रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

लाडू....




""लाडू येतात ना रे तुला?''

बाईंनी कपाळावर आठ्या आणतच विचारलं.

आपल्या खांद्यावरचा झारा दोन्ही हाताने सावरत महादेवने फक्‍त आपल्या ओठांना विलग केलं. त्याचे निम्म्याहून दात पडलेलं बोळकं खूपच विचित्र वाटलं.

सहा फूट उंची, डोक्‍याला टक्‍कल, अंगात कळकट-मळकट शर्ट आणि तसलीच तेलकट पॅंट, पायांना चपलांचा कधी स्पर्श झाला होता की नाही याबाबत शंकाच यावी, असे राकटलेले पाय. वर्षानुवर्ष चुलीच्या धगीसमोर बसून रापलेल्या चेहऱ्याच्या महादेवच्या ओठावरचे हसू मात्र कधी रापले नव्हते. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर "त्याला काय लागतंय' या तीन शब्दांनी सुरू करून महादेव बोलायला लागला की त्याचे बोलणे थांबवणे जाम कठीण होऊन जायचे. बुंदीचा शेवटचा घास संपल्यावर त्याचे हात जसे लाडू वळवायचे थांबायचे तसा अचानक कधी तरी तोच थांबायचा. मग पुढचा माणूस बोलायचा.




""काय विचारलं मी? तुला लाडू येतात ना ?'' बाईंनी आवाजात जितका शांतपणा आणता येईल तितका आणला.

""त्याला काय लागतंय?'' महादेवाने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला... ""आहो, आयुष्यभर तेच तर काम केलं आहे. बाईसाहेब, मी वळलेल्या लाडवांना बघूनच लोकांचे समाधान होते. तोंडात लाडू गेला की लाडवाबरोबर माणूस पण विरघळतो बघा. अहो! तिसरी पिढी आमची लाडू वळणारी. मी जन्माला आलो त्यावेळी आमच्या अण्णांनी म्हणजे आमच्या वडिलांनी चार पायलीचं लाडवाचं कंत्राट घेतलं होतं. आई लाडू वळत होती आणि त्याचवेळी तिच्या पोटात दुखायला लागलं. त्यातनं पण तिनं तीन पायलीचे लाडू वळलेच. मग मी जन्माला आलो. अण्णांनी आधी उरलेले लाडू वळले आणि मगच माझं तोंड बघितलं. माझा आणि लाडवाचा तिथून जो संबंध आहे, तो अजून तसाच आहे. तुमचे किती पायलीचे लाडू वळायचे आहेत?''

बाईंनी त्या रापलेल्या चेहऱ्याकडे परत बघितले. त्याच्या कळकट-मळकट कपड्यांवरून पुन्हा नजर फिरविली.

""अंघोळ करतोस ना रोज?'' बाईंनी त्रासिकपणे प्रश्‍न केला.

हा प्रश्‍न आता त्याला नेहमीचा आणि परिचयाचा होता.

""त्याला काय लागतंय, परवाच चार साबण आणलेत...''

"बरं बरं...' आता हा आपले अंघोळ पुराण सांगणार हे बघून बाईंनी त्याला थांबवलं.

""किती पायलीचे लाडू करायचे आहेत?'' महादेवाने आपल्या खांद्यावरचा झारा दोन्ही हातांनी आणखी घट्ट पकडत पुन्हा विचारले.

""हे पायलीचे गणित काही कळत नाही. तूच सांग, पन्नास माणसांना पुरवठा यायला हवेत.''

""त्याला काय लागतंय, पण माणसं कुठली आहेत त्यावर अवलंबून. तुमच्यासारखी सुशिक्षित आहेत, की आमच्यासारखी गावाकडची. म्हणजे तुमच्यासारखी माणसं असली की कमी लागतात, पण आमच्यासारखी असली की दे दणका...! तुम्हाला सांगतो, परवाच मी एका लग्नाचे लाडू केले होते. परवा. पण त्यालाही झाली चार-पाच वर्षे. माणसं होती शंभरच. पण दोन पायलीचे लाडू पुरले नाहीत...''

""पाच किलोचे लाडू करायचे आहेत आणि तेही न बोलता. जमेल का?'' बाईंच्या पाठीमागून साहेबांनीच विचारले.

""त्याला काय लागतंय...'' महादेवने बोलायचा पुन्हा प्रयत्न केला.

""त्याला तोंड बंद करायला लागतंय.'' साहेबांनी त्याला थांबवलं.

बाई खूप हसल्या आणि आत निघून गेल्या. महादेव आपल्या टकलावरून हात फिरवत तिथेच पायरीवर उभा राहीला.

""ये आत. चहा घेणार?''

साहेबांनी त्याला आत बोलवत विचारलं.

""न नको... म्हणजे सकाळी-सकाळी दोनदा झाला ना चहा. त्यामुळे आता चहा घेतला की पित्त होतं. मग चार दिवस काम होत नाही. अंगावर हे मोठे मोठे फोड उठतात'' महादेवने कमीत कमी शब्दांत उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

""हं... बरं..!''

""कधी करणार लाडू, किती साहित्य लागेल?'' बाईंनी आतूनच विचारलं.

""आज आत्ता.'' महादेवने क्षणाचा विलंब न करता उत्तर दिलं.

""अरे, आज कसं शक्‍य आहे...? फक्‍त विचारायचं होतं की किती साहित्य लागेल, यासाठी तुला बोलावलंय.''

""नाही बाईसाहेब, आज आणा की साहित्य. पाच किलोला किती लागणार आहे साहित्य. दोन तासाचं तर काम.''

""अरे पण...''

""हवं तर मजुरी कमी करा; पण आज कराच बाईसाहेब लाडू.'' महादेवने आपलं म्हणणं जितकं रेटता येईल तितकं रेटलं.

""अरे, पण आज का जबरदस्ती आहे का?... बाईंच्या बोलण्यात नाखुशी साफ दिसत होती.

""न नाही पण...'' महादेवाची जीभ जरा आडखळलीच.

""काय... आज साहित्याची यादी दे आणि ये उद्या-परवा मी तुझ्या त्या मित्राजवळ निरोप ठेवते.''

महादेवनं यादी दिली आणि खाली ठेवलेला झारा पुन्हा खांद्यावर घेतला. जाता जाता त्याचा पाय घुटमळलाच.

""बाईसाहेब बोलवा हां नक्‍की! लोकं बोलावतात, साहित्याची यादी ठेवून घेतात आणि पुन्हा लाडू करायला परत कोण बोलवत नाही. आजकाल लाडू कोण खातंय म्हणतात, आणि बेत बदलतो. या हातांना झारा धरण्याशिवाय आणि लाडू वळण्याशिवाय दुसरं काही येत नाही हो. हातात झारा नसला की हात थरथरतात. दोन महिन्यात एकपण काम नाही मिळालं. बाईसाहेब, रोज पोरगी विचारते, "बाबा, आज येताना लाडू आणणार?' पोरीला बाजारातून लाडू घ्यायला पैसे नाहीत. या हातांनी नेहमी पायली - चार पायलीचे लाडू केले. आता किलो-दोन किलोचे लाडू केले की ती चव येत नाही. त्यामुळे बेकरीवाले कामावर ठेवत नाहीत.'' त्याचे खोबणीतील डोळे आणखी खोल गेल्यासारखे वाटले.

त्याने झारा उचलला अणि तो जायला लागला.

""थांब.''

बाई आत गेल्या. त्यांनी कागदात गुंडाळून दोन लाडू आणले होते.

""हे लाडू दे तुझ्या पोरीला.''

""नको बाईसाहेब, बुंदीच्या लाडवाची चव रव्याच्या लाडवाला येणार नाही आणि पोरीला असे तुपात-बिपात केलेल्या लाडवाची चव कळली तर अवघड होईल. नकोच.''

""आज हे लाडू दे... उद्या ये आमच्याकडे... आम्ही लाडवाचा बेत देऊ की नाही माहीत नाही. पण तू उद्या आमच्याकडे लाडू नक्‍की करायला ये.''

महादेवच्या हातातला लाडू चटकन खाली पडला. त्याला बाईंचे पाय दिसले. क्षणभर त्याला बाईंचे पाय धरावे वाटले; पण फुटलेल्या लाडवाला गोळा करताना त्याला ते जमलं नाही.


सकाळ'च्या 7 November च्या स्मार्ट सोबतीमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकथा

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

चहा


अजूनही साखर डबल लागते का रे?... तिने स्वयंपाकघरातूनच जोरात विचारले...
""न.. नाही... साखर नको...''
""का? काय रे, काय झालं... डॉक्‍टरांनी बंदी घातली आहे का साखर खायला? तू ज्या पद्धतीने साखर खायचास ना, त्यावरून तर हे कधी ना कधी होणार होतंच म्हणा!''
""हं..!'' त्याने नुसता हुंकार सोडला.
""किती चहा प्यायचास... त्यात ती डबल साखर... दोन तासांच्या गप्पांमध्ये पाच कप चहा व्हायचा तुझा... मी एकदा संजयला म्हटलंही होतं, अरे, माझा एक मित्र होता.. तो फक्‍त चहाने आंघोळ करायचा बाकी होता...!
तुला आठवतं, एकदा तू म्हटला होतास... काश... ये बारिश च्याय की होती... तो कितना मजा आता! अरे ते वाक्‍य आठवून मी कितीदा हसलीय...''
""हं!'' त्याने पुन्हा हसण्याचा प्रयत्न केला.
""अरे तू बोलत का नाहीस? किती बडबडायचास! तोंडात एक तर चहा किंवा शब्द!! त्याशिवाय तुझं तोंड आठवता आठवत नाही...'' ती खळखळून हसली.
""काही नाही गं! त्या वयात असतो तो पोरकटपणा...''
त्याने पुन्हा तिच्याकडे वर मान करून बघितले आणि पुन्हा डोळे फिरवले.
""बाकी चहा पिण्याव्यतिरिक्‍त काही करतोस की केवळ चहाच पित असतोस.. खातो-बितोस की नाही?...'' ती पुन्हा खळखळून हसली.
""नाही... एक ग्रंथालय चालवतो.''
""अरे, ग्रंथालय आणि तू?'' तिने फक्‍त उडी मारायची बाकी होती. ""तुला पुस्तकांची कधीपासून आवड निर्माण झाली?... मला तर म्हणायचास, पुस्तकांपासून तुला लांब एका बेटावर ठेवलं पाहिजे... आणि तूच पुस्तकांच्या दुनियेत?... तुला आठवतं, तू केलेली ती कविता... आई शप्पथ! कसले शब्द एकमेकांना जोडले होतेस... कविता होय ती?... निव्वळ फालतूपणा होता..!''
""तुला आठवते ती कविता?...'' त्याने चमकून विचारलं.
""अरे अगदी शब्द अन्‌ शब्द आठवते...''
""हं!'' त्याने नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर शांतपणा आणण्याचा प्रयत्न करत काहीतरी प्रतसाद द्यायचा म्हणून दिला.
""थांब, चहा आणते हं...'' म्हणत ती आत उठून गेली...
तो शांतपणे कोचावर रेलून बसला. समोर राधा-कृष्णाचे भले मोठे पेंटिंग होते.
तो उठला. पेंटिंगजवळ गेला. त्याच्या भोवतीही अनेक चित्रे होती. बहुतांश राधा-कृष्णाचीच... अनेक नामी चित्रकारांची. काही नुसत्या बासऱ्या आणि एक-दोन मोरपिसांची चित्रे.
""अरे, संजयला खूप आवड होती पेंटिंगची. त्यानेच जमवलीत सगळी... फिरतीची नोकरी असल्यानं त्याला मिळवताही आली...'' तिच्या या वाक्‍यासरशी तो चटकन्‌ भानावर आला. ती चहाचा ट्रे घेऊन आली होती. तिने ट्रे बाजूला ठेवला आणि पेंटिंगजवळ येऊन सांगू लागली...
""हे पेंटिंग राजस्थानमधून आणले... हे पंजाबमधून... हे बांगलादेशातील एका गावातून...'' ती एक एक पेंटिंग दाखवत होती. ते कोठून आणले, कोणाचे आहे, हे सांगत होती. तिने त्या राधा-कृष्णाची माहिती सोडून सगळ्या पेंटिंगची माहिती सांगितली. त्याचे फारसे लक्ष त्याकडे नव्हते.
""अरे चहा थंड होतोय...''
""हा...''
""तू नाही चहा घेत...?''
""अं? नाही!''
""हं!'' त्याने पुन्हा काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचा प्रयत्न केला. पण जमला नाही.
""जरा बशी देतेस...''
""अरे, चहा थंडच तर झालाय... मग बशी कशाला...''
""हं...'' पुन्हा त्याने हुंकार सोडला आणि गप्प बसला.
""थांब, मी गरम करून आणते चहा! किती वेळ झाला ना...''
""हं! चालेल...'' म्हणत त्याने मान डोलावली.
तिने लगबगीने चहाचा कप उचलला आणि ती आत गेली.
""बरं, असं करता का... आय मीन... असं करतेस का, चहा राहूदेच...''
""का रे?... बरं राहू दे...'' तिने पण पुन्हा आग्रह नाही केला.
""ग्रंथालयात किती पुस्तकं आहेत?'' तिने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
""भरपूर आहेत! रजनीश आणि जे. कृष्णमूर्तींची तर जवळपास सगळीच आहेत... कुठून कुठून मागवली माहितीए... '' आपण फारच उत्साहात सांगतोय हे जाणवून तो पुन्हा गप्प राहिला.
आता तिने फक्‍त "हं'चा हुंकार सोडला...
""अरे त्या बाजारात तुला मी बघितलं आणि मला पटलंच नाही... तू आणि इथे? शक्‍यच नाही! पण तू... तूच होतास!! बाय द वे, तू कसा या शहरात...?''
""कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाची एक सीडी इथे होती... ज्यांच्याकडे ती आहे ते गृहस्थ खूप वयस्कर आहेत ना... मग म्हटलं आपणच यावं... खूप जुनी आहे...
तू कविता करतेस का गं... अजून?''
""नाही जमत आता...''
तिने भिंतीवर लावलेल्या राधा-कृष्णाच्या पेंटिंगकडे बघत विचारलं... ""आणि तू पेंटिंग बंदच केलं असशील ना?''
त्याने फक्‍त मान डोलावली...
""चल, माझी चारची ट्रेन आहे. मी निघतो आता...''
तो निघायला उठला तशी तीही उठली. ""चहाही नाही घेतलास आणि चाललास...''
""माझ्याऐवजी तू घे! पोचेल मला...'' गिळता गिळता त्याच्या तोंडातून सांडलंच.
""हं...''
""पण चहा करताना केवळ दूध उकळू नको म्हणजे झालं...''
तो उठला. जसा आला तसा निघून गेला.
त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत ती किती काळ उभी होती कोणास ठाऊक. मग ती उठली. किचनमध्ये गेली. चहाच्या डब्यात चहा नव्हताच. संजय होता तोपर्यंत घरात चहा असायचा तरी. संजय गेल्यापासून चहा आणणंही बंद झालं होतं. आज तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं.
चहा प्यायची खूप तलफ आली होती.

"सकाळ'च्या 10 ऑक्‍टोबरच्या स्मार्ट सोबतीमध्ये प्रसिद्ध झालेली लघुकथा

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

यावेळीही गाडी चुकली


खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते ज्येष्ठ साहित्यीकास निवडण्याचा आणि अध्यक्षपदाचाच सन्मान ठेवण्याची संधी यावेळीही साहित्य महामंडळाने गमावली आहे. एकच चूक वारंवार करण्यात खरे तर महामंडळाइतकी दुसरी संस्था नसावी.
चार-सहा टाळक्‍यांनाच मतदानाचा अधिकार असलेल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ साहित्यीक उतरण्यास तयार नसतात. त्याचा फायदा घेऊन अगदी "टुकार' लोक निवडून आल्याचा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती यावेळच्याही साहित्य संमेनलनात होणार नाहीच असे नाही. प्रा. फ. मु. शिंदें यांचा अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणूक रिंगणात उरलेली तीनही नावे तशी खूपच डावी आहेत. खरे तर त्यांची साहित्यीक वाटचाल तपासून बघितली तरी त्यात त्यांनी "अखिल भारतीय मराठी' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्जच भरला याचेच कौतुक वाटते.
साहित्य संमेलनाचा मेळावा दरवर्षी भरतो. (आठवा, बाळासाहेब ठाकरे यांनी याला बैलमेळा म्हटले होते.... त्यावेळी सगळे साहित्यीक तुटून पडले होते... नंतर त्यांच्यात इतक्‍या लाथाळ्या निर्माण र्झाल्या की बाळासाहेबांनाही वाटलं असेल अरे आपण तर बैल म्हटलं होतं... ही तर लाथा घालणारी गाढवं निघाली...) तर हा साहित्य संमेलनाचा मेळावा दरवर्षी भरत असतो. त्यात येरेगबाळे- पोट्‌टे सोट्‌टे आपले विचार मांडत असतात... वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनेलच्यादृष्टीने मजकुराचा भाग होतो आणि हौशी कवी, नवोदित लेखकांना झब्बा कुर्ता घालून आपण मोठे साहित्यिकच आहोत असे मंडपातून फिरताना वाटते... अयोजकांना मलई खायला मिळते शिवाय अत्तराचा फाया लावून इकडे-तिकडे बागडत मिरवायला मिळते... राजकारण्यांना भाषणं ठोकायला व्यासपीठ मिळते. गावातील रिकाम टेकड्यांना वेळ जायला साधन मिळते. साहित्य प्रकारच्या काही प्रमाणातील उथळ चर्चेशिवाय बाकी सगळ्या गोष्टींचा उहापोह मात्र चांगला होतो. बाकी साहित्यविषयक संमेलनात काहीच घडत नाही. त्यामुळे साहित्य संमेनलनांना चर्चेत आणण्यासाठी कधी नथुरामला पत्रिकेवर आणले जाते तर कधी परशुरामाच्या कुऱ्हाडीला, कधी तुकारामांच्या पुस्तकावरुन वाद होतो तर कधी स्वागत अध्यक्ष कोणी राजकारणीच असल्याचे बघुन सुत्रेच द्यायला माजी साहित्य संमेलनाध्यक्ष नकार देतो... एकूण काय साहित्य संमेलन नसून ते आता भंगार संमेलन झाले आहे. यंदा तर हे भंगार संमेलन होण्याची सुरवात अर्ज भरण्यापासूनच झाली आहे. साहित्य संमेलनाचा अर्ज भरणाऱ्यांपैकी तीन जणांना तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनताच काय पण साहित्याशी निगडीत असलेले लोकही ओळखत नाहीत.
त्या बाई.... नाव काय ओ त्यांचं... वर्तमानपत्रात ललीत विभागात काम करणाऱ्या संपादकीय मंडळींनी केलेला हा प्रश्‍न प्रभा गणोरकर यांच्याबाबतीत केलेला असून तो अनेक गोष्टी सांगून जाणारा आहे. (स्त्रीवाद्यांनी लगेच ओरडायला सुरवात करू नये... हा स्त्रीत्वाबद्दल नाही तर त्यांच्या लेखन कारकिर्दीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारा प्रश्‍न होता..) चार-सहा पुस्तके आपल्या नावावर लागली आणि डोक्‍यावरचे केस थोडे पांढरे झाले, आणि चारसहा कार्यक्रमात यजमानांसोबत फिरले की लगेच हे स्वतःला ज्येष्ठ वगैरे समजतात आणि कुठल्याही निवडणुकीत भाग घेतात... अरुण गोडबोले यांचे लिखाण तर वर्तमानपत्रीयच आहे.. खरे तर ते वर्तमान आणि पत्री असेच आहे.. ते लिहिले त्याच्या दुसऱ्या दिवशीच उडाले होते...आपण मराठी भाषेत असे कोणते साहित्य निर्माण केले की, पुढच्या शंभर वर्षांनंतरही आपण लिहिलेल्या हजारो कचरा पानातील चार ओळी तरी महाराष्ट्राच्या घरा-घरांपर्यंत पोचल्या असतील... एकही नाही...मग कशाला हा अट्टहास? त्या अरुण गोडबोले यांनी एका पुस्तकावर लेखकाच्या नावाखाली आपल्या अनेक डिग्य्रा लावल्यात.(डिग्रीचे अनेक वचन डिग्य्रा होतं का ओ...) त्यात अमुक तमुक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ही पाटीही उपयोगी ठरावी यासाठी अट्टहास दिसतो. त्यांची पर्यटनाची पुस्तके चाळण्याचा मोह एकदा झाला होता; पण तोही त्या गणोरकरबाईंच्या कवितांसारखाच अनाकलनीय असल्याने सोडला... (गणोरकरच ना त्या... )
या दोघांपेक्षा सर्वात मोठा विनोद म्हणजे संजय सोनवणी यांनी साहित्य संमेलनाचा अर्ज भरला आहे... (आम्हाला जातीयवादी रंग येतोय का?) संजय सोनवणीच ना? आम्हाला यांची नावेच माहीत नाहीत. हे कोण तर प्रकाशक. हे प्रकाशकांच्या मेळाव्याचे अध्यक्ष होऊ इच्छित आहेत काय? ... नाही. हे मग विचारवंत... अरेच्चा साहित्यिक आणि विचारवंत वेगळे असतात का? संजय सोनवणी हे फेसबुक आणि ब्लॉगवरच्या लोकांना माहिती आहेत म्हणे...बामणांना शिव्या घातल्या की, चार लोक लाईक करतात.. आठ लोक प्रतिक्रिया देतात आणि दहा लोक तुम्हाला निधर्मी वगैरे म्हणतात. (हे जैनधर्मीयांच्या मेळाव्यात जाणार आणि तिथे आम्हाला अल्पसंख्याक म्हणून फायदे द्या म्हणणार; परत मला जातीयवादाचा रंग येतोय) त्यांच्यासोबत असणाऱ्यांची नावे आणि जात तपासावी का हा विचार आमच्या मनात आला; पण आम्ही तो कटाक्षाने टाळला... तरीही यांनी असं काय लेखन केले की, यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वगैरे करावे...यांची म्हणे 80 पुस्तके आहेत... (एखादी औदुंबरसारखी कविता लिहिली असती तरी पुरे झाले असते.) पुस्तके प्रकाशीत कशी होतात. त्याच्या पहिल्या आवृत्त्या कशा खपविल्या जातात याबाबत एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. त्यामुळे तो विषय आम्ही घेत नाही.. (यांनी म्हणे, आणखी कसला तरी भंगार व्यवसायही केला होता. आम्ही भंगार व्यवसाय म्हटलंय, भंगाराचा नाही...) त्यामुळे छे.. पटत नाही बुवा..
आता हे लोक त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार ज्या खुर्चीत दुर्गा भागवत बसल्या होत्या, ज्या खुर्चीत पु. ल. देशपांडे बसले होते, ज्या खुर्चीत आचार्य अत्रे बसले होते. ज्यांनी साहित्याला वळण लावले. विचार कसा निर्भिड असतो हे सांगितले. तेथून हे लोक मारे गप्पा मारणार मराठी जगली पाहिजे याच्या...
तुमच्या हातात जर मराठी साहित्याचा दोर दिला तर तो तुटणार हे नक्‍कीच... 

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

स्वतंत्र

इथे सही करा... वकिलाने कागदाच्या तळातील जागा दाखविली...
तिने निमूटपणे पेन उचललं आणि सही केली...
""हां... पोटगीदाखल तुम्हाला दरमहा दहा हजार, तुमच्या नावे असलेली कार आणि तुम्हाला घातलेले दागिने तुमच्याकडेच राहतील. तरीही तुम्हाला आणखी काही हवे असल्यास साहेबांनी सांगायला सांगितले आहे... मी इथे दोन ओळींची जागा शिल्लक ठेवली आहे...'' वकील ब्ला ब्ला ब्ला बोलत होता... त्याच्या बोलण्याकडे तिचे जराही लक्ष नव्हते...
""आणखी कुठे सही...?'' तिने प्रश्‍न केला.
""तुम्हाला आणखी काही नको?''
""नको! जेवढं दिलंय तेच खूप आहे...''
वकिलाने पेन पुढे केलं.. सहीची जागा दाखविली... ""हां इथे सही...''
तिने निमूटपणे पुन्हा सही केली...
""हं, झालं...''
""साहेब नाही आले...?'' तिने वकिलाकडे बघितले.
""तुम्हाला भेटायचे आहे त्यांना?''
""हो!''
वकिलाने फोन लावला... तो तिथेच कुठे तरी असावा. अगदी भेटायला व्याकूळ असल्यासारखा तो पटकन समोर आला.
तिने त्याच्याकडे बघितले. काहीतरी बोलायला हवे म्हणून ती म्हणाली, ""झाल्या सह्या.''
""हं...'' त्याने फक्‍त हुंकार दिला.
""आता?''
""आता काय?''
""काही नाही...'' तिला प्रचंड अवघडलेपण आलं होतं...
""तुला या वेळी इथे बोलावलं म्हणून अडचण नाही ना झाली... म्हणजे तुझ्या ऑफीसमुळे..'' त्याने जितकं थंड राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न केला.
""न.. नाही... नाही...'' तिनेही सावरून घ्यायचा प्रयत्न केला...
""उलट केतकर आलेत सोडायला... त्यांच्याच गाडीतून आले इथे...''
तिच्या या वाक्‍यासरशी तिच्यावर रोखलेले त्याचे डोळे अलगद बाजूला गेले...
""हं..'' त्याने पुन्हा हुंकार दिला...
""ऑफिसच्या ड्रायव्हरकडून गाडी पाठवून देते...'' ती काही तरी बोलायचे म्हणून बोलली..
""नको नको... ती राहू दे तुझ्याकडेच... मी लिहिलंय त्यात... गाडी तुझ्याकडेच राहावी म्हणून... ती तुझ्याच नावावर आहे ना?''
""नकोय मला खरं... मी तुझ्या नावावर करून देईन..''
""पण...''
""जाऊ देत... तुला एक विचारायचं होतं...''
""तू या सह्यांसाठी आजचाच दिवस का निवडलास...?''
""काही खास नाही... वकिलाला वेळ होता म्हणून..'' त्याने तिच्याकडे न बघता उत्तर दिले...
तिनेही मग ताणले नाही...
""चल... जाऊ मी आता...'' त्याने आपला वरचा ओठ दातांत दाबला आणि फक्‍त मान डोलावली...
तो तिथेच थांबून होता...
न बघता ती पायऱ्या झपझप उतरली आणि गाडीत बसली... गाडीत बसताना तिला जाणवलं की तो तिच्याकडेच बघत आहे.....
गाडी सुरू झाली.... तिने पर्समधून रुमाल काढला आणि डोळे पुसले....
केतकरांकडे बघत म्हणाली.. ""थॅंक्‍स...''
""कशाबद्दल....?''
""आज तू होतास म्हणून त्याने अडवले नाही... आणि त्याने अडवले नाही म्हणून मी त्याला सोडू शकले...''
केतकरने फक्‍त मान हलवली....
""पण काय गं... घटस्फोटाचे हे पाऊल उचलण्याची खरंच गरज होती?''
""नाही... पण माझ्यासमोर याशिवाय पर्यायच नव्हता..''
""पण यामुळे तो कोलमडला नसेल?''
""हं... तो काय, मी नाही कोलमडले... पण आता सुखाने मरेल तरी...!''
""तुला आठवतं, आठ वर्षांपूर्वी याच दिवशी तू आमच्या लग्नाचा साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्यास...''
माणसाने खरेच एवढे प्रेम करू नये!
""मीही प्रेम केलं.. अगदी स्वतःपेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर केलं.. मला नाही तरी दुसरं कोण होतं प्रेम करण्यासारखं.. पण तरीही त्याच्याइतकं प्रेम करणं मला नाही जमलं...
तुला माहीत आहे... आमच्या घरातील एकही वस्तू त्याच्या नावावर नाही... घर, कार, साधा टेलिफोनसुद्धा माझ्याच नावावर...
त्याला एकदा विचारलं, का रे! सगळी कामं मला करायला लावायला तू लग्न केलंस की काय?
त्यावर तो एवढा अपसेट्‌ झाला होता... म्हणाला, नाही गं... प्रत्येक वेळी तुझं नाव लिहायला मिळावं म्हणून मी सगळ्या वस्तू तुझ्या नावावर केल्यात...
स्वयंपाक करत असताना ओट्याशेजारी खुर्ची ठेवून बसायचा...
काय रे, एवढं काय आहे माझ्यात? असं म्हटलं की नुसता हसायचा... काही बोलायचा नाही...
मी पुन्हा नोकरी करते म्हटल्यावर लगेच त्याने तुला फोन केला... मला यायला-जायला त्रास होऊ नये म्हणून कार घेतली....''
""हं...'' केतकरने हुंकार सोडला...
""आठ महिन्यांपूर्वी त्याची डायरी वाचली नसती तर....''
तिने हुंदका दाबायचा प्रयत्न केला... पण जमलं नाही...
""तो मरणार यात शंका नाही; पण तो रोज मरताना मला बघवणार नव्हतं.... आणि त्यालाही आता आपलं रोजचं मरण लपवताना त्रास नाही होणार, कामाच्या टूर काढून दिवसेंदिवस बाहेर राहावं लागणार नाही...''
केतकरने तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला... पण तिने हलकेच तो बाजूला घेतला...
""डायरीत त्याने लिहिलेलं वाक्‍य तुला सांगितलेलं आठवतंय?''
""...एका बाजूला हाडांच्या सांध्यात लपून राहिलेला हा कॅन्सर मला जगू देणार नाही. जगात माझ्यानंतर कोण हिचे? कसे होईल हिचे? अनाथाश्रमाच्या पायरीवर सोडून जाणारी आई आणि मध्यात संसार सोडून जाणारा मी यांत फरक तो काय? ती किमान बरी तरी... ओढ लावून गेली नाही... मी मात्र प्रेमाचे जाळे तिच्याभोवती विणून आता निघून जातोय...''
तिला बोलता येत नव्हते...
केतकरने गाडी थांबवली.. ती गाडीतून उतरली....
दहा वर्षांपूर्वी मी याच होस्टेलवर राहात होते... तुला आठवतं... माझ्यासारख्या अनाथ मुलीवर त्याने इतकं प्रेम केलं, की मला पुन्हा अनाथ करताना त्याचा जीव गुदमरायला लागला होता रे... मी समोर असताना त्याला त्याचा शेवटचा श्‍वास घेणंही जड जाईल.... लोक मला कृतघ्न आणि नालायकही म्हणतील. पण मी त्याला सोडलेलं नाही... त्याच्या गळ्याभोवती माझ्या प्रेमाचा फास लागलाय तो थोडा सैल केला इतकंच... तो
स्वतंत्र होईल... पण मी मात्र कायमची अडकेन... 

शुक्रवार, ५ जुलै, २०१३

प्रिय,

बाहेर ज्येष्ठातला पाऊस अखंडपणे कोसळतोय. रात्रीच्या या काळाखोत पावसाचा तेवढा आवाज ऐकू येतोय.. जणू आता सगळं आपल्या मिठीत घेऊन वाहून नेण्यासाठी आतुर असलेला हा पाऊस कधी थांबेल की नाही असंच वाटू लागलंय. रात्र, बाहेर मुसळधार कोसळणारा पाऊस, अशावेळी एकटं वाटतं. हा एकटेपणा दूर करण्याचा एक पर्याय असतो तो म्हणजे तुला पत्र लिहिण्याचा. पत्राच्या सोबतीने तुला सोबतीला आणण्याचा.. या मिट्ट अंधारात टेबलावरची ही मेणबत्ती आपल्या तुटपुंज्या शक्‍तीने तेवत आहे. खिडकीतून येणाऱ्या ओलसर वाऱ्याला न जुमानता तिची जगण्याची लढाई सुरू आहे. कधी कधी तिची ज्योत थरथरते, पण तेवढीच... पुन्हा ती ताठ मानेने तेवत राहते. अगदी थकलेल्या म्हातारीसारखी ती करारीपणे जगत आहे...
संध्याकाळची गोष्ट... दुपारपासूनच सुरू असलेल्या पावसाने सगळीकडे पाणी पाणी केले होते. झाडांवरून पावसाच्या पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या. इथे आमच्या घराच्या समोरच्या झाडावर असाच एक कावळा आपल्या सर्व शक्‍तीनिशी पावसाशी लढत असलेला मी बघितला.
आपल्या कोवळ्या काळ्या पंखावर पावसाचे बाण सहन करत तो फांद्यांच्या आधाराने पावसाच्या डोळ्यांत डोळा घालून बसला होता..त्याचे ते काट्या-कुट्याचे घरटे खाली कोसळले होते... फांद्यांचा आडोसा अपुरा पडत होता... त्याच्या तलम काळ्या पंखांचा आता पार झाडू होऊ गेला आहे. हे त्यालाही माहीत होते, पण तरीही त्याने आपली फांदी सोडली नव्हते... तिथून अगदी एका झेपेच्या अंतरावर माझ्या घराची बाल्कनी आहे. त्यात तो आला असता तरी त्याला कोणी हुसकावून लावले नसते तरी तो त्या झाडावर बसून राहिला. आपल्या मोडतोडत्या घरट्याकडे बघत. पावसाचे टपोरे थेंब आपल्या पंखावर झेलत. आताही तो या किर्र अंधारात त्याच फांदीवर तिथेच तसाच पडून असेल नया ज्येष्ठातल्या पावसाला तशी माया कमीच... तू म्हणायचीस नेहमी... "" मला वळिवाचा पाऊस आवडतो, कारण तो येतोच मुळी नाद करत, ढोल-ताशे घेऊन. येताना वाजत गाजत येतो आणि जाताना सगळा कचरा आपल्यासोबत नेतो, उन्हाने रापलेली मनं आणि तापलेल्या जमिनीला तृप्त करुन मागे ठेवतो फओलावा. ज्येष्ठ-आषाढ हे निमंत्रितांसारखे येतात. आपल्या ठराविक जागेवर बसतात आणि उठतात. कोसळतातही कर्तव्य केल्यासारखे. त्यांना माया नसतेच.'' खरंच आहे तुझं. आता बघ हा पाऊस येता तसाच. अगदी आपल्या कामाचे आठ तास मोजून भरावेत, यासाठी जणू केव्हापासून कोसळतो आहे.. त्याबरोबर आता वाराही जोराचा सुटला आहे.... मघापासून धीराने वाऱ्याचे आव्हान पेलणारी मेणबत्ती आता जास्तच थरथरू लागली आहे. या लढाईत ती जिंकणे अशक्‍य आहे. त्यामुळे आता पत्र अपुर्ण ठेवून झोपेला जवळ करणे हेच उत्तम...!
सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मला त्या आपल्या काट्या-कुट्याच्या घरट्याकडे बघत फांदीवर पाऊस झेलणाऱ्या कावळ्याची आठवण आली..
पत्र पूर्ण करावे की कावळ्याला बघावे या द्विधा अवस्थेत होतो. पण पहिल्यांदा तो कावळा बघावा आणि मग पत्राला हात घालावे असे वाटले म्हणून मी अंगणात गेलो. अंगणात त्या झाडाखाली पडलेल्या काट्या-कुट्याच्या घरट्याशेजारी तो कावळाही अचेतन होऊन पडला होता. त्याचे पंख त्या विस्कटलेल्या घरट्यासारखेच विस्कटले होते. त्याच्याच कडेला दुपारी पोरांनी सोडलेल्या नावांचे कागद. मला आता कळतंय की तुला ज्येष्ठ-आषाढातला पाऊस का आवडत नाही... कावळ्याची घरे ज्येष्ठ-आषाढातच कोसळतात... आणि कधी कधी कावळेही....!

                                                                                                                                                  तुझाच....

शुक्रवार, १० मे, २०१३

प्रिय,



कशी आहेस? काही प्रश्‍न हे उगाचच विचारले जातात ना? त्या प्रश्‍नांना तसा अर्थ नसतो. त्याची उत्तरे माहीत असतात. पण तरीही सुखात! हा शब्द ऐकण्यासाठी कान नेहमीच आतुर असतात. अनेकदा कानाचे आणि मनाचे पटत नाही; पण कानावर जास्त विश्‍वास ठेवावा लागतो. मागच्या वेळी मी ग्रेसबद्दल लिहिलं होतं. आठवतं... ग्रेस मनात शिरता शिरत नाही आणि एकदा शिरला की तो निघता-निघत नाही... तो रेंगाळत राहतो... त्याचे आर्त शब्द कानांत घट्ट आवाज करून राहतात.. अनेक अर्थांचे शेले ओढून आणलेले ते शब्द आपले सगळे शेले हळुहळू सोडून देतात...
अगदी हवेत शब्दांना फेकावे आणि त्या शब्दांना त्याने शब्दांनीच तोलून धरावे असे काही... पण केवळ शब्दांच्या आणि प्रतिमांच्या प्रेमात पडलेला हा कवी नव्हता. तो जपणूकदार होता... आपल्या सगळ्या जखमांची जपणूक करायचा. ग्रेस यांनी आपल्या शेवटच्या काळात लिहिलेल्या ओल्या वेळूच्या बासरीचे सूर आता माझ्या कानात घुमत आहेत... खरे तर ही कला त्यांनाच जमू शकते... पोकळ वेळूत कोणीही फुंकर मारून सुरांना आळवू शकते... ग्रेस प्राणांनी फुंकतात... त्यामुळे ओल्या वेळूची बासरीही मग सूरमयी होऊन जाते... दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत असताना ग्रेस यांच्या श्‍वासातून उमटलेले हे सूर आहेत. मला त्यात आर्तता दिसते. कधी भूतकाळाशी नाते जोडण्याचा प्रयत्न दिसतो. प्रतिमांच्या चौकटीतून जगाला बघणारा हा कवी प्रतिमांची चौकट एवढी मोठी करतो, की त्यात आपणही सामावून जातो. कधी कधी वाटते, की तो हा प्रतिमांचा पसारा सगळा आवरून, छे! उधळून देऊन मुक्‍तपणे लिहितो की काय? पण पुन्हा तो मागे फिरतो आणि प्रतिमांमध्ये अडकत राहतो. कर्करोगासारखा असाध्य रोग झालेला असताना जगण्याच्या भूतकाळाच्या पाटीवर पुसलेल्या आठवणींच्या रेषा त्यांना आठवत नसतील, असे म्हणणे म्हणजे तो त्यांच्यावरच अन्याय आहे. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक लेखांत जणू याच रेषा त्यांनी ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना पुन्हा प्रतिमांची चौकट घातली आहे इतकेच! या प्रतिमांच्या चौकटीत त्यांना सापडला तो देवदास... कर्करोगाशी हॉस्पिटलमध्ये झुंज देत असताना, त्या औषधांच्या आणि फिनेलच्या वातावरणात त्यांना देवदास का आठवतो?... तो केवळ आठवत नाही तर तो समग्र आठवतो. त्याच्या मनाच्या कप्प्यांसह आठवतो... चार दशकांहून अधिक प्रवास केल्यानंतर अगदी शेवटी त्यांना आठवतो तो देवदास... तोच देवदास जो पार्वतीच्या प्रेमात अखंड बुडालेला आहे... पण का? देवदासच का आठवला?
...ही देवदासाची मरणवाट नाही तर हा पार्वतीव्यतिरिक्‍त उरलेल्या जीवनसलगीचा एकमेव घाट आहे, अशी ओळ लिहिणाऱ्या ग्रेस यांना पार्वतीबरोबर घालवलेले क्षण जितके देवदासला आठवतात किंबहुना छळतात तितकेच ते छळतात जणू... गंमत आहे बघ... मला यांमध्ये प्रतिमांच्या जंजाळात अडकवून हलकेच आपले सांगणे पोचविण्याचा प्रयत्न दिसतो. तो तर त्यांच्या लेखनशैलीचा अविभाज्य घटक होता, पण यावेळी त्यांनी निवडलेल्या प्रतिमा सामान्य डोळ्यांच्या माणसांनाही स्पष्ट दिसतात... देवदासचे दुःख सगळ्यात मोठे का वाटते? कारण तो पार्वतीवर आसक्‍त नाही... आसक्‍ती ही प्रेमाची पायरीच असू शकत नाही... शरदचंद्रांनी लिहिलेल्या 1917 च्या या कादंबरीच्या नायकाचे आणि नायिकेचे अंतरंग कळण्यासाठी प्रेम करायला हवे... पार्वती आपल्याला मिळणार नाही, म्हटल्यावर देवदास कोलमडतो... ग्रेस म्हणतात, जगाकडून आलेली समीकरणे अनेक असतात. गोमेचा एक पाय तुटला म्हणून काय झाले... पण गोमेच्या अनेक पायांपैकी एक पाय तुटल्यावर तिच्या जीवाचा समग्र आकृतिबंध शबलित होतो, कलंकित होतो त्याचे काय? किती सहजतेने खरे सांगून टाकले... काय झालं... आयुष्य थांबतं का कोणासाठी? जगणं म्हणजे एवढंच का? हे सरळ नियम लोकांनी कुबड्यांसारखे निर्माण केले आहेत. त्याला उत्तरे देण्याची गरज नसते... जगण्याची रीतच अशी, की त्यात आकृतिबंध तुमचा हवा... अगदी तुझा हवा... पण तसं होत नाही... गोमेचा पाय करून टाकतात... आणि प्रश्‍नाची कुबडी हातात देऊन टाकतात... कुबड्या कधीच पायाची जागा घेऊ शकत नाहीत... त्या आधार देतील; पण पाय नाही होऊ शकत... आणि त्या चालण्याला प्रवास म्हणायचं की आयुष्य... खरे तर ते खुरटत चालणं... ढकलणं...
मी डोळे मिटून बघतो... अगदी आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असावा, या कल्पनेने डोळे मिटतो... आता या क्षणी मिटलेले डोळे कायमचे मिटले तर त्या अखंड अंधाराच्या प्रवासात डोळयांच्या पटावर कुठले चित्र उमटेल याचा मी विचार करतो, त्यावेळी तुझा एकच चेहरा दिसतो... अगदी हसरा... सोबत देणारा... त्या मिटलेल्या पापण्यांवर आपले गरम ओठ टेकवणारा... कदाचित हा कल्पनेचा खेळ असावा. आपण मिटलेले डोळे उघडले जाणार आहेत, याचा विश्‍वास कुठेतरी मनात खोल रुतून बसलेला असतो. त्यामुळे त्याचे काही वाटत नाही... पण खरोखर आपला मृत्यू समोर दिसतोय हे बघितल्यावर माणसाच्या मनात नेमके काय येत असेल...?

इथे आठवतो तो भीष्म... शरशय्येवर पडलेला भीष्म... उत्तरायणाची वाट बघणारा भीष्म... स्वतःच्या बापासाठी राजगादीवर लाथ मारून अखंड ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करणारा देवव्रत, भावासाठी राजकुमारींना पळवून आणणारा भाऊ, सत्यवतीने कुरूवंशवाढीसाठी प्रतिज्ञा मोडण्यासाठी भरीस घालूनही न बधलेला भीष्म... परशुरामासारख्या योद्‌ध्यासमोरही हार न पत्करणारा पण द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी गप्प राहणारा भीष्म... शरशय्येवर पडलेल्या आणि उत्तरायणाची वाट बघणाऱ्या भीष्माच्या डोळ्यासमोर काय येत असेल...? त्याच्या दीडशे वर्षांच्या आयुष्याच्या कुठल्या गोष्टी अगदी ठळक दिसत असतील... बापासाठी भीष्मप्रतिज्ञा केल्याचा दिवस की त्यानंतरचा दिवस...? राजा प्रदीपचा नातू आणि शंतनू-गंगेचा मुलगा देवव्रत याने आपल्या ताकदीच्या मनोनिग्रहाच्या जोरावर प्रतिज्ञा घेतली खरी; पण... त्या रात्री त्याला खरंच झोप लागली असेल...? त्याच्या डोळ्यांतही एखादा चेहरा तरळला नसेल का? मला वाटतं... शरशय्येवर आडवा झाल्यावर भीष्माच्या डोळ्यासमोर तोच चेहरा दिसत असणार... आठवणींचा गुंता झाला असणार... त्या प्रत्येक बाणाबरोबरची टोचणी त्याला जाणवत असणार... तो कोणाचा तरी देवव्रत होता... कधी तरी कोणीतरी देवव्रताच्या मनाच्या झरोक्‍यात प्रवेशलं असणार आणि भीष्माच्या प्रतिज्ञेच्या ओझ्याखाली ते दबून गेलेलं... मृत्यूशय्येवर पडलेल्या भीष्माला माफी मागावी वाटली असेल का? खरे म्हणजे तो राजगादी सोडून बाकीचे राजवैभव उपभोगत होता. पण त्यात त्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन का केले? सत्यवतीने विनवूनही त्याने विचित्रवीर्याच्या बायकांना का हात लावला नाही... कुरुवंशाचे खरे रक्‍त त्याच्या नसा-नसात वाहत असताना त्याला व्यासाचा आधार का घ्यावा वाटला? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला की ती त्या मनाच्या झरोक्‍याशी येऊन मिळतात. त्याने घेतलेली शपथ जर आणखी कोणाच्या भाळी लिहिली गेली असेल तर त्याचा उल्लेख महाभारतात नाही; पण त्यावेळी तो अस्तित्वात नसेलच कशावरून... आपल्यामागून असं फरफटलेलं आयुष्य त्याने कदाचित बघितले असेल... आणि त्याचा दोषी तोच होता... त्यामुळेच तर त्याला त्या बाणांची टोचणी फार लागली नाही. त्यापेक्षा मोठी टोचणी त्याला लागून राहिली होती. ग्रेस म्हणतात तसे गोमेचा एक पाय... त्याने एक पाय तोडला पण पुन्हा जे कलंकित आयुष्य त्याच्यासाठी भोगावे लागले त्याचे काय? देवव्रताचा भीष्म झाला... तसेच कोणीतरी हे व्रत आपलेच समजून जगले नसेलच असे नाही... कदाचित त्या चेहऱ्याला पुन्हा बघण्यासाठीच उत्तरायणाचा बहाणा करून भीष्म जिवंत राहिला नसेल कशावरून...?

मंगळवार, २ एप्रिल, २०१३

प्रिय,


हे पत्र 26 मार्चला लिहिलं होतं.....फक्‍त पोस्ट आता करतोय....


प्रिय,
आज 26 मार्च. बरोबर याच दिवशी वर्षापूर्वी एक प्रतिभावंत आत्मा आपला देह सोडून आपल्या जगात निघून गेला. ग्रेस त्याच्या जगात निघून गेला. खरे तर तो इथे कधी रमलाच नाही. तो इथला कधी नव्हताच, त्याचे जग वेगळे. तो त्या आपल्या जगात निघून गेला. ग्रेस गेला. माणिक गोडघाटे नावाच्या माणसाचा देह त्याने त्यागला. त्याची इथे घुसमट झाली की नाही माहीत नाही. जाण्याच्या दिवशी त्याचे पाय इथेच राहण्यासाठी थोडे घुटमळले की नाही माहीत नाही; कदाचित थोडे घुटमळले असतील. पण तरीही त्याला आपले पाय सोडवून घ्यायला फारसा त्रास झाला नसेल. खरे तर त्या दिवशी तो फक्‍त आपल्या दृष्टिआड झाला. ज्या दिवशी माणिक गोडघाटे नावाच्या देहाला "ग्रेस'ची ओळख पटली, त्याच दिवसापासून त्याचा त्या गूढ अंधारात जाण्याचा प्रवास सुरू झाला होता. या प्रवासात तो एकटा निघाला खरे; पण त्याला तो एकट्याचा प्रवास नको होता. त्या प्रवासात सोबत येण्यासाठी त्याने अनेकांना शब्दांच्या माध्यमातून साद घातली; पण ती साद ऐकण्याचे कान फार थोड्याच जणांकडे होते. जी. ए. कुलकर्णींकडे तो कान होता. पण जी. ए. तर त्याच्याआधीच त्या अंधारात निघून गेले होते. त्यांच्या जाण्याने त्या अंधाराला सोनेरी किनार लागली होती. तरी ग्रेस
बाकीच्या लोकांना साद घालत राहिला, वाट दाखवत राहिला. आपल्यासोबतीने येण्याचे आमंत्रण देत राहिला; पण त्या वाटेवरून चालण्याचे धाडस फारसे कोणी करू शकले नाही. तो कंठाच्या मुळापासून साद देत राहिला; पण त्या सादेतील आवाज बहुतांश जणांच्या कानापर्यंत पोचत नव्हता. ज्यांच्या कानापर्यंत पोचत होता, त्यांनाही त्यात अधिक गोंधळच जाणवायचा. त्यामुळे त्याच्या त्या वाटेला कोणी गेले नाही. खरे तर ग्रेस इथे रमलाच नाही. तो इथे रमला असता तर माणिक गोडघाटेच्या देहाची ग्रेसशी ओळख झाली नसती. तो ग्रेस होता. आपल्या भाळावरची जखम तो अशी दाखवी, की समोरच्याला ती जखम न वाटता नक्षीदार गोंदण असल्याचे वाटून जाई. ग्रेस गेला. पण जाताना त्याने जखमांची केलेली गोंदणे तशीच ठेवून गेला. इथे इतकी वर्षे राहिल्याचे ते कदाचित देणं असेल. तशी त्याने कोणतीच देणी बाकी ठेवली नव्हती. त्या देण्यावर कित्येक पिढ्या गुजराण करू शकतील. अर्थात ही संपत्ती वापरण्यासाठी त्याचा वारसा सांगणारे हवेत, ते मिळोत म्हणजे झाले. मला ग्रेसचा वंश वाढलेला बघायचा आहे. जखमा जपाव्यात तर ग्रेसने. भळभळत्या जखमेवर तो हलकेच फुंकर घालतो आणि नकळत भरत आलेल्या जखमेत नखही खुपसतो. त्याला जखमेची वेदना सहनही होत नाही आणि तो तिला सोडतही नाही.
तो असा का? हा प्रश्‍न नाही, कारण तो ग्रेस. ग्रेस मनावर उमटतो. ग्रेसचा मुक्‍काम तिथे. त्याला जर मेंदूच्या खिडकीतून बघायचा प्रयत्न केला तर त्याचा चेहरा धूसर होत जातो. दाढीआड लपवलेल्या चेहऱ्यावरच्या वेदनांच्या खुणा अस्पष्ट होत जातात, नव्हे तर चेहराच अस्पष्ट होत जातो. त्यामुळे त्याचा मनावरचा मुक्‍काम हलवू नये. खरे तर सगळीच मनावरची घरटी उचलून मेंदूच्या पेशींवर ठेवली तर ती टुमदार दिसतात खरी; पण त्यांच्या भिंती ठिसूळ होऊन गेलेल्या असतात. त्यामुळे अशी घरटी मेंदूच्या पेशींवर रुजत नाहीत. त्यांना मनावरच ठेवून द्यावे. अगदी मोडक्‍या-तोडक्‍या अवस्थेत त्यांना तिथेच रुजू द्यावे. ग्रेस अशी घरटी करणारा खरा "क्रिएटिव्ह'. तो म्हणायचाही creativity is my life and its conviction is my character...' ग्रेस असं बोलून जायचा आणि मग त्याचा अर्थ समजावत-बिमजावत बसायचा नाही. याचा अर्थ काय काढायचा माणसानं? conviction चा अर्थ डिक्‍शनरीत खूप गंमतीदार आहे; एक तर शिक्षा किंवा दृढ विश्‍वास. गम्मत म्हणजे ग्रेसला दोन्ही लागू होते. त्याला नेमके काय म्हणायचे होते? पण त्याचा त्याच्या निर्मितीवर असलेला दृढ विश्‍वासच जास्त महत्त्वाचा वाटत असणार. खरे तर त्याला love is my life असं म्हणायचं असणार. खूप मोठ्या माणसांनाही सगळ्याच वेळी सगळंच खरं कुठे बोलता येतं. तो प्रचंड प्रेमी होता. कशावरून विचारलंस तर सांगता येणार नाही. पण होता खरे. प्रेमी फक्‍त प्रेम करणाऱ्यांनाच म्हणायचे? मला नाही पटत, प्रेमासाठी भुकेलेल्यांना, ज्यांचा शोध अखंड सुरू असतो त्यांनाही प्रेमीच म्हणायला हवे. ग्रेस शोधणारा... प्रत्येकाचा शोध वेगळा. ग्रेसचा मार्ग वेगळा. त्यामुळे त्याच्या कवितांमधून उमटणारा अर्थ प्रत्येकाला वेगवेळा लागतो. ज्यांच्या मनापर्यंत ती कविता पोचली, त्यांनी त्या कवितेला आपल्यापरीने अर्थ लावले. काही कविता आपण कधी ऐकतो, कोणाच्या तोंडून ऐकतो यावरही त्याचा अर्थ अवलंबून असतो का? "भय इथले संपत नाही...' ग्रेसचीच कविता. तुझ्या तोंडून ऐकलेली... त्यापूर्वीही बऱ्याचवेळा ऐकली होती आणि त्यानंतरही बऱ्याचवेळा ऐकली. पण काळजाच्या खोलीत शिरली ती तुझ्या तोंडून ऐकलेली. तसे सगळेच शब्द. my conviction is my life... असं आज मला म्हणावंसं वाटतं आणि त्याचा नेमका अर्थ काय हे तुलाच शोधायला लावावं वाटतं....
तुझाच...

गुरुवार, २८ मार्च, २०१३

प्रिय,


प्रिय,
दुपार टळली आहे. उन्हाची सरळ किरणे आता तिरपी झाली आहेत. झरोयेणाऱ्या किरणांनी आपल्या पावलांचा वेग वाढविला आहे. इथे खिडकीत बसून आता हे पत्र लिहिताना समोरच्या झाडांवरील पक्ष्यांची लगबग वाढलेली जाणवत आहे. झाडांच्या बुडख्याशी पडलेल्या पानांची सळसळही वाढली आहे. मध्येच कोकिळेचा स्वर ऐकू येत आहे. वसंत आल्याची ती खूण. म्हणजे तसे प्रत्येक ऋतूच्या येण्याचे पडघम वाजतातच. म्हणजे बघ, वर्षा ऋतू येणार असेल तर एखादा वळीव आधीच पडतो. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट सांगत असतो की अरे! पुढे पावसाळा येणार आहे, तयार राहा. पावसाळा ऋतू सम्राटाप्रअसतो, येताना आणि जातानाही शंखनाद होतो. तो येतोही असा, की सगळं आपल्या आधीन करून टाकतो. बाकीचे ऋतू तुलनेत शांत.
आता हेच बघ ना.. हेमंत, शिशिर येतात चोरपावलाने आणि जातातही चोरपावलाने. अगदी आपल्या उत्कर्षाच्या काळात त्यांचे अस्तित्व जाणवते एवढेच. पण वसंत यापेक्षा निराळा. तो येतोही मंद सुरांनी आणि जातोही भैरवी गाऊन.. ही मैफल संपू नये वाटत असतानाच तो निघतो.. हेमंत अजून सरलाही नाही, त्याअगोदरच कोकिळेने आपला तंबोरा लावायला घेतला आहे. झाडांनी आपल्याभोवती पिकल्या पानांचा सडा घातला आहे. फांद्यांवर हळूहळू पालवी फुटू लागली आहे. हे असंच होतं माझं, नेहमी भरकटत राहतो... लिहायचे असते एक आणि लिहितो भलतेच.
तुला माहीतच आहे, ज्यावेळी जे बोलायचे ते बोलता कुठे आले मला? जाऊ देत! तर सांगत होतो, माझ्या घरासमोरच्या शेवग्याची अशीच पानगळती सुरू आहे. त्याची ती इवलीशी पिवळी पाने अंगणात मुबागडत असतात... दिवाळी-दसऱ्याला आपण जशी अंगणात मोठी रांगोळी घालतो तशी ती पानांची स्वैर रांगोळी पसरलेली असते.. आताही खिडकीतून बघताना या पिकल्या पानांची पाठशिवण सुरू आहे. त्यातच मध्ये-मध्ये दिसणारी ही सावरीची म्हातारी म्हणजे लपाछपीचा खेळ खेळणाऱ्या पोरांमध्ये लिंबू-टिंबू पोरं जशी लुडबुडतात तसंच आहे हे. या सावरीच्या कापसाला म्हातारी का म्हणत असतील याचं मला नेहमी कोडं पडतं. छे! हे तर एखाद्या लहानग्याला त्याच्या आईने झालरीचे टोपडे घातले आहे, त्याला दृष्ट लागू नये म्हणून कपाळाला, गालाला, हनुवटीला तीट लावली आहे आणि अंगणात खेळायला सोडले आहे असेच वाटते. ते पोर मग अशा पाठशिवणीच्या खेळात मध्ये-मध्ये लुडबुडत राहातं... आता हेच बघ, त्या पाठशिवणीच्या खेळात रममाण झालेलं एक पान लपण्यासाठी हळूच खिडकीतून आत आलं आहे. माझ्या टेबलवरच्या उघड्या वहीच्या पानांत अलगद जाऊन बसलं आहे. मी ही वही अशीच मिटली तर ते तिथेच राहील... कित्येक दिवस, महिने, कदाचित वर्षही... मग त्या पानाचे आणि त्या वहीच्या पानाचेही नाते जमून जाईल. मी हलकेच वही मिटून टाकली.. वहीप्रमाने मनही मिटता येत असतं तर किती बरं झालं असतं ना? पण मन मिटता येत नाही...
आता या वसंतात अंगणातील, परसातील सगळी झाडे नव्याने हिरवीगार होतील. जुनी पाने गळून ताजीतवानी होतील.. पण मनाचं तसं होत नाही ना? पिकलेल्या पानांना मन लगेच सोडत नाही.. ती गळूनही पडत नाहीत लवकर... कदाचित पडलीच तर नवी पालवी... छे! नवी पालवी येईलच असे नाही... अगदी आमच्या मळ्यात कित्येक वर्षांपासून उभ्या असलेल्या वठलेल्या आंब्यासारखंच हे.. अनेक ऋतू येऊन गेले.. पण त्या आंब्याला पुन्हा काही पालवी फुटली नाही... दर पावसाळ्यात त्याच्या खोडावर शेवाळ साठतं, खोड हिरवंगार होतं... काही काळासाठी आम्ही सुखावून जातो.. पण पुन्हा त्या वठलेल्या लाकडाचा आणखी एक भाग तुटून जातो... दरवर्षी असं होतं.... या वसंतातही ते आंब्याचं झाड असंच पालवीविना उभं राहील.. त्याच्यासाठी वसंत आणि ग्रीष्यात काहीच फरक नाही... मातीत मिसळेपर्यंत त्याचा वसंतही असाच ग्रीष्जाईल.. पण मनाचं तसं होत नाही ना! मातीत मिसळेपर्यंत त्याला जगावं लागतं... चढलेल्या शेवाळाला पालवीसारखं जपावं लागतं... खरंच ना? तुला माहीत आहे, मी काय सांगतो आहे आणि काय सांगू पाहतोय... यावर्षीच्या वसंतात तू शेवाळाला सोडून पालवीला जपशील अशी अशा करतो... पुढचे मग कितीही ग्रीष्आले तरी त्यात ती पाने तगून राहतील आणि तुला टवटवीत करत राहतील... बाकी पत्र खूप लांबलंय... दिवेलागणीची वेळ झाली आहे.. वाराही मस्त सुटलाय... काळजी घे... यंदा पालवीला खुडू नको... एवढंच....
तुझाच........

रविवार, १७ मार्च, २०१३

पतंग


प्रति,
जन्म आणि मृत्यू आपल्या हातात असत नाही. आपण कोणाच्या पोटी जन्माला यायचं, आपलं लिंग काय असावं, आपला रंग काय असावा, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्माला यायचं याबाबत आपल्या हातात काहीही असत नाही. असतं ते पुढे आलेले आयुष्य जगणं, ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करणं. पण तेही आपल्या हातात कुठे असतं?. तुम्ही कोण व्हायचं हे तुम्ही ठरवू शकलात तरी तुम्ही ते व्हालच असे नाही. झालाच तर तुम्हाला हवा असलेला आनंद त्यात मिळेलच असे नाही. तुमच्या अवती-भवती कुठली माणसे असावीत, कुठली नसावीत काहीच ठरवता येत नाही. प्रवासाचा रस्ता आपण निवडलेला असला तरी त्या प्रवासातील सांगाती आपल्याला निवडता येत नाहीत. ते बरे असतील तर तो प्रवास सुखाचा होतो नाही तर मग मुक्‍कामाचे ठिकाण येईपर्यंतची धडपड. आपण हे मिळविले ते मिळविले म्हणतो खरे....
पण ते खरेच आपण मिळवलेले असते की आपले विधीलीखित आपल्याला तिथपर्यंत पोचवते? आपली इच्छा असो वा नसो? तो प्रवास करावा लागतो. आपल्याला वाटते आपण मुक्‍त आहोत, पण खरेच आपण मुक्‍त असतो की आपल्या दोऱ्या दुसऱ्याच कोणाच्या हातात असतात? अगदी पतंगासारख्या. विधिलीखिताच्या दोराशी घट्‌ट बांधलेले आणि वाऱ्याच्या हिंदोळ्यावर भरकटणारे. त्यात त्याची मर्जी कुठे असते? वाऱ्याची दिशा, त्याचा वेग आणि विधिलिखीत दोराच्या हिसक्‍याप्रमाणे प्रवास सुरू होतो. कधी उंच जातो तर कधी खाली कोसळतो. पुन्हा उडण्याचे त्राण आणि बळ पंखात असेल तर पुन्हा उडतोही. पण सगळ्याच पतंगाच्या नशिबी आकाशात घिरट्या घालत राहाणे कुठे असते? कधी कधी विधीलिखिताच्या लेखणीचा झटका एवढा मोठा असतो की वाऱ्याचा हिंदोळ्यावर डोलणाऱ्या पतंगावर ते वारंच स्वार होतं. मग फाटून कोसळणं एवढाच कार्यभार राहातो. एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात, झाडाच्या फांदीत अडकून पडणे हेच नशिबी येतं. आकाशात भरारी मारून थकून जमिनीवर कोसळलेल्या पतंगाला मुक्‍ती मिळत असेल, पण वाऱ्याच्या झटक्‍याने वा दोर तुटून झाडांच्या फांद्यांवर अडकून पडलेल्या पतंगाला मुक्‍ती कुठे.. तो तर वेदनेचा सांगाती. ती वेदना केवळ फाटल्याची असत नाही... फाटलेपणाची आणि दुखावल्याची वेदना तर असतेच ती नसते असे नाही पण त्याहीपेक्षा मोठी वेदना असते ती दुर्लक्षित झाल्याची, निरुपयोगी झाल्याची... त्या अवस्थेतून त्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही. अगदी कोणी काढलंच तर तो आपली उंच भरारी घ्यायची ताकदच गमावून बसलेला असतो. कायमचे हे अपंगत्व केवळ शारीरिक कुठे असते ती तर मनोवस्था असते. सर्वांच्या नजरेतून उमटणारा केविलवाणा भाव आणि खोटे दुःख असह्य होते. नजरेतील केविलवाणा भाव बदलत जात पुन्हा दुर्लक्षित परावर्तित होणारा भाव टोचण्या देत राहातो... ? पराभवाचं दुःख खूप मोठं असतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख पराभवानंतर आलेल्या दुर्लक्षपणाचं. लोकांच्या डोळ्यातून पाझरणाऱ्या अविश्‍वासाची वेदना खूप भयानक असते. प्रत्येक नजर सांगत असते की अरे तू पराजित आहेस तुला बोलायचा हक्‍क नाही. तुला नजर वर करायचा अधिकार नाही. मेलेल्या गोमेला ज्या प्रमाणे पुन्हा पुन्हा ठेचले जाते अगदी तसेच या नजरा प्रत्येकवेळा ठेचत राहातात. तुमच्यातील उभे राहाण्याचे बळ शोषित राहातात.....मग तो पराभव कसला का असेना. नैतिक-अनैतिक. प्रत्येकवेळी अनैतिक असते ते तितके अनैतिक असतेच का? की त्याचीही काही रूपं असतात? गुन्हा आणि अनैतिक हे एकाच बाजूला कसे असू शकते? काहीच कळत नाही...
याक्षणी असंख्य विचार डोक्‍यात घिरट्या घालत आहेत. मरणासाठी कारणांची जंत्री तयार करत आहेत. प्रत्येक कारण वेगळे. पण तरीही ते गरजेचे. त्या-त्या वेळेला मरणाला ते कारण उपयोगीही. पण त्या कारणांनी काही मरण यावे वाटले नाही. अगदीच विचार आला नसेल असे नाही, पण यापासून लांब जावे, खूप लांब जावे एवढे वाटले असणार, पण सगळं संपून देऊन जगणंच नाकारावे असे काही वाटले नाही. अपमान, पराजय आणि अवहेलना या गोष्टी नित्याच्याच होत्या. त्यामुळे काही काळाने तो जगण्याचा भाग बनला होता. तरीही प्रश्‍न पडतो माणसं आत्महत्या का करतात? केवळ जगण्याचा कंटाळा आला म्हणून? की जगण्याचा वीट आला म्हणून? जगण्याचे प्रयोजन राहिले नाही म्हणून की मरणातून पुन्हा जन्माला येऊन नवा डाव मांडावा म्हणून? असाध्य रोगाला कंटाळून आत्महत्या करणारे जसे आहेत तसे डॉक्‍टरांकडे काही दिवस मला जगायचे आहे म्हणून रडणारेही असतातच की. दोघांचे रोग सारखेच पण तरीही एकाला जीवनेच्छा तर दुसऱ्याला मरण जवळ करावे वाटते. काय फरक दोघांच्या वेदनांतील? नवरा चांगला मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या स्त्रिया आहेत तशाच मिळालेली फिक्‍की पाने मांडून डाव रंगविणाऱ्या स्त्रियाही असतात. मग यांत फरक काय? जगण्याचा स्वतःचा अधिकारच का लोक नाकारतात...? यांसारख्या अनेक प्रश्‍नांनी आता माझ्या मनात गर्दी केली आहे. कुठल्याच प्रश्‍नाचे ठोस उत्तर मिळत नाही. ते उत्तर मिळाले असते तर लोकांनी जगण्याची ही कारणे आणि मरण्याची ही कारणे अशी सरळ भेदाभेद केली नसती का? मरण्याच्या कारणांपासून दूर नेणारी अनेक औषधे आणि सल्लाकेंद्रे बाजारात उपलब्ध आहेत पण तरीही लोक त्याकडे न जाता सरळ मरण का पत्करतात? गुंता.... गुंता.... गुंता...
अगदी काही वेळाने समोर ठेवलेला दोर माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल. श्‍वांसांचे येणे-जाणे बळजबरीने बंद होईल. पायांची हातांची एक धडफड होईल आणि पुन्हा सगळं शरीर शांत होईल..... काही काळ तसाच जाईल... मग दारात पडलेल्या दुधाच्या पिशव्या आणि पेपर... खोलीतून येणारा कुजका वास यांमुळे शेजाऱ्या-पाजाऱ्यांना संशय येईल.... दार उघडलं जाईल... लटकेल्या देहाकडे बघून लोक लोक आत्महत्या म्हणतील. पण खरेच ही आत्महत्या आहे का? आत्महत्या म्हणजे काय? हत्या या शब्दात कुणाचे तरी नुकसान आहे. पण मी जे काही करायला निघालो आहे त्या कोणाचे नुकसान आहे का? छे! असा कोणीच समोर दिसत नाही ज्याचं माझ्याविना आडून राहील. आई-वडील चारऐवजी आठदिवस रडतील, छे! रडतील की नाही हेही माहित नाही. कदाचित रडणारही नाहीत. गेल्या 20 वर्षात त्यांनी कधी कदर केली नाही आता का रडतील. ओळखणारही नाहीत कदाचित. त्यांच्या जगण्याचा मी काही अविभाज्य घटक वैगेरे कधीच नव्हतो. भाऊ-बहिणींना मी जिवंत आहे किंवा नाही हेही माहित नाही. कदाचित दरवर्षी त्यांच्या मेळाव्यात माझी आठवण निघत असेलही, यावेळच्या मेळाव्यात काहींचे डोळे ओलही होतील... अगदी लहाणपणीच्या एकदोन आठवणी काढून... पण त्यापेक्षा फार काही नाही होणार... त्यांना काही तरी आपलं हरवलंय असे वाटणार नाही. नुकसान तर नाहीच नाही... यापेक्षा काय? मी आता आत्महत्या केली किंवा माझा अपघात होऊन मृत्यू झाला किंवा मी आणखी चाळीस वर्षे जगलो तरी जे हयात असतील त्यांना माझ्याबद्दल यापेक्षा काही वेगळे वाटणार नाही. अगदीच स्पष्ट सांगायचे झाल्यास मी मेल्याचे कोणाला काहीच वाईट वाटणार नाही. मी आणखी काही काळ जगलो तरी त्या जगण्याचेही कोणाला काहीच वाटणार नाही. मग का जगायचे? केवळ श्‍वास चालू आहेत म्हणून ? जगण्याला काही तरी प्रयोजन नको का? कोणतीही गोष्ट शाश्‍वत असत नाही. अगदी आज ज्या गोष्टी चिरंतन वाटतात त्याही चिरंतन नाहीत, त्यांचाही प्रवास लयाकडेच सुरू आहे. वेग कमी असेल पण लय सुरूच आहे. मग आपण का जगायचे. लयापर्यंत पोचेपर्यंत श्‍वास घ्यायचा.... पण का? आणि त्यातून मिळवायचे काय? काहीच नाही. राहणार काय? काहीच नाही...... आताही हे सगळे शब्दांचे बुडबुडे.. यांतून काही मिळणार नाही.

लावलेला दोर, त्याची लांबी. त्याचा पीळ पोलिस तपासतील. पडलेल्या स्टुलाचे फोटो काढले जातील. खिशातील या चिठ्‌ठीचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रेमभंग की आर्थिक अडचण? व्यवसायात खोट की आणखी काही कारण? काही चुका? काही काही श्‍लेष काढले जातील. त्यातून नसलेल्या जवळच्या माणसांना आणखी त्रास दिला जाईल. जिवंत होता त्यावेळी त्रास आणि आता मेला तरी त्रास म्हणून ते या घटनेकडे बघतील. मग कारण काय द्यावे. द्यायचे म्हणून द्यावे की खरोखरचे द्यावे. जीवनेच्छा संपली हे कारण ठीक आहे. पण ही जीवनेच्छा का संपली याचा मग पोलिस शोध घेत राहातील. कदाचित त्यासाठी कोणाला तरी कारणीभूत ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील. उभे-आडवे प्रश्‍न विचारून त्याला सोडून देतील. पण त्याला त्रास व्हायचा तो होणारच. तो रोखायचा कसा.? आजाराला कंटाळून म्हटलं तर मग डॉक्‍टरांच्या काही चिठ्ठ्या तरी सापडायला हव्यात. पण त्याही सापडणार नाहीत. मग काय? प्रेमभंग छे! वयाच्या साठाव्या वर्षी प्रेमभंगाचे कारण चालेल? मग म्हातारा चाळवला होता हा श्‍लेष काढला जाईल. आता हेच बघा मी मेल्यानंतर माझ्या मृत शरीराकडे बघून लोकांना काय वाटेल याचीही भीती वाटते.. मेल्यानंतर मला चाळवलेला म्हातारा किंवा आणखी काही म्हटले तर काय फरक पडणार... पण ती भीती आहेच... पण केवळ आपल्याला म्हातारा चाळवला होता म्हणण्याचा राग नाही, त्याचे कारण ते आत्महत्येमागे कारण नाही... जे खरे कारण आहे ते द्यायला काय हरकत आहे.. लोक विश्‍वास ठेवो अथवा न ठेवो..

आता माझी जी अवस्था आहे त्याला प्रेमभंग म्हणता येईल? छे! ! प्रेमलय म्हणता येईल किंवा आठवणींचा लय. काहीच कळेनासे झाले आहे. वयाच्या 27 वर्षी प्रेमात पडल्यानंतर आणि एकोणतीशीत नकार मिळाल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी आत्महत्या..... हे कारण कसे लागू होईल. पण हेच खरे आहे. 27 ते 29 या दोन वर्षांत मिळालेल्या सहवासाच्या आठवणींवर पुढची तीस वर्षे निभावली. ती आठवणींची पुंजी तीस वर्षे पुरवून खाल्ली. आता सगळं संपलं. त्या पुरचुंडीचा चोळा-मोळा झाला आहे. आता पुन्हा पुन्हा त्या पुरचुंडीकडे वळून बघून तो आनंद मिळेनासा झाला आहे. नव्या आठवणींसाठीचे दरवाजे केव्हाच बंद करून ठेवले होते. आता त्या दरवाजांना पुन्हा उघडणे शक्‍यच नाही. त्याच्या बिजागरी केव्हाच गंजून गेल्या आहेत. त्यावर लाथ मारावी तशा काळाच्या आघाताने कमकुवत झालेल्या भिंतीच कोसळताहेत. त्या एकेक कोसळलेल्या भिंती आता सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहे. त्यामुळे सगळंच उद्‌ध्वस्त करावं असं वाटतंय. गेल्या तीस वर्षांचे संचीत त्या दोन वर्षांत दडलेलं होतं. एखादं माणुस तुमच्या आयुष्यात किती काळ असावं हे तुमच्या हातात असत नाही. पण जेवढा वेळ तुमच्यासोबत असणार आहे त्या वेळेच्या आठवणी तुम्हाला कितीकाळ पुरतात त्यावर बरेच अवलंबून आहे. प्रत्यक्षात जगातली कुठलीच भाषा "प्रेम' ही संकल्पना पूर्णपणे मांडू नाही शकत. काळजी म्हणजे प्रेम? सेक्‍स म्हणजे प्रेम? आदर म्हणजे प्रेम? छे! ! अशा कुठल्याच चौकटीत प्रेमाला बसवता येत नाही. अगदी स्पर्श न करता गेली तीस वर्षे मी जगलोच आहे. अगदी तिने टाकलेला तो एक कटाक्ष आता-आतापर्यंत अंतःकरण ढवळून टाकायचा. त्या कटाक्षाच्या आठवणींच्या नशेसाठी हे शरीर असावं असे वाटायचे. त्यासाठीच तर हे शरीर जपलं. पण अलीकडे ती नशा काही उरली नाही. नशेला शरीराची गरज असते. शरीराशिवाय नशा येत नाही. त्यामुळे शरीर आवश्‍यक असते. आता मात्र आठवणींची पुरचुंडी कितीही हुंगली तरी ती नशा आता चढायची बंद झाली आहे. व्यसनी माणसाला जसे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे वळावे वाटते तसे मात्र होते आहे. मेंदूतील प्रत्येक कण आणि कण पुन्हा पुन्हा बंड करतो आहे. आता गेल्या तीस वर्षात कॅन्व्हासवरील चित्रांवर पुन्हा पुन्हा गिरवून त्याचे रंग एकमेकांत इतके गुंतले आहेत की मूळचे चित्रही आठवेनासे झाले आहे. असह्य.. असह्य आणि असह्य ही एकच भावना आता वारंवार उचंबळून येत आहे. जगण्याचे प्रयोजन हलकेच कोणीतरी काढून घेतल्याची भावना दृढ होत आहे. आता काय करायचे हेच कळत नाही. शरीराचे हे चोचले पुरविणे शक्‍य नाही. बाजारात तुम्हाला सेक्‍स मिळतो अगदी हवा तितका मिळतो पण "मन' मिळत नाही. ते मिळविताही येत नाही. ते विधीलिखितानं तुमच्या भाळी लिहिलं असावं लागतं. कोणाच्या मनात स्थान मिळवायचे हे तुम्ही ठरवू शकत नाही. दया, करुणा या भावना तुम्ही जाग्या करालही पण प्रेम छे!! प्रेम नाही उत्पन्न करू शकत. सहवासाने माया निर्माण होते, त्याची सवय लागते पण प्रेम नक्‍कीच नाही. सहवास संपला की सवयीने माणुस अस्ताव्यस्त होतो... पण तो काही काळापुरताच ... पण पुन्हा तो पुर्वपदावर येतो, एका सवयीपासून दुसऱ्या सवयीकडे तो वळतो. प्रेमाचं तसं असत नाही. गेल्या तीस वर्षांचे संचीत संपले आहे. आता जगण्याला प्रयोजन राहिले नाही. म्हणून हा दोर गळ्यात. आता गळा आवळला की डोळ्यासमोर अंधार येईल. गिजबटेल्या कॅन्व्हासवरचे चित्रही काळे बनून जाईल. जाणिवांच्या काळ्या रंगात हा काळा रंग मिसळून जाईल. मग कोणतेच रंग राहणार नाहीत. अंधार... ती कोण याचा शोध मात्र होऊ नये एवढीच अपेक्षा....

सर ! पीएमचा रिपोर्ट गळा आवळल्यानेच मृत्यू असा आलाय. पण बॉडी न्यायला कोणी आलेलं नाही. काय करायचं?
हवलदाराच्या प्रश्‍नासरशी, त्या इन्स्पेक्‍टरची तंद्री तुटली. त्याने हातातले ते पत्र टेबलावर ठेवले. डोळ्यांच्या कडा पुसल्या...आणि आवाजात जितकी जरब आणता येईल तितकी आणली....
काय?
सर ! बॉडी न्यायला कोणी आलं नाही. काय करायचं? आपण लावायची का विल्हेवाट.!
नाही..थांब....
त्याची फाईल बघू.... फोटो बघू!
हवालदाराने तातडीने त्याचा फोटो काढून दिला...
सर ! काय करू विल्हेवाट लावू...
नाही... ?
काय करायचे.. हवालदाराने पुन्हा प्रश्‍न केला?
रिपोर्ट फाईल काढ, त्यात लिही.
बॉडी ताब्यात घेणारा ः सुहास रामचंद्र फडके.
वय 28
ृताशी नाते ः मुलगा....
................................................................
चार वर्षापूर्वी त्याला नोकरी लागल्यानंतर त्याच्या आईने अशीच आत्महत्या केली होती. तिनेही चिठ्‌ठी लिहिली होती, पतंगाचा दोर तुटल्याने पतंग भरकटतो, मी मात्र स्वतःच्याच हाताने दोर तोडला. मग भरकटलेपण आले... मग अडगळीत जाऊन पडणेही नशिबात आले.... छे!! अडगळीत कुठे तुझ्या बाबांच्या संसारात तर अडकून पडले होते. संसारत काही त्रास नाही झाला... पण शरीराला त्रास झाला नाही म्हणून शरीर का जोपासायचे... काही वेदना त्यापलीकडच्या असतात... पण आता सहन होत नाही रे! दोर तर खूप आधीच तुटला होता. तरी संसाराच्या वाऱ्यावर बरेच वर्षे घिरट्या घालत राहिले... तुझे बाबा होते आणि पुन्हा नव्हतेही. सगळं सारखंच... तुला तुझ्या पायावर उभे करण्यासाठी जगत होते. आज तू तुझ्या पायावर उभा राहिलास. आता पतंगाला मोक्ष मिळायला हरकत नाही...
त्यानं घर पालथं घातल्यावर एका पुस्तकात एक फोटो सापडला होता... आज आत्महत्या केलेल्या माणसाशी तो चेहरा बराच जुळता होता....
............................................

रविवार, १० मार्च, २०१३

माया


""गुलजारांनी मायाला का मारलं असेल रे?''
दोरीवरचे कपडे काढता काढता तिने केलेल्या या प्रश्‍नाने तो थोडा आश्‍चर्यचकीतच झाला, पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
""सांग ना? गुलजारांनी मायाला का मारलं असेल? केवळ महेंद्रला एकटं ठेवण्यासाठी? की महेंद्रला नायक करण्यासाठी?... बोल ना?''
""कशाला आडकतेस सिनेमांत.. तीन तासांचा सिनेमा बघायचा, आवडला तर वेळ चांगला गेला म्हणायचं. नाही आवडला तर वेळ तरी गेला याचं समाधान मानायचं आणि सोडून द्यायचं.''
त्यानं आपलं सरळ तत्वज्ञान मांडलं.
"" हे खरंच, पण तरीही काही सिनेमे राहातातच ना मनात घर करुन. प्रभाव टाकतात, का माहित नाही, पण त्यातली पात्रं आपली वाटतात, त्यांच्या सुखानं आपण सुखावतो आणि दुःखानं दुःखी होतो. त्यामुळे वाटतं रे. तिचा काय दोष? तिनं कोणताही अपराध नाही केला.. आपल्या भावनांशी प्रामाणिक राहिली ती... महेंद्रला जमलं नाही ते... मग महेंद्रला मारायला नको का?...''

तो काहीच बोलला नाही... ती त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेनं बघत होती.
""जर माया मेली नसती तर...
""तर काय?...''
""...तर महेंद्र नायक झाला असता?... त्याला नायक म्हणून लोकांनी स्वीकारलं असतं?... नसतं स्वीकारलं... महेंद्रला नायक करायला माया मरायलाच हवी होती.''

हातातला पेपर खाली घेतला आणि त्याने वर बघितलं. ती अस्वस्थ वाटत होती... बाहेर उत्साहाने भरलेली आणि आतून खूप एकटी.. एकाकी.. तसं ती बोलायची खूप.. सांगायचीही खूप.. पण गाळून... आडून आडून सांगायची... सर्वच दुःखांना सुखाचा मुलामा लावण्यात तिच्याइतकं पटाईत कोणीच नव्हतं. एकदा चुकून बोलून गेली होती, अवती-भवती माणसं खूप असतात... पण तो सगळा कचराच नाही रे?... पण तेवढंच.. नंतर कधी तिच्या बोलण्यातून अनुत्साह दिसला नाही. खळखळ कधी जाणवली नाही..
""मी काय विचारते आहे? लक्ष आहे का इकडे? तुझं बाबा त्या पेपरकडेच लक्ष..
""महेंद्रला नायक करण्यासाठी मायाने का मरायचं? की कथा पुढे जाण्यासाठी लेखकाला कुणाला तरी मारावंच लागतं? माया जगली असती तर तिचं अस्तित्व काय? महेंद्रसोबत ती राहिली असती तर काय? महेंद्र नायक राहिला असता? त्याचं नायकत्व त्याच्या एकटं राहण्यात आहे... म्हणूनच तर तर इंदू त्याला सोडून जाते आणि माया मरुन जाते... '' ती बोलत होती. विचारत होती.. तो मात्र गप्प होता..
""तू बोलत का नाहीस? खरंच ना? महेंद्र एकटा राहिला म्हणूनच तर नायक ना?...''

ती खूप वेळ विचारत राहिली.. पण तो काहीच बोलला नाही.. मग ती आपल्या कामांसाठी निघून गेली.
खरंच, महेंद्र आहे का नायक? च्छे! महेंद्र कुठला नायक?... चित्रपटाच्या लांबीत त्याला जास्त रोल आहे एवढंच. पण त्यामुळे तो नायक कुठे होतो? तो जगतो का? कोणासाठी? त्याचं मायावर प्रेम की इंदूवर? त्याला एकच निवडायची असेल तर ते शक्‍य आहे का? नायकाला ते जमलं पाहिजे. महेंद्रला कुठला निर्णय कधी घेता येतो? तो सर्वसामान्यांपेक्षा दुर्बळ, हतबल, कदाचित पिचलेलाही.. नायक कुठे पिचलेला असतो?...

त्याची नजर सहज समोरच्या आरशात गेली.. गालावरचे वाढलेले खुंट आणि कपाळावरची आठी त्याला स्वस्त बसू देत नव्हती. आपण जर महेंद्रच्या जागेवर असतो तर सर्वसामान्याप्रमाणे वागलो असतो? की आपली अवस्थाही अशीच झाली असती?.. इंदूला आपण सोडू शकलो असतो की मायाला?... इंदूला सोडणं तुुलनेत सोप्पं... मायाला सोडतो म्हटलं तरी सोडता येत नाही. तिच्याविना जगता येणं अशक्‍य आणि तिच्या सोबत जगणं त्याच्या प्राक्‍तनात नाही..!

त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे आणि कपाळावरच्या आठ्यांकडे बघून ती जोरात हसली..
""अरे नको विचार करू इतका... मी सहज विचारलं.... जाऊ दे रे !''
जाऊ दे!
हा आपला परवलीचा शब्द.. प्रत्येक गोष्टीला जाऊच तर द्यायचं...! गुंत्यात अडकू नये यासाठी जाऊ दे... आपल्या बोलण्याचा विपर्यास्त काढला जाईल म्हणून जाऊ दे... सोप्या प्रश्‍नांची उत्तरं कठीण वाटू लागली की मग जाऊ दे... जाऊच तर दिलं आत्तापर्यंत... पण असं जाऊ दे म्हटल्यानं जातं का? गुंत्यातून पाय निघतो का?... मग असा एक एक गुंता वाढत जातो आणि तो गळ्याभोवती पाश टाकत राहातो... त्यात श्‍वास गुदमरत राहातो.. कधी कधी वाटतं... या गुंत्यांनी आपला गळा दाबून टाकावा आणि मोकळं करावं... पण इतक्‍या सहज मोकळं कसं होता येईल?...

मरते. का? लेखकही समाजाच्या खोट्या चौकटीतच अडकून पडला म्हणून? त्यालाही समाजाने ठरवून दिलेल्या रंगातच चित्र रंगवायला आवडतं म्हणून?... की... की त्याला पुन्हा पुन्हा महेंद्रला मारायचं आहे म्हणून..? माया सोडून जाते आणि सुटते... इंदूही स्वतःचा पदर सोडवून घेत दुसऱ्याच्या हातात हात घालून निघून जाते.. उरतो तो फक्‍त महेंद्र...! रोज मरायला...!!

डोक्‍यात असंख्य मुंग्या चावा घेत आहेत असं त्याला वाटून गेलं... विचारांची माळ कधी गुंफली आणि मायाचा चेहरा कधी पटलावर आला हे त्यालाच कळलं नाही... समोर बायको असूनही त्याला तीच दिसत होती... मेंदूचा सुक्ष्मातील सुक्ष्म भाग तिनेच व्यापून गेला होता.. त्याचीही ती जणू मायाच होती...
.........................

ती... आपल्यावर अतोनात प्रेम करणारी... आपल्यासाठी झुरणारी... कदाचित आपल्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी... पण हलकेच हात सोडवून घेणारी... महेंद्र आणि आपल्यात तेवढे साम्य नक्‍की आहे. आहेच की.. तीही तितकीच सहज... निरपेक्ष आणि संवेदनशील... समाजाला फाट्यावर मारणारी... नकारातही ठाम आणि होकारातही ठाम... नकार देताना आपल्याभोवती सगळी कडी रचून स्वतःला सुरक्षीत करणारी आणि होकार देताना ती सगळी कडी मोडून टाकून जवळ घेणारी... प्रवाही... प्रवाहात ओढून घेणारी... त्या प्रवाहात तुम्हाला काय वाटते याला काही महत्त्व नाही... त्याची दिशा आणि पोचण्याचे स्थळ निश्‍चित असते.. त्यात तुम्हाला स्थान काहीच नाही.. त्यामुळंच
तिच्यासोबत संसार थाटायची स्वप्नं स्वप्नंच राहिली... ती स्वप्नं कसली होती... त्यात तर आपण किती तरी काळ जगलो होतो... तिच्या केसांना कुरवाळायचं होतं... गालांना गोंजारायचं होतं... तिच्या तप्त ओठांवर ओठ टेकवून तू फक्‍त माझीच आहेस हे सांगायचं होतं... तिच्या कुशीत शिरुन बरगड्या मोडेपर्यंत गच्च मिठी मारायची होती... प्रेम कुठे शारीर पातळीवर असतं..? नसतंच ते... पण स्पर्शाइतक्‍या सहज भाषेशिवाय ते पोचत नाही, एकरूप होता येत नाही... हे खरं... तिच्या स्वप्नांची पाखरं माझ्या डोळ्यांतून उडू द्यायची होती... पण नाही जमलं. काही वेळाच इतक्‍या वाईट असतात की त्या वेळांना काही बळी लागतात... तिने नकार दिला ती वेळ तशीच होती.. त्या वेळेला माझा बळी हवा होता. वेळेचे बळी आणि काळाचे बळी यांत फरक आहे. काळ एकदाच बळी मागतो आणि तो घेतला की पुन्हा मागे वळून बघत नाही. वेळ तसं करत नाही. ती असूरासारखी असते. तिला चटक लागते. रक्‍ताची. त्याच त्या रक्‍ताची. त्यामुळेच ती पुन्हा पुन्हा बळी घेत राहाते आणि पुन्हा पुन्हा जिवंतपणाचे पाणी शिंपडत राहाते... जिवंत करून पुन्हा बळी घेण्याचं कसब वेळेइतकं कोणाकडेही नाही...
........
त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती जणू इंदूसारखीच भासत होती. इंदूसारखीच ती.. कर्तव्यनिष्ठ. सोशिक.. ही आपल्याला सोडून जाईल.. नाही कदाचित.. आणि माया मिळेल... तीही नाही मिळणार... इंदूकडे जाण्याचा रस्ता आपल्या हाताने उघडूही.. तिच्यापर्यंत शारीर पातळीवर पोहचूही पण मानसिक आधाराचे काय?.. ना इकडे ना तिकडे... लटकणं हेच प्राक्‍तन...
...............

रात्री केव्हा तरी तिला जाग आली... सकाळच्या एका प्रश्‍नाने त्याचा दिवस खराब गेला होता... आता झोप तरी निट लागली का बघायला ती उठली.. दिवे लावले... खोलीत तो नव्हताच.. नेहमीप्रमाणेच तो अभ्यासिकेत असणार म्हणून तिने अभ्यासिकेचं दार उघडलं... आणि जोरात हंबरडा फोडला... आयुष्यभर लटकत राहण्यापेक्षा एकदाच लटकलेलं बरं म्हणून त्यानं स्वतःला लटकून घेतलं होतं... काळापुढे वेळ हरली होती... तिच्या प्रश्‍नाचं उत्तर आता तिलाच नको होतं !

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

प्रिय,


खूप दिवसांनी पत्र लिहितोय. इतके दिवस पत्राला का उशीर हा काही तुला प्रश्‍न पडणार नाही. आणि खरेतर माझ्याकडेही त्याचे असे खास उत्तर नाही. कंटाळा, आळस हे माझ्या नावाचे काही समानार्थी शब्द आहेत. (त्यात तू म्हणतेस तो मूर्ख हा शब्दही आहेच!).त्यामुळे कोणत्याही प्रश्‍नाचे माझे सरळ साधे उत्तर असते. कंटाळा! अर्थात काही करण्याचा उत्साह असण्याचे काही प्रयोजन तरी हवे... जाऊ देत. पत्र लिहिण्यास एक कारण मात्र आज मस्त आहे.. काल 24 फेब्रुवारीला पन्हाळ्यावर चंद्रशेखर गाडगीळांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. मैफल खासगी स्वरुपाचीच होती. आणि ती रंगलीही अशी की खूपच खासगी वाटून गेली. अगदी पौर्णिमेचा चंद्र आपल्या पूर्ण तेजाने आकाशात माथ्यावर येऊन आपली किरणांची बरसात करत होता आणि त्याचवेळी गाडगीळ "" फिर वही श्‍याम वही गम, वही तनहाई है, दिल को समझाने तेरी याद चली आई है... '' गात होते. तलतच्या आवाजात लागलेला सूर गाडगीळांनी तंतोतंत लावला होता. आणि तीच आर्तता होती. रात्रीततल्या त्या चंद्रबिंबाकडे बघत त्यावर सुरांचा अभिषेक ते घालत होते. व्हायोलिनवर फिरणार गज तर लिलया फिरत होता. या वाद्याचे वैशिष्ट्यच असे की त्याची तार ही उसाच्या पानाइतकी धारधार असते. चटकन कोणी उसाच्या पानावरुन हात फिरवावा आणि बोटे रक्‍तबंबाळ व्हावीत इतकी ताकद व्हायोलिनमध्ये आहे. तो गज त्या तारांवर पडला की मनाशी तो तार जोडू पहातो. आणि गझलेची जर त्याला फूस असेल तर तो ती तार आणखी धारधार होत जाते. त्यामुळेच ती ""फिर वही...चे सूर आणि तुझी याद एकदमच आली.... नारळांच्या झावळ्यांमधून डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे बघत कानातून मनात अलगद उतरणारी ती गझल तुझ्यापर्यंत तो चंद्र वाहून नेतो आहे की काय असे वाटून गेले. तू आत्ता त्या चंद्राकडे एकटक बघत बसली असशील असे वाटून गेले. आणि तो आपला दुवा साधतोय असा भास झाला. मैफीलीचा रंग वाढत होता.. गाडगीळ रंगात आले होते. आपल्या गायकीचे एक एक अनुभव सांगत होते. आणि अचानक त्यांनी एक शेर ऐकवला...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा है तो ज़माने के लिए आ

पन्हाळ्याच्या त्या उघड्या वातावरणात गार वारा अलगद गरम वाटू लागला..

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ...

ंदी हसन साहेबांचीची ही गझल पूर्वीही मी ऐकली होती, पण खरेच यावेळी ती आणखी वेगळी वाटली. अहमद फराज यांनी ती लिहिलीय अप्रतिम. पण मनापर्यंत पोचविण्यासाठी जो सूर लावावा लागतो तो मेहंदी हसन साहेबांचा तर लागतोच पण काल गाडगीळांचाही लागला. त्या शब्दांच्या अर्थापर्यंत ते घेऊन गेले आणि तिथून पुढचा प्रवास अर्थात तुझ्यासोबतीनेच झाला. गम्मत बघ कार्यक्रमाची सुरवात भजनाने झाली आणि शेवट गझलेने. देवाला भजन का आवडते याचा प्रत्यय मला काल पुन्हा उमजला. भजनातील भाव सुरांच्या रस्त्यावरून धावत सुटतात ते भगवंताच्या चरणापाशीच जाऊन थांबतात, गझलही तशीच अगदी शब्दांचे रुपेरी रूप घेऊन आलेले भाव आर्ततेच्या सुरांना जेव्हा मिठी मारतात तेव्हा ते मनात घर करत नाही तर तिथून आपला रस्ता शोधत हव्या त्या ठिकाणी पोचतात. त्यामुळेच ज्यावेळी कार्यक्रमाचा शेवट "तोच चंद्रमा नभात या गाण्याने झाला त्यावेळी... एकांती मजसमीप तीच तूही कामीनी.. हे शब्द खोटे नाही वाटले..!

तुझाच...

शनिवार, १९ जानेवारी, २०१३

गाजराचा हलवा अन्‌ उकडीचे मोदक



गाजराचा हलवा अन्‌ उकडीचे मोदक 

साहित्य संमेलनात साहित्याविषयी चर्चा व्हावी, समाजाच्या बदलत्या 
धारणांबाबत ऊहापोह व्हावा, परिसंवाद असे घडावेत, की त्यातून काही दिशा ठरवता यावी, उल्हासित करणाऱ्या ललित साहित्याचा गौरव व्हावा आणि प्रत्येक साहित्य प्रकाराकडे नेणाऱ्या वाटांचा धुंडोळा घेतला जावा; परंतु 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याबाबत काहीच झाले नाही. संमेलन संपल्यानंतर दुधी भोपळा आणि गाजराचा हलवा किती खाल्ला आणि मोदक किती रिचवले, याचीच चर्चा रंगली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्‌घाटनाच्या भाषणात केलेल्या विवेचनाशिवाय एकही वक्‍ता साहित्याच्या परिघात बोलला नाही. काठावर पोहणारेच जास्त जमले होते, हे खेदाने म्हणावे लागेल.

86 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकदाचे पार पडले. वादग्रस्त ठरलेल्या साहित्य संमेलनाला पोलिसी छावणीचे रूप देऊन पूर्ण करावे लागले यातूनच तेथे विचार काय आणि कसा मांडला गेला हे स्पष्ट होते; पण मुळातील वादांमध्ये येथे पडायचे नाही. ते वाद का झाले आणि ते गरजेचे होते का, याचा ऊहापोह अनेकांनी अनेक व्यासपीठांवरून केला आहे; परंतु साहित्य संमेलनातून प्रत्यक्ष काय मिळाले हे जर रसिकांना विचारले तर ""पैसे भरले होते म्हणून गाजराचा हलवा आणि उकडीचे मोदक मिळाले,'' यापेक्षा ते फारसे काही सांगतील असे वाटत नाही. संमेलने केवळ उत्सवी स्वरुपामुळे लक्षात राहात असतील तर तो त्या संमेलनाचाच अपमान मानायला हवा. साहित्य संमेलनात नेमके काय हवे आणि कसे हवे याचाही ऊहापोह अनेकांनी केला आहे. अनेकजण काठावर राहून आणि आता यापुढे आपल्याला साहित्य महामंडळाकडून काहीच मिळवायचे नाही, या भावनेतून टीका करतात. साहित्य महामंडळाची वारेमाप स्तुती करणाऱ्यांचा उघड लोभ असतो तसाच तो त्याला विरोध करणाऱ्यांचाही असतो, हे मानून घेतले तरी काही प्रश्‍न उरतातच आणि त्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.
चिपळूणला झालेल्या साहित्य संमेलनात राजकीय लोकांची उपस्थिती हा वादाचा विषय ठरला होता. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्‌घाटनाच्या भाषणात केलेल्या फटकेबाजीमुळे हा वाद किती निरर्थक होता हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले आणि पाहिले आहे; पण त्यापुढे जाऊन साहित्य महामंडळाने त्याचे केलेले समर्थन हा भाग चर्चेला घेण्याशिवाय पर्याय नाही. साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. उषा तांबे यांनी साहित्य संमेलनातील कार्यक्रमाबाबत केलेल्या दोन-चार विधानांचा उल्लेख करावा लागेल आणि मग साहित्य संमेलनाच्या यशापयशाबाबत चर्चा करता येईल. सौ. तांबे म्हणाल्या, ""साहित्य संमेलनाच्या पत्रिकेकडे बघून लोक दोन टिपण्या करतात. समजा जर आम्ही नामांकित लोकांना बोलावले तर टीका करणारे म्हणतात, की त्याच त्या चेहऱ्यांना साहित्य संमेलनात कायम बोलावले जाते, तर समजा आम्ही नव्या लोकांना संधी दिली तर कार्यक्रम पत्रिका फडकवत लोक विचारतात यातील एक तरी ओळखीचे आहे का?'' हे सांगताना आम्ही नव्या चेहऱ्यांना व्यासपीठ मिळवून देतोय अशी मखलाशीही सौ. तांबेबाईंनी मारली; पण संमेलनात नावे नवीन असणं आणि त्यातून काहीतरी मिळणं या बाबीही आवश्‍यक आहेत. ते मात्र कुठेच दिसले नाही. खुल्या गप्पा, कथाकथन, कविसंमेलनासह सहा परिसंवाद होते; पण हे सगळेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंगाने गेले. काही वक्‍ते खरेच चांगले बोलले यात वाद नाही; पण सहाहून अधिक परिसंवादात 24 हून अधिक वक्‍ते बोलूनही चांगल्या वक्‍त्यांची नावे सांगायला एका हाताची बोटेही खूप व्हावीत यासारखे दुर्दैव नाही. उद्‌घाटनाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर यांच्या खुल्या गप्पा रंगल्या. खरे तर या गप्पांची संमेलनात आवश्‍यकता होती का? हा प्रश्‍न पडावा अशा पद्धतीने त्याचे आयोजन आणि सादरीकरण झाले. नायगावकर आणि फुटाणे यांनी गेल्या दशकभरात महाराष्ट्रात आणि जगभरातील कार्यक्रमांत जे सांगितले तेच त्यांनी संमेलनाच्या मुख्य सभामंडपाच्या व्यासपीठावरून सांगितले. त्यात नावीन्य काहीच नव्हते. मुख्य सभामंडपात किती गर्दी झाली याचा उल्लेख नंतर समारोपाच्या भाषणात नियोजन समितीतील सर्वच वक्‍त्यांनी केला असला तरी केवळ सभामंडपातील उपस्थितीवर संमेलन यशस्वी मानायचे असते तर मग आणखी दोन चार सांस्कृतिक कार्यक्रम आणि दोन चार हिंदी-मराठी अभिनेत्रींना बोलावले असते तर गर्दीचा उच्चांक झाला असता. रंजनात्मक कार्यक्रमांची आवश्‍यकता कोणी नाकारत नाही. अगदी संमेलनात रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही आक्षेप असण्याचे कारण नाही; पण मुख्य सभामंडपातला पहिलाच गप्पांचा कार्यक्रम आणि तोही या पद्धतीने करायचा म्हणजे साहित्य संमेलनाला उपस्थित साहित्यप्रेमींपेक्षा राजकारण्यांचाच विचार झाल्याचे स्पष्ट होते आहे.
मुख्य सभामंडपातील कार्यक्रम आणि सभामंडप क्रमांक दोनमधील कार्यक्रमांवर बारकाईने बघितले तर साहित्यसंमेलनात साहित्यालाच अस्पृश्‍य मानले आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. जागतिकीकरण आणि मराठी कादंबरी या शीर्षकाखाली एक परिसंवाद दोन क्रमांकाच्या सभामंडपात झाला. त्यात एक दोन वक्‍ते खरेच चांगले बोलले. अगदी श्रीराम पचिंद्रे यांनी जागतिकीकरणात ग्रामीण महाराष्ट्र कसा बदलला याचे चांगले विवेचन केले; पण परिसंवाद हा काही व्याख्यान असत नाही. त्यात उपस्थितांनी त्याच्या अनेक पैलूंवर चर्चा करावी, ही अपेक्षा असते; पण ती काही झाल्याचे चित्र समोर आले नाही. जागतिकीकरणात मराठी कादंबरी कित्येक मैल लांब असताना आणि आंग्लेतर भाषांमध्ये त्याचे प्रतिनिधित्व चांगले उमटले असताना मराठी मात्र याबाबत अनेक बाबतीत का मागे राहिली, हा प्रश्‍न अनुत्तरित राहतो. अनुवादित साहित्याला मराठीत चांगले दिवस येण्याचे कारण मुळात मराठी कादंबरीकारांनी सकस आणि आताच्या पिढीला आवश्‍यक विषय हाताळले नाहीत किंवा ते ज्या ताकदीने हाताळायला हवेत तसे ते हाताळले नाहीत, हे सूर्याइतके स्पष्ट आहे; पण त्याबाबत वक्‍त्यांनी आणि अध्यक्षांनी फारसे विवेचन केले नाही. मुख्य सभामंडपात झालेला आम्ही काय वाचतो आणि का वाचतो हा परिसंवादही असाच. (इथे मुद्दाम मुख्य सभामंडपातील कार्यक्रम असा उल्लेख याचसाठी केला आहे, की राजकारणी मंडळी व्यासपीठावर असतील तर कार्यकर्ते सभागृहात असतातच आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तळ ठोकून राहातात याचा जणू अभ्यासच नियोजन समितीने केला होता.) यातील राजकारण्यांची निवड नियोजन समितीने की साहित्य महामंडळाने भांग पिऊन केली होती का, असा प्रश्‍न विचारण्याची गरज आहे. राजकारण्यांबाबत राग नाही; पण परिसंवादात किमान काही विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना बोलाविणे आवश्‍यक होते. महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण या दोनच विचारांच्या लोकांना बोलाविण्याचा अर्थ काय? एक सुनील तटकरे यांनी आपण काहीच वाचत नसल्याचे स्पष्ट करत राजकारण्यांनी समाजमन वाचायला हवे, हे एक वाक्‍य बोलून परिसंवादाचा नूर बदलला. तुम्ही काय वाचता, त्याचा उपयोग तुमच्या राजकारणात कसा होतो आणि त्या विचारांमुळे तुम्ही त्या पक्षाचे काम करता का, असे साधे प्रश्‍न सर्वसामान्य लोकांच्या मनात होते. राजकीय लोक वाचतात का? गंमत म्हणून एक उल्लेख करायला हरकत नाही. व्यासपीठावरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील या दोघांनीही गांधीजींचा उल्लेख केला नाही. गांधीविचाराने आम्ही राजकारण करतो, असे सांगणाऱ्या राजकारण्यांना गांधीजी वाचू वाटले नाहीत, ही बाब आश्‍चर्याची आणि खेदाचीच म्हणावी लागेल. कदाचित त्यांनी गांधीजी वाचलेही असतील; पण व्यासपीठावरूनही त्यांनी ते सांगणे त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांसाठीही गरजेचे होते. हीच बाब भाजपच्या आमदार आणि खासदारांची. आत्मचरित्र आणि चरित्रग्रंथ आम्ही वाचतो, असे सांगणाऱ्या आमदार-खासदारांना गोळवलकर गुरुजी, देवरस आणि संघाच्या नेतृत्वाचा विसर पडला. आम्ही हे वाचतो, ते वाचतो आणि त्याचा आमच्यावर हा परिणाम झाला, तो झाला असे सांगताना आम्ही सोयीचे राजकारण करतो, हेच त्यांनी सांगितले. नियोजन समितीला समाजवादी कोणी मिळाला नसेल हे कदाचित मानण्यासारखे होते; पण आठवले मिळाले असते. मार्क्‍सवादी एखादा मिळाला असता; पण त्यांनी ते केले नाही. सर्वच विचारांचे प्रतिनिधित्व जसे साहित्य महामंडळाकडे नाही त्याचेच जणू हे प्रतिबिंब होते.
आमच्या रेषा बोलतात भाषा, हा परिसंवादही असाच. चित्रकारांना व्यासपीठ मिळवून देताना त्यातील प्रमुख चित्रकारांना बोलायची संधी मिळाली पाहिजे, याचाही अट्‌ट्‌हास नियोजन समितीने धरायला हवा होता. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर माईकसमोर येऊन जे चार शब्द बोलले ते खरेच एक मोठे व्यंगचित्रच होते. पुढे कार्यक्रम आहे, आटपा असे सांगत चाललेला परिसंवाद म्हणजे मेंढीला ओढत नेण्याचा प्रकार होता. सभामंडपात राजकारण्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सरकवलेल्या चिठ्ठ्या फार काही सांगून गेल्या. या परिसंवादात शि. द. फडणीस खरेच खूप चांगले बोलले; पण सगळा मूडच आता राजकारणी व्यासपीठावर कधी येणार आणि ते काय बोलणार अशाच आशयाचा होता.
कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था अशा आशयाचा एक परिसंवाद होता. आता यात कहर म्हणजे सूत्रसंचालिकेनेच परिसंवादात भाग घेतला. त्यांना तो अधिकारही आहे; पण परिसंवादात अध्यक्षीय भाषण (भाषण हा शब्द येथे गैरलागू असला तरी साहित्य संमेलनातील बहुतेक सगळ्याच वक्‍त्यांनी आपल्याला आता भाषण द्यायची संधी मिळाली आहे. पुढे चार टकली बसली आहेत, तर बोला याच अंगाने त्या वेळेचा "सदुपयोग' केला.) झाल्यानंतर परिसंवाद संपतो; पण येथे उलटेच. बाई बोलायला लागल्या. अध्यक्ष महाराज आपल्या खुर्चीत चाळवाचाळव करत होते. त्या परवानगी मागितल्यासारखे करत होत्या. माईक हातात घेऊन अध्यक्ष मान डोलावतील म्हणून बघत होत्या; पण अध्यक्ष काही बोलत नव्हते. मग त्यांनी त्यांची परवानगी आहे असं स्वतःच जाहीर केले आणि सुरू केले. संयोजन समितीतील एक असल्यानेच अध्यक्षांनी (ऐनवेळचे कारण मुळात कार्यक्रम पत्रिकेतील अध्यक्ष आलेच नाहीत) मूक संमती दिली.
कथाकथन, समारोप कार्यक्रम अशा अनेक बाबींवर सविस्तर लिहायला हवे. कथाकथन कार्यक्रमात सहभागी कथाकारांकडून कथा घेतल्या असत्या आणि त्याला लागणारा वेळ निश्‍चित केला असता तर समारोपाच्या कार्यक्रमाला व्यासपीठ रिकामे करून देण्याची घाई झाली नसती. बेल परिसंवादात मारली आणि एखाद्या वक्‍त्याने आपले आवरते घेतले तर ते फार अडचणीचे ठरत नाही; पण कथा सांगणाऱ्या लेखकाला कथा अर्धवट कशी सोडून माघारी फिरता येईल. समारोपाच्या कार्यक्रमातही मुख्यमंत्र्यांचे नाव पत्रिकेवर आणि प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेता एवढे 180 अंशांमध्ये बदल करण्याचे धाडसच कसे होते, हा प्रश्‍न आहे. व्यावहारिक विचार करा म्हणजे प्रश्‍नाची उत्तरे मिळतील, असे नियोजन समिती आणि महामंडळ सांगत असले तरी व्यावहारिक विचार आणि धंदेवाईक विचार यांत फरक असतो, हेही कुणीतरी सांगायला हवे. केवळ पत्रकारांना गाजराचा हलवा खायला दिला म्हणून ते सगळं गोड-गोड नाही लिहिणार.... 

बुधवार, २ जानेवारी, २०१३

प्रिय,

प्रिय, 
नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! प्रत्येकवेळा पत्राची सुरवात काय करावी हेच कळत नाही. म्हणजे माणूस  बघ कोणाशी बोलायचं असेल तर मुद्दाम खाकरतो. कळलं का? ऐकलं का? असे उगाच सांगतो. तसेच पत्र लिहिताना हा उगाचचा पसारा खूप मांडावा लागतो. मग एकदा पसारा मांडला की मग त्यातून हवे ते उचलून दाखविता येते. खरे तर पत्र लिहिण्याचा उद्देश दुस्तर हा घाट. गौरी तुझी आवडती लेखिका होय ना! तुला तिची नमू आवडते! नमू, हरिभाई आणि वनमाळी सगळ्यांच्याच प्रेमात जणू तू. गौरीने खूप सहजतेने नमू निर्मिली आहे. मला नमू अस्वस्थ करुन गेली हे खरेच पण मला आवडला तो नकुल. अलिप्त. मुक्‍याने प्रेम करणारा. कादंबरीत त्याला फारसा वाव नाही तरीही का कोणास ठावूक पण मला नकूलच आवडला. अर्थात त्याच्यावर गौरीने अन्याय केलाय ही भावनाही आहेच. नकुलचा जेवढा हक्‍क होता तेवढं काही त्याला मिळालेलं नाही. अगदी त्याला दिलेल्या अपंगत्वासारखंच कादंबरीतील त्याचं अस्तित्वही पंगू करुन ठेवलंय जणू. गौरीने त्याला "नकुल' हे का नाव दिले मला माहीत नाही. कदाचित तो घोड्यावरुन रपेट मारतो एवढ्या एकाच संदर्भासाठीच जर तिने त्याला नकुल म्हटले असेल तर त्या नकुल या नावावरही अन्याय आहे. अर्थात त्या एका कारणासाठी गौरीने त्याला नकुल हे नाव दिले नसणार हे निश्‍चित. त्याच्यातील आणखी काही पुसटरेषांना अधोरेखीत करण्यासाठी तिने हे नाव दिले असावे पण तरीही
महाभारतातील नकुलाची बाकीची वैशिष्ट्य गौरीच्या नकुलमध्ये अस्पष्टच दिसतात. काही रेषा आणखी ठळक करता आल्या असत्या तर... तर कदाचित त्या रेषांपुढे वनमाळीच्या रेषा कमकुवत झाल्या असत्या की काय? हा प्रश्‍न पडतो.
नकुल शब्दाचा मुळात अर्थच देखणा, विद्वान आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारा असा आहे. महाभारतातील नकुल असाच होता. आपल्या भावांवर कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणारा. अश्‍वप्रशिक्षणात प्रवीण असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जनक पित्याचे रुप घेतलेला. माद्रीची दोन्ही मुले देखणी होती. सहदेव आणि नकुल. पण त्यातही नकुल उजवा होता. व्यासांनी अर्जुनाला पुर्ण पुरुष केले पण आकर्षक ठेवले नकुलला. तो एवढा देखणा होता की त्याच्यासारखा देखणा पुरुष त्याकाळी अस्तित्वातच नव्हता. ( लक्षात घे कृष्ण आणि अर्जुन दोघे असतानाही नकुलाबाबत जर ही अख्यायिका असेल तर तो किती देखणा असेल!) त्यामुळेच अज्ञातवासाच्या काळात नकुलला आपल्या अंगावर राख आणि माती माखून घेऊन रुप लपवावे लागले होते. अशा देखण्या पुरुषाचे नाव देताना गौरीने या नकुलवर प्रचंड अन्यायच केला ही भावना तीव्र होते. त्यात त्याला पंगू करुन तर तिने नकुलवर सुड उगवलाय की काय असे वाटत राहाते. वनमाळीचे रुप आणि नकुलाचे रुप हे भिन्न. अगदी कृष्ण आणि नकुलासारखे. दोघांच्या रुपातला गोडवा वेगळा. दोघांची प्रेम करण्याची ते जाणवू द्यायची पद्धत वेगळी. पण तरीही महाभारतातल्या नकुलाला मिळालेली अवहेलना गौरीनेही कायम ठेवली म्हणायला वाव आहे. खरे तर तिने नकुल हे नावच घ्यायला नको होते.
पांडवांच्यात सगळ्यात कर्तृत्वान पुरुष होता अर्जून त्याखालोखाल भीम मग युधिष्ठीर आणि नकुल सहदेव हे पांडवांची पाच नावे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली दोन कडी एवढ्याच अंगाने येतात. अगदी द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी त्वेषाने लालेलाल झालेला भीम लोकांना दिसला, पण त्याचवेळी आपल्या भावाच्या प्रेमाखातर गप्प बसावे लागल्याची विषन्नता मनात दाबून काळाठिक्‍क पडलेला नकुल नाही कोणाला दिसला. मल्लविद्येत निपून असलेला भीम, धनुर्विद्येत एकमेवाव्दितिय असलेला अर्जून किंवा धर्मनिष्ठेने राहणाऱ्या युधिष्ठिराच्या झोळीत व्यासांनी भरभरुन माप ओतले. पण माद्रीच्या नकुल आणि सहदेवाच्या ओंजळीत तिर्थ घालतानाही जणू कंजूषपणा केला. यक्ष प्रश्‍नावेळीसुद्धा युधिष्ठीर माद्रीचा एक पुत्र मागतो तो माद्रीवर उपकार करत असल्यासारखा. त्याला तर भीम आणि अर्जुनच हवा असतो पण मग मी कुंतीचा एक मुलगा जिवंत असताना दुसराही कुंतीचा कशाला त्यापेक्षा माद्रीचा एक. त्यात भावना आणि धर्म असेलही पण त्यातही व्यासांनी नकुलला किंवा सहदेवाला त्यांच्या अंगभूत कर्तृत्वाची शबासकी दिलेली नाही. त्या प्रश्‍नावेळी तर युधिष्ठीराला त्यागाची मूर्ती दाखविताना नकुल आणि सहदेवाला नालायकच जणू दाखविण्याचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे मूळ महाभारतात नकुलला त्याचे माप ओंजळीत टाकलेलेच नाही उलट त्याच्याकडे असलेल्या अश्‍वविद्येचा आणि तलवारबाजीत निपूण असलेल्या कलेचा ओझरता उल्लेख केला आहे. महायुद्धात अर्जूनाने रथ अडकलेल्या कर्णाचा वध केला तोही शल्याच्या सारथ्यामुळे. शल्य हा सहदेव आणि नकुलचा मामा. त्यामुळे आपल्या भाच्यांचा पराभव होऊ नये म्हणून क्षणोक्षणी त्याने कर्णाचा तेजोभंग केला आणि त्याचा रथ चिखलात अडकला. अर्जूनाने कर्णाचा वध काय किंवा भिष्म, द्रोणाचा केलेला वध हा युद्धनिपूणतेवर कुठे केला आहे. कधी शिखंडीची मदत तर कधी युधिष्ठिराची मदत घेऊन कट-कारस्थाने रचून विजय मिळविले. पण त्याचवेळी धर्माने युद्ध करणाऱ्या नकुलने कर्णादि कौरंवाच्या मुलांचा केलेला पराभव अगदी त्रोटकपणे मांडला आहे. व्यासांनी कदाचित सर्वांना समान न्यायाने वागवले असेलही पण त्यानंतर महाभारत जीरविणाऱ्या लोकांनी मात्र नकुल आणि सहदेवाला खड्यासारखे बाजुला काढून ठेवले हे मात्र खरे. गौरीनेही तेच केले. नकुलला तेवढेच महत्त्व दिले. त्याच्यातील अंतर्विरोध, त्याच्या भावना सगळे कसे त्याच्यासोबतीनेच ठेवले. त्याचे नमूवर प्रेम आहे का? नमू त्याच्याबाबतीत नेमका किती विचार करते ते स्पष्टपणे येतच नाही. तोही येता-जाता येतो. डोकावतो आणि निघून जातो. घर करुन राहात नाही. तो घर करतो अगदी काहींच्याच मनात. त्यांना तो हॅण्डसम वाटतो कदाचित दुर्लक्षित किंवा अजाणही. त्याच्या एकटेपणाची किव येत नाही तर त्याच्या एकटेपणाबाबत कुतुहलता वाटते. कुसुमाग्रजांची एक कविता आहे . अहि नकुल नावाची त्या कवितेतला नकुलही असाच. अचानक येणारा आणि आपले कार्य संपल्यावर निघून जाणारा. रेंगाळणे हे त्याच्या प्राक्‍तनात नाहीच. रेंगाळले की आशा वाढते आणि आशा वाढल्या कि त्यातून अटी निर्माण होतात. त्यामुळे तो अटी निर्माण करत नाही. जे द्यायचे त्याचा हिशोब मांडत नाही. त्यासाठी त्याला काही वेदना होतात का? याचाही हिशोब नसतो. म्हणूनच त्याला नकुल म्हणतात. मला नकुलासारखे प्रेम करणे ज्याक्षणी जमेल त्या क्षणाची वाट बघतोय.

तुझाच...