शनिवार, ९ जुलै, २०११

कपाटातील समृध्द अडगळ

जगातील कोणत्याही ललित साहित्याचा मूळ गाभा वाचकांचे रंजन करणे हाच असतो, किंबहुना तोच असायला हवा. समाजप्रबोधन, नीतीमत्तांची शिकवणी साहित्यांनी घ्यायला हरकत नाही; पण त्यापूर्वी त्यांचा मूळ गाभा रसरशीत असायला हवा. जर एखादी कथा, कविता, नाटक, कादंबरी या गाभ्यापासून दूर गेली तर ती कलाकृती कागदांचे भेंडोळे किंवा चांगल्या वेष्टणातील रद्दी एवढ्यापुरतीच मर्यादित राहते. अशा कलाकृतीकडून वाचकही काही अपेक्षा करत नाहीत आणि प्रकाशक आणि लेखक दोघांनाही त्यातून काही मिळत नाही. बऱ्याचदा जाहिरातबाजी आणि लेखकाचे नाव वापरून प्रकाशक दुय्यम, तिय्यम दर्जाचे पुस्तक वाचकांच्या माथ्यावर मारण्यात यशस्वी होतात. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ याबाबतीत प्रचंड यशस्वी झाल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक श्रीयुत भालचंद्र नेमाडे यांची हिंदू जगण्याची समृद्घ अडगळ कादंबरी प्रसिद्ध करून आणि प्रसिद्धीला आणून रामदास भटकळ यांनी मराठीजनांवर जो काही उपकार केला आहे त्याला तोड नाही. अत्रेंच्या भाषेत सांगायचे झाल्यास गेल्या दहा हजार वर्षांत असे पुस्तक छे.., कादंबरी छे.., प्रबंध छे.., झोपेची गोळी जे काही त्यांनी प्रसिद्ध केले आहे तसे प्रसिद्धीस आणण्याची कुणाच्या बापाच्यात धमक नाही.
अनेक साहित्यिकांची उतरत्या वयात प्रतिभा संपुष्टास गेलेली असते. प्रतिभेचे तळे आटले, की हे जुन्या काळात रमू लागतात; मग प्रतिभेच्या अत्युच्च स्थानी असताना यांच्या हातातून निसटलेली काही पाने त्यावेळी त्यांना दुय्यम दर्जाची वाटलेली, पण आता हातातून काहीच निसटत नसल्याने आधार वाटू लागतात. मग हे साहित्यिक असे कागदाचे कपटे गोळा करून एका पोत्यात बांधतात आणि त्याला काही तरी नाव देतात. अनेकवेळा हा प्रयोग यशस्वीही होतो. त्या कागदांच्या बोळ्यातून काहीतरी हाताला लागते. उरलेला कचरा जरी सोडला तरी काही तरी हाताला लागले म्हणून वाचकही खूश असतो. रा. रा. नेमाडेंनीही असाच सगळा कचरा एका पोत्यात भरला. त्याला गोंडस असे नावही दिले "हिंदू'. हे िंहंदू नाव का, तर त्या पोत्याबाबतीत काही तरी वाद निर्माण होईल आणि पोती हातोहात खपली जातील. "होराभूषण' नेमाडेंचा हा होरा पक्‍का खरा ठरला. पोती भराभर खपली खरे; पण लोकांनी त्याचे तोंड उघडले आणि हातात फक्‍त संदर्भहीन कागदांचे कपटे मिळायला लागले. त्यामुळे लोकांनी एकदा ते तोंड झाकले ते पुन्हा काही उघडले नाही. त्यामुळे 650 रुपयांची ही कादंबरी कपाटातील समृद्ध अडगळ ठरते.
साहित्यिकाची प्रत्येक कलाकृती एकटी असते. लेखकाने यापूर्वी काय लिहिले आणि ते कसे होते यावर त्याने नंतर लिहिलेल्या पुस्तकांना प्राथमिक ग्राहक मिळण्यासाठी फायदा होतो खरा; परंतु त्या प्रत्येक पुस्तकाची स्वतःची ओळख निर्माण झाली तरच साहित्यिक यशस्वी ठरतो, नाही तर लेखक अमुक"कार' तमुक"कार' बनतो. एखाद्या लेखकाच्या दृष्टीने असे "कार' बनणेही खूप मोठे भाग्याचे असल्याने तो त्यावर समाधानी असतो. पण जातिवंत लेखकाला त्याची स्वतःची ओळख एखाद्या पुस्तकावरून व्हावी, असे वाटत नसते. त्यामुळे तो प्रत्येकवेळी प्रतिभेची नवनवी शिखरे चढत राहतो. त्यामुळे त्याची मागची पुस्तके कितीही गाजली असली तरी तो नूतन नवा भेटतो. नेमाडेंच्या बाबतीत अगदी तसेच म्हणायला गेल्यास ते "कोसला'पुरतेच मर्यादित राहतात आणि उद्या त्यांची ओळख सांगायची झाल्यास "कोसला'कार म्हणूनच सांगावी लागेल. प्राध्यापकी पिंड असलेल्या नेमाडेंना हिंदू धर्माबद्दल लिहायचे होते, त्यांना जातीपातीबद्दल लिहायचे होते, त्यांना ब्राह्मणी संस्कृतीबद्दल लिहायचे होते, रुढी-परंपरा यावर लिहायचे होते, त्यांना प्रत्येक गोष्टीवर लिहायचे होते, पण त्यासाठीचा आराखडा सापडत नव्हता. मग ते पस्तीस वर्षे लिहित राहिले, जमेल तसे आणि जमेल तेवढे.. घरात कागदांची नुसती अडगळ निर्माण झाली. आता ही अडगळ कमी करण्यासाठी त्यांनी पोती शोधायला सुरवात केली. या कागदाच्या कपटांना एका धाग्यात गुंतविणे आवश्‍यक होते. सध्या प्रबंध आणि शोधनिबंधांना कोणी कुत्रं खात नाही. विचारवंतांची पुस्तके ग्रंथालयांच्या कपाटात धूळ खात पडली आहेत. अशात या कपटांना विकून चांगला पैसा मिळविण्याच्या दृष्टीने कादंबरीसारखा मार्ग हा सोयीस्कर होता. त्यामुळे त्यांनी कादंबरीचं पोतं निवडलं. ज्या पोत्यात ही सगळी कागदे घातल्यानंतर ते विकलंही गेलं पाहिजे. मग त्या पोत
्याच्या नावावरून वाद निर्माण झाला पाहिजे. मग काय करायचे तर पोत्याला "वादळी' नाव द्यायचे. समाजातील भावनांचे ध्रुवीकरण झाल्याच्या काळात त्यांना "हिंदू' नावाचं पोतं सापडलं. त्यात त्यांनी हा सगळा पसारा कोंबला आणि तो खंडेराव नावाच्या एका काल्पनिक पात्राला पकडून त्याच्यावर वाचकांच्या दारात नेऊन टाकण्याची जबाबदारी सोपविली.
मुळात नेमाडेंना काय म्हणायचे आहे, कशासाठी म्हणायचे आहे आणि का म्हणायचे आहे हे काहीच या कादंबरीतून स्पष्ट होत नाही. त्यांना हिंदू धर्मातील रुढी-परंपरांवर टीकाही करायची आहे आणि त्याबद्दल भूमिकाही घ्यायची नाही. ब्राह्मणांना दुखवायचेही नाही आणि सोडायचेही नाही. केवळ मत्सर आणि आपल्याला खूप काही कळतं एवढं सांगण्यासाठी त्यांनी 603 पाने खर्ची घालण्याचे कारण नव्हते. त्यांनी मोठ्याने ओरडून सांगितलं असतं, की मला खूप काही कळतं आणि मी यांचा यांचा मत्सर करतोय, तर नेमाडेंचे साहित्यिक पुण्य एवढेही लयाला गेलेले नाही. त्यामुळे मराठी माणसांनी मान डोलविली असती. पण महाकाव्य लिहिण्याच्या अट्टहासापोटी त्यांनी केलेला हा कारभार आहे. पुस्तकातील त्रुटींबद्दल लिहायचे तर प्रत्येक पानावर त्रुटीच आहे. "नेमाडपंथी' भाषा म्हणून लोकांच्या डोक्‍यावर काहीही थापायचे हे योग्य नाही. रंजकता तर नाहीच, पण निवेदनाच्या पातळीवरही सगळा सावळा गोंधळ आहे. शेजारी झेंडू बामची डबी ठेवून वाचायला बसले तरी वाचता येत नाही. कादंबरी कुठल्याच पातळीवर चांगली नाही. ज्यांच्या सहनशक्‍तीची परीक्षा घ्यायची आहे अशा लोकांसाठी ही कादंबरी खूप चांगली आहे. त्यांनी ती वाचावी आणि सहनशक्‍ती दाखवावी हे माझे आव्हान आहे.

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

विचारवंत ठरण्याच्या हव्यासापायी केलेली लेखनकाणाठी हे या लेखनाचे स्वरूप आहे.

SUSHMEY म्हणाले...

हरकत नाही.... विचारवंत होण्याचा हव्यास असण्यात गैर नाही..... पण त्यासाठी डोक्‍यात विचार यायला हवेत.... आणि विचारवंत म्हणजे तरी काय? डोक्‍यात आलेले सगळे विचार मांडणे की सद्‌सद्‌ विवेकबुध्दीने त्याचे अनुमान आणि परिणाम जाणून मग विचार मांडणे....

भानस म्हणाले...

आपली याबाबतीतली मते बरीचशी जुळतात. मला नेमाडे खरे तर भावलेत परंतु तरीही म्हणावेच लागेल की ’कोसला ’तली समर्थ लेखणी नंतर काहीशी मंद झाली. कदाचित आपल्या अपेक्षाच जास्त असतील...

तुझी साधकबाधक विचारप्रवृत्ती आवडली.