रविवार, १७ जानेवारी, २०१०

मैफल रंगली

तो.... (मैफल रंगली)
हरिदास संमेलनाचे रिपोर्टींग करायला गेल्यावर आधी बुवांची छोटेखानी मुलाखत घ्यायला स्टेजच्या मागे गेलो, तर ती तिथेच होती. आपल्याला बघून ती चटकन सामोरी आली. बुवांना नमस्कार करायला आलात ना? मीही नमस्कार करायला आले आहे. तुम्हाला शास्त्रीय संगीत आवडतं? खरं तर नाही म्हणायचं होतं. पण तोंडातून नकळत हो! आलं. मलाही आवडतं मी तर दोन परीक्षाही दिल्या आहेत इती ती. मी बुवांची मुलाखत न घेताच तिच्याबरोबर कार्यक्रमाला गेलो. व्यासपीठावर बुवा ताणा घेत होते आणि आपली नजर मात्र तिच्यावरच खेळली होती. एखादं निरागसं बाळ आजी सांगत असलेल्या गोष्टींकडे कसं लक्ष देवून ऐकेल तसंच ती गाणं ऐकत होती. तिच्या पापण्यांची होणारी जलद उघडझाप जाणवून गेली. मध्यंतरात तिचे अखंड बोलणं चालू होतं. एक मात्र जाणवलं ज्या मैत्रीणीबरोबर ती कार्यक्रमाला आली होती तिला सोडून तिने माझ्या शेजारील खुर्चीवरुन मैफल ऐकली. मैफल रंगली रंगमंचावर बुवांची आणि रंगमंचाखाली माझी.....

ती..... (मैफल रंगली)
त्याला शास्त्रीय संगीताची आवड असेल असं वाटलं नव्हतं. किंबहूना त्या नाटकानंतर आपली त्याच्याशी भेट होईल असंही वाटलं नव्हतं. केवळ शास्त्रीय संगीताची आवड आहे असं नाही तर बुवांचा किती आदर करतो तो.नाहीतर मैफीलीआधि कशाला आला असता बुवांना नमस्कार करायला. बुवांचे गाणं आपण यापुर्वीही अनेकदा ऐकलं अगदी प्राण कर्णाशी आणून ऐकलं. पण आज मात्र आपलं सगळं लक्ष बुवांच्या गाण्याकडे नव्हतंच. बुवांचं गाणं एकीकडे रंगत असताना आपलं मन मात्र दुसरीकडेच स्वप्न रंगवत होतं. एकदा दोनदा आपण चोरुन त्याच्यावर कटाक्ष टाकला तेव्हा त्याचं लक्ष आपल्याकडेच असल्याचं जाणवलं. कदाचित आपल्या मनाचे ते मांडेही असावेत. पण तो आपल्याकडे चोरुन बघत होता हे मात्र नक्‍की. मध्यंतरात आपण गाण्याविषयी इतकं बोललो पण तो मात्र शांत होता. अगदी विरक्‍त साधूसारखा पण त्याची नजर तशीच रोखलेली आणि टोकदार. नंतरचा दीड तास मैफल रंगली व्यासपीठावर बुवांची आणि मनात त्याची....