मंगळवार, १३ मार्च, २०१२

बांगड्या....

तिने कपाटातून पुन्हा बांगड्या काढल्या... त्या बांगड्या तिने डोळे भरून बघितल्या आणि फडताळात कोंबून ठेवल्या. जोरात दार लावले, लाकडी कपाटाचे ते दार पावसाळी हवामानामुळे फुगले होते. त्याचे दरवाजे घट्ट बसत नव्हते. तरी ताकदीने दोन्ही दरवाजे तिने लावले आणि त्याच्या कोयंड्याला कुलूप लावले. काही क्षण ती तिथेच बसून राहिली. मग कसल्या तरी आठवाने उठली आणि आवेगातच तिने घर सोडले. या बांगड्यांबद्दल वहिनींना सांगायलाच हवे. त्यांना किती आनंद होईल. त्यांनी प्रत्येकवेळी मदत केली. तिच्या डोक्‍यात विचार येत होते.. ती लगबगीने चालत होती... जणू पळतच होती... बंगल्याच्या दारात आल्यावर तिने दीर्घ श्‍वास घेतला. चेहऱ्यावरचा आनंद जितका लपवता येईल तितका लपवला आणि तिने बंगल्याची बेल वाजवली... वहिनींनीच दार उघडले... एवढ्या सक्‍काळी - सकाळी कशी ही म्हणून त्यांना आश्‍चर्य वाटले, पण त्यांनी ते चेहऱ्यावर आणू दिले नाही. ती आत गेली...
अगं, अजून भांडी नाही पडलीत... थोडा वेळ थांब... चहा घेणार का? वहिनी बोलत बोलत आत गेल्या... ती गप्प बसून राहिली... थोडा वेळ तसाच गेला. धीटाई करून आत जावे आणि वहिनींना सांगावे, असे तिला वाटले; पण आपलेच सुख आपण कसे सांगायचे म्हणून ती गप्प बसली... तिला सुख कुठल्या शब्दात व्यक्‍त करतात हेच माहीत नव्हतं...
वहिनी थोड्या वेळाने बाहेर आल्या... तशी ती पुढे झाली. तिचे डबडबलेले डोळे आता कोणत्याही क्षणी पाझरू लागतील अशी स्थिती होती... पण ती बोलली नाही. वहिनी काहीबाही सांगत राहिल्या... तिच्या कानावर ते शब्द पडत राहिले; पण डोक्‍यात काही गेले नाहीत.
भांड्यांचा ढीग बघून तिने पदर खोचला आणि ती कामाला लागली... एक-एक भांडे घासता-घासता तिच्या डोळ्यांतून अश्रूंची माळ वाहत होती. जणू कित्येक वर्षांपासून ती माळ तिच्या पापण्यांच्या आत तशीच होती आणि कुणीतरी हलकेच त्यातील धागा काढून टाकावा आणि एक एक मोती सरकत सरकत खाली यावा... अगदी तसेच... तिला काही क्षण ते अश्रू लपवावेत वाटले; पण तिने आज त्यांना आडवले नाही...
वहिनी कोणाला तरी सांगत होत्या... या आता भांडी घासताहेत. त्या खूपच सोशिक आहेत. नवरा लवकर गेला... यांनीच मुलाला वाढविले... धुणी-भांडी करून त्याला इंजिनिअर केले... सासूनं दिलेल्या दोन बांगड्या काय ते तिची मालमत्ता, ती पण तिने पोराच्या शिक्षणासाठी मोडून टाकली... पोरगंही हुशार निघालं... कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच त्याचे सिलेक्‍शन झाले... चार-पाच लाखांचे पॅकेज मिळाले; पण हिचे दुर्दैव काही संपले नाही. गेल्या चार महिन्यांपासून त्याने एक पत्र की फोन केला नाही. त्याला नोकरी लागली, त्यावेळी किती आनंदात होती ती. म्हणाली होती, ""वहिनी, पोरगं मिळवतं झालं... आता काय तुमच्याकडं येणं हुईल, असं वाटत नाही... पण माझ्या सासूनं दिलेल्या बांगड्या म्या मोडल्या. आता सुनंला चार बांगड्या घातल्या की माझं काम सपलं... त्यामुळे काही दिस तुमच्याकडं काम करायला लागंलच... ''
पोरगं एवढं मिळवतं झालं तरी हिचं काम काही सुटलं नाही बघा... सुनेला सोन्याच्या बांगड्या घालेपर्यंत हिचे हात तेवढे मजबूत राहू दे एवढीच प्रार्थना... एवढं कष्ट करून हिने पोराला वाढविलं... चांगला इंजिनिअर केला... पण आता त्याला आईची लाज वाटत असणार. त्यामुळेच फिरकला नाही. आला नाही तर नाही, पण चार पैसे तरी पाठवायचे... पण ते पण नाही... असली पोरं जन्माला येण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं बरं... वहिनी ताड-ताड बोलत होत्या... वहिनी नेहमीच तिच्याविषयी मायेने बोलायच्या... पोरासाठी आपल्या पोराचा जुना सदरा हक्‍काने द्यायच्या... घरात काही चांगलं-चुंगलं केलं की पोरासाठी घेऊन जा म्हणून सांगायच्या... झेपेल तेवढी पैशाची पण मदत केली... पण वहिनींचे हे बोलणे तिला आज नाही आवडले... ती उठली आणि सरळ निघून गेली... वहिनींना काही समजले नाही...
दुसऱ्या दिवशीही ती वेळेअगोदरच आली... वहिनींना काही कळेना...
""अगं, तू जादा काम लावून घेतले आहेस की काय? तुझी तब्येत बघ किती तोळा-मासा झाली आहे. अशी जर तू काम करायला लागलीस तर आजारी पडशील आणि इथे तू आजारी पडलीस तर कोण आहे बघायला... तुझा तो पोरगा दीडशहाणा एकदा नोकरी लागली तो गेला तिकडेच... तू बसलीएस इथे सुनेला मी हे करणार - ते करणार करत. उद्या तो येईल बायकाबरोबर आणि सांगेल ही तुझी सून आणि हा तुझा नातू...'
वहिनी कळकळीने बोलत होत्या... ती गप्प बसली... काय करावे हेच तिला सुचत नव्हते... तिने तरी हिम्मत केली... कनवटीची चिठ्‌ठी काढली आणि वहिनींसमोर धरली... वहिनींनी चिठ्‌ठी वाचायला सुरवात केली..
प्रिय, आई
खूप दिवसांनी पत्र लिहितोय. तू रागावली असशील. पण काय करू... मागे एकदा शेजारघरी फोन लावला होता, त्यांना तुला बोलवायला सांगितले होते... पण काकांनी फोनच असा उचलला की तू त्या घरात यावी असं वाटलंच नाही. मग फोन करायचे सोडून दिले. काका फोनवर बोलले पण तसेच दुसरेही... ते बोलत नाहीत म्हणून त्यांना गृहीत धरण्यात अर्थ नाही. तुला वाचता येत नाही. त्यामुळे पत्र तरी कसं लिहिणार... पण आज ऑफिसमधलाच एक सहकारी तिकडे येतोय असं कळल्यावर त्याच्याकडून दिलं हे पत्र. तो दाखवेल वाचून... सोबत चार सोन्याच्या बांगड्या पाठविल्यात. दुकानदार मला म्हणाला, अरे बांगड्या घेताय पण हाताचे माप आणले नाहीत... मला तुझी मूर्ती आठवली... तुझ्या हाताचे माप काय आणि कसे द्यायचे हेच कळेना... मग मी सरळ माझ्या हातांचे माप दिले... माहीत आहे मला, त्या तुला मोठ्या होतील. पण त्या तुला नक्‍की वर्षभरात येतील. आणि हो... सोबत मी काही पैसे पाठविले आहेत... मीही पुढच्या महिन्यात दहा-बारा दिवसांची सुटी घेऊन येतोय... रागावू नकोस...
तुझाच..

या चिठ्‌ठीबरोबर तिने त्या बांगड्या वहिनींच्या हाती दिल्या... वहिनींनी त्या बांगड्या बघितल्या आणि एवढेच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले... हा मुलगा स्वतःच्या पोटाला खातो की आईच्या हातांना स्वप्नात बघून जगतो कळत नाही... त्याच्या पगाराच्या मानाने त्या बांगड्या खूपच महाग होत्या...

.................................
****सकाळ स्मार्ट सोबतीमध्ये 8 मार्चला छापलेली माझी लघुकथा