सोमवार, १२ ऑक्टोबर, २००९

डोळे......

खिडकीच्या काचेवर चोच मारणाऱ्या त्या चिमणीकडे बघून आईचा जीव कळवळला... तिला चार तांदळाचे दाणे टाक रे असं म्हणून तिने रोळी माझ्यासमोर ठेवली. मी माझ्या मुठीत मावेल तितके तांदूळ घेतले आणि खडीकीसमोर ते टाकले. ती चिमणी घाबरुन उडून गेली. मी हिरमुसून परत आलो... आई म्हणाली येईल थोड्या वेळाने लांब उभा राहा.... मी खूप वेळ तिची वाट बघितली पण पुन्हा ती काही आली नाही.... नंतर पुन्हा एक दिवस ती परत त्याच खिडकीत आली आणि काचेवर चोच मारत राहीली. मी आईला सांगितलं... आईनं लांबून हलक्‍या हाताने तांदूळ टाकले... चिमणी उडाली पण ती लांब गेली नाही... आजुबाजूचा अंदाज घेत टुणटुण उड्या मारत एक एक तांदूळ ती टीपत राहीली..... मग थोड्यावेळाने ती परत निघून गेली. मी आईला विचालं, ""आई ती परत येईल.? आई हो म्हणाली...
मग दुसऱ्या दिवशीही ती आली... मी अंगणात काहीतरी करत होतो.... आईनं हाक मारली. तुझी चिमणी आली बघ म्हणून मी धावत आलो... रोळीतील तांदूळ मुठभरुन घेणार इतक्‍यात आईनं कण्यांचा एक डबा माझ्यासमोर ठेवला.""यातील तांदूळ घालत जा'' आईन सांगितलं. मी मूठभर कण्या घेतल्या आणि आईनं जसं लांबून तांदूळ टाकले तसे टाकल्या... आता चिमणी घाबरली नाही...तिने धिटपणे काही दाणे टीपले आणि निघून गेली.... मग रोजचाच आमचा हा खेळ बनला.... रोज शाळेतून आल्यावर मी त्या खिडकीच्या काचेकडे बघत तासनतास बसायचो... ती येईल याची वाट बघत.... तीही नित्यनेमाने यायची.... मी तिला कण्या टाकायचो, ती त्या टीपायची आणि परत निघून जायची.... अलीकडे तर आई मी शाळेतून यायच्या वेळी खिडकीतच खावू ठेवायची. त्या चिमणीचा मुक्‍कामही आता वाढू लागला होता.... एकदिवस मी बघितलं की तिने खडकीच्या वरच्या कोपऱ्यात काही काटक्‍या गोळा करुन घर बांधलंय..... मग मी रोज त्या घरट्यात डोकाऊन बघयचो पण त्याला हात लावायचा नाही, असं आईनं बजावलेलं होतं, त्यामुळं त्याला हात लावायची इच्छा होऊनही मी हात लावला नाही... एक दिवस त्यात मला छोटी छोटी अंडी दिसली.... आईनं सांगितलं की काही दिवसांनी त्यातून पिलं बाहेर येतील म्हणून.... मी वाट बघायचो रोज आईला विचारायचो, आई रोज उद्या म्हणायची... आणि एक दिवस त्यातून चिवचिवाट सुरु झाला.... मी आनंदानं आईला सांगितलं... आईन त्या दिवशी मला रोळीतील तांदूळ घ्यायला मुभा दिली होती.... मग मी रोज संध्याकाळी त्या खिडकीपाशी बसून त्या इवल्याश्‍या चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायचो.... आई ओरडायची....अभ्यासाला बैस म्हणून पण तिने कधी चिमणीला दोष दिला नाही.... चोचीच चोच घालून दाणे भरवणं बघितलं की मला मजा वाटायची.... माझ्यासाठी आईनही तोच प्रसंग कित्येकवेळा बघितला होता....
एका संध्याकाळी मी असाच शाळेतून पळत आलो.. दप्तर बाजुला टाकलं... आईनं खिडकीत शिरा आणि पाणी ठेवलं होतं. मी हातपाय न धुताच हातात प्लेट घेवून त्या खिडकीच्या कोपऱ्याकडे बघत होतो.... तिथं ते घरटंच दिसलं नाही.... मला काही कळलं नाही.... मी धावत आईला जावून विचारलं... आई खिडकीपाशी आली तिनं बघितलं ..... खिडकीच्या खाली ते काट्याकुट्यांचं घरटं पडलं होतं.... आणि जवळच काही पिसं पडली होती.....ती चिमणी चिवचिवाट करत इकडून तिकटे फिरत होती...खिडकीच्या काचेवर चोच मारत होती... आईनं माझ्याकडं बघीतल आणि मला कवळून घेतलं आणि तिने डोळ्याच्या कडा पुसल्या....आजही आईचे ते डोळे मला अस्वस्थ करतात.....