रविवार, १९ डिसेंबर, २०१०

नारंगी

ते रानबोरांनी लदडलेलं झाड बघत ती पोरं फाटकाच्या दारात रेंगाळली होती. त्यांचे आई-वडिल समोरच चालू असलेल्या रस्त्यावर काम करत होते. त्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या सावलीत ती पोरं खेळत होती. त्यातच एकाची नजर त्या बोरांनी बहरलेल्या झाडाकडे गेली आणि मग ती फाटकापाशी रेंगाळू लागली. फाटकाच्या कोपऱ्यावर असलेली वॉचमन केबीन आणि त्यातल्या त्या मिशावाल्या बंदुकधारी माणसाची नजर त्यांना आत जाण्यापासून रोखत होती, पण तो कधीतरी तिथून जाईल आणि आपल्याला आत शिरता येईल या आशेने ती तीन-चार पोरं त्या तिथंच रेंगाळत राहिली. थोडा वेळ तसाच गेला... त्या केबीनमधला तो मिशावाला बंदुकधारी आता कुठेतरी गेला होता. एका पोराच्या ही बाब लक्षात आली. त्यानं इतरांना खुणावलं आणि त्या तीन-चार पोरांनी हलकेच फाटक ढकललं. फाटकाचा किर्र-कट असा आवाज आला पण लगेच थांबला. ती पोरं पळतच त्या बोराच्या झाडापाशी गेली. तिथे तर पिकलेल्या बोरांचा सडा पडला होता. आता एक बोर तोंडात आणि थोडी फाटक्‍या ओट्यात साठवत ती पोरं त्या झाडाभोवती पिंगा घालू लागली.... पोरांचा दंगा वाढला तसा तो मिशावाला तिथे आला... त्या पोरांचा चाललेला पिंगा त्याने बघितला आणि न बघितल्यागत करुन तो केबीनमध्ये शिरला. पोरांना वाटलं त्याचं लक्षच नाही. पोरांनी झाडाला हलवायला सुरवात केली. बोरांचा आणखी सडा पडला. ती आंबट गोड, पिठूर बोरं तोंडात घालत मिटक्‍या मारत पोरं झाडाभोवती फिरत होती. हाताला लागेल ती हिरवी, पिवळी, नारिंगी बोरं गोळा करत होती... एवढ्यात फाटकाचा दरवाजा पुन्हा करकरला. एक मोठी गाडी आत आली... मघाच्या मिशावाल्यानं त्यातल्या साहेबाला नमस्कार केला. ती गाडी पुढे गेली... पोरांचं लक्ष गाडीकडे गेलं... ती पुढं गेलेली गाडी मागे आली... तो मिशावाला बंदुकधारी लगबगीने पुढे गेला... आणि मग गयावया करु लागला... पोरांना काही समजले नाही... तो तसाच गेला... त्याने फाटक लावले आणि त्याला कुलूप घातले... आणि तो पोरांकडे येऊ लागला... आता पोरांना भीती वाटू लागली होती... आता हा आपल्याला मारणार!... त्यातल्या लहान पोरांना मोठ्याने आपल्या पाठिशी धरले आणि हात पुढे केला... त्या मिशावाल्याने त्या पोरांना मारलं नाही. चला, साहेबांनी बोलावलंय... पोरांना आता पळून जावं वाटलं... पण फाटक बंद होतं..... पोरं गुमान त्या मिशावाल्याच्या मागून चालू लागली... थोड्यावेळाने बंगला आला... मघाच्या त्या गाडीतला तो उंचापुरा साहेब गाडीच्या बाहेर उभा होता... पोरांना आता हा आपल्याला काय शिक्षा करणार याची उत्सुकता लागली होती... साहेब तिथल्याच एका पायरीवर बसला... त्याने पोरांना जवळ बोलावलं... ओट्यातली बोरं सांभाळत पोरं जवळ गेली... साहेबाने त्या बोरांकडे बघितलं...बोरं कोणी कोणी खाल्ली... साहेबाच्या या प्रश्‍नावर कोणीच काही बोललं नाही... साहेबानं पुन्हा प्रश्‍न विचारला... साहेबाची भाषाच पोरांना कळली नाही... साहेब या बोरांबाबतच काहीतरी विचारत असणार याची त्यांना खात्री होती... त्यामुळे त्यातल्या दोघा मोठ्या पोरांनी माना डोलावल्या. बारक्‍यांनीही त्यांचं अनुकरण केलं... साहेबाने त्यांना ओट्यातली बोरं खाली टाकायला सांगितलं... पोरांनी बोरं खाली टाकली... मग साहेबाने त्यातल्या सगळ्यात लहान पोराला जवळ बोलावलं,तुला चॉकलेट आवडतं?... पोराला साहेबाची भाषाच कळली नाही... त्यामुळं ते मख्ख चेहरा करुन उभं राहिलं... साहेबाला काय करावं काही कळेना... साहेबाने आत हाक मारली... त्याबरोबर एक नोकर पळत पुढे आला... त्याला काहीतरी साहेबांनी सांगितले... तो लगबगीने गेला आणि बरीच चॉकलेटं घेऊन आला... साहेबाने प्रत्येक पोराला चॉकलेट दिलं... पोरांना ते चॉकलेट फोडता येईना... साहेबाने त्यातलं एक चॉकलेट फोडलं आणि खाल्लं. पोरांनी बघितलं आणि तसंच ते चॉकलेट फोडून तोंडात टाकलं... पोरांची भीती पार पळाली होती... पोरांनी आता आपल्या ओट्यात, खिशात ती चॉकलेटं भरुन घेतली... साहेबाने त्या मिशावाल्या बंदुकधाऱ्याला पुन्हा खुणावलं... तो लगबगीने पुढे झाला. पोरांसाठी फाटक खुलं झालं... पोरं आनंदानं उड्या मारत गेली... फाटक बंद करुन तो साहेबांपाशी आला... साहेब त्या विखुरलेल्या बोरांकडे बघत होता... ती पिवळी नारिंगी बोरं त्याला खुणावत होती... त्यातलं एक बोर त्यांनं उचललं आणि तोंडात टाकलं... त्या पिढूर नारंगी बोराच्या आंबट तुरट चवीने साहेबाच्या मनावरचे अनेक बंध सुटे झाल्याचे त्या बंदुकधाऱ्या मिशावाल्याला वाटले....

शनिवार, १८ डिसेंबर, २०१०

कुलकर्णी

समस्त कुलकर्ण्यांची माफी मागून....
मला नेहमी प्रश्‍न पडायचा की नावाच्या शेवटी जे काही आपण लावतो त्याला आडनाव का म्हणायचं. या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी मी खूप पुस्तके चाळली, अनेक लोकांना भेटला पण समाधान करेल असे उत्तर मिळाले नाही. एखाद्या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही की मला कुलकर्णी आडनावं आठवतात. जगातील सर्व प्रश्‍नांची उत्तरे आपल्याकडे असतातच या आविर्भावात ते असतात.त्यामुळे या प्रश्‍नाचे उत्तरही त्यांच्याकडे असावे हे मानून मी एका कुलकर्ण्याला हा प्रश्‍न पुसला. पहिल्यांदा मी प्रश्‍न पुसला आणि नंतर त्याने आपल्या ज्ञानाचा बोळा माझ्या मेंदवारुन फरशीवरुन फडकं पुसावं तसा पुसला. आहे हो.... काय आहे त्यात.... आडनाव का म्हणतात तेच ना आहे की उत्तर आहे ... कुलकर्ण्यांनं आपल्या पोटावरुन हात फिरवत उत्तर दिलं.हे बघ... (पुढचा माणुस कितीही लहान असो वा मोठा त्याला एकेरी हाक मारण्याची यांची कसब वादातीत आहे.... )जे नाव इतरांच्या प्रगतीच्या आडवे येतं ते आडनाव.... कुलकर्ण्यांनं आडनावाची केलेली ही व्याख्याआपल्याच आडनावरुन केल्याचं कोणाच्याही लक्षात येईल. पण खरेच आहे ही व्याख्या इतरांना लागू पडो अथवा न पडो पण समस्थ कुलकर्ण्यांना लागू पडते हे निश्‍चित......अहो! काही म्हणा महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर पाटील आणि कुलकर्णी इतरांच्या कायम आड येऊन उर्वरितांना विहिरीत कसे ढकलायचे याचाच विचार करत असतात की काय असा प्रश्‍न मला पडत आला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात निम्मे पाटील आणि उरलेले कसले तरी खरे तर कसलेले पाटील असल्याने सत्तेत असलेल्यांबद्दल आम्ही बोलत नाही. त्यामुळे पाटलांच्या आड जाणे आम्हाला परवडण्यासारखे नसल्याने आम्ही त्यांचा आडा आडानेच उल्लेख करतो. पण कुलकर्णी ना सत्तेत ना विद्‌वत्तेत. तरीही आपलं घोडं पुढं दामटायचं यांना चांगलं माहित.आता परवाचीच गोष्ट एक ग्रहस्थ बसमधुन निघाले होते.... गाडी तशी रिकामीच त्यामुळे आपले बाकड्‌यावर जरा पसरुनच बसले होते... एका बाजुला पिशवी... पिशवीतून डोकावणारी शेवग्याची शेंग... त्या पिशवीचा तुटलेला एक बंध आणि तो दुसऱ्या बंधाला बांधलेला... आता हा इसम अशा अवस्थेत पसरुन बसल्यावर तो कुलकर्णीच असणार यात शंका घेण्याचे कारण नाही... एवढ्यात दुसरा एक माणुस बसमध्ये चढला... इतकी गाडी रिकामी असूनही त्याला तो बाकडाच आवडला...सरका?आता त्याचा तो आवाज आणि सरका म्हणण्याच्या पध्दतीवरुन तो पाटील असणार हे नक्‍कीच... पण लगेच ऐकतील ते कुलकर्णी कसले... क्‍यॉ पुढे जागा नाही.... आता गप्प सरकून बसायचं का नाही....पण बदकाच्या क्‍यॅ क्‍यॅ प्रमाणे कुलकर्ण्यांने आपला चोमडेपणा केलाच....का जागा तुझ्या बापाची आहे....आता मात्र कुलकर्ण्या भ्याला... आपला लेचापेचा दंड दाबत त्याने पिशवी उचलली..प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची सवयच यांना लागलेली असते. एकुणच कुलकर्णी ही जमात विलक्षण वेगळी.. यांची तऱ्हाच निराळी.... वर्षानुवर्षे कारकुनी केल्याने यांच्या रक्‍तातच कारकुनी भिनलीय की काय असा प्रश्‍न पडतो... म्हणजे एखाद्या कुलकर्ण्यांनं जर मान मोडली तर त्यातून कार कुन कार कुन... असाच आवाज येतो की काय हे बघायला पाहिजे....कुठल्याही वर्गातील पोरांना तू मोठेपणी कोण होणार असं विचारा.... जे पोरगं ठोसपणे नोकरी म्हणतंय ते कुलकर्णी आहे हे बीनदिक्‍कत समजायचे..... कुलकर्ण्यांची पोरं.....इंजिनिअरिंगपासून एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतील आणि परत आएएसच्या परीक्षेला बसून नोकरीच करतील.... कुलकर्ण्यांच्या बायकांची तऱ्हाही निराळी असते.. कधीही बघा... चार कुलकर्ण्यांच्या बाया एकत्र आल्या की त्यांच्यातील संवाद ऐकायचा.... ती भटीन... आता ही भटीन म्हणजे जोशी आडनावाची कोणतरी बाई असणार हे नक्‍की.... ती नोडगीन आता ही नोडगीन म्हणजे कोण हे मात्र त्या गावातील इतर आडनावांर अवलंबून म्हणजे सरदेसाई, सोनटक्‍के अशा अडनावांच्या बायकां... कुलकर्णी सोडून इतर सर्व बायकांना यांच्या काही ना काही उपाध्या असतातच... वन्स, वहिनी, आणि काकू असा उल्लेख ज्या बायकांचा होतो त्या कुलकर्ण्यांच्याच कोणीतरी असणार हे नक्‍की...पण काही म्हणा ज्या गावात कुलकर्णी आणि पाटील या आडनापैकी जर एक आडनाव गावात नसेल तर शिळोप्याच्या गप्पात पाटलाचा पोर आणि कुलकर्ण्याची पोरगी आणायची कोठून........

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

हिरवा


""तुला माहीत होतं मी या कार्यक्रमाला येणार होतो ते'', त्यानं विचारलं.
हो !
ती नेहमी तुटक बोलायची... त्याला त्याची सवय झाली होती. आजही ती खूप बडबडेल मनातलं सगळं सांगले, याची अपेक्षा नव्हतीच पण तरीही ती थांबली याचेच त्याला खूप होते.
किती वर्षे झाली असतील नाही,
तो काही तरी बोलायचे म्हणून बोलला...
अठरा...
पुन्हा तिचे तुटक उत्तर.... हो अठरा वर्षे झाली... काळ गेल्यानंतर तो कसा गेला वाटतो पण खरेच ही आठरा वर्षे कशी काढलीत ती मलाच माहित.ती काही बोलली नाही.... आपलं बोलणं तिला आवडलं नाही काय असं वाटून तो मध्येच थांबला.... काही क्षण तसेच निःशब्दात गेले त्या कार्यक्रमातील इतकी धावपळ आणि गोंधळातही दोघांना त्यांच्यातील शांतता असह्य झाली
"बोला की'...
ती पुटपुटली.
""गेल्या आठरा वर्षांत आज तू भेटशील, उद्या तू भेटशील असे वाटत राहायचं.. खरे तर अनेकदा तुला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडायचो पण पाय साथ द्यायचे नाहीत. कितीतरी वेळा परतलोय तुला भेटण्यासाठी निघून....''
ती त्याच्याकडे एकटक बघत होती, जणू तो बोलत असलेला प्रत्येक शब्द अन्‌ शब्द ती मनात कोरुन घेत होती.
"" तुला कधी वाटलं का मी तुला भेटायला येईन असं...''
त्याला हा प्रश्‍न आपण विचारायला नको होता, असं वाटून गेलं पण तरीही तिच्या उत्तराच्या अपेक्षेने तो थांबला....
"" नाही !'' ती बोलली... यावेळी त्यानं तिच्या डोळ्यात खोल बघितलं त्यातून त्याला काही दिसतं का.... तिच्या नाही म्हणण्यात ठामपणापेक्षा नाराजी जास्त दिसली.
का? असा प्रश्‍न विचारावा वाटला पण त्यानं घाई केली नाही....काही तरी बोलायचं म्हणून त्यान विचारलं.
""आज थंडी खूप आहे नाही. तू स्वेटर नाही घातलास...
अरे स्वेटरवरुन आठवलं तुला हिरवा स्वेटर हवा होता आणि मला तो आवडला नव्हता कितीवेळ तू माझ्याशी बोलली नव्हतीस तुला प्रत्येक गोष्टीचा रंग हिरवा का नाही असाच प्रश्‍न पडायचा? घराची अक्षरशः बाग केली होतीस...
त्यावेळी मी तुझ्यावर रागवायाचो, आदळाआपट करायचो... पण तू गेल्यानंतर मात्र घरातील प्रत्येक कुंडी मी आजही जपली आहे आजही ती बाग तशीच आहे हिरवीगार.... घराचे पडदे अनेकवेळा बदलले पण त्यांचा हिरवा रंग आजही तसाच आहे...... तुझे सगळे कपडे हिरव्या रंगाचे असायचे नाही, अगदी रुमालापर्यंत. त्याच्या ओठातून हे वाक्‍य निघाले आणि त्याचे लक्ष तिच्या साडीकडे गेले. तिने अमंगळ साडीचा पदर चाचपला. आत्तापर्यंत त्याच्यावर खिळलेली तिची नजर खाली झुकली. तिच्या साडीचा रंग वेगळा बघून त्यालाही काही सुचले नाही..... पुन्हा दोघांत निःशब्दता आली.. काही रिकामे क्षण तसेच निघून गेले....खरे तर ते क्षण रिकामे नव्हतेच उलट आतापर्यंत जगलेल्या आयुष्यातली पोकळी भरुन काढून ओसंडून वाहू देणारे इतके भरलेले.... तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरची एक एक रेघ निरखीत होता.
""आता हिरवाई उरली नाही....ती बोलली. तुझ्यापासून वेगळं झाल्यावर वाटलं होतं आता आयुष्य आपल्या मर्जीनुसार घालवायचं..... मला कोणाचीच बंधने नको होती. काही काळ गेलाही तसाच... पण नंतर ते जगणं बेचव वाटू लागलं. तुझ्याकडे परतायचे सगळे दरवाजे मीच बंद करुन घेतले होते. त्यामुळे तो रस्ता बंदच होता. पर्याय काहीच नव्हता. त्यानंतर "तो' माझ्या आयुष्यात आला. आमच्याच ऑफीसमध्ये काम करायचा. लग्न केलं दहा वर्षे संसारही केला. अगदी निमूटपणे केला. पण आमचे सूर काही जुळले नाहीत. तुझ्याबरोबर घालवलेल्या दिड वर्षांतील मोजके क्षणही त्याच्याबरोबरच्या दहा वर्षात मिळाले नाहीत. तो माझ्यावर प्रेम करायचा का? मी त्याच्यावर प्रेम केलं का? खरेच तो माझ्या आयुष्यातून गेल्यावर जी पोकळी जाणवायला हवी होती ती जाणवते का? या प्रश्‍नांची उत्तरे मला आजही सापडलेली नाहीत. ती भरभरुन बोलत होती. इतकी ती कधी बोललीच नव्हती. ..... तो गेला आणि माझं हिरवाईशी नातं तुटलं... तू मघाशी विचारलंस ना की तू येशील का? असे कधी वाटले होते का? खरे तर त्या प्रश्‍नाचं उत्तर होतं, तू येऊ नये असंच वाटायचं. अगदी दिवस सुरु झाला की एक भीती वाटायची की तू कुठेतरी भेटलास तर आपल्याला तुला सामोरे जाता येईल का?तुला आठवतं मी एक पोपट आणला होता.. त्या पोपटावरुन तुझ्यात आणि माझ्यात किती भांडणे झाली होती.
"" किती मुर्ख होतो मी. मला खरेच कळलं नाही तुझ्यापेक्षा पोपट जास्त महत्त्वाचे वाटत होते.''
"" तू नाही रे मीच मुर्खपणा केला. सौंदर्य स्वातंत्र्यात असते याची जाणिवच नव्हती. ऐक तो पोपट नंतर आमच्या घरात होतां बराच काळ. पण एक दिवस काय झालं काय ठाऊक, पिंजऱ्याचे तोंड उघडे राहिले. पण तो काही हलला नाही.. त्या दरवाजातून बाहेर पडायचेच त्याला कळले नाही. माझ्या हिरवाईचेही तसेच झाले. पहिल्यांदा मला हिरवा रंग आवडतो म्हणून आख्खं घर मी हिरवं केलं आणि नंतर तो हिरवा मीच माझ्यावर लादत गेले.
तो गेल्यावर मात्र हिरव्याचे दार मी उघडले. आणि पुन्हा त्यात प्रवेश नाही केला.
""चल जाऊ या! '' त्यानं विचारलं. तुला सोडू घरी... त्यानं विचारलं... तिनं नकार दिला नाही.
तिच्या घरचा रस्ता याच्या घरावरुन होता. यानं तिला घर दाखवायला आत नेले. ती जसे घर सोडून गेली होती अगदी तसंच घर होतं. अठरा वर्षांपुर्वीचे घर आणि आताचे घर यात काहीच फरक नव्हता. कुड्यांही तशाच आणि त्यातील झाडेही तशीच.... तुझी इतकी सवय झाली होती की काहीच बदलू दिले नाही... त्याच्या या वाक्‍याने ती भानावर आली. तिने त्याच्याकडे बघितले.... त्याचे डोळे भरुन आले होते...तिच्याही कडा ओल्या झाल्या होत्या....तिने जिथे पिंजरा ठेवला होता. त्याच ठिकाणी त्यानं पिंजरा आणून ठेवला होता... त्यातील पोपटाकडे तिने बफघितले....तिने हलकेच त्याच्या दरवाजाची कडी काढली. कडी काढताच पोपट उडाला आणि त्या अंधारात दिसेनासा झाला....
चलायचं....ती पायऱ्या उतरता उतरता म्हणाली...तोही लगबगीने तिच्या मागून चालू लागला. ती थांबली... त्याचा हात हातात घेतला आणि पायऱ्या उतरु लागली.... तिच्या डोळ्यातून उडालेले पोपट त्याच्या डोळ्यात दिसत होते..........

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

भात पीठलं...

खिशातील पाचशेची नोट त्यानं दोनदा चाचपून बघितली. पगार होण्याला अजून किमान दहा-बारा दिवस तरी आहेत. हे दहा दिवस ही नोट जपून वापरायला पाहिजे. खरे तर या महिन्यात तशी तोशीस पडण्याची कारण नव्हते, पण पोरांनी हट्‌टच केला बाबा कुठेतरी फिरायला जाऊया.... बायकोनेही मग पोरांच्या हो मध्ये हो मिसळला आणि मग पर्याय नव्हता. सज्जनगडाच्या त्या गंधीत वातावरणात आपण आज इकडे आलो ते बरेच झाले असं त्याला वाटू लागलं. मग पोरांचे हट्‌ट त्याने बिनबोभाट पुरवायला सुरवात केली. मनाला एक प्रकारची शांती मिळाली.
बायकोला तो म्हणालाही
""बरं झालं आपण आज आलो इकडे. त्या रोजच्या दगदगीच्या दलदलील नाका तोंडात सगळा चिखल जातो बघ, कितीही हातपाय हलवा तसूभरही इकडे वा तिकडे जात नाही... चिखलातच खोल खोल जात राहतो आणि मग धडपड फक्‍त नाक वर राहण्याची करायची... या धडपडीत कधी उगवलेला दिवस मावळतो तेच कळत नाही....
तो काय बोलतो हे त्याच्या बायकोला काही समजायचे नाही, हे त्यालाही कळायचे पण तो बोलत राहायचा... पुर्वी कधी कधी त्याला तिचा राग यायचाही पण पर्याय नसायचा...मग तो उठून निघून जायचा... कधी कधी रात्री उशीरा परत यायचा, तोंडाचा वास लपवत...
पण अलीकडे त्याची बायको समजुतदार झाल्यासारखी वागायची... तिला त्याचं कोड्यातलं बोलणं कळायचं नाही पण ऐकून घ्यायची, कधी कधी ती मानही डोलवायची... तिला काय समजलं असेल का नसेल याचा तो आता विचार करायचा नाही पण बोलत राहायचा....
ती काही बोलली नाही, फक्‍त हुं हां तिने केले. पोरं लांब खेळत होती. त्यानं खिशात पुन्हा हात कोंबला आणि ती नोट चाचपली. पोराच्या शाळेत दोनशे रुपये द्ययाचे होते.. शंभर रुपये भाड्याला जाणार होते....मग दोनशे रुपये शिल्लक राहणार होते. आता तेवढ्यावर दहा-बारा दिवस कसे काढायचे, पण निघतील काहीतरी करुन निघतील... तो स्वतःशीच पुटपुटला.... संध्याकाळेने आता अंगावर अंधाराची चादर ओढून घेतली होती... त्याला आता गडावरुन खाली उतरायची घाई झाली होती... शेवटची गाडी चुकली की गडावरुन पहाटेच खाली उतरता येणार होते... रात्र गडावर काढणे त्याला परवडणारे नव्हतेच... त्याने लगबगीने पोरांना हाक मारली आणि स्टॅंडच्या दिशेने चालू लागला.... मनात देवाचे नाव घेत तो एक एक पाऊल टाकत होता.... तो स्टॅंडवर पोहचला...
शेवटची गाडी कधी सुटणार? दुकानदाराला त्याने प्रश्‍न केला.
अर्धवट राहिलेले शटर बंद करत तो पुटपुटला
सुटली....
काय गाडी सुटली, अहो रात्री आठ वाजता गाडी सुटते ना?
हो पण गडाचा दरवाजा आता आठला बंद होत असल्याने पावणे आठलाच गाडी सुटते... तुम्ही पोहचेपर्यत गडाचा दरवाजाही बंद होणार
मग?
मग काय पावणं, आता रात्र इथेच काढायची...
मंदिराचे भक्‍तनिवास आहे... तिथे झोपण्याची मोफत सोय आहे... फक्‍त जेवणाची सोय तुम्हाला करावी लागणार.... त्याच्या डोळ्यापुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले... आजची रात्र इथे काढायची म्हणजे जेवणाचाही खर्च वाढला....खिशातली ती पाचशेची नोट आता त्याला ढिसूळ लागू लागली...
मघाशी त्याला पोरांचा हेवा वाटू लागला होता... आता त्यांचा त्याला राग यायला लागला. कशाला यायचं इथे... घरात काय जीव जात होतो यांचा.... त्याला बायकोचाही राग यायला लागला. काय आफत आहे, मठ्‌ठ आहे नुसती... तो त्या मंदिराच्या भक्‍तनिवासात पोहचला. तिथल्या कर्मचाऱ्याने त्याला राहण्याची जागा दाखविली. तिथे असलेल्या चादरीवर तो आडवा झाला. आता सकाळच्या पहिल्या गाडीने परतायचे एवढेच त्याच्या डोक्‍यात होते. त्याचा तिथेच डोळा लागला. थोड्यावेळाने पोराच्या रडण्योन त्याला जाग आली. त्याची आईने त्याला बहुतेक मारले असावे. त्याने विचारलं का मारलंस...
सकाळपासून नुसता भूक भूक करतोय... आता हाडं खा म्हणावं...
एकदा त्याची आईही त्याला असंच म्हटल्याचे त्याला आठवलं.... च्यायला पोरांच्या नशिबीही आपलंच दुर्दैव का..
त्यानं पोरांना उठवलं आणि कुठे काही खायला मिळतंय का ते बघितलं....
रस्ते सगळे झोपलेले... दुकाने बंद... त्याला काय करावे कळले नाही... एका हॉटेलच्या खिडकीतून मिणमिणता दिवा त्याला दिसला. त्याने खिशात हात घातला आणि पुन्हा ती पाचशेची नोट चाचपली... त्याने दारावर थाप मारली...
एक साठीच्या आसपास असलेल्या बाईने दार उघडले....
काय काय पाहिजे...
जेवायला काही आहे.....
त्या बाईने एकदा त्याच्याकडे आणि नंतर त्या बाईकडे आणि मुलाकडे बघितलं....
नाही काहीच शिल्लक नाही....
बघा की पोरं उपाशी आहेत काही आहे का?
भात पिठलं चालेल का? पन्नास रुपये पडतील....
भात पिठल्याला पन्नास रुपये म्हणजे चौघांचे मिळून दोनशे रुपये झाले.... या पोरांना एक रात्र उपाशी काढायला काय होतंय... मरणार आहेत काय एका रात्रीतून....त्याच्या मनात आलं पण तो बोलला नाही...पोरांना खायला घालू आणि जाऊ... त्यानं विचार केला...
मलाही भूक लागलीय.... मीही भात-पिठलं खाईन.... त्याच्या बायकोने सांगितले.. मग मी काय घोडं मारलं आहे.
द्या की...
तो आत आला.. त्या एकत्र केलेल्या खुर्च्या त्याने वेगवेगळ्या केल्या ....सगळे बसले....
काय बाई आहे.. गरजवंताला अक्‍कल नसते असं म्हणतात ते उगाच नाही.. दहा रुपयांचे भात-पिठलं पन्नास रुपयांना... त्याने मनातल्या मनात त्या बाईला शिवी हासडली.... त्याला त्याच्या बायकोचाही राग आला.. येताना काहीतरी खायला घेऊन आली असती तर... पण तो काही बोलला नाही..... घरी गेल्यावर बघतो....
अर्ध्या तासाने त्या बाईने चार पानं केली...
प्रत्येक घास खाताना त्याला मोडल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांची नोट समोर येत होती... आता पन्नास रुपये घेणार आहेच तर मग खा की भरपूर म्हणून मग त्याने पुन्हा पुन्हा भात मागितला. शेवटी भात संपला सांगण्यासाठी तिने पातेलंच समोर आणलं...
पन्नास रुपयांत आता पोटभर भातही नाही याची त्याला आणखी चिड आली...
पोरं जेवली.... यानंही मग हात धुतला...
खिशातून त्याने पाचशेची नोट काढली....त्या बाईच्या हातात दिली...
भात पोटभर मिळाला नाही मावशी....
माफ करा हं पण मला अंदाज नाही आला... त्या बाईने अपराधी भावनेनं माफी मागितली...
एवढे पैसे सुटे कुठले..... जरा सुटे पैसे असतील तर द्या की....
नाही हो... एवढेच आहेत... यातील दोनशे रुपये घ्या आणि बाकीचे तिनशे परत द्या....
म्हातारीची चेष्टा करता काय? आहो भात पिठल्याला कोणी दोनशे रुपये घेते काय? आणि मी भात-पिठलं काय धंदा म्हणून नाही वाढलं... ही पोरं उपाशी झोपू नयेत म्हणून केलं.... त्यात तूमचं पोट तरी कुठे भरलं. तुम्हाला मी पन्नास रुपये म्हटलं खरं पण तीस रुपये असले तरी द्या...
त्याला काही सुचेनासं झालं... म्हणजे या बाईने चौघांसाठी पन्नास रुपये सांगितले होते. मघाशी प्रत्येक घास खाताना आपण या बाईला शिव्या-शाप दिला...
सुटे तीस रुपये नसतील तर नाही दिले तर चातलील.... बाईच्या त्या वाक्‍याने तो भानावर आला...
नाही घ्या नाय यातील तीस रुपये....
नाही ओ... चार दिवस धंदा कुठे झालाय पैसे असायला.... तुम्ही नंतर कधी आलात गडावर तर द्या पैसे....
त्याने पाचशेची नोट खिशात कोंबली. त्या रात्री त्याला झोप लागली नाही.... दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी पकडण्याच्या नादात त्याला त्या बाईची आठवण झाली नाही, पण आजही मध्यरात्री कधीतरी त्याला त्या बाईचा चेहरा आठवतो आणि तो दचकून उठतो...
त्या बाईचे ते तीस रुपये तसेच त्याच्या खिशात वेगळे आहेत... सज्जनगडावर जाण्याच्या प्रतीक्षेत.......

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०

लाल

प्रार्थना संपली आणि सगळी मुले खाली बसली....वर्गशिक्षक एक एक विद्यार्थ्याचे नाव घेऊन हजेरीपट मांडत होते.....
तिचं नाव घेतल्यावर दारातूनच उत्तर आलं
""हजर''
शिक्षकांनी नाकावर आलेल्या चष्म्यावरुन तिच्याकडे बघितलं आणि डोळ्यांनीच तिथंच थांब म्हणून दटावलं.
सगळ्या विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन झाल्यावर शिक्षकांनी तिला बोलावलं...
हं या आत. कुठे मैदान मारुन आलात?.....अर्थात या शब्दांचा तिच्यावर काही परिणाम होणार नसल्याचे त्यांना माहित होतं.
ती काही बोलली नाही, गप्प उभी राहिली... खूप रडली असावी असे तिचे डोळे लाल असायचे....त्यांनी तिला एकदा विचारलेही होते; पण तिने काही सांगितले नाही.....तशी ती कधीच काही बोलायची नाही... ताठ मानेने डोळ्यात डोळे घालून उभी राहायची... तिचे ते लालभडक डोळे बघुन त्यांना त्यांची भीती वाटायची... त्या डोळ्यांत त्यांना कधी पाणी दिसलेच नाही...
ती शाळेला रोजच उशिरा यायची... रोज ते शिक्षक तिला त्याचे कारण विचारायचे पण ती बोलायची नाही.... तिच्या उशिरा येण्यापेक्षा ती न बोलता गप्प बसायची याचाच त्यांना राग यायचा....
आज जर कारण सांगितले नाहीस तर वर्गात बसू देणार नाही... तुझ्या आई-बाबाला घेऊन ये..... शिक्षकांनी फर्मावलं.
तरीही ती गप्प उभी राहिली... तिचा तो गप्पपणा शिक्षकांना बोचू लागला.... शिक्षा करावी तर दहावीच्या वर्गातील मुलीला शिक्षा तरी काय करणार.... त्यांना काही सुचेना... पण आज सोक्षमोक्ष लावायचाच याचा निर्धार त्यांनी केला.
"चल ! मुख्याध्यापकांनी जर तुला बसू दिलं तर बस वर्गात...' शिक्षक मुख्याध्यापकांच्या केबीनच्या दिशेने चालू लागले... ती त्यांच्या मागे....
मुख्याध्यापकांची केबीन ...छे! मारुतीच्या मंदिरात एका बाजुने दानात मिळालेली तिजोरी आणि दुसऱ्या बाजुला असलेल्या कट्ट्याचा आधार घेऊन केलेली छोटी जागा म्हणजे केबीन.... शाळाच चार घरांत भरायची तर केबीन कुठली असणार....
त्या दहा बारा गावांत एकच शाळा... वाड्या-पाड्यातील पोरं यायची... कधीही यायची... कधीही जायची.... शिक्षकांना त्याची सवयच झाली होती.... पण इथे फरक होता... पोरांना उशीर का म्हणून विचारलं की काही-बाही उत्तर सांगायची.... म्हस चारायला गेलतो, आई गावाला गिलीया, बाबा आजारी हाय... काहीही उत्तरं यायची पण उत्तरं यायची पण ही मुलगी काहीच उत्तर द्यायची नाही....
तसे ते शिक्षक नवीनच, इथल्या पोरांची त्यांना भाषाच कळायची नाही.. कधी कधी ते चिडायचे...पण पोरंच त्यांच्या भाषेला हसत राहायची... ते तिला घेऊन मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले...
मुख्याध्यापक.... ते कधी असत कधी नसत. असले तरी त्यांचे शाळेकडे लक्ष कमीच... कुठल्या तरी चळवळीत ते काम करायचे... त्याच्या मासिकाचे संपादनाचेच काम मोठे...ते काही तरी पांढऱ्यावर काळे करत बसले होते....
सर, ही मुलगी रोज शाळेला उशिरा येते आणि कारण विचारले तरी बोलतही नाही....
मुख्याध्यापकांनी एकदा तिच्याकडे बघितलं.. ती खाली मान घालून गप्प उभी होती....
अभ्यास कसा करुन राहिला, सर? मुख्याध्यापकांनी मान वर न काढताच शिक्षकांना प्रश्‍न केला.
चांगला आहे... म्हणजे दहावीला जर मंडळाने नंबर काढला तर हीचाच नंबर येईल... शिक्षकांनी सांगितलं...
मग येऊ द्या की.... , मुख्याध्यापकांनी तिला काहीच न विचारता सुनावलेला हा निर्णय ऐकून शिक्षकांना काय बोलावे सुचेना....
ते वर्गात आले... आज त्यांना शिकविण्याचा मूडच राहिला नाही... सरांनी असा का निर्णय दिला असेल... तिला बोलतं करण्याचा प्रश्‍नच नव्हता....
तिच्या उशिरा येण्याचा प्रश्‍न नव्हताच, पण ती उशिरा का येते याचे कारण कधीच सांगत नव्हती हाच प्रश्‍न होता...ते वर्गावर आले पण त्यांचे शिकविण्याकडे लक्ष लागले नाही....
पुढच्या जवळपास प्रत्येक दिवशी ती उशिराच यायची.... एकदा त्यांनी तिला सरळ सांगून टाकलं तू मला विचारत जाऊ नकोस आलीस की सरळ वर्गात येऊन बस.... पण तरीही ती उशिरा आली की पहिली एक दोन मिनीटे त्यांना त्रास व्हायचाच....
दहावीची परीक्षा झाली...... निकाल लागला....अपेक्षेप्रमाणे ती शाळेत पहिली आली होतीच.... कदाचीत ती मंडळातही पहिलीच असावी... सगळ्या शिक्षकांनी तिचे तोंडभरुन कौतुक केलं... पण ती बोलली नाही...
त्या शिक्षकांनीही ती शाळा सोडली... पुन्हा धकाधकीच्या प्रवाहात स्वतःला वाहतं केलं... इथं चकचकीत बुट आणि टाय घातलेली पोरं बघितली की त्यांचा त्यांना हेवा वाटायचा... एखादा विद्यार्थी उशिरा आला की मग त्यांना ती आठवायची...त्याचबरोबर तिचे ते लाल डोळे आठवायचे. ती मुलगी त्यांच्या डोक्‍यातून काही गेली नाही....एकदा असेच नवीन कुठले मासीक आले म्हणून ते बघत होते.... मासीक चाळता चाळता त्यांची नजर त्या फोटोवर गेली... तीच ती...त्यांची उत्सुकता ताणली... त्यावेळी ते ज्या शाळेत शिकवत होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा तो लेख होता.....
"" वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच तिने या लढाईत भाग घेतला. शालेय शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं पण व्यवस्थेला संपवायचा विडाच तिने उचलला. खरे तर तिने पेनाने लढाई लढावी, असेच मला वाटायचे पण तिने तो मार्ग नाकारला आणि पेनाऐवजी तिने हातात बंदूक घेतली...या दिशेने पाऊल टाकल्यानंतर येणारा शेवट निश्‍चित होता... पण, ती शेवटपर्यंत डळमळली नाही...'' लेख खूपच मोठा होता... पण त्यांना पुढे वाचता आले नाही.... त्या लालभडक डोळ्यांना आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले.....

जांभळा

ट्रंकेतील तो जांभळा ड्रेस हलकेच काढतानाही त्याचा कडेचा पत्रा लागलाच... जीर्ण झालेल्या त्या कपड्याला तो पत्र्याचा स्पर्श पेलवला नाही, भाजी चिरताना नकळत विळीची धार बोटांना लागावी, अशी ती कळकळली.... किती वर्षे झाली ... बारा तरी होऊन गेली असावीत.... अकरावी परीक्षा पास झाल्यावर हट्‌टाने बाबांकडून तो ड्रेस मागून घेतला होता.... दुकानाच्या काचेतून दिसणारा तो मोरपंखी जांभळा ड्रेस कितीतरी दिवस तिच्या डोळ्यात घर करुन राहिला होता...तोच ड्रेस घ्यायचा म्हणून ती हट्‌टून बसली होती....घागरा चोली घालून काय तमाशा करायचा आहे काय? असं बाबा म्हणाले खरे पण त्यांचा हा राग लटका होता..
""एकच तर मुलगी आहे तिचा हट्‌ट नाही, पुरवायचा तर मग कोणाचा हट्‌ट पुरवायचा.''
आईच्या या वाक्‍यापुढे बाबांचं काहीच चालायचं नाही. त्या तलम मोरपंखी जांभळ्या कपड्याचा पहिला स्पर्श झाल्यावर असंख्य मोर मनात नाच करत होते....
त्यावर्षी दांडिया खेळताना उगाचच आपण कोणीतरी वेगळे आहोत असे वाटून गेलं. कितीजणींनी त्या ड्रेसबद्दल विचारलं होतं....
""असे गडद रंग तुला फार शोभून दिसतात.''
शेजारच्या काकूंनी केलेली ती स्तुती आठवली तरी आजही अंगावर मुठभर मांस चढते....
तिला त्या ड्रेसविषयीच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या.... कितीकाळ ती त्या ड्रेसला कुरवाळत बसली...
""उठा ! पब्लीकला जमा करायचंय. आजच्या खेळाला चार पैसं मिळालं न्हायी तर जेवायला घावणार न्हायी.... ''
तिचा नवरा तिच्यावर डाफरत होता.... तो सायकल सर्कस करायचा... पण त्याच्या खेळाला माणसं कुठं जमायची म्हणून तिला आधी नाचवायचा....
त्याच्यासोबत पळून आली त्यावेळी ती अवघी आठरा वर्षांची होती. घरात बाबांना विचारायची हिम्मतच झाली नाही.... त्याच्याही घरात विरोधच....
""कुठेही राहू, मीठ भाकर खाऊ'', तो सांगायचा... तिलाही ते पटायचं....दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला... पळण्याचा आधी निर्णय घेतला आणि नंतर तो नशीबाचाच भाग बनला... पळणं मागेच लागलं....लग्न होऊन सहा महिने झाले नसतील... तोच एका रात्री तिचा नवरा भीत भीत घरात शिरला....गेल्या चार-पाच महिन्यात तो कमालीचा दारु प्यायला लागला होता... दुकानदाराशी उदारीवरुन भांडण झालं, हातातील फुटलेली बाटली तशीच त्याच्या पोटात खुपसली....तिला समजायचं ते समजलं... हातात जे लागेल ते घेतलं आणि पळायला सुरवात केली... एक गाव झालं की दुसरं... दुसरं झालं की तिसरं....प्रत्येक गावात जाऊन रोजगार कुठे मागायचा, म्हणून मग सायकल सर्कस सुरु केली.... तो सायकलीवर कसरती करायचा.... पण पब्लीक जमा व्हायचं नाही....म्हणून मग तिच्या नवऱ्याने तिला नाचायला लावलं....घरातनं बाहेर पडताना घेतलेला तो ड्रेस तेवढीच तिची संपत्ती.... तो ड्रेस घालून ती रस्त्यावर उतरली की भल्या भल्यांच्या नजरा तिच्यावर खिळायच्या... त्या लोकांची लोचट नजर बघून तिला असह्य व्हायचं पण इलाज चालायचा नाही....चार पैसे हाताशी लागायचे पोटाची खळगी भरायची आणि पुढच्या गावचा रस्ता धरायचा....ज्याचा हात धरुन ती पळून आली होती त्याच्यासाठी पळणं एवढंच तिच्या नशीबी उरलं होतं...
पाठित एक जोराचा मुक्‍का मारुन त्यानं तिला जोरात शिवी हासडली, तशी ती भानावर आली.
"चल बाहेर''
तो म्हणाला आणि तसाच मागे वळला..
तिने हातातल्या त्या जांभळ्या रंगाच्या ड्रेसकडे बघितलं...त्याचा रंग आता पार फिका पडला होता....
तिनं घागरा, चोली घातली आणि रस्त्यावर येण्यासाठी दारात उभी राहिली.... तिचा नवरा मोठ-मोठ्याने ओरडत होता... तमाशा देखो- तमाशा देखो....
नवऱ्याचे ते शब्द ऐकून बांबाचे शब्द तिला आठवले....घागरा चोली घालून काय तमाशा करायचाय....ती अस्वस्थ झाली...
मघाशी ट्रंकेतून बाहेर काढताना तो ड्रेस दंडावरच फाटला होता.... लोक त्या फाटलेल्या भागाकडेच बघत राहाणार...तिला स्वतःचीच किळस आली...आता नाचलं की पैसे मिळणार आणि त्याच पैशानं हा दारु पिणार आणि रात्री पुन्हा मारणार.... ती स्वतःशीच पुटपुटली.... त्या जांभळ्या ड्रेसचा रंग जसा फिका पडला होता....तसंच तिच्या नवऱ्याविषयी वाटणाऱ्या भावनांच्या आता चिंध्या झाल्या होत्या... त्याचा रंग तर केव्हाच उडून गेला होता...तीची ही जाणीव आणखी तीव्र झाली... तिने अंगावरचा तो ड्रेस काढला, त्या ड्रेसकडे पुन्हा एकदा तिने पाहिले... त्या विटलेल्या जांभळ्या ड्रेसमधुन असंख्य मोर तिला खुणावत होते.... तो ड्रेस तिने ट्रंकेत ठेवला.....तिचा नवरा बाहेर ओरडत होता..... तीने ट्रंक उचललली आणि ती पळू लागली... यावेळी तिच्या नशिबापासून नाही तर नशीबाच्या शोधात डोळयात नाचणारे जांभळे मोर घेऊन.....

निळा.....

या समुद्रात आणि मनात तसे बरेच साम्य.... समुद्र अथांग आणि मनाचाही कोठे थांग लागतो......दोघांनाही भरती-ओहटी येते... समुद्रालाही मर्यादा पाळायला लागतात आणि मनालाही.... दोघांनीही मर्यादा सोडली की अनर्थच.... मग मागे उरतो केवळ कचारा, गाळ, असह्य करुन सोडणारा कुजलेला कुबट वास ... एक लाट चटकन आली तिने मघाशी ओढलेल्या रेघोट्या घेऊन निघून गेली.... मनावरचे आठवणींचे ओरखडे असे मिटले असते तर.... पुन्हा डोक्‍यात विचारांनी गलका सुरु केला.... एका विचारातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा.... पण ही साखळी कुठे आहे... एका कडीतून दुसऱ्या कडीत घेवून जाणारा विचार हवा... पण तसे होत नाही.... सगळेच आपली मतं मांडतात आणि मग गलका होतो.... डोकं भणभणतं....पण या विचारातून बाहेर कसं पडायचं.... एक विचार मारायला दुसरा विचार डोक्‍यात आणायचा.... पण पहिल्याने ती जागा सोडायला तर हवी. ती जागा सोडली तर पुढे जाता येतं पण पहिल्या विचाराने जागाच सोडली नाही तर... तर मग साचलेपण येतं..... विचारांच्या गलक्‍याचा आवाज जसा टीपेला पोहचला तसं तिचं डोकं भणभणायला लागलं.... तिची चलबिचल वाढली. ती थरथरली.... सुरकुतलेली तिची गोरी कातडी आणखी पांढरी पडू लागली....
चला आत, वारा सुटायला लागलाय....तिच्यासोबत आलेल्या त्या मुलीने तिच्या आंगावरची शाल सरळ केली. आणि तिला उठण्यासाठी हात दिला... तिने तो हात नाकारला... स्वतःच उठण्याचा प्रयत्न केला... पण अशक्‍तपणाने तो फसला.... ती मुलगी सरळ पुढे झाली तिने दोन्ही हातांनी तिच्या हातांना धरलं आणि तिला उठण्यास मदत केली. यावेळी मात्र तिने कोणताच प्रतिकार केला नाही.... तिच्या खांद्याच्या आधाराने ती चालू लागली... समुद्रावरची तिची दृष्टी तशी खिळून होती....
ती राहात होती त्या खोलीतूनही समुद्र दिसायचा....समुद्र पाहायचा तिला नादच लागला होता.....ती इथे आल्यापासून ती समुद्राला डोळ्यात साठवत होती...ती खिडकीत बसुन राहिली.... काळोखाचा पडदा गडद झाला, तशी ती उठली... जेवणावरची वासनाच उठली होती... तरी तिने दोन घास पाण्याबरोबर घशात कोंबले...जेवणापेक्षा तिला दिल्या जाणाऱ्या औषधांच्या गोळ्याच जास्त होत्या.... रोज गोळ्या घेताना तिला वाटायचं अजून कशी जगण्याची वासना टिकून आहे....कधी कधी गोळ्या घ्यायची इच्छा नसली की तिचा नवरा तिला समजावयाचा... गेलेल्या माणसांचा विचार करु नको....आपल्याला जगलं पाहिजे, माझ्यासाठी तरी तू जग.... मग तासन्‌ तास ती लेकरांच्या फोटाखाली आसवं ढाळीत बसायची.... नवराच मग घास भरवायचा, गोळ्या द्यायचा..... पण ते गेल्यापासून तिला काहीच सुचेना....काही काळ तिने गोळ्या नाकारुन बघितल्याही ....मग पाय बांधून, हात बांधून गोळ्या चारणं सुरु झालं....मग तिनं गोळ्या नाकारणं बंद केलं..
दुसऱ्या दिवशीही ती किनाऱ्यावर बसून राहिली.... समुद्राची निळाई तिच्या निळ्या डोळ्यात साठत राहिली... या समुद्राचा रंगही निळा आणि आकाशाचाही रंग निळाच.... किती दिवसांनी ती आकाशाकडे बघत होती... दिवस छे किती वर्ष झाली आकाशाकडे बघून... रोज दिसाणारी ही निळाई डोळ्यात का साठत नव्हती....तिचा नवरा तिला म्हणायचा... तुझ्या डोळ्यात मला काहीच दिसत नाही.... या निळ्या रंगाचा अर्थ काय?, ती काही बोलायची नाही.... समोरचा सागरही तसाच निळा तिच्या डोळ्यांसारखा. या आकाशाची निळाईच या सागरात प्रतिबिंबित होते.... तो निर्वाताचा, पोकळीचा रंगच खरा..... मग तिला जाणवलं आपले डोळेही असेच निळे.... पोकळीचा रंग ल्यायलेले... आता पोकळीच तर उरली बाकी काहीच नाही... आठवणीच्या पापुद्य्रात केवळ पोकळी.... अंनतांचा ध्यास घेणारी.... ती उठली.... अडखळत ती घरात शिरली.... होत्या नव्हत्या त्या गोळ्या तिने घेतल्या..... सकाळी कोणीतरी दार उघडलं.... आजाराला कंटाळून आत्महत्या असा पोलिस रिपोर्ट आला....एक पोकळी दुसऱ्या पोकळीत विलीन झाली होती...

पिवळा......

कितीवेळ गेला ठाऊक नाही. पण या काळात ढगांनी किती आकार बदलले, जशी सुर्याची किरणे तिरपी होत गेली तसा रंगही बदलत गेला. कापसासारखा मऊ मुलायम रंग... एखाद्या विरक्‍त माणसासारखा... सगळ्या इच्छा अर्पून रिता झाल्यासारखा... नाही तरी तो रिता झालेलाच असतो की... ओंजळ लहान आहे की मोठी, काही बघत नाही... देत राहतो, बरसत राहतो. जेवढं आहे ते सगळं देतो म्हणूनच त्याचा तो पांढरा रंग... मग येणारी पिवळसर छटा... विरक्‍तीतून जाणिवांच्या दिशेने नेणारी... या रंगाचा अर्थ लावायचा तरी कसा?... कारण अगोदर असणारा पांढरा हा विरक्‍तीचाच आणि नंतरचा भगवा हाही विरक्‍तीचा! अर्थात भगवा पुढे मोक्षाच्या दिशेने जाणारा... पहिल्या पांढऱ्या रंगात मोक्षाचीही अभिलाषा नाही. तिथे फक्‍त देणे आहे. दिल्यानंतरचे समाधान त्यात ओतप्रोत आहे. त्यामुळे तिथे कुठलेच इच्छेचे रंग दिसत नाहीत. दिसतो तो फक्‍त पांढरा शुभ्र रंग... इच्छा आकांक्षांना मागे ठेवलेला पांढरा रंग.... नंतरच्या केशरी किंवा भगव्या रंगाचा अर्थही विरक्‍तीच्या दिशेने जाणाराच पण इथे त्याला मोक्षाची इच्छा आहे... म्हणूनच मघाशी कापसाच्या पुंजक्‍यासारखा पांढरा शुभ्र दिसणारा ढग आता भगवा रंग घेतल्यानंतर विरळ होतो आहे... त्याला मोक्षाची, विरुन जाण्याची फार घाई झाल्याचे जाणवते... पण या मधला जो पिवळा रंग आहे त्याचा अर्थ काय लावायचा?... समाधानाच्या समाधीतून जागे होऊन मोक्षाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेचा हा रंग... विचारांची तंद्री सुटली तसे सगळ्या परिसराचा ताबा आंधाराने घेतल्याचे त्याला जाणवले... तो उठला... त्याने देवासमोर दिवा लावला... ती पिवळी ज्योत फडफडली आणि पुन्हा त्याच्या मनाने त्या पिवळ्या रंगाचा शोध सुरु केला... काय असेल याचा अर्थ... ही ज्योतही मोक्षाच्या दिशेनेच चाललेली... कापसाचा पांढरा रंग हरवून ती ही याच वाटेने चाललेली... मोक्षाच्या इच्छेचाच रंग पिवळा... तो अस्वस्
थ झाला... अंगाला त्याच्या घाम सुटला... आयुष्यभर ज्याच्यामागे धावलो तो साक्षात्कार वयाच्या उत्तरार्धात असाही मिळू शकतो का? त्यालाच प्रश्‍न पडला! सगळ्या इच्छा, आकांक्षा मागे ठेवून एकाकीपणाचे जीवन आपण पसंत केले... अगोदर पसंत केले मग ते समाजाने लादले... कपड्याचे रंग बदलले... पांढऱ्याशुभ्र धोतराचे रुपांतर मग भगव्या वस्त्रात केव्हा झाले ते त्यालाही कळले नाही... मग तो रंग चिकटला तो चिकटलाच... पण या भगव्यापेक्षाही त्याला आता पिवळा रंग फार जवळचा वाटू लागला... तो पिवळा रंग त्याच्या डोळ्यात साकाळत राहिला... सकाळी कोणीतरी कडी वाजवली..... दार उघडले नाही... प्रतिसाद आला नाही... महाराजऽऽऽऽऽऽऽ... शिष्याने टाहो फोडला... त्यांचा पिवळा पडलेला देह बघून कोणीतरी म्हणाले, महाराजांना काविळीने गिळले... त्यांना काय माहित, महाराज मोक्षाच्या वाटेवर निघून गेले होते...

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

गांधीवाद आता पेलवत नाही....

गांधीवाद आता पेलवत नाही....

कोणतीही राजकीय व्यवस्था परिपूर्ण असत नाही. सगळ्यांना खुश ठेवणे हे कोणत्याही व्यवस्थेला शक्‍यच नाही, त्यामुळे अशी राजकीय व्यवस्था असली पाहिजे जी बहुसंख्यांकांना खुश करणारी आणि अल्पसंख्यांकाना नाराज न करणारी. लोकशाहीत ती मुल्ये अंतर्भूत असतात म्हणूनच लोकशाही ही सध्याच्या ज्ञात राजकीय व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट मानली गेली, पण तरीही लोकशाहीने बहुसंख्यांचे हित जोपासले का?( इथे बहुसंख्यांक या शब्दाचा अर्थ बहुसंख्यांक असाच आहे. भारतात अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक अशा शब्दांना जाती धर्माचा वास येतो, तो अर्थ इथे अपेक्षित नाही. त्यामुळेच जर गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे वर्ग केले तर गरीब या वर्गात, जो बहुसंख्यांक आहे त्यात हिंदूंबरोबर मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि बौध येतातच) हा प्रश्‍नच आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठिवर लोकशाहीने भांडवलदारांचे पाय चेपण्यातच धन्यता मानली आहे. सकृतदर्शनी सगळं चांगलं दिसत असलं तरी व्यवस्था म्हणून अनेक बाबतीत लोकशाही अपयशी ठरली आहे, हे मान्यच करावे लागेल.
अंधपणाने लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांचा दावा असतो की, गरीबातील गरीबाला राजव्यवस्थेत स्थान लोकशाहीनेच मिळाले, गरीब-अशिक्षीत जात-धर्म यांपलीकडे जाऊन आपला नेता आणि राज्यकर्ते कोण असावेत हे ठरविण्याचा अधिकार लोकशाहीनेच दिला. पण सध्याची परिस्थीती बघितली तर खरेच हा अधिकार आता उरला आहे का? कि केवळ सांगडा उरला आहे. गेल्या लोकसभेत आणि विधानसभेतील निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही उमेदवाराच्या खासगी स्वीय सहायकला विचारले तर तो सांगेल की निवडणूक लढविण्याचा खर्च किती आला ते. या अकड्यांवरील शुन्य कीती असतात हेही सर्वसामान्य लोकांना कळत नाही मग निवडणूक लढविणे तर सोडाच.
लोकशाही ही धनिकांची बाटीक बनली आहे की काय हा प्रश्‍न उपस्थित होतो. लोकसभेत उधळलेल्या नोटांनी हे आणखी स्पष्ट केले आहे.

बहुसंख्यांकांचे धिंडवडे
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत बिरुदावली मिरवतो. लोकसंख्येच्या अंकशास्त्रानुसार भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे, यात शंका नाही, पण लोकशाही म्हणजे केवळ लोकांना मतदानाचा अधिकार एवढंच मर्यादित आहे का? की त्यापुढे जाऊन काही वेगळे आहे हे तपासायला गेले तर हातात केवळ कचरा कचरा आणि कचराच लागतो. लोकशाहीत खरे तर मुखवट्यांचे राज्य असते. जसा सण येता तसा मुखवटा चढवून रस्त्यावर नाच करणाऱ्यांप्रमाणे प्रत्येकवेळा मुखवटा बदलला जातो. हे बहुतेक मुखवटे बहुसंख्यांकाना खुश करण्यासाठीच चढविलेले असतात, या मुखवट्यामागचा भेसुर चेहरा मात्र दिसत नाही.
साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचे घेता येईल. ज्या देशाची लोकसंख्या आगामी काळात दिडशे कोटींच्या घरात जाईल आणि या वाढलेल्या तोंडांची भूक भागविण्यासाठी जे हात दिवसरात्र राबताहेत, संसदेत बसलेले लोक ज्यांच्या मतावर निवडून आले आहेत त्यांचे (शेतीसाठी घेतलेले) कर्ज माफ करताना सरकारने दयाळू आणि दानशूरपणाचा मुखवटा असा काही घातला होता की कर्जमाफी घेणाऱ्या हातांना आपण खूप मोठे पातक करतो आहोत की काय असा भास होत राहिला. पण त्याचवेळी उद्योगजगताला सरकारेन जे स्टीम्युलेटींग पॅकेज दिले त्याचा गाजावाजा झाला नाही. देशातील 70 टक्‍के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. त्या 70 टक्‍के म्हणजेच जवळपास 90 कोटी लोकसंख्येसाठी सरकारने 60 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली तर जी संख्या एक कोटींपेक्षा कमी आहे, त्या लोकसंख्येसाठी सरकारने स्टीम्युलेटींग पॅकेज दिले, ज्याव्दारे सरकारच्या तिजोरीत येणारे 16 हजार कोटी रुपये थांबले किंबहूना ते या उद्योजकांना मिळाले. प्रश्‍न हे बरोबर की चूक असा नाही. प्रश्‍न आहे तो नैतीकतेचा आणि सरकारी दायित्वाचा. शेतकऱ्यांच्या पुढे टाकलेल्या तुकड्यांचा गाजावाजा होतो तर मग या उद्योगांना खाऊ घातलेल्या श्रीखंड पुरीचाही गाजावाजा व्हायलाच हवा.
खरे तर एकूणच राजकीय व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकांनी बदलायला हवा. जगातील सर्व कालीन आणि सर्व राजकीय व्यवस्थांनी आम्ही तुमच्यासाठी "सर्वकाही' करतो असा असेच सांगितले. खरे तर राजकीय व्यवस्था ही सर्वसामान्यांनी त्यांचे जगणे सुसह्या व्हावे म्हणून स्वीकरलेले एक साधन आहे. जसं एखाद्या चित्रकाराने जर खूप चांगले चित्र काढले तर त्याचे श्रेय कुंचल्याला जात नाही तसेच राजकीय व्यवस्थेचे आहे. मग याच्या पुढचा भाग असा येतो की जर चित्र चांगले झाले नाही तर याचा अर्थ चित्रकारालाच बाद म्हणावे लागेल. तसे म्हणण्यातही अडचण नाही, पण त्याचबरोबर हेही तपासायला हवे की कुंचला कुठे बिघडला नाही का? आणि जर हा कुंचलाच बिघडलेला असेल तर मग तो बदलायचे धाडस हवे. इथे येणारे चित्र महत्त्वाचे, त्यामुळे कुंचला कीतीही रेखीव असला तरी तो बदलायचे धाडस चित्रकाराने दाखविले पाहिजे. त्याचप्रमाणे राजकीय व्यवस्था समाजातील स्वास्थ्य टिकवून त्याची प्रगती घडविण्याचे साधन आहे. त्यामुळे जर हे साधनच बिघडले असेल तर ते बदलायचा पर्याय ठेवायलाच हवा. त्यामुळेच राज्यकर्ते जेव्हा म्हणतात की आम्ही हे केले ते केले त्यावेळी त्यांना प्रश्‍न विचारायला हवा की तुमची नेमणूकच त्यासाठी आहे. राज्यकर्ते जेव्हा सांगतात की आम्ही एक कोटीचा निधी तुमच्यासाठी आणला, शंभर कोटींची विकासकामे केली, त्यावेळी त्यांना विचाराला हवे की बाबांनो हे कोटींचे आकडे तुम्ही कोणाच्या जीवावर बोलता आहात, आम्ही इथे श्‍वास घेतो त्यावरच फक्‍त कर लावलेला नाही. नाही तर सर्वच गोष्टींवर कर लागतोच की. त्यामुळे आमच्या खिशातून काढून तुम्ही खर्च केले आणि वर आम्हालाच सांगता की आम्ही खर्च केला म्हणून. आता हा पैसा खर्च करतानाही तो आमच्याच वाट्याला परिपूण येतो कुठे. पिकाला पाणी देणाऱ्या पाईपलाईला जर शंभर छिद्रे पाडली आणि तीन दिवस
पाणी देत जरी राहिलो तरी पीक वाळायचे तसे वाळणारच की त्याच प्रमाणे हा पैसा खर्च होतो. गरीबांच्या नावाने योजना तयार करायची, त्यासाठी निधीची तरतूद करायची आणि मग त्या योजनेतून पैशाचा रतीब खात राहायचे. राजीव गांधी नेहमी म्हणत असत जर शंभर रुपयांची योजना जाहीर केली तर तळात येईपर्यंत केवळ पंधरा पैशांचेच काम होते.. ती परिस्थीती राजीव गांधी सत्तेत येण्यापुर्वीही होती आणि आजही आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार राज्यकर्तेच आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हे पुन्हा अधोरेखीत झाले आहे. 46 हजार कोटी रुपये या स्पर्धेच्या आयोजनासाठी खर्च करण्यात आले आहेत. 16 हजार कोटी रुपये आफ्रीकेतील अनेक देशांचे वार्षीक अर्थसंकल्पही एवढा नाही. हे पैसे आले कोठून. लोकांनी घाम गाळून मिळविलेल्या पैसे कराच्या मार्गातून सरकारकडे जमा झाले आणि तेच पैसे सरकारने (खोट्या) प्रतष्ठिेसाठी खर्च केले. खर्च केले म्हणण्यापेक्षा मुठभर लोकांच्या खिशात कोंबले. हजारो कोटी रुपयांचा घोटाळ झाला. घोटाळा हा शब्दच चुकीचा चक्‍क पैसे खाल्ले. आता बरेच पोपट हे सांगतात की राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्यामुळे देशातील पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल म्हणून. पण हे काही खरे नाही. कुठलेही नियोजन नसताना केवळ कल्पनांच्या भरारीवर मांडलेली ही गृहीतके आहेत. हे 46 हजार कोटी रुपये काही पर्यटनक्षेत्रांच्या विकासासाठी खर्च केले जाणार नाहीत. त्यामुुळे राष्ट्रकुलच्या निमित्ताने जे लोक येतील ते लोक पर्यटनस्थळांना भेट देतीलही पण पुढे काय?. कोणत्याही तयारीशिवाय परीक्षेला बसल्यानंतर जी अवस्था होते तीच अवस्था होणार. हेच लोक पुन्हा आपपल्या देशात परतल्यानंतर येथील पर्यटनस्थळांचे वर्णन करतील आणि जे चार लोक येणार होते तेही कमी हाईल. कोणत्याही निर्णयाच्या दोन बाजू असतातच एक चांगली आणि एक वाईट. बहुसंख्य लोकांना जो निर्णय अपील होतो तो निर्णय घेणे इष्ट. मुळात ज्या देशातील 30 कोटींहून अधिक जनता एकवेळ उपाशी राहते त्या देशाने असे खेळावर पैसे लुटावेत का? हा प्रश्‍न आहे, आणि त्यापुढे जाऊन इतके पैसे खर्च केल्यानंतर तरी देशातील काही खेळांत प्रगती होणार आहे का?...या प्रश्‍नांची उत्तरे नकारात्मकच येतात. हे 46 हजार कोटी खेळासाठी आणि खेळांडूंसाठी वापले असते तर भारतात अनेक चांगली क्रीडासंकुले उभारली गेली असती. खेळाडूं
च्या गरजा पूर्ण झाल्या असत्या आणि केवळ पदकांच्या जीवावर आपण अनेक देशांत मानाचे आणि आदराचे स्थान मिळविले असते. पण आपल्या लोकांना सगळे झटपट पाहिजे असते. अगदी मान-सन्मानही. राष्ट्रकुलसारखी स्पर्धा आपण का आयोजित करतो आहोत हेच कळत नाही. चीनने ऑलिम्पीक स्पर्धा आयोजित केली म्हणून जर तुम्हाला पोटशुळ उठून जर स्पर्धा आयोजित करत असाल तर आकलेची डीवाळखोरीच आहे. त्या देशाच्या आर्थिक संरचनेची आणि आपल्या आर्थिक संरचेनेची तुलना होत नाही पण केवळ अमुक तमुक देशाने ही स्पर्धा आयोजित केली तर मग मी का नाही हा पोरखेळ आहे. आपली आर्थिक स्थीती बघून आपण पाय पसले पाहिजेत. केवळ राष्ट्रकुल स्पर्धाच नाही तर सगळ्याच बाबतीत आता आपण नापास झालो आहोत, सगळी व्यवस्था सडली आहे आताच जर बदल केला नाही तर उद्या तो बदल करणे शक्‍यही होणार नाही. सापाचे गांडुळ करण्याच्या दिशेने आपला प्रवास चालला आहे. एकदा का आपण गांडूळ झालो की आपल्याला फणाच काढता येणार नाही.

व्यवस्था उलथवून टाकली पाहिजे.....
गेल्या पन्नास वर्षात आपल्याला लोकांनी बऱ्याच वाईट गोष्टी शिकविल्या. तो त्यांच्या धोरणंचा भाग होता. एखाद्या लहान मुलाला जर सारखंच ांगितले की तू खूप महान आहेस तर तोही त्याची शेखी मिरवायला लागतो तसेच आपले झाले आहे. गांधीजींचे कार्य आणि गांधीवाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट एखाद्या वेळी योग्य असली तर ती सर्व काळात योग्य ठरतेच असे नाही. गांधीवादाबद्दल तसाच वास येतो. एखाद्या समाजाला निष्क्रीय करण्याचा तो मार्ग आहे की काय अशी शंका येतो. युरोपीय देशांच्या इतिहासाकडे बघितले तर ते कधीच राजकारणात नजीकचा विचार करताना दिसत नाही, त्यांना दुरगामी परिणाम हवे असतात. त्यामुळेच भारतीय समाजापुढे एक आदर्शवाद ठेवून त्या निष्क्रीय करण्याचे काम त्यांनी केले. गांधीवाद केवळ अहिंसा आणि सत्य या दोनच चाकांभोवती फिरत नाही तर त्यांच्या चरख्याप्रमाणे तो जीवनातील प्रत्येक घटकांत सामावलेला आहे. गांधीवादाची उद्दीष्ट्ये उच्च असली तरी तो मार्ग खूपच काट्याकुट्यांचा आहे. व्यवस्था बदलण्याची ताकद गांधीवादात नाही( ती गांधीजींच्यात होती यात शंका नाही). त्यामुळे गांधीवाद जोपासत व्यवस्थेवर हल्ला करता येणार नाही.कदाचीत एखादी अशी वेळ येते की जिथे सर्वकालीन मुल्यांना बाजुला ठेवून क्रांती घडवावी लागते. त्यावेळी घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मुल्यांच्या कसोटीवर बरोबरच असतील असे नाही पण येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या गोष्टी करणे आवश्‍यक असते. आणि बरोबर की चूक हे ठरविणार कोण? आपण आपल्या उन्नतीसाठी जर एखादी व्यवस्था बदलत असू तर तो आपला अधिकार आहे. त्याचे मार्ग नैतीक आणि माणुसकीला धरुन असावेत एवढीच अपेक्षा.

सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

प्रशांत!

"सकाळ'चे उपसंपादक प्रशांत कुलकणीं यांचे अपघाती निधन झाले त्यावेळी "सकाळ'मध्ये लिहलेला हा लेख......
प्रशांत

प्रशांत! नावाप्रमाणेच तुमचा उत्साह उधाणलेल्या समुद्रासारखा होता. शांत स्मिताचे तुम्हाला तसे वावडेच, एखाद्या निरागस बालकाप्रमाणे भावना चटकन तुमच्या डोळ्यांत दिसायच्या. खरे तर मी तुम्हाला प्रशांत अशी हाक कधी मारलीच नाही. तसा तो माझा अधिकारही नाही; पण मी सर म्हणून जरी हाक मारत असलो तरी त्याचा नात्यात कधी दुरावा आला नाही. एक सीनिअर आणि एक ज्युनिअर एवढे नाते कधीच नव्हते. खास मैत्रीचे नाते होते, असेही मी म्हणणार नाही; पण जी केमिस्ट्री जमली होती ती केवळ आपल्यातच! त्याला मग कोणी मैत्रीचे नाव देवो वा आणखी काही.जगणे किती सहज असते हे तुमच्यावरून जाणवायचे. अगदी झऱ्यासारखे तुमचे वाहणे... तुम्ही नेहमी वाहत राहिला, अगदी निर्मळ. राग, लोभ, मत्सर या भावनांसह तुम्ही होता. अगदी सामान्यांप्रमाणे; पण तरीही तुमच्यात वेगळेपण होते. कोणत्याही गोष्टीचा पुरेपूर उपभोग घ्यायची तुमची मनीषा सदैव असायची. ऑफिसमध्ये कधी तुमचा शर्ट चुरगळलेला पाहिला नाही की सलग दुसऱ्या दिवशी तोच शर्ट अंगावर दिसला नाही; पण म्हणून तुम्ही इतरांना कधी नावे ठेवले नाही. अगदी कामाच्या बाबतीत आपल्यात बऱ्याच वेळा मतभेद झाले, अबोला झाला; पण हे फार काळ ताणले गेले नाही, यात बहुतेक वेळा तुमचाच हात पहिल्यांदा माझ्या खांद्यावर पडायचा. जसे तुमचे राहणे टापटिप, तसे बोलणेही. थोडे अनुनासिक असले तरी त्याला टिपिकल बाज होता. आपले म्हणणे जर खरे असेल, तर समोर कुणीही असले तरी तुम्ही माघार घ्यायचा नाही आणि आपल्यापेक्षा जर समोरच्याला जादा माहिती असेल तर तुम्हील लहानांनाही विचारायला संकोचायचा नाही. एकूणच तुम्ही पहिल्यापासून थोडे इतरांपासून वेगळेच. तुम्ही मनगटी घड्याळही उजव्या हातावर घालत असायचा, याबाबत एकदा मी तुम्हाला विचारले होते, की घड्याळ उजव्या हातात का घालता? त्यावर तुमचे सरळ आणि साधे उत्तर होते. जसे घड्याळ
डाव्या हातात घालण्याला काही कारण नाही, तसे उजव्या हातात न घालायलाही कारण नाही. एकूण तुमचे व्यक्‍तिमत्त्व सर्वांत राहून सर्वांत वेगळे. घरातही तुम्ही लहान मीही लहान. तुम्ही नेहमी म्हणायचा नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये. मी मात्र तुम्हाला विरोध करायचो. त्यावेळी तुम्ही म्हणायचा, जितके लाड होतात तितकेच फटकेही खायला लागतात. त्यापेक्षा सर्वांत मोठे असावे. असे अनेक विषयांवर आपल्या चर्चा व्हायच्या. बहुतेक त्या खासगी असायच्या.शेवटी, तुमचे तुमच्या पिल्यावर खूप प्रेम. होय तुम्ही तुमच्या यशला चार चौघांतही पिल्याच म्हणायचा. बाप होणे सोपे; पण बापपण निभावणे अवघड; पण तारेवरची त्रिस्थळी नोकरी करूनही तुम्ही तुमच्या पिल्याला जपले अगदी त्याची आई बनून. वहिनी नोकरीनिमित्त बाहेर असल्याने तुमच्यावरच त्याची जबाबदारी. त्यामुळे कामावर आलेल्या आईला पिलाची काळजी वाटून कसे व्याकूळ होते, अगदी तुम्ही तसे असायचा. रात्री कधी कधी तुम्हाला वेळ होणार असेल, तर तुमची ती तळमळ जाणवत राहायची. कदाचित देवालाही अशीच माणसे आवडत असावीत म्हणूनच तर त्याने तुम्हाला बोलावून घेतले. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच आकाशातून चंद्र गायब व्हावा आणि अमावस्या यावी, अगदी तसे तुम्ही गेला. आता तारे कितीही लुकलुकले तरी चंद्राची जागा कोण घेणार?

लोखंड तापलंय आताच घाव हवा !

तेजस्विनी सावंतच्या सत्कारावेळी अचानक व्यासपीठावर येऊन अनघा घैसास यांनी खेळाडूंची व्यथा मांडली. अनेक दिवस दबलेल्या भावनांना घैसास यांनी आवाज दिला. घैसास यांनी जे केले ते बरोबर की चूक, त्यांची तळमळ बरोबर; पण व्यासपीठ चूक अशा पद्धतीच्या चर्चा आता रंगू लागल्या आहे. या चर्चा एका अंगाने सुरूच राहतील; पण खरा मुद्दा यामुळे पुन्हा एकदा बाहेर आला आहे. अनेक खेळांत विजयी पताका लावणाऱ्या या राज्याला क्रीडा धोरणच नाही, राज्यकर्त्यांना क्रीडा क्षेत्राविषयी फार आत्मीयता नाही, हे पुन्हा ठळक झाले आहे. केवळ आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक खेळाडूंना खेळांत करिअर करता येत नाही. (सुहास खामकर याला केवळ पैशाअभावी स्पर्धेत भाग घेता आला नाही) खेळाची आणि खेळाडूंची फरपट होत असताना त्यांना मदत कशी करायची, हेच अनेकवेळ क्रीडा संघटनांना कळत नाही. एखाद्या खेळाडूचाच प्रश्‍न असेल तर अर्ज-विनंत्या करून काहीवेळा प्रश्‍न मार्गीही लागतो; पण त्याचा सर्वंकष उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या... हेच सुरू राहते. आता अनघा घैसास यांनी मांडलेल्या मतांमुळे सर्वच माध्यमांनी हा प्रश्‍न उचलून धरला आहे. भीष्मराज बाम यांच्यासारख्या तज्ज्ञांनीही या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. एखादा प्रश्‍न सुटावयाचा झाल्यास त्याला एखादे तत्कालीन कारण लागते. अनघा घैसास यांनी दाखविलेल्या धाडसाचे रूपांतर जर सरकारच्या निर्णयात करायचे असेल तर क्रीडा संघटनांनी आता आपला आवाज वाढविला पाहिजे. कोल्हापूरसारख्या जिथे प्राथमिक सोयी-सुविधाही मोठ्या मुश्‍किलीने मिळतात तिथे तेजस्विनी, वीरधवलसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतात. तिथे जर या सोयी-सुविधा योग्य आणि माफक दरात मिळाल्या तर खेळाडूंची खाण बनेल, यात शंका नाही; पण गरज आहे ती आवाज उठविण्याची. अनेक ठिकाणी, अनेकां
नी वेगवेगळ्या वेळी आवाज उठविण्यापेक्षा अनेकांनी एकाचवेळी आवाज उठविला, तर काही निर्णय होतात, हा इतिहास आहे. कोल्हापूरचा समाज प्रचंड सजग आहे. जर सरकार मदत करत नसेल, तर त्या मदतीची वाट न बघता इथला प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करतो, हे साऱ्यांनाच ठावूक आहे; पण एवढा अप्पलपोटेपणा कोल्हापूरला परवडणारा नाही. राज्याचा विचार करून कोल्हापूरनेच प्रथक संघर्षासाठी बाह्या सरसावल्या पाहिजेत. इथल्या मातीतच संघर्षाचा वास आहे. कोल्हापूरने पुढाकार घेतला तर राज्याचे क्रीडाधोरण निश्‍चित होईलच; पण पुन्हा कुठल्याही खेळाडूला केवळ पैसा नाही म्हणून खेळणे बंद करावे लागणार नाही. लोखंड तापले आहे, गरज आहे ती घाव घालण्याची !

रविवार, ५ सप्टेंबर, २०१०

भाषेतील प्रदूषणही रोखणे आवश्‍यक

""पुढनं लेफ्ट मारा !''
""जोतिबाला जायला रस्ता कुठला?'' असं विचारल्यावर वाघबीळच्या पायथ्याशी असलेल्या एका भाजी विक्रेत्या बाईने दिलेलं हे उत्तर... आय वॉज... आय वील टेल यू... ओपीडीत बसलेल्या डॉक्‍टरचं उत्तर... अरे तू मॅरीड केलंस म्हणे... दहावीपर्यंत वर्गात असलेल्या मित्राचा प्रश्‍न... अशी अनेक उदाहरणे देता येतील... अगदी अफलातून... या सगळ्या मंडळींना एवढंच माहीत आहे, की इंग्रजी शब्द वापरल्याने पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. ही तीनही उदाहरणे वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक वर्गातील आहेत. त्यांचे शिक्षणही वेगवेगळे आहेत. म्हणजे भाजी विकणारी बाई दुसरी-तिसरीला गेली असेल तर डॉक्‍टरबाई एमबीबीएस आहेत. म्हणजेच तिसरी, दहावी आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या तिघांनाही इंग्रजीचा सोस आहे. यातील कदाचित डॉक्‍टरबाईंना इंग्रजीचा वापर जास्त करावा लागत असेल. त्यांच्या त्या व्यवसायाची गरजही असेल; पण
तरीही प्रश्‍न राहतो तो त्यातील शुद्धतेचा. तो केवळ गडबड आणि गोंधळाचा परिणाम नव्हता तर मुळातच व्याकरणाचा आणि त्यांचा फार जवळचा संबंध वाटत नव्हता. कारण नंतरची अनेक वाक्‍यं त्या अशाच मोडक्‍या तोडक्‍या इंग्रजीत बोलत राहिल्या. का? पुढच्या माणसाला इंग्रजीत बोललेलं फार जास्त कळतं म्हणून, की पुढच्या माणसाला कळूच नये म्हणून; की मी एवढं शिकलेय आणि मराठीत कसं बोलणार म्हणून? यांतील तिसरं कारण जरा जास्त महत्त्वाचं आहे. संभाषण हे दोन्ही व्यक्‍तीत समान पातळीवर व्हायला पाहिजे; पण पुढच्या माणसापेक्षा मी जरा जास्त हुशार आहे हे ठसवायचं असेल तर मग इंग्रजीतून संभाषणाला सुरवात केली जाते. जेणेकरून मला यातील जरा जास्त कळतं; तुम्ही माझं म्हणणं मान्य करा, असा त्यात अर्थ गर्भित असतो. असू द्या... तो अर्थ असण्यासही ना नाही. पण मग ती भाषा तरी नीट यायला हवी ना! केवळ भाषेचा विचार करता आपल्याला मातृभाषा जरी व्यवस्थित येत असली तरी पुढच्या माणसावर प्रभाव पडतो. अगदी चपखल प्रभाव पडतो. "तू मॅरीड केलंस म्हणे' पेक्षा "तू लग्न केलंस म्हणे' हे त्याला नीट विचारता आलं असतं. पण प्रभाव टाकण्याच्या नादात त्याचा असलेला थोडा प्रभावही कमी झाला. भाजी विक्रेत्या बाईचं इंग्रजी मात्र चिंतेचं कारण आहे. कारण तिनं तो शब्द वापरला तो पुढच्या माणसावर प्रभाव टाकण्यासाठी मुळीच नाही. "लेफ्ट मारा', "टायमाला' यांसारखे शब्द त्यांच्या बोलण्यात घट्ट बसू लागले आहेत आणि मराठीची गंगोत्री इथेच आहे. इथेच इंग्रजीचं मराठीतील प्रदूषण थोपवलं पाहिजे. म्हणजे या लोकांना इंग्रजीपासून लांब ठेवा असा अर्थ काढू नये तर खेड्यात शिकविणाऱ्या शिक्षकांनी भाषेवर अधिक काम केले पाहिजे. मराठी आणि इंग्रजीची भेसळ करायला लागू नये इतक्‍या दोन्ही भाषा यायला हव्यात, याची दक्षता त्यांनीच घ्यायला हवी.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

झरा वाहता झाला....

त्यांनी त्याच्या पायातले बूट काढले. अंगावर पांघरूण घातले. त्याच्या छातीवरचा तिचा फोटो त्यांनी हळूच त्याच्या हातातून सोडवून घेतला. डोक्‍याखाली उशी सारली, उशी सारता सारता त्याच्या तोंडाचा दर्प त्यांना असह्य झाला. त्यांनी मग त्याच्या खोलीत पडलेले अस्ताव्यस्त कपडे सरळ केले. टेबलावरची पुस्तकं सरळ लावली. अनाथ लॅपटॉप, मोबाईल जागेवर ठेवले. दहा-साडेदहाच्या दरम्यान त्याला जाग आली. तो उठल्याची चाहूल लागताच त्यांनी त्याच्यासाठी चहा केला. त्याच्या हातात चहाचा मग देताना त्यांनी विचारलं, ""आज ऑफिसला जाणं फार महत्त्वाचं आहे का?'' त्यांच्या त्या आकस्मिक प्रश्‍नाने तो बावचळला. खरं म्हणजे दहा वाजून गेल्यानंतरही त्यांना घरात बघूनच त्याला आश्‍चर्य वाटलं होतं. ""नाही तसं काही नाही. फोन करून सांगावं लागेल फक्‍त, काही काम आहे का बाबा?''
""काम असं काही नाही; पण अरे नवा एक सिनेमा आलाय, बघावं म्हणतोय, म्हटलं तुला वेळ असेल, तर तुझ्यासोबतीनं बघावा.''
त्याच्या हातात पोह्यांची प्लेट देता देता त्यांनी सांगितलं. त्याचे बाबा कधीच हिटलर नव्हते. तो जे म्हणेल त्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. हे कर, ते करू नको, असं त्यांनी म्हटलेलं त्याला आठवलं नाही. तो विभाग जणू आईनंच उचललेला. असं असलं, तरी त्यांनी कधी त्याला यापूर्वी चहा करून दिलेला, अथवा पोह्याची प्लेट हातात दिलेलीही आठवली नाही.
""फोन करून बघतो. बघतो म्हणजे बॉसला येत नाही म्हणून फक्‍त सांगतो.''
सिनेमा बघून आल्यावर या सिनेमाला आज आपण का आलो होतो, याचाच प्रश्‍न त्यांना पडला होता. बाबा नंतर खूप वेळ त्या सिनेमावर बोलत होते.
""तुम्ही नेहमी बाहेर जेवायला कुठे जाता रे?''
""तसं काही नाही, जसा ग्रुप असेल तसा जातो.''
""आवडीचं एखादं ठिकाण असेलच की.''
त्यानं नाव सांगितलं. दोघे जेवले. बाबांच्या वागण्यातील तो सगळा बदल तो दिवसभर अनुभवत होता. आता त्याला असह्य झालं.
त्यानं सरळ विचारलं, ""काय झालं, आज एवढा बदल का?''
""काही नाही रे, म्हटलं, तुझ्या जवळ जाता येतं का बघावं.''
त्याला काही कळलं नाही.
""कोण आहे रे ती?''
बाबांनी आता थेट प्रश्‍न विचारल्यावर त्याला लपवता आलं नाही. त्यानं सांगितलं ""कोण ती...''
""नाही म्हणाली?'' बाबांच्या प्रश्‍नावर तो चपापला.
""हो! कालच तिला विचारलं.''
""काय म्हणाली?''
""तू माझ्या लायकीचा नाहीस.''
""म्हणून दारू प्यायची?''
तो पुन्हा चपापला.
""सगळं आयुष्य तिच्यावर उधळून लावीन...'' त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच दाबला.
""टाक की मग उधळून, अडवलंय कोणी?''
बाबांच्या त्या उत्तरावर त्याला काय बोलावं ते सुचेना.
""एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य उधळणं सोपी गोष्ट नाही आणि म्हटलं, तर अवघडही नाही.
तुझ्या आईशी मला लग्न नव्हतं करायचं...''
तो शांत राहिला.
""...होतं एका मुलीवर प्रेम. होतं म्हणजे आहे. अगदी जिवापाड प्रेम केलं. तिनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. एकदा मला म्हणाली लग्न करून टाक, तेही मान्य केलं. आयुष्य उधळून लावणं यापेक्षा काय वेगळं असतं; पण त्यानं माझ्या आणि तुझ्या आईच्या नात्यात कधी बाधा आली नाही...''
तो बाबांकडे बघत राहिला. एक झरा खूप काळानंतर वाहिला होता.

सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

कर्ण

तो प्रश्‍न तिच्या मनात रेंगाळत राहिला. गेल्या वीस वर्षांत हजाराहून अधिक पत्रकारांनी मुलाखती घेतल्या असतील, प्रकट मुलाखतीही खूप झाल्या पण हा प्रश्‍न कोणीच विचारला नाही, किंबहूना तसा विचार आपल्या मनालाही कधी शिवला नाही. आतापर्यंत किती प्रकारचे लेखन केले,नाटक, कादंबरी, चित्रपट, टिव्ही मालिकांची स्क्रीप्ट ललीतमधील कित्येक प्रकार हाताळले, पण तसा विचारच कधी मनात शिरला नाही.
शिरला नाही की कधी कुठल्या पात्रात तो लपला ...?
सगळं कसं कपोकल्पीत असतं, असं ती आजवर सांगत आली. पहिल्या कादबंरीला जेव्हा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तेव्हा किती लोकांनी मुलाखती घेतल्या. हे सगळं कल्पनेतलं, सुचलेलं, पाहिलेलं, दुसऱ्याचे अनुभव अशी ती उत्तरे देत राहिले. पण मनाचा एक कोपरा रात्री-अपरात्री जागे करायचा आणि ठासून सांगायचा पात्रांच्या ओझ्याखाली तूच आहेस बघ ती पात्रे बाजुला सारुन... पण त्या पात्रांचा पालापाचोळा बाजुला करण्याचा प्रयत्न तिने केला नाही.
पण आजच्या त्या प्रश्‍नाने ती पार गोंधळून गेली.... मनावर चढविलेली सगळी पुट दूर करुन खोल काहीतरी आत शोध घ्यावा अस तिला वाटून गेलं. खूप थकल्यासारखंही तिला झालं.
""प्राक्‍तनात माझ्या पाच नवरे होते हे मला कुठे ठावूक होते, मस्ययंत्रात फिरणाऱ्या मत्स्याचा वेध घेण्यास येणाऱ्या प्रत्येक नृपात आपण आपला पती बघत होतो. पण दरबारातील एकाही नृपाला तो मत्स्यवेध सोडाच पण धनुष्यास प्रत्यंचा जोडणे शक्‍य झाले नाही. मग तरीही कर्ण सभेत आपल्यावर आपल्या पायाचा थरकाप का उडाला. त्याचे ते अजस्र बाहु, ती डोळे दीपवणारी कुंडले बघुन आपले डोळे का दीपले नाहीत. त्याने ते धनुष्य उचलले आणि आपण कर्णाला नकार दिला, का? या प्रश्‍नाचे उत्तर माझ्याकडेही नाही. श्रेष्ठ वर्णासाठी, श्रीकृष्णाने सांगितले म्हणून की त्यावेळी आपली मती कुंठीत झाली म्हणून. वस्त्रहरणाचा आदेश देणारा कर्ण हा इतिहासात नोंदविला जाईल पण तो नवरा म्हणून कुठे वाईट होता. जुगारात हरल्यावर आपल्या बायकोला पणाला लावणाऱ्या सम्राटापेक्षा तो नक्‍कीच मोठा होता, आणि नशीबाचे खेळ बघा सूत कुळातील म्हणून ज्याला नाकारलं तो तर पांडवांचा भ्राता निघावा. यापेक्षा दैवदुर्विलास कोणता...कृष्णाला पुढे महाभारत घडवायचे होत म्हणून का त्यानं मला कर्णाला न वरण्याचं सांगितलं.'' द्रौपदीच्या भूमिकेत काम करणाऱ्या नायिकेच्या तोंडातील ती वाक्‍य होती. अगदी सहज तिच्या हातातून ते उतरली गेले. कादंबरीतली ही वाक्‍ये खरे तर द्रौपदीच्या मनातील अवस्था दाखविणारी पण तीच वाक्‍ये तो पत्रकार आपल्याला सांगत होता. आणि चेहऱ्यावरचे भाव निरखीत होता. आणि त्यानं विचारलं,
"" तुम्ही काय केलं असतं, कर्णाला वरलं असतं की अर्जुनाची वाट बघितली असती....''
त्या प्रश्‍नाने ती चरकली... आयुष्यात अनेक प्रश्‍न विचारले, कधी चोरट्या चर्चाही झाल्या, त्याचं कधीच काही वाटलं नाही, पण या प्रश्‍नाने ती भांबावली. खरंच आपण काय केलं असतं, अर्जुनाची वाट बघितली असती...की कर्णाला होय म्हटलं असतं....ती अडखळली... नाही देता येणार या प्रश्‍नाचे उत्तर... त्यानंही मग ताणलं नाही.... त्यानं फक्‍त एक चिठ्‌ठी तिच्या हातात दिली. आणि सांगितलं या प्रश्‍नाचं उत्तर मिळालं की मग वाचा...ज्यांची ही चिठ्‌ठी आहे त्यांची ही शेवटची इच्छा आहे. तिला वाटलं जाऊ दे की काय ती अट पाळायची, पत्र वाचून टाकू.... पण नंतर तिलाच वाटून गेलं.. खरंच आपण काय केलं असतं.. तिची अस्वस्थता वाढली....रात्रभर तिला झोप लागली नाही...पहाटेपर्यंत तिला उत्तर मिळाले नाही.... तिने पत्र उघडले....
प्रिय,
कर्ण आणि माझ्यात एक फरक आहे. द्रौपदीने नाकारल्यावर कर्णाने तिचा सूड उगविला पण मला तुझा राग करता आला नाही. किंबहुना अर्जूनापेक्षा जास्त मी प्रेम केलं. अगदी आयुष्यभर......
कॉलेजमध्ये असताना तिला लग्नाची मागणी घालणारा तो. त्याला आपण का नकार दिला, तिला काहीच कळलं नाही...
तिचे डोळे भरुन आले...तिला तिच्या प्रश्‍नाचं उत्तर मिळालं होतं.... तिनं अर्जूनाची वाट बघितली कारण तिला कर्णच कळाला नव्हता....

बुधवार, २८ जुलै, २०१०

पत्र

नाव काय रे तुझं? जेवलास की नाही? आई कुठाय तुझी? काही खाणार का? तिनं प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. त्यानं हूं की चू केलं नाही. बहुतेक खूप रडल्याने त्याचा चेहरा सुजला होता... पण कुठेही मारल्याचे घाव नव्हते... नाकातून बाहेर आलेला शेंबूड त्यानं आत ओढला आणि पुन्हा तो त्या टेलिफोन खांबाला धरून राहिला... त्याची ती शांतता तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळी दहा वाजता ते आठ वर्षांचं पोर त्या खांबाशेजारी बसलेलं होतं. गोबऱ्या गालांचं. गोरंपान आणि अंगात चांगले कपडे असलेलं पोरगं मोठ्या खात्या-पित्या घरातलं वाटत होतं. पहिल्यांदा कोणीतरी असेल म्हणून तिनं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं... दुपार झाली... ते तिथंच बसून होतं... त्याच्याकडे बघायचं नाही, असं अनेकदा ठरवूनही तिची नजर त्याच्याकडे पुन्हा पुन्हा जात होती... आता त्याच्याकडे बघायचं नाही असं ठरवून ती नजर वळवायची... संध्याकाळ झाली तशी ती अस्वस्थ झाली... त्या पोराची तिला आता दया येऊ लागली, ते चुकलंय की कोणी त्याला इथे आणून सोडलंय, याची विचारपूस करावी म्हणून ती त्याच्याजवळ गेली... तिनं त्याला नाव-गाव विचारलं; पण ते काही बोललं नाही... तिनं त्याला हरतऱ्हेची आमिषे दाखवून बघितली; पण ते बधलं नाही... खांबाचा हात काही त्यानं सोडला नाही... तिला काही सुचेना... त्याला त्याच्या स्थितीवर सोडूनही जाता येईना आणि थांबताही येईना... काही क्षण तिला पोलिसांना फोन करावा वाटला; पण तिला धाडस झालं नाही... पोलिस येणार, त्याला घेवून जाणार... पुन्हा हे तिथंही नाही बोललं तर त्याला बालसुधारगृहात ठेवणार... ती अनेक वर्षे तिथं नोकरीला होती... पोलिसांना फोन म्हणजे त्याच्यासाठी नरकाचा दरवाजा आपल्या हाताने उघडण्यासारखंच... ती आता अस्वस्थ झाली... तिला काहीच सुचेना... त्याला त्याच्या अवस्थेवर सोडून द्यायचं तिनं मनाशी पक्‍कं केलं आणि ती घरात गेली... देवापाशी दिवा लावला... थो
डं कुंकू कपाळाला लावलं... सकाळचं बरंच जेवण शिल्लक होतं... तिनं टीव्हीचा रिमोट हातात घेतला... एक एक चॅनेलवरून ती सरकू लागली... पण मन रमेना... त्या पोराचा विचार मनातून जाता जात नव्हता... खिडकीतून बघावं काय, तो कुठे गेला असा विचार करून ती दोनदा खिडकीपाशी गेलीही. पण तिनं खिडकी उघडली नाही... पण ते जर तिथं असेल तर त्याला अंधाराची भीती नको म्हणून तिनं बाहेरचा दिवा लावला... रात्री बऱ्याच उशिराने तिला झोप आली... पहाटे जाग आल्यावर तिनं पहिल्यांदा खिडकी उघडली आणि त्या खांबाकडे तिनं बघितलं. ते पोरगं तिथं नव्हतं... रात्रीच्या थंडीत ते कुठेतरी गेलं असेल... कुठे गेलं असेल ते... घरी सुखरूप पोचलं असेल का? कोण असतील त्याचे आई-वडील... असे अनेक प्रश्‍नांचे तरंग तिच्या मनात उमटत राहिले. पण तिनं त्याला बगल दिली....ते सुखरुप असेल असा मनाशी समज करून तिनं चहाचं आधण ठेवलं आणि पेपर आला का बघण्यासाठी तिनं दार उघडलं... दारातच ते पोरगं पाय मुडपून झोपलं होतं... अगदी निरागस.. त्याच्या मुठी वळल्या होत्या... त्या वळलेल्या एका मुठीत एक चिठ्ठी होती... तिनं अलगद ती चिठ्ठी सोडवून घेतली...
त्यावर लिहिलं होतं...
प्रिय, संगीता,
याची आई चार वर्षांपूर्वी गेली... कॅन्सरने माझं आयुष्य अवघ्या चार महिन्यांवर आलं आहे... यापुढे याला पाळणारे हजारो मिळतील... पण सांभाळणारं कोणीच नाही... याचा सांभाळ कर...
ज्याच्यासाठी ती आयुष्यभर अविवाहित राहिली होती त्या दिलीपचं ते पत्र होतं...

सोमवार, २६ जुलै, २०१०

नायक

ते पुस्तक बाजुला ठेव आणि ऑर्डर दे... मी माझ्या मित्राला सांगत होतो.. अरे ! हे पुस्तक हातात घेतल्यापासून सोडवतच नाही... आपल्याकडे कुठे होतात असे प्रयोग...सगळे भाषांतरीत किंवा रुपांतरीत....खरी नाटकं होतात... तिकडे युरोपात...
च्यायला तुझं हे असंच असतं.....मरु दे रे तो शेक्‍सपीअर.....
शेक्‍सपीअर कधीच मरणार नाही..... मी मरु दे म्हटल्याक्षणी आमच्या टेबलसमोर येवून ऑर्डसाठी उभा असलेला वेटर म्हणाला....
मला काही सुचलं नाही.... तोही मग काही बोलला नाही.... ऑर्डर घेतली आणि निघून गेला.....नंतर अनेकवेळा त्या हॉटेलमध्ये माझं जाणं-येणं-आणि खाणं होत राहिलं, कधी तो असायचा कधी नसायचा... असला तर ऑर्डर घेण्यावाचून तो काही करायचा नाही.... दोन तीनवेळा मी त्याला बोलतं करण्यासाठी शेक्‍सपीअर, हॅम्लेट असं काही तर बरळत राहिलो पण त्याच्याकडून प्रत्यूत्तर आलं नाही... मात्र मला एक जाणवलं तो असा काही विषय निघाला की त्याला त्याचा प्रचंड त्रास होत असावा, त्यामुळे तो ऑर्डर न घेताच जात असे आणि मग दुसराच कोणी तरी वेटर येवून ऑर्डर घ्यायचा.
एका शनिवारी असाच त्याच हॉटेलसमोरुन जाताना तो बाहेर बसलेला दिसला...
काय रे असा बाहेर का बसलायस.... उगाचच स्वतःच्या इस्त्री केलेल्या कपड्यांचा गर्व होऊन मी त्याला एकेरी हाक मारली.... त्यालाही बहुतेक त्याची सवय झाली असावी त्यामुळे तो काही बोलला नाही.... मग मी त्याच्याजवळ जावून बसलो... काय विशेष!
आज तेवीस एप्रिल.... शेक्‍सपीअर आजच्याच दिवशी गेला....गेला? छे ! तो तर कधी जातच नाही....ठेवून जातो मागे शोकांतिका.... जगण्यातल्या सगळ्या वेदना तशाच ठेवून.....
नंतर तो भेटत राहिला... हॉटेलमध्ये तो काही बोलायचा नाही... पण दर शनिवारी मात्र हॉटेलच्या बाहेरच्या कट्ट्यावर माझी वाट बघत राहायचा... मी भेटलो की मग त्याच्या मनावरची जळमटं थोडी दूर व्हायची... मग बोलत राहायचा इस्किलस, सॉफक्‍लिस, युरिपीडीज, इब्सेन या साऱ्यांविषयी....हॅम्लेट आणि लिअर तर त्याची दैवतंच जणू त्यातील प्रसंगच्या प्रसंग तो म्हणायचा... आख्खा लिअर उभा करायचा...अलीकडे आता त्याला ये-जा बोलावताना जीभ जड व्हायची... पण तोच म्हणाला... आता थोडीही मान वर काढणं मला पेलावणारं नाही... तू मला ये-जाच कर... मीही मग त्याला त्रास दिला नाही....त्याला त्याच्या जागेवर सोडून दिलं... त्यातूनही एकदा त्याला मी विचारलं.... तू इथे म्हणजे हॉटेलमध्ये कसा म्हणून, पण तो बोलला नाही...... त्याचे ते निस्तेज डोळे केवळ हलले.... आणि तो उठला....
माझा प्रश्‍न आवडला नसेल, तर राहू दे पण बोलायचं टाळू नको... मी म्हटलं.
तो काही बोलला नाही... पण त्या प्रश्‍नाचा त्याच्यावर फारसा फरकही झाल्याचे जाणवला नाही. त्यानंतरही तो अनेकवेळा अनेक विषयांवर बोलत राहायचा....
एकदा असाच तो बसलेला असताना त्याच्या हातात काहीतरी होतं....मी खोदून खोदून विचारल्यावर त्यानं तो फोटो दाखविला....
लग्नानंतर पाचच दिवसात सहकारी प्रोफसरबरोबरच पळून गेली..... एवढंच म्हणाला
मला काय समजायचं ते समजलं... मी गप्प बसलो त्याला पुढचं काही विचारलं नाही.... एखाद्या शनिवारी मी भेटलो नाही की अस्वस्थ व्हायचा.... पण काही बोलायचा नाही.... तू येत जारे एवढंच म्हणायचा... एकदा मी म्हटलं अरे तुला जर माझी आठवण आली की एखादा फोन करत जा ना.... तो म्हणाला नको रे तुम्ही कामात असता तुम्हाला त्रास द्यायला आवडत नाही.... मी काही समजावून सांगितलं तरी तो ऐकणार नव्हताच.... मग बळेच मी त्याच्या खिशात माझे कार्ड कोंबले....
यावर माझा मोबाईल नंबर आहे.... तुला फोन करावा वाटला की कर .....मी काही फार बिझी असत नाही....
तो काही बोलला नाही.... पण त्याने ते कार्ड फेकूनही दिलं नाही..... नंतर अनेक आठवडे त्या हॉटेलात मला जाता आले नाही.....
एक दिवस रात्री उपसंपादकगीरीचे काम करत असताना पोलिस ठाण्यातून फोन आला.....ओळख पटवायची होती... मी गेलो तो तोच होता....
डोक्‍यात जोराचा मार बसल्याने गेला, बहुतेक कुणीतरी बेदम चोपलेले दिसते.... पोलिसाने बातमीच्या अंगाने माहिती पुरविली...मी काही बोललो नाही... सरळ हॉटेलमध्ये गेलो...ं
मॅनेजरला विचारलं, "" काय झालं, त्याला कोणी मारलं.''
काही नाही ओ.. चांगला... चांगला म्हणता म्हणता नालायक निघाला साला, आहो हॉटेलमध्ये आलेल्या बाईचा हात धरला..... लोकांनी बेदम मारलं मी तरी काय करणार... लोक हॉटेलात यायचे बंद व्हायचे..... मारलं ते बरंच झालं.....
मला त्याचं पुढचं बोलणं ऐकूच आलं नाही.... जाता जाता त्या हॉटेलमालकाला विचारलं तो काही बोलला का?
त्या बाईला शीला म्हणत होता.....आहो एका प्रोफेसरची बायको ती ....
मला काहीच सूचलं नाही.... ज्या नायकांच्या प्रेमात तो होता... त्यांच्याच पंक्‍तीत तो केव्हाच जावून बसला होता....आणखी एक शोकांतिका बस्स!

सोमवार, १२ जुलै, २०१०

मोगरा!

प्रवेशाच्या रांगेत शेवटच्या क्रमांकावर तो होता. येता-जाता शिक्षक त्याच्याजवळ थांबत त्याची विचारपूस करत. बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षात तो वर्गात पहिला आला होता. भौतिक शास्त्रासारख्या विषयात तर त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्याच्याकडून महाविद्यालयाला खूपच अपेक्षा होत्या. त्याने विद्यापीठात प्रथम यावे अशी सगळ्या प्राध्यापकांची इच्छा होती. तो मात्र शांत होता. अगदी बुद्धासारखा. कोणी त्याला "जिनीअस,' तर कोणी "न्यूटन' म्हणून हाक मारत; पण त्याच्या चेहऱ्यावरची स्मिताची लकेर कधी बदलली नाही. शिक्षक त्याच्याजवळ येऊन थांबत. त्याची विचारपूस करत. त्याच्या खांद्यावर हात ठेवत आणि पुढे जात.
प्रवेशाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सगळेच गडबडीत होते. कार्यालयातील कर्मचारी आपल्या नेहमीच्या शैलीत समोरच्या विद्यार्थ्यांवर खेकसत होता. प्रत्येक अर्जातील चुका त्याला पृथ्वीगोलाएवढ्या दिसत आणि हर्क्‍युलससारखा त्याचा भार आपल्या खांद्यावर पडल्यासारखा त्याचा चेहरा होई.
"शेवटच्या दिवशीच तुम्हाला कशी जाग येते,' असा प्रश्‍न जवळपास प्रत्येकाला विचारत एक-एक अर्ज हातावेगळा करत होता. रांग कूर्मगतीने पुढे सरकत होती. रांगेत आता त्याच्या मागेही मुले आली होती. शनिवार असल्याने कार्यालय दुपारीच बंद होणार, हे निश्‍चित होते. त्यामुळे रांगेत चुळबूळ सुरू झाली. सोमवारी जादा शुल्क भरून अर्ज स्वीकारले जाणार होते. त्यामुळे मधल्या एक-दोन मुलांनी सोमवारचा पर्याय खुला करत काढता पाय घेतला.
बाराचे ठोके वाजले, तसे अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. तासाभरात अर्ज भरला नाही, तर सोमवारी उगाच दोन-अडीचशे रुपयांना फटका बसणार होता. त्यातच ज्यांना दुसऱ्या वर्षाला कमी गुण होते त्यांना "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या अटीमुळे आवडीचा विषय मिळतो की नाही, याचीही धाकधूक होतीच. त्यामुळेच रांगेत चुळबूळ वाढली. तो मात्र शांत होता. मघाशी त्याच्याशी बोलून पुढे गेलेल्या प्राध्यापकांपैकी एक जण त्याच्याकडेच येत होते. त्याच्यापाशी आले, त्याच्याकडे बघून त्यांनी स्मित केले आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या विद्यार्थ्याकडे बघत म्हणाले, ""इथं काय करतोय? रांगेतून आज तुला प्रवेश मिळणार नाही. चल.'' तो मुलगा त्यांच्या पाठीमागून गेला. जाताना त्याने आपल्या बरोबरच्या मुलांनाही नेले. तो मात्र शांत होता. बरोबर एक वाजता त्याचा क्रमांक आला. त्याने आपला अर्ज त्या कारकुनाच्या हातात दिला आणि घड्याळाने एकाचा टोला दिला. कारकुनाने एकदा त्याच्याकडे बघितले आणि दुसऱ्याच मिनिटात पावती हातात दिली. ""सरांना सांगितलं असतंस, तर लगेच काम झालं असतं. रांगेत उभं राहण्याची गरज नव्हती,'' तो भाबडेपणाने म्हणाला. त्याचे वडील त्याच कॉलेजमध्ये उपप्राचार्य होते.
""मोगऱ्याच्या वेलीला वाढण्यासाठी आधाराची गरज असते, फुलण्यासाठी नाही. त्यामुळे चालताना कुबड्या घेतल्या तेवढ्याच पुरेशा आहेत. आता आणखी कशाचाही कुबड्या नकोत मला,'' बाजूला ठेवलेली कुबडी उचलत तो शांतपणे म्हणाला आणि निघून गेला.
खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली. का कोणास ठाऊक; पण कारकुनाला त्यातून मोगऱ्याचा गंध जाणवला.

बुधवार, ३० जून, २०१०

पाण्याचा थेंब

सकाळपासून पावसाची रिपरिप थांबली नव्हती. तिच्या अंगावरची खोळ केव्हाच भिजून ती आता गळू लागली होती. डोक्‍यापासून ती चिंब भिजली होती... तशातच तिनं घराला जवळ केलं. अंगावरची ओली साडी तशीच ठेवून ती गोठ्यात शिरली आणि धारा काढायला सुरवात केली. आज डेअरीला दूध घातले नाही तर उद्याची मीठभाकर मिळणार नाही याची तिला जाणीव होती. तिने पटापट धारा आटोपल्या. डेअरीला दूध घातलं आणि तशीच ती घरी परतली. अंगावरची साडी आता सुकायला लागली होती. चुलीच्या धगीत ती आणखी सुकेल म्हणून तिनं निखाऱ्यावर फुंकर मारली आणि शेणी आत सारली. आगीने पेट घेतल्यावर तिनं साडीचा पदर जरा त्यावर सुकवायचा प्रयत्न केला आणि मिश्रीचं बोट तोंडात कोंबलं. तिचं दहा वर्षांचं पोर शाळेतनं पळत घरात आलं. चिखलाने माखलेल्या कपड्यांसहच ते तिला जाऊन बिलगलं. तिनं त्याला तसंच बाजूला सारलं. ते थोडं हिरमुसलं; पण लगेच बाहेर खेळायला पळालं. तिनं चुलीवर चहाचं आदण ठेवलं आणि परत त्याला तिनं हाक मारली. ते मघाच्याच वेगानं परत आत आलं, कपातला चहा त्यानं बशीत घालून भुरकायला सुरवात केली. चहा भुरकून झाल्यावर त्याला काही तरी आठवलं, मग म्हणालं, ""आये, यंदा चंद्री याली तरी च्या काळाच की.'' ती काही बोलली नाही. तसलाच काळा चहा तीही प्यायली आणि मालकिणीच्या घरी भांड्याला गेली. भांडी घासता घासता मालकीण मोठ्यानं ओरडताना तिनं ऐकलं. काय झालं म्हणून ती आत आली तर तिच्या पोराएवढंच मालकिणीचं पोरगं व्हॉं करून रडत होतं आणि त्याची आई त्याला जबरदस्तीनं दूध पाजत होती. निम्मे दूध खाली सांडत होतं. ते नको नको म्हणत होतं, पाय आपटत होतं. ती तशीच घरी आली. दारात तिचं पोर खेळत होतं. तिला त्याला जाऊन मिठी मारावी वाटली; पण धीर झाला नाही. तिच्या डोळ्यातून एकच थेंब आला; पण त्याचा प्रवाह दिवसभर पाऊस पडून भरलेल्या नाल्यापेक्षा जास्त होता.

बुधवार, २८ एप्रिल, २०१०

नाणी..

आई-वडील नाहीत, भूक लागलीय रुपाया द्या की! अकरा-बारा वर्षांचं ते पोर काकुळतीला येऊन मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांकडे हात पसरत होतं. कोणी हातावर त्याच्या एखाद्‌ दुसरं नाणं टेकवत, तर कोणी तसंच निघून जाई. हळूहळू मंदिरातील गर्दी कमी होऊ लागली... त्याच्या शर्टच्या खिशातही नाणी खूप जमा झाली... त्यानं सगळी नाणी काढली, ती मोजली आणि पुन्हा खिशात कोंबली... आणखी चार रुपयांची त्याला गरज होती म्हणून ते पुन्हा मंदिराच्या दारात आलं. येणाऱ्यांपुढे हात पसरत राहिलं. मंदिराच्या दिशेनं येणाऱ्या सुटा-बुटातील माणसांकडे त्यानं पाहिलं. आता यानं पाच रुपयांचं नाणं दिलं की, संपलं म्हणून त्यानं त्याच्याकडे हात पसरला आणि पुन्हा आई-वडील नसल्याचं पालुपद सुरू केलं... त्या साहेबानं त्याच्याकडे एकदा बघितलं, तुच्छतेनं मान फिरविली आणि तो चालू लागला. त्याच्या मागून येणाऱ्यानं पोरांकडं बघितलं आणि त्याला त्याचा संताप आला. त्यानं पोराला धरलं आणि दोन मुस्काटात मारल्या... आई मेली काय, म्हणत तो त्याला मारू लागला. साहेबाला आता त्या पोराची दया आली. त्यानं मागं वळून त्या माणसाच्या हातातून त्याची सुटका केली. पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ, पण मारू नका... साहोबानं सुनावलं.... त्या माणसानं साहेबांकडे बघितलं आणि रागानं पुन्हा पोराच्या मुस्काटात मारली, "ह्यो माझा भाचा हाय आणि त्येची आई जित्ती हाय.... असं काही काही सांगत राहिला. साहेबाला काही कळलं नाही. त्यानं तरीही त्या पोराचा हात त्या माणसाच्या हातातून सोडवला. बॅगेतील पाण्याची बाटली बाहेर काढली आणि त्या पोराला पाणी पाजलं. "तुझी आई जिवंत आहे ना?' साहेबानं प्रश्‍न विचारला. "हो!' पोरानं डाव्या मनगटानं शेंबूड पुसला आणि रल्या ओढातून ते पुटपुटलं. त्याला शांत होऊ दिलं आणि मग साहेबांनं विचारलं, "मग भीक का मागतोस? आईनं सांगितलं का?' त्याला आता धीर आला. "आईनं नाही
सांगितलं, पण...' त्यानं खिशातून ती सगळी नाणी बाहेर काढली. ती पुन्हा मोजली "यात आणखी दोन रुपये घालून परीक्षेची फी भरणार आहे... उद्या लगेचच भरायची आहे. हॉटेलात काम मागायला गेलो त्यांनी दिवसाला 20 रुपयेच देणार म्हणून सांगितलम्हणून इथं आलो.' फीसाठी पैसे पाहिजेत म्हटल्यावर कोणी पैसे द्यायला तयार नव्हते. म्हणून आई-वडिल मेले म्हणून पैसे मागायला लागलो. साहेबाला काही कळलं नाही. साहेबाचा हात नकळत खिशात गेला. त्याला तिथं नाणी लागली, पण ती त्याला द्यावी वाटली नाहीत. खिशाचं पेन त्यानं काढलं आणि त्याच्या हातात टेकवलं आणि... साहेब मंदिरात न जाताच निघून गेला.

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

एप्रिल फुल !

रात्रीचे बाराचे ठोके पडले आणि तिचा मोबाईल वाजला...डोळे तारवटतच तिने तो उचलला आणि हॅलो म्हटलं.....हॅलो मी दारात उभा आहे.. दार उघड... त्याचा आवाज ऐकून ती थोडी बावचळली.....एवढ्या रात्री का आला असेल? काहीतरी नक्‍की महत्त्वाचं काम असेल म्हणून तिने दार उघडलं... दारात कोणी नाही बघून तिनं दार बंद केलं आणि त्याला फोन लावला... तो मोठ्याने ओरडलाच...एप्रिल फुल. ती स्वतःशीच हसली. फोन ठेवला आणि आडवी झाली. तिने झोपायचा प्रयत्न केला, पण झोप येईना. मागचे दिवस आठवत राहिले. तो पहिल्यांदा भेटलेला... कॉलेजमध्ये त्याने केलेली धमाल... नंतर त्याने केलेलं प्रपोज. त्याच्याशी आपण लग्न करणार आहे म्हटल्यावर आईने केलेला थयथयाट...
किती दिवस तो आईला समजावत होता. त्यासाठी रोज तिच्या शाळेत जात होता. आईच म्हणाली नंतर, जर त्यानं मला प्रपोज केलं असतं तर मीही हो म्हटलं असतं. खूप बडबड्या. लग्नानंतर किती काळजी घेत होता. एकेकदा त्याच्या त्या काळजीचाही वीट यायचा. आपण त्याला म्हणायचो की नको काळजी करत जाऊ एवढी. पण तो साधं डोकं दुखत असलं तरी रात्र रात्र बसून राहायचा. एकदा असंच ऑफीसच्या ट्रीपला गेल्यावर याचे एवढे फोन आले की शेवटी त्याला बास असं सांगावं लागलं. त्यानं तरी ऐकलं नाही. फोन वाजत राहिला. बॉस म्हणालाच असले अँटीने बदलावे. त्यावेळी काही वाटले नाही. पण नंतर तसं साचत राहिलं.
बॉसच्या शेजारी असताना याचा फोन आला की बॉसचं डोकं फिरायचं. मग तो कामात न झालेल्या चुकाही दाखवत राहायचा. त्याचा त्रास होऊ लागला. त्याची अति काळजी आता अंगावर येवू लागली. चिड येवू लागली. मग, एकदा त्याला सरळ सांगून टाकलं, आपलं यापुढे एकत्र राहाणं शक्‍य नाही. तो काही बोलला नाही. नंतर त्या आवेगातच आपण घटस्फोटाची कागदपत्रे केली. त्यानं का हा प्रश्‍न न विचारताच सही केली.
मग फोन बंद झाले. पहिले काही महिने छान गेले. बॉस नेहमीप्रमाणे बोलत होता. मग अचानक एक दिवस बॉसने छेडले... मैत्रीणीजवळ आपण खूप रडलो. पण दुसऱ्याच दिवशी बॉसने केबीनमध्ये बोलवून पाय धरले. बॉसचा सुजलेला चेहराच सांगत होता की त्याने रात्री त्याला बदड बदड बदडले असणार. त्याला फोन केला. तोच उत्साह खूप बडबडला. मग फोन खाली ठेवला. त्या रात्री खूप एकटं वाटलं. मग नंतर तो फोन करत राहायचा. आधी विचारायचा की तू रिकामी आहेस का? मग बोलू का विचारायचा आणि बोलायचा. त्याचा तो त्रयस्थपणा अंगावर यायचा. पण धीर नाही झाला. मग एक दिवस त्याला सरळ विचारलं आपण पुन्हा लग्न करुया का? लगेच हसला. मग म्हणाला, नको... आपल्या लग्नाची तारीख एक एप्रिल होती. एकदा "फुल' बनल्यावर तीच चूक पुन्हा कशाला !

रविवार, १४ मार्च, २०१०

याद तुझी......

आम्ही थोर पत्रकार नाही आहोत. पोटासाठी काम करावे, पोट भरुन उरले तर दिमागाला खाद्य पुरवावे, अगदीच अपचन झाले असेल आणि वैद्याने लंघनाचा सल्ला दिला असेल तर थोडे होन आणि काही नाणी शिल्लक राहिली समजून एखादा चित्रपट बघण्याची हौस आम्ही पुरवत आलो आहोत. वर उल्लेखल्याप्रमाणे आम्ही लेखणीशी निगडीत धंदा करत असल्याने आम्हास अनेक ठिकाणी प्रतिष्ठा मिळते, तसे काही ठिकाणी आम्हास श्‍वानकुलीन समजून हाड हाडही केले जाते. पण आम्ही अशांकडे दुर्लक्ष करतो आणि लेखणी पाजरतोच. खरे तर नाटक आणि सिनेमांना आम्ही आमचा गनीमच मानला आहे. दिसला की घातली वाघनखे, काढला कोथळा बाहेर... पण आलिकडे असे काहीतरी वेगळे होऊ लागले आहे की ती चित्रपटातील सगळी मुर्खपणाची गाणी, आणि नट नट्यांचे धावणे, पळणे आवडू लागले आहे..... अगा विपरीत झाले म्हणून आम्ही हे आमच्या तिर्थरुपांना सांगितले, त्यांनी नेहमीप्रमाणे पहाडी हास्याचा आवाज करीत कोण आहे रे ती असा सरळ प्रश्‍न आम्हांस पुसला. तिर्थरुपांना सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे आवडत नाहीत हे एव्हाना आमच्या ध्यानात आले असल्याने आम्ही सरळ मातोश्रींच्या पायात झुकलो. मातोश्रींनीही आम्हाला तोच प्रश्‍न पुसल्याने एकंदरीतच आमचे काही खरे नाही हे आम्हाला कळून चुकले. सांप्रतसमयी आमचे मन एका कन्येवर जडल्याचे तुम्हाला कळले असेलच पण तो विषय नाही. आमचे मन कुठेतरी लागल्याचे आम्हास खूप महिन्यांपासून ज्ञात आहे, पण अलिकडच्या काळात आम्ही मुर्खपेटीच्यासमोर बसून तासनतास ते प्रेमकाव्याने ओथंबलेले चित्रपट बघतो आहोत, प्रियतमेच्या विरहात डावा हात तोंडावर घेत, पिंजारलेल्या केंसावरुन हात फिरविणाऱ्या तरुणसदृश प्रौढाचे काळ्या पांढऱ्या रंगातील चित्रपट बघतो आहोत. आम्ही कोण कुळातील, आमचा काय हुद्दा याचे स्मरण न ठेवता आम्ही आता शिळही फुंकतो आहोत.. कोण अधर्म हा म्हणून आमुचे स
गे सोयरे आमच्याकडे बघत आहेत किंतू त्यांसी दुखवावे हा हेतू आमुच्या मनी कधी शिवला नाही, तत्कारणी आम्ही गप्प बसतो. सांप्रत समयी थ्री इडीयटनामक चित्रपटात महान तत्ववेत्ते जे की आमीर खान यांनी समस्त तरुणांना धडा शिकविता शिकविता त्यातील कन्येला सांगितले तैसेच आमुच्या बाबतीतच होत आहे. आता याला जर कोणी नावे ठेवत असेल तर ठेवो बुवा......

सोमवार, १ मार्च, २०१०

जुगार तुम्ही जिंकलात

प्रिय डॉ. सलील यांना,
स. न. वि. वि.
परवा शनिवारी कोल्हापुरात तुमचा गाणी मनातील हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम सुंदर होता, आवडला या प्रतिक्रीया तर खूप लोकांकडून तुम्हाला आल्याच असतील, त्या पुन्हा इथे देण्यात आणि तुमचा वेळ घेण्यात अर्थ नाही. खरे तर सोन्याला सोने किंवा हिऱ्याला हिरा म्हणणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. त्यामुळे तुमचा कार्यक्रम आणि तो चांगला झाला या गोष्टी एका सुत्राच्या बरोबर चिन्हाच्या आल्याड पल्याडच्या दोन बाजू आहेत. पण पत्र हे सांगण्यासाठी लिहिलंच नाही.
पत्र लिहिण्यामागे खरं कारण खूप दिवसांनी एखाद्या संगीतकाराने आपली पहिली निर्मिती रंगमंचावर सादर केली. अलिकडे माध्यमांच्या प्रसारामुळे गाणी गाजतात, लोकांच्या ओठावरही येतात पण ती कानावर अनेकवेळा आदळल्याने, गाण्यात फार दम आहे म्हणून नाही. त्यामुळे एकदा का हा पूर ओसरला की मग मागे उरतो तो केवळ कचराच. अशात तुमची गाणी खूप गाजली आणि ओठावर नुसती आलीच नाहीत तर ती रेंगाळलीही आणि मनात घर करुन राहिली. त्याच त्या कार्यक्रमांना खूप प्रसिध्दी आणि पैसा मिळत असतानाही तुम्ही "गाणी मनातली' हा कार्यक्रम घेवून आलात. खरे तर डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे ब्रॅंडींग इतके मोठे आहे की पुण्यात तुमचा सोलो कार्यक्रम झाला असता तरी लोकांनी तोबा गर्दी केली असती. पण तरीही कोल्हापुरात कार्यक्रम घेण्याचा जुगार तुम्ही खेळलात. पहिल्यांदाज डाव मांडावा आणि तिन्ही एक्‍के हाती लागावे तसा तो जुगार तुम्ही जिंकलातही. रंगमंचाखालून तुमच्या उत्स्फूर्ततेला आणि आत्मविश्‍वासाला सलामही ठोकला गेला. खरे तर तुमच्या समकालीन संगीतकारांत तुम्ही ठसा उमटविला आहे. आमच्या जन्माअगोदरची गाणी गातच आम्ही मोठे झालो... मधल्या काळात खूपच सुमार दर्जाचे संगीत महाराष्ट्राला ऐकायला मिळाले. सौमित्रची गीते आणि मिलींद इंगळे यांचा आवाज घेवून आलेल्या गारव्याने कोरड्या घशात ओलावा निर्माण केला खरा पण तोही कट पेस्ट असाच होता, कारण त्यापुर्वी हिंदीत त्याच संगीताने यश मिळविले होते मग त्याच बोलांवर मराठी शब्द पेरले गेले. सौमित्र यांच्या शब्दांनी मात्र तरीही जादू केलीच. पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने मराठी भावगीतांना पुन्हा सोनेरी दिवस आणले. हे सगळं लिहिण्यामाने केवळ तुमची स्तुती करावी हा हेतू नाही, स्तूती करायची असेल तर आता पायलीला पन्नास भाट मिळतात, आणि अशी तुणतुणी मला वाजवता येतच नाही. पण कोल्हापुरात तुम्ही केलेल्या नव्या प्रयोगाबद्दल तुमचे अभिनंदन आणि मला खात्री आहे की तुम्ही यापुढेही आमचा विश्‍वास ढळू देणार नाही.

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

शेकडो समुद्रांचा ओलावा

बास झालं! उठा आता... हा रस्ता पुरा करायचाय... भाकरीचा शेवटचा घास तोंडात जायच्याआधीच मुकादमाची हाक ऐकून ती थोडी वैतागलीच... हातातला घास तसाच तोंडात कोंबत तिने घटाघटा पाणी प्यायलं.... डोक्‍यावर बांधलेला टॉवेल सावरत तिनं मांडीवरल्या लेकराला झाडाला बांधलेल्या झोळीत टाकलं... तिच्या हिसक्‍याच्या उठण्यानं ते जागं झालं आणि त्या झोळीत उठून बसलं...मुकादमाचा तोंडाचा पट्‌टा सुरुच होता... एकेकीचं नाव घेत कामाला लागायच्या तो सुचना देत होता.... हीचं नाव घेऊन तो ओरडलाच... बाई पोराला घरात ठेवा, इथं कामं असतात.... असं काहीबाही तो बडबडत राहिला.... ती उठली...तिच्या बरोबरच्या बाया मुकादमाला शिव्या देतच उठल्या... काळ मागे लागल्यासारखाच मेला पाठिवर बसतो.... त्या पुटपुटल्या.... पण हे काम सुटलं तर लवकर काम हाताला मिळायचं नाही...त्यामुळे त्या त्याच्या मागनं चालू लागल्या. तीही उठली... हातात झाडू घेवून रस्ता साफ करु लागली.... हात हालवा बाई.... सगळी धूळ गेली पाहिजे.... डांबर चिकटत नाही त्याशिवाय... मुकादम अशा सुचना देतच होता. एवढ्यात तिला तिच्या तान्हुल्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. पहिल्यांदा तिने त्याकडे दुर्लक्षच केले, पण ते कळवळायला लागल्यावर ती उठली... आईचा स्पर्श झाल्यावर तेही रडायचं थांबलं... तिच्याकडे बघून खुदकन हसलंही.... वादी हाय जन्माचा! म्हणत तिनं त्याला झोळीतून उचललं... पटपटा त्याचे मुके घेतले.... मग त्याला पुन्हा झोळीत ठेवलं... आई लांब गेली तशी ते पुन्हा रडायला लागलं... ती मागे वळली... त्याला कडेवर घेतलं आणि काम चालू आहे तिथं त्याला आणलं... वर सूर्य आग ओतत होता...तापलेला रस्ता उष्ण उच्छ्शास सोडत होता....तिनं डोक्‍याचा टॉवेल सोडला त्या तापलेल्या रस्त्यावरच तो पसरला... तान्हुल्या गालाचा पापा घेत त्याला त्यावर ठेवलं....आणि पुन्हा हातात झाडणी घेतली.... तापलेल्या उन्हात ते तान्हुलं तिथंच खेळतं राहिलं...
. त्याला आईच्या डोळ्यांतील शेकडो समुद्र ओलावा देत होते....

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

पंड्या

पुर्वी गावाकडे आमच्या घरी अनेक माणसं यायची.... गोंधळी, रामदासी अशी बरीच माणसं त्यात असायची... आजीने तर अनेक विधवा, परितक्‍त्या बायांना आमच्या वाड्याच्या समोरच्या खोलीत राहायची मुभा दिली होती. घरातील नीटवाट, पाणी भरण्याची कामं या बाया करायच्या आणि मग आजीच त्यांना लागेल तो शिधा द्यायची.... खूप वर्षे हे असंच चालू होतं. यामध्येच एक यायचा म्हणजे काशिचा पंड्या. साठी पार केलेला... डोक्‍याचा गोटा, कळकट मळकट धोतर आणि तशीच कळकट पिशवी खांद्याला अडकवलेला पंड्या दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी यायचा. हा काशिहून यायचा म्हणे ...आणि तेथील गंगाजल आणि काळा दोरा आम्हाला द्यायचा. खरे तर तो काशिचा पंडित पण का कोणास ठावूक आमच्या घरातील सगळ्या बाया-बापड्या त्याला पंड्याच म्हणायच्या. विशेष म्हणजे तो आला हे कळल्यावर आमच्या आत्याही खास त्याच्याकडून काशिचा गंडा बांधायला माहेरला यायच्या. तो महाराष्ट्रातील बऱ्याच देशस्थांच्या घरी जायचा, आमच्या अनेक पाहुण्यांकडे तो कधी ना कधी गेलेला असायचाच... कुणाकडे उन्हाळ्यात... कुणाकडे पावसाळ्यात...सगळीकडे तो त्याच्या त्या कळकट मळकट पिशवीतून काळ्यामीट्‌ट बाटलीतील गंगाजल पाजायचा. माझे वडील नेहमी म्हणायचे हा कुठला जातोय काशिला, इथेच पंचगंगेचं पाणी बाटतील भरत असेल आणि आंबाबाईच्या देवळातील दोरे वाटत असेल.... पण असं असलं तरी तेही त्याच्याकडून भक्‍तीभावानं पाणी घ्यायचे आचमन करुन डोक्‍याला हात पुसायचे....आणि वर्षभर तो काळा गंडा हातात जपायचे... असा हा पंड्या कमरेत वाकलेला, अनुनासिक हिंदी बोलणारा, कर्मठ दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी मुक्‍कामला यायचा. एकदा आला की किमान पंधरा दिवस त्याचा मुक्‍काम हालयाचा नाही.
खरे तर पंड्याचा आम्हाला फार राग यायचं कारण काहीच नव्हतं....पण त्याच्याकडून काळा गंडा बांधून घेणं म्हणजे एक दिव्यच असायचं. काळा दोरा बांधला की
त्याला नमस्कार करायला लागायचा....नमस्कार केला की तो दोन्ही हातांनी जोराचा धपाटा पाठीवर मारायचा.. त्याने पाठित सणकच भरायची... त्यामुळे पंड्याचा आम्हाला प्रचंड राग यायचा......तर त्याला बायकांची शिवाशिव चालयची नाही याचा घरातील बायकांना त्रास. शीव... शीव...शीव असा कायमचा जप त्याच्या तोंडात असायचा...त्याच्यासाठी सडलेले तांदूळ, स्टोव्ह, तांब्याच्या घागरीत पाणी याची तजवीज करायला लागायची...तो स्वयंपाक करत असला की त्याच्याशेजारी कोणी गेल्याचे त्याला आवडायचे नाही. खासकरुन बायकांनी. त्याने म्हणे स्वतःच केलेल्या स्वयंपाकाशिवाय दुसरा घास तोंडात टाकला नव्हता.. कधी मधी आई स्वयंपाक घरात गेलीच तर
लगेच म्हणायचा
दूर... दूर...दूर.. भाभींजी आप थोडा अलग रहें.... आईला याचा प्रचंड राग यायचा
मेल्याने माझ्याच घरातील स्वयंपाकघरावर आपला हक्‍क सांगितलाय.. आई पुटपुटायची.... तो पंड्या लगेच माझ्या आजीकडे आईची तक्रार करायचा. मग आजी म्हणायची, ""त्याला नका रे त्रास देवू काशिचा ब्राह्मण आहे.... ब्रह्मचारी आहे.... शाप देईल...... दरवर्षी तो यायचा नंतर नंतर तो थकत चालला होता..... पण पीळ मात्र तसाच... शीव..शीव..शीव..चा जप कायम....आता तर आजीही नव्हती जिच्याकडे तक्रार करायला.... एकदा आई अशीच चिडली... म्हणाली, दक्षिणा घ्या आणि चालते व्हा... तुमची नाटकं इथं कोणी सहन करणार नाही... मग तो आमच्या शेजाऱ्यांच्या घरी गेला.... तिथून पुढे कुठे गेला ते कळलेच नाही.... नंतर बरेच वर्षे पंड्या आला नाही... आम्हालाही त्याची आठवण आली नाही.... नंतर एकदा माझ्या मावशीनं सांगितलं.... तो तिच्या गावात राहायचा एकटाच... नंतर नंतर त्याला स्वयंपाक करायला जमायचं नाही... पण त्याने हेका सोडला नाही.... मग एकदिवस त्याने स्वतःला रेल्वेखाली झोकून दिलं..... पोलिस रिपोर्टमध्ये आलं 80 वर्षांचा माणूस... आत्महत्या.... सोबत पिशवी, त्यात एक पाण्याची बाटली आणि काही काळे दोरे....

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

बंद दरवाजा

कोण आहे?... दारावची थाप ऐकून नाराजीनेच तो ओरडला... पापण्या उघडण्याचा त्याने प्रयत्न केला पण जाडावलेल्या पापण्या उघडण्यास तयार नव्हत्या... हळू हळू दारावरचा थापांचा वेग वाढला... आता तर त्याला राग आला... अंगावरचे पांघरुण बाजुला सारुन त्याने दार उघडले.... समोर एक अनोळखी माणूस बघून त्याचा पारा पार चढला...
कोण तुम्ही? काय काम आहे?.
मी... मी... तो अडखळला...
काय मी... मी... आहो पहाटेचे चार वाजताहेत आणि तुम्ही कुणाच्याही दारावर थापा काय मारताय.?.. त्याने शक्‍य तितका राग दाबण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बोलण्यातून तो जाणवलाच...
नाही... मी... थोडावेळ आत येवू का?...
त्याच्या विस्कटलेल्या केसांवरुन आणि अंगावरच्या कपड्यावरुन तो कोणी भूकेला भिकारीच वाटत होता... त्याला आत घेतले तर तो पुन्हा जेवण मागणार....नकोच ती कटकट
आतबित काय नको..त्या बाहेरच्या माणसाने काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही.... ओ... चालते व्हा बघू येथून... च्यायला रात्रभर काम करायचं... आणि ह्या कटकटी...
त्याने दरवाजा बंद करुन घेतला... बंद कसला त्याने तो जोरात आदळलाच...
मग त्याने बेडवर स्वतःला सैल सोडलं... जडावलेल्या पापण्या पुन्हा बंद झाल्या...
थोड्या वेळाने पुन्हा दारावची थाप ऐकू आली... त्याने कुस बदलली... पण दार उघडले नाही... ती थाप थोडी जोरात झाली... मग थांबली...
दुपारी आकरा बारा वाजता कधीतरी तो उठला...दरवाजाच्या कडीला लावलेला पेपर हाती घेतला आणि मग एक, एक पान उलटत ... एक अन्‌ एक बातमी वाचून काढली... रात्रभर उपसंपादकगिरी केलेल्या कामांतील काही चुका आता त्याला ठळक जाणवू लागल्या...काही शब्दांचा त्यालाच राग आला.... हा इथे नको होता वापरायला.... ही ची जागा चुकलीय.... या बातमीत च लावायचाच राहिलाच की.... असं तो मनाशी काहीतरी पुटपुटला... त्याने पेपर मिटला... मग त्याला पहाटेच्याच्या प्रसंगाची आठवण झाली... कुणाला तरी सांगायचे म्हणून त्याने फोन लावला...
पण फोन बराचवेळ वाजला तरी उचलला नाही... त्याने दोनदा प्रयत्न केला पण काहीच उत्तर नाही... त्याने मग दुसरा फोन लावला....
काय बातम्या कशा लागल्या... चांगल्या... तिकडून फारसा उत्साह नव्हताच....
का रे आवाज असा का?
गोट्या गेला...
तो किंचाळला... कसा?
काल त्याला हार्ट अटॅक आला होता...दवाखान्यात पोहचलाच नाही....
अरे पण...
अरे पहाटेच त्याला हार्ट अटॅक आला...त्याच्या वडिलांना काहीच कळलं नाही....ते इथे नवीन आलेत ना... त्यांना इथले काहीच माहिती नाही... त्यामुळे ते तिथूनच जवळ असलेल्या कुठल्या तरी गोट्याच्या मित्राच्या घरी
गेले होते, काही गाडीची व्यवस्था होते का बघायला.... पण त्याने यांना बघून दारच बंद करुन घेतले......तो नंतर बरच काही सांगत होता.... पण त्याच्या हातातून मोबाईल केव्हाच पडून गेला होता...
आता त्याला भोवळ आली...... समोरच आरसा होता... त्यात त्याने पाहिले.... त्याला उगाचच आपले पुढचे दोन दात सुळ्यांसारखे भासले.... त्यावर रक्‍तही होतं....

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

मौनाची भाषांतरे व्हावीत

तिच्या पैंजणाची रुणझुण ऐकली की तो तिथेच थबकायचा. मग त्याच्या समोरचे सगळे रंग बदलून जायचे. भरदुपारीही मग त्याला पश्‍चिमेची गुलाबी प्रभा दिसायची. तो तसाच होता. अगदी वेडा. ती समोर आली की मग मात्र तो मुग्ध व्हायचा. तिच्या प्रत्येक हालचाली तो डोळे भरून पाहायचा. मग घसा खाकरून बोलण्याचा प्रयत्न करायचा; पण ओठ साथ द्यायचे नाहीत, जीभ वळायची नाही. बोलायचं असायचं एक आणि तो भलतंच बोलून जायचा. तिला हे जाणवायचं; पण तिही काही बोलायची नाही. फक्‍त हसत राहायची, गालावर आलेले केस मागे घेत राहायची. मग त्याची अवस्था बघून आपणच काहीतरी सांगत राहायची. खूप बोलल्यावर मग ती जाते म्हणायची, तो थांबवायचा तिला. ""जाऊ नको,'' म्हणायचा... थोडा वेळ परत ती थांबायची. मग जायला निघायची. मग त्याच्या हृदयाची धडधड आणखी वाढायची; पण तिला अडवायचं बळ त्याच्या हातात यायचं नाही. ती निघून गेली की, मग याला सगळे विषय सुचायचे... काय बोलायचे होते, ते सगळे आठवायचे. मघाशी बोलताना आपण खूपच मूर्खपणा केला, हेही त्याला जाणवायचे. मग तो स्वतःच्याच डोक्‍यावर एक टपली मारायचा. जोरात शीळ फुंकायचा आणि पुन्हा ती कधी भेटेल याची वाट बघत राहायचा. पुन्हा ती भेटली की याचं असंच व्हायचं. ती त्याला नेहमी म्हणायची, ""तू असा कसा?'' मग तो गप्प बसायचा. काही प्रश्‍नांची उत्तरे नाही देता येत, असं काहीबाही समजावयाचा. मग तीही ताणायची नाही. त्याला त्याच्या स्थितीत सोडून द्यायची. कस्तुरीमृगाच्या बेंबीसारखं त्यांचं प्रेम दरवळत राहायचं आणि ते दोघेही त्याच्याच शोधात हिंडत राहायचे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं तिला सांगायलाच पाहिजे का? तिला ते समजत नसेल का, असं त्याला वाटायचं. तर त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तर तो मग सांगत का नाही, असं तिला वाटायचं आणि मग दोघेही मौन बाळगून राहायचे. उद्याच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त त्यांच्या मौनांची भाषांतरे व्हावीत.

बुधवार, २७ जानेवारी, २०१०

चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती

चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती

विवेकानंदांसारख्या सन्यस्त जीवन जगणाऱ्या प्रभुतीने पैशाला महत्त्व दिले नाही, यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही; पण पैशाची निकड त्यांनीही अमान्य केलेली नाही. मात्र पैसा हेच सर्वस्व नाही हे ते वारंवार सांगतात. तरुणच देशाचे भवितव्य बदलतील! असा गाढ आशावाद दाखविणाऱ्या विवेकानंदांचे विचार आजही तरुणांना प्रेरणादायी आहेत.-----------
""आपण गरीब आहोत असे समजू नका. केवळ पैसा हीच जगातील शक्‍ती नव्हे; चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती होय. साऱ्या जगात हीच खरी शक्‍ती आहे. हे तुम्ही स्वतःच बाहेर येऊन पाहा.''
2 नोव्हेंबर 1883 मध्ये अळसिंगा पेरुमल या आपल्या गुरुबंधूंना लिहिलेल्या पत्रामध्ये विवेकानंदांनी नितीमत्ता आणि पावित्र्याला पैशापेक्षा जास्त महत्त्व आहे हे पटवून दिले आहे.
शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांनी "ते' ऐतिहासिक भाषण केले. त्या भाषणाआधी त्यांना पैशाची आवश्‍यकता होती आणि त्यासाठीच त्यांनी पेरुमल यांना पत्र लिहिले असल्याचे जाणवते. पेरुमल यांना काही कारणांनी पैसे जमविता आले नाहीत, त्याबद्दल ते स्वतःला दोषी मानत होते. त्यामुळे पेरुमल यांना समजावताना विवेकानंदांनी वरील पत्र लिहिले. त्या पत्रात, पैसा हेच सर्वस्व नसल्याचे ते पटवून देतात. केवळ याच पत्रात नव्हे तर विवेकानंदांनी त्या काळात ज्या-ज्या वेळी भारतात पत्र लिहिले त्या-त्या वेळी पैशाला महत्त्व देऊ नका, पैसा हा आवश्‍यक असला तरी तो सर्वस्व नाही, हेच वारंवार सांगितले.
अमेरिका म्हणजे पैशाचं झाड! याबद्दल भारतात वाटणारी उत्सुकता आणि ते मिळत नसल्याचे दुःख हे त्या काळातही होतेच; पण अमेरिकेतील ऐषोआरामबद्दल येथे वाटणाऱ्या कुतुहलामुळे आणि तो ऐषोआराम मिळत नसल्याचे वाईट वाटून घेणाऱ्या आपल्या गुरुबंधूंना ते समजावून सांगताना आपल्याकडे पैसा नसला तरी अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांची पैशात मोजमाप करता येणार नाही हे ते सांगतात.
पैसा हेच दुःखाचे मूळ असेल तर इथे (अमेरिकेत) तो प्रश्‍न नाही; मग येथील लोक दुःखी का? कारण येथे नितीमत्ता नाही. त्यापेक्षा भारतातील लोक अधिक सुखी आहेत. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकवेळी आपल्याकडे काय अधिक आहे! याचा विचार करायला हवा ! हेच ते वारंवार सांगतात.
म्हैसूरच्या राजेसाहेबांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,""पाश्‍चात्य लोक आमच्या जातीभेदांवर कितीही टीका करोत; पण त्यांच्यात आमच्यापेक्षा देखील वाईट असा जातीभेद आहे आणि तो म्हणजे पैशावर उभारलेला जातीभेद, अर्थगत जातिभेद. अमेरिकन लोक म्हणतात की सर्व शक्‍तीमान डॉलर काहीही करू शकतो; पण या देशात जेवढे कायदे आहेत तेवढे जगात इतरत्र कुठेही नाहीत आणि येथील लोक कायद्यांना जेवढे धाब्यावर बसवितात तेवढे दुसरीकडे कुठे आढळत नाही. साधारणपणे आपले गरीब लोक या पाश्‍चात्यांपेक्षा कितीतरी अधिक नितीमान आहेत आणि हीच आपली शक्ती आहे.
खास करुन तरुणांना मार्गदर्शन करताना विवेकानंदांनी धर्म आणि जगणं यांची सांगड घातली आहे. स्पर्धा असतेच, पण ही स्पर्धा कुठल्या पातळीपर्यंत करायची हे ठरविले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या आणि उर फुटेपर्यंत धावायला लावणाऱ्या स्पर्धेत तरुणांना पैसा सर्वस्व वाटू लागला आहे. पैसा काहीही करु शकतो. त्यामुळे पैशासाठी काहीही हे सूत्र ठळक झाले आहे. याच सूत्राला गिरवत तरुणाई पुढे जात आहे. मग पैसा मिळाला नाही की निराशा आणि निराशेतून आत्महत्या! अशा दुष्टचक्रात तरुणाई सापडत आहे; पण कोणत्याही दुष्टचक्राला भेदण्याची ताकद केवळ तरुणांतच आहे हा अशावाद ते जागवत राहातात.
त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून आशावाद आणि जगण्याची उर्मी यांना प्रथम प्राधान्य दिल्याचे जाणते. खास करुन कर्मकांड म्हणजे धर्म नसून नितीमत्ता हाच धर्म आहे हेच ते वारंवार पटवून देतात. धर्म आणि जगणं यांची सांगड घालताना जगण्यापासून धर्माला वेगळं करता येत नसल्याचे ते स्पष्ट करतात.आज "पैसा' या शब्दाभोवतीच यशापयश केंद्रीत होत असताना विवेकानंद तरुण सहकाऱ्यांना विवेक, नितीमत्ता यांची किंमत पैशात करता येणार नाही, हे सोदाहरण स्पष्ट करतात.

टाईमपास ः वेळेचा अपमानच

टाईमपास ः वेळेचा अपमानच
अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे.
संस्कृतमध्ये एक कथा आहे. गाढव आणि उंट एकत्र चाललेले असतात. मध्येच उंटाला गाढवाची स्तुती करावी वाटते म्हणून ते म्हणतं, ""हे गर्दभमहाराज, तुमचा आवाज किती गोड आहे.'' उंटाने केलेल्या स्तुतीने गाढवाच्या अंगावर मूठभर मांस चढतं. आपल्या या मित्राने एवढी स्तुती केली म्हटल्यावर तेही उंटाची स्तुती करतं. ""हे उंटमहाराज, तुम्ही दिसायला किती सुंदर आहात.'' ही गोष्ट आठवायचं कारण "टाईमपास' हे नाटक. नावाप्रमाणे टाईमपास म्हणूनही या नाटकाकडे बघितलं तरी नाटक बघायला जाऊन वेळ वायाच घालविला नाही तर वेळेचा अपमानही केला असं वाटतं.
सुयोगची निर्मिती, शफाअत खान यांचे लेखन आणि भरत जाधव, सुप्रिया पिळगावकर यांचा अभिनय म्हणून प्रेक्षक नाटकाकडे वळतात खरे; पण आपल्या हाती निखळ मनोरंजनसुद्धा लागू नये, या बद्दलची हळहळ व्यक्‍त करतच नाट्यगृहातून बाहेर पडतात. नाटकाचं नाव "टाईमपास' असल्याने त्यातून तत्त्वज्ञान सांगितले जाणार नाही, हे निश्‍चित होतेच;
पण विनोद तरी निखळ आणि खळखळून हसविणारा हवा. (विनोदनिर्मिती थोड्या अतिशयोक्‍तीने आणि डोक्‍याचा वापर न करता केली असती, तरी चालली असती) पण नाटक कोणत्याच अंगाने फुलत नाही आणि ते संपले कधी हेही कळतच नाही. नाटकाची संकल्पना चांगली असली, तरी संहितेवर कामच नाही. नवरा-बायको कंटाळा घालविण्यासाठी एकमेकांना अनोळखी म्हणून भेटतात आणि त्यातून विनोदाची निर्मिती ही संकल्पना खूपच चांगली असली तरी संहितेवर मेहनत नाही. एक-दोन कोट्या सोडल्या तर नाटकातील विनोद लक्षात राहत नाही. तेच तेच संवाद परत परत येत राहतात. आणि मग कंटाळा घालविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाच कंटाळा येऊ लागतो. प्रेक्षागृहात थोडी खसखस पिकली असली तरी ती पोरासोरांची आणि ती नवदाम्पत्यांची. नवरा हसला म्हणून बायको हसते आणि बायको हसली म्हणून नवरा; पण चांगले नाटक बघण्यासाठी आलेला प्रेक्षक मात्र हिरमूसूनच बाहेर पडतो. वेगवेगळी पात्रं उभी करण्यात नाटककाराला यश आलेले नाही. आणि नाटक बहुंताश चॅनेलवर दिसणाऱ्या हास्य कार्यक्रमाच्या अंगाने जाते आणि तिथेच फसते. खासकरून एमटीचे पात्र उभे करताना त्यात आणखी संवाद चांगले हवे होते. वेशभूषाही करायला हरकत नव्हती; पण काहीच नाही. प्रेक्षागृहातून नाटकाच्या सुरवातीपासून खसखस पिकत असली, तरी ती दमदार संहितेचे यश नसून भरत आणि सुप्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दिलेली दाद आहे. खासकरून भरतच्या चेहऱ्यावरील भाव नेहमीप्रमाणे बदलतात आणि त्यातून थोडी विनोदनिर्मिती होते; पण ती भरतचीच जमेची बाजू. पहिल्या अंकानंतर प्रेक्षक दुसऱ्या अंकात काही तरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो; पण त्याला त्यातही काहीच मिळत नाही. नाटकाचा शेवटही तसाच. तो थोडा आणखी भावनिक करता येऊ शकला असता.
नाटक संपल्यावर एकांकिकेचे ओढूनताणून दोनअंकी नाटक केल्याचे जाणवते. खरे तर काही प्रसंग आणखी थोडे रंजक केले असते, थोडी वेशभूषाही केली असती तर जमेची बाजू ठरली असती. त्यामुळे नाटक उभे राहिले असते, की नाही माहीत नाही; पण पडतानाही थोडा कमी आवाज झाला असता. या नाटकाची चर्चा एवढी का झाली हा प्रश्‍न आहे. अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे. टाईमपासने या सगळ्याचा पुरेपूर लाभ उठविला आहे. सुमार संहिता, सुमार संवाद, दिग्दर्शनाला वावच नाही, रंगमंचावर वीस वीस वर्षे अभिनय केल्यानंतर सुप्रिया आणि भरतने केलेला अभिनय खूप उच्च दर्जाचा म्हणणे हा त्यांचाच अपमान आहे. त्यामुळे टाईमपासला जाणे म्हणजे वेळ वाया घालविणे नव्हे; तर वेळेचा अपमान करण्यासारखेच आहे.

सोमवार, २५ जानेवारी, २०१०

स्वल्पविराम

तो (स्वल्पविराम)
will you marry me.... मी सरळ तिला विचारुन टाकलं. तिला ते अनपेक्षित नव्हतं पण हा प्रश्‍न मी इतक्‍या सरळ विचारेन असं वाटलं नसावं. माझी उत्तराच्या अपेक्षेने रोखलेली नजर तिला असाह्य झाली असावी. तिनं गालावर आलेल्या बटा हलकेच मागे सारल्या मग चेहरा वळवला आणि दीर्घ उच्छ्शास सोडला..... हे बघ...... मी तिला तिथेच थांबवलं. उत्तर फक्‍त हो की नाही एवढंच तर दे.... मी आवडतो किंवा नाही एवढं महत्त्वाचं.... कारणांत अडकवू नको मला... मी सरळ सांगितलं. माझ्या या सरळ बोलण्याचा तिच्यावर व्हायचा तो परिणाम झाला. तिचे डोळे लकाकले माझ्या रोखलेल्या नजरेला टाळत तिनं पुन्हा एकदा दीर्घ उच्छ्शास सोडला आणि म्हणाली......sorry I can't. म ाझी तिच्यावर रोखलेली नजर खाली झुकली...... o. k. चहा घ्यायचा काय? मी इतक्‍या सहजतेनं पुढे जाईन असं तिला वाटलं नसावं कदाचित. तिने निमिषभर माझ्याकडे बघितलं. मग नजरेत तोच मिश्‍किलपणा आणत म्हणाली चल!
आयुष्यात असे स्वल्पविराम पडत असतातच.
..................
ती (स्वल्पविराम)

तो विचारणार हे आपल्याला नक्‍की ठावूक होतं. त्याच्या नेहमीच्या बोलण्यातूनही ते जाणवत राहायचही.... त्यानं विचारावं असही आत खोल वाटत होतच की आपल्याला पण आज त्यानं विचारलं आणि आपण मात्र त्याला नाही म्हटलं......का? तोच म्हणतो, कुठलाही निर्णय घेण्यापुर्वी फायदा तोटा यांचा विचार करायचा नसतो. फक्‍त मनाशी प्रामाणिक राहायचं मन तुम्हाला कधी धोका देत नाही.... पण मन आणि बुद्धी वेगळे कुठे असतात. त्याला होय म्हणायचं धाडस ना मनात आहे ना बुद्धीत. तो शंभर टक्‍के हसबंड मटेरियल आहे पण लग्न म्हणजे गारमेंट नव्हे. चांगला वाटला म्हणून केलं आणि नंतर फेकून दिलं. तो मित्र म्हणून चांगला आहे.... त्यानं तिथंच राहावं.....गाज देत. पण तो काही किनाऱ्याला धडका देत बसणाऱ्यातला नव्हे..... सावरेल लगेचच..... पण एक नक्‍की आयुष्याच्या ओळीत एक स्वल्पविराम नक्‍की पडला.

रविवार, २४ जानेवारी, २०१०

अस्वस्थता

तो (अस्वस्थता)
चैत्रातलं उन वखवखत असावं.... आणि पायाखालची तापलेली वाळू रक्‍त शोषीत असावी....नजर जाईपर्यंत केवळ आग आग आणि आग असावी..... अंगातील पेशी अन्‌ पेशी पाण्यासाठी टाहो फोडत असावी.... जगण्याच्या लढाईतील शेवटच्या शस्त्रांचीही धार बोथट व्हावी.... गात्रांतला प्राणवायू निसटू पहावा.....त्याचवेळी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गट्‌टी करावी......सजीवतेचा ढोल पिटावा आणि संवेदनांची लकेर आकाशात उमटून जावी.... मिटलेल्या पापण्यांवर पाण्यांचे तीर चालावेत .... अशीच ती आयुष्यात आली.... अगदी अचानक, आश्‍वासक आणि आवश्‍यक वेळी.....ती आलीच अशी गर्जत येणाऱ्या वळीवासारखी, उन्हाला आपल्या हुकमी आवाजात दटावत कोरडेपणा नाहिसा करत. तिच्या या वर्षावात आपण चिंब भिजलो. अक्षरशः निथळलो.... पण ह्या जलधारांचा आवेग आपल्याला नेहमी पेलवेल....विजेशी स्पर्धा करत, गर्जत येणाऱ्या मेघधारांत आपण स्थिर राहू शकू की तिच्या प्रवाहाबरोबर वाहवत जाऊ....व्याकूळतेने सुखाची प्रतिक्षा बघावी आणि ते दारात आल्यानंतर मात्र त्याला आत घेण्याची भीती वाटावी, अशी का अवस्था झाली आहे....... अस्वस्थता.... अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

ती....(अस्वस्थता)

अविचल वृक्षासारखा आहे तो. येणाऱ्या प्रत्येक वाटसरुला आपल्या छायेत घेणारा, त्यांच्याशी मुकेपणाने संवाद साधणारा. आपल्या अंगा-खांद्यावर पक्षांना खेळू देणारा निश्‍चल, निश्‍चिंत आणि निग्रहीसुध्दा. त्याच्या छायेत गेल्यावर आपल्याला निवांतपणा लाभतो. डोळे मिटावेत आणि पडून राहावं असं वाटतं त्या छायेतला गारवा श्‍वासात भरुन जातो पण पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या त्या अजस्त्र अशा फांद्यांची भीती वाटते... कधीतरी त्या कोसळतील आणि आपल्याला गाढून टाकतील इतकी तिव्र भीती..... अंगावर शहारे आणणारी भीती. त्याच्या पानांची सळसळ डोळे उघडे असेपर्यंत रम्य वाटते पण तेच डोळे मिटले की त्या पानांतून सर्पाची सळसळ भासते. आकाशाशी स्पर्धा करणारा एखाद्या तीव्र वेदनेने तो कोसळणार तर नाही ना? वाऱ्याशी झिम्मा खेळणारे त्याचे हात वाऱ्याच्या एका तीव्र झटक्‍यात तुटणार तर नाहीत ना? कोसळणाऱ्या जलधारांना आपल्या पानांवर थोपविता थोपविता तो वाहवत तर जाणार नाही ना? काहीच समजत नाही....पाऊल पुढे टाकावे की इथेच थांबावे.... अस्वस्थता अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

अस्वस्थता

तो (अस्वस्थता)
चैत्रातलं उन वखवखत असावं.... आणि पायाखालची तापलेली वाळू रक्‍त शोषीत असावी....नजर जाईपर्यंत केवळ आग आग आणि आग असावी..... अंगातील पेशी अन्‌ पेशी पाण्यासाठी टाहो फोडत असावी.... जगण्याच्या लढाईतील शेवटच्या शस्त्रांचीही धार बोथट व्हावी.... गात्रांतला प्राणवायू निसटू पहावा.....त्याचवेळी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गट्‌टी करावी......सजीवतेचा ढोल पिटावा आणि संवेदनांची लकेर आकाशात उमटून जावी.... मिटलेल्या पापण्यांवर पाण्यांचे तीर चालावेत .... अशीच ती आयुष्यात आली.... अगदी अचानक, आश्‍वासक आणि आवश्‍यक वेळी.....ती आलीच अशी गर्जत येणाऱ्या वळीवासारखी, उन्हाला आपल्या हुकमी आवाजात दटावत कोरडेपणा नाहिसा करत. तिच्या या वर्षावात आपण चिंब भिजलो. अक्षरशः निथळलो.... पण ह्या जलधारांचा आवेग आपल्याला नेहमी पेलवेल....विजेशी स्पर्धा करत, गर्जत येणाऱ्या मेघधारांत आपण स्थिर राहू शकू की तिच्या प्रवाहाबरोबर वाहवत जाऊ....व्याकूळतेने सुखाची प्रतिक्षा बघावी आणि ते दारात आल्यानंतर मात्र त्याला आत घेण्याची भीती वाटावी, अशी का अवस्था झाली आहे....... अस्वस्थता.... अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

ती....(अस्वस्थता)

अविचल वृक्षासारखा आहे तो. येणाऱ्या प्रत्येक वाटसरुला आपल्या छायेत घेणारा, त्यांच्याशी मुकेपणाने संवाद साधणारा. आपल्या अंगा-खांद्यावर पक्षांना खेळू देणारा निश्‍चल, निश्‍चिंत आणि निग्रहीसुध्दा. त्याच्या छायेत गेल्यावर आपल्याला निवांतपणा लाभतो. डोळे मिटावेत आणि पडून राहावं असं वाटतं त्या छायेतला गारवा श्‍वासात भरुन जातो पण पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या त्या अजस्त्र अशा फांद्यांची भिती वाटते... कधीतरी त्या कोसळतील आणि आपल्याला गाढून टाकतील इतकी तिव्र भीती..... अंगावर शहारे आणणारी भीती. त्याच्या पानांची सळसळ डोळे उघडे असेपर्यंत रम्य वाटते पण तेच डोळे मिटले की त्या पानांतून सर्पाची सळसळ भासते. आकाशाशी स्पर्धा करणारा तो एखाद्या तीव्र वेदनेने तो कोसळणार तर नाही ना? वाऱ्याशी झिम्मा खेळणारे त्याचे हात वाऱ्याच्या एका तीव्र झटक्‍यात तुटणार तर नाहीत ना? कोसळणाऱ्या जलधारांना आपल्या पानांवर थोपविता थोपविता तो वाहवत तर जाणार नाही ना? काहीच समजत नाही....पाऊल पुढे टाकावे की इथेच थांबावे.... अस्वस्थता अस्वस्थता आणि अस्वस्थता भरुन राहिली आहे.

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

लपंडाव

तो....(लपंडाव)

तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे चारच शब्द आपण किती घोगऱ्या आवाजात बोललो. अखंड बडबडणारी ती मग शांत झाली. बोल की एवढच म्हणाली, नंतरची एक दोन मिनीटं तरी दोघंही काहीच बोललो नाही. नंतर महत्त्वाचं बोलणं राहूनच गेलं. पण तिला बहुतेक ते कळलं असावं. त्यामुळे तीही बोलली नाही. खूप दिवसांपासून तिला विचारायचं धाडसं करत होतो पण ते जमलं नाही म्हणून आज मनाचा हिय्या केला. पण मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, एवढं एकच वाक्‍य बोलल्यानंतर मात्र आपला धीर झाला नाही. श्‍वास जड झाला... छाती धडधडत होती. बहुतेक तिला ते जाणवलं त्यामुळे नंतर
तिने बोलण्याचा आग्रह धरला नाही. अखंड बडबडणारी ती हरवून गेल्यासारखी होती. नजर चोरटी आणि श्‍वास जलद होतं होते.
नंतर बराच वेळ हवा-पाण्यासंदर्भात बोलत होतो. एका चित्रपटाची सगळी कथाही सांगून टाकली. उगाच हसलो... पण ती शांत होती.....तिच्या केसांच्या बटांनी आपल्याला वेड लावले आहे हेच तर सांगायचे होते. पण धीर झाला नाही. महत्त्वाचं बोलण्यासाठी भेटलो पण शब्दांचाच लपंडाव खेळत राहिलो.

ती....(लपंडाव)

तो असा का आहे वाट चुकलेल्या वाटसरुसारखा. कायम भांबावलेला असतो. समोरची सरळ वाट त्याला त्याच्या मुक्‍कामापर्यंत घेवून जाणारी असते पण तो वळणं घेत राहातो. आणि वळल्यावर मग तो मार्गदर्शकाची वाट बघत राहातो. प्रत्येकवेळा त्याला सावरणारं कोणीतरी लागतं. तो मुलगा आहे त्यानं विचारलं पाहिजे. मी कोण वाघीण आहे का सिंहीण याला फाडून खाणार आहे का? .... पण त्याचा हाच स्वभाव तर आपल्याला खूप आवडला. त्यानं चटकन विचारलं असतं तर त्याच आश्‍चर्य वाटलं असतं. पण त्याचं वळणं घेत बोलणंच तर आपल्याला आवडतं. नेहमी शांत शांत असणारा आज किती बडबडला. महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणाला, पण हवा पाण्याच्या गप्पा मारत राहिला. उगाचच हसत होता.
आज आपण नुसतं हं हा हू करत राहिलो, पण तो बोलत होता. त्याच्या बोलण्याचे हसू येत होते, पण तो ओशाळेल म्हणून ते दाबून धरले. कदाचित मनातल्या भावना ओठावर येऊ नयेत यासाठीच तर तो बोलण्याचा लपंडाव करत होता.

बुधवार, २० जानेवारी, २०१०

अनाथ

अनाथ

ऑफीसला जायच्या रस्त्याच्या कडेचे ते झाड नेहमी कुणाला ना कुणाला सावलीत ठेवायचं. प्रत्येक सिझनमध्ये त्या झाडाखाली कोणी ना कोणी वेगळं असायचं. पावसाळ्यात छत्री दुरुस्त करणारा, हिवाळ्यात स्वेटरवाला, उन्हाळ्यात टोप्या विक्रेता बसलेला असायचा. परवाच्या रस्तारुंदीकरणात त्याच्या पारंब्या तोडल्या गेल्या आणि फांद्यांवरही कुऱ्हाड चालविली गेली. आता त्या झाडाची सावलीही संकुचित झाली. अलीकडे तर तर तिथे कोणीच दिसायचे नाही. परवा सहज त्या झाखाली नजर गेली आणि बघितलं तर काही कुत्र्याची पिलं तिथं खेळत होती. ती तिथे कशी आली, कुठून आली काहीच कळलं नाही. रोज ऑफीसला जाताना ती तिथे खेळत असलेली दिसायची. चार- पाच तरी असतील. भुऱ्या रंगाची, मऊ केसांची. मग रोज त्या झाडाखाली थोडावेळ थांबायचं आणि त्या कुत्र्यांना निरखायचं हा छंदच लागला. आईच्या अंगा खांद्यावर खेळणारी ती पिलं बघितली की मजा वाटायची. त्या पिलांची आईही त्यांना खेळवायची, चावायची, गुरगुरायची. ती गुरगुरली की काही पिलं लांब जायची आणि परत फिरायची.थोडे दिवसांनी त्यातील एक-एक पिल्लू कमी होत गेलं. शेवटी एकच पिल्लू राहिलं. ते पिल्लू आणि त्याची आई त्या झाडाभोवती फिरत असायची. हायवेवरुन होणाऱ्या वाहनांच्या ये-जा पासून ती त्याची जणू रक्षण करायची. काल त्याच रस्त्यावरुन जाताना समोरच्या ट्रकने जोरात ब्रेक दाबला. गाडी कचकन थांबली. काय झालं म्हणून पुढे जाऊन बघितलं तर ती पिलाची आई ट्रकच्या पुढच्या चाकात सापडलेली. थोडावेळ तिची धाप सुरु होती आणि नंतर तिही थांबली. तिचं ते पिल्लू शेजारीच केकाटत होतं. ट्रकचालकानं त्या मेलेल्या कुत्रीला रस्त्याच्या एका कडेला आणून टाकलं आणि तो पिलाकडे गेला. त्यानं ते पिल्लू उचललं आणि ट्रकच्या केबीनमध्ये ठेवलं. मला राहावलं नाही म्हणून मी त्याला विचारलं, ""सरदारजी क्‍या करोगे इसका?'' सहा फूट दोन
इंच उंचीच्या त्या सरदाराचे डोळे थोडे किलकीले झाले. माझ्याकडे त्यानं बघितलं आणि म्हणाला, कुछ नहीं, पालुंगा! यतीम होने का दुख मालुम है