शनिवार, २४ डिसेंबर, २०११

आणखी एक दिवस बुडाला....

तो
आणखी एक दिवस बुडाला. हा सूर्य पश्‍चिमेला गेल्यावर एक अनामिक ओढ निर्माण होत आहे. सूर्याचा हा प्रवास थोडा वेगात करता आला तर... आयुष्य जर-तर वर चालत नाही. व्यवहाराच्या पक्‍क्‍या भिंतींनी आयुष्य कोंडलेलं असतं. कितीही म्हटलं तरी या भिंती मोडकळीला येत नाहीत. त्याची रंगरंगोटी होते एवढंच. आज ती कुठे असेल.. अशीच माझ्यासारखी कातरवेळी मनात हुरहूर घेऊन एकांतात बसली असेल, की कामाच्या ओझ्याखाली स्वतःला दाबून टाकून स्वतःलाच हरवून बसली असेल.. की, प्रश्‍नांच्या जंजाळात तिने स्वतःला अडकवून घेतले असेल. अनेक प्रश्‍न तिच्या मनात उमटत असतील.. मी का थांबलो नाही...? का, पुन्हा एकदा तिचा हात जोरात पकडून तिला सांगितले नाही की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही... ? अर्ध्या वाटेत का सोडलं..? .जर सोडायचेच होते तर कशाला आशेचे मोरपंख लावायचे.. कितीतरी प्रश्‍न.. प्रश्‍नांचा कोळी तिच्याभोवती आपली जाळी विणत असेल आणि ती त्यातून स्वतःला सोडवत असेल....माहित नाही. कदाचित विसरूनही गेली असेल. नव्या वाटेवर नव्या सवंगड्याबरोबर खूष असेल. काहीच माहित नाही.... जगणं इतकं अवघड या पुर्वी कधीच नव्हतं. व्यवहाराच्या भिंती इतक्‍या उंच व इतक्‍या काळ्या कधीच भासत नव्हत्या, ज्यात साध्या मैत्रीच्या नात्यासाठीही झरोका नसावा. कालप्रवाहाचा हा वेग वाढावा, त्या प्रवाहाच्या आवेगात या भिंती कोसळाव्यात आणि जगण्याला एक निमित्त मिळावं. खरे, तर हीच भावना एक निमित्त आहे जगण्यासाठी!. कधीतरी या भिंती कोसळतील हीच एक आशा आहे. कालप्रवाहाचा वेग वाढवावा आणि त्याच्या खुणा अंगावर दिसाव्यात. जख्खड म्हातारपण यावं, जिथे समाजाच्या बंधनांचा पिळ सुटलेला असेल, खुपऱ्या झालेल्या डोळ्यातूनही जाणिवा प्रकट होतील, अगदी तिथपर्यंत पोचायचे आहे. हा आजचा एक दिवस बुडाला, असे अनेक दिवस बुडावेत आणि मग तो एकच दिवस उगवावा. जो एकच दिवस जगलो तरी आयुष्य तृप्त व्हावे.... आजचा आणखी एक दिवस बुडाला...

ती
आणखी एक दिवस बुडाला.....मावळतीचे रंग खूप फिके वाटताहेत आज. आजच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसांत हा केशरी रंग केशरी वाटतच नाही. जणू आयुष्याचेच रंग फिके पडलेत की काय? असे वाटते. तो सोडून गेला याचे दुःख आहे, की त्याला जाऊ दिले हेच कळत नाही. हात सोडवून घेताना त्याचीही नक्‍कीच घालमेल झाली असेल, किंबहूना आपल्यापेक्षा जास्त त्याचीच घालमेल झाली असणार, हे निश्‍चित! वेड्यासारखं मरायचा. बोलायचा कमी, पण ऐकायचा खूप.. प्रेम करायचा... आणि ते जाणवूही द्यायचा. त्याच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला धीरच झाला नाही. ज्यावेळी द्यावा वाटला त्यावेळी त्याने हात सोडवून घेतला होता. मोरपंखी काही दिवस त्याच्या सहवासात गेले खरे पण त्याच्या आठवणींवर कसे जगायचे. व्यवहाराच्या भिंतीपलीकडील त्याची कुजबूज ऐकावी म्हटलं तरी ते शक्‍य नाही. रितेपणा जावणतो आहे सगळा... त्याच्या नसण्याचा... तो नव्हताच कधी; पण तो येण्याची एक आस होती. तीही मावळली.. या मावळतीच्या सूर्याप्रमाणे आता अंधार आणि मग त्यातून डोकावणारा चंद्र.. चांदण्या.. याच तर सोबतीला... प्रत्येक रात्र हवीहवीशी वाटावी... चांदण्याच्या जागा बदलताना, चंद्राच्या कला न्याहाळताना रात्र सरावी... डोळ्यात झोप असतानाही अशा कितीतरी रात्री जागून काढल्यात, रात्रीसारखी सखी नाही, तिच्या खांद्यावर डोके ठेवून कितीहीवेळ रडा, ती खुलासे मागत नाही. थोपटत राहाते. आजचा दिवस संपला... असे अनेक दिवस संपतील.. कधीतरी एक दिवस नक्‍की येईल, जो रात्रसखीप्रमाणे खुलासे मागणार नाही... व्यवहाराच्या भिंती इतक्‍या जोरात कोसळतील की पलीकडची कुजबूजच नाही तर त्याची हाकही ऐकू येईल...त्या एका दिवसासाठी असे अनेक दिवस जायला हवेत.... आजचा आणखी एक दिवस बुडाला.....