शुक्रवार, १५ जुलै, २०११

पाऊस

तो....
काळ्या ढगांचा हिला एवढा नाद का? नादच, नाही तर काय!
ढग जमू लागले की ही तिची उरत नाही. सगळी हातातील कामे बाजूला टाकून ती अंगणात येते, ढगांच्या काळ्या पंखाखाली स्वतःला हरवून बसते. कानठळ्या बसविणारा तो ढगांचा गडगडाट ऐकण्यासाठी जन्माची आतूर झाल्यासारखी वाटते. निसर्गातील प्रत्येक श्‍वासाला घाबरवून सोडणाऱ्या त्या आवाजाने हिला कोणती मोहिनी घातली आहे कोणास ठावूक. पण तिला तो आवाज आवडतो. त्या लखलखणाऱ्या विजांचा तिच्या नितळणाऱ्या सावळ्या चेहऱ्यावरून परावर्तीत होणारा तो प्रकाश जेव्हा माझ्या खिडकीत येतो त्यावेळी तो गोळा करून साठवून ठेवावा वाटतो. किती पावसाळे लोटले पण, पहिल्यांदा तिला पावसात भिजताना बघितले तेव्हाची "ती' आणि आजची "ती' तशीच आहे उत्कट. उत्कटता हाच तर तिच्यातील आणि पावसातील समानतेचा धागा. कधी कधी प्रश्‍न पडतो की, तिचा हा सावळा रंग तिने ढगांकडून घेतला की ढगांनी तिच्याकडून. दोघांकडेही स्वतः रिते होऊन दुसऱ्याला सर्वस्व देण्याचा गुण. पाऊस जणू तिच्यात पुरता भिनला आहे. कधी ती गडगडाटासह येणाऱ्या वादळी पावसासारखी वाटते तर कधी आषाढातल्या मुक्त होऊन कोसळणाऱ्या सरीसारखी, तर कधी श्रावणसरींसारखी हलकेच बरसत राहते. ती अशी बरसत राहते म्हणूनच तर आपल्या रखरखीत आयुष्यात हिरवाई आहे....

ती
"तो' असा का आहे हा प्रश्‍नच आहे. वळवाच्या ढगांसारखा अगदी अनाकलनीय. कधी कोसळेल? कधी नाही काहीच पत्ता लागू देत नाही. पावसाचं याला वावडं म्हणावं तर तासन्‌तास खिडकीत बसून "तो' पाऊस न्याहाळत असतो; पण त्याने कधी ओंजळ गजाबाहेर काढून हात ओले केल्याचं स्मरत नाही. पावसात चालायची वेळच जर आली, तर इतका अंग चोरुन चालतो की रेनकोटवरचा पाऊसही जणू त्याच्या अंगाला छेडतो की काय असे वाटते. भर पावसात हा इतका कोरडा कसा राहू शकतो? कधी कधी ढगांनाच जणू तो जमत असेल तर मला भिजवून दाखवा, असे आव्हान करतो आणि त्यावर हे आव्हान न पेलवल्याने ढग थयथयाट करतात की काय असे वाटून जाते. पण तो आहे तसाच आहे म्हणून तर मी आहे. तो त्या खिडकीत उभा असतो त्यामुळेच तर त्या ढगांच्या आवाजाची भीती नाही वाटत. एकटीला भयग्रस्त करणारे ते ढग, तो सोबतीला असला की
अगदी सुतासारखे सरळ वागायला लागतात. मग त्यांच्या त्या गर्जनेत ढोलांचा नाद ऐकायला मिळतो, विजांचा लखलखाट अंगभर घ्यावा वाटतो, पण त्यासाठी तो खिडकीत उभा असायला हवा. तो समोर असतो त्यामुळेच तर हे ढग आणि वीज आपल्या मर्यादा नाही सोडत...