शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

प्रिय



खूप दिवसांनी पत्र लिहितोय. त्याबद्दल माफ कर. तुझ्याकडे माफी मागायची हाही एक बहाणा असतो, तुझ्याजवळ जाण्याचा, हे बहुतेक तुलाही माहीत आहे. काही नात्यांचं असंच असतं. जे दिसतं तसं असत नाही. महाभारत हा जसा तुझ्या आवडीचा विषय तसा माझ्याही. महाभारताचे वैशिष्ट्यच हे की ते प्रत्येकाला आपपल्या नजरेतून वेगळे भासते. कृष्ण-राधा ही जोडी महाभारतात नाही, ती नंतरच्या काळात कीर्तनकारांनी टाकली, दुर्गा भागवतांनी याबाबत खूप संशोधन केले आहे. खरे तर राधा आणि द्रौपदी ही पात्रे कीर्तनकारांनी वेगळी केली. राधाही विवाहित आणि द्रौपदीही विवाहित. पण दोघींचे कृष्णावर प्रेम. राधा-कृष्ण मांडताना कीर्तनकारांनी त्या प्रेमाला भक्‍तीचे रुप दिले आणि द्रौपदी-कृष्ण प्रेमाला बहीण-भावाचा मुलामा; पण मला नेहमी वाटते, राधा ही काही गोकुळातली गवळण नव्हती. शिवाजी सावंतांनी युगंधर लिहिताना राधेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला; पण त्यांनाही तो लागला नाही. मग त्यांनी शब्दांचा किस काढत राधा म्हणजे मोक्ष वगैरे असा काहीसा अर्थ लावला. पण राधेला महाभारतात शोधण्याचा त्यांनी आणखी थोडा प्रयत्न केला असता तर राधा महाभारतात क्षणा-क्षणाला भेटली असती. राधा आणि द्रौपदी या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. द्रौपदीत राधेला बघायचे थोडेसे धाडस केले तर तिच्यात राधा दिसतेच. अगदी स्वच्छ निर्मळपणे ती दिसते. विशेष म्हणजे प्रियतमेसाठी सर्वस्व देणारा कृष्ण द्रौपदीसाठीच भारतीय युद्ध घडवून आणतो हेही आरशासारखे स्पष्ट आहे. पाच पती असूनही द्रौपदीला कृष्ण का आवडावा? हा प्रश्‍न उपस्थित होईलही, पण नवऱ्यांची संख्या किती यावर का प्रेम असते. पाचही पतींमध्ये पराक्रम आणि शौर्य होते, पण प्रेम केवळ शौर्य आणि पराक्रमावर केले जात नाही, ती अंतरिक गोष्ट आहे. दुर्गाबाई याबाबत खूप सविस्तर सांगायच्या, पण त्यांनीही राधेला आणि द्रौपदीला एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मांडलेले नाही. कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील नाते हे भावा-बहिणीचे रंगविले ते खरे कीर्तनकारांनी आणि त्यानंतर भावगीत रचणाऱ्या कवींनी. द्रौपदी खरे तर कृष्णाची सखी. गंमत बघ हं, कृष्णाच्या रुक्‍मिणी-सत्यभामेसह सोळा सहस्र स्त्रिया असल्या तरी त्याला त्याची सखी भेटली ती द्रौपदीत आणि पाच नवरे असूनही कृष्णेला अर्थात द्रौपदीला कृष्णातच सखा दिसला. खरे तर हा प्रेमाचा रंग नाटककारांनी आणि कवींनी फुलवायला हवा होता. अगदी प्लेटो सांगतो तसे हे प्रेम अशारीरिक आणि उच्च पातळीवर होते. द्रौपदीच्या लज्जा रक्षणापासून ते तिच्यातील सूडाला मूर्त रूप देण्यापर्यंतच्या प्रवासात पांडवांहून जास्त पुढाकार कृष्णाने घेतला आहे. त्यासाठी त्याने वाट्‌टेल ते केले आहे. यांत तिच्यासाठी सर्वस्व द्यायचा हेतू होता. कृष्णाला भारतीय युद्ध थांबवायचे असते तर ते केव्हाच थांबले असते. पण ते त्याला थांबवायचे नव्हते. द्रौपदीचा झालेला अपमान जितका पांडवांना जिव्हारी लागला होता, त्यापेक्षा जास्त कृष्णाला लागला होता. म्हणूनच तर त्याने अर्जुनाला "युगंधर' तत्त्वज्ञान सांगून लढायला भाग पाडले. एखाद्या शूर सेनानीने युद्ध लढण्यापूर्वी आपल्या शस्त्रांना धार द्यावी, दारूगोळ्यांचा साठा करावा, व्यूहरचना करावी, अगदी त्याचप्रमाने द्यूत सभेनंतर कृष्णाने केले. पांडवांपेक्षा कृष्णालाच हे युद्ध हवे होते हे उघड आहे. हे युद्ध जिंकल्यानंतर कृष्ण काही चक्रवर्ती सम्राट वगैरे होणार नव्हता, किंवा तोही चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिरच्या साम्राज्यातील एक मांडलिक राजा होणार होता. तरीही त्याने पांडवांना मदत केली. याचे कारण धर्माची पुनर्स्थापना हे नव्हतेच. कारण कौरवांचा पक्ष अधर्माचा आणि पांडवांचा पक्ष धर्माचा हे कशावरून ठरणार? युद्धभूमीवरचा धर्म काय हे कृष्णाने सांगितले, याचा अर्थ असा नव्हे, की कौरवांचे राज्यच मूळी अधर्माचे होते. त्याचे संदर्भ वेगळे वेगळे करायला हवेत. सांगायचा मुद्दा हाच, की कृष्णाने केवळ आणि केवळ द्रौपदीसाठी हा महाभयंकर संग्राम घडवून आणला. पण हे अमूर्त आणि संयमी प्रेम उघड झाले नाही हे खरेच. आपल्याकडे सामाजिकदृष्टया स्त्री-पुरुषांना कुठल्यातरी नात्यात अडकविणे भाग पडते. तसे न झाल्यास अनैतिकतेच्या गाळात त्यांना अडकावे लागते. द्रौपदी विवाहित आणि कृष्णही विवाहित त्यात कृष्णाला दैवपद बहाल केलेले. त्यामुळे द्रौपदी आणि कृष्ण यांच्यात प्रेम होते आणि राधा दुसरी तिसरी कोणी नसून ती द्रौपदीच होती, असे जर कोणी सांगितले तर त्याला एक तर मुर्खात काढण्याचा संभव होता किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा. त्यामुळे राधेला कृष्णेतून वेगळे करण्यात आले आणि द्रौपदीला बहीण करण्यात आले. पण द्रौपदी आणि कृष्णाचे खरे प्रेम होते. अपुरेपण दोघांतही होते, माणसांच्या गर्दीत आपण एकटे असतो ना तसेच त्या दोघांचे होते.
पण त्यातही गंमत आहे. या दोघांचे प्रेम उच्च असले तरी खरे उच्चतम प्रेम महाभारतात सापडते ते भीमाचे. युधिष्ठिर एकपत्नीव्रत राहिला पण त्यात त्याच्या प्रेमापेक्षा तत्त्वाचा भाग जास्त होता, भीमाचे हिडिंबाशी लग्न झाले होते, ते खरे द्रौपदी त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी. हे खरे तर एकतर्फी प्रेम होते. द्रौपदी मनाने कृष्णाची होती. खरे तर ती राधेसारखी कृष्णाबरोबर होती आणि भीम राधेप्रमाणे द्रौपदीवर प्रेम करायचा. द्यूत सभेत कृष्णेची विटंबना होताना तिला आठवला तो कृष्ण, पण पांडवात ज्याची सर्वात जास्त तडफड झाली तो भीम.
तुझाच..