि विचारलं...
माये, सुटी म्हणजे काय गं?

प्रिय,

खूप दिवसांनी जुने कपाट आवरायला घेतले होते. वर्तमानपत्रातील काही कात्रणे, काही टिपण्या आणि पिवळे पडलेल्या पुष्कळश्‍या कागदांनी कपाट गच्च भरुन गेलं होतं. अर्धवट लिहिलेले.. रेघोट्या ओढलेले.. टाचण मारुन ठेवलेले....कोणी कथेच्या शेवटाच्या प्रतिक्षेत तर कोणी अगदीच एखादा शब्द लिहून ठेवून टाकल्यामुळे रुसलेले, तर काही पत्रे लिहून पूर्ण झालेली पण पत्त्याच्या शोधात... म्हटलं तर सगळा कचरा म्हटलं तर प्रत्येक कागद आणि कागद एक-एक जाणिव.. एक-एक भावना.. एकाच कपाटात कोंबून ठेवलेल्या.. काही दडवलेल्या... काही कागदांच्या ओझ्यामुळे दडपून गेलेल्या... मुक्‍या आणि बहिऱ्याही...खरे तर त्या मुक्‍या होत्या म्हणूनच तर त्या एकत्र राहात होत्या. एकमेकांच्या उरावर पडलेले काही पिवळे कागद मात्र आपल्याच भावविश्‍वात रमलेले होते. अंगाला माती लागल्यावर पैलवान कसे छाती काढून चालतात, तसेच अंगावरची धूळ अभिमानाने मिरवत होते. मी ती हलक्‍या हाताने झटकल्यावर उगाचच त्यांना राग आला की काय असे वाटून गेले. त्यातच एका कोपऱ्यात एक कागद सगळ्यांपेक्षा वेगळा होता. कोरा.. हा पण पिवळा पडला नव्हता. मी सहज तो उचलला... चटकन तो थरथरला असे वाटून गेलं. सगळ्या पिवळ्या कागदांत हा पांढरा शुभ्र कागद कुठून आला हे मलाही कळले नाही. कागद आणि पेन गोळा करण्याची मला तशी हौस आहेच, पण हा त्याखातर हा कागद नक्‍कीच आणला नव्हता. कारण तसे असते तर त्याच्यासारखे आणखी काही कागद तिथे असायला हवे होते. एकटाच.. त्याचा उजवा कोपरा थोडासा मुडपला होता.. तो मुडपलेला कोपरा मी हलकेच सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण वळल्याची खूण घट्‌ट उमटली होती. त्यावर तारीख 20 फेब्रुवारी असं लिहिलं होतं. आणि मग काहीच लिहिणं झालं नव्हतं.
20 फेब्रुवारी...तुला पत्र लिहायला घेतलं होतं. त्यासाठीच हा खास कागद आणला होता. पत्र लिहायचे ही कल्पनाच खूप मजेशीर आणि धाडसाची वाटत होती. अगदी उत्साहाने पत्र लिहायचा घाट घातला होता. त्यासाठी हा खास कागद आणला होता. त्याचे पाकिटही तितकेच खास आणले होते.अगदी चित्रपटात दाखवतात ना तसेच गुलाबी रंगाचे.. इथेच कपाटात कुठेतरी नक्‍की असेल. ते पाकिट मिळविण्यासाठी किती दुकाने फिरलो होतो देव जाणे. सायकल मारुन मारुन पाय थकले होते. त्यावर गुलाबाचे एक फुल चितारले होते. मस्त टपोरे फूल होते ते. तो कागद हातात घेतला आणि विचारांच्या माळेत दोरा ओवला गेला बघ.
किती दिवस.. किती वर्षे सरली तरी त्या कागदाचा शुभ्रपणा तसाच होता. अगदी पांढऱ्या ढगांसारखा. तो काळवंडला नाही की पिवळा पडला नाही. काळाच्या खुणा त्याच्या अंगावर जराही दिसत नाहीत, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमासारखं. काळाचा कधीच त्यावर परिणाम झाला नाही. अगदी व्हावा, अशी इच्छा बाळगुनही. खरेच हे पत्र पहिलं प्रेमपत्र होतं. अगदी कोरं. निखळ, निरपेक्ष आणि सर्वात महत्त्वाचं खूपच निरागस. खरं बोलणारं. आपल्या भावना न दडविणारे, त्याला कसलाच मुलामा न लावलेलं. तुझ्या डोळ्यांसारखं. तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझे डोळे बोलतातच, मी तुला कधी सांगितलं नाही. पण तुझे डोळे खूप बोलतात खूप..खूप.. आनंद झाला की किलकीले हसतात. रागावले की कोरडे पडतातत.. वेदना पापण्यांच्याच्या आड लपवतात.. आज या कागदाने पुन्हा डोळ्यांची आठवण करुन दिली. पापण्या.. कोरिव भूवया.. भूवयांमध्ये लावलेली टिकली.. कधी साधी..कधी चंद्रकोरीसारखी.. किती आठवणी आल्या दाटून.. आज हे पत्र त्याच कागदावर लिहितोय. पण बघ ना. मघाशी प्रिय शब्द लिहिताना त्यातील य चा पाय थोडा लांबलाच. शाई थोडी जास्तच खाली ओघळली.. हा कागद तसाच कोरा ठेवायला हवा होता. जरा माझं जास्तीच झालं.
तुझाच