रविवार, १० मार्च, २०१३

माया


""गुलजारांनी मायाला का मारलं असेल रे?''
दोरीवरचे कपडे काढता काढता तिने केलेल्या या प्रश्‍नाने तो थोडा आश्‍चर्यचकीतच झाला, पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले.
""सांग ना? गुलजारांनी मायाला का मारलं असेल? केवळ महेंद्रला एकटं ठेवण्यासाठी? की महेंद्रला नायक करण्यासाठी?... बोल ना?''
""कशाला आडकतेस सिनेमांत.. तीन तासांचा सिनेमा बघायचा, आवडला तर वेळ चांगला गेला म्हणायचं. नाही आवडला तर वेळ तरी गेला याचं समाधान मानायचं आणि सोडून द्यायचं.''
त्यानं आपलं सरळ तत्वज्ञान मांडलं.
"" हे खरंच, पण तरीही काही सिनेमे राहातातच ना मनात घर करुन. प्रभाव टाकतात, का माहित नाही, पण त्यातली पात्रं आपली वाटतात, त्यांच्या सुखानं आपण सुखावतो आणि दुःखानं दुःखी होतो. त्यामुळे वाटतं रे. तिचा काय दोष? तिनं कोणताही अपराध नाही केला.. आपल्या भावनांशी प्रामाणिक राहिली ती... महेंद्रला जमलं नाही ते... मग महेंद्रला मारायला नको का?...''

तो काहीच बोलला नाही... ती त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेनं बघत होती.
""जर माया मेली नसती तर...
""तर काय?...''
""...तर महेंद्र नायक झाला असता?... त्याला नायक म्हणून लोकांनी स्वीकारलं असतं?... नसतं स्वीकारलं... महेंद्रला नायक करायला माया मरायलाच हवी होती.''

हातातला पेपर खाली घेतला आणि त्याने वर बघितलं. ती अस्वस्थ वाटत होती... बाहेर उत्साहाने भरलेली आणि आतून खूप एकटी.. एकाकी.. तसं ती बोलायची खूप.. सांगायचीही खूप.. पण गाळून... आडून आडून सांगायची... सर्वच दुःखांना सुखाचा मुलामा लावण्यात तिच्याइतकं पटाईत कोणीच नव्हतं. एकदा चुकून बोलून गेली होती, अवती-भवती माणसं खूप असतात... पण तो सगळा कचराच नाही रे?... पण तेवढंच.. नंतर कधी तिच्या बोलण्यातून अनुत्साह दिसला नाही. खळखळ कधी जाणवली नाही..
""मी काय विचारते आहे? लक्ष आहे का इकडे? तुझं बाबा त्या पेपरकडेच लक्ष..
""महेंद्रला नायक करण्यासाठी मायाने का मरायचं? की कथा पुढे जाण्यासाठी लेखकाला कुणाला तरी मारावंच लागतं? माया जगली असती तर तिचं अस्तित्व काय? महेंद्रसोबत ती राहिली असती तर काय? महेंद्र नायक राहिला असता? त्याचं नायकत्व त्याच्या एकटं राहण्यात आहे... म्हणूनच तर तर इंदू त्याला सोडून जाते आणि माया मरुन जाते... '' ती बोलत होती. विचारत होती.. तो मात्र गप्प होता..
""तू बोलत का नाहीस? खरंच ना? महेंद्र एकटा राहिला म्हणूनच तर नायक ना?...''

ती खूप वेळ विचारत राहिली.. पण तो काहीच बोलला नाही.. मग ती आपल्या कामांसाठी निघून गेली.
खरंच, महेंद्र आहे का नायक? च्छे! महेंद्र कुठला नायक?... चित्रपटाच्या लांबीत त्याला जास्त रोल आहे एवढंच. पण त्यामुळे तो नायक कुठे होतो? तो जगतो का? कोणासाठी? त्याचं मायावर प्रेम की इंदूवर? त्याला एकच निवडायची असेल तर ते शक्‍य आहे का? नायकाला ते जमलं पाहिजे. महेंद्रला कुठला निर्णय कधी घेता येतो? तो सर्वसामान्यांपेक्षा दुर्बळ, हतबल, कदाचित पिचलेलाही.. नायक कुठे पिचलेला असतो?...

त्याची नजर सहज समोरच्या आरशात गेली.. गालावरचे वाढलेले खुंट आणि कपाळावरची आठी त्याला स्वस्त बसू देत नव्हती. आपण जर महेंद्रच्या जागेवर असतो तर सर्वसामान्याप्रमाणे वागलो असतो? की आपली अवस्थाही अशीच झाली असती?.. इंदूला आपण सोडू शकलो असतो की मायाला?... इंदूला सोडणं तुुलनेत सोप्पं... मायाला सोडतो म्हटलं तरी सोडता येत नाही. तिच्याविना जगता येणं अशक्‍य आणि तिच्या सोबत जगणं त्याच्या प्राक्‍तनात नाही..!

त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे आणि कपाळावरच्या आठ्यांकडे बघून ती जोरात हसली..
""अरे नको विचार करू इतका... मी सहज विचारलं.... जाऊ दे रे !''
जाऊ दे!
हा आपला परवलीचा शब्द.. प्रत्येक गोष्टीला जाऊच तर द्यायचं...! गुंत्यात अडकू नये यासाठी जाऊ दे... आपल्या बोलण्याचा विपर्यास्त काढला जाईल म्हणून जाऊ दे... सोप्या प्रश्‍नांची उत्तरं कठीण वाटू लागली की मग जाऊ दे... जाऊच तर दिलं आत्तापर्यंत... पण असं जाऊ दे म्हटल्यानं जातं का? गुंत्यातून पाय निघतो का?... मग असा एक एक गुंता वाढत जातो आणि तो गळ्याभोवती पाश टाकत राहातो... त्यात श्‍वास गुदमरत राहातो.. कधी कधी वाटतं... या गुंत्यांनी आपला गळा दाबून टाकावा आणि मोकळं करावं... पण इतक्‍या सहज मोकळं कसं होता येईल?...

मरते. का? लेखकही समाजाच्या खोट्या चौकटीतच अडकून पडला म्हणून? त्यालाही समाजाने ठरवून दिलेल्या रंगातच चित्र रंगवायला आवडतं म्हणून?... की... की त्याला पुन्हा पुन्हा महेंद्रला मारायचं आहे म्हणून..? माया सोडून जाते आणि सुटते... इंदूही स्वतःचा पदर सोडवून घेत दुसऱ्याच्या हातात हात घालून निघून जाते.. उरतो तो फक्‍त महेंद्र...! रोज मरायला...!!

डोक्‍यात असंख्य मुंग्या चावा घेत आहेत असं त्याला वाटून गेलं... विचारांची माळ कधी गुंफली आणि मायाचा चेहरा कधी पटलावर आला हे त्यालाच कळलं नाही... समोर बायको असूनही त्याला तीच दिसत होती... मेंदूचा सुक्ष्मातील सुक्ष्म भाग तिनेच व्यापून गेला होता.. त्याचीही ती जणू मायाच होती...
.........................

ती... आपल्यावर अतोनात प्रेम करणारी... आपल्यासाठी झुरणारी... कदाचित आपल्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी... पण हलकेच हात सोडवून घेणारी... महेंद्र आणि आपल्यात तेवढे साम्य नक्‍की आहे. आहेच की.. तीही तितकीच सहज... निरपेक्ष आणि संवेदनशील... समाजाला फाट्यावर मारणारी... नकारातही ठाम आणि होकारातही ठाम... नकार देताना आपल्याभोवती सगळी कडी रचून स्वतःला सुरक्षीत करणारी आणि होकार देताना ती सगळी कडी मोडून टाकून जवळ घेणारी... प्रवाही... प्रवाहात ओढून घेणारी... त्या प्रवाहात तुम्हाला काय वाटते याला काही महत्त्व नाही... त्याची दिशा आणि पोचण्याचे स्थळ निश्‍चित असते.. त्यात तुम्हाला स्थान काहीच नाही.. त्यामुळंच
तिच्यासोबत संसार थाटायची स्वप्नं स्वप्नंच राहिली... ती स्वप्नं कसली होती... त्यात तर आपण किती तरी काळ जगलो होतो... तिच्या केसांना कुरवाळायचं होतं... गालांना गोंजारायचं होतं... तिच्या तप्त ओठांवर ओठ टेकवून तू फक्‍त माझीच आहेस हे सांगायचं होतं... तिच्या कुशीत शिरुन बरगड्या मोडेपर्यंत गच्च मिठी मारायची होती... प्रेम कुठे शारीर पातळीवर असतं..? नसतंच ते... पण स्पर्शाइतक्‍या सहज भाषेशिवाय ते पोचत नाही, एकरूप होता येत नाही... हे खरं... तिच्या स्वप्नांची पाखरं माझ्या डोळ्यांतून उडू द्यायची होती... पण नाही जमलं. काही वेळाच इतक्‍या वाईट असतात की त्या वेळांना काही बळी लागतात... तिने नकार दिला ती वेळ तशीच होती.. त्या वेळेला माझा बळी हवा होता. वेळेचे बळी आणि काळाचे बळी यांत फरक आहे. काळ एकदाच बळी मागतो आणि तो घेतला की पुन्हा मागे वळून बघत नाही. वेळ तसं करत नाही. ती असूरासारखी असते. तिला चटक लागते. रक्‍ताची. त्याच त्या रक्‍ताची. त्यामुळेच ती पुन्हा पुन्हा बळी घेत राहाते आणि पुन्हा पुन्हा जिवंतपणाचे पाणी शिंपडत राहाते... जिवंत करून पुन्हा बळी घेण्याचं कसब वेळेइतकं कोणाकडेही नाही...
........
त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती जणू इंदूसारखीच भासत होती. इंदूसारखीच ती.. कर्तव्यनिष्ठ. सोशिक.. ही आपल्याला सोडून जाईल.. नाही कदाचित.. आणि माया मिळेल... तीही नाही मिळणार... इंदूकडे जाण्याचा रस्ता आपल्या हाताने उघडूही.. तिच्यापर्यंत शारीर पातळीवर पोहचूही पण मानसिक आधाराचे काय?.. ना इकडे ना तिकडे... लटकणं हेच प्राक्‍तन...
...............

रात्री केव्हा तरी तिला जाग आली... सकाळच्या एका प्रश्‍नाने त्याचा दिवस खराब गेला होता... आता झोप तरी निट लागली का बघायला ती उठली.. दिवे लावले... खोलीत तो नव्हताच.. नेहमीप्रमाणेच तो अभ्यासिकेत असणार म्हणून तिने अभ्यासिकेचं दार उघडलं... आणि जोरात हंबरडा फोडला... आयुष्यभर लटकत राहण्यापेक्षा एकदाच लटकलेलं बरं म्हणून त्यानं स्वतःला लटकून घेतलं होतं... काळापुढे वेळ हरली होती... तिच्या प्रश्‍नाचं उत्तर आता तिलाच नको होतं !