त्यांनी त्याच्या पायातले बूट काढले. अंगावर पांघरूण घातले. त्याच्या छातीवरचा तिचा फोटो त्यांनी हळूच त्याच्या हातातून सोडवून घेतला. डोक्याखाली उशी सारली, उशी सारता सारता त्याच्या तोंडाचा दर्प त्यांना असह्य झाला. त्यांनी मग त्याच्या खोलीत पडलेले अस्ताव्यस्त कपडे सरळ केले. टेबलावरची पुस्तकं सरळ लावली. अनाथ लॅपटॉप, मोबाईल जागेवर ठेवले. दहा-साडेदहाच्या दरम्यान त्याला जाग आली. तो उठल्याची चाहूल लागताच त्यांनी त्याच्यासाठी चहा केला. त्याच्या हातात चहाचा मग देताना त्यांनी विचारलं, ""आज ऑफिसला जाणं फार महत्त्वाचं आहे का?'' त्यांच्या त्या आकस्मिक प्रश्नाने तो बावचळला. खरं म्हणजे दहा वाजून गेल्यानंतरही त्यांना घरात बघूनच त्याला आश्चर्य वाटलं होतं. ""नाही तसं काही नाही. फोन करून सांगावं लागेल फक्त, काही काम आहे का बाबा?''
""काम असं काही नाही; पण अरे नवा एक सिनेमा आलाय, बघावं म्हणतोय, म्हटलं तुला वेळ असेल, तर तुझ्यासोबतीनं बघावा.''
त्याच्या हातात पोह्यांची प्लेट देता देता त्यांनी सांगितलं. त्याचे बाबा कधीच हिटलर नव्हते. तो जे म्हणेल त्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. हे कर, ते करू नको, असं त्यांनी म्हटलेलं त्याला आठवलं नाही. तो विभाग जणू आईनंच उचललेला. असं असलं, तरी त्यांनी कधी त्याला यापूर्वी चहा करून दिलेला, अथवा पोह्याची प्लेट हातात दिलेलीही आठवली नाही.
""फोन करून बघतो. बघतो म्हणजे बॉसला येत नाही म्हणून फक्त सांगतो.''
सिनेमा बघून आल्यावर या सिनेमाला आज आपण का आलो होतो, याचाच प्रश्न त्यांना पडला होता. बाबा नंतर खूप वेळ त्या सिनेमावर बोलत होते.
""तुम्ही नेहमी बाहेर जेवायला कुठे जाता रे?''
""तसं काही नाही, जसा ग्रुप असेल तसा जातो.''
""आवडीचं एखादं ठिकाण असेलच की.''
त्यानं नाव सांगितलं. दोघे जेवले. बाबांच्या वागण्यातील तो सगळा बदल तो दिवसभर अनुभवत होता. आता त्याला असह्य झालं.
त्यानं सरळ विचारलं, ""काय झालं, आज एवढा बदल का?''
""काही नाही रे, म्हटलं, तुझ्या जवळ जाता येतं का बघावं.''
त्याला काही कळलं नाही.
""कोण आहे रे ती?''
बाबांनी आता थेट प्रश्न विचारल्यावर त्याला लपवता आलं नाही. त्यानं सांगितलं ""कोण ती...''
""नाही म्हणाली?'' बाबांच्या प्रश्नावर तो चपापला.
""हो! कालच तिला विचारलं.''
""काय म्हणाली?''
""तू माझ्या लायकीचा नाहीस.''
""म्हणून दारू प्यायची?''
तो पुन्हा चपापला.
""सगळं आयुष्य तिच्यावर उधळून लावीन...'' त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच दाबला.
""टाक की मग उधळून, अडवलंय कोणी?''
बाबांच्या त्या उत्तरावर त्याला काय बोलावं ते सुचेना.
""एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य उधळणं सोपी गोष्ट नाही आणि म्हटलं, तर अवघडही नाही.
तुझ्या आईशी मला लग्न नव्हतं करायचं...''
तो शांत राहिला.
""...होतं एका मुलीवर प्रेम. होतं म्हणजे आहे. अगदी जिवापाड प्रेम केलं. तिनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. एकदा मला म्हणाली लग्न करून टाक, तेही मान्य केलं. आयुष्य उधळून लावणं यापेक्षा काय वेगळं असतं; पण त्यानं माझ्या आणि तुझ्या आईच्या नात्यात कधी बाधा आली नाही...''
तो बाबांकडे बघत राहिला. एक झरा खूप काळानंतर वाहिला होता.