सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,

प्रिय,
रात्रीचे तीन वाजलेत. अंगभर कंटाळा आणि झोप दाटून आली आहे. पापण्यांना चहाचा टेकू आता देणे गरजेचे आहे. हा टेकूही फारकाळ टिकणार नाही, हे माहीत आहे; पण तरी तो द्यायला पाहिजे. आता जर असेच थांबलो, तर कोणत्याही क्षणी पापण्या खाली कोसळतील आणि त्या कोसळलेल्या पापण्यांचा आधार घेत मग एक-एक गात्र आपली हत्यारे टाकून देतील. जागे राहण्याची लढाई संपून जाईल आणि निद्रेची शांतता पसरेल. त्यामुळे चहाची आता आवश्‍यकता आहेच. प्रिंटिंग मशिनचा आवाज आता कानापर्यंत येऊ लागला आहे. धडधड करत एक एक पेपर बाहेर पडत असणार... वातावरणात माणसाच्या आवाजाचा लवलेशही नाही. मशिनची घरघर-घरघर आणि घरघरच ऐकू येत आहे. आणखी काही वेळ तरी जागे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅन्टीनचा दरवाजा खटखटवणे भाग आहे.

कॅन्टीनचा दरवाजा खटखटला तसा चहावाला पोऱ्या डोळे चोळत बाहेर आला. त्याने एकवार माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितले आणि पुन्हा डोळे चोळले. मी काही म्हणण्याआगोदरच तो आत गेला. स्टोव्ह त्याने पेटवला. त्या स्टोव्हचा आवाज आता त्या मशिनच्या आवाजात मिसळला आहे. जणू त्या दोघांची जुगलबंदी चालली होती. पण ही जुगलबंदी फारकाळ टिकणारी नाही. चहाला उकळी फुटेल आणि स्टोव्ह गप्प होऊन जाईल... अगदी तसेच झाले... पोऱ्याने चहा आणून दिला आणि बाहेरची लाईट बंद करून निघून गेला. अस्ताव्यस्त मांडलेल्या खुर्च्यांमध्ये मी, माझा चहा आणि सोबतीला होते काळेभोर आकाश, त्यात टिमटिमणारे तारे, हलक्‍या पावलांनी प्रवास करणारा वारा आणि झाडांच्या मुळाशी रात्रीचे काही किडे.. बस बाकी काहीच नव्हतं. मी सरळ वर आकाशात बघितले, टिमटिमणारे तारे जणू माझ्याकडेच बघत असल्याचा भास झाला. प्रत्येक तारा वेगळा. त्याची तऱ्हा वेगळी. कोणी लांबवरचे तर कोणी जवळचे. कोणी फटकून राहणारे तर कोणी उगाच सलगी दाखविणारे... तोंड लपविणारेही काही तारे, तर काही तारे उगाचच आपला तोरा मिरविणारे... सगळेच तारे वेगळे... निराळे... आठवणींसारखे... प्रत्येक आठवणींची खासियत वेगळी... काही आठवणी जुन्याच होऊ नये वाटतात, तर काही आठवणींपासून आपण दूर होऊ पाहतो... तरीही त्या टिमटिमत राहतात... आपल्या असण्याची जाणीव सतत करून देत राहतात..आणखी तास दोन तासांनी सूर्याची काही किरणे आवेगात सगळ्या आकाशभर पसरतील आणि हे टिमटिमणारे तारे हळुहळु लुप्त होतील. तरी काही चावट तारका त्यातूनही आपले अस्तित्व दाखवत राहतील. आठवणींसारखेच..... मग सरळ सूर्यबिंब वर येईल आणि त्यापुढे त्या तारकेची धीटाई अपुरी पडेल. त्याच्या त्या प्रखरतेपुढे मान तुकवत तिलाही विरळ व्हावेच लागेल.... मग प्रतीक्षा अंधाराची... सूर्य मावळण्याची... .. आयुष्याचेही असेच असते ना? प्रत्येक प्रहर वेगळा त्याच्या गरजा वेगळ्या आणि त्याने मागितलेल्या आहुत्या वेगळ्या... प्रत्येक आहुतीनंतरच कळते की ती किती मोठी होती.. ... आता हे विचारांचे रंग कागदावर तसेच उमटतील का? हा प्रश्‍नच आहे. पण तसेच उतरावेत यासाठी प्रयत्न करतोय.... बघू जमेल कदाचित.... आज एक काळी रात्र आठवणींची रुपेरी किनार लेवून गेली हे मात्र निश्‍चित!

तुझाच....

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

प्रिय, प्रिय

प्रिय,
पहिले पत्र लिहिताना लगेच दुसरे पत्र लिहिण्याचे वचन दिले तर होते पण ते काही पाळता आले नाही. काही तरी खटोटोप करुन चार ओळी लिहिण्याचा मनोदयही केला होता, पण तेही जमलं नाही. आयुष्य असंच असतं. सगळीच गणितं आपल्या म्हणण्यानुसार सुटत नाहीत, काही फासे नकळत जास्त पडतात, तर कधी कमी पडतात. गुणाकार करायला जाताना ज्यादा आलेल्या अंकाना वजाबाकीत टाकावे लागते तर कधी भागाकारच जमत नाही. एकूण बाकी शुन्य काही येत नाही आणि गणित काही सुटत नाही. मग एका आकड्यांनी गणित सुटलं नाही म्हणून दुसऱ्या आकड्यांशी खेळ मांडायचा. अगदी शेवटपर्यंत डोक्‍याच्या शिरा ताणायच्या... पण तरीही गणित काही सुटत नाही. प्रत्येक माणसासाठी वेगळं गणित असतं हेच खरं आणि ज्याचा-त्यानं त्या गणिताचा फॉर्म्यूला शोधणं गरजेचं असतं. कधी कोणाला हा फॉर्म्युला सापडतो तर कधी कोणाला हा सापडत नाही. पण जोपर्यंत हा फॉर्म्यूला सापडत नाही तोपर्यंतचा प्रवास चालूच ठेवावा लागतो. हा नाही तर तो, तो नाही तर तो असे रोज नवे फॉर्म्यूले शोधत त्यात आकडे मांडून बसावे लागते किंवा मग गणितच सोडून देऊन होईल ते होऊ द्या, ही भूमिका घ्यावी लागते. माझं गणित तसं कच्चच त्यामुळे असे काही फॉर्म्यूले शोधत मी काही बसत नाही. जे आकडे येतात त्यांना मी हाय म्हणतो, आणि सरळ बाजुला निघून जातो. अनेकवेळा मग असे हे सुटलेले आकडे रात्री, अपरात्री डोळ्यासमोर येऊन नाच करतात, फेर धरुन नाचू लागतात. दरदरुन घाम सुटतो आणि डोक्‍यातील पेंशीचा रक्‍तप्रवाह आणखी गरम करतात, त्यावेळीही त्या आकड्यांना पकडून त्यांना त्याच्या जाग्यावर बसवावं आणि एका झटक्‍यात गणित सोडवून टाकावं, असं वाटतं खरं पण गणित चुकण्याचीच भीती मनाचा इतका ताबा घेते की मग नकळत हातातून हे आकडे कसे सुटतात हेच कळत नाही. मग पुन्हा प्रवास सुरु होतो आकड्यांना टाळण्याचा, त्यांच्यापासून तोंड लपविण्याचा.... अरे, पत्र लिहिण्यास वेळ का लागला एवढयाचे कारण एवढं मोठं लिहिणं म्हणजे जास्तच आहे ना ! जाऊ देत... पण खरे सांगू पहिले पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या पत्रात काय लिहायचे हेच कळेनासे झाले होते. कालच्या सगळ्या घटना आठवून बघितल्या. काय तुला सांगता येईल याची यादी करुन बघितली, पण तुला सांगण्यासारखं असं काहीच घडलं नाही. गाडी दोन वेळा पंक्‍चर झाली आणि बुटाची लेस सुटल्याने पडता-पडता वाचलो, या दोन घटना तशा तुला सांगण्यासारख्या होत्या, पण त्यातही गंम्मत अशी काही नव्हती. त्यामुळे काय सांगावे हा प्रश्‍न पडला... त्यामुळे पत्र दोन दिवस उशीरा लिहितोय... बाकी तुझं उत्तम चालंलं असेलच.....

तुझाच.... 

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,


खरे तर तिला खूप पत्रे लिहायची होती... पण धाडसच झालं नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास एक भीती होती.. तिला आवडलं नाही तर... आजही आहे पण आता तिला ही पत्रे धाडायचीच नाहीत... ती लिहायची आहेत फक्‍त माझ्यासाठी... खूप बोलायचं राहून गेलेलं बोलायचं आहे... म्हणून ही पत्रे... आता रोज एक पत्र लिहायचंच असं ठरवून ही पत्रे लिहिणार आहे. अगदी डेलीसोप सारखं... ती आहेत फक्‍त माझ्यासाठी आणि माझ्या मनातील तिच्यासाठी.... प्रेमपत्रात खरे तर एक अल्लडपणा असतो, अजाणतेपण असते. त्यातल्या भावना खऱ्या असतात आणि त्या दुसऱ्यांसाठी विनोदीही वाटू शकतात...

प्रिय,
खरं तर पहिल्याच पत्रात प्रिय लिहिताना हात अडखळतोय. पण तसंही काही हे पहिलं पत्र नाही. या पूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यावर नावही नव्हतं. त्यावेळी तर नेमकं काय लिहावं हेच कळत नव्हतं. पण आता मात्र प्रिय लिहावं वाटू लागलं आहे. खरं तर प्रतिपासून प्रियपर्यंतचा प्रवास खूप अडखळणारा आणि मजेशीरही आहे. सगळेच मनाचे खेळ. पुढच्या माणसाला गृहीत धरुन चालणारे. आपल्याच नादात, विश्‍वात रमणारे. त्यामुळे यातील प्रिय शब्द तुझा कुठे आहे; तो माझा आणि केवळ माझा आहे. तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे, हा काही आग्रह नाही. (अपेक्षा मात्र आहेच) त्यामुळे तुला प्रिय आवडलं नसलं तरी ते तुझं नाही. त्यामुळे ते नावडण्याचा तुला अधिकारही नाही. त्यामुळे पुन्हा लिहितोच प्रिय....
पत्रास कारण की, खरेच पत्राला काही कारण आहे का? माहीत नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास कारण नाहीच..अकारण म्हण हवं तर. पण आपण मित्रांना, मैत्रिणींना फोन करतो त्या प्रत्येकवेळी कारण असतं का? नाही ना. अगदी तसंच. आपण मित्राला फोन करतो कारण, आपल्याला त्याला सांगायचं असतं की तुझी आठवण आली रे! अगदी तसंच तुझी आठवण आली, एवढंच कारण पुरेसं आहे. खरं तर तुझी आठवण कधी येतच नाही. फिल्मी डायलॉगप्रमाणे " मै तुम्हे भूलाही कहा हूू, की मुझे तुम्हारी याद आएं'. अगदी तसं काही नाही. खरेच असे काही क्षण असतात माणसाच्या आयुष्यात की आपण स्वतःलाही विसरतो. पण तेवढेच काही क्षण असतील, ज्या क्षणी मी तुला विसरलो असेन. तेवढेच. उर्वरित प्रत्येक क्षणी मला तुझी आठवणच तर असते की जिच्यावर मी जगतो आहे. आताही हे पत्र लिहिताना तू काय करत असशील, हा प्रश्‍न मला पडला आहेच. खरं तर ते जाणून घेण्याची इच्छा नसते, तरीही प्रश्‍न पडतो. का? याचे उत्तर मात्र देता येत नाही. खरंच का? माहीत नाही. तुझ्याभोवती रुंजी घालणाऱ्या क्षणांचा गुंजारव ऐकण्याची एक अनामिक इच्छा मात्र असते. त्या गुंजारवाचा नाद कानभर ऐकावा, त्यात गुरफटून राहावे, भाळून म्हण हवं तर, पण त्या नादात, मदहोशीत राहावे एवढे मात्र वाटते. म्हणून त्या क्षणांची ओढ. पहिलेच पत्र आहे. खूप काही लिहित नाही. उद्याही पत्र लिहायचे आहेच की.

तुझाच....