शुक्रवार, १० मे, २०१३

प्रिय,



कशी आहेस? काही प्रश्‍न हे उगाचच विचारले जातात ना? त्या प्रश्‍नांना तसा अर्थ नसतो. त्याची उत्तरे माहीत असतात. पण तरीही सुखात! हा शब्द ऐकण्यासाठी कान नेहमीच आतुर असतात. अनेकदा कानाचे आणि मनाचे पटत नाही; पण कानावर जास्त विश्‍वास ठेवावा लागतो. मागच्या वेळी मी ग्रेसबद्दल लिहिलं होतं. आठवतं... ग्रेस मनात शिरता शिरत नाही आणि एकदा शिरला की तो निघता-निघत नाही... तो रेंगाळत राहतो... त्याचे आर्त शब्द कानांत घट्ट आवाज करून राहतात.. अनेक अर्थांचे शेले ओढून आणलेले ते शब्द आपले सगळे शेले हळुहळू सोडून देतात...
अगदी हवेत शब्दांना फेकावे आणि त्या शब्दांना त्याने शब्दांनीच तोलून धरावे असे काही... पण केवळ शब्दांच्या आणि प्रतिमांच्या प्रेमात पडलेला हा कवी नव्हता. तो जपणूकदार होता... आपल्या सगळ्या जखमांची जपणूक करायचा. ग्रेस यांनी आपल्या शेवटच्या काळात लिहिलेल्या ओल्या वेळूच्या बासरीचे सूर आता माझ्या कानात घुमत आहेत... खरे तर ही कला त्यांनाच जमू शकते... पोकळ वेळूत कोणीही फुंकर मारून सुरांना आळवू शकते... ग्रेस प्राणांनी फुंकतात... त्यामुळे ओल्या वेळूची बासरीही मग सूरमयी होऊन जाते... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत असताना ग्रेस यांच्या श्‍वासातून उमटलेले हे सूर आहेत. मला त्यात आर्तता दिसते. कधी भूतकाळाशी नाते जोडण्याचा प्रयत्न दिसतो. प्रतिमांच्या चौकटीतून जगाला बघणारा हा कवी प्रतिमांची चौकट एवढी मोठी करतो, की त्यात आपणही सामावून जातो. कधी कधी वाटते, की तो हा प्रतिमांचा पसारा सगळा आवरून, छे! उधळून देऊन मुक्‍तपणे लिहितो की काय? पण पुन्हा तो मागे फिरतो आणि प्रतिमांमध्ये अडकत राहतो. कर्करोगासारखा असाध्य रोग झालेला असताना जगण्याच्या भूतकाळाच्या पाटीवर पुसलेल्या आठवणींच्या रेषा त्यांना आठवत नसतील, असे म्हणणे म्हणजे तो त्यांच्यावरच अन्याय आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक लेखांत जणू याच रेषा त्यांनी ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना पुन्हा प्रतिमांची चौकट घातली आहे इतकेच! या प्रतिमांच्या चौकटीत त्यांना सापडला तो देवदास... कर्करोगाशी हॉस्पिटलमध्ये झुंज देत असताना, त्या औषधांच्या आणि फिनेलच्या वातावरणात त्यांना देवदास का आठवतो?... तो केवळ आठवत नाही तर तो समग्र आठवतो. त्याच्या मनाच्या कप्प्यांसह आठवतो... चार दशकांहून अधिक प्रवास केल्यानंतर अगदी शेवटी त्यांना आठवतो तो देवदास... तोच देवदास जो पार्वतीच्या प्रेमात अखंड बुडालेला आहे... पण का? देवदासच का आठवला?
...ही देवदासाची मरणवाट नाही तर हा पार्वतीव्यतिरिक्‍त उरलेल्या जीवनसलगीचा एकमेव घाट आहे, अशी ओळ लिहिणाऱ्या ग्रेस यांना पार्वतीबरोबर घालवलेले क्षण जितके देवदासला आठवतात किंबहुना छळतात तितकेच ते छळतात जणू... गंमत आहे बघ... मला यांमध्ये प्रतिमांच्या जंजाळात अडकवून हलकेच आपले सांगणे पोचविण्याचा प्रयत्न दिसतो. तो तर त्यांच्या लेखनशैलीचा अविभाज्य घटक होता, पण यावेळी त्यांनी निवडलेल्या प्रतिमा सामान्य डोळ्यांच्या माणसांनाही स्पष्ट दिसतात... देवदासचे दुःख सगळ्यात मोठे का वाटते? कारण तो पार्वतीवर आसक्‍त नाही... आसक्‍ती ही प्रेमाची पायरीच असू शकत नाही... शरदचंद्रांनी लिहिलेल्या 1917 च्या या कादंबरीच्या नायकाचे आणि नायिकेचे अंतरंग कळण्यासाठी प्रेम करायला हवे... पार्वती आपल्याला मिळणार नाही, म्हटल्यावर देवदास कोलमडतो... ग्रेस म्हणतात, जगाकडून आलेली समीकरणे अनेक असतात. गोमेचा एक पाय तुटला म्हणून काय झाले... पण गोमेच्या अनेक पायांपैकी एक पाय तुटल्यावर तिच्या जीवाचा समग्र आकृतिबंध शबलित होतो, कलंकित होतो त्याचे काय? किती सहजतेने खरे सांगून टाकले... काय झालं... आयुष्य थांबतं का कोणासाठी? जगणं म्हणजे एवढंच का? हे सरळ नियम लोकांनी कुबड्यांसारखे निर्माण केले आहेत. त्याला उत्तरे देण्याची गरज नसते... जगण्याची रीतच अशी, की त्यात आकृतिबंध तुमचा हवा... अगदी तुझा हवा... पण तसं होत नाही... गोमेचा पाय करून टाकतात... आणि प्रश्‍नाची कुबडी हातात देऊन टाकतात... कुबड्या कधीच पायाची जागा घेऊ शकत नाहीत... त्या आधार देतील; पण पाय नाही होऊ शकत... आणि त्या चालण्याला प्रवास म्हणायचं की आयुष्य... खरे तर ते खुरटत चालणं... ढकलणं...
मी डोळे मिटून बघतो... अगदी आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असावा, या कल्पनेने डोळे मिटतो... आता या क्षणी मिटलेले डोळे कायमचे मिटले तर त्या अखंड अंधाराच्या प्रवासात डोळयांच्या पटावर कुठले चित्र उमटेल याचा मी विचार करतो, त्यावेळी तुझा एकच चेहरा दिसतो... अगदी हसरा... सोबत देणारा... त्या मिटलेल्या पापण्यांवर आपले गरम ओठ टेकवणारा... कदाचित हा कल्पनेचा खेळ असावा. आपण मिटलेले डोळे उघडले जाणार आहेत, याचा विश्‍वास कुठेतरी मनात खोल रुतून बसलेला असतो. त्यामुळे त्याचे काही वाटत नाही... पण खरोखर आपला मृत्यू समोर दिसतोय हे बघितल्यावर माणसाच्या मनात नेमके काय येत असेल...?

इथे आठवतो तो भीष्म... शरशय्येवर पडलेला भीष्म... उत्तरायणाची वाट बघणारा भीष्म... स्वतःच्या बापासाठी राजगादीवर लाथ मारून अखंड ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करणारा देवव्रत, भावासाठी राजकुमारींना पळवून आणणारा भाऊ, सत्यवतीने कुरूवंशवाढीसाठी प्रतिज्ञा मोडण्यासाठी भरीस घालूनही न बधलेला भीष्म... परशुरामासारख्या योद्‌ध्यासमोरही हार न पत्करणारा पण द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी गप्प राहणारा भीष्म... शरशय्येवर पडलेल्या आणि उत्तरायणाची वाट बघणाऱ्या भीष्माच्या डोळ्यासमोर काय येत असेल...? त्याच्या दीडशे वर्षांच्या आयुष्याच्या कुठल्या गोष्टी अगदी ठळक दिसत असतील... बापासाठी भीष्मप्रतिज्ञा केल्याचा दिवस की त्यानंतरचा दिवस...? राजा प्रदीपचा नातू आणि शंतनू-गंगेचा मुलगा देवव्रत याने आपल्या ताकदीच्या मनोनिग्रहाच्या जोरावर प्रतिज्ञा घेतली खरी; पण... त्या रात्री त्याला खरंच झोप लागली असेल...? त्याच्या डोळ्यांतही एखादा चेहरा तरळला नसेल का? मला वाटतं... शरशय्येवर आडवा झाल्यावर भीष्माच्या डोळ्यासमोर तोच चेहरा दिसत असणार... आठवणींचा गुंता झाला असणार... त्या प्रत्येक बाणाबरोबरची टोचणी त्याला जाणवत असणार... तो कोणाचा तरी देवव्रत होता... कधी तरी कोणीतरी देवव्रताच्या मनाच्या झरोक्‍यात प्रवेशलं असणार आणि भीष्माच्या प्रतिज्ञेच्या ओझ्याखाली ते दबून गेलेलं... मृत्यूशय्येवर पडलेल्या भीष्माला माफी मागावी वाटली असेल का? खरे म्हणजे तो राजगादी सोडून बाकीचे राजवैभव उपभोगत होता. पण त्यात त्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन का केले? सत्यवतीने विनवूनही त्याने विचित्रवीर्याच्या बायकांना का हात लावला नाही... कुरुवंशाचे खरे रक्‍त त्याच्या नसा-नसात वाहत असताना त्याला व्यासाचा आधार का घ्यावा वाटला? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला की ती त्या मनाच्या झरोक्‍याशी येऊन मिळतात. त्याने घेतलेली शपथ जर आणखी कोणाच्या भाळी लिहिली गेली असेल तर त्याचा उल्लेख महाभारतात नाही; पण त्यावेळी तो अस्तित्वात नसेलच कशावरून... आपल्यामागून असं फरफटलेलं आयुष्य त्याने कदाचित बघितले असेल... आणि त्याचा दोषी तोच होता... त्यामुळेच तर त्याला त्या बाणांची टोचणी फार लागली नाही. त्यापेक्षा मोठी टोचणी त्याला लागून राहिली होती. ग्रेस म्हणतात तसे गोमेचा एक पाय... त्याने एक पाय तोडला पण पुन्हा जे कलंकित आयुष्य त्याच्यासाठी भोगावे लागले त्याचे काय? देवव्रताचा भीष्म झाला... तसेच कोणीतरी हे व्रत आपलेच समजून जगले नसेलच असे नाही... कदाचित त्या चेहऱ्याला पुन्हा बघण्यासाठीच उत्तरायणाचा बहाणा करून भीष्म जिवंत राहिला नसेल कशावरून...?