रविवार, ३० ऑक्टोबर, २०११

पोपटपंची

सारथ्याने लगाम हातात घेतले आणि चाबूक मारला. घोडे उधळले... रथाने वेग घेतला. हवेत एक धुळीचा लोट उठला... कोणी म्हणाले, आता रथ हाकून काय उपयोग, फार वेळ झाला... कोणी म्हणाले, आता रथ हाकला तरी रथपत्यालाच त्याचा फायदा होईल असे म्हणता येणार नाही... काहींनी मात्र रथपती अजून कसे पट्टीचे रथपती आहेत आणि तेच कसे उद्या सिंहासनावर बसतील, हे ठासून सांगायला सुरवात केली... रथपती मात्र हवालदिल झाले होते... रथातून उठणाऱ्या धुळीपेक्षा या अशाच धुळीची वावटळं त्यांच्याभोवती फिरत होती... यातून मार्ग कसा काढायचा हेच त्यांना कळत नव्हतं... एवढ्यात...
नमस्ते, नमस्ते, नमस्ते....रथपतींकडे बघून पोपट जोरात किंचाळला.. त्या पोपटाकडे बघून रथपत्याने रथ थांबण्यिाचा आदेश दिला. हा पोपट खूप महान दिसतो. नाही तरी आपल्या मनात असलेला "नमस्ते' त्याला कसं कळलं. रथपती खाली उतरले. समोर पोपटवाला आपल्या पोपटाला डाळ खाऊ घालत होता.
महाराज... महाराज... रथपतींनी धोशा लावला... पोपटवाला खूश झाला. एवढा मोठा रथपती, पण आपल्यासमोर येऊन थांबल्याचे त्याला आश्‍चर्य वाटले. पण जमेल तितके आश्‍चर्य त्याने लपवले.
रथपतीने पुन्हा धोशा लावला...
महाराज... महाराज... नमस्ते सदा वत्सले केलं, यात्रा काढल्या, लोहपुरुषाची बिरुदावली मिरवून घेतली, अनेक जिने चढलो तरी माशी कुठं तरी शिंकते आहे. पंतप्रधानपदाची रेष काही हातावर उमटत नाही... काही तरी उपाय सांगा महाराज... उपाय सांगा? त्यांनी आपल्या थरथरत्या हाताने पोपटवाल्यासमोर "नोट' ठेवली. पोपटवाल्याने एकदा नोटेकडे आणि दुसऱ्यांदा रथपतींच्या चेहऱ्याकडे बघितले.
"लाल'बुंद चेहऱ्यावरची चिंतेची "कृष्ण' रेघ पोपटवाल्याला उठून दिसली.
पोपटवाल्याने नोट दाखवताच पोपटाने एक कार्ड चोचीत पकडले आणि पोपटवाल्याच्या हाती दिले.
""तुम्ही म्हणता तेवढं पक्षानं तुम्हाला दिलं नाही, लोकांना तुम्ही पुढं आणता, पण लोक मात्र तुमचं नाव घेत नाहीत. तुम्ही धाडसाचे, पण आता वय साथ देत नाही... "रामा'चं नाव सोडल्यापासून त्रास फार होतो आहे. ''
पोपटवाल्याने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. रथपतींची अस्वस्थता वाढू लागली. हा पोपट भलताच हुशार निघाला.
""महाराज भूतकाळ चांगला सांगितलात; पण भविष्याचं काय? पंतप्रधान होईन का नाही...?''
पोपटवाल्याने मघाशी ठेवलेल्या नोटेकडे पुन्हा बघितलं. रथपतींच्या रथाच्या मानाने "नोट अगदीच तोकडी होती. त्या नोटेकडे बघून काय भविष्य सांगायचं हेच त्याला कळेना.
""तुमची इच्छा फार, पण दैव साथ देत नाही. तुमच्या मार्गात चार चार ग्रह वक्री आहेत. त्यांची शांती केली पाहिजे. ''
""त्यासाठी उपाय काही महाराज... ''रथपत्याने आग्रह सोडला नाही.
""उपाय भारी आहे... पण झेपला पाहिजे. नागासाठी दुधाचा पूर आणला पाहिजे. मेद आणि मोद दोन्ही वाढले, की पदापर्यंत पोचण्याचा मार्ग आणखी कठीण... त्यामुळे तब्येत चांगली ठेवण्यासाठी "गड' सर केले पाहिजेत. ''
""महाराज मग तरी मार्ग सुकर होईल ना?''
""एवढं करूनही खरे तर सांगता येत नाही.''
""का का महाराज? आता आणखी काही अडचणी..?''
""अडचणी खूप आहेत.'' पोपटवाल्याने "नोटे'कडे पुन्हा लक्ष देत सांगायला सुरवात केली. ""अहो राहू आणि केतूचा अनिष्ट काळ चालू आहे. हे दोन्ही जोपर्यंत तुमच्या कुंडलीत आहेत तोपर्यंत या पदापर्यंत पोचणे अवघडच.''
""मग यावर काही उपाय...?''
""उपाय आहे, पण तो जालीम आहे. "भागवत' धर्माचा आधार घ्यायला पाहिजे... त्या मोहनासमोर नतमस्तक झालं की सगळं ठीक होतं. ''
पोपटवाल्याचा हा उपाय ऐकून रथपती उठले. त्यांनी पोपटवाल्याला नमस्कार केला आणि ते निघू लागले.
एवढ्यात पोपटवाला मोठ्याने बोलला,
""आणखी एक करायचे... लोकसभेत सरकार पाडण्यासाठी "नोट' कामाला आली नसली तरी चांगलं भविष्य ऐकण्यासाठी "चांगली नोट नकामी येते.''

***30 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'मध्ये छापून आलेला माझा लेख***

उंटाचं पोर...

नदीच्या त्या पुलावरून जाताना त्याला नेहमी तिथं थांबावं वाटायचं. नदीच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या त्या हिरवळीवर मस्त पडून राहावं, त्या हिरवळीवरून प्रतिबिंबित झालेली उन्हं अंगावर झेलावीत. रात्री तिथून चांदण्यांचा प्रकाश अंगावर ल्यावा, असं काहीबाही त्याला वाटत राहायचं. नदीवरील पुलावरून जाताना त्याची जी स्वप्नं सुरू व्हायची ती ऑफिस येईपर्यंत. स्वप्न बघणं हा त्याचा जणू नित्यक्रमच बनला होता. नदीपेक्षा तिचा किनारा त्याला फार आपला वाटायचा. त्या किनाऱ्यावर बसून दिवस अन्‌ दिवस घालवावा, असं त्याला वाटत राहायचं. पण ही स्वप्नांची माळ ऑफिसच्या दारात येताच विरून जायची. कामाच्या ओझ्याखाली माळेचे मणी पिचून जायचे. पण दुसऱ्या दिवशी परत ते मणी चमकत त्याच्या डोळ्यासमोर यायचे आणि त्यातील धाग्याप्रमाणे तो त्यात गुंगून जायचा. आजही त्यानं पुलावरून जाताना सहज त्या नदीकिनाऱ्याकडं बघितलं आणि त्याला आश्‍चर्य वाटलं. एक उमदा उंट... छे उंटीण असावी ती... तिच्यासोबत एक पिल्लूही होतं. अगदी तिच्यासारखंच... त्या किनाऱ्यावर होती... ती उंटीण कुणाचीही पर्वा न करता त्या कुरणात हिंडत होती. तिचं ते पिल्लू तिच्या मागे मागे करत होतं. त्यांच्या मागे दोन-तीन गाढवं आणि एखाद-दुसरी मेंढी. त्या हिरव्यागार हिरवळीवर मनसोक्‍तपणे चरणारी ती उंटीण, त्या गाढव आणि मेंढ्यांचे जणू नेतृत्वच करीत होती. कळपाच्या प्रमुखाप्रमाणे ती डौलदारपणे, आपल्याच मस्तीत चरत होती. त्यानं गाडी थांबविली आणि त्या उंटीणीला न्याहाळायला सुरवात केली... तपकिरी रंगाचे ते उमदे जनावर एखाद्या राजाच्या सांडणीस्वारांच्या
तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या सैनिकाने प्रेमाने वाढवावे त्याप्रमाणे असावे असे वाटले. तिचे ते भुरभुरीत केस नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांना कुठलीच दाद देत नव्हते. कशाचीच तमा न बाळगता आपल्या ऐटीत ती उंटीण चरत होती आणि तिच्या मागून ते पिल्लू... ती गाढवं... आणि मेंढ्या...
ती उंटीण चरत होती त्याच्या पलीकडेच थोड्या अंतरावर काही माणसांची लगबग चालू होती. गेल्या पावसाळ्यात पुराने खचलेली जमीन भराव टाकून ते ती सपाट करत होते.
मग रोज तो त्या पुलावर थांबून त्या उंटीणीला आणि तिच्या पिलाला निरखायचा. ती उंटीण आणि तिचं ते विजातीय कुटुंब आपल्या मस्तीत त्या कुरणावर ताव मारायचं. ती उंटीण मध्येच आपल्या पिलाला चाटायची... त्याची माया करत राहायची..
आता त्या पलीकडचा भराव टाकून तिथं पालं उभी राहिली होती. कधी कधी तो आता त्या उंटीणीबरोबर त्या पालांकडेही नजर टाकायचा. त्या पालांतून खेळणारी मुलं आणि तेथील माणसांना निरखायचा. खरे तर त्यांच्या त्या मुक्‍त जगण्याचा त्याला हेवा वाटायचा. खास करून त्या पालातील "त्या' माणसाचा. तो त्या उंटीणीप्रमाणेच त्या पालांचा प्रमुख असावा. काळाकुट्ट, पिळदार शरीराचा, त्याच्या दंडावरचा तो काळा दोरा आणि उंटीणीच्या गळ्यातील काळी दोरी यामध्ये त्याला बरेच साम्य दिसायचे. तो पुलावर थांबून त्याला निरखायचा. शहरात फिरतानाही तो कुठे कुठे दिसायचा, कधी गटार खणताना, कधी कुठल्या इमारतीच्या बांधकामावर काम करताना, तर कधी त्या उंटीणीवर पोरांना बसवून फेरफटका मारताना... अलीकडे तो त्याच्याकडे बघतो हे त्यालाही कळले होते. त्यामुळे तोही याच्याकडे बघून ओळखीचा हसायचा, पण दोघांत बोलणं व्हायचं नाही. कधी कधी रात्री ऑफिसमधून परतताना त्याच्या पालाशेजारी लावलेली शेकोटी त्याला दिसायची. त्या शेकोटीभोवती तो आणि त्याची बायको आणि त्याची ती दोन चिल्लीपिल्ली दिसायची. त्या कडाक्‍याच्या थंडीत ती तिथंच झोपलेली असायची. कधी अंगावर पांघरुण असायचे तर कधी तेही नसायचे. तो मात्र रात्रीच्या जागत्यासारखा त्या सगळ्यांसाठी जागा असायचा. ती उंटीण आणि तिचं पिल्लूही तिथेच असायचे... थंडी संपली तसे ते नदीभोवतीचं ते गवतही आता खुरटलं होतं. उन्हाच्या सरळ किरणांना ती उंटीण जुमानायची नाही. खरे तर ती सरळ किरणांना आपल्या तिरप्या मानेवर झेलत जणू आव्हान द्यायची... भर उन्हात काम करताना तिचा मालकही उन्हाला आव्हान द्यायचा. त्याच्या त्या रापलेल्या काळ्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकायचे... आता अलीकडे तो त्याच्याकडे बघायचा. हसायचा. "क्‍या साब' असं बोलायचाही. त्यालाही बरं वाटायचं.
पावसाळा सुरू झाला तसं नदीचं पाणी वाढू लागलं. नदीने आपला विस्तार करायला सुरवात केली. तिथली बरीच पालं उठली होती... फक्‍त त्याचे पाल तिथे तसेच होते... पावसाच्या धारांत पालांचे कापड टिकाव धरत नव्हतं. त्यावरचा प्लास्टिकचा कागद वाऱ्यावर उडून जायचा. तो मालक त्या पालाला ठीक करायचा प्रयत्न करायचा... पण तो कुठे टिकाव धरणार होता... तो आता त्याच्याकडे बघायचा; पण हसायचा नाही. ती उंटीण आणि तिचं ते पिल्लू आता नदीपासून दूर रस्त्याकडेला झाडाचा आडोसा घेत उभे राहिलेले असायचे... तिचे ते विजातीय कुटुंब एक एक करत गायब झालं होतं. बहुतेक मालकाने ते विकले असावे. आता पावसामुळे त्या उंटीणीचे तपकिरी केस काळे पडले होते. त्या उमद्या जनावराला काय करावे तेच कळत नव्हते. पाऊस त्याच्या अंगावर पेलवत नव्हता. जणू पावसाने त्याचे अंग कुजवायला सुरवात केली होती. अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्याकडे बघवत नव्हते. तिच्या जखमी कासेमुळे पिलाचीही उपासमार होत असावी. पावसाने ते फार बिथरलं होतं. त्या एवढ्याशा जीवाला तो पाऊस सहन होत नव्हता... येणारे-जाणारे रस्त्यात थांबून त्या उंटीणीकडे बघायचे, पिलाबाबत हळहळायचे आणि मालकाला शिव्या घालायचे... पाऊस जोराचा सुरू होता... नदीचे पाणी वाढत होते... एके दिवशी त्या पालाशेजारी कसलीशी गर्दी झाली म्हणून तो पाहायला थांबला... काही प्राणीप्रेमी त्याची ती उंटीण घेऊन चालले होते... तो दयावया करत होता. पाया पडत होता... जगण्याचे तेच एक साधन राहिल्याचे वारंवार सांगत होता. पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते... प्राणीप्रेमींपैकी एकाने त्या उंटीणीचे पिल्लू ओढत आणले. त्याने त्याच्यासमोर उभे केले आणि त्याला दोन शिव्या घातल्या.
बघ. या छोट्या जीवाचे हाल काय झाले आहेत... तुम्हाला जनावरं सांभाळता येत नाही तर पाळता कशाला... त्यातील एकाने आणखी शिवी हासडली. तो रडत होता. गयावया करत होता. आता ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी एक मोठा ट्रक आणला.. त्यात त्या उंटीणीला आणि त्या पिलाला घातले. ट्रक गेला, तशी गर्दी ओसरली. पावसाची रिमझीम सुरूच होती. परवाच्या जोराच्या वादळी पावसानं त्याचे ते पाल पार विस्कटून गेलं होतं. तो, त्याची बायको आणि त्याचं ते चार-पाच वर्षांचं पोर त्या गेलेल्या ट्रककडे शून्य नजरेने बघत होते. पुढे जावं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून धीर द्यावा म्हणून तो पुढे गेला. तो पुढे झाला तशी त्याची बायको पालात शिरली...
त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. एवढ्यात त्याच्या डोळ्यातील पाण्याचा लोट बेभानपणे सुटला.
"साब..' एवढाच शब्द त्याला ऐकू आला अणि मग पालाच्या आत गेलेल्या त्याच्या बायकोचा जोराचा हुंदका....
साब ए लोक पुछते है, उस बछडे को देखा क्‍यों नही... परसो रात आयी बाढ में मेरा बच्चा बह गया... पुलीसने कहा यहॉं गैरकानुनी रहते हो! ...किसी से कुछ नही कहना... नही तो जेल में सड जाओगे...
त्याला काही सुचेनासं झालं... इथं उंटाच्या पोरापेक्षा माणसाचं पोर फार स्वस्त झालं होतं...!!

*** आकांक्षा दिवाळी अंकात छापून आलेली लघुकथा***

दोन पत्रं


आता वाहनांची वर्दळ बरीच कमी झाली होती. रात्रीचे 12 वाजून गेले असतील, मघापासून पुलाभोवती फिरणारा तो पुलाखाली आला. पुलाच्या एका खांबाशेजारी एक दगड होता, त्यावर तो रेलून बसला. दिवसभर वणवण करत भटकलेले शरीर थकून गेलं होतं. पण पोटातील भूक डोळ्यातील झोपेला अडवून धरत होती. त्यानं खूप प्रयत्न केला; पण झोप येत नव्हती. डोळ्यासमोरून बायको आणि पोराचा चेहरा जात नव्हता; काय करत असतील... हाच विचार त्याच्या मनात येत होता... कदाचित बायको रडून रडून थकून गेली असेल... बिचारीच्या डोळ्यातील पाणी आटलं असेल पण हुंदका अजून तसाच असेल.... खूप प्रेम करायची...तिच्यामुळेच पूर्णत्व आलं आहे.... पण.... पोराला अजून काही कळत नाही. पण आपला बाबा चार दिवसांपासून घरी का परतला नाही, हा प्रश्‍न त्यालाही पडला असेलच. हा प्रश्‍न विचारून विचारून त्यानं आईला भंडावून सोडलं असेल. त्याला दोघांची काळजी वाटली... त्यांच्या आठवाने त्याचे डोळे भरुन आले...त्याने हलकेच गालावर आलेले थेंब पुसले...

चार दिवसापूर्वी ऑफीसला जातो सांगून तो बाहेर पडला होता. तो अद्याप घरी पतला नव्हता. चार महिन्यापूर्वीच कंपनीने त्याला मंदिच्या कारणावरून काढलं होतं. बायकोला हा धक्‍का सहन होणार नाही... बिचारी फार सोसते आणि आता विचारांनीही खंगायची... लग्नापासून तिच्या अंगाला तसं काही लागलंच नाही...कदाचित मला सोडून जाईल...छे ती सोडून जाण्याचा विचार येताच त्याला कसंतरी झालं... तिच्याशिवाय मी नाही जगू शकत. ती आहे म्हणून मी आहे....वीज चमकावी तसा तो विचार त्याच्या मेंदूतून सरसरला.... त्यामुळे त्यानं ही गोष्ट बायकोला सांगायचं टाळलं.मग तो रोज ऑफीससाठी म्हणून बाहेर पडायचा आणि नोकरी शोधत कंपन्यांची दारं झिजवत राहायचा. दिवस जात होते आणि जमा पुंजी संपत होती. दोन महिने खुळ्या आशेतच गेले. आता त्याला निराशा येऊ लागली होती, पण काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजेत म्हणून तो रोज घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परतायचा. पण काही उपयोग व्हायचा नाही.... घरात बायको-पोरापुढे हसताना... त्यांच्याशी गप्पा गोष्टी करताना त्याची नजर चोर बनायची... त्याची बायकोही त्याच्या नजरेत नजर मिसळायला टाळायचीच.... चार दिवसांपूर्वी तो असाच घराबाहेर पडत होता एवढ्यात बायकोचे ते शब्द त्याच्या कानावर पडले.... पोरगं कसला तरी हट्ट करत होतं, त्याची आई त्याला समजावत होती.
आज बाबांचा पगार होणार आहे, ते नक्की आणतील हं !
तिचा तो "नक्‍की' शब्द त्याला दिवसभर टोचत राहीला. संध्याकाळ झाली... मंदिराच्या पायऱ्यांवरुन तो खाली उतरला.... आता घराकडे जायचं तर पोरगं हट्‌ट करणार... त्याला आणि बायकोला समजाविताही येणार नाही....कदाचित आपल्याला नोकरी नाही म्हणून ती सोडूनही जाईल... छे तिने सोडून जाण्याची कल्पनाही त्याला सहन झाली नाही.... त्याला काहीच सुचेना...
तो मटकन खाली बसला... थोडावेळ तिथेच बसून राहिला.... आज घराकडेच जायचं नाही हे त्यानं मनाशी पक्‍क ठरवून टाकलं...मग शहरात फिरत राहिला रात्री एका बसमध्ये चढला कंडक्‍टरने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं.... बस कुठे निघाली हेही त्याला माहित नव्हतं.. एका स्टॉपवर बस थांबली.. सगळे उतरले हाही उतरला... रात्र बरीच झाली होती....मग तो रस्त्यावरुन फिरु लागला.... दिवसभराच्या कंटाळ्याने पाय पुरते थकले होते...त्याची नजर कुठे निवारा मिळतो का याचा शोध घेऊ लागली.... तिथल्याच रस्त्याच्या एका पुलाखाली त्यानं आपलं ठाण मांडलं. आणि तिथे तो झोपून गेला.....
आता गाड्यांचा आवाज पूर्ण मंदावत होता. गेली चार दिवस तो या पुलाच्या आधाराने जगत होता. कपडे आता मळके म्हणण्यापलिकडे गेले होते. दाढी वाढली होती. आणि चपलाचा तुटका बंद त्याच्या भिकारीपणांच्या लक्षणांना आणखी अधोरेखीत करत होता. दोन दिवसापूर्वी सकाळी फिरायला येणाऱ्यापैकी कोणीतरी त्याच्यासमोर शिळी चपाती ठेवली; त्यावेळी तो मनाशीच हसला. दुपारपर्यंत त्यानं त्या चपातीला हात लावला नाही. नंतर मात्र पोटाने मनावर विजय मिळविला.चपातीचा प्रत्येक घास खाताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या... नंतर तिसऱ्या दिवशी आणि आजही कोणीतरी चपात्या आणून त्याच्यापुढे टाकल्या..... त्याला पहिल्यांदा त्या खाव्यात असं वाटलं पण नंतर त्यानं धीर केला त्यानं हात लावला नाही... दुपारी कधीतरी कुत्री त्याभोवती जमा झालेली त्यानं बघितलं आणि मग तो वेड्यासारखा हसत राहिला....
आता त्याला काही सुचत नव्हतं... कुत्र्याचं जगणं त्याला नकोच होतं....त्यानं खिसा चाचपला.... पेन अजून खिशात होते. त्यानं समोरच्या कचरा कुंडांतील एक कागद उचलला आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालायला लागला.
दुसऱ्या दिवशी पहाटे रेल्वे पोलिसांना रुळावर एक बॉडी मिळाली आणि खिशात एक पत्र
प्रिय,
रिमा.
आपल्या लग्नाला 3 वर्षे झाली. या तीन वर्षात जेवढं सुख देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. सप्तपदीची सगळी वचनं मी पाळण्याचा प्रयत्न केला; पण आता ते शक्‍य नाही. तू सोडून जाण्यापेक्षा तू सोडून जाण्याची भीतीच मोठी आहे...ही व्दिधा सहन होत नाही... जगायचं तुझ्याशिवाय ही कल्पनाही सहन होत नाही..... म्हणून मी जगाचा निरोप घेतोय; जमलं तर माफ कर.
तुझाच रघू

पोलिसांनी पत्र वाचलं आणि त्या पत्रावरील पत्ता. त्या पत्त्यावर ते पोचले तर घराला मोठं कूलूप होतं. पोलिसांनी शेजारी चौकशी केली. त्यांना एक पाकिट मिळाल आणि त्यात रघुच्या नावाने एक पत्र


रघु.
आपल्या लग्नाला तीन वर्षे झाली. पण या तीन वर्षात मी तुमची कधीच होऊ शकले नाही... सप्तपदीची वचंन मी पाळू शकले नाही. खरे तर मी हे आधीच सांगायला हवं होतं... मनाविरुद्ध लग्न झालं होतं माझं... मला तुम्हाल धोका द्यायचा नव्हता....त्यामुळे नेटाने तीनवर्षे संसार केला पण आता हि व्दिधा सहन होत नाही... त्यामुळे मी आता सोडून जात आहे कायमचीच.... सोबत पिंटूंला घेऊन जात आहे... जमलं तर माला माफ करा.*** 27 आक्‍टोबरच्या "ंसकाळ'च्या स्मार्ट सोबतीमध्ये छापून आलेली माझी लघुकथा ***