बुधवार, २७ जानेवारी, २०१०

चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती

चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती

विवेकानंदांसारख्या सन्यस्त जीवन जगणाऱ्या प्रभुतीने पैशाला महत्त्व दिले नाही, यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही; पण पैशाची निकड त्यांनीही अमान्य केलेली नाही. मात्र पैसा हेच सर्वस्व नाही हे ते वारंवार सांगतात. तरुणच देशाचे भवितव्य बदलतील! असा गाढ आशावाद दाखविणाऱ्या विवेकानंदांचे विचार आजही तरुणांना प्रेरणादायी आहेत.-----------
""आपण गरीब आहोत असे समजू नका. केवळ पैसा हीच जगातील शक्‍ती नव्हे; चांगुलपणा, पावित्र्य हीच खरी शक्‍ती होय. साऱ्या जगात हीच खरी शक्‍ती आहे. हे तुम्ही स्वतःच बाहेर येऊन पाहा.''
2 नोव्हेंबर 1883 मध्ये अळसिंगा पेरुमल या आपल्या गुरुबंधूंना लिहिलेल्या पत्रामध्ये विवेकानंदांनी नितीमत्ता आणि पावित्र्याला पैशापेक्षा जास्त महत्त्व आहे हे पटवून दिले आहे.
शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांनी "ते' ऐतिहासिक भाषण केले. त्या भाषणाआधी त्यांना पैशाची आवश्‍यकता होती आणि त्यासाठीच त्यांनी पेरुमल यांना पत्र लिहिले असल्याचे जाणवते. पेरुमल यांना काही कारणांनी पैसे जमविता आले नाहीत, त्याबद्दल ते स्वतःला दोषी मानत होते. त्यामुळे पेरुमल यांना समजावताना विवेकानंदांनी वरील पत्र लिहिले. त्या पत्रात, पैसा हेच सर्वस्व नसल्याचे ते पटवून देतात. केवळ याच पत्रात नव्हे तर विवेकानंदांनी त्या काळात ज्या-ज्या वेळी भारतात पत्र लिहिले त्या-त्या वेळी पैशाला महत्त्व देऊ नका, पैसा हा आवश्‍यक असला तरी तो सर्वस्व नाही, हेच वारंवार सांगितले.
अमेरिका म्हणजे पैशाचं झाड! याबद्दल भारतात वाटणारी उत्सुकता आणि ते मिळत नसल्याचे दुःख हे त्या काळातही होतेच; पण अमेरिकेतील ऐषोआरामबद्दल येथे वाटणाऱ्या कुतुहलामुळे आणि तो ऐषोआराम मिळत नसल्याचे वाईट वाटून घेणाऱ्या आपल्या गुरुबंधूंना ते समजावून सांगताना आपल्याकडे पैसा नसला तरी अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांची पैशात मोजमाप करता येणार नाही हे ते सांगतात.
पैसा हेच दुःखाचे मूळ असेल तर इथे (अमेरिकेत) तो प्रश्‍न नाही; मग येथील लोक दुःखी का? कारण येथे नितीमत्ता नाही. त्यापेक्षा भारतातील लोक अधिक सुखी आहेत. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकवेळी आपल्याकडे काय अधिक आहे! याचा विचार करायला हवा ! हेच ते वारंवार सांगतात.
म्हैसूरच्या राजेसाहेबांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,""पाश्‍चात्य लोक आमच्या जातीभेदांवर कितीही टीका करोत; पण त्यांच्यात आमच्यापेक्षा देखील वाईट असा जातीभेद आहे आणि तो म्हणजे पैशावर उभारलेला जातीभेद, अर्थगत जातिभेद. अमेरिकन लोक म्हणतात की सर्व शक्‍तीमान डॉलर काहीही करू शकतो; पण या देशात जेवढे कायदे आहेत तेवढे जगात इतरत्र कुठेही नाहीत आणि येथील लोक कायद्यांना जेवढे धाब्यावर बसवितात तेवढे दुसरीकडे कुठे आढळत नाही. साधारणपणे आपले गरीब लोक या पाश्‍चात्यांपेक्षा कितीतरी अधिक नितीमान आहेत आणि हीच आपली शक्ती आहे.
खास करुन तरुणांना मार्गदर्शन करताना विवेकानंदांनी धर्म आणि जगणं यांची सांगड घातली आहे. स्पर्धा असतेच, पण ही स्पर्धा कुठल्या पातळीपर्यंत करायची हे ठरविले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या आणि उर फुटेपर्यंत धावायला लावणाऱ्या स्पर्धेत तरुणांना पैसा सर्वस्व वाटू लागला आहे. पैसा काहीही करु शकतो. त्यामुळे पैशासाठी काहीही हे सूत्र ठळक झाले आहे. याच सूत्राला गिरवत तरुणाई पुढे जात आहे. मग पैसा मिळाला नाही की निराशा आणि निराशेतून आत्महत्या! अशा दुष्टचक्रात तरुणाई सापडत आहे; पण कोणत्याही दुष्टचक्राला भेदण्याची ताकद केवळ तरुणांतच आहे हा अशावाद ते जागवत राहातात.
त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून आशावाद आणि जगण्याची उर्मी यांना प्रथम प्राधान्य दिल्याचे जाणते. खास करुन कर्मकांड म्हणजे धर्म नसून नितीमत्ता हाच धर्म आहे हेच ते वारंवार पटवून देतात. धर्म आणि जगणं यांची सांगड घालताना जगण्यापासून धर्माला वेगळं करता येत नसल्याचे ते स्पष्ट करतात.आज "पैसा' या शब्दाभोवतीच यशापयश केंद्रीत होत असताना विवेकानंद तरुण सहकाऱ्यांना विवेक, नितीमत्ता यांची किंमत पैशात करता येणार नाही, हे सोदाहरण स्पष्ट करतात.

टाईमपास ः वेळेचा अपमानच

टाईमपास ः वेळेचा अपमानच
अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे.
संस्कृतमध्ये एक कथा आहे. गाढव आणि उंट एकत्र चाललेले असतात. मध्येच उंटाला गाढवाची स्तुती करावी वाटते म्हणून ते म्हणतं, ""हे गर्दभमहाराज, तुमचा आवाज किती गोड आहे.'' उंटाने केलेल्या स्तुतीने गाढवाच्या अंगावर मूठभर मांस चढतं. आपल्या या मित्राने एवढी स्तुती केली म्हटल्यावर तेही उंटाची स्तुती करतं. ""हे उंटमहाराज, तुम्ही दिसायला किती सुंदर आहात.'' ही गोष्ट आठवायचं कारण "टाईमपास' हे नाटक. नावाप्रमाणे टाईमपास म्हणूनही या नाटकाकडे बघितलं तरी नाटक बघायला जाऊन वेळ वायाच घालविला नाही तर वेळेचा अपमानही केला असं वाटतं.
सुयोगची निर्मिती, शफाअत खान यांचे लेखन आणि भरत जाधव, सुप्रिया पिळगावकर यांचा अभिनय म्हणून प्रेक्षक नाटकाकडे वळतात खरे; पण आपल्या हाती निखळ मनोरंजनसुद्धा लागू नये, या बद्दलची हळहळ व्यक्‍त करतच नाट्यगृहातून बाहेर पडतात. नाटकाचं नाव "टाईमपास' असल्याने त्यातून तत्त्वज्ञान सांगितले जाणार नाही, हे निश्‍चित होतेच;
पण विनोद तरी निखळ आणि खळखळून हसविणारा हवा. (विनोदनिर्मिती थोड्या अतिशयोक्‍तीने आणि डोक्‍याचा वापर न करता केली असती, तरी चालली असती) पण नाटक कोणत्याच अंगाने फुलत नाही आणि ते संपले कधी हेही कळतच नाही. नाटकाची संकल्पना चांगली असली, तरी संहितेवर कामच नाही. नवरा-बायको कंटाळा घालविण्यासाठी एकमेकांना अनोळखी म्हणून भेटतात आणि त्यातून विनोदाची निर्मिती ही संकल्पना खूपच चांगली असली तरी संहितेवर मेहनत नाही. एक-दोन कोट्या सोडल्या तर नाटकातील विनोद लक्षात राहत नाही. तेच तेच संवाद परत परत येत राहतात. आणि मग कंटाळा घालविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाच कंटाळा येऊ लागतो. प्रेक्षागृहात थोडी खसखस पिकली असली तरी ती पोरासोरांची आणि ती नवदाम्पत्यांची. नवरा हसला म्हणून बायको हसते आणि बायको हसली म्हणून नवरा; पण चांगले नाटक बघण्यासाठी आलेला प्रेक्षक मात्र हिरमूसूनच बाहेर पडतो. वेगवेगळी पात्रं उभी करण्यात नाटककाराला यश आलेले नाही. आणि नाटक बहुंताश चॅनेलवर दिसणाऱ्या हास्य कार्यक्रमाच्या अंगाने जाते आणि तिथेच फसते. खासकरून एमटीचे पात्र उभे करताना त्यात आणखी संवाद चांगले हवे होते. वेशभूषाही करायला हरकत नव्हती; पण काहीच नाही. प्रेक्षागृहातून नाटकाच्या सुरवातीपासून खसखस पिकत असली, तरी ती दमदार संहितेचे यश नसून भरत आणि सुप्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दिलेली दाद आहे. खासकरून भरतच्या चेहऱ्यावरील भाव नेहमीप्रमाणे बदलतात आणि त्यातून थोडी विनोदनिर्मिती होते; पण ती भरतचीच जमेची बाजू. पहिल्या अंकानंतर प्रेक्षक दुसऱ्या अंकात काही तरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो; पण त्याला त्यातही काहीच मिळत नाही. नाटकाचा शेवटही तसाच. तो थोडा आणखी भावनिक करता येऊ शकला असता.
नाटक संपल्यावर एकांकिकेचे ओढूनताणून दोनअंकी नाटक केल्याचे जाणवते. खरे तर काही प्रसंग आणखी थोडे रंजक केले असते, थोडी वेशभूषाही केली असती तर जमेची बाजू ठरली असती. त्यामुळे नाटक उभे राहिले असते, की नाही माहीत नाही; पण पडतानाही थोडा कमी आवाज झाला असता. या नाटकाची चर्चा एवढी का झाली हा प्रश्‍न आहे. अलिकडे आता कोणत्याही नाट्य संस्थेने नवीन नाटक आणले, की सगळेच त्याचे तोंड भरून कौतुक करू लागतात. कोणीच कुणाच्या नाटकाला नावं ठेवायचं नाही. तू चांगला, तो चांगला, मीही चांगला असे सगळंच चांगभलं सुरू आहे. टाईमपासने या सगळ्याचा पुरेपूर लाभ उठविला आहे. सुमार संहिता, सुमार संवाद, दिग्दर्शनाला वावच नाही, रंगमंचावर वीस वीस वर्षे अभिनय केल्यानंतर सुप्रिया आणि भरतने केलेला अभिनय खूप उच्च दर्जाचा म्हणणे हा त्यांचाच अपमान आहे. त्यामुळे टाईमपासला जाणे म्हणजे वेळ वाया घालविणे नव्हे; तर वेळेचा अपमान करण्यासारखेच आहे.