गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

गर्दीतील "माणूस'कोल्हापूर एसटी स्टॅंडवर सोलापूर फलाटावर बसलेल्या त्या वृद्धेकडं लक्ष जाण्याचं काहीच कारण नव्हतं. विस्कटलेले पांढरे केस, अस्ताव्यस्त झालेली मळकी साडी, शेजारीच गाठोडेसदृश असलेली पिशवी आणि त्यावर असलेली काठी बघून ती कोणी भिकारीच वाटत होती. गाडीची वाट पाहणाऱ्या स्टॅंडवरील माझ्यासारख्या अनेकांनी तिच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं; पण मला मात्र तिची आशाळभूत नजर अस्वस्थ करत होती. तिच्याकडं लक्ष द्यायचं नाही असं ठरवूनही नजर मात्र तिच्याकडंच वळत होती. अर्ध्याएक तासात तिच्याजवळून जवळपास पन्नासएक लोक इकडेतिकडं गेले; पण तिनं कोणाकडेच पैसे मागितले नाहीत आणि कोणी तिला पैसेही टाकले नाहीत. एवढ्यात एक पन्नाशीचा विजार-शर्ट घातलेला माणूस तिथं आला. तो काहीतरी तिच्याशी बोलला आणि निघून गेला. मला वाटलं काही पैसे देऊन तो गेला असेल; पण तो परत आला. त्याच्या हातात ब्रेड आणि पेला होता. बहुतेक त्यात चहा असावा. तिनं तो ब्रेड आणि चहा संपवला. तो माणूस पेला घेऊन परत गेला आणि पुन्हा आला. एसटीची चौकशी करून परत तिथं आला. मग मात्र मला राहावलं नाही. मी त्याच्याजवळ गेलो. शांतपणे त्यांच्या मागे उभा राहिलो, तो तिला सांगत होता, "आता लगेचच एसटी आहे.' एवढ्यात एसटी लागली. त्यानं तिची काठी आणि गाठोडं एका हातात घेतलं आणि दुसऱ्या हातानं तिला आधार दिला. मला ते गाठोडं घ्यावं वाटलं; पण धीर झाला नाही. त्यानं तिला सोलापूरच्या एसटीत बसविलं आणि कंडक्‍टरकडून तिकीट घेतले. तिच्या त्या गाठोड्यात ते ठेवत त्यानं ते कुठे ठेवलं ते कंडक्‍टरला दाखविलं. जाताना पन्नासाची नोट तिच्या हातावर ठेवत रिक्षानं जा, असं त्यानं सांगितलं. एसटीतून उतरल्यावर मी त्याला नाव विचारलं, पण तो फक्‍त हसला आणि ज्या गर्दीतून तो आला होता त्याच गर्दीत पुन्हा मिसळला. कोण असावा तो?