बुधवार, २ जानेवारी, २०१३

प्रिय,

प्रिय, 
नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! प्रत्येकवेळा पत्राची सुरवात काय करावी हेच कळत नाही. म्हणजे माणूस  बघ कोणाशी बोलायचं असेल तर मुद्दाम खाकरतो. कळलं का? ऐकलं का? असे उगाच सांगतो. तसेच पत्र लिहिताना हा उगाचचा पसारा खूप मांडावा लागतो. मग एकदा पसारा मांडला की मग त्यातून हवे ते उचलून दाखविता येते. खरे तर पत्र लिहिण्याचा उद्देश दुस्तर हा घाट. गौरी तुझी आवडती लेखिका होय ना! तुला तिची नमू आवडते! नमू, हरिभाई आणि वनमाळी सगळ्यांच्याच प्रेमात जणू तू. गौरीने खूप सहजतेने नमू निर्मिली आहे. मला नमू अस्वस्थ करुन गेली हे खरेच पण मला आवडला तो नकुल. अलिप्त. मुक्‍याने प्रेम करणारा. कादंबरीत त्याला फारसा वाव नाही तरीही का कोणास ठावूक पण मला नकूलच आवडला. अर्थात त्याच्यावर गौरीने अन्याय केलाय ही भावनाही आहेच. नकुलचा जेवढा हक्‍क होता तेवढं काही त्याला मिळालेलं नाही. अगदी त्याला दिलेल्या अपंगत्वासारखंच कादंबरीतील त्याचं अस्तित्वही पंगू करुन ठेवलंय जणू. गौरीने त्याला "नकुल' हे का नाव दिले मला माहीत नाही. कदाचित तो घोड्यावरुन रपेट मारतो एवढ्या एकाच संदर्भासाठीच जर तिने त्याला नकुल म्हटले असेल तर त्या नकुल या नावावरही अन्याय आहे. अर्थात त्या एका कारणासाठी गौरीने त्याला नकुल हे नाव दिले नसणार हे निश्‍चित. त्याच्यातील आणखी काही पुसटरेषांना अधोरेखीत करण्यासाठी तिने हे नाव दिले असावे पण तरीही
महाभारतातील नकुलाची बाकीची वैशिष्ट्य गौरीच्या नकुलमध्ये अस्पष्टच दिसतात. काही रेषा आणखी ठळक करता आल्या असत्या तर... तर कदाचित त्या रेषांपुढे वनमाळीच्या रेषा कमकुवत झाल्या असत्या की काय? हा प्रश्‍न पडतो.
नकुल शब्दाचा मुळात अर्थच देखणा, विद्वान आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारा असा आहे. महाभारतातील नकुल असाच होता. आपल्या भावांवर कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम करणारा. अश्‍वप्रशिक्षणात प्रवीण असणारा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जनक पित्याचे रुप घेतलेला. माद्रीची दोन्ही मुले देखणी होती. सहदेव आणि नकुल. पण त्यातही नकुल उजवा होता. व्यासांनी अर्जुनाला पुर्ण पुरुष केले पण आकर्षक ठेवले नकुलला. तो एवढा देखणा होता की त्याच्यासारखा देखणा पुरुष त्याकाळी अस्तित्वातच नव्हता. ( लक्षात घे कृष्ण आणि अर्जुन दोघे असतानाही नकुलाबाबत जर ही अख्यायिका असेल तर तो किती देखणा असेल!) त्यामुळेच अज्ञातवासाच्या काळात नकुलला आपल्या अंगावर राख आणि माती माखून घेऊन रुप लपवावे लागले होते. अशा देखण्या पुरुषाचे नाव देताना गौरीने या नकुलवर प्रचंड अन्यायच केला ही भावना तीव्र होते. त्यात त्याला पंगू करुन तर तिने नकुलवर सुड उगवलाय की काय असे वाटत राहाते. वनमाळीचे रुप आणि नकुलाचे रुप हे भिन्न. अगदी कृष्ण आणि नकुलासारखे. दोघांच्या रुपातला गोडवा वेगळा. दोघांची प्रेम करण्याची ते जाणवू द्यायची पद्धत वेगळी. पण तरीही महाभारतातल्या नकुलाला मिळालेली अवहेलना गौरीनेही कायम ठेवली म्हणायला वाव आहे. खरे तर तिने नकुल हे नावच घ्यायला नको होते.
पांडवांच्यात सगळ्यात कर्तृत्वान पुरुष होता अर्जून त्याखालोखाल भीम मग युधिष्ठीर आणि नकुल सहदेव हे पांडवांची पाच नावे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली दोन कडी एवढ्याच अंगाने येतात. अगदी द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी त्वेषाने लालेलाल झालेला भीम लोकांना दिसला, पण त्याचवेळी आपल्या भावाच्या प्रेमाखातर गप्प बसावे लागल्याची विषन्नता मनात दाबून काळाठिक्‍क पडलेला नकुल नाही कोणाला दिसला. मल्लविद्येत निपून असलेला भीम, धनुर्विद्येत एकमेवाव्दितिय असलेला अर्जून किंवा धर्मनिष्ठेने राहणाऱ्या युधिष्ठिराच्या झोळीत व्यासांनी भरभरुन माप ओतले. पण माद्रीच्या नकुल आणि सहदेवाच्या ओंजळीत तिर्थ घालतानाही जणू कंजूषपणा केला. यक्ष प्रश्‍नावेळीसुद्धा युधिष्ठीर माद्रीचा एक पुत्र मागतो तो माद्रीवर उपकार करत असल्यासारखा. त्याला तर भीम आणि अर्जुनच हवा असतो पण मग मी कुंतीचा एक मुलगा जिवंत असताना दुसराही कुंतीचा कशाला त्यापेक्षा माद्रीचा एक. त्यात भावना आणि धर्म असेलही पण त्यातही व्यासांनी नकुलला किंवा सहदेवाला त्यांच्या अंगभूत कर्तृत्वाची शबासकी दिलेली नाही. त्या प्रश्‍नावेळी तर युधिष्ठीराला त्यागाची मूर्ती दाखविताना नकुल आणि सहदेवाला नालायकच जणू दाखविण्याचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे मूळ महाभारतात नकुलला त्याचे माप ओंजळीत टाकलेलेच नाही उलट त्याच्याकडे असलेल्या अश्‍वविद्येचा आणि तलवारबाजीत निपूण असलेल्या कलेचा ओझरता उल्लेख केला आहे. महायुद्धात अर्जूनाने रथ अडकलेल्या कर्णाचा वध केला तोही शल्याच्या सारथ्यामुळे. शल्य हा सहदेव आणि नकुलचा मामा. त्यामुळे आपल्या भाच्यांचा पराभव होऊ नये म्हणून क्षणोक्षणी त्याने कर्णाचा तेजोभंग केला आणि त्याचा रथ चिखलात अडकला. अर्जूनाने कर्णाचा वध काय किंवा भिष्म, द्रोणाचा केलेला वध हा युद्धनिपूणतेवर कुठे केला आहे. कधी शिखंडीची मदत तर कधी युधिष्ठिराची मदत घेऊन कट-कारस्थाने रचून विजय मिळविले. पण त्याचवेळी धर्माने युद्ध करणाऱ्या नकुलने कर्णादि कौरंवाच्या मुलांचा केलेला पराभव अगदी त्रोटकपणे मांडला आहे. व्यासांनी कदाचित सर्वांना समान न्यायाने वागवले असेलही पण त्यानंतर महाभारत जीरविणाऱ्या लोकांनी मात्र नकुल आणि सहदेवाला खड्यासारखे बाजुला काढून ठेवले हे मात्र खरे. गौरीनेही तेच केले. नकुलला तेवढेच महत्त्व दिले. त्याच्यातील अंतर्विरोध, त्याच्या भावना सगळे कसे त्याच्यासोबतीनेच ठेवले. त्याचे नमूवर प्रेम आहे का? नमू त्याच्याबाबतीत नेमका किती विचार करते ते स्पष्टपणे येतच नाही. तोही येता-जाता येतो. डोकावतो आणि निघून जातो. घर करुन राहात नाही. तो घर करतो अगदी काहींच्याच मनात. त्यांना तो हॅण्डसम वाटतो कदाचित दुर्लक्षित किंवा अजाणही. त्याच्या एकटेपणाची किव येत नाही तर त्याच्या एकटेपणाबाबत कुतुहलता वाटते. कुसुमाग्रजांची एक कविता आहे . अहि नकुल नावाची त्या कवितेतला नकुलही असाच. अचानक येणारा आणि आपले कार्य संपल्यावर निघून जाणारा. रेंगाळणे हे त्याच्या प्राक्‍तनात नाहीच. रेंगाळले की आशा वाढते आणि आशा वाढल्या कि त्यातून अटी निर्माण होतात. त्यामुळे तो अटी निर्माण करत नाही. जे द्यायचे त्याचा हिशोब मांडत नाही. त्यासाठी त्याला काही वेदना होतात का? याचाही हिशोब नसतो. म्हणूनच त्याला नकुल म्हणतात. मला नकुलासारखे प्रेम करणे ज्याक्षणी जमेल त्या क्षणाची वाट बघतोय.

तुझाच...