मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१०

पंड्या

पुर्वी गावाकडे आमच्या घरी अनेक माणसं यायची.... गोंधळी, रामदासी अशी बरीच माणसं त्यात असायची... आजीने तर अनेक विधवा, परितक्‍त्या बायांना आमच्या वाड्याच्या समोरच्या खोलीत राहायची मुभा दिली होती. घरातील नीटवाट, पाणी भरण्याची कामं या बाया करायच्या आणि मग आजीच त्यांना लागेल तो शिधा द्यायची.... खूप वर्षे हे असंच चालू होतं. यामध्येच एक यायचा म्हणजे काशिचा पंड्या. साठी पार केलेला... डोक्‍याचा गोटा, कळकट मळकट धोतर आणि तशीच कळकट पिशवी खांद्याला अडकवलेला पंड्या दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी यायचा. हा काशिहून यायचा म्हणे ...आणि तेथील गंगाजल आणि काळा दोरा आम्हाला द्यायचा. खरे तर तो काशिचा पंडित पण का कोणास ठावूक आमच्या घरातील सगळ्या बाया-बापड्या त्याला पंड्याच म्हणायच्या. विशेष म्हणजे तो आला हे कळल्यावर आमच्या आत्याही खास त्याच्याकडून काशिचा गंडा बांधायला माहेरला यायच्या. तो महाराष्ट्रातील बऱ्याच देशस्थांच्या घरी जायचा, आमच्या अनेक पाहुण्यांकडे तो कधी ना कधी गेलेला असायचाच... कुणाकडे उन्हाळ्यात... कुणाकडे पावसाळ्यात...सगळीकडे तो त्याच्या त्या कळकट मळकट पिशवीतून काळ्यामीट्‌ट बाटलीतील गंगाजल पाजायचा. माझे वडील नेहमी म्हणायचे हा कुठला जातोय काशिला, इथेच पंचगंगेचं पाणी बाटतील भरत असेल आणि आंबाबाईच्या देवळातील दोरे वाटत असेल.... पण असं असलं तरी तेही त्याच्याकडून भक्‍तीभावानं पाणी घ्यायचे आचमन करुन डोक्‍याला हात पुसायचे....आणि वर्षभर तो काळा गंडा हातात जपायचे... असा हा पंड्या कमरेत वाकलेला, अनुनासिक हिंदी बोलणारा, कर्मठ दरवर्षी हिवाळ्यात आमच्या घरी मुक्‍कामला यायचा. एकदा आला की किमान पंधरा दिवस त्याचा मुक्‍काम हालयाचा नाही.
खरे तर पंड्याचा आम्हाला फार राग यायचं कारण काहीच नव्हतं....पण त्याच्याकडून काळा गंडा बांधून घेणं म्हणजे एक दिव्यच असायचं. काळा दोरा बांधला की
त्याला नमस्कार करायला लागायचा....नमस्कार केला की तो दोन्ही हातांनी जोराचा धपाटा पाठीवर मारायचा.. त्याने पाठित सणकच भरायची... त्यामुळे पंड्याचा आम्हाला प्रचंड राग यायचा......तर त्याला बायकांची शिवाशिव चालयची नाही याचा घरातील बायकांना त्रास. शीव... शीव...शीव असा कायमचा जप त्याच्या तोंडात असायचा...त्याच्यासाठी सडलेले तांदूळ, स्टोव्ह, तांब्याच्या घागरीत पाणी याची तजवीज करायला लागायची...तो स्वयंपाक करत असला की त्याच्याशेजारी कोणी गेल्याचे त्याला आवडायचे नाही. खासकरुन बायकांनी. त्याने म्हणे स्वतःच केलेल्या स्वयंपाकाशिवाय दुसरा घास तोंडात टाकला नव्हता.. कधी मधी आई स्वयंपाक घरात गेलीच तर
लगेच म्हणायचा
दूर... दूर...दूर.. भाभींजी आप थोडा अलग रहें.... आईला याचा प्रचंड राग यायचा
मेल्याने माझ्याच घरातील स्वयंपाकघरावर आपला हक्‍क सांगितलाय.. आई पुटपुटायची.... तो पंड्या लगेच माझ्या आजीकडे आईची तक्रार करायचा. मग आजी म्हणायची, ""त्याला नका रे त्रास देवू काशिचा ब्राह्मण आहे.... ब्रह्मचारी आहे.... शाप देईल...... दरवर्षी तो यायचा नंतर नंतर तो थकत चालला होता..... पण पीळ मात्र तसाच... शीव..शीव..शीव..चा जप कायम....आता तर आजीही नव्हती जिच्याकडे तक्रार करायला.... एकदा आई अशीच चिडली... म्हणाली, दक्षिणा घ्या आणि चालते व्हा... तुमची नाटकं इथं कोणी सहन करणार नाही... मग तो आमच्या शेजाऱ्यांच्या घरी गेला.... तिथून पुढे कुठे गेला ते कळलेच नाही.... नंतर बरेच वर्षे पंड्या आला नाही... आम्हालाही त्याची आठवण आली नाही.... नंतर एकदा माझ्या मावशीनं सांगितलं.... तो तिच्या गावात राहायचा एकटाच... नंतर नंतर त्याला स्वयंपाक करायला जमायचं नाही... पण त्याने हेका सोडला नाही.... मग एकदिवस त्याने स्वतःला रेल्वेखाली झोकून दिलं..... पोलिस रिपोर्टमध्ये आलं 80 वर्षांचा माणूस... आत्महत्या.... सोबत पिशवी, त्यात एक पाण्याची बाटली आणि काही काळे दोरे....