गुरुवार, १ एप्रिल, २०१०

एप्रिल फुल !

रात्रीचे बाराचे ठोके पडले आणि तिचा मोबाईल वाजला...डोळे तारवटतच तिने तो उचलला आणि हॅलो म्हटलं.....हॅलो मी दारात उभा आहे.. दार उघड... त्याचा आवाज ऐकून ती थोडी बावचळली.....एवढ्या रात्री का आला असेल? काहीतरी नक्‍की महत्त्वाचं काम असेल म्हणून तिने दार उघडलं... दारात कोणी नाही बघून तिनं दार बंद केलं आणि त्याला फोन लावला... तो मोठ्याने ओरडलाच...एप्रिल फुल. ती स्वतःशीच हसली. फोन ठेवला आणि आडवी झाली. तिने झोपायचा प्रयत्न केला, पण झोप येईना. मागचे दिवस आठवत राहिले. तो पहिल्यांदा भेटलेला... कॉलेजमध्ये त्याने केलेली धमाल... नंतर त्याने केलेलं प्रपोज. त्याच्याशी आपण लग्न करणार आहे म्हटल्यावर आईने केलेला थयथयाट...
किती दिवस तो आईला समजावत होता. त्यासाठी रोज तिच्या शाळेत जात होता. आईच म्हणाली नंतर, जर त्यानं मला प्रपोज केलं असतं तर मीही हो म्हटलं असतं. खूप बडबड्या. लग्नानंतर किती काळजी घेत होता. एकेकदा त्याच्या त्या काळजीचाही वीट यायचा. आपण त्याला म्हणायचो की नको काळजी करत जाऊ एवढी. पण तो साधं डोकं दुखत असलं तरी रात्र रात्र बसून राहायचा. एकदा असंच ऑफीसच्या ट्रीपला गेल्यावर याचे एवढे फोन आले की शेवटी त्याला बास असं सांगावं लागलं. त्यानं तरी ऐकलं नाही. फोन वाजत राहिला. बॉस म्हणालाच असले अँटीने बदलावे. त्यावेळी काही वाटले नाही. पण नंतर तसं साचत राहिलं.
बॉसच्या शेजारी असताना याचा फोन आला की बॉसचं डोकं फिरायचं. मग तो कामात न झालेल्या चुकाही दाखवत राहायचा. त्याचा त्रास होऊ लागला. त्याची अति काळजी आता अंगावर येवू लागली. चिड येवू लागली. मग, एकदा त्याला सरळ सांगून टाकलं, आपलं यापुढे एकत्र राहाणं शक्‍य नाही. तो काही बोलला नाही. नंतर त्या आवेगातच आपण घटस्फोटाची कागदपत्रे केली. त्यानं का हा प्रश्‍न न विचारताच सही केली.
मग फोन बंद झाले. पहिले काही महिने छान गेले. बॉस नेहमीप्रमाणे बोलत होता. मग अचानक एक दिवस बॉसने छेडले... मैत्रीणीजवळ आपण खूप रडलो. पण दुसऱ्याच दिवशी बॉसने केबीनमध्ये बोलवून पाय धरले. बॉसचा सुजलेला चेहराच सांगत होता की त्याने रात्री त्याला बदड बदड बदडले असणार. त्याला फोन केला. तोच उत्साह खूप बडबडला. मग फोन खाली ठेवला. त्या रात्री खूप एकटं वाटलं. मग नंतर तो फोन करत राहायचा. आधी विचारायचा की तू रिकामी आहेस का? मग बोलू का विचारायचा आणि बोलायचा. त्याचा तो त्रयस्थपणा अंगावर यायचा. पण धीर नाही झाला. मग एक दिवस त्याला सरळ विचारलं आपण पुन्हा लग्न करुया का? लगेच हसला. मग म्हणाला, नको... आपल्या लग्नाची तारीख एक एप्रिल होती. एकदा "फुल' बनल्यावर तीच चूक पुन्हा कशाला !