शनिवार, २८ एप्रिल, २०१२

सुटी

किक्रेट खेळणाऱ्या त्या मुलांकडे तो एकटक बघत होता. कोणी चेंडू टाकत होता, कोणी बॅटने तो फटकावत होता. ती दहा बारा पोरं आपल्या खेळात रंगून गेली होती. ते. हातातील बोचकं सावरत ते सात-आठ वर्षांचं पोरगं त्या खेळणाऱ्या पोरांकडे बघत होतं. त्यांच्यात दंगा चालू होता. भांडणं होत होती.. जिंकणं-हरणं चालू होत. एकमेकांच्या उरावर बसणं चालू होतं. ते पोरगं आपल्या बोचक्‍याला सावरत शेजारच्याच गडग्यावर बसलं. हलकेच त्याने बोचकं बाजुला ठेवलं. ते ठेवताना त्यातली एक फाटकी-तुटकी बाहुली खाली पडली. मघाशी कचराकुंडी चाचपताना सापडलेली ती कापडी बाहुली त्याने हलकेच त्या बोचक्‍यात कोंबली होती.
गोट्या...
आईच्या चौथ्या हाकेनंतर त्या क्रिकेट खेळणाऱ्यापैकी बॅट घेतलेला मुलगा थोडा चलबिचल झाला. त्याने तरीही डाव तसाच चालू ठेवला. बोचकं सांभळणाऱ्या त्या पोरानं हाकेच्या दिशेकडे बघितलं. मग त्या पोरांकडे बघत राहिलं. त्या पोराची आई त्याला पुन्हा-पुन्हा हाक मारत होती. आणि ते मात्र आपल्या खेळांत गुंगून गेलं होतं. पोरांचा गोंधळ उडाला होता. चिडा-चिडी दंगामस्ती सुरु होती. कोणी त्यांना हाक मारते आहे याकडे त्यांचं लक्षच नव्हते. एवढ्यात त्या बॅट धरलेल्या पोरानं चेंडू टोलावला तो त्या बोचकं घेतलेल्या पोराच्या पायाशी आला. त्याला तो चेंडू आवडला. तो चेंडू उचलण्यासाठी ते खाली वाकलं पण इतक्‍यात दुसरं एक पोरगं तिथं आलं त्याने तो चेंडू उचलला आणि जोरात फेकला.
त्या पोरांत जावं, तो चेंडू हातात घ्यावा, बॅट घुमवावी.. असं त्या बोचकं घेतलेल्या पोराला वाटलं पण त्याने तो विचार सोडून दिला. त्या पोरांइतके चांगले कपडे त्याच्याकडं नव्हते, दिवसभर उन्हात काम केल्यानं अंग सगळं घामेजून गेलं होतं. त्यातच कचऱ्यात शोधा-शोध करुन त्याची सगळी घाण अंगाला लागली होती. अंग मळलं होतं, कपडे मळके होते. त्या पोरांच्या तुलनेत तो खूपच घाणेरडा दिसत होता. त्यालाच त्याची लाज वाटत होती. त्या टकटकीत मुलांत कसं जायचं? म्हणून मग ते गप्पच बसलं.
पुन्हा त्या मुलाच्या आईची हाक ऐकू आली.. तरी ते पोर खेळत राहिलं.. आईची हाक जवळ-जवळ येऊ लागली.. ती जशी जवळ येऊ लागली तशी पोरांची चलबिचल वाढली..
काकू आली रे, स्टंप, बॅट घेऊन पळा... एकाने जोरात आरोळी ठोकली, तशी सगळी पोरं पटपट गोळा झाली.. सगळ्या वस्तू पोरांनी गोळा केल्या आणि त्यांनी धुम ठोकली. बॅट घेतलेलं पोर मात्र शूर शिपायासारखं तिथेच टिकून राहिलं. त्या बोचकेवाल्या पोराला त्याचं आश्‍चर्य वाटलं..
आता त्याची आई त्याच्याजवळ आली होती. तिने त्याला हलकेच टपली मारली.
किती हाका मारायच्या रे, सुटी लागली म्हणून किती वेळ खेळायचे... त्याची आई त्याला दटावत होती.. ती माय-लेक बोलत बोलत त्याच्यासमोरुन गेली. समोरुन जाताना त्या पोराच्या आईने त्याच्याकडे बघितलं, मग त्याच्या बोचक्‍याकडे आणि म्हणाली, बघ तुझ्यापेक्षा किती लहान आहे, पण तरीही सुटीत बघ कसा आईला मदत करतो ते. आता तुही सुटीत काम कर. ती माय-लेक अंधारात निघून गेली.
त्या पोराने बोचकं उचललं. घर जवळ करायला हवं होतं. घर कसलं, कालच तर त्या माळावर त्याच्या आई-बाबांनी पालं टाकलं होतं. हे गाव अजून नवं होतं. कळायला लागल्यापासून किती गावं बदलली हेही आता आठवेनासं झालं आहे. अंधारातच तो आपल्या पालांकडं वळला. पोटात भूक होतीच पण त्यापेक्षा मनात खूप विचार होते. त्या पोरांनी टोलवलेले चेंडू त्याच्या डोक्‍यात टप्पे खात होते. ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्या पोराची आई आणि ते पोरंग यांचं बोलणं त्याच्या मनात कोरुन गेलं होतं. पालांत शिरल्या शिरल्या त्यानं बोचक्‍यातील बाहुली काढली आणि आपल्या लहान बहिणीच्या हातात दिली. आई चुलीला लाकूड लावत होती. त्यानं ते बोचकं बाहेर ठेवलं आणि ते आईकडे गेलं.. आईकडे सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे असतात याची त्याला खात्री होती. त्यानं हलकेच आईच्या गळ्यात हात घातला, गालाला गाल लावला आणि विचारलं...
माये, सुटी म्हणजे काय गं?

प्रिय,

खूप दिवसांनी जुने कपाट आवरायला घेतले होते. वर्तमानपत्रातील काही कात्रणे, काही टिपण्या आणि पिवळे पडलेल्या पुष्कळश्‍या कागदांनी कपाट गच्च भरुन गेलं होतं. अर्धवट लिहिलेले.. रेघोट्या ओढलेले.. टाचण मारुन ठेवलेले....कोणी कथेच्या शेवटाच्या प्रतिक्षेत तर कोणी अगदीच एखादा शब्द लिहून ठेवून टाकल्यामुळे रुसलेले, तर काही पत्रे लिहून पूर्ण झालेली पण पत्त्याच्या शोधात... म्हटलं तर सगळा कचरा म्हटलं तर प्रत्येक कागद आणि कागद एक-एक जाणिव.. एक-एक भावना.. एकाच कपाटात कोंबून ठेवलेल्या.. काही दडवलेल्या... काही कागदांच्या ओझ्यामुळे दडपून गेलेल्या... मुक्‍या आणि बहिऱ्याही...खरे तर त्या मुक्‍या होत्या म्हणूनच तर त्या एकत्र राहात होत्या. एकमेकांच्या उरावर पडलेले काही पिवळे कागद मात्र आपल्याच भावविश्‍वात रमलेले होते. अंगाला माती लागल्यावर पैलवान कसे छाती काढून चालतात, तसेच अंगावरची धूळ अभिमानाने मिरवत होते. मी ती हलक्‍या हाताने झटकल्यावर उगाचच त्यांना राग आला की काय असे वाटून गेले. त्यातच एका कोपऱ्यात एक कागद सगळ्यांपेक्षा वेगळा होता. कोरा.. हा पण पिवळा पडला नव्हता. मी सहज तो उचलला... चटकन तो थरथरला असे वाटून गेलं. सगळ्या पिवळ्या कागदांत हा पांढरा शुभ्र कागद कुठून आला हे मलाही कळले नाही. कागद आणि पेन गोळा करण्याची मला तशी हौस आहेच, पण हा त्याखातर हा कागद नक्‍कीच आणला नव्हता. कारण तसे असते तर त्याच्यासारखे आणखी काही कागद तिथे असायला हवे होते. एकटाच.. त्याचा उजवा कोपरा थोडासा मुडपला होता.. तो मुडपलेला कोपरा मी हलकेच सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण वळल्याची खूण घट्‌ट उमटली होती. त्यावर तारीख 20 फेब्रुवारी असं लिहिलं होतं. आणि मग काहीच लिहिणं झालं नव्हतं.
20 फेब्रुवारी...तुला पत्र लिहायला घेतलं होतं. त्यासाठीच हा खास कागद आणला होता. पत्र लिहायचे ही कल्पनाच खूप मजेशीर आणि धाडसाची वाटत होती. अगदी उत्साहाने पत्र लिहायचा घाट घातला होता. त्यासाठी हा खास कागद आणला होता. त्याचे पाकिटही तितकेच खास आणले होते.अगदी चित्रपटात दाखवतात ना तसेच गुलाबी रंगाचे.. इथेच कपाटात कुठेतरी नक्‍की असेल. ते पाकिट मिळविण्यासाठी किती दुकाने फिरलो होतो देव जाणे. सायकल मारुन मारुन पाय थकले होते. त्यावर गुलाबाचे एक फुल चितारले होते. मस्त टपोरे फूल होते ते. तो कागद हातात घेतला आणि विचारांच्या माळेत दोरा ओवला गेला बघ.
किती दिवस.. किती वर्षे सरली तरी त्या कागदाचा शुभ्रपणा तसाच होता. अगदी पांढऱ्या ढगांसारखा. तो काळवंडला नाही की पिवळा पडला नाही. काळाच्या खुणा त्याच्या अंगावर जराही दिसत नाहीत, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमासारखं. काळाचा कधीच त्यावर परिणाम झाला नाही. अगदी व्हावा, अशी इच्छा बाळगुनही. खरेच हे पत्र पहिलं प्रेमपत्र होतं. अगदी कोरं. निखळ, निरपेक्ष आणि सर्वात महत्त्वाचं खूपच निरागस. खरं बोलणारं. आपल्या भावना न दडविणारे, त्याला कसलाच मुलामा न लावलेलं. तुझ्या डोळ्यांसारखं. तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझे डोळे बोलतातच, मी तुला कधी सांगितलं नाही. पण तुझे डोळे खूप बोलतात खूप..खूप.. आनंद झाला की किलकीले हसतात. रागावले की कोरडे पडतातत.. वेदना पापण्यांच्याच्या आड लपवतात.. आज या कागदाने पुन्हा डोळ्यांची आठवण करुन दिली. पापण्या.. कोरिव भूवया.. भूवयांमध्ये लावलेली टिकली.. कधी साधी..कधी चंद्रकोरीसारखी.. किती आठवणी आल्या दाटून.. आज हे पत्र त्याच कागदावर लिहितोय. पण बघ ना. मघाशी प्रिय शब्द लिहिताना त्यातील य चा पाय थोडा लांबलाच. शाई थोडी जास्तच खाली ओघळली.. हा कागद तसाच कोरा ठेवायला हवा होता. जरा माझं जास्तीच झालं.
तुझाच 

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

प्रिय,


खूप दिवसांनी पत्र लिहितोय. कशी आहेस? आठवण येत नव्हती, असे नाही आणि पत्र लिहायला घेतले नाही, असेही नाही, पण लिहिता मात्र आलं नाही हे खरं. तुम्ही शब्दांना कितीही चांगले मित्र माना पण, ते ऐनवेळी तुम्हाला मदत करतीलच असे नाही. खाऊसाठी भर बाजारात हट्‌टाला पेटून मटकन बसणाऱ्या पोरट्यांसारखे कधी ते भोकाड पसरून वाटेतच बसतील याचा नेम नाही; मग कितीही मिनत्या करा, ते ऐकायचे नाहीत, मग त्यांना झटका द्यावाच लागतो. त्या पोराला जशी चापट द्यावी लागते, अगदी तशीच चापट शब्दांना वेळेची द्यावी लागते, मग शब्द वठणीवर येतात. सांगितलेल्या वाक्‍यांच्या मार्गावरुन मग सरळ चालतात. आता हेच बघ ना! मागचे पत्र लिहून आता जवळपास वीस-पंचवीस दिवस होऊन गेले. या दिवसांत कितीतरी वेळा पेनाचे टोक कागदावर टेकवले; पण शब्द काही उमटले नाहीत. सांगायचे उरले नाही, असेही नाही, पण ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी शब्दांची वस्त्रे घालायलाच तयार नव्हत्या. मग कितीतरी वेळा कागदावर रेघोट्या ओढून रात्र काढली. आता आजही सांगायचे खूप आहे. खूप लिहायचे आहे, पण तरीही हट्‌टी शब्द अडून बसलेतच की, आता एवढे गोंजारल्यावर ते नक्‍कीच शांत होतील असं वाटतं...
"तुला बोलायचं असतं एक आणि तू बोलतोस तिसरंच' हा तुझा आरोप मान्यच आहे. आजही बघ मला लिहायचे आहे एक आणि लिहितोय दुसरंच.
तुझी खूप आठवण येत आहे. खूप वाटतं... अगदी आता तुला समोर बसवावं आणि तुझ्या डोळ्यात डोळे घालून रात्रभर त्यात डुंबत राहावं.. हलकेच तुझ्या केसांतून हात फिरवावा...कोणीच बोलू नये... ना तू, ना मी....निःशब्दांतून शब्द उमटत राहावे आणि ते फक्‍त तुला आणि मलाच कळावे..... तुला आठवतं मी तुला काळी म्हटलेलं... आम्ही काही काळे नाही, गहू वर्णीय असं तुझं म्हणणं. ठिकच होतं, पण तरीही तुला चिडवायला मी काळीच म्हटलं होतं.. खरं तर काळी का म्हटलं होतं माहिती आहे तुला... काळा रंग सगळं पोटात घेतो.. क्षमा करण्याचा गुण काळ्या रंगात जितका आहे तितका कुणाच्यातच नाही. आणि जो या रंगाशी सलगी करतो तो या रंगासारखाच होऊन जातो.. म्हणून तू काळीच. आपल्या रंगात रमणारी.. आपल्या रंगाशी एकरुप असलेली...तुझा काळा रंग गडदतेतून आलेला... सगळे गडद रंग एकत्र करुन ते तुझ्यात भरले आहेत आणि ते इतके एकजीव आहेत की त्यामुळे तू काळी भासते आहेस... हा काळा रंग डोळ्यांत साठवून घ्यायचा आहे... अगदी काजळ घातल्यासारखा... मग दुसऱ्या दिवशी ऑफीसात कितीही लोकं कुजबुजू देत की अरे हा काजळ घालून आला की काय? एक दिवस वेडा होण्यातही मजा असते नाही का? नाही तरी तू मला वेडा म्हणतेसच की, कधी कधी...
तुझाच 

रविवार, १५ एप्रिल, २०१२

एक सांज अनुभवायलाच हवी

जगण्याचे संदर्भ बदललेत... एक एक मिनिट महत्त्वाचा ठरू लागलाय... कामं तर पाचवीला पुजल्यासारखीच मागं लागली आहेत... हात रिकामे म्हणून रिकामा वेळ म्हणायचा, तर तोही रिकामा कुठे आहे? मेंदूत तणाव निर्माण करणाऱ्या पेशी कॅन्सरसारख्या वाढत असतातच की! त्या स्वस्थ कुठे बसू देतात... मग एक दिवस सरतो... आठवडे सरतात... महिने, वर्षेही कधी सरून गेली हेच कळत नाही... मागे वळून बघितले तर पाऊलखुणाही दिसत नाहीत... खरं आहे ना!
जरा बाहेर पडून बघा... चैत्र फुललाय... झाडांची हिरवी-पोपटी पालवी सूर्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत आहे... कधी पावसाळ्यात पाऊस आला म्हणून ज्या झाडाखाली थांबलो होतो, त्या झाडांना आता तांबड्या-पिवळ्या फुलांचे गुच्छ लगडलेले आहेत... तापलेले रस्ते मुजोर वाटताहेत खरे, पण ती मुजोरी नाही... नाराजी आहे. संध्याकाळी भरून वाहणाऱ्या रस्त्यांवर दुपारी कोणीच नसते याची... आणि नेहमी पश्‍चिमेच्याच दिशेकडून येणारे ढग आता कुठल्याही दिशेने येत आहेत. आभाळ काळ्या-निळ्या ढगांनी गच्च होत आहे... दिवसभर तापलेल्या धरित्रीवर जणू छत घालावे म्हणून ढग दाटीवाटीने बसलेले असतात... मग हलकेच टप टप करत टपोरे थेंब पडताहेत... कधी कधी गाराही पडताहेत... पण हे अनुभवायला थोडं बाहेर पडायला हवं. एक संध्याकाळ एकटेच रस्त्यावर येऊन फिरायला हवं... किमान खिडक्‍यांची दारे पडद्यातून मुक्‍त करायला हवीत.
चैत्र-वैशाखातला पाऊस हा श्रावणातल्या पावसापेक्षा वेगळा... त्याचा आवेग वेगळा... त्याची गती वेगळी... तो येणार याची खात्री नसते आणि जाताना काय नेईल याचा नेम नसतो; म्हणूनच तर तो कधी काय होईल हे सांगता न येण्यासारख्या आयुष्यासारखा असतो.. "अनप्रेडिक्‍टेबल'. तो येतानाही आवाज करत येणार आणि गेल्यानंतरही आपल्या खुणा मागे ठेवणार... ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखखाट होतोय, ढग गच्च दाटून आलेत म्हणून तुम्ही घरातून बाहेर पडलाच नाहीत तर त्या दिवशी पाऊस यायचाच नाही आणि आज पाऊस नाही येणार म्हणून तुम्ही बाहेर पडावे आणि त्यावेळी हृदयाचा ठोका चुकविण्यासारखी सर्रकन वीज चमकावी आणि धबाबा पाऊस कोसळावा... खरी मजा इथे आहे... या पावसात एकदा भिजलं की मग अख्खा चैत्र-वैशाख कितीही आग ओकत राहिला तरी त्याचा राग येत नाही... चैत्रातील एक संध्याकाळ खरंच अनुभवायला हवी... अगदी पावसाच्या गच्च मिठीत शिरताना अंगावरचा "ब्रॅंडेड' ड्रेस भिजतोय, याची काळजी सोडायला हवी. चिखल बूट, सॅंडलला जरा लागलाच पाहिजे... डोक्‍यावरून ओघळणारे थेंब नाकाच्या शेंड्यावरून अलगद तोंडात घेताना जी मजा आहे ती पंधरा-वीस रुपयांच्या मिनरल वॉटरमध्ये नक्‍कीच नाही. पाकिटातील नोटांना तसेच भिजू द्यावे. बघा या महिन्यात एक संध्याकाळ अशी जगता येते का? संध्याकाळचा बाहेर पडणारा पाऊस मनात साठवता येतो का?... खरंच एक सांज अनुभवायलाच हवी!


** 14 एप्रिललच्या "सकाळ' मध्ये छापून आलेला माझा लेख....**

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

भातुकली...

भातुकली...

त्याने तिला टपली मारली आणि तो आत गेला. बंगल्याच्या दारातच तिने आपला भातु कलीचा खे ळ मांडला होता. गोबऱ्या गालाची, कुरळ्या केसांची, ती चार-पाच वर्षांची मुलगी आपल्या बाहुलीला न्हाऊ-माखू घालत होती.
आत गेला तसा तो सैल झाला. सोफ्यावर अंग टाकून तो पडून राहिला. तू कधी आलास... घराची ती मालकीन असावी. अठ्‌ठेचाळीस-पन्नास वर्षांची असेल. काळ्या रंगाआड केसांचे वय लपविले असले तरी गालावर रुळणाऱ्या काही बटा चहाडी करतच होत्या. चेहऱ्यावर सुरकुत्यांनी खेळ मांडायची तयारी सुरू केली होती. गडद लालीने ओठांची कमान उगाच रुंद केल्याचे वाटत होते. त्याने तिच्याकडे बघितले आणि जोराचा सुस्कारा टाकला.
""बाहुलीला अंघोळ घालणं चालू होतं त्यावेळी आलो.आता ती जेवून झोपी पण गेली असेल. हा हा हा..''
त्याचा हा स्वभाव तिला माहीत होता. कोणत्याही गोष्टीकडे तो नेहमीच विनोदाच्या अंगाने बघायचा आणि मग स्वतःच मोठ-मोठ्याने हसायचा.. त्याच्या बोलण्यातला रोख तिला कळला. पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं.
""चहा-कॉफी काय हवं''
तिचा साधा प्रश्‍न.
""काही नको. बघायला आलो होतो...''
त्याने सरळ मुद्द्याला हात घातला.
""बघितलंस ना मग कशी वाटली.''
तिने सहज राहण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्नच.
""छान आहे. सगळीच मुलं छान दिसतात. त्यात ही पण छान आहे. मला तिचा राग नाहीच..''
""जाऊ दे ना जयंता..'' तिने विषय टाळायचा प्रयत्न केला.
""जाऊ दे तर जाऊ दे... पण तरीही मला काही प्रश्‍नांची उत्तरं नाही मिळाली.
म्हणून आलो इथे..''
""मला तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे द्यायची नाहीत.'' तिने स्पष्टपणे उत्तर देण्याचे टाळले..
"पण..'
"पण नाही आणि बिन नाही. जयंता आपलं काय ठरलं होतं. आपण एकमेकांच्या आयुष्यात डोकावायचे नाही.. मग तुझे हे प्रश्‍न का'
""का?''
जयंताने चेहरा त्रासिक करत प्रश्‍न विचारला.
""कारण ती माझं नाव लावणार आहे. आपला अजून घटस्फोट झालेला नाही, म्हणून.''
"हो! मग नाही लावणार ती तुझं नावं. तुझं नाव तिला लावण्यात मला स्वारस्य नाही.''
तिने तोडायचं म्हणून सांगून टाकलं.
""प्रश्‍न नावाचा नाही.. हे तुलाही माहीत आहे.''
जयंताने जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न केला. तू उद्या आणखी दहा मुलं आणलीस आणि त्यांनी माझं नाव लावलं तरी मला हरकत नाही, हे तुलाही माहीत आहे. मला त्या मुलीविषयीही राग नाही.. पण हेच जर करायचं होतंतर मग...'
""मग काय''
"मग जणू तुला माहीतच नाही..''
जयंताने प्रश्‍न विचारायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तिने चेहरा बाजूला केला.
मघाशी भातुकली खेळणारी ती मुलगी आत आली. तिने डाव्या हातात बाहुली घट्‌ ट धरली होती. डोळ्यात करुणेशिवाय दुसरा भाव नव्हता. गालांवर उदासतेचे ढग दाटीवाटीने बसले होते. त्या मुलीने एकदा तिच्याकडे आणि एकदा जयंताकडे बघितले. मग तिने हलकेच हातातील बाहुली समोरच्या टेबलवर ठेवली आणि तिच्यापाशी आली. जयंता बघत होता. तिला न्याहाळत होता. तिने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर जयंताकडे बघितले. मग हलकेच तिने जयंताच्या पायाला हात लावला आणि मग तिच्या पायाला.... जयंताला कळले नाही. काय होतंय ते.. तिने ती बाहुली उचलली आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. जयंता तिच्या पाठमोऱ्या बाल मूर्तीकडे बघत राहिला.
"जयंता... मला वाटतं तुझ्या प्रश्‍नांची उत्तरं तुला मिळाली असतील..'
तिच्या या वाक्‍याने तो प्रचंड अस्वस्थ बनला. त्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला होता. कोणीतरी त्याचा गळा आवळतोय असं वाटत होतं. तो तिच्याकडे बघत होता आणि स्वतःला शिव्या घालत होता. त्या क्षणी त्या घरात राहणं म्हणजे नरक वाटून तो ताडकन्‌ बाहेर पडला. दरवाजातून बाहेर येताना त्याचा पाय एका खेळण्याला लागला. चटकन त्याचं मन हललं. त्याने ते खेळणं उचललं. त्याला त्या मुलीची नजर आठवली आणि मग तिची. आयुष्यात एवढा मोठा भातुकलीचा खेळ त्याने बघितला नव्हता. जिवंत खेळण्यांनी खेळणाऱ्या तिच्या भातुकलीच्या खेळाचे तो एक खेळणे केव्हांच होऊन गेला होता. आता त्यात आणखी एका खेळण्याची भर पडली होती..
**पाडवा सृजनमध्ये प्रसिध्द झालेली माझी लघुकथा**