गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

तो आणि ती

तो....(पडदा उघडला)
नाट्यगृहाच्या खिडकीपाशी किती वेगात आली ती. तिकीट घेतलं आणि झटकन सटकली.. तिकिटासाठी आपण तासभर रांगेत ताटकळत बसलोय हेच विसरलो. वाऱ्याचा झंझावात यावा तशी ती आली आणि गेलीही. आपण नुसतेच तिच्याकडे बघत राहिलो. नंतर नाटकाच्या मध्यंतरात चहा पीताना ती दिसली. रमेशही होता तिच्याबरोबर.... त्यानेच तिची ओळख करुन दिली. किती बडबडत होती. एखाद्या धबधब्यासारखी अखंड वहात होती. डोळे कितीदा मिचकावत होती. जाताना "परत भेटू' म्हटल्यावर आपण उत्स्फूतपणे कधी म्हणालो. त्या कधीवर ती काय खळखळून हसली. एखाद्या निष्पाप बाळासारखी आणि तेवढ्यात तिच्या गालावरची खळी आपल्याला दिसली....
नाटकाचा दुसरा अंक रंगमंचावर चालू झाला. पडदा वर गेल्याचे तेवढे जाणवले... पुढचे काही आठवतच नाही. उरलेला दिड तास तीच तर दिसत होती. नाट्यगृहाच्या खिडकीपाशी गडबडीत येणारी, अखंड बोलणारी, खळखळून हसणारी, हसताना गालावरचे केस मागे सारणारी, नाटकाचा हाच तर अंक डोळ्यासमोर उभा राहिला अगदी पडदा पडेपर्यंत.
....................................................................
ती....(पडदा उघडला)
काय शामळू आहे. तिकिटासाठी रांगेत उभा होता. पण एखादी मुलगी सरळ येते तिकिट घेते म्हणजे काय. मख्खपणे तसाच होता. चम्याच दिसतोय. नंतर मध्यंतरात भेटला. शर्टाचे हातोबे कोपरापर्यंत दुमडलेले. नाटक बघायला आलात की मारामारी करायला असं विचारल्यावर नुसताच हसला. आत्तापर्यंत अनेक मुले बघितली. अगोदर मुलीकडे एकटक बघतात आणि मुलगी बघायला लागली की मग नजर फिरवतात. हा मात्र एकटक बघत होता. आपण नजरेला नजर दिली तर नजर फिरवेल असं वाटलं पण पठ्ठ्याने नजर फिरविली नाही. पाच मिनीटात आपण किती बडबडलो पण त्याने मान हलविण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. जाताना भेटू म्हटल्यावर मात्र "कधी' किती उत्स्फूर्तपणे म्हणाला.
नाटक मध्यंतरानंतर पुढे सरकलंच नाही." कधी' एवढाचा त्यानं उच्चारलेला शब्द कानात घुमत राहिला आणि त्याची नजर टोचत राहिली. त्याचा चेहरा नजरेसमोरुन हललाच नाही, अगदी पडदा पडेपर्यंत.