रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

कायदा

हॅ, हॅ, हॅ करत ते अवघं दहा-बारा वर्षांचं पोरगं हात पुढे करत माझ्यासमोर आलं.... कपाळावर मळवट भरलेला, जटा वाढलेल्या, कमरेला चिंद्या गुडाळलेल्या... पायात मोठाले वाळे घातलेल्या त्या पोराकडे बघत मी काहीतरी देण्यासाठी खिशात हात घातला पण हाताला काहीच लागलं नाही... मी तसाच हात त्याच्या हातात देत खांदे उडविले.... ते पोरगं काही बोललं नाही. तसंच ते पुढच्या, मग पुढच्या असं करत त्या गोलाकार जमावात फिरत राहिलं... त्याची बहुतेक आई असावी ती, ढोलकीवर काठी फिरवत मधीच हॅ हॅ हॅ करत होती.....सगळ्या गर्दीत फिरल्यावर त्याच्या हाताला थोडी नाणी लागली.... ती समोरच्या त्या कपाटासदृश्‍य देव्हाऱ्यासमोर ठेवत त्याने त्यावर ठेवलेला चाबूक उचलला... मग हवेत दोन तीन फटके मारत त्याने समोरच्या गर्दीकडे बघितलं आणि स्वतःच्या अंगावर त्या चाबकाचे फटके मारायला सुरवात केली एक, दोन, तीन, चार...... अंगावर चाबकाचे फटके मारून झाल्यावर ते पोरगं पुन्हा त्या गर्दीकडे वळलं मघासारखा हात पुढे करत परत ते फिरलं.... मग आणखी थोडी नाणी त्याला मिळाली.... मघाची आणि आताची नाणी बघून ते हिरमुसलं त्यानं आईकडं बघितलं.... आईचं ढोलकीवर काठी फिरवत हॅ हॅ हॅ करणं सुरुच होतं........ मग त्याची आई समोर आली.... तिच्या हातात मोरपीसांचा पंखा होता....तिनं ती मोरपीसं त्याच्या दंडावर फिरवलं.... ती ते मोरपीस फिरवायला लागली तसं ते पोरगं कळवलं... पण त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत.... भीतीने त्यानं अंग आक्रसून घेतलं.... पण त्याच्या आईनं एका हाताने त्याचा दंड पकडत दुसऱ्या दंडावर मोरपीस फिरवणं सुरुच ठेवलं...मग तिनं ते मोरपीस त्या देव्हाऱ्यावर ठेवत तिथली मोठी सुई उचलली.... त्याच्या हातावर ती बळेच दिली आणि ढोलकीवर काठी जोरात घासली.... आता ते पोरगं उठलं.. ती मोठी सुई त्यानं त्या गर्दीला दाखविली आणि दुडक्‍या चालीत स्वतःभोवती गिरकी घेत त्यानं ती आपल्या दंडा
वर टोचली..... ती सुई घुसली... रक्‍ताची चिळकांडी उडाली.... मी डोळे घट्‌ट मिटले... आता ते पोरगं पुढं झालं नाही... त्याची आई पुढे झाली.... कुणी नाणी टाकली... कुणी नोटा टाकल्या...तिने सगळे पैसे गोळा केले आणि डोक्‍यावर तो देव्हारा घेतला आणि चालू लागली..... तिचं ते पोरगं.... दंड चोळत तिच्या मागून चालू लागली..... गर्दी ओसरली.....रस्ता मोकळा झाला.... रस्त्याच्या पलीकडील घराच्या भिंतीवर लिहलं होतं... बालकांचा निरागसपणा हिरावून घेऊ नका...... बालकांना कामाला लावू नका....कायद्यानं बंदी आहे.....