शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

मौनाची भाषांतरे व्हावीत

तिच्या पैंजणाची रुणझुण ऐकली की तो तिथेच थबकायचा. मग त्याच्या समोरचे सगळे रंग बदलून जायचे. भरदुपारीही मग त्याला पश्‍चिमेची गुलाबी प्रभा दिसायची. तो तसाच होता. अगदी वेडा. ती समोर आली की मग मात्र तो मुग्ध व्हायचा. तिच्या प्रत्येक हालचाली तो डोळे भरून पाहायचा. मग घसा खाकरून बोलण्याचा प्रयत्न करायचा; पण ओठ साथ द्यायचे नाहीत, जीभ वळायची नाही. बोलायचं असायचं एक आणि तो भलतंच बोलून जायचा. तिला हे जाणवायचं; पण तिही काही बोलायची नाही. फक्‍त हसत राहायची, गालावर आलेले केस मागे घेत राहायची. मग त्याची अवस्था बघून आपणच काहीतरी सांगत राहायची. खूप बोलल्यावर मग ती जाते म्हणायची, तो थांबवायचा तिला. ""जाऊ नको,'' म्हणायचा... थोडा वेळ परत ती थांबायची. मग जायला निघायची. मग त्याच्या हृदयाची धडधड आणखी वाढायची; पण तिला अडवायचं बळ त्याच्या हातात यायचं नाही. ती निघून गेली की, मग याला सगळे विषय सुचायचे... काय बोलायचे होते, ते सगळे आठवायचे. मघाशी बोलताना आपण खूपच मूर्खपणा केला, हेही त्याला जाणवायचे. मग तो स्वतःच्याच डोक्‍यावर एक टपली मारायचा. जोरात शीळ फुंकायचा आणि पुन्हा ती कधी भेटेल याची वाट बघत राहायचा. पुन्हा ती भेटली की याचं असंच व्हायचं. ती त्याला नेहमी म्हणायची, ""तू असा कसा?'' मग तो गप्प बसायचा. काही प्रश्‍नांची उत्तरे नाही देता येत, असं काहीबाही समजावयाचा. मग तीही ताणायची नाही. त्याला त्याच्या स्थितीत सोडून द्यायची. कस्तुरीमृगाच्या बेंबीसारखं त्यांचं प्रेम दरवळत राहायचं आणि ते दोघेही त्याच्याच शोधात हिंडत राहायचे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं तिला सांगायलाच पाहिजे का? तिला ते समजत नसेल का, असं त्याला वाटायचं. तर त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तर तो मग सांगत का नाही, असं तिला वाटायचं आणि मग दोघेही मौन बाळगून राहायचे. उद्याच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त त्यांच्या मौनांची भाषांतरे व्हावीत.