गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

प्रिय,



सुनीताबाई देशपांडे यांचा उल्लेख मागच्या पत्रात झाला होता. तो सहज आला आज मात्र तो मुद्दाम करतो आहे. बाईंची दोन-तीन पुस्तके पूर्वी कॉलेजमध्ये असताना वाचली होती. त्यातील आहे मनोहर तरी हे तर सगळ्या गावाने सांगितल्यामुळे केवळ उत्सुकतेपोटी वाचले आणि मग ठेवून दिले. त्याचा त्या वयातही फारसा परिणाम झाला नाही. पु.लं.च्या बद्दल त्यांनी एक दोन जिव्हारी लावणारे उल्लेख केले असले तरी त्याचा मूर्तीभंजन वैगेरे होण्याचा काही परीणाम झाला नाही. खरे तर त्या वेळी या जातकुळीतील अनेक पुस्तके वाचली होती. वाचली कसली चावलीच होती ती. कांचन घाणेकरचे नाथ हा माझा आणि माधवी देसाई यांचे नाच गं घुमा... पण या पुस्तकांमुळे काशिनाथ घाणेकरांबद्दल वेगळं वाटण्याचा संभव नव्हता कारण त्यांना काही मी रंगमंचावर कधी बघितले नव्हते. रंगमंचावरील त्यांच्या अभिनयाचे विश्‍लेषण जाणकार नाटककाराने केले असते आणि त्यावर जर काही प्रश्‍नचिन्हे उपस्थित केली असती तर ती मान्यही झाली असती. पण ते तसे नव्हते हे मनाशी पक्‍के ठाऊक असल्याने मूर्तीभंजन झाले नाही हे खरेच.
विषयांतर हा पत्रकारांना राजकारण्यांकडून मिळालेला संसर्ग आहे की काय असा प्रश्‍न मला अलीकडील काळात पडायला लागला आहे. नाही तर पत्राचा विषय आणि आशय या दोन्ही बाबतीत मी जे काही विषयांतर करतो त्याची कारणमिमांसा करताच येत नाही. असो! तर सुनीताबाईंनी लिहिलेल्या त्या पुस्तकाचा फारसा परिणाम झाला नाही. नंतर मात्र सुनीताबाईंनी पु.लं. गेल्यानंतर लिहिलेल्या लेखाने परत त्यांना वाचावे वाटू लागले. "मण्यांची माळ' फारसं रुचलं नाही. पण मग प्रिय जी. ए. वाचनात आले. जी.ए. बद्दल प्रचंड कुतूहल होतेच पण त्यापेक्षा जास्त त्यांच्या कथांतून दिसणाऱ्या अंधाराचे कुतूहल किंवा ओढ जास्त होती. त्यापायी प्रिय जि. ए. हातात घेतले. त्या पत्रातून एखादा कवडसा त्या अंधारावर पडावा हीच अपेक्षा होती. पण झालं भलतंच. सुनीताबाईंच्या पत्रात जी. ए. भेटतात ते पुन्हा अंधाराच्या अनेक छटांमधुन. दरीतील खोल अंधार, गुहेतील अंधार आणि त्यापेक्षा जास्त खोल विहिरीतील खुणावणारा अंधार. खरे तर त्या विहिरीत नेमकं किती गोड पाणी आहे हे बघण्यासाठी खोल खोल उतरत राहातो पण तरीही एखादी पायरी चुकतेच. काळजाचा ठेका चुकतो. पुन्हा सावरतो. त्या विहिरीत पुन्हा उतरायचे नाही असे ठरवून वर येतो आणि पुन्हा पुन्हा ती विहीर खुणावत राहाते. त्या विहिरीतील तो निळाशार काळोख अजब आहे. सुनीताबाई त्या अंधारात आपल्या घेऊन जातात आणि मग हलकेच आपला हात सोडवून पुढे निघून जातात. मग आपला प्रवास सुरू होतो. त्या काळोखातून पुढे जाण्याचा. खोल उतरत राहण्याचा. काळोखात भरकटत राहावं वाटणं हेच तर जी. ए.चं वैशिष्ट्य. त्यातील प्रत्येक पत्र असेच आहे. त्या विहिरीकडे नेणारे, खोलपर्यंत पोचविणारे आणि पुन्हा माघारी फिरायला लावणारे. झिंग आणणारे आहे हे. व्यसनी माणुस एकाच गोष्टीकडे परत परत का वळतो याचे कारण येथे कळते. ती झिंग हवी-हवीशी वाटते. त्याच-त्या सुखासाठी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी माणुस पुन्हा पुन्हा करतो. त्यामुळेच ती पत्रे.. (तशी सगळीच पत्रे आपली) पुन्हा पुन्हा वाचत असतो. तूही वाचली असशील ती पत्रे. तरी पुन्हा एकदा वाच.. अनेकदा त्या पत्रातून तू दिसतेस. आहा! काय पण प्रत्येकवेळा मीच कशी दिसते रे तुला? असा प्रश्‍न तुझ्या डोक्‍यात उमटेलही.. पण खरेच तू दिसतेस. भांडणारी.. आपल्या मतांवर ठाम असणारी... पत्र हा खरे तर वैयक्तिक मामला. पण तो वैयक्‍तिक राहात नाही. याचे कारण व्यक्‍तीला चिकटलेले सगळे गुण-दोष त्यातून प्रकट होतात. ते काही एकाच व्यक्‍तीची मक्‍तेदारी असू शकत नाही. तशाच गुणांच्या अनेक व्यक्‍ती असतातच. त्यामुळे प्रत्येकवेळी मीच कशी दिसते असा जर तुझा प्रतिवाद असेल तर तो आधीच खोडून काढलेला बरा. " तुम होती तो ऐसा होता' च्या तालावर हे नाही... तुम ही हो चा ताल आहे हा..

बाकी.. आज शतकातील सर्वात अनोखा दिवस होता. 12-12-12.. भारीच ना! आपल्या आयुष्यात आता पुन्हा ही तारीख येणार नाही. पुढच्या या तारखेला कदाचित तू असू शकतेस...( हा हा...मी तुझ्यापेक्षा लहान आहे हा तुझा युक्तिवाद असतो ना म्हणून.) हा झाला विनोदाचा भाग. पण असे दिवस, असे काही क्षण साठवून ठेवावे वाटतात. ते साठवायचे असतातही. पण आज काहीच नाही.. साठवण्यासारखे.. दिवस असा-तसाच गेला.. अगदी रोजची कामेही नीट झाली नाहीत... मग चला तुला पत्र लिहावे म्हणून पत्र लिहायला घेतले..पत्र बारा तारखेलाच लिहिले आहे. कदाचित ते 13 तारखेला पोस्ट होईल. पण ते लिहून झालं बारा तारखेला. बारा तारीख खरेच किती महत्त्वाची आहे तुलाही माहीत आहे.....मागच्या पत्रात लिहिलं होतं की प्रत्येक पत्र कुठे स्वतंत्र असतं आता हेच बघ ना? हेही त्याच माळेतील पत्र..

तुझाच....

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२

प्रिय,

सुनीताबाई देशपांडे म्हणतात, तुमचं पहिलं पत्र हे निव्वळ पत्र किंवा मूळ पत्र आणि बाकीची सगळी पत्रे ही पत्रोत्तरे. खरे असेलही. पत्राला उत्तर लिहिताना किंवा त्याचा संदर्भ घेऊन लिहिताना ते पत्र मूळ पत्र राहत नाही. पत्रांच्या माळेतील तो एक मणी होतो, त्याचे अस्तित्व त्या माळेतील इतर मण्यांप्रमाणेच असते. वेगळे अस्तित्व त्याला असत नाही. दोन्ही हात एकमेकांत गुंफून घेतलेल्या शिल्पाप्रमाणे. त्यातील प्रत्येक शिल्प आपपल्या ठिकाणी सुंदर दिसत असले तरी, त्या शिल्पांना एकमेकांपासून दूर करता येत नाही. ते केलं की मग अपुरेपणा जाणवतो. मूळ पत्रात तो अपुरेपणा असत नाही. पण मूळ पत्र म्हणजे तरी काय? प्रत्येक पत्र मूळ पत्र असू शकते का? छे! प्रत्येक पत्र कधीच मूळ असू शकत नाही. पहिले पत्र केवळ मूळ म्हणता येईल. बाकीची सगळी पत्रे ही पुन्हा माळेतील मणीच. त्याला एकमेकांपासून दूर नाही करता येणार. आता हेच बघ. तुला लिहिलेले पहिले पत्र आणि त्यानंतरची ही सगळी पत्रे ही एका अदृश्‍य अशा कडीत बांधलेलीच आहेत की. त्यातून त्यांना वेगळे करता येणार नाही. पहिल्याच पत्रात फक्‍त तुम्हाला तुमचेपण मांडता येते. बाकीच्या पुढच्या सगळ्या पत्रांमध्ये तो पहिला धागा असतोच, कधी उत्तरांचा तर कधी प्रश्‍नांचा. पण ज्या पत्रांना उत्तरे मिळत नाहीत, ती पत्रे पुन्हा मूळ पत्रासारखी असतात का? छे तीही मूळ असत नाही. जाऊ दे ! आपण या भानगडीतच न पडलेले बरे. मला तुला जे सांगायचे आहे ते सांगितले म्हणजे झाले. ते पत्र मग मूळ आहे की पत्रांच्या कडीमधले याला काही अर्थ असत नाही.
तू साथ-साथ चित्रपट बघितला असशीलच ना? दीप्ती तुलाही आवडते आणि मलाही. तिच्या डोळ्यात तुझे साधेपण दिसते. खरे तर नूतनच्या मीनाक्षी डोळ्यांपेक्षा तुझे डोळे अधिक बोलके आहेत. हे कधीतरी सांगायचे होते, पण ते राहिलेच. तर दीप्तीचा साथ-साथ चित्रपट. त्यातील बहुतेक गाणी सुंदरच आहेत. पण तरीही "तुम को देखा तो ये ख्याल आया ' हे गाणं अप्रतिम. तुझ्या आवडत्या जगजीतसिंहने गायलेले. पडद्यावर फारुख डोळ्यात ीजतका आर्त भाव आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे मागे गेलेले केस आणि समोर साधी पण आश्‍वासक दीप्ती. जगजीतच्या पहिल्या हुंकारापासून आणि चित्राच्या आलापापासून गाणं खोल मनात उतरत राहातं. समोरची दीप्ती हळूहळू विरत जाऊन तिथे तू दिसू लागतेस. खास करुन ज्या वेळी आज फिर हमने इक तमन्ना की, ही ओळ तो गातो त्यावेळी हाय! जणू ती ओढणी आपल्याच हातात असल्याचा भास होतो. तो ज्या सहजतेने ती सोडून देतो आणि म्हणतो "आज फिर दिल को हमने समझाया... हाय... दीप्तीच्या चेहऱ्यावरचे ते सगळे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागतात. मागे केस हलक्‍या हाताने घेणारी. मान हलकेच तिरकी करुन बोलणारी आणि सगळ्यात महत्त्वाचे मी नजर चुकवत असताना धिटाईने नजर मिळविणारी... तूच आणखी कोण असणार.. "हम जिसे गुणगुणा नही सकते...' हे कडवं गाताना जगजीतचाही घसा थोडा कोरडा पडला असणार नक्‍की. काही वेळाच अशा असतात.. त्यांची गाणी आपल्याला गुणगुणायला येतच नाहीत... कितीही ओठांवर असलं तरी सांगता येत नाही हेच खरे.... आज पुन्हा तुझी आठवण खूप दाटून आली. असे काही क्षण असतात त्यावेळी खूप सैरभैर व्हायला होतं. जगणंच अवघड वाटायला लागतं, पण हे क्षण धिटाईने पेलायला लागतात. ही कला मला यायला लागली आहे असे वाटते तरी काही क्षण सुटतातच की... आजही आठवणींचा आवेग आवरून धरला आहे. आज पुन्हा मनाला समजावलं आहे....

                                                                                                                                     तुझाच