रविवार, २० फेब्रुवारी, २०११

युतीचा नवा खेळ


भारतीय जनता पक्ष असो वा शिवसेना या दोन्ही पक्षांना आता युती स्वबळावर सत्तेत येईल याबाबत आत्मविश्‍वास उरलेला नाही. जोपर्यंत दलित समाज युतीबरोबर येत नाही, तोपर्यंत युतीला बहुमत मिळणार नाही, हे त्यांना पक्‍के ठाऊक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना पायघड्या घातल्या नसत्या तरच नवल. शिवसेनेला आगामी मुंबई महापालिकेसाठी रामदास आठवले पाहिजे आहेत, तर भाजप लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अपेक्षित धरून चालला आहे. त्यामुळे भाजपला आता कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून स्वतःचे आणि मित्रपक्षांचे खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठीच मुंडेंची बांधणी सुरू आहे.लो कसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून बराच अवधी आहे. गेल्या निवडणुकांत काय चुका झाल्या, याचे आत्मपरीक्षण सर्वच पक्षांनी केले आहे. तरीही आता पुन्हा निवडणुका जवळ आल्यासारखी विधाने विरोधी पक्षांच्या नेत्याकंडून होत आहेत. यात विरोधी पक्षाची ताकद वाढविण्याचा जसा प्रयत्न आहे, तसाच सत्ताधाऱ्यांच्या मनातही चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर सभेत मनसेशी युती करणे कसे गरजेचे आहे, हे आकडेवारीनिशी सांगितले. त्याचदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या गणिताबाबत चर्चा रंगू लागली आहे. खरे तर भीमशक्ती- शिवशक्ती एकत्र येण्याची गोष्ट काही नवी नाही. यापूर्वीही अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आहेत आणि त्या वेळीही केवळ चर्चाच रंगली होती. त्यानंतरही रामदास आठवले ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत होते, त्यांच्यासोबतच राहिले आणि शिवशक्ती आणि भीमशक्‍ती एकत्र येण्याची चर्चा हे केवळ एरंडाचे गुऱ्हाळ ठरले. यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण होणारच नाही असे नाही; पण मागच्या वेळीपेक्षा या वेळी ही युती होण्याच्या दिशेने रंकाळ्याचा नंदी एक तांदूळ पुढे सरकला आहे, हे निश्‍चित.
शिवसेनेला आता गरज आहे मुंबई महापालिका जिंकण्याची. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला विरोधात मनसे असल्याने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी विरोधातील ताकद जेवढी कमी करता येईल तेवढी करण्याकडे त्यांचे लक्ष आहे. मुंबई ही शिवसेनेची पेढी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई जिंकायची आहे.
मुंबईतील दलित मते मिळविण्यासाठी रामदास आठवलेंची शिवसेनेला गरज आहे. (त्यासाठी ते काही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याच्या तयारीतही आहेत.) रामदास आठवले जर शिवसेनेला मिळाले तर निवडणुकीची ही प्रश्‍नपत्रिका सोपी जाणार नसली तरी त्यातील दोन-तीन प्रश्‍नांची उत्तरे अगोदरच माहीत असल्याने प्रश्‍नपत्रिकेला सामोरे जातानाचा आत्मविश्‍वास वाढेल, यात शंका नाही. त्यामुळे शिवसेनेला आठवलेंची गरजच आहे. याच वेळी रामदास आठवलेंनाही लोकसभेचा पराभव जिव्हारी लागला आहे. आघाडीशी युती करूनही आपल्याला काहीच मिळाले नसल्याची भावना त्यांची तीव्र झाली आहे. हीच भावना कमी-जास्त प्रमाणात त्यांच्या कार्यकर्त्यांतही आहे. ग्रामीण पातळीवर काम करत असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी-कॉंग्रेसने गृहीतच धरले आहे. त्यामुळे त्यांनाही आघाडीशी संबंध नकोसे झाले आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा मेळ रिपब्लिकन विचारांशी बसत नसला तरी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांत हा मेळ बसू लागला आहे. त्यामुळे समान कार्यक्रम ठरवून एकत्र यायला हरकत नाही, अशीच भावना दलित कार्यकर्त्यांची आहे. आगामी विधानसभा निवडणुका व्हायच्या तेव्हा होवोत; पण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुंकाअगोदर ही युती झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांत युतीच्या बळावर आपली ताकद वाढेल, असा विश्‍वास या कार्यकर्त्यांना वाटत आहे. तरीही रामदास आठवलेंना आपल्यासोबत घेण्यासाठी युतीच्या नेत्यांना दोन पावले मागे यावे लागेल, हे निश्‍चित!
मनसेबाबत गोपीनाथ मुंडेंनी युतीचे केलेले वक्तव्य आणि राज ठाकरे यांनी त्याबाबत केलेला इन्कार दोघांच्याही राजकारणाचा भाग आहे. मुंडे आता दिल्लीत असल्याने दिल्लीतल्या वाऱ्याप्रमाणे ते बोलतात आणि राज ठाकरेंना दिल्लीतल्या वाऱ्यापेक्षा मुंबईचे खारे वारे जास्त प्रिय आहे. केंद्रातील आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात सापडल्याने हे सरकार कधी कोसळते, अशी वाट भाजप बघत आहे. त्यामुळेच कोहाळा पडला तर काय काय करायचे, याची रणनीती ते आतापासून बनवायला लागले आहेत. आज मनसे युतीसोबत नसली तरी उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने युतीत सहभागी व्हावे, यासाठीच हा प्रयत्न आहे. (त्यामुळेच रविशंकर यांनी मनसेबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील न म्हणता एनडीए घेईल, असंच म्हटलं आहे.) पण यात एक फरक आहे. शिवशक्‍ती-भीमशक्‍ती एकत्र यावी, ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जशी इच्छा आहे, तशीच ती त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. त्या प्रमाणात भाजप-मनसे एकत्र येण्यास मनसेचे ना नेते इच्छुक आहेत ना कार्यकर्ते.

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

हे डोळे पुन्हा दिसणार...


तिच्या डोळ्यांनी घायाळ झालेल्यांची संख्या कमी नाही। अगदी अख्खा चित्रपट तिच्या डोळ्यांसाठीच बघणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. तिने नुसती पापण्यांची उघडझाप केली, तरी अनेक थांबलेली हृदये धडधडायची. अगदी तिच्या चेहऱ्यावरची रेघ बघता बघता मरण यावं, अशी इच्छा बाळगणारे कमी नव्हते, नाहीत. कोमेजलेली फुलेही तिच्या हसण्याने पुन्हा टवटवीत व्हायची. ती मीनाक्षी होती, ती रोहिणी होती, ती नूतन होती. नूतन यांचे टपाल तिकीट टपाल खाते प्रकाशित करणार आहे. आपले बोलके डोळे रूपेरी पडद्यावर ठेवून गेलेल्या या अभिनेत्रीची आठवण राहावी म्हणून हे टपाल तिकीट खचितच नाही, तर तो टपाल खात्याचा सन्मानच आहे."नूतनचा चेहराच एक अभिनयाचे व्यासपीठ होते. आजही जेव्हा तिचे चित्रपट बघतो, तेव्हा तिच्या चेहऱ्याशिवाय नजर दुसरीकडे वळत नाही' नाना पाटेकरसारख्या स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या अभिनयसम्राटाचे हे उद्‌गार नूतन यांचा गौरव अधिकच अधोरेखित करतात. नूतन यांचा मुखाभिनय त्यांच्या डोळ्यांतून प्रवाहित होत होता. त्यांचे हरिणीसारखे डोळे आणि पातळ ओठ एखाद्या सामान्य प्रसंगातही प्राण भरायचे. स्मिता पाटील, तब्बू किंवा दीप्ती नवल या नूतन यांच्या अभिनयाच्या विस्तारकच वाटतात. "बंदिनी' हा नूतन यांचा प्रचित्रपट. यात प्रत्येक फ्रेममध्ये नूतन नव्याने भेटतात. डोळ्यांतील भाव इतक्‍या सहजतेने बदलतात, की प्रेक्षक त्या डोळ्यांभोवतीच घुटमळत राहतो. एकीकडे त्यांचे ते पातळ ओठ थरथरत निशब्दता व्यक्त करतात आणि त्याच वेळी त्यांचे डोळे ती निशब्दतेला चिरून ओरडत राहतात. त्यांच्या याच अभिनयावर बेहद्द खूश झालेल्या दिलीप कुमार यांनी मी "कर्मा'पूर्वी नूतन यांच्याबरोबर चित्रपट का केला नाही, असा स्वत:ला प्रश्‍न विचारतात. दिलीप कुमार असो वा अशोक कुमार किंवा अमिताभ यांच्यासोबतच्या फ्रेम नूतन यांचा मुद्राअभिनय ठळकच होत नाही तर तो सहकलाकाराच्या चेहऱ्यावरचा चेहरा बनून जातो.संकोच, प्रेम, माया, हुरहूर हे भाव डोळ्यांतून अगदी सहजपणे उतरत होते. "मै तो भूल गयी बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे', हे गाणे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. अशा या मुद्रेला टपाल खात्याने मुद्रित केले नसते तर नवलच; पण नूतन यांच्या तिकिटावर शिक्का मारताना पोस्टमनचे डोळे मात्र भरून येणार, हे निश्‍चित!शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

रेल्वे स्टेशन

दादा,
एवढाच शब्द त्या पोरीनं उच्चारला आणि त्याच्यासमोर तिने हात पुढे केला. पहाटे साडेतीन-चारची वेळ.
रेल्वे स्टेशनवर त्याच्याबरोबर उतरलेले, घराकडे लगबगीने चाललेले प्रवासी, चहावाल्या पोरांच्या आरोळ्या.. पेपर स्टॉलवर मोठ्याने लावलेला रेडिओ.. रिक्षावाल्यांची येणाऱ्या प्रवाशांकडे कुठे जाणार म्हणून विचारपूस. या गर्दीत भिकारी नव्हतेच. नव्हते म्हणजे ते भीक मागत नव्हते. झोपलेली, पेंगाळलेली भिकाऱ्यांची पोरे आणि बाया अस्थाव्यस्थ पडल्या होत्या. अशा या पहाटेच्या वेळी हात पुढे केलेली ती बारा-तेरा वर्षांची पोरगी अस्वस्थ करत होती. अंगात कुठल्याशा शाळेचा युनीफॉर्म होता. पण तो इतका मळला होता, की तो नेमक्‍या कोणत्या शाळेचा हेच कळत नव्हतं. हातात कंडे, केस विस्कटलेले आणि मातीने माखलेले. गाल खोल गेलेले, अगदी बरेच दिवस काही खाल्लं नसल्यासारखे. बरेच दिवस झोप नसल्यासारखे डोळे तारवटलेले आणि पोटातील भूकेमुळे लाचार झालेले. तिची ती नजर आणखी अस्वस्थ करत होती.
चल हट यहॉं से!
बहुतेक त्याची अस्वस्थ नजर बघून चहावाल्याने तिला हटकलं. पण ती हलली नाही. आपली लाचार दृष्टी आणखी लाचार करत ती त्याच्याभोवती घुटमळत राहिली. त्याने खिशात हात घातला, काही नाणी हाताला लागतात का बघायला, पण हात रिकामा वर आला.
तू चहा पिणार?
त्याच्या या प्रश्‍नावर ती काही बोलली नाही. पण हललीही नाही. हिला एक चहा दे.. चहावाल्याने आपल्या ठेवणीतील एक कप काढला आणि तिच्यापुढे चहा ओतला. ब्रेड खाणार...तिने नकार दिला नाही. चहावाल्याने न सांगताच ब्रेड काढला आणि तिच्या हातात दिला. तिने तो अगदी आधाशासारखा खाल्ला. पुन्हा तिने हात पुढे केला नाही. अजून उजाडायला दोन तास अडिच तास अवकाश होता, तोपर्यंत त्याला स्टेशनवरच थांबावे लागणार होते. तिथल्याच एका बाकड्यावर त्याने बॅग ठेवली आणि प्रवासाने थकलेल्या अंगाला त्या बाकड्यावर अक्षरशः सैल सोडलं. डोळ्यातील झोप चहाने कमी झाली नव्हती, त्याने जोराची जांभई दिली. एवढ्यात ती पोरगी त्याच्याजवळ येऊन बसली. ती जवळ बसल्यावर त्याला काही सुचेना. बॅगेत फारसे सामान नव्हतेच पण आहे, ती बॅगही चोरीला गेली तर या अनोळखी शहरात फार पंचायत व्हायची म्हणून त्याने ती मांडीवर ठेवली. पोरीच्या ते लक्षात आलं असावं, त्यामुळे तिने नजर फिरवली. तो काही बोलला नाही. बसून राहिला. तीही काही बोलली नाही. बराच वेळ गेल्यानंतर तीची चूळबूळ सुरु झाली.
सुटे पैसे नाहीत माझ्याकडे, तिच्यापासून सुटका करण्यासाठी तो बोलला.
""नको दादा, पैसे नको मला.''
मग काय? जा इथून निघून. मला थोडं झोपायचं आहे.
ती काही बोलली नाही, पण तिथून निघूनही गेली नाही. बाकड्याच्या कोपऱ्यावर बसून ती बाकड्याचा हात टोकरत राहिली.
आई-बाबा कोणी आहे का नाही? तिची अस्वस्थता सहन न होऊन तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
त्याच्या या प्रश्‍नासरशी ती गडबडीने मागे सरकली. त्याच्याकडे बघत म्हणाली.
आहेत की.
मग तू इथे काय करते आहेस.
घरातून पळून आले आहे?..
काय म्हणतेस काय? त्या प्रश्‍नाने तो उडाला. आता त्याला ती भिकारी वाटेनाशी झाली. आपल्यासारखीच कोणीतरी चांगल्या घरातील मुलगी ही भावना त्याला सुखावून गेली.
का आलीस पळून... मघापेक्षा त्याच्या बोलण्यात आलेला तो ओलावा. तिला जाणवला पण लगेच ती सावरली. मघाशी मागे सरलेली ती पुन्हा पुढे सरकरली, तिने बाकड्याचा कडा आणखी घट्‌ट पकडला.
त्याला ते जाणवलं. तो मागे सरला. काहीच बोलला नाही. बराचवेळ शांतता पसरली.
काय झालं.. आई रागावली म्हणून घर सोडलंस?
नाही..
मग?
ती काही बोलली नाही. कदाचित तिला कारण सांगायचे नसेल, समजून तो गप्प बसला. कुठे राहातात आई-बाबा..
बोरीवलीला.
फोन नंबर आहे. आपण फोन करुया.
त्याने खिशातून मोबाईल काढला आणि तिच्याकडे आशेने बघायला लागला.
पण, बाबा मारतील मला.
नाही मारायचे..
काय करतात तुझे बाबा..
मॅथचे प्रोफेसर आहेत.
मग, गणितात नापास झालीस म्हणून घर सोडलंस काय?
नाही. गणितात मला नेहमीच सेंट परसेंट असतात.
मग?
पुन्हा ती गप्प बसली.
बर राहू दे, नंबर सांग...
तिने नंबर दिला. नावही सांगितलं. तिचे बाबाच होते फोनवर. खूपवेळ रडले. मग बोलले. गयावया करु लागले, पोरीची काळजी घ्या म्हणून... खूपवेळ दोघे तसेच बसून राहिले. आता उजाडले होते, गर्दीचा आवाज वाढला होता.
बराच काळ गेल्यानंतर त्याने पुन्हा चहा घेतला. दोन-चार तास तसेच निघून गेले. त्याचा मोबाईल वाजला. साहेब त्याची वाट बघत बसला होता. त्याने थातूर-मातूर उत्तरे दिली. थोड्यावेळान पुन्हा फोन वाजला. तिच्या वडिलांचा फोन होता. ते समोरच उभे होते. त्यांची पोरगी मात्र त्याच्यामागे लपली होती. तो काही बोलला नाही. ते पुढे आले त्यांनी तिला एका हाताने जवळ घेतलं. त्याच्याही डोळ्यातून अश्रु आले. ती अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. बाप-लेकीचं भेटणं झाल्यावर ते त्याच्याजवळ आले, त्यांनी त्याचा हात हातात घेतला. डोळ्याच्या कडा ओलावल्याच होत्या.
""आम्हला आनाथ होण्यासापासून वाचवलंत.'' त्यांचे हे वाक्‍य त्याच्या जिव्हारी लागलं. फोनवर मघाशी त्यांनी सांगितलं होतं, ती अनाथ होती, हे समजल्याने तिनं घर सोडलं होतं.
तो मागे न बघता निघून गेला. मागे त्यानेच त्याच्या आई-वडिलांना असंच आनाथ केलं होतं.