सोमवार, १२ जुलै, २०१०

मोगरा!

प्रवेशाच्या रांगेत शेवटच्या क्रमांकावर तो होता. येता-जाता शिक्षक त्याच्याजवळ थांबत त्याची विचारपूस करत. बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षात तो वर्गात पहिला आला होता. भौतिक शास्त्रासारख्या विषयात तर त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्याच्याकडून महाविद्यालयाला खूपच अपेक्षा होत्या. त्याने विद्यापीठात प्रथम यावे अशी सगळ्या प्राध्यापकांची इच्छा होती. तो मात्र शांत होता. अगदी बुद्धासारखा. कोणी त्याला "जिनीअस,' तर कोणी "न्यूटन' म्हणून हाक मारत; पण त्याच्या चेहऱ्यावरची स्मिताची लकेर कधी बदलली नाही. शिक्षक त्याच्याजवळ येऊन थांबत. त्याची विचारपूस करत. त्याच्या खांद्यावर हात ठेवत आणि पुढे जात.
प्रवेशाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सगळेच गडबडीत होते. कार्यालयातील कर्मचारी आपल्या नेहमीच्या शैलीत समोरच्या विद्यार्थ्यांवर खेकसत होता. प्रत्येक अर्जातील चुका त्याला पृथ्वीगोलाएवढ्या दिसत आणि हर्क्‍युलससारखा त्याचा भार आपल्या खांद्यावर पडल्यासारखा त्याचा चेहरा होई.
"शेवटच्या दिवशीच तुम्हाला कशी जाग येते,' असा प्रश्‍न जवळपास प्रत्येकाला विचारत एक-एक अर्ज हातावेगळा करत होता. रांग कूर्मगतीने पुढे सरकत होती. रांगेत आता त्याच्या मागेही मुले आली होती. शनिवार असल्याने कार्यालय दुपारीच बंद होणार, हे निश्‍चित होते. त्यामुळे रांगेत चुळबूळ सुरू झाली. सोमवारी जादा शुल्क भरून अर्ज स्वीकारले जाणार होते. त्यामुळे मधल्या एक-दोन मुलांनी सोमवारचा पर्याय खुला करत काढता पाय घेतला.
बाराचे ठोके वाजले, तसे अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तासाभरात अर्ज भरला नाही, तर सोमवारी उगाच दोन-अडीचशे रुपयांना फटका बसणार होता. त्यातच ज्यांना दुसऱ्या वर्षाला कमी गुण होते त्यांना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या अटीमुळे आवडीचा विषय मिळतो की नाही, याचीही धाकधूक होतीच. त्यामुळेच रांगेत चुळबूळ वाढली. तो मात्र शांत होता. मघाशी त्याच्याशी बोलून पुढे गेलेल्या प्राध्यापकांपैकी एक जण त्याच्याकडेच येत होते. त्याच्यापाशी आले, त्याच्याकडे बघून त्यांनी स्मित केले आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या विद्यार्थ्याकडे बघत म्हणाले, ""इथं काय करतोय? रांगेतून आज तुला प्रवेश मिळणार नाही. चल.'' तो मुलगा त्यांच्या पाठीमागून गेला. जाताना त्याने आपल्या बरोबरच्या मुलांनाही नेले. तो मात्र शांत होता. बरोबर एक वाजता त्याचा क्रमांक आला. त्याने आपला अर्ज त्या कारकुनाच्या हातात दिला आणि घड्याळाने एकाचा टोला दिला. कारकुनाने एकदा त्याच्याकडे बघितले आणि दुसऱ्याच मिनिटात पावती हातात दिली. ""सरांना सांगितलं असतंस, तर लगेच काम झालं असतं. रांगेत उभं राहण्याची गरज नव्हती,'' तो भाबडेपणाने म्हणाला. त्याचे वडील त्याच कॉलेजमध्ये उपप्राचार्य होते.
""मोगऱ्याच्या वेलीला वाढण्यासाठी आधाराची गरज असते, फुलण्यासाठी नाही. त्यामुळे चालताना कुबड्या घेतल्या तेवढ्याच पुरेशा आहेत. आता आणखी कशाचाही कुबड्या नकोत मला,'' बाजूला ठेवलेली कुबडी उचलत तो शांतपणे म्हणाला आणि निघून गेला.
खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. का कोणास ठाऊक; पण कारकुनाला त्यातून मोगऱ्याचा गंध जाणवला.