शनिवार, २३ जून, २०१२

प्रिय,


प्रिय,
तुला माहीत आहेच, मी जिथे राहतो तिथे झाडांची दाटी आहे. तिथे एक आंब्याचे डेरेदार झाड आहे. गच्च काळपट हिरव्या पानांनी बहरलेल्या त्या झाडाच्या एका फांदीवर एक कोकीळ नेहमी बसलेला असतो. गेल्या अडीच वर्षांपासून मी त्याला बघतोय. तो त्याच फांदीवर असतो. अगदी एकटा. दिवसाच्या कुठल्याही वेळेत मी त्या फांदीकडे बघतो, त्यावेळी तो तिथेच असल्याचे मला दिसले आहे. अगदी पहाटेच्या चंद्रप्रकाशातही त्याची ती लांब काळी शेपूट फांदीतून खाली दिसतच असते. अर्थात त्याला मी तिथे पहाटेच जास्त वेळा बघितले आहे. पण भर दुपारीही तो तिथून आर्त गात असायचा. अगदी गेल्या गुरुवारपर्यंत त्याचे ते आर्त गाणे सुरू होते. हिवाळा असो वा उन्हाळा अथवा पावसाळा, अशा कुठल्याच ऋतूचा आणि त्याच्या गायनाचा काहीच संबंध नसायचा. कोकीळ सहसा वसंतातच गातात हा झाला विज्ञानाचा नियम, पण हा पठ्ठ्या कधीही गायचा. कुठल्याही ऋतूत, कुठल्याही वेळी.
पण त्यातही भर दुपारी त्याची गायनसमाधी लागायची. त्याची ती आर्तता बघून मला मंदिरात व्याकूळ होऊन एकतारी घेऊन भजन गाणाऱ्या भक्‍ताची आठवण येते. देवाची आळवणी करताना स्वतःला विसरून गाणारा भक्‍त आणि तो कोकीळ यांच्यात मला बरेच साम्य वाटते. भजनकऱ्याला जसे स्वतःचीही जाणीव नसते. अगदी तसेच त्या कोकीळला कुठल्याही ऋतूची जाणीवच नसते. जणू एक ऋतू त्याच्याभोवती वेढा टाकून बसला आहे आणि तो त्यात गुरफटून राहिला आहे. त्यामुळेच अगदी भर पावसातही तो "कुहू'चा टाहो फोडत असतो. त्याला मी असे पावसातही गाताना बऱ्याचवेळा ऐकले आहे. जणू आपल्या प्रियतमेची आठवण त्याला जगू देत नाही आणि मरूही देत नाही. तिला आळवताना त्याचा सूर आर्त व्हायचा. त्याची ती आर्तता ऐकून स्वर्गात जर देव असतील तर तेही नक्‍कीच व्याकूळ झाले असतील यात शंका नाही. अगदी निसर्गाच्या उलटच आहे. पण जे आहे ते हे आहे. पण का कोणास ठाऊक पण तो कोकीळ गेल्या गुरुवारपासून गायचाच बंद झाला. तो तिथेच असतो. त्याची ती काळी शेपटी त्या फांदीतून तिथेच दिसते, पण तो गात नाही. अगदी समाधी लावल्यासारखा असतो. मला वाटलं त्याला जोड मिळाला असेल. पण त्या फांद्याआडून दुसरी शेपटी दिसली नाही कधी. तरीही तो गात नाही, सूर आळवत नाही. त्याची आर्तता संपली की काय असा प्रश्‍न मला पडला होता. समाधीस्त ऋषीच्या दर्शनानेही समाधान मिळते ना अगदी तसेच समाधान त्याच्याकडे बघितले की मिळते. काल पहिल्यांदा मी त्याला त्याच्या नेहमीच्या फांदीपेक्षा दुसऱ्या फांदीवर बसलेलं बघितलं. त्याच्या पंखांची थोडी फडफडही ऐकू आली. अगदी कीर्तनात दंग झालेल्या महाराजांसारखाच तो. देवाने दृष्टांत द्यावा आणि कीर्तनकाराच्या चेहऱ्यावर ओसंडून आनंद वाहावा असाच तो भासला. बहुतेक त्यालाही त्याच्या प्रियतमेने दृष्टांत दिला असेल. त्या क्षणभर दर्शनानेही तो मोहरून गेला असेल. कोकीळच तो... आता तो येत्या वसंतात गायीलही, पण ते सूर आनंदाचे असतील आणि समाधानाचेही.....त्याला ते सूर नक्‍की सापडतील... तुला काय वाटतं....
तुझाच...