सोमवार, २६ मार्च, २०१२

प्रिय,

एवढा हतबल मी कधीच नव्हतो. जगण्याला आव्हान मानणारा मी आता त्याच्या हातातील कठपुतळी बनून गेलोय, असं वाटतं. तुझा नकार, तुझा होकार, तुझ्या नसण्यातील असणं आणि आता तुझ्या असण्यातील नसणं सगळंच असह्य होत आहे.... तू नव्हतीच तेव्हाची ती अपुरेपणाची भावनाही आपली वाटायची. आता मात्र ती अपुरेपणाची भावनाही राहिली नाही.. आता तुटलेपण जाणवते...मला माहीत आहे हे तुटलेपण तुलाही जाणवत असेल. तुलाही त्याच्या वेदना होत असतीलच पण तरीही हे अपुरेपण आता अवघड होऊन गेले आहे. जगण्याच्या लढाईला काही जखमा आवश्‍यक असतातच... आज मी या जखमाही हरवून बसलो आहे.. तुझ्या असण्यातील नसलेपण मला आता पोखरुन टाकेल... केवळ पोखरनार नाही तर तो मलाच खाऊन टाकेल की काय असे वाटू लागले आहे. बाहेर चैत्र फुलतोय आणि इथे मनात माझ्या पानगळती सुरू आहे.. विचित्रच सगळं... कधी कधी मला या कोवळ्या पानांचा हेवा वाटतो...सूर्य निर्दयीपणे आग ओकत असताना ही झाडांची कोवळी पालवी आपल्या एवढुशा छातीवर ती सूर्याचे अग्नीबाण कसे झेलतात.. याचे कौतुक वाटते...तू दुर्गा भागवतांचे ऋतुचक्र वाचलं असशीलच ना? त्यांनी सगळे ऋतु मांडलेत. पण बाईंही काही ऋतुंबाबत अज्ञानीच होत्या. नाही! एकटेपणा त्यांनीही अनुभवलाच पण तरीही एकटेपणा आणि नसलेपणा या दोन गोष्टी वेगळ्याच असतात ना? तुझं असून नसणं हे सगळ्यात वाईट... हाक पोचतेय पण हाक मारता येत नाही आणि तुलाही मागे वळून बघायचे आहे आणि बघता येत नाही... ही अवस्था दोघांचीही...एक दडपण आले आहे...वेदना कुरवाळण्यात काही अर्थ नसतो हे तुझं सांगणं मला मान्य आहे पण ते मनापर्यंत पोचत नाही.... हा चैत्र संपेल आणि वैशाख येईल आणि तो कायम राहील... कदाचित त्या वैशाखात कुठून तरी तू पुन्हा भरुन येशील.. ढगांसारखी... नाही तरी तुझा रंग ढगांसारखाच की... सावळा... देणारा.. आणि बरसून जाशील... काही काळ पुन्हा चैतन्य पसरले आणि मग पुन्हा आजच्यासारखा दाह....बरसून रिकामे होणे तुला जमते...मला नाही जमत... मला भरुन घेण्याची सवय लागली आहे.. आणि मग तो भरलेपणा सहन करत जगायचे... मोकळे नाही होता येत मला... मला तो शाप आहे.. तू बोलतानाही नुसताच ऐकायचो मी. तुझा हुंकार... तुझा दोन शब्दांमधला चड-उतार...काही शब्दांवर तू देत असलेला भर आणि मग प्रत्येक गोष्ट अगदी पहिल्यापासून शेवटापर्यंत सांगताना त्याचे तू केलेले विस्तारीकरण... प्रत्येक प्रसंग एक एक पायरीनेच सांगण्याची हातोटी.. मला नाहीच कधी जमली... मला जमले ते तुझे तूपण साठवण्यात...तुझी प्रत्येक गोष्ट साठवून ठेवण्यात... तो मिळणार नाही कधी.. ही जाणिव जीतकी घट्‌ट होत गेली तितकेच मी या साठवण्याकडेच जास्त लक्ष दिले... मला सांगायचेच बरेच काही राहून गेले.... हे साठवलेपण आता माझ्याबरोबरच जाईल... ज्या दिवशी अचानक तुझ्या हातातून एखादे भांडे पडून फुटेल, त्या दिवशी समज एक श्‍वास कायमचा थांबला..

तुझाच