शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

बंद दरवाजा

कोण आहे?... दारावची थाप ऐकून नाराजीनेच तो ओरडला... पापण्या उघडण्याचा त्याने प्रयत्न केला पण जाडावलेल्या पापण्या उघडण्यास तयार नव्हत्या... हळू हळू दारावरचा थापांचा वेग वाढला... आता तर त्याला राग आला... अंगावरचे पांघरुण बाजुला सारुन त्याने दार उघडले.... समोर एक अनोळखी माणूस बघून त्याचा पारा पार चढला...
कोण तुम्ही? काय काम आहे?.
मी... मी... तो अडखळला...
काय मी... मी... आहो पहाटेचे चार वाजताहेत आणि तुम्ही कुणाच्याही दारावर थापा काय मारताय.?.. त्याने शक्‍य तितका राग दाबण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बोलण्यातून तो जाणवलाच...
नाही... मी... थोडावेळ आत येवू का?...
त्याच्या विस्कटलेल्या केसांवरुन आणि अंगावरच्या कपड्यावरुन तो कोणी भूकेला भिकारीच वाटत होता... त्याला आत घेतले तर तो पुन्हा जेवण मागणार....नकोच ती कटकट
आतबित काय नको..त्या बाहेरच्या माणसाने काही तरी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही.... ओ... चालते व्हा बघू येथून... च्यायला रात्रभर काम करायचं... आणि ह्या कटकटी...
त्याने दरवाजा बंद करुन घेतला... बंद कसला त्याने तो जोरात आदळलाच...
मग त्याने बेडवर स्वतःला सैल सोडलं... जडावलेल्या पापण्या पुन्हा बंद झाल्या...
थोड्या वेळाने पुन्हा दारावची थाप ऐकू आली... त्याने कुस बदलली... पण दार उघडले नाही... ती थाप थोडी जोरात झाली... मग थांबली...
दुपारी आकरा बारा वाजता कधीतरी तो उठला...दरवाजाच्या कडीला लावलेला पेपर हाती घेतला आणि मग एक, एक पान उलटत ... एक अन्‌ एक बातमी वाचून काढली... रात्रभर उपसंपादकगिरी केलेल्या कामांतील काही चुका आता त्याला ठळक जाणवू लागल्या...काही शब्दांचा त्यालाच राग आला.... हा इथे नको होता वापरायला.... ही ची जागा चुकलीय.... या बातमीत च लावायचाच राहिलाच की.... असं तो मनाशी काहीतरी पुटपुटला... त्याने पेपर मिटला... मग त्याला पहाटेच्याच्या प्रसंगाची आठवण झाली... कुणाला तरी सांगायचे म्हणून त्याने फोन लावला...
पण फोन बराचवेळ वाजला तरी उचलला नाही... त्याने दोनदा प्रयत्न केला पण काहीच उत्तर नाही... त्याने मग दुसरा फोन लावला....
काय बातम्या कशा लागल्या... चांगल्या... तिकडून फारसा उत्साह नव्हताच....
का रे आवाज असा का?
गोट्या गेला...
तो किंचाळला... कसा?
काल त्याला हार्ट अटॅक आला होता...दवाखान्यात पोहचलाच नाही....
अरे पण...
अरे पहाटेच त्याला हार्ट अटॅक आला...त्याच्या वडिलांना काहीच कळलं नाही....ते इथे नवीन आलेत ना... त्यांना इथले काहीच माहिती नाही... त्यामुळे ते तिथूनच जवळ असलेल्या कुठल्या तरी गोट्याच्या मित्राच्या घरी
गेले होते, काही गाडीची व्यवस्था होते का बघायला.... पण त्याने यांना बघून दारच बंद करुन घेतले......तो नंतर बरच काही सांगत होता.... पण त्याच्या हातातून मोबाईल केव्हाच पडून गेला होता...
आता त्याला भोवळ आली...... समोरच आरसा होता... त्यात त्याने पाहिले.... त्याला उगाचच आपले पुढचे दोन दात सुळ्यांसारखे भासले.... त्यावर रक्‍तही होतं....