मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

बघा जमलं तर थोडे ओझे उतरवून....

प्रति,
राजू परुळेकर यांना
आपण खूप मोठे पत्रकार, लेखक, सुत्रसंचालक, मुलाखतकार, राजकीय विश्‍लेषक आणि "विचारवंत' आहात हे माहित असूनही हा पत्राचा अट्‌टहास. विचारवंतांनी विचार मांडावेत आणि आमच्यासारख्या डोक्‍यात बटाटे असलेल्यांनी ते निमूटपणे मान्य करावेत हे सरळ साध सूत्र आजपर्यंत आम्ही (इथे आदरार्थी एकवचन नाही... आमची सगळी जमात या अर्थाने आहे.) पाळलं; पण काय होतं बटाट्याला जर ओलाव्याचा स्पर्श लागला तर त्यालाही मग कोंब फुटतात. तुमच्या लेखनाच्या सानिध्यात आल्यानंतर खूपदा आमच्या सडक्‍या डोक्‍यातील कुचक्‍या बटाट्यांना कोंब फुटले.. पण विचारवंतांनी विचार करायचा असतो, आपल्यासारख्यांनी नाही हा एकच विचार डोक्‍यात ठेवून हे कोंब आम्ही खूडत राहिलो. पण आता हे विचारांचे कोंब दसऱ्यात भोम वाढावे, तसे वाढल्याने ते तुमच्याच दारात आणून टाकत आहे एवढंच.
तुम्ही कोणाबद्दल लिहावे, काय लिहावे, काय उद्देशाने लिहावे हा तुमचा वैयक्‍तीक प्रश्‍न असला तरी "विचारवंतांनी' आणि लेखकांनी (कदाचित तुम्ही स्वतः ला विचारवंत मानत नसाल आणि त्यामुळे ही माझी जबाबदारी नाही असं म्हणू शकाल म्हणून लेखक हा शब्द. तुम्ही लेखक आहात हे तुम्हीच मान्य केले आहे.) मांडलेले विचार त्याचे वैयक्‍तीक राहात नाहीत. अर्थात ते वैयक्‍तीक राहू नयेत याचसाठी तर लिहलेले असतात हे आम्हाला (पुन्हा इथे आणि इथून पुढे सर्वच ठिकाणी आदरार्थी एकवचन नाही... आमची सगळी जमात या अर्थाने आहे.) ठावूक आहे, त्यामुळे त्या विचारांना आपलेच विचार समजून ते आम्ही आधी गिरवतो आणि नंतर मिरवतो. पण... विचारवंतांनी आपली मतं विचार म्हणून लादायला सुरवात केली त्यावेळेपासून आम्हाला या विचारवंतांनी खूप छळलंय. खास करुन राजकिय विश्‍लेषकांनी. राजकिय विश्‍लेषणाला आवश्‍यक असणारी माहिती आणि थोडे शब्दांचं पाठबळ असले की विचाराचे पंतग उडवायला खूप मोठे आकाश मिळते. आता तर इतके चॅनेल झाले आहेत की भाषण येणाऱ्या सगळ्यांना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे जो-तो उठतो आणि विश्‍लेषण करत सुटतो. पण यात तुम्ही खूप वेगळे होता. राजकीय विश्‍लेषणातही तुमचा समाजशास्त्राचा अभ्यास आम्हाला भारावून टाकत आला आहे. त्यामुळेच आमच्यामधील अनेक जण तुमचे चाहते झाले आहेत, पण अलिकडील तुमचे लिखाण आणि तुम्ही टीव्हीवर मांडत असलेले विचार ऐकले की आम्हाला आमचीच लाज वाटू लागली आहे. कधी काळी आम्ही साऱ्यांना आम्ही परुळेकरांचा आदर्श समोर ठेवलाय तुम्हीही ठेवा हे आग्रहाने सांगत होतो पण... पण सारंच मुसळ केरात गेलं.
मुळात तुमच्याबद्‌दल आम्हाला फारसा राग नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने विचार मांडायला लागलाय ते बघता तुम्ही प्रगतीचा सोपा मार्ग शोधलाय असाच वास येत आहे. खऱ्या-खोट्यात आम्ही जात नाही, पण जे समोर दिसतंय त्यावरुन तरी तुम्ही भविष्यात मनसेचे प्रवक्‍ते (किंवा उद्या सामनासदृश मनसेने एखादे वृत्तपत्र काढले तर त्याचे संपादक) वगैरे झालेले दिसला तर त्यात आश्‍चर्य वाटायला नको. उद्धव (मर्द) ठाकरे नावाचा जो काही लेख लिहिला आहे तो पूर्वदोष आणि मताभिन्नतेचा उत्कृष्ट नमुना आहे. लेखकाने वैयक्‍तीक विचार मांडताना त्याला एकतर वैयक्‍तीक रुप द्यावे किंवा जर त्याला सार्वमताचा रंग चढवायचा असेल तर सार्वमत काय आहे हे तपासून बघावे. वरवर बघता तुमचा लेख सार्वमत तपासून लिहिला आहे,असं वाटत असलं तरी तो फक्‍त शब्दखेळ आहे, आणि हा खेळ खेळताना समोरच्या वाचकालाही गृहीत धरले आहे. उद्धव ठाकरे चांगले की राज ठाकरे या वादात आम्हाला पडायचे नाही. आम्हाला दोघांबद्दलही तितकाच आदर आहे. पण राज ठाकरे यांच्या पाठिमागे संस्कृत नेता हे विशेषण लावताना जिथं तुमच्या लेखणीतील शाई (किंवा संगणकावरील कळ) फार सैल होते तिथेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लिहिताना वस्तूस्थितीचा उगाच टेंभा मिरवताय हे जाणवत राहातं. राज यांना चांगले म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहेच, ते चांगले आहेत याबद्दल आमच्याही मनात शंका नाही पण (परुळेकर तुम्ही चार वाक्‍य झाली की पण म्हणायला आम्हाला भाग पाडताय. पण म्हणायचं नाही असा "पण' करुनही) याचा अर्थ तुम्ही इतरांची उंची कमी दाखवून राज यांची उंची वाढवायचा प्रयत्न करताय. उद्धव ठाकरे यांना कमी लेखण्यासाठी त्यांनी उच्चारेले काही "शब्द' म्हणजेच त्यांचे व्यक्‍तीमत्व दाखविण्याचा तुम्ही केलेला अट्‌टहास बाळबोध वाटतो. राजकारणातील भाषणालाच त्या माणसाचे व्यक्‍तीमत्व मानाय
चे हे आमच्यासारख्या मठ्‌ठ माणसांनी. पण तुमच्यासारख्या विश्‍लेषकांनी तर व्यासपीठावर न बोलताही नेता कोणते शब्द पेरुन गेला याचा उहापोह करावा. परिस्थीती कोणती आणि समोरचा श्रोता काय मानसिकतेचा आहे हे बघूनच नेते भाषण करतात. यात प्रत्येकवेळा त्यांचे व्यक्‍तीमत्व शंभर टक्‍के असतेच असे नाही. उच्चारलेला शब्दाचा नेमका काय अर्थ हे विश्‍लेषकाने सांगावे त्याच शब्दात त्याने स्वतःला अडकवून ठेवू नये.
आपल्याकडचे जवळजवळ सर्वच पत्रकार कुठल्या ना कुठल्या विचाराने प्रभावित असतात त्यांचा त्यांच्या लेखनावर परिणाम होतोच यात तुम्ही अपवाद असावे असंही आमचं म्हणणं नाही पण विचाराने प्रभावीत असणे आणि विचारांचे ओझं घेवून फिरणं यात नक्‍कीच फरक आहे. विचारांचं ओझं डोक्‍यावर असेल तर त्याशिवाय दुसरा विचार डोक्‍यात शिरत नाही. बघा जमलं तर थोडे ओझे उतरवून....
ता. क.
वरील पत्र लिहिताना इंग्रजी शब्दांचा वापर मुद्दामच केलेला नाही. पण ज्या राज ठाकरे यांच्याबरोबरच्या मैत्रीचे गोडवे तुम्ही गाता त्यांच्या राजकारणानेच तुम्ही प्रेरीत दिसता नाहीतर तुम्ही "अल्केमीस्ट्री' हे सदराचे नाव ठेवलेच नसते.