मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

चांगदेवाची अवस्था

प्रती,
े,
खरंच चांगदेवाची काय अवस्था झाली असेल, हे मला आत्ता नक्‍की कळते. अर्थात मी चांगदेव नाही आणि तू ज्ञानेश्‍वर नाहीस तरीही मायना काय लिहावा हा प्रश्‍नच होता. परत पत्र लिहिताना एकेरी उल्लेख करावा की आदर व्यक्‍त करावा काहीच कळलं नाही. शेवटी शब्द तरी तुम्हाला कुठपर्यंत साथ देणार फक्‍त भावना महत्वाच्या. त्या व्यक्‍त झाल्या की शब्दांचं काम संपलं. म्हणजे त्यांचं काम हे फक्‍त वाहकांचं. तुमच्या अभियांत्रिकी भाषेत सांगायचं झालं, तर शब्द काही भावनांचे चांगले वाहक नाहीत. गरजेला उपयोगी पडतात एवढाच त्यांचा कार्यभार.
कुणाचे पत्र, का लिहिलं असेल, गरज होती का अशा प्रश्‍नांची एक रांग तुझ्या मनात असणार हे नक्‍की. पण या प्रश्‍नांच्या जाळ्यातून बाहेर आल्यावर तुलाही पटेल. तशी आपली ओळख "तोंडदेखली' असंही म्हणता येत नाही. तरी आपली ओळख आहे. बऱ्याचदा आपल्या भोवती असणारे सगळे आपल्याशी खूप चांगलं बोलत असतात, आपल्याबद्दल त्यांच्या मनात खूप चांगल्या भावना असतात तरीही काही गोष्टींसाठी मात्र त्यांच्याकडे वेळ असतोच असं नाही. जगाच्या दृष्टीने अगदी शुल्लक गोष्टी असतील पण त्या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असतात. जगण्याचं बळ देवून जाणाऱ्या असतात. आमचे एक आकाशवाणीवरील सहकारी आहेत, श्रीनिवास जरंडीकर तू नाव ऐकून असशील त्यांना पदोन्नती मिळाली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना एखादं पुस्तक भेट देता येईल का हे बघण्यासाठी मी "ग्रंथ'मध्ये गेलो होतो. अनेक पुस्तके बघीतल्यानंतर एक पुस्तक हाती लागलं ते संदीप खरे यांच्या कवितांचे. हा कवितासंग्रह तुलाही आवडेल असा चटकन विचार माझ्या मनात आला. खरे तर तू लेक्‍चरर म्हणून रुजू झाल्यावरच तुला एखादे पुस्तक देवून तुझे अभिनंदन करावे अशी इच्छा होती पण एकतर आपली ओळख अगदीच त्रोटक आणि त्यात तू मुलगी. थोडं स्पष्ट लिहतोय पण त्याला इलाज नाही. यानं मुद्दाम पुस्तक भेट दिलं की काय ही भावना साहाजिक उमटली असती. त्यामुळे तो विचार मी बाजुला ठेवला. खरे तर कविता आवडणारी लोकं खूप आहेत पण कवितांवर प्रेम करणारी लोकं खूप कमी आहेत. आणि मग अशा विषयांवर चर्चा करणारी माणसं मिळत नाहीत. मग अतृप्ततेची भावना रेंगाळत राहते. काहीच सूचत नाही. बिघडलं काय असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काही नाही असंच तर असतं पण बिघाड दुरुस्त कसा करायचा हेही सूचत नाही. अशावेळी तुझ्यासारखे मित्र असणं आवश्‍यक असतं.
तुझ्या नव्या भूमिकेसाठी अभिनंदन !

प्रवीण कुलकर्णी
कोल्हापूर
11 ऑगस्ट 2009

ता. क. तुला आवडलं नसेल तर तसा स्क्रॅपही तू ऑर्कूटवर टाकू शकतेस. थोडं वाईट वाटेल बाकी शुन्य!

प्रती, जरंडीकर सर यांना

प्रती,
जरंडीकर सर यांना,
मोबाईल फोनमुळे आजकाल पत्र लिहिण्याचा सराव उरलेला नाही. किंबहुना आमच्या पिढीने परीक्षेत जेवढी पत्रे लिहिली तेवढीच. बाकी कार्यालयीन रुक्ष पत्रे लिहीत असलो तरी त्याला "अर्ज' (मनातून कितीही राग असला तरी) हेच स्वरूप राहिले. सांगायचा मुद्दा असा, की बऱ्याच मोठ्या कालावधीत पत्र लिहिण्याचा योग तसा आलेला नाही. त्यामुळे पत्रात जर काही चुका असतील तर त्या समजून घ्याल, ही अपेक्षा.
परवाच्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलताना तुम्हाला पदोन्नती मिळाली हे समजले. फोनवरुन शुभेच्छाही दिल्या; पण या शुभेच्छात तो ओलावा नव्हता, की काय याची रुखरुख मलाच लागून राहिली. आजकाल शुभेच्छांचे मेसेज या मोबाईलवरुन त्या मोबाईलवर सगळीकडे बागडत असतात, ज्याने धक्‍का दिला त्याचा मेसेज, एवढंच. बाकी सगळा शब्दांचा बुडबुडा. त्यामुळे मेसेज पाठवावा की न पाठवावा या द्विधा मनःस्थितीत होतो. बऱ्याचदा फोनवरुन बोलताना आपल्या नेमक्‍या काय भावना आहेत हे समोरच्याला कळतेच असे नाही. त्यासाठी लागणारे शब्दांचे गुच्छ प्रत्येक वेळी आपल्याकडे असतातच असे नाही आणि मग एखाद्या सुंदर घटनेच्या आनंदाच्या कळ्या फुलतातच असे नाही. त्यामुळे हा पत्राचा अट्टहास.
तुम्हाला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल अभिनंदन! अगदी खूप वर्षांचा नसला तरी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या स्नेहात मला हे
माहीत आहे की, तुमचे (सरकारी कर्मचारी असला तरी) कामावर किती प्रेम आहे. आपण पुढच्या आठवड्यात सुटीवर जाणार असाल तर या आठवड्यात बारा बारा तास काम केल्याचे मी बघितले आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि झोकून घेणे, त्यासाठी लागणारे कष्ट उपसणे बघितले की तुमच्यापेक्षा आम्ही किती लहान आहे हे लक्षात येते. त्यामुळेच या पदोन्नतीतील आणखी महत्त्व. बाकी तुमच्यापेक्षा वयाने (तांत्रिक अर्थाने), अनुभवाने आणि बुद्धीने सगळ्याच बाबतीत खूप लहान आहे. भावना पोहोचविणे एवढाच या पत्राचा उद्देश, बाकी काहीच नाही.
पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन!