रविवार, ३ एप्रिल, २०११

सोळा सहस्रातील स्त्री

डोक्‍यावरचा मोरपिसांचा मुकुट त्याने काढून ठेवला आणि तो बाथरूमध्ये शिरला. चेहऱ्यावरचा रंग धूत असतानाच कोणी तरी कडी वाजविली. त्याने चेहरा धुतला आणि तो पुसतच तो बाहेर आला. अजुनी अंगावरची नाटकातील कृष्णाची वस्त्रे तशीच होती. गळ्यातील माळ आणि पितांबर तसेच होते. खरे तर त्याला आज खूप कंटाळा आला होता, कोणी भेटायला सही मागायला येऊ नये असेच वाटत होते; पण समोरच्या त्या बाईंना त्याला थांबवावे नाही वाटले. ती बाई आत आली.
तुमचं कृष्णाचं काम खूप सुंदर झालं. मला तुमचा अभिनय खूप आवडतो.
त्यानं उगाच हसण्याचा प्रयत्न केला. आभारी आहे, अशा अर्थाने त्याने मान हलविली.
ती बाई तिथेच उभी राहिली... त्याला तिचे तसे उभे राहणे अस्वस्थ वाटू लागले.
तुम्ही बसा ना?
तिही थोडी संकोचली होती; पण बसली. ती बसल्यावर त्याला आपण उगाचच तिला बसायला सांगितल्याचे वाटून गेले.
तुमच्याकडे बघितल्यावर कृष्ण तुमच्यासारखाच दिसत असेल असे वाटते हो?
""नाही हो हे तुमचे प्रेम आहे. रंगांची पुटं चेहऱ्यावर चढवून कृष्ण रंगवणारे आम्ही बहुरुपी. त्या योगेश्‍वराचे रुप कुठे यायचे आम्हला.''
त्याचे ते थोडे लांबलेले वाक्‍य ऐकून ती थोडी सैल झाली. तिथेच व्यवस्थित बसत तिने त्याच्याकडे बघितले. तो थकला होता; पण तरीही त्या बाईचे तिथे बसणे त्याला खुपत नव्हते. ती काही फार सुंदर म्हणावी अशी नव्हतीच. खरे तर थोडी सावळी होती. चाळीशी पार केली असेल; पण निटनेटक्‍या कपड्यांमुळे ती थोडी आकर्षक वाटत होती.
""पण तुमच्यातील राधाकृष्णच योगेश्‍वर कृष्णापेक्षा जास्त भावतो. त्या शेवटच्या प्रसंगातील यादवीने असह्य झालेल्या कृष्ण नाही बघवत.''
""पण खरे तर तोच कृष्ण खरा की... असह्य, दुर्बल तो कुठे योगेश्‍वर आहे. महाभारताच्या युद्धा वेळी अर्जुनाला उपदेश सांगणारा, पांडवांसाठी शिष्टाई करणारा आणि जरासंधाचा वध करण्यासाठी भीमाला प्रोत्साहित करणारा कृष्णच तो राधाकृष्ण.'' तो खाली बसला. त्या बाईंकडे त्याने आणखी एकदा निटस्‌ बघितलं, कुठे ओळख लागते का बघण्यासाठी मेंदूच्या शेवटच्या पेशीपर्यंत ताण दिला; पण कुठेच संदर्भ लागला नाही.
""तुम्ही अनेक भूमिका केल्या; पण तरीही वीस वर्षांपूर्वीचे हे नाटक तुम्हाला अजून का करावे वाटते.''
तसा तो अबोल, खूप कमी बोलायचा. कोणी पत्रकाराने वैगेरे काही प्रश्‍न विचारले तरी तो जास्त काही नाही बोलायचा. त्याच्या मुलाखतीही खूप जणांनी घेतल्या; पण त्या शाळा-कॉलेजांत अर्ज भरून द्यावा तश्‍याच स्वरूपाच्या. अलीकडे तर तो काही बोलायचाच नाही. त्याच्या जुन्या मुलाखतींनाच नव्या स्वरूपात पत्रकार सादर करायचे. कधी काळी काही मते त्याने मांडलेली असायची; पण ती आज पुरती बदललेली असायची तरीही ती मते त्याच्या नावावर वर्तमानपत्रे खपवायची. त्याला त्याचे काहीच वाटायचे नाही. आता त्या मतांनाही किंमत फक्‍त काही मिनिटांच्या मनोरंजनाची आहे हे त्याला कळले होते. पण आज या बाईंशी बोलावं असं त्याला वाटू लागलं. कुठे तरी समानधागा असेल याची त्याला खात्री वाटू लागली.
तुम्हाला माझा प्रश्‍न आवडला नाही का?
त्या बाईंच्या अर्जवी आवाजाने तो भानावर आला.
""तसं काही नाही. या नाटकातील कृष्ण मला फार आवडतो. तो माझा वाटतो. नटाच्या आयुष्याची शोकांतिका हीच असते तो अनेक भूमिका करतो. अनेकांची चरित्र पडद्यावर किंवा रंगमंचावर मांडतो; पण स्वतः मात्र कोरडाच राहतो. या कृष्णाच्या भूमिकेत मला माझं पण दिसतं. खरे तर मला या भूमिकेच्या तालमीच जास्त करायला आवडतात. त्या आपल्यासाठी असतात ना? त्या भूमिकेतून बाहेर यावं असं वाटतचं नाही; पण तालमी केल्यानंतर नाटक रंगमंचावर यायलाच पाहिजे नाही तर इतरांची पोटे कशी भरणार म्हणून हे नाटक रंगमंचवर येते एवढेच.''
म्हणजे मला नाही समजलं. त्या योगेश्‍वर कृष्णात आणि तुमच्यात साम्य आहे असं वाटतं की काय?
नाही ओ. त्या योगेश्‍वर कृष्णात आणि माझ्यात काही साम्य शोधायचे म्हणजे असंख्य सूर्याने व्यापलेल्या आकाशात आणि आपल्यात एखाद्या काजव्याने साम्य शोधावे तसेच आहे. ''
मग तरीही तुम्हाला कृष्णात साम्य वाटतेच की.
हो पण त्या योगेश्‍वर कृष्णात नाही. तुम्हाला त्या नाटकातील एक प्रसंग आठवतो. नरकासूर वधानंतर कृष्ण त्या सोळा सहस्त्र स्त्रियांना आपलेसे करतो. त्या रात्री कृष्णाला झोप लागत नाही. आपल्या महालात येरझाऱ्या घालणाऱ्या त्या कृष्णाकडे त्या सोळा सहस्र स्त्रियांतील एक धीट स्त्री येते.
हो... आठवते. तोच एक तर प्रसंग मनाच्या कुपीत कायम ठेवलाय... त्या एका प्रसंगासाठीच तर मी हे नाटक अनेक वेळा बघितले. बघते आहे... त्यातील शब्द अन्‌ शब्द तोंड पाठ आहे... ती म्हणते...
कृष्णा तुझी बेचैनी कळते रे...सहस्त्र स्त्रिया मिळूनही तू तसा कोरडाच की. खरे तर तू त्या राधेच्या प्रेमपाशातून मुक्‍त झालाच नाही, होणारही नाहीस.. तू गोकुळ आणि मथुरा सोडून इथे आलास त्यामागे राधेला विसरणे हेही होतेच की. पण ते तुला काही जमले नाही. राधेला विसरणे म्हणजे स्वतःला विसरणे. तुझ्या पराक्रमात, तुझ्या शिष्टाईत, तुझ्या साऱ्या गुणांतून राधाच तर दिसते. राधेला तुझ्यातून वेगळे केले की तू तुझा उरतोस कुठे. त्यामुळे आज तुला झोप लागणार नाही, तशी झोप मलाही लागणार नाही.
माणुसकीच्या नात्याने तू आम्हाला जवळ केलंस. तुझ्या राज्यात आम्ही तुझ्या बायका म्हणूनही फिरू. नकासुराच्या राज्यात ज्या बंदीवासात आम्ही होतो त्यापेक्षा निश्‍चितच तुझ्या राज्यात आम्हाला मोकळीक मिळेल. तुझ्या नावाच्या कुंकवामुळे समाजात मानही मिळेल; पण तरीही आम्ही तुझ्या नाही होऊ शकणार. खरे सांगू कृष्णा त्या बंदीवासापेक्षा ही मोकळी हवा फार लागते रे. नरकासुराच्या बंदीशाळेपेक्षा तुझा महाल मोठी बंदीशाळा वाटते. नरकासुराने केलेल्या यातनांचे काही वाटायचे नाही.. तुझी मूर्ती डोळ्यासमोर आली की सगळ्या वेदना सुसह्य व्हायच्या. तू येशील ही आशा होती आणि या सगळ्यातून तू आम्हाला बाहेर काढशील, या आशेवरच तर जगत होतो आम्ही; पण तू आलास आणि ती आशाही आमच्याकडून तू हिरावून घेतलीस. आता आम्ही तुझ्या आहोत आणि तू मात्र आमचा नाहीस. ... आता जगायचं कसं. तुझंही असंच होईल. राधेच्या विचाराशिवाय तुला जगायला येणारच नाही.''
तो त्या बाईंकडे बघत राहिला. त्याला एकट्यालाच वाटायचं हे नाटक माझ्यासाठीच लिहिलं आहे. प्रत्येक पात्र माझ्याच भावना बोलत आहे; पण त्या बाईंकडे बघितल्यावर त्याला वाटले हे नाटक माझे एकट्याचे कुठे आहे. त्या बाईतील आणि कृष्णाने मुक्‍त केलेल्या त्या सहस्र स्त्रियांतील अंतर पार मिटून गेल्याचे त्याला वाटले.