गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

प्रिय,



सुनीताबाई देशपांडे यांचा उल्लेख मागच्या पत्रात झाला होता. तो सहज आला आज मात्र तो मुद्दाम करतो आहे. बाईंची दोन-तीन पुस्तके पूर्वी कॉलेजमध्ये असताना वाचली होती. त्यातील आहे मनोहर तरी हे तर सगळ्या गावाने सांगितल्यामुळे केवळ उत्सुकतेपोटी वाचले आणि मग ठेवून दिले. त्याचा त्या वयातही फारसा परिणाम झाला नाही. पु.लं.च्या बद्दल त्यांनी एक दोन जिव्हारी लावणारे उल्लेख केले असले तरी त्याचा मूर्तीभंजन वैगेरे होण्याचा काही परीणाम झाला नाही. खरे तर त्या वेळी या जातकुळीतील अनेक पुस्तके वाचली होती. वाचली कसली चावलीच होती ती. कांचन घाणेकरचे नाथ हा माझा आणि माधवी देसाई यांचे नाच गं घुमा... पण या पुस्तकांमुळे काशिनाथ घाणेकरांबद्दल वेगळं वाटण्याचा संभव नव्हता कारण त्यांना काही मी रंगमंचावर कधी बघितले नव्हते. रंगमंचावरील त्यांच्या अभिनयाचे विश्‍लेषण जाणकार नाटककाराने केले असते आणि त्यावर जर काही प्रश्‍नचिन्हे उपस्थित केली असती तर ती मान्यही झाली असती. पण ते तसे नव्हते हे मनाशी पक्‍के ठाऊक असल्याने मूर्तीभंजन झाले नाही हे खरेच.
विषयांतर हा पत्रकारांना राजकारण्यांकडून मिळालेला संसर्ग आहे की काय असा प्रश्‍न मला अलीकडील काळात पडायला लागला आहे. नाही तर पत्राचा विषय आणि आशय या दोन्ही बाबतीत मी जे काही विषयांतर करतो त्याची कारणमिमांसा करताच येत नाही. असो! तर सुनीताबाईंनी लिहिलेल्या त्या पुस्तकाचा फारसा परिणाम झाला नाही. नंतर मात्र सुनीताबाईंनी पु.लं. गेल्यानंतर लिहिलेल्या लेखाने परत त्यांना वाचावे वाटू लागले. "मण्यांची माळ' फारसं रुचलं नाही. पण मग प्रिय जी. ए. वाचनात आले. जी.ए. बद्दल प्रचंड कुतूहल होतेच पण त्यापेक्षा जास्त त्यांच्या कथांतून दिसणाऱ्या अंधाराचे कुतूहल किंवा ओढ जास्त होती. त्यापायी प्रिय जि. ए. हातात घेतले. त्या पत्रातून एखादा कवडसा त्या अंधारावर पडावा हीच अपेक्षा होती. पण झालं भलतंच. सुनीताबाईंच्या पत्रात जी. ए. भेटतात ते पुन्हा अंधाराच्या अनेक छटांमधुन. दरीतील खोल अंधार, गुहेतील अंधार आणि त्यापेक्षा जास्त खोल विहिरीतील खुणावणारा अंधार. खरे तर त्या विहिरीत नेमकं किती गोड पाणी आहे हे बघण्यासाठी खोल खोल उतरत राहातो पण तरीही एखादी पायरी चुकतेच. काळजाचा ठेका चुकतो. पुन्हा सावरतो. त्या विहिरीत पुन्हा उतरायचे नाही असे ठरवून वर येतो आणि पुन्हा पुन्हा ती विहीर खुणावत राहाते. त्या विहिरीतील तो निळाशार काळोख अजब आहे. सुनीताबाई त्या अंधारात आपल्या घेऊन जातात आणि मग हलकेच आपला हात सोडवून पुढे निघून जातात. मग आपला प्रवास सुरू होतो. त्या काळोखातून पुढे जाण्याचा. खोल उतरत राहण्याचा. काळोखात भरकटत राहावं वाटणं हेच तर जी. ए.चं वैशिष्ट्य. त्यातील प्रत्येक पत्र असेच आहे. त्या विहिरीकडे नेणारे, खोलपर्यंत पोचविणारे आणि पुन्हा माघारी फिरायला लावणारे. झिंग आणणारे आहे हे. व्यसनी माणुस एकाच गोष्टीकडे परत परत का वळतो याचे कारण येथे कळते. ती झिंग हवी-हवीशी वाटते. त्याच-त्या सुखासाठी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी माणुस पुन्हा पुन्हा करतो. त्यामुळेच ती पत्रे.. (तशी सगळीच पत्रे आपली) पुन्हा पुन्हा वाचत असतो. तूही वाचली असशील ती पत्रे. तरी पुन्हा एकदा वाच.. अनेकदा त्या पत्रातून तू दिसतेस. आहा! काय पण प्रत्येकवेळा मीच कशी दिसते रे तुला? असा प्रश्‍न तुझ्या डोक्‍यात उमटेलही.. पण खरेच तू दिसतेस. भांडणारी.. आपल्या मतांवर ठाम असणारी... पत्र हा खरे तर वैयक्तिक मामला. पण तो वैयक्‍तिक राहात नाही. याचे कारण व्यक्‍तीला चिकटलेले सगळे गुण-दोष त्यातून प्रकट होतात. ते काही एकाच व्यक्‍तीची मक्‍तेदारी असू शकत नाही. तशाच गुणांच्या अनेक व्यक्‍ती असतातच. त्यामुळे प्रत्येकवेळी मीच कशी दिसते असा जर तुझा प्रतिवाद असेल तर तो आधीच खोडून काढलेला बरा. " तुम होती तो ऐसा होता' च्या तालावर हे नाही... तुम ही हो चा ताल आहे हा..

बाकी.. आज शतकातील सर्वात अनोखा दिवस होता. 12-12-12.. भारीच ना! आपल्या आयुष्यात आता पुन्हा ही तारीख येणार नाही. पुढच्या या तारखेला कदाचित तू असू शकतेस...( हा हा...मी तुझ्यापेक्षा लहान आहे हा तुझा युक्तिवाद असतो ना म्हणून.) हा झाला विनोदाचा भाग. पण असे दिवस, असे काही क्षण साठवून ठेवावे वाटतात. ते साठवायचे असतातही. पण आज काहीच नाही.. साठवण्यासारखे.. दिवस असा-तसाच गेला.. अगदी रोजची कामेही नीट झाली नाहीत... मग चला तुला पत्र लिहावे म्हणून पत्र लिहायला घेतले..पत्र बारा तारखेलाच लिहिले आहे. कदाचित ते 13 तारखेला पोस्ट होईल. पण ते लिहून झालं बारा तारखेला. बारा तारीख खरेच किती महत्त्वाची आहे तुलाही माहीत आहे.....मागच्या पत्रात लिहिलं होतं की प्रत्येक पत्र कुठे स्वतंत्र असतं आता हेच बघ ना? हेही त्याच माळेतील पत्र..

तुझाच....

मंगळवार, ४ डिसेंबर, २०१२

प्रिय,

सुनीताबाई देशपांडे म्हणतात, तुमचं पहिलं पत्र हे निव्वळ पत्र किंवा मूळ पत्र आणि बाकीची सगळी पत्रे ही पत्रोत्तरे. खरे असेलही. पत्राला उत्तर लिहिताना किंवा त्याचा संदर्भ घेऊन लिहिताना ते पत्र मूळ पत्र राहत नाही. पत्रांच्या माळेतील तो एक मणी होतो, त्याचे अस्तित्व त्या माळेतील इतर मण्यांप्रमाणेच असते. वेगळे अस्तित्व त्याला असत नाही. दोन्ही हात एकमेकांत गुंफून घेतलेल्या शिल्पाप्रमाणे. त्यातील प्रत्येक शिल्प आपपल्या ठिकाणी सुंदर दिसत असले तरी, त्या शिल्पांना एकमेकांपासून दूर करता येत नाही. ते केलं की मग अपुरेपणा जाणवतो. मूळ पत्रात तो अपुरेपणा असत नाही. पण मूळ पत्र म्हणजे तरी काय? प्रत्येक पत्र मूळ पत्र असू शकते का? छे! प्रत्येक पत्र कधीच मूळ असू शकत नाही. पहिले पत्र केवळ मूळ म्हणता येईल. बाकीची सगळी पत्रे ही पुन्हा माळेतील मणीच. त्याला एकमेकांपासून दूर नाही करता येणार. आता हेच बघ. तुला लिहिलेले पहिले पत्र आणि त्यानंतरची ही सगळी पत्रे ही एका अदृश्‍य अशा कडीत बांधलेलीच आहेत की. त्यातून त्यांना वेगळे करता येणार नाही. पहिल्याच पत्रात फक्‍त तुम्हाला तुमचेपण मांडता येते. बाकीच्या पुढच्या सगळ्या पत्रांमध्ये तो पहिला धागा असतोच, कधी उत्तरांचा तर कधी प्रश्‍नांचा. पण ज्या पत्रांना उत्तरे मिळत नाहीत, ती पत्रे पुन्हा मूळ पत्रासारखी असतात का? छे तीही मूळ असत नाही. जाऊ दे ! आपण या भानगडीतच न पडलेले बरे. मला तुला जे सांगायचे आहे ते सांगितले म्हणजे झाले. ते पत्र मग मूळ आहे की पत्रांच्या कडीमधले याला काही अर्थ असत नाही.
तू साथ-साथ चित्रपट बघितला असशीलच ना? दीप्ती तुलाही आवडते आणि मलाही. तिच्या डोळ्यात तुझे साधेपण दिसते. खरे तर नूतनच्या मीनाक्षी डोळ्यांपेक्षा तुझे डोळे अधिक बोलके आहेत. हे कधीतरी सांगायचे होते, पण ते राहिलेच. तर दीप्तीचा साथ-साथ चित्रपट. त्यातील बहुतेक गाणी सुंदरच आहेत. पण तरीही "तुम को देखा तो ये ख्याल आया ' हे गाणं अप्रतिम. तुझ्या आवडत्या जगजीतसिंहने गायलेले. पडद्यावर फारुख डोळ्यात ीजतका आर्त भाव आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचे मागे गेलेले केस आणि समोर साधी पण आश्‍वासक दीप्ती. जगजीतच्या पहिल्या हुंकारापासून आणि चित्राच्या आलापापासून गाणं खोल मनात उतरत राहातं. समोरची दीप्ती हळूहळू विरत जाऊन तिथे तू दिसू लागतेस. खास करुन ज्या वेळी आज फिर हमने इक तमन्ना की, ही ओळ तो गातो त्यावेळी हाय! जणू ती ओढणी आपल्याच हातात असल्याचा भास होतो. तो ज्या सहजतेने ती सोडून देतो आणि म्हणतो "आज फिर दिल को हमने समझाया... हाय... दीप्तीच्या चेहऱ्यावरचे ते सगळे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागतात. मागे केस हलक्‍या हाताने घेणारी. मान हलकेच तिरकी करुन बोलणारी आणि सगळ्यात महत्त्वाचे मी नजर चुकवत असताना धिटाईने नजर मिळविणारी... तूच आणखी कोण असणार.. "हम जिसे गुणगुणा नही सकते...' हे कडवं गाताना जगजीतचाही घसा थोडा कोरडा पडला असणार नक्‍की. काही वेळाच अशा असतात.. त्यांची गाणी आपल्याला गुणगुणायला येतच नाहीत... कितीही ओठांवर असलं तरी सांगता येत नाही हेच खरे.... आज पुन्हा तुझी आठवण खूप दाटून आली. असे काही क्षण असतात त्यावेळी खूप सैरभैर व्हायला होतं. जगणंच अवघड वाटायला लागतं, पण हे क्षण धिटाईने पेलायला लागतात. ही कला मला यायला लागली आहे असे वाटते तरी काही क्षण सुटतातच की... आजही आठवणींचा आवेग आवरून धरला आहे. आज पुन्हा मनाला समजावलं आहे....

                                                                                                                                     तुझाच 

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

प्रिय,



तुझी आठवण आली की... छे! आठवण हा शब्दच चुकीचा. तुझ्याशी खूप बोलावं वाटलं की पत्र लिहिणं हे आता माझं नित्याचं झालं आहे. तुझ्याशी बोलायचे म्हणजेच तुला पत्र लिहायचे, म्हणजे तुझं वेगळं अस्तित्व मान्य करायचं. म्हणूनच या पत्र लिहिण्याच्या काळापुरता का होईना, मी तुझ्यापासून वेगळा होतो. तुला माझ्यातून बाहेर काढून, तुझ्याशी गप्पा मारण्याचा हा एकच मार्ग माझ्याकडे आता उरला आहे. एवढंच. जगातील माहीत झालेली प्रत्येक गोष्ट तुला सांगावी, त्या गोष्टीकडे तुझ्या डोळ्यांनी बघावे अशी खूप इच्छा असते, पण.. पण हा पण आडवा येतो. म्हणून हा पत्रप्रपंच. तुझ्यापर्यंत पोचण्याचा. तुला पुन्हा पुन्हा आळवत स्वतःला जगवत ठेवण्याचा. एकदा का तू समोर आलीस की मग अनेक गोष्टी सुचू लागतात. काही उपयोगाच्या काही निरूपयोगी, तरीही मग मी बरळत राहातो. तुझ्याशी बोलत राहातो अखंडपणे. आताही असंच होईल. विषय एक आणि मी भलतंच काहीतरी सांगत राहीन.......
रामायणाचा मी अनेक अंगाने विचार करतो. रामायणातील प्रत्येक पात्र प्रत्येकवेळी वेगळी भासतात. त्याच्याकडे तर्काने बघितले तर ती आपापल्या जागा सोडून दुसऱ्याच जागा घेताना दिसतात. श्रद्धेने बघितले तर त्यांच्यात दैवत्व दिसते, तर डोळ्यांना मर्यादा दिसतात. पण हीच पात्रे मनाच्या चक्षुतून बघितली की तर त्यांची उंची कैक पटीने वाढते. रामायण आणि महाभारताचे हेच तर वैशिष्ट्य आहे कि त्यांतील अनेक पात्रे आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे भेटतात. ती कोणालाच भेट नाकारत नाहीत. जसे समोरच्याला हवे तसेच ती भेटत राहातात. आता हेच बघ. रामायणात जर उत्तम प्रेमकथा आहेत असं म्हटलं तर तुलाही शंका येईल. पण खरेच रामायणात अप्रतिम अशा प्रेमकथा आहेत. राम-सीता, रावण-मंदोदरी, लक्ष्मण-उर्मिला अशा अनेक. पण यांत प्रेमाचे सगळे रंग दिसतात ते राम-सीता प्रेमकथेत. रावण-मंदोदरीला कधी वियोग सहनच करावा लागला नाही. रावणाचे मंदोदरीवर इतके प्रेम होते, त्यामुळेच समोर सीतेसारखी रुपगर्वीता असतानाही त्याचे मन चळले नाही. लक्ष्मण-उर्मिला यांच्यात वियोगाचा एक मोठा कालखंड आला पण नंतर ते एकत्र झाले. अगदी शेवटपर्यंत. राम-सीतेच्या प्राक्‍तनात मात्र मिलन-वियोग-मिलन आणि पुन्हा वियोग आहे. खरे तर खूप मोठी आणि उत्सुकतेने ताणलेली ही प्रेमकथा आहे. आपल्या पुराणांनी याबाबत अनेक श्‍लोक लिहिले आहेत. ते अनेकदा अतिशयोक्‍ती अलंकारांनी सजलेले वाटतात, तरीही त्यात राम आणि सीतेच्या प्रेमाचे रंग अचूकतेने टिपलेले आहेत. एका श्‍लोकाचा अर्थच मुळी असा आहे. रावणाने सीतेला पळवून आणून अशोकवनात ठेवलेली असते. रामाच्या वियोगाने सीता प्रचंड दुःखी झालेली आहे आणि तिला रामाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. ती तिच्या सेवेत असलेल्या त्रीजटा नामक राक्षसीला म्हणते, त्रीजटे मला आता भीती वाटू लागली आहे. ज्या प्रमाणे किडा कुंभार माशीचे सतत ध्यान करतो आणि तिचेच रुप घेतो, अगदी तसेच माझे झाले आहे. मी रामाचा इतका विचार करते, त्याचे इतके चिंतन करते की मला कधी कधी वाटते की मी रामच होऊन जाईन. पण मी राम झाले तर संसारसुख कसे घेणार?, त्यावर त्रीजटा तिला म्हणते, ""अगं तू जसा रामाचा विचार करतेस अगदी तसाच रामही तुझाच विचार आणि चिंतन करतो आहे. त्यामुळे जर तू राम बनलीस तर तोही सीता बनेल. मग राम बनलेली तू रावणाचा वध कर आणि आपल्या सीतेकडे जा.
राम आणि सीतेतला हा प्रेमगंध खरेच अगदी वेगळा आहे. विरह
प्रेमाचा हा रंग विरहात असलेल्यांनाच कळतो, कळावा. विरह रंग हाच तर प्रेमाचा खरा रंग. मलाही कधी कधी वाटतं माझंही असंच होईल. मलाही तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. जगण्याचे मार्ग सगळे तुझ्याभोवतीच घुमत राहातात. मी तुझा इतका विचार करतो आहे की कदाचित मी तूच बनून जातो की काय असं वाटत राहातं. तुझ्या बोलण्यासारखं बोलू लागतो. अलीकडे तर अनेक शब्द तुझेच तोंडात येतात. तुझ्या आवडी निवडी माझ्याच होऊन गेल्या आहेत. कधी कधी मी चटकन असा बोलून वा वागून जातो की मी असा नव्हतोच कधी . कुंभारमाशीच्या चिंतनात अडकलेल्या किड्यासारखा मीही कुंभारमाशीच होऊ लागलो आहे. पण या कुंभारमाशी होण्यातही एक मजा आहे. एक गुंगी आहे हे खरेच.
तुझाच...

रविवार, २६ ऑगस्ट, २०१२

"पॉलीश'

"पॉलीश'
एवढाच शब्द त्याने उच्चारला आणि त्याच्यापुढे पाय पुढे केला.
झाडाखाली बसलेल्या त्या सत्तरीतल्या चांभाराने एकदा त्याच्याकडं बघितलं आणि आपल्याकडचा चपलांचा एक जोडा त्याच्यापुढं ढकलला.
त्याने त्या जोड्यात पाय घुसविले आणि तसाच उभा राहिला.
लय दिस झालं, पन बुटाचं हे मॉडेल नायी बघिटलं. मागं लय फॅशन व्हती याची, पर आता कोन न्हाय वापरत.
चांभाराच्या त्या वाक्‍याने त्याला उगाचच अंगावर मास चढल्यासारखं वाटलं. आपल्या पांढऱ्या शुभ्र मिश्‍यांवर ताव मारत त्यानं नुसतं स्मित केलं. उगाचच आपल्या दाढी केलेल्या तुळतुळीत गालावरून हात फिरवला. कोटाची बटने काढली आणि पुन्हा घातली.
साधं करू की पेशल?
हं. स्पेशल. त्यानं आवाजात जितका जरब आणता येईल तितका आणला.
सायब कसं हाय! तुमच्यासारख्या लोकांस्नी असा चकचकीतच बूट लागतो. चालायचं कुठं असतंया. गाडीत बसला की धूम निघाला.....
हं.. चांभाराच्या त्या जवळीकतेनं तो थोडा अस्वस्थ झाला. बोलून चालून चांभार, दिडदमड्या मिळविणार आणि किती आगाऊपणे बोलतो, असाच भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
किती वेळ? त्यानं पुन्हा आवाजात जरब आणण्याचा प्रयत्न केला, पण ती तितकीशी जमली नाही.
लय नायी, पर चकाकी तर आली पाईजे..
हं. तो गप्प बसला.
बराचवेळ शांतता तशीच राहिली. कोणीच काही बोललं नाही. त्या चांभाराचे हात वेगानं बुटावर फिरत होते. मघापासून हातापेक्षा वेगाने चालणारी त्याची जीभ थंड पडली होती. एक बूट झाल्यावर त्यानं दुसरा हातात घेतला. त्याच्यावर तो ब्रश फिरवू लागला.
आपण उगाचच त्याला थांबवलं, असं वाटून त्यानं काही तरी प्रश्‍न करायचा म्हणून केला.
हं. किती वर्षे झाली. इथे बसतोस?
हं...
आता त्या चांभारानं त्याचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्यानं गप्पपणे आपलं काम सुरूच ठेवले. सायबाने समोर बघितलं. उन तसं बऱ्यापैकी होतं. अंगातून आता घाम येऊ लागला होता. तो ज्या गाडीतून आला होता, ती नवीकोरी गाडी समोरच उभी होती. गाडीच्या थंडाव्यात जा,वं असं त्याला वाटून गेलं. पण त्यानं तो विचार टाळला. त्या चांभाराशेजारी असलेल्या एका मोडक्‍या खुर्चीवर त्यानं रुमाल टाकला आणि तिथंच बसून राहिला. काही क्षण तसेच गेले. ती शांतता त्याला आणखी डसू लागली.
त्यानं पुन्हा विचारलं.
किती वर्षे झाली. इथे बसतोस?
वरीस, दोन वरीस झालं असल की, इथं बसतो. तेच्याआगुदर.. तो बघा बंगला तिथं बसायचो. म्हणजे तिथं बंगला नव्हता. व्हतं एक घर. त्याच्या पुढ्यात एक झाड व्हुतं. तिथं बसायचो, न्हान व्हतो, तवापसनं.
त्यानं त्या बंगल्याकडे बघितलं. खूपच दिमाखात तो बंगला उभा होता.
मागल्या साली घर पाडलं. अन्‌ आता तिथं बंगला झाला. म्या ज्या झाडाखाली बसत हुतो ते झाड बी तोडलं गेलं. मंग काय. काही दिस बंगल्याच्या भित्तीला टेकून टाका घालायचो. पन एकदा वाचमन चिडला, म्हणाला सायबांकडं लय पावणं येणार हायती, उठ इथंनं. मग दोन चार दिसाला कोण कोण येत राहिलं आणि मग म्या सरळ इथ मुक्‍काम ठोकला.' तो बोलत होता.
""मोठ्या बंगल्यांस्नी न्हान माणसं पेलवत न्हायीत सायेब. तेंच्या शिरमंतीपुढं आपल्यावानी गबाळ्याचा कशापायी संसार थाटायचा. ह्या बुटांचं भारी असतंया बघा, गरीब दिसू लागली की हात फिरवायचा. थोडं पॉलीश केलं की झ्याक नव्यावानी दिसतंया. माणसांचं तसं नसतंया. माणसांना का कोणी पॉलीश करणार. म्हणलं त्यांचं नशीब त्यांच्याकडं आपलं आपल्याकडं. आपण जनमलोच तुटक्‍या चपलेवानी, दोन-चार टाकं काय घातलं तेवढंच आपलं. आता ते बी काय उपेगाचं न्हायी. शिवायला आता तळ बी राहिला न्हायी.''
हं.. सायबानं आता नुसता हुंकार भरला.
तू बघितलं आहेस त्या बंगल्यातील सायबांना? पुन्हा काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं प्रश्‍न केला.
नाय बा, काळ्या काचंच्या गाड्यातली माणसं कुठं दिसत्यात गरीबाला. पर गाड्या बघितल्यात. लय झ्याक हायती. तुमची ही गाडी बी तशीच, पर त्या बंगल्यातील गाड्या लय निराळ्या. रोज येगळी गाडी.
तो गप्प बसून राहिला. त्यानं त्या बंगल्याकडं एक नजर टाकली आणि पुन्हा त्या चांभाराकडं. त्याने आता दोन्ही बूट चकचकीत करुन ठेवले होते.
चांभाराने त्याच्याकडे बघितले.
त्याने पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला. पण तेवढ्यात गाडीचा ड्रायव्हर पुढे आला, ड्रायव्हरने पन्नासाची एक नोट त्याच्यापुढे ठेवली. साहेब गाडीत बसून निघून गेला. चांभाराने त्याच्या गाडीकडे बघितले. गाडी त्या बंगल्याच शिरली.
चांभार स्वतःशीच हसला. त्या बंगल्याच्या सायबालाच आपण सांगत व्हुतो की. त्याने मान हलवली आणि सायबानं टाकलेल्या पन्नाशीच्या नोटेकडं बघत चांभार पुटपुटला, आजचा दिस गेला आता, उद्याचं उद्या बघू.
त्यानं तिथं ठेवलेलं आपलं सामान आवरायला सुरवात केली. सायब बसलेल्या खुर्चीवर सायबाचा रुमाल तसाच होता. एवढा मोठ्‌ठा साहेब आणि त्याचा रुमाल बघून चांभाराला कसंतरीच वाटलं. रुमालाला पडलेल्या भोकांवरुन त्याला समजलं, त्या बंगल्यात जाण्यापूर्वी सायबालाही पॉलीश केलं होतं. माणसांना पॉलीश केलेलं त्यानं पहिल्यांदाच बघितलं होतं. 

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

प्रिय



खूप दिवसांनी पत्र लिहितोय. त्याबद्दल माफ कर. तुझ्याकडे माफी मागायची हाही एक बहाणा असतो, तुझ्याजवळ जाण्याचा, हे बहुतेक तुलाही माहीत आहे. काही नात्यांचं असंच असतं. जे दिसतं तसं असत नाही. महाभारत हा जसा तुझ्या आवडीचा विषय तसा माझ्याही. महाभारताचे वैशिष्ट्यच हे की ते प्रत्येकाला आपपल्या नजरेतून वेगळे भासते. कृष्ण-राधा ही जोडी महाभारतात नाही, ती नंतरच्या काळात कीर्तनकारांनी टाकली, दुर्गा भागवतांनी याबाबत खूप संशोधन केले आहे. खरे तर राधा आणि द्रौपदी ही पात्रे कीर्तनकारांनी वेगळी केली. राधाही विवाहित आणि द्रौपदीही विवाहित. पण दोघींचे कृष्णावर प्रेम. राधा-कृष्ण मांडताना कीर्तनकारांनी त्या प्रेमाला भक्‍तीचे रुप दिले आणि द्रौपदी-कृष्ण प्रेमाला बहीण-भावाचा मुलामा; पण मला नेहमी वाटते, राधा ही काही गोकुळातली गवळण नव्हती. शिवाजी सावंतांनी युगंधर लिहिताना राधेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला; पण त्यांनाही तो लागला नाही. मग त्यांनी शब्दांचा किस काढत राधा म्हणजे मोक्ष वगैरे असा काहीसा अर्थ लावला. पण राधेला महाभारतात शोधण्याचा त्यांनी आणखी थोडा प्रयत्न केला असता तर राधा महाभारतात क्षणा-क्षणाला भेटली असती. राधा आणि द्रौपदी या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. द्रौपदीत राधेला बघायचे थोडेसे धाडस केले तर तिच्यात राधा दिसतेच. अगदी स्वच्छ निर्मळपणे ती दिसते. विशेष म्हणजे प्रियतमेसाठी सर्वस्व देणारा कृष्ण द्रौपदीसाठीच भारतीय युद्ध घडवून आणतो हेही आरशासारखे स्पष्ट आहे. पाच पती असूनही द्रौपदीला कृष्ण का आवडावा? हा प्रश्‍न उपस्थित होईलही, पण नवऱ्यांची संख्या किती यावर का प्रेम असते. पाचही पतींमध्ये पराक्रम आणि शौर्य होते, पण प्रेम केवळ शौर्य आणि पराक्रमावर केले जात नाही, ती अंतरिक गोष्ट आहे. दुर्गाबाई याबाबत खूप सविस्तर सांगायच्या, पण त्यांनीही राधेला आणि द्रौपदीला एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मांडलेले नाही. कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील नाते हे भावा-बहिणीचे रंगविले ते खरे कीर्तनकारांनी आणि त्यानंतर भावगीत रचणाऱ्या कवींनी. द्रौपदी खरे तर कृष्णाची सखी. गंमत बघ हं, कृष्णाच्या रुक्‍मिणी-सत्यभामेसह सोळा सहस्र स्त्रिया असल्या तरी त्याला त्याची सखी भेटली ती द्रौपदीत आणि पाच नवरे असूनही कृष्णेला अर्थात द्रौपदीला कृष्णातच सखा दिसला. खरे तर हा प्रेमाचा रंग नाटककारांनी आणि कवींनी फुलवायला हवा होता. अगदी प्लेटो सांगतो तसे हे प्रेम अशारीरिक आणि उच्च पातळीवर होते. द्रौपदीच्या लज्जा रक्षणापासून ते तिच्यातील सूडाला मूर्त रूप देण्यापर्यंतच्या प्रवासात पांडवांहून जास्त पुढाकार कृष्णाने घेतला आहे. त्यासाठी त्याने वाट्‌टेल ते केले आहे. यांत तिच्यासाठी सर्वस्व द्यायचा हेतू होता. कृष्णाला भारतीय युद्ध थांबवायचे असते तर ते केव्हाच थांबले असते. पण ते त्याला थांबवायचे नव्हते. द्रौपदीचा झालेला अपमान जितका पांडवांना जिव्हारी लागला होता, त्यापेक्षा जास्त कृष्णाला लागला होता. म्हणूनच तर त्याने अर्जुनाला "युगंधर' तत्त्वज्ञान सांगून लढायला भाग पाडले. एखाद्या शूर सेनानीने युद्ध लढण्यापूर्वी आपल्या शस्त्रांना धार द्यावी, दारूगोळ्यांचा साठा करावा, व्यूहरचना करावी, अगदी त्याचप्रमाने द्यूत सभेनंतर कृष्णाने केले. पांडवांपेक्षा कृष्णालाच हे युद्ध हवे होते हे उघड आहे. हे युद्ध जिंकल्यानंतर कृष्ण काही चक्रवर्ती सम्राट वगैरे होणार नव्हता, किंवा तोही चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिरच्या साम्राज्यातील एक मांडलिक राजा होणार होता. तरीही त्याने पांडवांना मदत केली. याचे कारण धर्माची पुनर्स्थापना हे नव्हतेच. कारण कौरवांचा पक्ष अधर्माचा आणि पांडवांचा पक्ष धर्माचा हे कशावरून ठरणार? युद्धभूमीवरचा धर्म काय हे कृष्णाने सांगितले, याचा अर्थ असा नव्हे, की कौरवांचे राज्यच मूळी अधर्माचे होते. त्याचे संदर्भ वेगळे वेगळे करायला हवेत. सांगायचा मुद्दा हाच, की कृष्णाने केवळ आणि केवळ द्रौपदीसाठी हा महाभयंकर संग्राम घडवून आणला. पण हे अमूर्त आणि संयमी प्रेम उघड झाले नाही हे खरेच. आपल्याकडे सामाजिकदृष्टया स्त्री-पुरुषांना कुठल्यातरी नात्यात अडकविणे भाग पडते. तसे न झाल्यास अनैतिकतेच्या गाळात त्यांना अडकावे लागते. द्रौपदी विवाहित आणि कृष्णही विवाहित त्यात कृष्णाला दैवपद बहाल केलेले. त्यामुळे द्रौपदी आणि कृष्ण यांच्यात प्रेम होते आणि राधा दुसरी तिसरी कोणी नसून ती द्रौपदीच होती, असे जर कोणी सांगितले तर त्याला एक तर मुर्खात काढण्याचा संभव होता किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा. त्यामुळे राधेला कृष्णेतून वेगळे करण्यात आले आणि द्रौपदीला बहीण करण्यात आले. पण द्रौपदी आणि कृष्णाचे खरे प्रेम होते. अपुरेपण दोघांतही होते, माणसांच्या गर्दीत आपण एकटे असतो ना तसेच त्या दोघांचे होते.
पण त्यातही गंमत आहे. या दोघांचे प्रेम उच्च असले तरी खरे उच्चतम प्रेम महाभारतात सापडते ते भीमाचे. युधिष्ठिर एकपत्नीव्रत राहिला पण त्यात त्याच्या प्रेमापेक्षा तत्त्वाचा भाग जास्त होता, भीमाचे हिडिंबाशी लग्न झाले होते, ते खरे द्रौपदी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी. हे खरे तर एकतर्फी प्रेम होते. द्रौपदी मनाने कृष्णाची होती. खरे तर ती राधेसारखी कृष्णाबरोबर होती आणि भीम राधेप्रमाणे द्रौपदीवर प्रेम करायचा. द्यूत सभेत कृष्णेची विटंबना होताना तिला आठवला तो कृष्ण, पण पांडवात ज्याची सर्वात जास्त तडफड झाली तो भीम.
तुझाच..

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

फेडरर तू हरायला नको होतस....

मला टेनिसमधला "टे' कळत नाही,
रॅकेट कशाची असते काही माहीत नाही,
बॅक हॅण्ड, फोर हॅण्ड मला समजत नाहीत
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....

सर्व्हीस म्हणजे काय याचा मला पत्ता नाही
गुणांचा तक्‍ता कसा केला जातो, कळत नाही
ब्रेक पॉंईट म्हणजे कशाला ब्रेक ते समजत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतस....

स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्ह
टेनीसमध्येही असतं का माहीत नाही..
चेंडू प्रेक्षकांत भिरकावल्यावर टाळ्या
मिळतात का हेही माहीत नाही
पण तरीही फेडरर तू हरायला नको होतंस...


टेनिसमधला तू बादशाह वैगेरे असशील
अनेक लढाया तू जिंकल्या असशीलही
पण तरीही तू उपयोगाचा नाहीस.....
तू खरंच हरायला नको होतंस...

मला गोल्डन चेरी माहीत नाही..
पण मला माहीत आहे डोळ्यांतील अश्रुंची किंमत
लाखो डोळ्यांतून तुझ्यासाठी गालावर आलेल्या
आणि त्यापेक्षा जास्त "त्या' दोन डोळ्यांतील अश्रू,
तुझ्या हरण्यामुळे तसेच डोळ्यात थबकून राहिलेले
त्या दोन डोळ्यांसाठी किमान तू हरायला नको होतसं...

फेडरर खरेच तू जिंकायला हवं होतंस, त्या दोन डोळ्यांसाठी तरी.......

(लंडन ऑलिंपिकमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने रॉजर फेडररला हरवून गोल्ड जिंकल्यानंतर) 

बुधवार, ४ जुलै, २०१२

प्रिय,

प्रिय,
पहाटेचे तीन वाजलेत. गेल्या चार दिवसांप्रमाणे आजही झोप आलेली नाही. येण्याची शक्‍यताही नाही. खिडकीतून चंद्राचा मंद प्रकाश आत येतोय. नुकत्याच चालायला लागलेल्या बाळाच्या पायातील पैंजणाप्रमाणे पावसाच्या थेंबांचा नाद होत आहे. मघाशी ऑफीसमधून येताना त्याचा नाद कानात साठवतच आलो. पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस थांबायची खूप वेळ वाट बघितली आणि मग रेनकोट अंगावर चढविला. गाडीला किक मारता मारता सहज नजर आकाशाकडे गेली. आषाढी पौर्णिमेचा चंद्र ढगांच्या दाटीतून चांदण बरसत होता. शब्दशः चांदणं बरसत होतं. चंद्राचा मंद प्रकाश आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्यासाठी रेनकोट काढला आणि पाऊस आणि चांदण दोन्ही अंगावर झेललं. रिकाम्या, एकट्या रस्त्याला सोबत करत रस्त्याच्या मध्येच गाडी लावून चिंब भिजत राहिलो. पावसाच्या धारांसोबत तुला आठवत राहिलो. तू उच्चारलेला प्रत्येक शब्द, तू घेतलेला एक अन्‌ एक हुंकार, तुझं हसणं. सगळं आठवत राहीलं. पावसाचा सांगाती बनून जणू आठवणींच्या धारा बरसत राहिल्या आणि त्यात मी चिंब होत राहिलो. पावसासारखा आठवणींचा दुसरा कोणी सांगाती नाही. आवणींबरोबर येणाऱ्या आसवांना तो हलकेच आपलेसे करतो. तू कोण? कोणासाठी? असले प्रश्‍न विचारत बसत नाही आणि त्याचे डागही मागे ठेवत नाही. त्यामुळे त्याच्यासोबतीने खूप रडून घेतले. मोकळे होण्याचे मी नवनवे मार्ग शोधतो आणि प्रत्येक वाटेत तूच भेटत राहतेस. तू एकदा म्हणाली होतीस, माझं सगळं विश्‍व तू व्यापून टाकले आहेस. तू तर माझं विश्‍वच आहे. त्यातून कसं बाहेर पडणार. पण पडायचे आहे कोणाला ?
तुला लहानपणीची एक गोष्ट सांगतो. तेव्हा दुसरीत होतो मी. नागपंचमीची सुटी होती. गावाकडे त्यावेळी आमच्या वर्गातील बरीच मुलं गुरांना चारायला घेऊन जात. मग मीही त्यादिवशी त्यांच्यासोबत गेलो. दिवसभर त्या माळरानात आम्ही चिखलाचे नाग करत राहिलो. संध्याकाळ झाली तरी आम्ही तिथून हालायला तयार नाही म्हटल्यावर आमच्यासोबत असलेल्या एका मोठ्या माणासाने उगाचच आम्हाला दटावले. नागपंचमीला नाग करायचे नसतात. त्यात तुम्ही मातीचा नाग करुन तो मोडलात. आता नाग रात्री येऊन तुम्हाला चावणार. आप्पांना विचारलं, त्यांना वाटलं मला देवघरात ठेवलेला नाग हवाय, त्यामुळे त्यांनीही सांगितलं, नाग मोडला की नाग रात्री येतोच. मला काही सुचेना. भीती प्रचंड वाटत होती. त्या रात्री नाग बऱ्याचदा स्वप्नात आला. दरदरून घाम फुटला आणि कडाडून ताप आला. दुसरा आख्खा दिवस आप्पा समजावत राहिले, नाग-बिग काही येत नाही. पण भीती काही पुरती गेली नाही. पुढे-पुढे तो नाग माझ्या गळ्याभोवती वेटोळा घालून बसलाय असं वाटायचं. पण गेल्या काही दिवसांपासून तो कुठे बिळात लपून बसला होता, देव जाणे. तू गेलीस आणि पुन्हा तो नाग वळवळायला लागला. जणू कात टाकून ताज्या दमाने तो येतो आहे असं वाटू लागलं, आणि तेवढ्यात तुझ्या आठवणींचे हजारो गरुड आकाशात घिरट्या घालू लागले. आता काही तो परत येईल असे वाटत नाही.


तुझाच

शनिवार, २३ जून, २०१२

प्रिय,


प्रिय,
तुला माहीत आहेच, मी जिथे राहतो तिथे झाडांची दाटी आहे. तिथे एक आंब्याचे डेरेदार झाड आहे. गच्च काळपट हिरव्या पानांनी बहरलेल्या त्या झाडाच्या एका फांदीवर एक कोकीळ नेहमी बसलेला असतो. गेल्या अडीच वर्षांपासून मी त्याला बघतोय. तो त्याच फांदीवर असतो. अगदी एकटा. दिवसाच्या कुठल्याही वेळेत मी त्या फांदीकडे बघतो, त्यावेळी तो तिथेच असल्याचे मला दिसले आहे. अगदी पहाटेच्या चंद्रप्रकाशातही त्याची ती लांब काळी शेपूट फांदीतून खाली दिसतच असते. अर्थात त्याला मी तिथे पहाटेच जास्त वेळा बघितले आहे. पण भर दुपारीही तो तिथून आर्त गात असायचा. अगदी गेल्या गुरुवारपर्यंत त्याचे ते आर्त गाणे सुरू होते. हिवाळा असो वा उन्हाळा अथवा पावसाळा, अशा कुठल्याच ऋतूचा आणि त्याच्या गायनाचा काहीच संबंध नसायचा. कोकीळ सहसा वसंतातच गातात हा झाला विज्ञानाचा नियम, पण हा पठ्ठ्या कधीही गायचा. कुठल्याही ऋतूत, कुठल्याही वेळी.
पण त्यातही भर दुपारी त्याची गायनसमाधी लागायची. त्याची ती आर्तता बघून मला मंदिरात व्याकूळ होऊन एकतारी घेऊन भजन गाणाऱ्या भक्‍ताची आठवण येते. देवाची आळवणी करताना स्वतःला विसरून गाणारा भक्‍त आणि तो कोकीळ यांच्यात मला बरेच साम्य वाटते. भजनकऱ्याला जसे स्वतःचीही जाणीव नसते. अगदी तसेच त्या कोकीळला कुठल्याही ऋतूची जाणीवच नसते. जणू एक ऋतू त्याच्याभोवती वेढा टाकून बसला आहे आणि तो त्यात गुरफटून राहिला आहे. त्यामुळेच अगदी भर पावसातही तो "कुहू'चा टाहो फोडत असतो. त्याला मी असे पावसातही गाताना बऱ्याचवेळा ऐकले आहे. जणू आपल्या प्रियतमेची आठवण त्याला जगू देत नाही आणि मरूही देत नाही. तिला आळवताना त्याचा सूर आर्त व्हायचा. त्याची ती आर्तता ऐकून स्वर्गात जर देव असतील तर तेही नक्‍कीच व्याकूळ झाले असतील यात शंका नाही. अगदी निसर्गाच्या उलटच आहे. पण जे आहे ते हे आहे. पण का कोणास ठाऊक पण तो कोकीळ गेल्या गुरुवारपासून गायचाच बंद झाला. तो तिथेच असतो. त्याची ती काळी शेपटी त्या फांदीतून तिथेच दिसते, पण तो गात नाही. अगदी समाधी लावल्यासारखा असतो. मला वाटलं त्याला जोड मिळाला असेल. पण त्या फांद्याआडून दुसरी शेपटी दिसली नाही कधी. तरीही तो गात नाही, सूर आळवत नाही. त्याची आर्तता संपली की काय असा प्रश्‍न मला पडला होता. समाधीस्त ऋषीच्या दर्शनानेही समाधान मिळते ना अगदी तसेच समाधान त्याच्याकडे बघितले की मिळते. काल पहिल्यांदा मी त्याला त्याच्या नेहमीच्या फांदीपेक्षा दुसऱ्या फांदीवर बसलेलं बघितलं. त्याच्या पंखांची थोडी फडफडही ऐकू आली. अगदी कीर्तनात दंग झालेल्या महाराजांसारखाच तो. देवाने दृष्टांत द्यावा आणि कीर्तनकाराच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहावा असाच तो भासला. बहुतेक त्यालाही त्याच्या प्रियतमेने दृष्टांत दिला असेल. त्या क्षणभर दर्शनानेही तो मोहरून गेला असेल. कोकीळच तो... आता तो येत्या वसंतात गायीलही, पण ते सूर आनंदाचे असतील आणि समाधानाचेही.....त्याला ते सूर नक्‍की सापडतील... तुला काय वाटतं....
तुझाच...

शुक्रवार, ८ जून, २०१२

काजळी



काजळी

त्याने समईची वात हलकेच बाहेर काढली, काडेपेटीतील काडी पेटविली आणि हलकेच समईवर धरणार इतक्‍यात वीज चमकून गेली आणि त्यापाठोपाठ आलेल्या ढगांच्या गडगटाने खिडक्‍यांची तावदाने वाजली. तावदानांची बंधने झुगारुन आत आलेल्या वाऱ्याने हातातल्या काडीला अगोदर गच्च मिठी मारली तशी ती लाजून विझून गेली.
समई लावायची तर खिडक्‍या बंद केल्या पाहिजेत म्हणून तो उठला. त्याने खिडक्‍यांची दारे लावून घेतली. त्यावरचे पडदे लावून घेतले. बाहेर पाऊस कोसळायला लागला होता. धबाबा... हा कोसळणारा पाऊस मृगाचा नव्हता. वळीवाचा, आवेगाने आलेला... वाजत गाजत... वळीवाच्या पावसाला जितकी आतुरता असते तितकी मृगाच्या पावसाला नसते, असं त्याला पुर्वी वाटायचं. जणू तो प्रियकरासारखाच असतो, अगदी उत्कट... असं त्याचं ठाम मत होतं. आता छतावर टपोरे थेंब वाजू लागले होते. पावसाच्या आवेशात आता त्याचं अवघं घर आलं होतं. त्याला ते कोरडं हवं होतं... या मुरदाड पावसाने आपल्याला न सांगता आपल्या घराचा असा ताबा घेतल्याचा त्याला राग येऊ लागला होता.
कधी काळी त्याला वळीवाचा पाऊस प्रचंड आवडायचा. कधीही मग रात्री-अपरात्रीही पाऊस पडायला लागला की तो बाईक काढायचा आणि पावसात मनसोक्‍त भिजून घरी परतायचा. पाऊस मनात साठवून घ्यायचा. त्याच्याइतकी वळीवाच्या पावसाची कोणीच वाट बघितली नसेल... पहिला पाऊस अंगावर झेलण्यासाठी तो कुठलीही किंमत द्यायचा. एकदा ऑफीसची कसली तरी महत्त्वाची मिटींग सुरू होती. बाहेर ढगांनी गच्च दाटी केली होती. तो त्या मिटिंगरुममध्ये अस्वस्थपणे बसून राहिला होता. आता कुठल्याही क्षणी पाऊस पडायला सुरवात होईल, आणि इथली मिटींग तशीच सुरू राहिली तर.. या विचाराने तो अस्वस्थ होत होता.. बाहेर हलके हलके थेंब पडायला सुरवात झाले आणि त्याने मिटींगमध्ये स्पष्ट सांगितले, "" मला पावसात भिजायचे आहे. हा या वर्षीचा पहिला पाऊस आहे. आता पुन्हा पहिल्या पावसात भिजायला पुढच्या वर्षीशिवाय पर्याय नाही.'' गंमत म्हणजे त्या मिटींगला आलेल्या अनेकांनाही त्याचा हा पाऊसवेडेपणा आवडला आणि मिटींग भर पावसातच झाली. त्या मिटींगनंतर त्याला प्रमोशन मिळत गेली आणि मग त्याच्या आणि भिजण्याच्या आड कधी नोकरी आली नाही. पहिल्या पावसात मग तो भिजत राहायचा. कपड्यांसकट. ते कपडे मग अंगावरच वाळवायचा... पावसाच्या थेंबामुळे पडलेले डाग मग मिरवत राहायचा.. त्या डागांतून अत्तराचा वास येतो असं काही-बाही सांगत राहायचा. मग कधी-कधी उन्हाळा कडक वाटू लागला की तोच शर्ट घालून तो त्या पावसाच्या आठवणींत रमून जायचा. लोक त्याच्या माघारी मूर्ख, भावूक, मोठे पद मिळाले म्हणून असली थेरे सुचतात, असं म्हणायचे पण त्याकडे तो लक्ष द्यायचा नाही. त्या भिजून वाळलेल्या शर्टाचा त्याला अभिमान वाटायचा. दरवर्षीचे असे पहिल्या पावसात भिजलेले शर्ट त्याच्या कपाटात नांदत राहायचे. अलीकडे मात्र तो या पहिल्या पावसालाच घाबरायचा. काय कोण जाणे पण त्याला हा वळीवाचा पाऊस आवडायचा नाही.

ती शेवटची भेटली त्यालाही आता दहा वर्षे झाली. तिने नकार तर त्याअगोदर दहा वर्षांपुर्वी दिला होता. पण तरीही त्या दिवशी ती एवढंच म्हणाली होती...
तुला पहिला पाऊस आवडतो ना? त्याचा आवेग, त्याची आतुरता.. त्याचं निरपेक्ष अस्तीत्व.. त्याला ना धरतीवर काही पिकवायचे नसते ना नदी नाल्यांच्या प्रवाहात स्वतःला अडकवून घ्यायचे असते. त्याला फक्‍त समाधान द्यायचे असते, असं तू मानायचास ना?...
हो! एवढंच तो म्हणाला..
खरे तर तिला पाऊस नावडायचा नाही पण पावसावर तिने बोलावे इतका काही पाऊस तिला आवडत नव्हता खचितच.
पण तरीही त्याने आडवले नाही. तिला बोलू दिले.
...तूही वळीवाच्या पावसासारखाच रे. जगण्याची मजा एकाच गोष्टीतून अनुभवणारा. माझ्यावर वळीवाच्या उत्कटतेने प्रेम करणारा आणि नकारानंतर पुन्हा न परतणारा.. मला तू आषाढातल्या पावसासारखा हवा होतास. अनुराग करणारा... हक्‍काने पडणारा... आपल्या अस्तीत्वाने सगळं रान हिरवंगार करणारा... नद्या-नाल्यांतून ओसंडून वाहणारा... पण ती मजा तुला नाही कळली किंवा तू समजावून नाही घेतलीस... तु तुझ्याच मापाने सगळं मोजलंस... ती एवढंच म्हणाली आणि निघून गेली. कितीतरी दिवस त्याला तिच्या त्या शब्दांचे अर्थच समजले नाहीत. काही तरी बडबडायचे म्हणून ती बडबडली असेच वाटून तो आपल्या कामाला लागला... पण तिचे शब्द त्याच्या मेंदूत घर करुन राहिले होते.
चार वर्षांपुर्वी असाच तो खिडकीतून बाहेर बघत होता... बाहेर आषाढातला पाऊस कोसळत होता.. अखंडपणे... पण त्यात जोर-जबरदस्ती नव्हती... गवताच्या कोवळ्या पानालाही स्पर्श करताना त्याला काही यातना तर होत नाहीत याचीच जणू काळजी घेत असल्यासारखा. त्या दिवशी त्याला कळले.. ती काय म्हणाली ते... पण वेळ निघून गेली होती..
त्याने बाहेर बघितले... वळीवाचा पाऊस नेहमीप्रमाणे कोसळला आणि आता ओसरुनही गेला होता... त्याने पुन्हा काडेपेटीतील काडी पेटविली. समईच्या वातीने काजळी धरली होती. ही काजळी त्याला आज तरी काढता येणार नव्हती... समई आज पेटणार नव्हतीच..!


*** "सकाळ'च्या स्मार्टसोबतीमध्ये 7 जूनला प्रसिद्ध झालेली माझी लघुकथा 

शनिवार, २८ एप्रिल, २०१२

सुटी

किक्रेट खेळणाऱ्या त्या मुलांकडे तो एकटक बघत होता. कोणी चेंडू टाकत होता, कोणी बॅटने तो फटकावत होता. ती दहा बारा पोरं आपल्या खेळात रंगून गेली होती. ते. हातातील बोचकं सावरत ते सात-आठ वर्षांचं पोरगं त्या खेळणाऱ्या पोरांकडे बघत होतं. त्यांच्यात दंगा चालू होता. भांडणं होत होती.. जिंकणं-हरणं चालू होत. एकमेकांच्या उरावर बसणं चालू होतं. ते पोरगं आपल्या बोचक्‍याला सावरत शेजारच्याच गडग्यावर बसलं. हलकेच त्याने बोचकं बाजुला ठेवलं. ते ठेवताना त्यातली एक फाटकी-तुटकी बाहुली खाली पडली. मघाशी कचराकुंडी चाचपताना सापडलेली ती कापडी बाहुली त्याने हलकेच त्या बोचक्‍यात कोंबली होती.
गोट्या...
आईच्या चौथ्या हाकेनंतर त्या क्रिकेट खेळणाऱ्यापैकी बॅट घेतलेला मुलगा थोडा चलबिचल झाला. त्याने तरीही डाव तसाच चालू ठेवला. बोचकं सांभळणाऱ्या त्या पोरानं हाकेच्या दिशेकडे बघितलं. मग त्या पोरांकडे बघत राहिलं. त्या पोराची आई त्याला पुन्हा-पुन्हा हाक मारत होती. आणि ते मात्र आपल्या खेळांत गुंगून गेलं होतं. पोरांचा गोंधळ उडाला होता. चिडा-चिडी दंगामस्ती सुरु होती. कोणी त्यांना हाक मारते आहे याकडे त्यांचं लक्षच नव्हते. एवढ्यात त्या बॅट धरलेल्या पोरानं चेंडू टोलावला तो त्या बोचकं घेतलेल्या पोराच्या पायाशी आला. त्याला तो चेंडू आवडला. तो चेंडू उचलण्यासाठी ते खाली वाकलं पण इतक्‍यात दुसरं एक पोरगं तिथं आलं त्याने तो चेंडू उचलला आणि जोरात फेकला.
त्या पोरांत जावं, तो चेंडू हातात घ्यावा, बॅट घुमवावी.. असं त्या बोचकं घेतलेल्या पोराला वाटलं पण त्याने तो विचार सोडून दिला. त्या पोरांइतके चांगले कपडे त्याच्याकडं नव्हते, दिवसभर उन्हात काम केल्यानं अंग सगळं घामेजून गेलं होतं. त्यातच कचऱ्यात शोधा-शोध करुन त्याची सगळी घाण अंगाला लागली होती. अंग मळलं होतं, कपडे मळके होते. त्या पोरांच्या तुलनेत तो खूपच घाणेरडा दिसत होता. त्यालाच त्याची लाज वाटत होती. त्या टकटकीत मुलांत कसं जायचं? म्हणून मग ते गप्पच बसलं.
पुन्हा त्या मुलाच्या आईची हाक ऐकू आली.. तरी ते पोर खेळत राहिलं.. आईची हाक जवळ-जवळ येऊ लागली.. ती जशी जवळ येऊ लागली तशी पोरांची चलबिचल वाढली..
काकू आली रे, स्टंप, बॅट घेऊन पळा... एकाने जोरात आरोळी ठोकली, तशी सगळी पोरं पटपट गोळा झाली.. सगळ्या वस्तू पोरांनी गोळा केल्या आणि त्यांनी धुम ठोकली. बॅट घेतलेलं पोर मात्र शूर शिपायासारखं तिथेच टिकून राहिलं. त्या बोचकेवाल्या पोराला त्याचं आश्‍चर्य वाटलं..
आता त्याची आई त्याच्याजवळ आली होती. तिने त्याला हलकेच टपली मारली.
किती हाका मारायच्या रे, सुटी लागली म्हणून किती वेळ खेळायचे... त्याची आई त्याला दटावत होती.. ती माय-लेक बोलत बोलत त्याच्यासमोरुन गेली. समोरुन जाताना त्या पोराच्या आईने त्याच्याकडे बघितलं, मग त्याच्या बोचक्‍याकडे आणि म्हणाली, बघ तुझ्यापेक्षा किती लहान आहे, पण तरीही सुटीत बघ कसा आईला मदत करतो ते. आता तुही सुटीत काम कर. ती माय-लेक अंधारात निघून गेली.
त्या पोराने बोचकं उचललं. घर जवळ करायला हवं होतं. घर कसलं, कालच तर त्या माळावर त्याच्या आई-बाबांनी पालं टाकलं होतं. हे गाव अजून नवं होतं. कळायला लागल्यापासून किती गावं बदलली हेही आता आठवेनासं झालं आहे. अंधारातच तो आपल्या पालांकडं वळला. पोटात भूक होतीच पण त्यापेक्षा मनात खूप विचार होते. त्या पोरांनी टोलवलेले चेंडू त्याच्या डोक्‍यात टप्पे खात होते. ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्या पोराची आई आणि ते पोरंग यांचं बोलणं त्याच्या मनात कोरुन गेलं होतं. पालांत शिरल्या शिरल्या त्यानं बोचक्‍यातील बाहुली काढली आणि आपल्या लहान बहिणीच्या हातात दिली. आई चुलीला लाकूड लावत होती. त्यानं ते बोचकं बाहेर ठेवलं आणि ते आईकडे गेलं.. आईकडे सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे असतात याची त्याला खात्री होती. त्यानं हलकेच आईच्या गळ्यात हात घातला, गालाला गाल लावला आणि विचारलं...
माये, सुटी म्हणजे काय गं?

प्रिय,

खूप दिवसांनी जुने कपाट आवरायला घेतले होते. वर्तमानपत्रातील काही कात्रणे, काही टिपण्या आणि पिवळे पडलेल्या पुष्कळश्‍या कागदांनी कपाट गच्च भरुन गेलं होतं. अर्धवट लिहिलेले.. रेघोट्या ओढलेले.. टाचण मारुन ठेवलेले....कोणी कथेच्या शेवटाच्या प्रतिक्षेत तर कोणी अगदीच एखादा शब्द लिहून ठेवून टाकल्यामुळे रुसलेले, तर काही पत्रे लिहून पूर्ण झालेली पण पत्त्याच्या शोधात... म्हटलं तर सगळा कचरा म्हटलं तर प्रत्येक कागद आणि कागद एक-एक जाणिव.. एक-एक भावना.. एकाच कपाटात कोंबून ठेवलेल्या.. काही दडवलेल्या... काही कागदांच्या ओझ्यामुळे दडपून गेलेल्या... मुक्‍या आणि बहिऱ्याही...खरे तर त्या मुक्‍या होत्या म्हणूनच तर त्या एकत्र राहात होत्या. एकमेकांच्या उरावर पडलेले काही पिवळे कागद मात्र आपल्याच भावविश्‍वात रमलेले होते. अंगाला माती लागल्यावर पैलवान कसे छाती काढून चालतात, तसेच अंगावरची धूळ अभिमानाने मिरवत होते. मी ती हलक्‍या हाताने झटकल्यावर उगाचच त्यांना राग आला की काय असे वाटून गेले. त्यातच एका कोपऱ्यात एक कागद सगळ्यांपेक्षा वेगळा होता. कोरा.. हा पण पिवळा पडला नव्हता. मी सहज तो उचलला... चटकन तो थरथरला असे वाटून गेलं. सगळ्या पिवळ्या कागदांत हा पांढरा शुभ्र कागद कुठून आला हे मलाही कळले नाही. कागद आणि पेन गोळा करण्याची मला तशी हौस आहेच, पण हा त्याखातर हा कागद नक्‍कीच आणला नव्हता. कारण तसे असते तर त्याच्यासारखे आणखी काही कागद तिथे असायला हवे होते. एकटाच.. त्याचा उजवा कोपरा थोडासा मुडपला होता.. तो मुडपलेला कोपरा मी हलकेच सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण वळल्याची खूण घट्‌ट उमटली होती. त्यावर तारीख 20 फेब्रुवारी असं लिहिलं होतं. आणि मग काहीच लिहिणं झालं नव्हतं.
20 फेब्रुवारी...तुला पत्र लिहायला घेतलं होतं. त्यासाठीच हा खास कागद आणला होता. पत्र लिहायचे ही कल्पनाच खूप मजेशीर आणि धाडसाची वाटत होती. अगदी उत्साहाने पत्र लिहायचा घाट घातला होता. त्यासाठी हा खास कागद आणला होता. त्याचे पाकिटही तितकेच खास आणले होते.अगदी चित्रपटात दाखवतात ना तसेच गुलाबी रंगाचे.. इथेच कपाटात कुठेतरी नक्‍की असेल. ते पाकिट मिळविण्यासाठी किती दुकाने फिरलो होतो देव जाणे. सायकल मारुन मारुन पाय थकले होते. त्यावर गुलाबाचे एक फुल चितारले होते. मस्त टपोरे फूल होते ते. तो कागद हातात घेतला आणि विचारांच्या माळेत दोरा ओवला गेला बघ.
किती दिवस.. किती वर्षे सरली तरी त्या कागदाचा शुभ्रपणा तसाच होता. अगदी पांढऱ्या ढगांसारखा. तो काळवंडला नाही की पिवळा पडला नाही. काळाच्या खुणा त्याच्या अंगावर जराही दिसत नाहीत, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमासारखं. काळाचा कधीच त्यावर परिणाम झाला नाही. अगदी व्हावा, अशी इच्छा बाळगुनही. खरेच हे पत्र पहिलं प्रेमपत्र होतं. अगदी कोरं. निखळ, निरपेक्ष आणि सर्वात महत्त्वाचं खूपच निरागस. खरं बोलणारं. आपल्या भावना न दडविणारे, त्याला कसलाच मुलामा न लावलेलं. तुझ्या डोळ्यांसारखं. तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझे डोळे बोलतातच, मी तुला कधी सांगितलं नाही. पण तुझे डोळे खूप बोलतात खूप..खूप.. आनंद झाला की किलकीले हसतात. रागावले की कोरडे पडतातत.. वेदना पापण्यांच्याच्या आड लपवतात.. आज या कागदाने पुन्हा डोळ्यांची आठवण करुन दिली. पापण्या.. कोरिव भूवया.. भूवयांमध्ये लावलेली टिकली.. कधी साधी..कधी चंद्रकोरीसारखी.. किती आठवणी आल्या दाटून.. आज हे पत्र त्याच कागदावर लिहितोय. पण बघ ना. मघाशी प्रिय शब्द लिहिताना त्यातील य चा पाय थोडा लांबलाच. शाई थोडी जास्तच खाली ओघळली.. हा कागद तसाच कोरा ठेवायला हवा होता. जरा माझं जास्तीच झालं.
तुझाच 

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

प्रिय,


खूप दिवसांनी पत्र लिहितोय. कशी आहेस? आठवण येत नव्हती, असे नाही आणि पत्र लिहायला घेतले नाही, असेही नाही, पण लिहिता मात्र आलं नाही हे खरं. तुम्ही शब्दांना कितीही चांगले मित्र माना पण, ते ऐनवेळी तुम्हाला मदत करतीलच असे नाही. खाऊसाठी भर बाजारात हट्‌टाला पेटून मटकन बसणाऱ्या पोरट्यांसारखे कधी ते भोकाड पसरून वाटेतच बसतील याचा नेम नाही; मग कितीही मिनत्या करा, ते ऐकायचे नाहीत, मग त्यांना झटका द्यावाच लागतो. त्या पोराला जशी चापट द्यावी लागते, अगदी तशीच चापट शब्दांना वेळेची द्यावी लागते, मग शब्द वठणीवर येतात. सांगितलेल्या वाक्‍यांच्या मार्गावरुन मग सरळ चालतात. आता हेच बघ ना! मागचे पत्र लिहून आता जवळपास वीस-पंचवीस दिवस होऊन गेले. या दिवसांत कितीतरी वेळा पेनाचे टोक कागदावर टेकवले; पण शब्द काही उमटले नाहीत. सांगायचे उरले नाही, असेही नाही, पण ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी शब्दांची वस्त्रे घालायलाच तयार नव्हत्या. मग कितीतरी वेळा कागदावर रेघोट्या ओढून रात्र काढली. आता आजही सांगायचे खूप आहे. खूप लिहायचे आहे, पण तरीही हट्‌टी शब्द अडून बसलेतच की, आता एवढे गोंजारल्यावर ते नक्‍कीच शांत होतील असं वाटतं...
"तुला बोलायचं असतं एक आणि तू बोलतोस तिसरंच' हा तुझा आरोप मान्यच आहे. आजही बघ मला लिहायचे आहे एक आणि लिहितोय दुसरंच.
तुझी खूप आठवण येत आहे. खूप वाटतं... अगदी आता तुला समोर बसवावं आणि तुझ्या डोळ्यात डोळे घालून रात्रभर त्यात डुंबत राहावं.. हलकेच तुझ्या केसांतून हात फिरवावा...कोणीच बोलू नये... ना तू, ना मी....निःशब्दांतून शब्द उमटत राहावे आणि ते फक्‍त तुला आणि मलाच कळावे..... तुला आठवतं मी तुला काळी म्हटलेलं... आम्ही काही काळे नाही, गहू वर्णीय असं तुझं म्हणणं. ठिकच होतं, पण तरीही तुला चिडवायला मी काळीच म्हटलं होतं.. खरं तर काळी का म्हटलं होतं माहिती आहे तुला... काळा रंग सगळं पोटात घेतो.. क्षमा करण्याचा गुण काळ्या रंगात जितका आहे तितका कुणाच्यातच नाही. आणि जो या रंगाशी सलगी करतो तो या रंगासारखाच होऊन जातो.. म्हणून तू काळीच. आपल्या रंगात रमणारी.. आपल्या रंगाशी एकरुप असलेली...तुझा काळा रंग गडदतेतून आलेला... सगळे गडद रंग एकत्र करुन ते तुझ्यात भरले आहेत आणि ते इतके एकजीव आहेत की त्यामुळे तू काळी भासते आहेस... हा काळा रंग डोळ्यांत साठवून घ्यायचा आहे... अगदी काजळ घातल्यासारखा... मग दुसऱ्या दिवशी ऑफीसात कितीही लोकं कुजबुजू देत की अरे हा काजळ घालून आला की काय? एक दिवस वेडा होण्यातही मजा असते नाही का? नाही तरी तू मला वेडा म्हणतेसच की, कधी कधी...
तुझाच 

रविवार, १५ एप्रिल, २०१२

एक सांज अनुभवायलाच हवी

जगण्याचे संदर्भ बदललेत... एक एक मिनिट महत्त्वाचा ठरू लागलाय... कामं तर पाचवीला पुजल्यासारखीच मागं लागली आहेत... हात रिकामे म्हणून रिकामा वेळ म्हणायचा, तर तोही रिकामा कुठे आहे? मेंदूत तणाव निर्माण करणाऱ्या पेशी कॅन्सरसारख्या वाढत असतातच की! त्या स्वस्थ कुठे बसू देतात... मग एक दिवस सरतो... आठवडे सरतात... महिने, वर्षेही कधी सरून गेली हेच कळत नाही... मागे वळून बघितले तर पाऊलखुणाही दिसत नाहीत... खरं आहे ना!
जरा बाहेर पडून बघा... चैत्र फुललाय... झाडांची हिरवी-पोपटी पालवी सूर्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत आहे... कधी पावसाळ्यात पाऊस आला म्हणून ज्या झाडाखाली थांबलो होतो, त्या झाडांना आता तांबड्या-पिवळ्या फुलांचे गुच्छ लगडलेले आहेत... तापलेले रस्ते मुजोर वाटताहेत खरे, पण ती मुजोरी नाही... नाराजी आहे. संध्याकाळी भरून वाहणाऱ्या रस्त्यांवर दुपारी कोणीच नसते याची... आणि नेहमी पश्‍चिमेच्याच दिशेकडून येणारे ढग आता कुठल्याही दिशेने येत आहेत. आभाळ काळ्या-निळ्या ढगांनी गच्च होत आहे... दिवसभर तापलेल्या धरित्रीवर जणू छत घालावे म्हणून ढग दाटीवाटीने बसलेले असतात... मग हलकेच टप टप करत टपोरे थेंब पडताहेत... कधी कधी गाराही पडताहेत... पण हे अनुभवायला थोडं बाहेर पडायला हवं. एक संध्याकाळ एकटेच रस्त्यावर येऊन फिरायला हवं... किमान खिडक्‍यांची दारे पडद्यातून मुक्‍त करायला हवीत.
चैत्र-वैशाखातला पाऊस हा श्रावणातल्या पावसापेक्षा वेगळा... त्याचा आवेग वेगळा... त्याची गती वेगळी... तो येणार याची खात्री नसते आणि जाताना काय नेईल याचा नेम नसतो; म्हणूनच तर तो कधी काय होईल हे सांगता न येण्यासारख्या आयुष्यासारखा असतो.. "अनप्रेडिक्‍टेबल'. तो येतानाही आवाज करत येणार आणि गेल्यानंतरही आपल्या खुणा मागे ठेवणार... ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखखाट होतोय, ढग गच्च दाटून आलेत म्हणून तुम्ही घरातून बाहेर पडलाच नाहीत तर त्या दिवशी पाऊस यायचाच नाही आणि आज पाऊस नाही येणार म्हणून तुम्ही बाहेर पडावे आणि त्यावेळी हृदयाचा ठोका चुकविण्यासारखी सर्रकन वीज चमकावी आणि धबाबा पाऊस कोसळावा... खरी मजा इथे आहे... या पावसात एकदा भिजलं की मग अख्खा चैत्र-वैशाख कितीही आग ओकत राहिला तरी त्याचा राग येत नाही... चैत्रातील एक संध्याकाळ खरंच अनुभवायला हवी... अगदी पावसाच्या गच्च मिठीत शिरताना अंगावरचा "ब्रॅंडेड' ड्रेस भिजतोय, याची काळजी सोडायला हवी. चिखल बूट, सॅंडलला जरा लागलाच पाहिजे... डोक्‍यावरून ओघळणारे थेंब नाकाच्या शेंड्यावरून अलगद तोंडात घेताना जी मजा आहे ती पंधरा-वीस रुपयांच्या मिनरल वॉटरमध्ये नक्‍कीच नाही. पाकिटातील नोटांना तसेच भिजू द्यावे. बघा या महिन्यात एक संध्याकाळ अशी जगता येते का? संध्याकाळचा बाहेर पडणारा पाऊस मनात साठवता येतो का?... खरंच एक सांज अनुभवायलाच हवी!


** 14 एप्रिललच्या "सकाळ' मध्ये छापून आलेला माझा लेख....**

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

भातुकली...

भातुकली...

त्याने तिला टपली मारली आणि तो आत गेला. बंगल्याच्या दारातच तिने आपला भातु कलीचा खे ळ मांडला होता. गोबऱ्या गालाची, कुरळ्या केसांची, ती चार-पाच वर्षांची मुलगी आपल्या बाहुलीला न्हाऊ-माखू घालत होती.
आत गेला तसा तो सैल झाला. सोफ्यावर अंग टाकून तो पडून राहिला. तू कधी आलास... घराची ती मालकीन असावी. अठ्‌ठेचाळीस-पन्नास वर्षांची असेल. काळ्या रंगाआड केसांचे वय लपविले असले तरी गालावर रुळणाऱ्या काही बटा चहाडी करतच होत्या. चेहऱ्यावर सुरकुत्यांनी खेळ मांडायची तयारी सुरू केली होती. गडद लालीने ओठांची कमान उगाच रुंद केल्याचे वाटत होते. त्याने तिच्याकडे बघितले आणि जोराचा सुस्कारा टाकला.
""बाहुलीला अंघोळ घालणं चालू होतं त्यावेळी आलो.आता ती जेवून झोपी पण गेली असेल. हा हा हा..''
त्याचा हा स्वभाव तिला माहीत होता. कोणत्याही गोष्टीकडे तो नेहमीच विनोदाच्या अंगाने बघायचा आणि मग स्वतःच मोठ-मोठ्याने हसायचा.. त्याच्या बोलण्यातला रोख तिला कळला. पण तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं.
""चहा-कॉफी काय हवं''
तिचा साधा प्रश्‍न.
""काही नको. बघायला आलो होतो...''
त्याने सरळ मुद्द्याला हात घातला.
""बघितलंस ना मग कशी वाटली.''
तिने सहज राहण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्नच.
""छान आहे. सगळीच मुलं छान दिसतात. त्यात ही पण छान आहे. मला तिचा राग नाहीच..''
""जाऊ दे ना जयंता..'' तिने विषय टाळायचा प्रयत्न केला.
""जाऊ दे तर जाऊ दे... पण तरीही मला काही प्रश्‍नांची उत्तरं नाही मिळाली.
म्हणून आलो इथे..''
""मला तुझ्या काही प्रश्‍नांची उत्तरे द्यायची नाहीत.'' तिने स्पष्टपणे उत्तर देण्याचे टाळले..
"पण..'
"पण नाही आणि बिन नाही. जयंता आपलं काय ठरलं होतं. आपण एकमेकांच्या आयुष्यात डोकावायचे नाही.. मग तुझे हे प्रश्‍न का'
""का?''
जयंताने चेहरा त्रासिक करत प्रश्‍न विचारला.
""कारण ती माझं नाव लावणार आहे. आपला अजून घटस्फोट झालेला नाही, म्हणून.''
"हो! मग नाही लावणार ती तुझं नावं. तुझं नाव तिला लावण्यात मला स्वारस्य नाही.''
तिने तोडायचं म्हणून सांगून टाकलं.
""प्रश्‍न नावाचा नाही.. हे तुलाही माहीत आहे.''
जयंताने जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न केला. तू उद्या आणखी दहा मुलं आणलीस आणि त्यांनी माझं नाव लावलं तरी मला हरकत नाही, हे तुलाही माहीत आहे. मला त्या मुलीविषयीही राग नाही.. पण हेच जर करायचं होतंतर मग...'
""मग काय''
"मग जणू तुला माहीतच नाही..''
जयंताने प्रश्‍न विचारायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण तिने चेहरा बाजूला केला.
मघाशी भातुकली खेळणारी ती मुलगी आत आली. तिने डाव्या हातात बाहुली घट्‌ ट धरली होती. डोळ्यात करुणेशिवाय दुसरा भाव नव्हता. गालांवर उदासतेचे ढग दाटीवाटीने बसले होते. त्या मुलीने एकदा तिच्याकडे आणि एकदा जयंताकडे बघितले. मग तिने हलकेच हातातील बाहुली समोरच्या टेबलवर ठेवली आणि तिच्यापाशी आली. जयंता बघत होता. तिला न्याहाळत होता. तिने एकदा तिच्याकडे बघितले आणि नंतर जयंताकडे बघितले. मग हलकेच तिने जयंताच्या पायाला हात लावला आणि मग तिच्या पायाला.... जयंताला कळले नाही. काय होतंय ते.. तिने ती बाहुली उचलली आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. जयंता तिच्या पाठमोऱ्या बाल मूर्तीकडे बघत राहिला.
"जयंता... मला वाटतं तुझ्या प्रश्‍नांची उत्तरं तुला मिळाली असतील..'
तिच्या या वाक्‍याने तो प्रचंड अस्वस्थ बनला. त्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला होता. कोणीतरी त्याचा गळा आवळतोय असं वाटत होतं. तो तिच्याकडे बघत होता आणि स्वतःला शिव्या घालत होता. त्या क्षणी त्या घरात राहणं म्हणजे नरक वाटून तो ताडकन्‌ बाहेर पडला. दरवाजातून बाहेर येताना त्याचा पाय एका खेळण्याला लागला. चटकन त्याचं मन हललं. त्याने ते खेळणं उचललं. त्याला त्या मुलीची नजर आठवली आणि मग तिची. आयुष्यात एवढा मोठा भातुकलीचा खेळ त्याने बघितला नव्हता. जिवंत खेळण्यांनी खेळणाऱ्या तिच्या भातुकलीच्या खेळाचे तो एक खेळणे केव्हांच होऊन गेला होता. आता त्यात आणखी एका खेळण्याची भर पडली होती..
**पाडवा सृजनमध्ये प्रसिध्द झालेली माझी लघुकथा**


सोमवार, २६ मार्च, २०१२

प्रिय,

एवढा हतबल मी कधीच नव्हतो. जगण्याला आव्हान मानणारा मी आता त्याच्या हातातील कठपुतळी बनून गेलोय, असं वाटतं. तुझा नकार, तुझा होकार, तुझ्या नसण्यातील असणं आणि आता तुझ्या असण्यातील नसणं सगळंच असह्य होत आहे.... तू नव्हतीच तेव्हाची ती अपुरेपणाची भावनाही आपली वाटायची. आता मात्र ती अपुरेपणाची भावनाही राहिली नाही.. आता तुटलेपण जाणवते...मला माहीत आहे हे तुटलेपण तुलाही जाणवत असेल. तुलाही त्याच्या वेदना होत असतीलच पण तरीही हे अपुरेपण आता अवघड होऊन गेले आहे. जगण्याच्या लढाईला काही जखमा आवश्‍यक असतातच... आज मी या जखमाही हरवून बसलो आहे.. तुझ्या असण्यातील नसलेपण मला आता पोखरुन टाकेल... केवळ पोखरनार नाही तर तो मलाच खाऊन टाकेल की काय असे वाटू लागले आहे. बाहेर चैत्र फुलतोय आणि इथे मनात माझ्या पानगळती सुरू आहे.. विचित्रच सगळं... कधी कधी मला या कोवळ्या पानांचा हेवा वाटतो...सूर्य निर्दयीपणे आग ओकत असताना ही झाडांची कोवळी पालवी आपल्या एवढुशा छातीवर ती सूर्याचे अग्नीबाण कसे झेलतात.. याचे कौतुक वाटते...तू दुर्गा भागवतांचे ऋतुचक्र वाचलं असशीलच ना? त्यांनी सगळे ऋतु मांडलेत. पण बाईंही काही ऋतुंबाबत अज्ञानीच होत्या. नाही! एकटेपणा त्यांनीही अनुभवलाच पण तरीही एकटेपणा आणि नसलेपणा या दोन गोष्टी वेगळ्याच असतात ना? तुझं असून नसणं हे सगळ्यात वाईट... हाक पोचतेय पण हाक मारता येत नाही आणि तुलाही मागे वळून बघायचे आहे आणि बघता येत नाही... ही अवस्था दोघांचीही...एक दडपण आले आहे...वेदना कुरवाळण्यात काही अर्थ नसतो हे तुझं सांगणं मला मान्य आहे पण ते मनापर्यंत पोचत नाही.... हा चैत्र संपेल आणि वैशाख येईल आणि तो कायम राहील... कदाचित त्या वैशाखात कुठून तरी तू पुन्हा भरुन येशील.. ढगांसारखी... नाही तरी तुझा रंग ढगांसारखाच की... सावळा... देणारा.. आणि बरसून जाशील... काही काळ पुन्हा चैतन्य पसरले आणि मग पुन्हा आजच्यासारखा दाह....बरसून रिकामे होणे तुला जमते...मला नाही जमत... मला भरुन घेण्याची सवय लागली आहे.. आणि मग तो भरलेपणा सहन करत जगायचे... मोकळे नाही होता येत मला... मला तो शाप आहे.. तू बोलतानाही नुसताच ऐकायचो मी. तुझा हुंकार... तुझा दोन शब्दांमधला चड-उतार...काही शब्दांवर तू देत असलेला भर आणि मग प्रत्येक गोष्ट अगदी पहिल्यापासून शेवटापर्यंत सांगताना त्याचे तू केलेले विस्तारीकरण... प्रत्येक प्रसंग एक एक पायरीनेच सांगण्याची हातोटी.. मला नाहीच कधी जमली... मला जमले ते तुझे तूपण साठवण्यात...तुझी प्रत्येक गोष्ट साठवून ठेवण्यात... तो मिळणार नाही कधी.. ही जाणिव जीतकी घट्‌ट होत गेली तितकेच मी या साठवण्याकडेच जास्त लक्ष दिले... मला सांगायचेच बरेच काही राहून गेले.... हे साठवलेपण आता माझ्याबरोबरच जाईल... ज्या दिवशी अचानक तुझ्या हातातून एखादे भांडे पडून फुटेल, त्या दिवशी समज एक श्‍वास कायमचा थांबला..

तुझाच 

मंगळवार, १३ मार्च, २०१२

बांगड्या....

तिने कपाटातून पुन्हा बांगड्या काढल्या... त्या बांगड्या तिने डोळे भरून बघितल्या आणि फडताळात कोंबून ठेवल्या. जोरात दार लावले, लाकडी कपाटाचे ते दार पावसाळी हवामानामुळे फुगले होते. त्याचे दरवाजे घट्ट बसत नव्हते. तरी ताकदीने दोन्ही दरवाजे तिने लावले आणि त्याच्या कोयंड्याला कुलूप लावले. काही क्षण ती तिथेच बसून राहिली. मग कसल्या तरी आठवाने उठली आणि आवेगातच तिने घर सोडले. या बांगड्यांबद्दल वहिनींना सांगायलाच हवे. त्यांना किती आनंद होईल. त्यांनी प्रत्येकवेळी मदत केली. तिच्या डोक्‍यात विचार येत होते.. ती लगबगीने चालत होती... जणू पळतच होती... बंगल्याच्या दारात आल्यावर तिने दीर्घ श्‍वास घेतला. चेहऱ्यावरचा आनंद जितका लपवता येईल तितका लपवला आणि तिने बंगल्याची बेल वाजवली... वहिनींनीच दार उघडले... एवढ्या सक्‍काळी - सकाळी कशी ही म्हणून त्यांना आश्‍चर्य वाटले, पण त्यांनी ते चेहऱ्यावर आणू दिले नाही. ती आत गेली...
अगं, अजून भांडी नाही पडलीत... थोडा वेळ थांब... चहा घेणार का? वहिनी बोलत बोलत आत गेल्या... ती गप्प बसून राहिली... थोडा वेळ तसाच गेला. धीटाई करून आत जावे आणि वहिनींना सांगावे, असे तिला वाटले; पण आपलेच सुख आपण कसे सांगायचे म्हणून ती गप्प बसली... तिला सुख कुठल्या शब्दात व्यक्‍त करतात हेच माहीत नव्हतं...
वहिनी थोड्या वेळाने बाहेर आल्या... तशी ती पुढे झाली. तिचे डबडबलेले डोळे आता कोणत्याही क्षणी पाझरू लागतील अशी स्थिती होती... पण ती बोलली नाही. वहिनी काहीबाही सांगत राहिल्या... तिच्या कानावर ते शब्द पडत राहिले; पण डोक्‍यात काही गेले नाहीत.
भांड्यांचा ढीग बघून तिने पदर खोचला आणि ती कामाला लागली... एक-एक भांडे घासता-घासता तिच्या डोळ्यांतून अश्रूंची माळ वाहत होती. जणू कित्येक वर्षांपासून ती माळ तिच्या पापण्यांच्या आत तशीच होती आणि कुणीतरी हलकेच त्यातील धागा काढून टाकावा आणि एक एक मोती सरकत सरकत खाली यावा... अगदी तसेच... तिला काही क्षण ते अश्रू लपवावेत वाटले; पण तिने आज त्यांना आडवले नाही...
वहिनी कोणाला तरी सांगत होत्या... या आता भांडी घासताहेत. त्या खूपच सोशिक आहेत. नवरा लवकर गेला... यांनीच मुलाला वाढविले... धुणी-भांडी करून त्याला इंजिनिअर केले... सासूनं दिलेल्या दोन बांगड्या काय ते तिची मालमत्ता, ती पण तिने पोराच्या शिक्षणासाठी मोडून टाकली... पोरगंही हुशार निघालं... कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच त्याचे सिलेक्‍शन झाले... चार-पाच लाखांचे पॅकेज मिळाले; पण हिचे दुर्दैव काही संपले नाही. गेल्या चार महिन्यांपासून त्याने एक पत्र की फोन केला नाही. त्याला नोकरी लागली, त्यावेळी किती आनंदात होती ती. म्हणाली होती, ""वहिनी, पोरगं मिळवतं झालं... आता काय तुमच्याकडं येणं हुईल, असं वाटत नाही... पण माझ्या सासूनं दिलेल्या बांगड्या म्या मोडल्या. आता सुनंला चार बांगड्या घातल्या की माझं काम सपलं... त्यामुळे काही दिस तुमच्याकडं काम करायला लागंलच... ''
पोरगं एवढं मिळवतं झालं तरी हिचं काम काही सुटलं नाही बघा... सुनेला सोन्याच्या बांगड्या घालेपर्यंत हिचे हात तेवढे मजबूत राहू दे एवढीच प्रार्थना... एवढं कष्ट करून हिने पोराला वाढविलं... चांगला इंजिनिअर केला... पण आता त्याला आईची लाज वाटत असणार. त्यामुळेच फिरकला नाही. आला नाही तर नाही, पण चार पैसे तरी पाठवायचे... पण ते पण नाही... असली पोरं जन्माला येण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं... वहिनी ताड-ताड बोलत होत्या... वहिनी नेहमीच तिच्याविषयी मायेने बोलायच्या... पोरासाठी आपल्या पोराचा जुना सदरा हक्‍काने द्यायच्या... घरात काही चांगलं-चुंगलं केलं की पोरासाठी घेऊन जा म्हणून सांगायच्या... झेपेल तेवढी पैशाची पण मदत केली... पण वहिनींचे हे बोलणे तिला आज नाही आवडले... ती उठली आणि सरळ निघून गेली... वहिनींना काही समजले नाही...
दुसऱ्या दिवशीही ती वेळेअगोदरच आली... वहिनींना काही कळेना...
""अगं, तू जादा काम लावून घेतले आहेस की काय? तुझी तब्येत बघ किती तोळा-मासा झाली आहे. अशी जर तू काम करायला लागलीस तर आजारी पडशील आणि इथे तू आजारी पडलीस तर कोण आहे बघायला... तुझा तो पोरगा दीडशहाणा एकदा नोकरी लागली तो गेला तिकडेच... तू बसलीएस इथे सुनेला मी हे करणार - ते करणार करत. उद्या तो येईल बायकाबरोबर आणि सांगेल ही तुझी सून आणि हा तुझा नातू...'
वहिनी कळकळीने बोलत होत्या... ती गप्प बसली... काय करावे हेच तिला सुचत नव्हते... तिने तरी हिम्मत केली... कनवटीची चिठ्‌ठी काढली आणि वहिनींसमोर धरली... वहिनींनी चिठ्‌ठी वाचायला सुरवात केली..
प्रिय, आई
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. तू रागावली असशील. पण काय करू... मागे एकदा शेजारघरी फोन लावला होता, त्यांना तुला बोलवायला सांगितले होते... पण काकांनी फोनच असा उचलला की तू त्या घरात यावी असं वाटलंच नाही. मग फोन करायचे सोडून दिले. काका फोनवर बोलले पण तसेच दुसरेही... ते बोलत नाहीत म्हणून त्यांना गृहीत धरण्यात अर्थ नाही. तुला वाचता येत नाही. त्यामुळे पत्र तरी कसं लिहिणार... पण आज ऑफिसमधलाच एक सहकारी तिकडे येतोय असं कळल्यावर त्याच्याकडून दिलं हे पत्र. तो दाखवेल वाचून... सोबत चार सोन्याच्या बांगड्या पाठविल्यात. दुकानदार मला म्हणाला, अरे बांगड्या घेताय पण हाताचे माप आणले नाहीत... मला तुझी मूर्ती आठवली... तुझ्या हाताचे माप काय आणि कसे द्यायचे हेच कळेना... मग मी सरळ माझ्या हातांचे माप दिले... माहीत आहे मला, त्या तुला मोठ्या होतील. पण त्या तुला नक्‍की वर्षभरात येतील. आणि हो... सोबत मी काही पैसे पाठविले आहेत... मीही पुढच्या महिन्यात दहा-बारा दिवसांची सुटी घेऊन येतोय... रागावू नकोस...
तुझाच..

या चिठ्‌ठीबरोबर तिने त्या बांगड्या वहिनींच्या हाती दिल्या... वहिनींनी त्या बांगड्या बघितल्या आणि एवढेच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले... हा मुलगा स्वतःच्या पोटाला खातो की आईच्या हातांना स्वप्नात बघून जगतो कळत नाही... त्याच्या पगाराच्या मानाने त्या बांगड्या खूपच महाग होत्या...

.................................
****सकाळ स्मार्ट सोबतीमध्ये 8 मार्चला छापलेली माझी लघुकथा

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,

प्रिय,
रात्रीचे तीन वाजलेत. अंगभर कंटाळा आणि झोप दाटून आली आहे. पापण्यांना चहाचा टेकू आता देणे गरजेचे आहे. हा टेकूही फारकाळ टिकणार नाही, हे माहीत आहे; पण तरी तो द्यायला पाहिजे. आता जर असेच थांबलो, तर कोणत्याही क्षणी पापण्या खाली कोसळतील आणि त्या कोसळलेल्या पापण्यांचा आधार घेत मग एक-एक गात्र आपली हत्यारे टाकून देतील. जागे राहण्याची लढाई संपून जाईल आणि निद्रेची शांतता पसरेल. त्यामुळे चहाची आता आवश्‍यकता आहेच. प्रिंटिंग मशिनचा आवाज आता कानापर्यंत येऊ लागला आहे. धडधड करत एक एक पेपर बाहेर पडत असणार... वातावरणात माणसाच्या आवाजाचा लवलेशही नाही. मशिनची घरघर-घरघर आणि घरघरच ऐकू येत आहे. आणखी काही वेळ तरी जागे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅन्टीनचा दरवाजा खटखटवणे भाग आहे.

कॅन्टीनचा दरवाजा खटखटला तसा चहावाला पोऱ्या डोळे चोळत बाहेर आला. त्याने एकवार माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितले आणि पुन्हा डोळे चोळले. मी काही म्हणण्याआगोदरच तो आत गेला. स्टोव्ह त्याने पेटवला. त्या स्टोव्हचा आवाज आता त्या मशिनच्या आवाजात मिसळला आहे. जणू त्या दोघांची जुगलबंदी चालली होती. पण ही जुगलबंदी फारकाळ टिकणारी नाही. चहाला उकळी फुटेल आणि स्टोव्ह गप्प होऊन जाईल... अगदी तसेच झाले... पोऱ्याने चहा आणून दिला आणि बाहेरची लाईट बंद करून निघून गेला. अस्ताव्यस्त मांडलेल्या खुर्च्यांमध्ये मी, माझा चहा आणि सोबतीला होते काळेभोर आकाश, त्यात टिमटिमणारे तारे, हलक्‍या पावलांनी प्रवास करणारा वारा आणि झाडांच्या मुळाशी रात्रीचे काही किडे.. बस बाकी काहीच नव्हतं. मी सरळ वर आकाशात बघितले, टिमटिमणारे तारे जणू माझ्याकडेच बघत असल्याचा भास झाला. प्रत्येक तारा वेगळा. त्याची तऱ्हा वेगळी. कोणी लांबवरचे तर कोणी जवळचे. कोणी फटकून राहणारे तर कोणी उगाच सलगी दाखविणारे... तोंड लपविणारेही काही तारे, तर काही तारे उगाचच आपला तोरा मिरविणारे... सगळेच तारे वेगळे... निराळे... आठवणींसारखे... प्रत्येक आठवणींची खासियत वेगळी... काही आठवणी जुन्याच होऊ नये वाटतात, तर काही आठवणींपासून आपण दूर होऊ पाहतो... तरीही त्या टिमटिमत राहतात... आपल्या असण्याची जाणीव सतत करून देत राहतात..आणखी तास दोन तासांनी सूर्याची काही किरणे आवेगात सगळ्या आकाशभर पसरतील आणि हे टिमटिमणारे तारे हळुहळु लुप्त होतील. तरी काही चावट तारका त्यातूनही आपले अस्तित्व दाखवत राहतील. आठवणींसारखेच..... मग सरळ सूर्यबिंब वर येईल आणि त्यापुढे त्या तारकेची धीटाई अपुरी पडेल. त्याच्या त्या प्रखरतेपुढे मान तुकवत तिलाही विरळ व्हावेच लागेल.... मग प्रतीक्षा अंधाराची... सूर्य मावळण्याची... .. आयुष्याचेही असेच असते ना? प्रत्येक प्रहर वेगळा त्याच्या गरजा वेगळ्या आणि त्याने मागितलेल्या आहुत्या वेगळ्या... प्रत्येक आहुतीनंतरच कळते की ती किती मोठी होती.. ... आता हे विचारांचे रंग कागदावर तसेच उमटतील का? हा प्रश्‍नच आहे. पण तसेच उतरावेत यासाठी प्रयत्न करतोय.... बघू जमेल कदाचित.... आज एक काळी रात्र आठवणींची रुपेरी किनार लेवून गेली हे मात्र निश्‍चित!

तुझाच....

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

प्रिय, प्रिय

प्रिय,
पहिले पत्र लिहिताना लगेच दुसरे पत्र लिहिण्याचे वचन दिले तर होते पण ते काही पाळता आले नाही. काही तरी खटोटोप करुन चार ओळी लिहिण्याचा मनोदयही केला होता, पण तेही जमलं नाही. आयुष्य असंच असतं. सगळीच गणितं आपल्या म्हणण्यानुसार सुटत नाहीत, काही फासे नकळत जास्त पडतात, तर कधी कमी पडतात. गुणाकार करायला जाताना ज्यादा आलेल्या अंकाना वजाबाकीत टाकावे लागते तर कधी भागाकारच जमत नाही. एकूण बाकी शुन्य काही येत नाही आणि गणित काही सुटत नाही. मग एका आकड्यांनी गणित सुटलं नाही म्हणून दुसऱ्या आकड्यांशी खेळ मांडायचा. अगदी शेवटपर्यंत डोक्‍याच्या शिरा ताणायच्या... पण तरीही गणित काही सुटत नाही. प्रत्येक माणसासाठी वेगळं गणित असतं हेच खरं आणि ज्याचा-त्यानं त्या गणिताचा फॉर्म्यूला शोधणं गरजेचं असतं. कधी कोणाला हा फॉर्म्युला सापडतो तर कधी कोणाला हा सापडत नाही. पण जोपर्यंत हा फॉर्म्यूला सापडत नाही तोपर्यंतचा प्रवास चालूच ठेवावा लागतो. हा नाही तर तो, तो नाही तर तो असे रोज नवे फॉर्म्यूले शोधत त्यात आकडे मांडून बसावे लागते किंवा मग गणितच सोडून देऊन होईल ते होऊ द्या, ही भूमिका घ्यावी लागते. माझं गणित तसं कच्चच त्यामुळे असे काही फॉर्म्यूले शोधत मी काही बसत नाही. जे आकडे येतात त्यांना मी हाय म्हणतो, आणि सरळ बाजुला निघून जातो. अनेकवेळा मग असे हे सुटलेले आकडे रात्री, अपरात्री डोळ्यासमोर येऊन नाच करतात, फेर धरुन नाचू लागतात. दरदरुन घाम सुटतो आणि डोक्‍यातील पेंशीचा रक्‍तप्रवाह आणखी गरम करतात, त्यावेळीही त्या आकड्यांना पकडून त्यांना त्याच्या जाग्यावर बसवावं आणि एका झटक्‍यात गणित सोडवून टाकावं, असं वाटतं खरं पण गणित चुकण्याचीच भीती मनाचा इतका ताबा घेते की मग नकळत हातातून हे आकडे कसे सुटतात हेच कळत नाही. मग पुन्हा प्रवास सुरु होतो आकड्यांना टाळण्याचा, त्यांच्यापासून तोंड लपविण्याचा.... अरे, पत्र लिहिण्यास वेळ का लागला एवढयाचे कारण एवढं मोठं लिहिणं म्हणजे जास्तच आहे ना ! जाऊ देत... पण खरे सांगू पहिले पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्या पत्रात काय लिहायचे हेच कळेनासे झाले होते. कालच्या सगळ्या घटना आठवून बघितल्या. काय तुला सांगता येईल याची यादी करुन बघितली, पण तुला सांगण्यासारखं असं काहीच घडलं नाही. गाडी दोन वेळा पंक्‍चर झाली आणि बुटाची लेस सुटल्याने पडता-पडता वाचलो, या दोन घटना तशा तुला सांगण्यासारख्या होत्या, पण त्यातही गंम्मत अशी काही नव्हती. त्यामुळे काय सांगावे हा प्रश्‍न पडला... त्यामुळे पत्र दोन दिवस उशीरा लिहितोय... बाकी तुझं उत्तम चालंलं असेलच.....

तुझाच.... 

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१२

प्रिय,


खरे तर तिला खूप पत्रे लिहायची होती... पण धाडसच झालं नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास एक भीती होती.. तिला आवडलं नाही तर... आजही आहे पण आता तिला ही पत्रे धाडायचीच नाहीत... ती लिहायची आहेत फक्‍त माझ्यासाठी... खूप बोलायचं राहून गेलेलं बोलायचं आहे... म्हणून ही पत्रे... आता रोज एक पत्र लिहायचंच असं ठरवून ही पत्रे लिहिणार आहे. अगदी डेलीसोप सारखं... ती आहेत फक्‍त माझ्यासाठी आणि माझ्या मनातील तिच्यासाठी.... प्रेमपत्रात खरे तर एक अल्लडपणा असतो, अजाणतेपण असते. त्यातल्या भावना खऱ्या असतात आणि त्या दुसऱ्यांसाठी विनोदीही वाटू शकतात...

प्रिय,
खरं तर पहिल्याच पत्रात प्रिय लिहिताना हात अडखळतोय. पण तसंही काही हे पहिलं पत्र नाही. या पूर्वी एक पत्र लिहिलं होतं. त्यावर नावही नव्हतं. त्यावेळी तर नेमकं काय लिहावं हेच कळत नव्हतं. पण आता मात्र प्रिय लिहावं वाटू लागलं आहे. खरं तर प्रतिपासून प्रियपर्यंतचा प्रवास खूप अडखळणारा आणि मजेशीरही आहे. सगळेच मनाचे खेळ. पुढच्या माणसाला गृहीत धरुन चालणारे. आपल्याच नादात, विश्‍वात रमणारे. त्यामुळे यातील प्रिय शब्द तुझा कुठे आहे; तो माझा आणि केवळ माझा आहे. तुलाही मी प्रिय वाटलो पाहिजे, हा काही आग्रह नाही. (अपेक्षा मात्र आहेच) त्यामुळे तुला प्रिय आवडलं नसलं तरी ते तुझं नाही. त्यामुळे ते नावडण्याचा तुला अधिकारही नाही. त्यामुळे पुन्हा लिहितोच प्रिय....
पत्रास कारण की, खरेच पत्राला काही कारण आहे का? माहीत नाही. अगदी खरं सांगायचं झाल्यास कारण नाहीच..अकारण म्हण हवं तर. पण आपण मित्रांना, मैत्रिणींना फोन करतो त्या प्रत्येकवेळी कारण असतं का? नाही ना. अगदी तसंच. आपण मित्राला फोन करतो कारण, आपल्याला त्याला सांगायचं असतं की तुझी आठवण आली रे! अगदी तसंच तुझी आठवण आली, एवढंच कारण पुरेसं आहे. खरं तर तुझी आठवण कधी येतच नाही. फिल्मी डायलॉगप्रमाणे " मै तुम्हे भूलाही कहा हूू, की मुझे तुम्हारी याद आएं'. अगदी तसं काही नाही. खरेच असे काही क्षण असतात माणसाच्या आयुष्यात की आपण स्वतःलाही विसरतो. पण तेवढेच काही क्षण असतील, ज्या क्षणी मी तुला विसरलो असेन. तेवढेच. उर्वरित प्रत्येक क्षणी मला तुझी आठवणच तर असते की जिच्यावर मी जगतो आहे. आताही हे पत्र लिहिताना तू काय करत असशील, हा प्रश्‍न मला पडला आहेच. खरं तर ते जाणून घेण्याची इच्छा नसते, तरीही प्रश्‍न पडतो. का? याचे उत्तर मात्र देता येत नाही. खरंच का? माहीत नाही. तुझ्याभोवती रुंजी घालणाऱ्या क्षणांचा गुंजारव ऐकण्याची एक अनामिक इच्छा मात्र असते. त्या गुंजारवाचा नाद कानभर ऐकावा, त्यात गुरफटून राहावे, भाळून म्हण हवं तर, पण त्या नादात, मदहोशीत राहावे एवढे मात्र वाटते. म्हणून त्या क्षणांची ओढ. पहिलेच पत्र आहे. खूप काही लिहित नाही. उद्याही पत्र लिहायचे आहेच की.

तुझाच....

रविवार, ८ जानेवारी, २०१२

अनंता

अनंता

सहसा तो वैतागत नसे. कितीही मोठी गोष्ट झाली तरी हे असंच चालायचं असं त्याचं तत्त्वज्ञान. त्यामुळे पुढच्या माणसाच्या चुकांविषयी बोलण्यापेक्षा तो स्वतःच रस्ता बदलायचा. कोणत्याही गोष्टीचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा नाही. पण आज मात्र त्याला हे ट्रॅफिक प्रचंड त्रास देत होतं. जनावरेही या माणसांपेक्षा नियम पाळतात, असं त्याला वाटून गेलं. मघाशी तर त्या रस्त्यात आडवी-तिडवी गाडी मारणाऱ्या पोराच्या मुस्काटात एक ठेवून द्यावी, असं त्याला वाटून गेलं; पण त्यानं रागावर नियंत्रण ठेवलं. आणखी अर्धा किलोमीटर अंतर गेलं की हायवे लागणार होता. पण गाड्या मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होत्या. मध्येच मोटारसायकलस्वार घुसत होते. त्याच्या गाडीसमोर आडवे येत होते. तो वैतागत होता. जोराने हॉर्न वाजवत होता, पण त्यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता. इंच इंच करत तो पुढे सरकत होता. त्याचा संयमाचा बांध आता फूटू पाहत होता. आता जर कोण आडवे आलं तर सरळ उतरून कानाखाली द्यायची असंच त्यानं ठरवलं; पण ती वेळ आली नाही. शहरातला गर्दीचा रस्ता संपला आणि तो हायवेला लागला. ऍक्‍सिलेटरवरचा त्याचा पाय नकळत दाबला गेला. गाडीने वेग घेतला. डोक्‍यातून अजून विचार जात नव्हते. गाडीच्या वेगाबरोबर विचारांचा गोंधळ वाढत होता.
रोजच्या सवयीप्रमाणे आजही त्याला पहाटे पाचलाच जाग आली. ऑफिसला आज जायचंच नाही असं ठरवून तो अंथरुणावर पडून होता. पण झोप काही येत नव्हती. रोजच्या दगदगीची शरीरालाही इतकी सवय होते, की मग आरामही नको वाटतो. सक्‍तीने दिलेला आराम शरीर स्वीकारत नव्हतं; पण तोही हट्टाने उठत नव्हता. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. नाईट शिफ्टमधल्या त्याच्या हाताखालच्या माणसाचा फोन असणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यात आज उठायचेच नाही, असं ठरवून तो पडून राहिला. दोन कॉल त्यानं उचललेच नाहीत. शेवटी फोन वाजायचा बंद झाला. सकाळी चहा पिताना त्याच्या लक्षात आलं. पहाटे कोणी तरी फोन केला होता. त्याने मिसकॉल बघितले; तर ऑफिसचा नंबर नव्हताच.
आईचेच दोन मिसकॉल होते. आता एवढ्या पहाटे कशाला आईने फोन केला असेल, याचा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. काही अघटित तर घडलं नसेल ना?. त्यानं घाईघाईनं फोन केला. पण लागला नाही. आता त्याची अस्वस्थता प्रचंड वाढली. आई सहसा रात्री, पहाटे फोन करत नाही हे त्याला माहीत होतं. अनंतानं दंगाच जास्त केला तरच ती फोन करते. आजही एवढ्या पहाटे फोन करावा लागला याचा अर्थच काही तरी नक्‍की घडले असणार, असं त्याचं मन सांगत होतं, किंवा नेहमीप्रमाणे अनंतानं दंगा केला असेल आणि आईनं दटविण्यासाठी फोन लावला असणार, असंही वाटून गेलं. त्याला काही कळेना. शेवटी आईच्या फोनवर रिंग वाजली.
आईनंच फोन उचलला. हॅलो म्हटल्यावर ती एवढंच "म्हणाली... अनंता...'
याला काही कळेना, अनंताला काय झालं...? त्यानं दोनदा विचारलं. पण आई काही बोलली नाही. आता त्याचा बांध सुटायला लागला.
आईच्या "तुम्ही या इकडे' या सांगण्यातला त्याला अर्थ कळला. अनंताच्याच बाबतीत काहीतरी बरं-वाईट झालं असणार... नेहमीप्रमाणे त्यानं दंगा केला असता तर आईनं फोनवरच सांगितलं असतं. तिला आता त्याचं काही वाटत नाही. तीही या गोष्टींना सरावली आहे.

-------

समोरचा ट्रकवाला उगाचच हळू चालला आहे असं त्याला वाटू लागलं. त्यानं दोनदा कर्कशपणे हॉर्न वाजविला. तो बाजूला झाला. यानं ऍक्‍सिलेटरवरचा पाय आणखी जोरात दाबला. आता आई एकटी काय करत असेल? अनंता बरा असेल ना? याचा विचार करून करून त्याचं डोकं भंडावून गेलं होतं. दोन तासाचं अंतरही त्याला आता हजारो मैलांचं वाटू लागलं होतं. तो स्वतःशीच चिडत होता. वैतागत होता. रिकाम्या रस्त्याचाही त्याला राग येत होता. त्याची बायको गप्पपणे त्याच्या शेजारी बसली होती. त्याची होणारी तगमग ती बघत होती. ऍक्‍सिलेटरवरच्या पायाचा दाब वाढतच होता... अनंताचा चेहरा त्याच्या समोर आला.
बारावीला चांगले मार्क मिळाल्यावर त्याचे झालेले कौतुक... मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यावर वडिलांनी खास त्याच्यासाठी घेतलेली मोटारसायकल. वडिलांच्या जाण्याने कोलमडून पडलेला... दोन दोन दिवस जेवणही नाकारलेला... डॉक्‍टर झाल्यावर आईनं केलेली नेमप्लेट बघून लाजलेला. साध्या साध्या गोष्टीत आनंद मानायचा. आईच्याच हॉस्पिटलमध्ये त्यानं प्रॅक्‍टिस सुरू केली होती. सगळं कसं चांगलं चाललं होतं आणि...
त्यानं कचकन्‌ ब्रेक दाबायचा प्रयत्न केला; पण समोर आडवं आलेलं कुत्रं त्याच्या गाडीच्या चाकाखाली आलंच. जीवाच्या अकांतानं ओरडत होतं गाडीखाली चिरडलेलं ते कुत्रं. त्यानं आरशातून मागे बघितलं. ते तडफडत तिथेच रस्त्याच्या मध्यभागी बसलं. एवढ्यात पाठीमागून येणारा ट्रक त्याच्या अंगावरून पुढे आला. आता ते मरून गेलं असेल किंवा त्याच्या नरड्यात राहिलेला प्राण बाहेर पडण्यासाठी तडफडत असेल. मग त्या मांसाच्या गोळ्यावरून एक एक करत अनेक वाहने जातील. रस्त्यावरच मग रक्‍त सुकेल आणि मग तिथे कधी काही घडले होते हेच कळणार नाही. त्याला दरदरून घाम फुटला. त्यानं घाम पुसण्याचा प्रयत्न केला. अनंताचा चेहरा त्याला आता आणखी छळू लागला. त्यानं गडबडीने गाडी लावली. दारात फारशी गर्दी नव्हती. सगळे व्यवहार नेहमीसारखेच सुरू होते. त्याच्या जीवात जीव आला. लिफ्ट खाली यायची त्यानं वाट बघितली नाही. पटपट पायऱ्या चढून त्यानं फ्लॅटला जवळ केलं. फ्लॅटच्या दारातही कसलीच गडबड नव्हती. त्यानं बेल वाजवली. आईनंच दार उघडलं.
त्याला बघताच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ""अनंता...'' एवढंच ती बोलली आणि त्याच्या छातीवर कोसळली. त्याला कळेना.
आईला त्यानं सावरत विचारलं...
""कुठाय?''
""बाथरुममध्ये... रात्री तीन - साडेतीनपर्यंत नाडी लागत होती, बघ.'' तो धावत बाथरुमध्ये शिरला. पाठोपाठ त्याची बायकोही. अनंताचा तो जडावलेला देह निस्तेज होऊन अस्ताव्यस्त पडला होता. त्याला रडूही येईना. काय होतंय हेच कळत नव्हतं.
""...रात्री एक वाजता बाथरुममध्येच पडला. त्यावेळीच कोमात गेला होता. शेजारच्या दोन-तीन घरांच्या बेल वाजविल्या. त्यांना नेहमीसारखं अनंता आरडाओरडा करत असेल असं वाटलं असणार. त्यामुळे कोणीच दरवाजा उघडला नाही. त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला उचलून मला आत काही आणता आले नाही. मग मांडीवर डोकं ठेवून सकाळ व्हायची वाट बघू लागले. तीननंतर तर नाडीही लागायची बंद झाली. काय करावे काहीच कळेना. तुला रात्री फोन करावा तर तू गडबडीने यायचास. म्हणून सकाळी फोन केला. या लोकांनी माझ्या लेकाचा जीव घेतला बघ. रात्री कोणी मदत केली असती तर जगला असता.'' आई सांगत होती. रडत होती. त्याच्या कानावर ते शब्द आदळत होते आणि मनात चलबिचल होत होती.

----

बाबा गेल्यानंतर अनंता आपली फारच काळजी करायचा. त्याचा राग यायचा. प्रत्येक गोष्ट त्याला सांगायला लागायची. मग चिडचिड व्हायची. असेच एकदा लिफ्ट सुरू करू नको म्हणून तो खाली उतरला होता. स्वतःला फार शहाणा समजतो, म्हणून लिफ्टचे गिअर सोडले आणि लिफ्ट दाणकन्‌ खाली आदळली. हा खाली बसला होता. पण तरीही लिफ्टची एक कडा त्याच्या डोक्‍याला लागलीच. त्याच्या डोक्‍यावर जो परिणाम झाला तो झालाच. लोकांना वाटलं, अपघात झाला. कोणालाच याच्यावर संशय आला नाही. पण रात्री-अपरात्री त्याला जाग आली की, त्याचं मन खायचं. आपणच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहोत असं वाटून अपराधी वाटायचं. अनंताच्या निस्तेज चेहऱ्याकडे त्याला बघवायचेही नाही. नोकरीनिमित्त गाव सुटलं तसा तो विचार थोडा बाजूला सरला. त्याला त्या मघाशी ठोकरलेल्या कुत्र्याची आठवण झाली. त्यानं ठोकरल्यानंतर त्या कुत्र्याच्या अंगावरून ट्रक गेला होता. ट्रकने थोडाच त्या कुत्र्याचा जीव घेतला होता. तसेच अनंताच्या मृत्यूला आई शेजाऱ्या-पाजाऱ्यांना दोष देत होती. खरा तर त्याचा जीव त्यानेच तर चार वर्षांपूर्वी गिअर सोडविला तेव्हा घेतला होता... 

मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ

नागपूरमधल्या आपल्या निवासस्थानी आपल्या खुर्चीवर (सर्वसामान्य याला कोच म्हणतात) बसलेल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा मोबाईल फोन वाजला. आता या क्षणी कोणाचा फोन म्हणून त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनवर बघितले. डोके जेवढे चालविता येते, तेवढे चालवून बघितले; पण नंबर काही लक्षात येईना. मोहनदर्शन चारच दिवसांपूर्वी झाले होते, इतक्‍यात तिकडून बोलवणे येणे शक्‍य नाही, याची त्यांना खात्री होती. वरळीपासून परळीपर्यंत आता चिंता नव्हती, मग फोन कुठून असणार.
राष्ट्रीय अध्यक्षांना उगाचच राग आला. अरे, या मोबाईलवरून काहीच कळत नाही, फोन कुठला ते. लॅंडलाईन असेल तर नेमके कळते तरी की, फोन कुठल्या राज्यातील, कुठल्या गावातील. अध्यक्षांनी स्वतःच त्रागा करून घेतला. फोन उचलावा तरी पंचाईत आणि न उचलावा तरी. न जाणो, उत्तर प्रदेशमधील मंत्र्याबाबतच्या घोटाळ्याची बातमी द्यायला कोणी फोन केला असेल तर. पण तरीही त्याचा आता आपल्याला उपयोग नाही. आपल्याला काही त्याचा फार पाठपुरावा करायला जमणार नाही. पण आपले एक खंदे कार्यकर्ते आहेत की. एकदा का माहिती त्यांना मिळाली, की मंत्र्यांच्या डोक्‍यावरचे "किरीट' कसे खाली खेचायचे हे त्यांना चांगलेच कळते. त्यांना परस्पर हा नंबर द्यावा. पण न जाणो, आपल्यासाठी काही तरी असेल तर... सलग सातवा मिस कॉल पडल्यावर मग मात्र अध्यक्षांची चलबिचल झाली. आता फोन उचलायलाच हवा. या लोकांना कोण देतं हा पर्सनल नंबर कोण जाणे? राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःशीच पुटपुटले आणि त्यांनी फोन कानाला लावला.
""नमस्कार साहेब, मी आपला... हा अमुक तमूक...''
""बोला काय काम होतं...?'' अध्यक्षांनी नाराजीचा सूर कायम ठेवला.
""काही नाही.. तुमची आठवण झाली. बाकी तुमचे आरोग्य मात्र आता चांगलेच दिसते आहे. जरा हलकेही वाटायला लागला आहात.''
राष्ट्रीय अध्यक्षांना ही स्तुती प्रचंड आवडली. त्यांनी आपले बाहेर आलेले पोट थोडे आणखी आत घेतले. कसंचं कसंचं ... भाव चेहऱ्यावर आणत आपल्या तलवारकट मिशांतून स्मित केलं; पण फोनवरून त्या माणसाला ते कळलं नाही.
साहेब चुकून रागावले की काय, असे वाटून त्यानं सरळ सांगून टाकलं.
""साहेब, आरोग्य योजनेबद्दल नाही बोलत, तर तुमच्या आरोग्याबद्दल बोलतो आहे.''
आरोग्य योजनेबद्दल... काय ही काय भानगड आहे. अध्यक्षांना नेमके कळेना, हा काय बोलतो आहे.
""काही नाही साहेब, परवाच्या त्या पक्षप्रवेशाने पक्षातील आरोग्य बिघडले असल्याची चर्चा सगळीकडे घडते आहे. आपल्याच कार्यकर्त्यांनी ज्यांच्या डोक्‍यावरचा "किरीट' उतरवला, त्यांनाच तुम्ही कमळाचा मुकुट घातला. लोकांची "आड'"वाणी'ही आता सरळ बोलू लागली आहे. ते मोठे साहेब यात्रा काढून आरोग्य सुधारण्याच्या गोष्टी करताहेत आणि तुम्ही येईल त्याला मुकुट घालताहात.''
""हेऽऽ हेऽऽ सांगण्यासाठी मला तू फोन केलास... या वेळी...?'' राष्ट्रीय अध्यक्षांनी घड्याळाकडे बघत पुन्हा दटावणीच्याच सुरात प्रश्‍न केला.
""नाही साहेब...'' फोनवरचा माणूस अगदी लीन होऊन म्हणाला. ""तिकडे कितीही चर्चा झाल्या तरी त्याचा आपल्याला कायपण तोटा नाही. पण "रेशीमबागेत' याबाबत चर्चा आहे.''
राष्ट्रीय अध्यक्ष ताडकन्‌ जाग्यावरून उठले. (खुर्चीला काही क्षण का होईना बरे वाटले) पुन्हा खाली बसले. ""कोण आहे तिकडे...?'' एक स्वयंसेवक पुढे झाला.
""काय रे काय? शाखेत माझ्याबद्दल काही चर्चा-बिर्चा असतात का?''
""नाही साहेब? पण एक डायलॉग मात्र नागपुरात आता प्रत्येक स्वयंसेवकाच्या तोंडात आहे.''
"काय?''
""मोगॅम्बो ना खुश (कुश) हुआ''