मंगळवार, १४ एप्रिल, २००९

धर्म, पुतळा आणि गल्लत



त्यानं जगाला हसवलं. हसवताना जात-पात, धर्म कधी पाहिला नाही. परिस्थितीने अनेक वेळा त्याच्याविरोधात बंड पुकारलं; पण त्यानं त्या परिस्थितीला आपल्या कलेत डोकावू दिलं नाही... चार्ली चॅप्लिन हे त्या थोर कलाकराचं नाव. त्याच्या पुतळ्याच्या अनुषंगाने कर्नाटकात निर्माण झालेला वाद यातना देणारा आहे.

एकीकडे महाराष्ट्रात साहित्य संमेलन आणि आनंद यादव यांच्या पुस्तक आणि त्यांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या अनुषंगाने घडलेल्या गोष्टींबाबत जोरदार चर्चा होत असतानाच तिकडे कर्नाटकातही अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. धर्म आणि कला यांची अनावश्‍यक गल्लत झाल्यावर काय स्थिती निर्माण होऊ शकते, याचे एक उदाहरण सध्या कर्नाटकात पाहायला मिळते. तिथल्या राज्यकर्त्यांनी धर्मालाच कलेच्या खांद्यावर बसवून टाकले आहे. धर्माचा बोजा सहन न होऊन लडखडणाऱ्या कलेकडे राज्यकर्ते त्रयस्थासारखे बघत आहेत. त्यामुळेच ज्याचा धर्म केवळ लोकांना हसविणे हा होता त्या चार्ली चॅप्लीनच्या पुतळ्याला तो केवळ ख्रिश्‍चन आहे म्हणून विरोध होत आहे. केवढा हा दैवदुर्विलास!
चार्ली चॅप्लीन यांचा 67 फूट उंचीचा पुतळा पश्‍चिम किनारपट्टीवरील पदूवारी या गावात उभारण्यात येणार होता. कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक हेमंत हेगडे त्यांच्या आगामी चित्रपटासाठी हा पुतळा उभारणार होते; पण स्थानिकांनी या पुतळ्यास विरोध केला. त्यासाठी प्रमुख कारण होते ते चार्ली चॅप्लीन यांच्या धर्माचे. ज्या जागेवर हा पुतळा उभारण्यात येणार होता, तेथे समोरच एक मंदिर आहे. हिंदूंच्या मंदिराच्या दारात एका ख्रिश्‍चन माणसाचा पुतळा उभा करू देणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुखवटा स्थानिकांचा असला, तरी हिंदुत्ववादी संघटनांची भूमिकाच स्थानिकांच्या मुखातून बाहेर पडत आहे हे उघड आहे. विशेष म्हणजे हा पुतळा कायमस्वरूपीही नव्हता. केवळ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंतच पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार होता. त्यानंतर तो तेथून हलविलाही जाणार होता; पण तरीही स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला.
विशेष म्हणजे प्रशासनाची भूमिका या प्रकरणात बोटचेपी आहे. कलेचे स्वातंत्र्यच धोक्‍यात येत असताना प्रशासन विरोधकांची बाजू घेत आहे. कला आणि धार्मिकता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कलेला धर्म असत नाही. धर्माच्या पलीकडे कला असते, म्हणूनच कलाकार धर्मातीत असतात. त्यामुळेच त्यांच्या अभिव्यक्‍तीला पाठिंब्याची आवश्‍यकता असते. समाजाने आणि राज्यकर्त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे अभिप्रेत असते. इथे कलाकारांना प्रोत्साबन लांबच उलट त्यांना दबावाखाली काम करावे लागत आहे. "विशिष्ट' समुदायाला न आवडणारे भाष्य केले, तर त्यांच्यावर हल्ला होण्याची भीतीही आहे. याची उदाहरणे रोजच समोर येऊ लागली आहेत. स्वयंघोषित धर्म आणि संस्कृतीरक्षकांनी कर्नाटकातच पबमधील महिलांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडली आहे. कर्नाटकात अल्पसंख्याकांवर हल्ला, प्रार्थनास्थळांवर हल्ला असे प्रकार तर आता नित्याचेच होऊ लागले आहेत. एका विशिष्ट पक्षाची सत्ता असली, की आपला धार्मिकतेचा अजेंडा पुढे ढकलता येतो हे तथाकथित संस्कृतीरक्षकांना पाठ झाले आहे. त्याचाच फायदा घेत त्यांनी चॅप्लीनच्या पुतळ्यास विरोध केला आहे. पुतळ्याला विरोध करण्यामागे काही तात्विक दृष्टिकोन असता तर तो समजून घेता आला असता; पण केवळ चॅप्लीन ख्रिश्‍चन आहे आणि हिंदू मंदिरासमोर एका ख्रिश्‍चन माणसाचा पुतळा उभा राहणे म्हणजे धर्म बुडणे असा अपप्रचार करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुतळा कोणा ख्रिश्‍चन मिशनऱ्यांना उभा करायचा नव्हता, तर तो एका हिंदू दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटासाठी उभा करायचा होता; पण याला अविचाराने विरोध करण्यात आला.
पुतळ्याला झालेला विरोध पाहून कर्नाटकातील नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांतील अनेकांना धक्‍काच बसला. अभिव्यक्‍ती आणि कलेचा संकोच होतो आहे, असा टाहोही त्यांनी फोडला; पण त्याकडे कोणी लक्ष दिले नाही. एरवी राज्यकर्त्यांना अवैध, अनैतिक कामे करण्यास परवानगी लागतेच असे नाही; पण पुतळ्यासाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नाही आणि स्थानिकांच्या भावना महत्त्वाच्या असे समर्थन करण्यात येत आहे. ते दुर्देवी आहे.