शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

स्वतंत्र

इथे सही करा... वकिलाने कागदाच्या तळातील जागा दाखविली...
तिने निमूटपणे पेन उचललं आणि सही केली...
""हां... पोटगीदाखल तुम्हाला दरमहा दहा हजार, तुमच्या नावे असलेली कार आणि तुम्हाला घातलेले दागिने तुमच्याकडेच राहतील. तरीही तुम्हाला आणखी काही हवे असल्यास साहेबांनी सांगायला सांगितले आहे... मी इथे दोन ओळींची जागा शिल्लक ठेवली आहे...'' वकील ब्ला ब्ला ब्ला बोलत होता... त्याच्या बोलण्याकडे तिचे जराही लक्ष नव्हते...
""आणखी कुठे सही...?'' तिने प्रश्‍न केला.
""तुम्हाला आणखी काही नको?''
""नको! जेवढं दिलंय तेच खूप आहे...''
वकिलाने पेन पुढे केलं.. सहीची जागा दाखविली... ""हां इथे सही...''
तिने निमूटपणे पुन्हा सही केली...
""हं, झालं...''
""साहेब नाही आले...?'' तिने वकिलाकडे बघितले.
""तुम्हाला भेटायचे आहे त्यांना?''
""हो!''
वकिलाने फोन लावला... तो तिथेच कुठे तरी असावा. अगदी भेटायला व्याकूळ असल्यासारखा तो पटकन समोर आला.
तिने त्याच्याकडे बघितले. काहीतरी बोलायला हवे म्हणून ती म्हणाली, ""झाल्या सह्या.''
""हं...'' त्याने फक्‍त हुंकार दिला.
""आता?''
""आता काय?''
""काही नाही...'' तिला प्रचंड अवघडलेपण आलं होतं...
""तुला या वेळी इथे बोलावलं म्हणून अडचण नाही ना झाली... म्हणजे तुझ्या ऑफीसमुळे..'' त्याने जितकं थंड राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न केला.
""न.. नाही... नाही...'' तिनेही सावरून घ्यायचा प्रयत्न केला...
""उलट केतकर आलेत सोडायला... त्यांच्याच गाडीतून आले इथे...''
तिच्या या वाक्‍यासरशी तिच्यावर रोखलेले त्याचे डोळे अलगद बाजूला गेले...
""हं..'' त्याने पुन्हा हुंकार दिला...
""ऑफिसच्या ड्रायव्हरकडून गाडी पाठवून देते...'' ती काही तरी बोलायचे म्हणून बोलली..
""नको नको... ती राहू दे तुझ्याकडेच... मी लिहिलंय त्यात... गाडी तुझ्याकडेच राहावी म्हणून... ती तुझ्याच नावावर आहे ना?''
""नकोय मला खरं... मी तुझ्या नावावर करून देईन..''
""पण...''
""जाऊ देत... तुला एक विचारायचं होतं...''
""तू या सह्यांसाठी आजचाच दिवस का निवडलास...?''
""काही खास नाही... वकिलाला वेळ होता म्हणून..'' त्याने तिच्याकडे न बघता उत्तर दिले...
तिनेही मग ताणले नाही...
""चल... जाऊ मी आता...'' त्याने आपला वरचा ओठ दातांत दाबला आणि फक्‍त मान डोलावली...
तो तिथेच थांबून होता...
न बघता ती पायऱ्या झपझप उतरली आणि गाडीत बसली... गाडीत बसताना तिला जाणवलं की तो तिच्याकडेच बघत आहे.....
गाडी सुरू झाली.... तिने पर्समधून रुमाल काढला आणि डोळे पुसले....
केतकरांकडे बघत म्हणाली.. ""थॅंक्‍स...''
""कशाबद्दल....?''
""आज तू होतास म्हणून त्याने अडवले नाही... आणि त्याने अडवले नाही म्हणून मी त्याला सोडू शकले...''
केतकरने फक्‍त मान हलवली....
""पण काय गं... घटस्फोटाचे हे पाऊल उचलण्याची खरंच गरज होती?''
""नाही... पण माझ्यासमोर याशिवाय पर्यायच नव्हता..''
""पण यामुळे तो कोलमडला नसेल?''
""हं... तो काय, मी नाही कोलमडले... पण आता सुखाने मरेल तरी...!''
""तुला आठवतं, आठ वर्षांपूर्वी याच दिवशी तू आमच्या लग्नाचा साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्यास...''
माणसाने खरेच एवढे प्रेम करू नये!
""मीही प्रेम केलं.. अगदी स्वतःपेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर केलं.. मला नाही तरी दुसरं कोण होतं प्रेम करण्यासारखं.. पण तरीही त्याच्याइतकं प्रेम करणं मला नाही जमलं...
तुला माहीत आहे... आमच्या घरातील एकही वस्तू त्याच्या नावावर नाही... घर, कार, साधा टेलिफोनसुद्धा माझ्याच नावावर...
त्याला एकदा विचारलं, का रे! सगळी कामं मला करायला लावायला तू लग्न केलंस की काय?
त्यावर तो एवढा अपसेट्‌ झाला होता... म्हणाला, नाही गं... प्रत्येक वेळी तुझं नाव लिहायला मिळावं म्हणून मी सगळ्या वस्तू तुझ्या नावावर केल्यात...
स्वयंपाक करत असताना ओट्याशेजारी खुर्ची ठेवून बसायचा...
काय रे, एवढं काय आहे माझ्यात? असं म्हटलं की नुसता हसायचा... काही बोलायचा नाही...
मी पुन्हा नोकरी करते म्हटल्यावर लगेच त्याने तुला फोन केला... मला यायला-जायला त्रास होऊ नये म्हणून कार घेतली....''
""हं...'' केतकरने हुंकार सोडला...
""आठ महिन्यांपूर्वी त्याची डायरी वाचली नसती तर....''
तिने हुंदका दाबायचा प्रयत्न केला... पण जमलं नाही...
""तो मरणार यात शंका नाही; पण तो रोज मरताना मला बघवणार नव्हतं.... आणि त्यालाही आता आपलं रोजचं मरण लपवताना त्रास नाही होणार, कामाच्या टूर काढून दिवसेंदिवस बाहेर राहावं लागणार नाही...''
केतकरने तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला... पण तिने हलकेच तो बाजूला घेतला...
""डायरीत त्याने लिहिलेलं वाक्‍य तुला सांगितलेलं आठवतंय?''
""...एका बाजूला हाडांच्या सांध्यात लपून राहिलेला हा कॅन्सर मला जगू देणार नाही. जगात माझ्यानंतर कोण हिचे? कसे होईल हिचे? अनाथाश्रमाच्या पायरीवर सोडून जाणारी आई आणि मध्यात संसार सोडून जाणारा मी यांत फरक तो काय? ती किमान बरी तरी... ओढ लावून गेली नाही... मी मात्र प्रेमाचे जाळे तिच्याभोवती विणून आता निघून जातोय...''
तिला बोलता येत नव्हते...
केतकरने गाडी थांबवली.. ती गाडीतून उतरली....
दहा वर्षांपूर्वी मी याच होस्टेलवर राहात होते... तुला आठवतं... माझ्यासारख्या अनाथ मुलीवर त्याने इतकं प्रेम केलं, की मला पुन्हा अनाथ करताना त्याचा जीव गुदमरायला लागला होता रे... मी समोर असताना त्याला त्याचा शेवटचा श्‍वास घेणंही जड जाईल.... लोक मला कृतघ्न आणि नालायकही म्हणतील. पण मी त्याला सोडलेलं नाही... त्याच्या गळ्याभोवती माझ्या प्रेमाचा फास लागलाय तो थोडा सैल केला इतकंच... तो
स्वतंत्र होईल... पण मी मात्र कायमची अडकेन...